तुळापुर : संभाजीराजांची समाधी

आकाश खोत's picture
आकाश खोत in भटकंती
24 Oct 2017 - 12:51 pm

पुण्याहुन औरंगाबादला जाताना, लोणीकंदच्या थोडं पुढे एक फलक दिसतो. संभाजी राजांची समाधी हायवेपासून ५ किमी डावीकडे तुळापुर गावात आहे अशी माहिती त्यावर आहे. हा फलक इथुन जाताना खूपदा पाहिला. प्रत्येक वेळी तो दिसला कि त्या ठिकाणी जायचंय हि इच्छा मी गाडीत सोबत असणाऱ्यांना बोलून दाखवायचो.

सण अथवा काही कामानिमित्त नेहमी जात असल्यामुळे तिथे थांबता आलं नाही. एका मित्राच्या रविवारच्या लग्नाला जायचं होतं, आणि आम्हाला शनिवारी पण सुटी होती. त्यामुळे यावेळी शनिवारी निवांत निघून तुळापूरला भेट द्यायचीच असं ठरवलं.

पुण्याहुन सकाळी लवकर निघालो, आणि भूक लागलेली असल्यामुळे रस्त्यात लागणाऱ्या पहिल्या विठ्ठल कामतला थांबून नाश्ता करू असं बोलत बोलत आम्ही त्या तुळापूर फाट्याच्या पुढं निघून गेलो. तो फाटा मागेच राहिला हे आम्हाला नाश्ता झाल्यावर लक्षात आलं. गुगलवर अंतर पाहिलं तर आम्ही जवळपास १६-१७ किमी पुढे आलो होतो. आता पुन्हा मागे फिरून जायचं का असा अंदाज घेतला तेव्हा सर्वांचाच यावेळी तुळापुरला जायचंच असा मुड दिसला.

गाडी परत फिरवून आम्ही तुळापूरला गेलो, हायवेपासून आत गेल्यावर अगदी दहा मिनिटात समाधीस्थळ आलं. सापडायला काही अडचण आली नाही.

i1

संभाजी राजांचा पुतळा असलेलं प्रवेशद्वार होतं. आत संभाजी राजांचे अजून दोन पुतळे आहेत. एक समाधी मंदिरात आणि एक बाहेर.

i2

हे स्थळ मुळात त्रिवेणी संगमाचे आहे. भीमा, भामा, इंद्रायणी या तीन नद्यांचे.

त्यामुळेच संगमेश्वराचे तिथे प्राचीन मंदिरसुद्धा आहे. या मंदिराचा मुरार जगदेव यांनी जीर्णोद्धार केला अशी माहिती आणि चित्रे आहेत. या जगदेवांची इथे सुवर्णतुला झाली होती.

i3

इथेच शहाजी राजांचीसुद्धा एक चातुर्याची गोष्ट आहे. हत्तीचे वजन कसे करावे असा प्रश्न होता. (हत्तीचे वजन करण्याचे एका ठिकाणी वाचलेले कारण म्हणजे त्याच जगदेवांना हत्तीच्या वजनाइतके सोने दान करायचे होते.) तर शहाजी राजांनी युक्ती लढवली. हत्तीला नदीमध्ये होडीत चढवुन नदीचे पाणी जितके काठावर येईल तिथे खुण करायची. मग हत्तीला बाहेर काढुन त्याच होडीत दगडधोंडे भरायचे, आणि हत्तीच्या खुणेपर्यंत पाणी येईपर्यंत दगड भरत राहायचे. आणि मग तेवढ्या दगडांचे वजन म्हणजेच हत्तीचे वजन.

युरेका!!! म्हणजे आर्किमिडीज तत्व शहाजी राजेंना चांगलेच माहित होते.

संभाजी राजे फितुरीमुळे मोगलांकडून पकडले गेले. त्यांच्यासोबत त्यांचे सोबती कवी कलश हेसुद्धा होते. औरंगजेबाने त्यांची धिंड काढली, बरेच दिवस कैदेत ठेवुन छळ केला. डोळे फोडले. आणि शेवटी तुळापुरजवळच तुकडे तुकडे करून मारले. त्यांचे अंतिम संस्कार करू नयेत असा त्याचा हुकूम होता.

पण आसपासच्या गावकऱ्यांना आपल्या राजाची अशी परवड बघवली नाही. त्यांनी संभाजी राजांच्या शरीराचे मिळतील तेवढे भाग एकत्र करून अंतिम संस्कार केले.

त्यामुळे हि समाधी येथे उभी राहिली. या समाधी मंदिरात मध्यभागी संभाजी राजांचा पुतळा आहे, आणि भिंतींवर या सर्व प्रसंगांची चित्रे आहेत.

i4

i5

i6

वढू आणि तुळापूर हि शेजारची गावे. पण त्यांच्यात नेमके अंतिम संस्कार कुठे झाले आणि खरी समाधी कोणती अशा काही गोष्टींवरून वाद आहेत. तुळापूरला जायचे म्हणून उत्सुकतेने त्याबद्दल नेटवर माहिती वाचत होतो तेव्हा हे कळले.

वढू गावातल्या पाटील कुटुंबीयांनी ह्या अंतिम संस्कारात भाग घेतला होता आणि, संभाजी राजांच्या शरीराचे भाग एकत्र शिवले होते, म्हणून त्यांच्या औरंगजेबाच्या विरोधात आणि संभाजी राजांच्या सन्मानार्थ केलेल्या या शौर्याबद्दल "शिवले पाटील" म्हणुन ओळख मिळाली असे हि वाचले.

पण आता उद्भवलेल्या या वादाची चिन्हे तुळापुरला दिसली. इथे काही माहितीफलकांवर वढूचा उल्लेख होता तो खोडलेला आहे. अंतिम संस्कार इथेच झाले अशा आशयाची वाक्ये आहेत.

त्याच बरोबर कवी कलश यांना याच ठिकाणी मारले असे सांगणारा एक छोटा स्तंभ आहे.

i7

शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली असा आजवर माहित असलेला इतिहास होता. पण येथे असे लिहिले आहे कि रायरेश्वराच्याही आधी शहाजी राजांनी शिवाजी महाराजांना स्वराज्याची शपथ या ठिकाणी दिली होती.

वढूला जायला पुरेसा वेळ नव्हता. पण तिथे हि एकदा जायचे आहेच.

हा वाद आपल्या ठिकाणी. पण शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्याबद्दल नितांत आदर आणि भक्ती असलेल्या आमच्यासारख्या प्रत्येकाला जे ठिकाण महाराजांची स्मृती जपत आहे त्या ठिकाणी नतमस्तक व्हायला दुसरे कारण लागत नाही.

मी विश्वास पाटलांची "संभाजी" हि कादंबरी झपाटल्यासारखी वाचुन काढली होती. आणि त्यातला संभाजी राजांना पकडल्यानंतरचा जो शेवटचा भाग आहे तो अत्यंत अस्वस्थ मनोवस्थेत वाचला होता. महाराज आणि कवी कलश यांचे झालेले अतोनात छळ आणि तरी टिकून राहिलेला त्यांचा ताठ बाणा बघुन भावुक झालो होतो.

शिवाजी सावंतांची "छावा" वाचताना सुद्धा तीच गत.

समाधीस्थळी पोचताना आणि तिथे असताना हे विचार करून पुन्हा थोडे अस्वस्थ वाटले. पण ती जागा खूप शांत आहे. नद्या, मंद वारा, आणि तिथली शांतता यांचा प्रभाव असेल. तिथलं वेगळंच वातावरण आहे. यामुळे खूप शांत वाटायला लागले.

संगमेश्वराचे दर्शन घेतले.

i8

i9

नदीच्या घाटावर आणखी काही मंदिरे आहेत.

i10

या वर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे नद्यांना चांगले पाणी होते. खाली उतरून संगम जवळून पाहिला. आणि थोडा वेळ निवांत घालवुन पुढे निघालो.

i11

संभाजी राजांच्या व्यक्तिमत्वात खूप महान पैलू आहेत. ते विद्वान होते, कवी होते, शूर होते, स्वाभिमानी होते. त्यांच्यापासून सर्वांनाच खूप प्रेरणा आणि शक्ती मिळू शकते. त्या महान राजास कोटी कोटी प्रणाम.

प्रतिक्रिया

तुळापूरला अनेक वेळा जातो. तेथे आता निर्माण केलेल्या सुविधा चांगल्या आहेत. तिथेच संगमाच्या पलीकडे चालणारा वाळूउपसा पाहून मात्र अस्वस्थ व्हायला होते.

संभाजीराजांच्या शौर्याला शतशः प्रणाम!

पद्मावति's picture

24 Oct 2017 - 3:00 pm | पद्मावति

__/\__

II श्रीमंत पेशवे II's picture

26 Oct 2017 - 12:21 pm | II श्रीमंत पेशवे II

माझ्या लाडक्या शंभू राज्यांना ... त्रिवार वंदन

arunjoshi123's picture

26 Oct 2017 - 2:15 pm | arunjoshi123

छान लेख, माहिती.

दुर्गविहारी's picture

27 Oct 2017 - 10:12 am | दुर्गविहारी

उत्तम धागा ! पण संभाजी राजांची समाधी वढुला आहे. हे तुळापुरचे हल्लीच काढलेले दिसते. मी तुळापुरला गेलो होतो तेव्हा असा पुतळा किंवा उल्लेखही नव्ह्ता. असो.
बाकी शहाजीराजांनी केलेल्या तुलेचे छान वर्णन तुम्ही केलेले आहे.
या तुळापुरजवळच पेशव्यांनी बांधलेला फुलगावचा घाटही प्रेक्षणीय आहे. पुढच्या वढूच्या भेटीत तुम्ही हा ही पाहू शकता.

आकाश खोत's picture

27 Oct 2017 - 12:35 pm | आकाश खोत

धन्यवाद. तेच तर आता वढू आणि तुळापूर दोन्ही गावांमध्ये नेमकी जागा आणि समाधी कोणती यावर वाद चालू आहेत असे दिसते.

तुळापूरला हत्या झाली आणि वढू बुद्रुकला दहन झाले. तुळापूरचे जे आहे ते स्मारक आहे.

'शिवले ' हे आडनाव राजांच्या हत्येआधीही अस्तित्वात होते. तत्कालीन कागदपत्रांत शिवल्यांचे उल्लेख आहेत.

आकाश खोत's picture

29 Oct 2017 - 12:12 pm | आकाश खोत

पण आम्ही जिथे गेलो, तिथेही समाधी असेच लिहिले आहे. तुम्ही फोटो बघा.
आता दोन्ही गाववाले हीच समाधी असे म्हणत असतील तर जाणकारांनाच नेमकी माहिती असेल खरे काय,
पण सामान्य लोकांना हे गोंधळात टाकणारे आहे

शिवले नावाबद्दल मी नेटवरच वाचले, ते चुकीचे असू शकेल.

शशिकांत ओक's picture

31 Oct 2017 - 10:27 am | शशिकांत ओक

हाच घोळ नव्याने सुरू करण्यात आला आहे... जुन्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. काही किमी दूर पूर्णा नदीच्या संगम काठावर दुसरे मंदिर असून तिथे हेच खरे मंदिर असे भेट देणाऱ्यांना सांगितले जाते... यावर आणखी कोणी प्रकाश टाकेल का?

छान लेख
मी कित्येक वेळा तुळापूर ला जातो
आळंदी तेथून खूप जवळ आहे
तेथूम जवळच मरकळ येथे विपश्यना केंद्र आहे
असे ऐकून आहे

आकाश खोत's picture

29 Oct 2017 - 12:14 pm | आकाश खोत

धन्यवाद :)

छान लेख
मी कित्येक वेळा तुळापूर ला जातो
आळंदी तेथून खूप जवळ आहे
तेथूम जवळच मरकळ येथे विपश्यना केंद्र आहे
असे ऐकून आहे

छान लेख
मी कित्येक वेळा तुळापूर ला जातो
आळंदी तेथून खूप जवळ आहे
तेथूम जवळच मरकळ येथे विपश्यना केंद्र आहे
असे ऐकून आहे

चौथा कोनाडा's picture

31 Oct 2017 - 12:22 pm | चौथा कोनाडा

छान लिहिलेय. वृत्तांत आवडला !
फोटो ही छान आहेत !

बऱ्याच वेळा तुळपुरला जातो, निसर्ग रम्य वातावरण अनुभवण्या साठी. प्रत्येक वेळी वेगळा अनुभव !

पु ले शु !