प्रस्तावना : ज्यांची प्रस्तावना वाचायची राहून गेली असेल, त्यांनी ती वाचण्याकरिता कृपया खाली दिलेल्या लिंकवर हळुवारपणे टिचकी मारावी.
http://www.misalpav.com/node/41232
'कोण वसे तुझ्या हृदयी, कळू दे की मला हरीणी.
वाळूवरच्या रेघोट्यानी, सांगु पाहे माझी मानिनी'
आपल्या मनीचे हितगुज आपल्या बापाला सांगू पहाताना एक तरुणी.
Making of photo and status :
मी एकदा माझ्या पत्नी आणि मुलीला घेऊन अलिबाग येथे सहलीला गेलो होतो. समुद्रकिनारी वसलेले अलिबाग हे खरोखरीच एक निसर्गरम्य ठिकाण आहे. तेथे सुंदर सुंदर समुद्रकिनारे, नारळीपोफळीच्या बागा आणि खाण्यापिण्याची रेलचेल आहे. तीन दिवस आम्ही हिंडलो फिरलो, भरपूर मजा केली.
आम्ही खास एक दिवस समुद्रस्नानाकरिता राखून ठेवला होता. त्याप्रमाणे सकाळी हॉटेलवर दाबून नाष्टा केला आणि स्विमिंग कॉश्च्युम घालून समुद्रावर पोहोचलो. ऑड डे असल्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर अगदी तुरळक गर्दी होती. पाच सहाच कुटुंबे पाण्यात डुंबण्याचा आनंद घेत होती. आमचे त्रिकोणी कुटुंब आहे. मुलीला भाऊ बहीण नसल्याने बिचारी एकटीच तिच्यापरीने सहलीचा आनंद ओरबाडून घेण्याचा प्रयत्न करीत होती.
बराच वेळ समुद्राच्या पाण्यात खेळून झाल्यावर मी आणि सौ. किनाऱ्याच्या वाळूवर पहुडलो होतो. आमच्या बाजूलाच मुलगी तिथेच सापडलेल्या एका काठीने ओल्या वाळूवर रेघोट्या ओढीत होती. मला उत्सुकता वाटली की ती वाळूवर काय लिहितेय ते पहावे. मी जवळ जाऊन पाहिले तर तिचे वाळूवर उभ्या आडव्या रेघोट्या मारणे चालू होते. मी सहजच तिचा एक फोटो काढून घेतला.
काही दिवसांनी मी आमच्या अलिबागच्या सहलीचे फोटो पहात असताना हाच फोटो माझ्या पहाण्यात आला. आणि माझ्या मनात कुठेतरी क्लिक झालं. मला वाटलं की ह्या फोटोवर काहीतरी स्टेटस लिहावं. मी विचार करू लागलो. आणि मला एक कविकल्पना सुचली. मी कल्पना केली, की एका लग्नाच्या वयाला आलेल्या मुलीच्या बापाला तिच्याकरिता सुयोग्य वर शोधायचाय. त्यापूर्वी तो मुलीच्या हृदयात कोणी राजकुमार भरलाय का याची तिच्याकडे चौकशी करतो. पण मुलगी स्त्रीसुलभ लज्जेने आपल्या मनातले बापाला सांगू शकत नाही. म्हणून ती समुद्रकिनाऱ्यावरल्या ओल्या वाळूवर रेघोट्या ओढून आपल्या बापाला सांगू पहाते. आणि बाप ते जाणण्याचा प्रयत्न करतो. यावरून मला कवितेच्या पुढील ओळी स्फुरल्या.
'कोण वसे तुझ्या हृदयी, कळू दे की मला हरीणी.
वाळूवरच्या रेघोट्यानी, सांगु पाहे माझी मानिनी'...........
--- सचिन काळे.
माझा ब्लॉग : http://sachinkale763.blogspot.in
प्रतिक्रिया
26 Nov 2017 - 9:33 am | संजय पाटिल
छान!!
26 Nov 2017 - 7:20 pm | सचिन काळे
@ संजय पाटिल, धन्यवाद!!
26 Nov 2017 - 3:24 pm | दिपक.कुवेत
ओके........पण काय दाबून?
26 Nov 2017 - 7:23 pm | सचिन काळे
पण काय दाबून? >>> हा! हा!! हा!!
26 Nov 2017 - 3:26 pm | दिपक.कुवेत
रेघोट्या छान आहेत हं......
26 Nov 2017 - 7:24 pm | सचिन काळे
@ दिपक कुवेत, धन्यवाद!!
27 Nov 2017 - 9:31 am | सिरुसेरि
फोटो आणी आपले प्रांजळ निवेदन तसेच कवी कल्पना आवडली . आपण लिहिलेल्या कवितेच्या ओळी वाचुन कुठेतरी "ती फुलराणी" कविता आठवली .
"तो रविकर का गोजिरवाणा , आवडला आमुच्या फुलराणीला .. "
27 Nov 2017 - 12:25 pm | सचिन काळे
@ सिरुसेरि, फोटो आणी आपले प्रांजळ निवेदन तसेच कवी कल्पना आवडली >>> आपलेही हे प्रांजळ मत मला आवडले. माझे मन भरून आले. आपले फार फार आभार.
27 Nov 2017 - 9:39 am | ज्ञानोबाचे पैजार
गोरा गोरा पान, फुला सारखा छान
बाबा मला एक, भाउ आण
पैजारबुवा,
27 Nov 2017 - 12:17 pm | सचिन काळे
@ पैजारबुवा, गोरा गोरा पान, फुला सारखा छान, बाबा मला एक, भाउ आण >>> अगदी खरंय!! माझ्या मुलीच्या दुखऱ्या शिरेवर तुम्ही नेमकं बोट ठेवलेत. हा विषय लेखात मी पुढील एका ओळीतच आटोपता घेतला होता.
एकुलते एक असणं पालक आणि पाल्य, दोघांनाही पदोपदी क्लेशकारक असतं. आणि अशा सहलीच्या वेळेस ते जरा जास्तच जाणवतं. खरं तर या दुःखाला आपणच जबाबदार असतो. असो, झाली गोष्ट होऊन गेली. आता मी आजोबा होण्याची वेळ आलीय.
27 Nov 2017 - 2:23 pm | ज्ञानोबाचे पैजार
मी अजाणतेपणे तुम्हाला दुखावले त्याबद्दल मी तुमची मनापासून माफी मागतो... मला क्षमा करा...
आणि अजोबा होणे एनजॉय करा... तो सुध्दा एक आनंददायी (खरेतर अधिक आनंददायी) अनुभव असतो... शुभेच्छा
पैजारबुवा,
27 Nov 2017 - 3:04 pm | सचिन काळे
@ पैजारबुवा, अरे, नाही!! नाही!! मन दुखावण्याचं माझ्या मनात बिलकुल आले नाही. उलट माझे दुःख तुम्ही अचूक जाणले याचाच मला आनंद झालाय. आणि वरिष्ठांनी माफी मागून लहानांना लाजवायचे नसते हो!