दरस बिना..

समयांत's picture
समयांत in जनातलं, मनातलं
5 Dec 2017 - 1:07 am

समुद्राचा तळ गाठता येत नाही, आणि अश्रूचा स्रोतसुद्धा सापडत नाही.. दोघांना अस्तित्व खारेच आहे, एक अथांग तर दुसऱ्याचे अलौकिक.
दुपार सरत असतांनाचा वेळ, चार ते पाचचा, या वेळेत सारे भरून आलेले असते. ना खोल ना गंभीर, सगळे सुटेसुटे होणारे गुंते. वासांनी निर्माण झालेले जग मोकळे होत एक केवळ श्वास होणारे.
शांतता आणि अस्वस्थता एकाच वेळी जाणवते अश्यावेळी, शांतता म्हणजे दुपारची काहिली संपणारी असते म्हणून, आणि अस्वस्थता यासाठी कि संधिप्रकाशाचा खेळ सुरु होणार काही वेळाने म्हणून. एक एक पळ युगासारखा भासतो, श्वासांचे स्पष्ट येणेजाणे दिसते, येणारा लौकर जातो पण जाणारा मात्र रेंगाळत राहतो. पुस्तक वाचावे कि लिहावे कि ऐकावे काही; कि पाहावे असं भिरभिरत राहतं मन, खरी सृजनवेळ आल्यासारखं होतं.
Samayant
मनासारखी घडी बसवायला नको नको ते प्रसंग मनात पुरून घ्याव्या लागतात, हव्याहव्याश्या ज्या गोष्टी जिव्हाळा लाऊन साठवलेल्या असतात, त्यांना मनातून उसवून टाकाव्या लागतात.
मानलेला कोणीएक आपला माणूस असतो, आपण त्याला हव्यासाने आपल्या जवळ केले असते. नुसते त्यावर मन गोठवून ठेवलेले असते, त्याच्या सहवासाने आपल्या जीवनात आलेली दाट छाया पुष्कळ वाटू लागलेली असते. मग असेच, विनाकारण जीव खाली वर करत त्याच्या सोबत असतांनाही त्याच्याच आठवणीत निरंतर मश्गुल राहण्यात आयुष्य बनत जात असते. असे असण्यात कुठे मनाला दुबळेपणा येतो, तर मनाचे सबलीकरण कशात आहे हे विसरायला होते.

जीवनमान