भाग ३: अनवट घाटवाटा, रतनगड-आजोबा परिसरातल्या

दिलीप वाटवे's picture
दिलीप वाटवे in भटकंती
22 Dec 2017 - 1:22 pm

-- भाग पहिला --

"पाथरा घाट, आजोबा आणि गुयरीदार घाट"

--दिवस तिसरा--

आजचा टप्पा कालच्या एवढा अवघड काही नव्हता. एकतर गुयरीदार घाट सोप्या प्रकारातला होता आणि तो उतरायचा होता. त्यामुळे सकाळी थोडं आरामातच आवरलं. समोरच कात्राबाईचा डोंगर दिसत होता. त्याच्या उजव्या बाजूला कुमशेतचा कोंबडा आणि या दोन्हीच्या मधे कात्राबाईची खिंड जाणवत होती. कोंबड्याच्या जवळच सुर्योदय होत होता.

.

सकाळचे सात वाजले होते सुर्य बर्‍यापैकी वर येऊनही थंडी काही कमी झाली नव्हती आणि गार वारेही वहात होते. अंगातून थंडी जाऊन चैतन्य यावं म्हणून आमच्यातल्या एकानं थोडंसं फिजिकल ट्रेनिंग आणि नंतर हास्यक्लबात घेतले जाणारे हास्यप्रकार करून घेतले. मग काय सगळे एकदम तरतरीत झाले.

.

.

.

गरमागरम चहा तयार झाल्याची हाक ऐकू आल्यावर सगळे चुलीपाशी जमा झाले. नाश्ता आम्ही माथ्यावर जाऊन आल्यावर करणार होतो. तोपर्यंत दम निघावा म्हणून चहा बरोबर बिस्कीटं खाऊन घेतली. आता आम्ही सर्वजण माथ्यावर जाणार असल्यानं नाश्ता तयार करण्याची जबाबदारी बाळकृष्ण यांनी स्विकारली.

.

.

आता आम्ही आमच्या अंतिम लक्षाकडे म्हणजे आजोबा माथ्याकडे निघालो होतो. सर्वजण माथ्यावर जायला आतुर झाले होते त्यामुळे चढताना कुणीच थांबत नव्हतं. पाऊणएक तासात आम्ही माथ्यावर पोहोचलो. माथा बर्‍यापैकी मोठा होता. कोकणाच्या बाजूला सरळसोट कडा तर घाटमाथ्याकडे तो टप्प्याटप्प्याने उतरत गेलेला होता. माथ्यावर मोठी झाडे अशी नव्हतीच. खुरटीच झाडे तीही थोडीच दिसली. बाकी कमरेपर्यंत गवत माजलेलं होतं.

.

.

.

.

.

आजोबा माथ्यावरून दिसणारा नजारा तर अप्रतिम होता. एवढ्या उंचीवर आल्याने बराच लांबपर्यंत ओळखीचा प्रदेश दिसत होता. त्यात अलंग-मदन-कुलंग, कळसुबाई, कुडपण, घाटघर, साम्रद, सांधणदरी, खुटा-रतनगड, कात्राबाई, करंडा, कोंबडा, मुडा, गवळदेव, अगदी खालच्या बाजुला काल चढुन आलेल्या पाथर्‍याची बेचकी, त्यामागे कुमशेत, नाप्ता, कलाडगड आणि अगदी शेवटी हरिश्चंद्रगडाची रोहीदास आणि बालेकिल्ला टोके तर खाली कोकणात डेहणे, शाई आणि करवली नद्यांची खोरी एवढा परिसर अगदी स्वच्छ दिसत होता. पाहतापाहता स्वतःभोवती एक प्रदक्षिणा मारून पुर्ण झाली होती. माथ्यावर भरपुर फोटो काढले.

.

.

मोबाईलला नेटवर्क मिळाल्यामुळे सर्वांनी घरी खुशालीचे फोन केले आणि नाश्त्यासाठी कॅम्पसाईटवर परत आलो. कांदेपोहे आणि काल राहिलेल्या भाताचा केलेला फोडणीचा भात आणि वर कॉफी.
इथे येण्याचा आमचा अंतस्थ हेतु साध्य झाला होता आणि आता आजोबांचा निरोप घ्यायची वेळ जवळ आली होती.

.

.

ट्रेकला आलेले सर्वच पुणे व्हेंचरर्स या नामांकीत संस्थेच्या तालमीत तयार झाल्यामुळं प्रत्येकाला स्वच्छतेचं बाळकडू अगदी सुरवातीपासुनच मिळालं होतं. त्यामुळे कुणालाही न सांगता सर्वजण कॅम्पसाईटवर साफसफाईच्या कामाला लागले. " Leave nothing but footprints, take nothing but memories" हा मुलमंत्र सर्वांच्या अंगवळणीच पडल्यामुळे कुणाला काही सांगावंच लागलं नाही. अक्षरशः पंधरा मिनीटात कॅम्पसाईट स्वच्छ झाली. परतीचा प्रवास सुरू करण्यापुर्वी नेहमीप्रमाणेच शिवाजी महाराजांची गारद झाली. जय भवानी-जय शिवाजीच्या घोषणांनी आजोबाचा परीसर अगदी दुमदुमून गेला.

.

.

.

काल आजोबा माथ्यावर आलेल्या वाटेनेच परतीचा प्रवास असल्याने उतरताना काळजी घेण्याची जास्त गरज होती. कधीही परतीच्या प्रवासातच अपघात होण्याची दाट शक्यता असते. योग्य ठिकाणी दोराचा वापर केल्यामुळे उतरणं सुरक्षीत झालं होतं. एकमेकांना आधार देत, अवघड असलेल्या जागेवर मागच्याला सावध करत हळूहळू सर्वजण पठारावर आले.

.

.

.

आता आम्हाला आजोबा डाव्या हाताला ठेऊन वळसा घालायचा होता. आजोबाच्या उत्तरेला चिकटूनच साधारण पाऊण तासावर आजोबा आणि करंडा या दोन्हींमधे गुयरीदारची खिंड आहे. वाटेत एक मस्तपैकी पाण्याचा ओहोळ लागला. याला 'शिधोबाचा ओहोळ' म्हणतात. हा ओहोळ बारमाही वाहता असल्याने आजोबा माथ्यावर जाणारे बहूतेक सर्व याच्याच काठावर मुक्काम करतात. ओहोळातलं पाणी ओणवं होऊन प्यायला एक वेगळीच मजा येते.

.

.

.

आमच्यातल्या एकाच्या पायात क्रॅम्स येऊ लागल्याने थोडी विश्रांती घेऊन त्याच्यावर प्रथमोपचार केले.

.

पुढच्या दहाच मिनीटात घाटमाथ्यावर पोहोचलो. इथुन गुयरीदारची एकच एक नाळ दिसत होती जी आम्हाला डेहण्यापर्यंत घेवून जाणार होती.

.

.

.

.

तसं पहायला गेलं तर ही वाट तितकीही सोपी नव्हती पण कालच्या दिवसभरात सर्वजण अवघड वाटा चालून एवढे सराईत झाले होते या वाटेचं कुणाला काही वाटतच नव्हतं.

.

.

ही नाळ पश्चिमवाहिनी असल्यानं जवळजवळ अर्धी नाळ उतरून येईपर्यंत ऊनच लागलं नाही. त्यामुळे थांबण्याचा प्रश्नच आला नव्हता. थोडं खाली उतरल्यावर घसा कोरडा पडल्याची जाणीव झाली. एक मोठं झाड बघुन क्षणभर विश्रांती घेतली. इथूनच एक वाट डावीकडे वळून पदरात असलेल्या वाल्मिकी आश्रमाखालच्या पाण्याच्या कुंडांपर्यंत जाते. पण आम्हाला डेहणे गाठायचं असल्याने आम्ही सरळ खाली उतरून जाणार होतो. घरून आणलेल्या तहानलाडू भुकलाडूंचा काही वेळातच फडशा पडला. त्यावर सकाळीच तयार केलेलं सरबत प्यायलं.

.

.

थोडं खाली उतरल्यावर दोन मोठे दगड एका लहान झाडाच्या आधाराने सख्ख्या भावांप्रमाणे एकमेकांना टेकून उभे होते.

.

नाळेत पुढे एक मोठा कडा असल्याने वाट आता नाळेतून बाजुच्या जंगलात शिरून उतरू लागली. शेवटच्या टप्प्यात झाडे संपली आणि गवताचा एक भयानक उतार लागला. मग काय!! सगळे अगदी लहान झाले आणि त्या गवताळ टप्प्यावरून बहूतेक सर्वांनीच मनसोक्त घसरघुंडी खेळून घेतली.

.

सर्वजण खालच्या झाडीत सुखरूप उतरल्यावर डेहण्याकडे निघालो. वाटही सपाटीची आणि झाडीतुन असल्याने एवढे चालूनही थकवा जाणवत नव्हता. गुयरीदाराच्या नाळेतुन आलेल्या ओहोळाची आता 'शाई नदी' झाली होती आणि वाटही तिच्या बाजूबाजूने आम्हांला डेहण्यापर्यंत नेणार होती. थोडं चालल्यावर जंगल संपून वाट उघड्यावर आली. गाव जवळच असल्याच्या खुणाही जाणवू लागल्या होत्या. वाटेचा झालेला 'ट्रॅक्टरचा रस्ता' बरंच काही सांगुन जात होता. शेवटी ही नदीसुद्धा वाळू उपशापासून सुटली नव्हती.

.

मुख्य रांगेवरचे आजोबा, कात्राबाईचे कडे, रतनगड आकाशात उंच गेलेले दिसत होते. चालताचालता रतनगडाच्या वाटांचा विषय सुरू झाला आणि गोळी बरोबर लागली. बाळकृष्ण सोबतच चालत होते आणि आमचं बोलणं तेही लक्षपुर्वक ऐकत होते. त्यांनी सहजच 'चिकणदरा' वाटेबद्दल सांगितलं आणि माझे कान टवकारले. चौकशीअंती बरेच वर्षांपासून मला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर एका चुटकीसरशी मिळालं होतं. पुढच्या महीन्याभरातच हा नवीन घाटवाटेचा अतिशय अवघड ट्रेक आम्ही केला सुद्धा. कोणता होता तो ट्रेक वाचा पुढच्या भागात.
एकंदरीत आम्ही उतरलेला गुयरीदार घाट खुपच देखणा होता. भिकारवाडीनंतर आज आम्हाला आमच्या व्यतिरिक्त काही वेगळे लोक दिसू लागले होते.

.

.

घाट उतरून आल्यानंतर वाल्मिकनगरपर्यंतचं तासाभराचं टळटळीत उन्हातुन चालणं सपाटी असुनही अतिशय कंटाळवाणं झालं होतं. एवढ्या उन्हातही शेतकर्‍यांची शेतीची कामांची लगबग सुरू होती.

.

.

ट्रेकर्स अशा आडबाजूच्या खेड्यात गेले की आपसुकच त्यांच्याभोवती गावातल्या लहान मुलांचं चॉकलेट, गोळ्या आणि खाऊसाठी कोंडाळं जमतं. पण आमच्यातला एक ट्रेकरमित्र प्रत्येक ट्रेकला मुलांना थोडी वेगळी गोष्ट वाटतो ते म्हणजे 'पेन'. खरंच त्याचं हे काम कौतुकास्पदच आहे, नाही का?

.

.

वाल्मिकनगरच्या असलेल्या देवराममामांनी आमचा पाहूणचार त्यांच्याच दुकानातला पेप्सिकोला देऊन केला. घरी आलेल्या पाहूण्यांबद्दल त्यांना असलेलं प्रेम जाणवत होतं. केवळ दोन दिवसांच्या सहवासानं आमच्यात अतिशय घट्ट मैत्री झाली होती.

.

.

पुढच्या पंधरा मिनीटातच डेहण्यात बाळकृष्ण पाटेकरांच्या घरी दाखल झालो. घरून पाण्याला बादली घेतली आणि हातपंपावर अंघोळीला गेलो. नाहीतरी अशी अंघोळ आम्हाला पुन्हा लगेच तरी कधी करायला मिळणार होती?

.

अंघोळ झाल्यावर भुकही जाम सपाटून लागली त्यातुन पाटेकरांच्या गृहलक्ष्मीने असं चविष्ट गावरान जेवण बनवलं होतं म्हणून सांगू सगळ्यांनी दोन दोन भाकर्‍या जास्तच खाल्ल्या.

.

या ट्रेकमधे कोकणातील डेहण्यातुन पाथरा घाटाने आजोबा माथा आणि उतरताना गुयरीदार घाटाने परत डेहणे, असं पाठीवर दोन दिवसांचं सामान घेऊन, एकंदरीत आमचं १६-१७ तासांचं चालणं झालं होतं आणि तसं हे नक्कीच कमी नव्हतं. थकल्यानंतरही अजिबात चिडचिड न करता आम्ही ट्रेक व्यवस्थितपणे पुर्ण केला होता आणि हे केवळ आम्ही एकत्रितपणे, वारंवार करत असलेल्या डोंगरयात्रांमुळेच शक्य झालं होतं.

खरं म्हणजे आज रविवार सुट्टीचा दिवस असूनही कंटाळा करून चालणार नव्हता. दुसर्‍या दिवशीची कामे डोळ्यासमोर दिसत होती त्यामुळे लवकरात लवकर पुण्याला पोहोचायला हवं होतं. देवराममामांच्या मुलासोबत जाऊन गुंड्यातुन गाडी घेऊन आलो आणि लगेचच पाटेकरांचा निरोप घेतला आणि वाटेत फक्त एकच टी-ब्रेक घेऊन रात्री सुखरुप घरी परतलो.

.

क्रमशः

प्रतिक्रिया

दुर्गविहारी's picture

22 Dec 2017 - 8:06 pm | दुर्गविहारी

केवळ अप्रतिम हो !!!! तुमच्या बरोबर ट्रेकला जाउन आल्यासारखे वाटले. खरच छान लिहीताय. मि.पा.वर नियमित लिहीत चला हि विनंती.
आजोबाच्या माथ्यावर जाणे ईतके अवघड असेल असे वाटले नव्हते. यापुर्वी ईथेच मि.पा.वर सतिश कुडतरकर यांनी देखील आजोबाच्या माथ्याचे वर्णन केले होते. पण मुख्यतः आजोबाचा कडा क्लांईब करण्याचे वर्णन जास्त होते. इथे जायचे तर बर्‍यापैकी तयारी करावी लागणार असे दिसतय. आजवर अलंग, रतनगड, हरिश्चंद्र्गड, गोरखगड अश्या अनेक ठिकाणाहून या प्राचीन पर्वताचे दर्शन झाले आहे पण आता तुमच्या धाग्यामुळे माथ्यावर जाण्याचे वेध लागलेत.
मुक्काम आवरला कि कॅम्पसाईटची स्वच्छता हे प्रत्येक ट्रेकरचे कर्तव्यच आहे, ट्रेकर म्हणजे सामान्य पर्यटक नव्हे. त्यामुळे तुम्ही मुक्कामाची जागा स्वच्छ करुन एक आदर्श उभा केला आहे.
बाकी पेन वाटण्याचा उपक्रम आवडला. मी बर्‍याचदा गोळ्या न्यायचो, पण त्यामुळे ती मुले प्रत्येक येणार्‍या जाणार्‍या ट्रेकरकडे गोळ्या, चॉकलेट मागताहेत असे लक्षात आले. एक प्रकारे चुकीची सवय आपण त्यांना लावतोय, म्हणून मी ते थांबविले. मात्र पेन वाटणे हा नक्कीच स्त्युत उपक्रम आहे, राबविला जाईल.
हापश्यावरती आंघोळ करुन बरेच दिवस झालेत याची फोटोवरुन जाणीव झाली. आणि गावरान जेवणाची पंगतही बरेच दिवस नाही उठली. हे संबध वर्ष खुपच दगदगीचे गेले, ट्रेक झाले नाहीत याची खंत तुमच्या लिखाणामुळे जाणवती आहे.
पुढच्या लिखाणाला शुभेच्छा.