२८ सप्टेंबर - पुण्याहून प्रस्थान
२९ सप्टेंबर - इस्लामपूर ते तिरुवेकरे ऊर्फ चकवा!
३० सप्टेंबर - म्हैसूर दसरा शोभायात्रा
१ ऑक्टोबर - म्हैसूर पॅलेस आणि रोषणाई
२ ऑक्टोबर - म्हैसूर ते मदुराई
३ ऑक्टोबर - मीनाक्षी मंदिर
४ ऑक्टोबर - कन्याकुमारी दर्शन - विवेकानंद स्मारक, विवेकानंद केंद्र आणि सूर्योदय/सूर्यास्त
५ ऑक्टोबर - पद्मनाभ मंदिर (त्रिवेंद्रम)
६ ऑक्टोबर - केरळ - गॉड्स ओन ट्रॅफिक जाम!
७ ऑक्टोबर - मुरुडेश्वर
८ ऑक्टोबर - मुरुडेश्वर ते इस्लामपुर
९ ऑक्टोबर - पुण्याला परत!
नमस्कार,
"दो पहिया" ह्यांच्या युरोपवारी धाग्यात मोदकने मिपावर भटकंतीचे लाईव्ह अपडेट्स टाकण्याचा पायंडा पाडला. आता खुद्द मोदकराव बुलेटवर (परत एकदा) भटकायला बाहेर पडलेत आणि त्यांच्या प्रवासाचे लाईव्ह अपडेट टाकण्याचे भाग्य मला लाभले आहे!
चला तर मग सुरूवात करुया!
- पिलीयन रायडर
***************************************************************************************
मागच्या वर्षी भारतभूमीच्या उत्तरेकडे लेह लदाख सफर झाल्याने यावर्षी दक्षिणेला कन्याकुमारी सफर करायची ठरवलेली होती. एप्रिल मे मध्ये हिमाचल आणि डिसेंबरमध्ये ठरलेली सायकलवारी यांमुळे या वर्षी जमेल असे वाटत नव्हते पण जिंकायला १ बॉलवर ७ रन हव्या असताना बॉलरने नो बॉल टाकावा, तो फुलटॉस पडावा आणि ११ नंबरच्या खेळाडूने तो सीमापार मारावा असे अनेक योगायोग जुळून आले आणि अक्षरशः आठवड्याभराच्या सूचनेवर ७ दिवसांची रजा मंजूर झाली. मग काय.. मी आणि बुलेट..
शंतनुला विचारले "येतोस का..?" तो एका पायावर तयार झाला. त्याने याच वर्षी थंडरबर्ड घेतली होती त्यामुळे त्यालाही एक लाँग राईड करायची होती.
दोघांनीही आपाअपल्या गाड्यांचे सर्विसींग करून घेतले आणि सॅडल बॅग, आवश्यक गार्ड / जॅकेट वगैरे खरेदी केली. कन्याकुमारीचा प्लॅन खूप आधी बनवून ठेवला होता त्यामुळे प्लॅनवर फार कष्ट घ्यावे लागले नाहीत.
कन्याकुमारी...!!! भारताच्या मेनलँडचे शेवटचे टोक. तीन समुद्रांचा संगम, स्वामी विवेकानंदांनी समुद्रातल्या खडकावर केलेले ध्यान वगैरे गोष्टींची जुजबी माहिती असताना सन २००१ च्या सुमारास "गाथा विवेकानंद शीलास्मारकाची" हे पुस्तक हाती पडले. एकनाथजी रानडे या व्यक्तीने आपले सर्व व्यवस्थापन कौशल्य पणाला लाऊन देशाच्या सत्ताधारी सरकारचा पाठिंबा मिळवला आणि अगदी १ रूपयांपासून देणगी गोळा करून हे स्मारक कसे उभे केले याचे अप्रतीम वर्णन या पुस्तकात वाचायला मिळाले. हे पुस्तक तुम्ही वाचले आहे का..? नसल्यास जरूर वाचा. (दोन तीन वर्षांपूर्वी एकदा नशीब खूपच जोरावर होते आणि अचानक मला एकनाथजींच्या सहीचे पुस्तक मिळाले.)
कन्याकुमारी प्रवास तेंव्हापासून करायचा होता. नंतर हळूहळू गाडी चालवण्याची आवड निर्माण झाली. लेहवारी झाली. आता बुलेटनेच कन्याकुमारीलाही निघतो आहे..!!
***************************************************************************************
२८ सप्टेंबर २०१७
२८ सप्टेंबर २०१७
आज कन्याकुमारीला जायला निघायचे होते. पण अचानक ऑफिसमध्ये मीटींग्स आल्याने २ ला निघणार होतो ते ४ ला निघालो. आता मुक्कामाला इस्लामपुरला पोहोचलो आहोत. वाटेत येताना मस्त ढगाळ वातावरण होतं. विजा वगैरे चमकत होत्या. छान झाडीतून प्रवास झाला. पुणे ते कोल्हापुर ह्या एन.एच ४ हा रस्ता पुण्यातुन बाहेर पडेपर्यंत ठीक ठाक होता. पण तिथे फ्लाओव्हर्सचं काम चालू असल्यामुळे बर्यापैकी डायव्हर्जन्स आहेत. त्यानंतर शिरवळ ते सातारा हा सगळ्यात खराब भाग. कारण त्या रस्त्यावर मार्किंग्सच नाहीयेत. रात्री गाडी चालवताना मार्किंग्स महत्वाची असतात. त्यामुळे गाडीचा स्पीड कमी झाला. पुण्यातून ६ ला बाहेर पडलो आणि सातार्याला ७.४५ पर्यंत पोहोचलो. त्यानंतर माझा अत्यंत आवडता पॅच - सातारा ते कराड! तिथे मात्र गाडी चालवायला मजा आली. पण तिथे माझी आणि शंतनूची चुकामूक झाली. एकमेकांना शोधण्यात आमची पंधरा - वीस मिनिटं गेली. अंधार आणि पुढे मागे न थांबल्याने असं झालं, पण हरकत नाही. ते आजच्या दिवसाचं लर्निंग आहे. आता मित्राच्या घरी आलोय, उद्या सकाळी पुन्हा प्रवासाला सुरुवात. उद्याचा मुक्काम म्हैसुर येथे. सध्या तरी इथे धो धो पाऊस पडतोय.
***************************************************************************************
२९ सप्टेंबर २०१७
२९ सप्टेंबर २०१७
सकाळी इस्लामपुरातुन ७च्या दरम्यान बाहेर पडलो, कामेरी आणि येलुर करुन कोल्हापुर क्रॉस केल. क्रॉस करतानाच गाडी रिझर्वला लागली. एका पेट्रोल पंपावर गेलो तर तिथे कळालं की पुढे १५ किमी वर कर्नाटक बॉर्डर आहे आणि तिथे पेट्रोल स्वस्त आहे. असं त्या पेट्रोल पंपवाल्यानीच सांगितलं! मग पुढे १५ किमी वर पेट्रोल पंप सापडला. तिथे ९ रुपयांनी पेट्रोल स्वस्त होतं. पण तिथे कार्ड चालत नव्हतं. मग आणखीन पुढे गेलो. एका ठिकाणी पेट्रोलपंप सापडला. तिथे गाड्या पेट्रोल भरायला बाजुला घेतल्या घेतल्या की दोन तीन लोकं आले आणि कॅमेराला हात लावून, गार्डला हात लावून हे काय आहे, ते काय आहे असं नेहमीप्रमाणे प्रश्न सुरू झालं. मग हे कशासाठी, कुठे चाल्लाय वगैरे विचारू लागले. त्यांना उत्तरं देत बसलो. तो पेट्रोल पंपही अगदी मोठा होता. प्रशस्त एकदम. फक्त डिझेलचे ३ -४ सेक्शन. पेट्रोलचे वेगळे. तिथून निघालो.
आता कर्नाटकच्या हद्दीतला रस्ता सुरू झाला होता. तो रस्ता फारच स्मूथ होता. मोठाच्या मोठा रस्ता. म्हणजे एखादी गोळी आपण त्या रस्त्याच्या दिशेने झाडली तर ती गोळी सरळ जाऊन परत शेवटी तिची क्षमता संपली की रस्त्यावरच पडेल इतका सरळ! कर्नाटकातले रस्ते चांगले आहेत. तीन तीन लेनचे रस्ते. बस आणि ट्रक लेन बाय व्यवस्थित आहे. तिथे टॉयलेटची सोयही असते. डेझिग्नेटेड एरिया असतो. नीट मार्क असतो त्याचा. त्यामुळे थांबायला सेफ वाटतं.
आज जाताना टेकड्या टेकड्यातला पॅच होता. म्हणजे आपण एका खिंडीतून बाहेर पडायचं, उतरायचं की लगेच पुढची खिंड किंवा टेकडी तयार. रस्ता सरळच. तिथून पुढे आम्ही कावेरी हॉटेलला आलो. हे ते हॉटेल जिथून गोवा किंवा आंबोलीला रस्ता जातो. तिथे नाश्ता केला. इडली वडा , उपीट अशी खादाडी झाली. कॉफी चांगली मिळते इथे. इथला मालक म्हैसुरचा होता. त्याने इकडून असं जावा, तसं जावा अशी सगळी सगळी माहिती सांगितली.
म्हैसुरच्या दसर्याबद्दल बरंच काही सांगितलं. त्याच्याशी गप्पा मारुन बाहेर पडलो. तिथून मग सरळ रस्ता परत पकडला. बेळगाव विधानसभा वगैरे क्रॉस केलं. हुबळी नंतर अचानक सिंगल लेन रोड चालू झाला. तिथे बराच वेळ गेला. एनएच ४ ला सिंगल लेन जरा सरप्राईजिंग होतं. तिथे बर्याच ठिकाणी रस्त्याची एक लेन एका साईझच्या खडीने आणि दुसरी दुसर्या साईझच्या खडीने केलेली असं होतं. लेन बदलताना ते स्पष्ट जाणवायचं. ते खूप डेंजरस होतं. नंतर मग एन.एच ४ मध्येच खड्डे पण सुरु झाले. कागल ते बेळगाव आणि हुबळी पर्यंत रस्ता चांगला होता. त्यानंतर मात्र रस्ता ओके ओके. ३०-४० किमीचा तो एक पॅच जरा खराब होता. नंतर परत चांगला रस्ता. टोललाही कुठे गर्दी नव्हती. व्यवस्थित स्पीडने बाहेर पडता येईल इतके मोठे रस्ते होते. सर्व्हिस रोड वगैरे व्यवस्थित होते. पुढे अचानक एका ठिकाणी पवनचक्क्या सुरु झाल्या. त्या बघायला थोडा वेळ थांबलो. इरसाल बुवांशी बोलणं झालं ते इथेच. तिथे फोटो काढून निघालो.
दावणगिरीच्या आसपास आम्ही जेवायला थांबलो. आत जाण्यापेक्षा बाहेरच्या बाहेरच एक धाबा बघितला आणि तिथे थांबलो. जेवण अगदीच काही तरी होतं. त्या धाबेवाल्यानी पराठ्याचं अगदी चांगलं वर्णन केले म्हणून तो मागवला. पण प्रत्यक्षात मात्र अत्यंत तेलकट सारण असलेला पराठा. त्या ताटाला सुद्धा आजुबाजुने स्पष्ट तेल दिसत होतं. वाटीभर तरी तेल असेल. कसा बसा तो खाल्ला. दाल - तडका रोटी वगैरे खाऊन ४ च्या सुमारास तिथून बाहेर पडलो. त्यानंतर असाही एक पॅच आला जिथे कुठेही डोंगर नव्हते. पुण्यात असं होत नाही. कुठेही गेलो तरी डोंगर दिसतातच. इथे मात्र क्षितिजा पर्यंत फक्त हिरवीगार शेती. नुकतीच लावलेली असल्याने जमिनीला लगतच. हिरवे लांब लांब पट्टे. इथे गाडी चालवताना मजा आली. पुढे चार थेंब पडल्या सारखा पाऊस आला.
तिथून पुढे आम्हाला कुठे तरी राईट टर्न घ्यायचा होता. एक तर तो चित्रदुर्गला घेता आला असता. एन.एच ४ चित्रदुर्गच्या बाहेरून जातो. मोठे मोठे फ्लाय ओव्हर्स आहेत. आणि त्यांना दगडी तटबंदी करून हिस्टोरिक लूक दिलाय. तिथून एक रस्ता म्हैसुरला जातो असं एकानी आम्हाला सांगितलं होतं. पण शेवट पर्यंत तो रस्ता काही आम्हाला सापडला नाही. कुठेही बोर्ड नव्हता की काही नव्हतं. पुढे एका टोलनाक्याला एका ट्रॅव्हल्सवाल्याला विचारलं. त्यानी खाणाखुणांसकट कसं जायचं हे आम्हाला सांगितलं. आम्ही हिरीयुरपासून राईट टर्न घेतला. ह्या भागात हायवेला प्रचंड चतुर किटक होते. धडाधड आमच्या हेल्मेट, मास्क, गॉगलला धडकत होते. आम्ही सांगितलं होतं तसं सरळ जात होतो. आणि अचानक एन.एच ४ लाच परत लागलो. तिथे अगदी "टुवर्डस पुणे" असा बाण दाखवलेला बोर्ड बिर्ड होता. मग आमच्या पक्कं लक्षात आलं की आम्ही रस्ता चुकलोय. परत यु टर्न मारला. एका सर्कलला आम्ही राईट ऐवजी लेफ्ट टर्न घ्यायला हवा होता असं काही तरी लक्षात आलं. तो बरोबर टर्न घेऊन आम्ही योग्य रस्त्याला लागलो. आम्हाला हुल्ल्याळ गावापर्यंत जायचं होतं. तो रस्ता म्हणजे.. अहाहाहा! तिथे काहीही मार्किंग नव्हतं. आजुबाजुला फक्त शेती. वाईट गोष्ट म्हणजे समोरची सगळी वहानं अप्पर लाईट लावून चालवत येत होती. तो खेळ बघत बघत पुढे यायचं होतं. त्यात बराच वेळ गेला.
हुल्लाळच्या पुढे आम्हाला सांगितलं होतं तसं एका मोठंच्या मोठं नाव असलेल्या (नाव विसरलो) जंक्शन पासून आम्हाला लेफ्ट टर्न घ्यायचा होता. तिथे आम्ही म्हैसुर ११६ किमी चा बोर्ड पाहिला होता. तिथून पुष्कळ पुढे आलो. छोटी छोटी गावं लागत होती. मार्किंगचे रस्तेही आले. त्या रस्त्यावर आम्ही जवळपास १.५ तास होतो. तिथून पुढे किमान ७० किमी राहिले असावेत असा आमचा हिशोब होता. त्या वेळी "तुरुवेकेरे" गावात एक बोर्ड, म्हैसुर ११३ किमी! एक तर आम्ही रस्ता तरी चुकलो किंवा काय माहिती काय झालं. चकवा लागणे म्हणतात तसा प्रकार झाला. शेवटी ह्याच गावात मुक्काम करायचं आम्ही ठरवलं. इथे खंडे नवमी निमित्त गाड्या घरं ट्रॅक्टर सगळं छान छान केळीच्या पानांनी सजवलं आहे. पेट्रोल पंप सुद्धा सजवला होता. छान गाण्यावर ढिच्चिक ढिच्चिक नाचणारं लाईटिंग केलंय.गावाला तीन टोकं आहेत वेगवेगळी, सगळी कडे फिरुन वेशीचे बोर्ड पाहुन आलो. धाबे वगैरे काही नाहीये. शेवटी चिवडा आणि वेफर्स खाऊन झोपू. आणि उद्या सकाळी उठून आम्ही म्हैसुरला निघु.
***************************************************************************************
३० सप्टेंबर २०१७
३० सप्टेंबर २०१७
दिवसभर गाडीवर असल्याने झोपताना आणि आता उठल्यावर बुलेटचा "डग डग डग डग..." असा आवाज कानात साठून राहिला आहे. गणपतीत ढोल ताशाचा आवाज असाच साठून राहतो... हे एक फार भारी फिलिंग असते.
सकाळी या आवाजाचा आनंद घेत थोडावेळ पडून होतो, अचानक बांग झाली, शंतनुही उठला. शेजारीच कुठेतरी मशीद असावी.. आवरले, गाडीला बॅगा अडकवल्या आणि बाहेर पडलो. सकाळी सकाळी खेड्यातले रिकामे रस्ते आणि आजूबाजूला हिरवीगार शेती.. मग आम्ही गाड्यांचा वेग थोडा वाढवलाच. या रस्त्यावरून जाताना थोड्या थोड्या अंतरावर गावे लागत होती. दसऱ्यानिमित्त सजवलेली घरे, गाड्या दिसत होत्या. लोकांनी 'दिल खोलके' केळ्याचे खुंट जिकडे तिकडे लावले होते. ट्रॅक्टर, सायकल, सार्वजनिक बसेस इतकेच काय एका ठिकाणी विजेच्या खांबाला पण खुंट आणि हार गुंडाळले होते. मग आम्ही का मागे राहू, आम्ही पण एका गावात थांबून गाड्यांना हार घातले. हारवाल्याशी थोडे बारगेन करायचा प्रयत्न केला तर त्याने पटकन हाराची लांबी कमी केली. मग त्याला सांगितलेली किंमत मान्य करावीच लागली कारण इतके छोटे हार गाडीच्या हेडलाईटलाच बसले असते, मग गप ते हार विकत घेतले, दुकानदार आणि उत्साही लोकांनी ते गाडीला बांधले नंतर त्या दुकानदाराकडे केळी विचारली तर त्याने चार सोनकेळी तशीच दिली. पैसे नकोत म्हणाला. आम्ही निघताना गडबडीने दुकानाबाहेर आला आणि गाडीच्या पुढच्या चाकाखाली लिंबू ठेवून "आता जावा" अशी खूण केली. आम्ही थोडे पुढे येऊन फोटोसेशन केले. नंतर थोडे पुढे आलो आणि अचानक आडवा प्रवास करत हायवे लागला. आता हा पुणे बेंगलोर की काय असा विचार करेपर्यंत लक्षात आले की हा मेंगलोर-बेंगलोर हायवे आहे. तिथेच एके ठिकाणी भरपेट नाष्टा केला. मध्ये एकदा नाराळाचे पाणी प्यायला थांबलो. स्ट्रॉ वगैरे काही भानगडच नाही. सरळ तोंडाला नारळ लावायचा!
तिथून पुढे आम्ही म्हैसुरला पोहोचलो. तिथलं युथ हॉस्टेल शोधलं. रुम ताब्यात घेऊन बॅगा टाकल्या आणि लगेच रिक्षा पकडून राजवाड्याच्या दिशेने निघालो. तिथे मिरवणूक चालू होणार होती. पुण्यात जसं गणपतीच्या वेळेला वातावरण असतं तसं वातावरण होतं. प्रचंड गर्दी होती. आम्ही एक जागा पकडून तिथेच सेटल झालो. ढकला ढकली सुद्धा भरपूर चालू होती. तोवर शोभारथ असतात तसे रथ यायला सुरुवात झाली. प्रत्येक जिल्ह्याचे रथ, असे ३२ रथ आले. नंतर प्रत्येक खात्याचा रथ. म्हणजे पोलीस, अग्निशामक दल. एक एस.बी.आयचा रथ सुद्धा होता. जिल्ह्यांच्या रथांसोबत तिथले स्थानिक पारंपारिक कलाकारही होते. ह्या नंतर ६ च्या सुमारास अश्वदल आलं. त्यामागे अंबारी. मुख्य देवीची अंबारीतून मिरवणूक होती. लोक देवीच्या घोषणा देत होते. इथे कार्यक्रम संपला आणि लोक परत जाऊ लागले. ह्या गडबडीत माझ्या हिमाचलच्या ट्रिपमधल्या एका मैत्रिणीचा, पल्लवीचा फोन आला. तिने आम्हाला एका कार्यक्रमाची तिकिटं आणून दिली. मग तासभर आम्ही तिथेच टाईमपास केला कारण प्रचंड ट्रॅफिक होतं. ज्या अंतरासाठी आम्ही मगाशी ६० रुपये दिले होते, त्यासाठी आता रिक्षावाले २००/- मागत होते.
थोड्यावेळाने हॉस्टेलवर जाऊन गाड्याकाढून म्हैसुरच्या दुसर्या टोकाला असणार्या त्या कार्यक्रमासाठी निघालो. ह्या कार्यक्रमाचे नाव म्हणजे "टॉर्चलाईट". जाताना रस्त्यात आम्हाला थांबवून ठेवलं कारण कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची आणि राज्यपालांची गाडी जाणार होती. हा कार्यक्रम म्हणजे पोलीस, एन.सी.सी अशा युनिफॉर्ममधल्या दलांचे संचलन असते. त्या दरम्यान त्यांनी बदुकांच्या फैरी झाडल्या. मग घोडेस्वारीची प्रात्यक्षिकं झाली. ह्यानंतर इंडियन आर्मीचे टॉर्नेडो नावाचे एक मोटरसायकलचे युनिट आहे, ते रॉयल इन्फिल्ड वर कसरती करतात. त्यांनी जबरदस्त प्रयोग केले! ३० मोटरसायकली एकमेकांच्या अत्यंत जवळून जाणे, क्रॉस्मध्ये जाणे इ. प्रयोग झाले. त्या युनिटच्या कॅप्टनने मोटरसायकलवर उभे राहुन पूर्ण स्टेडियमला चक्कर मारली. गाडीवर उभे राहणे, चालत्या गाडीवर बागेत बसल्यासारखं पेपर वाचणे, दोघांनी मिळून एक बार नेणे आणि तिसर्याने त्या बारवर व्यायामप्रकार करणे, चालत्या गाडीवर शिडीवर चढणे असे एकाहून एक थक्क करणारे प्रयोग केले. त्यांच्या टीमचे प्रतिक म्हणून "टी" आणि "म्हैसुर दसरा" असे फॉर्मेशन्सही बनवले. आम्ही कार्यक्रम संपायच्या १५ मिनिटं आधीच निघालो कारण इतके लोक निघाले की खूप जाम झाला असता. आता बाहेरुन जेवुन हॉस्टेलवर येऊन पडलो आहोत. रात्रीच्या वेळेला झाडांना केलेली सुंदर रोषणाई दिसते आहे.
***************************************************************************************
१ ऑक्टोबर २०१७
१ ऑक्टोबर २०१७
काल गडबडीत पॅलेस बघायला जमलं नाही म्हणून आज मुक्काम वाढवला आणि पॅलेस पहायचा प्लान केला. रिसेप्शनवर जाऊन एक दिवस मुक्काम वाढवून द्यायला गेलो. हॉस्टेल मध्ये कुणीही नसल्याने अगदी आनंदाने त्यांनी तो वाढवूनही दिला! रुमवरुन बाहेर पडलो "मल्लिगा इडली" खायला. मल्लिगा म्हणजे मोगरा. ही इडली मोगर्याच्या सुंगधाच्या तांदुळाचे एक वाण इथे डेव्हलप केले आहे त्यापासून बनवलेली असते. ती शोधायला झू पाशी गेलो. ते हॉटेल काही सापडेना. पण एका रिक्षावाल्याने "मल्यारी" नावाच्या एका वेगळ्या हॉटेलला पाठवलं. तिथे डोसा चांगला मिळेल म्हणे. तिथे गेलो तर २० - २५ मिनिटांच्या वेटींग नंतर आमचा नंबर लागला. एक अगदी लहानसे हॉटेल आहे. डोसा खरंच मस्त होता. छोट्या साईझचा मसाला डोसा होता. मसाला मात्र वेगळा बनवला होता. फारच टेस्टी प्रकार होता तो. झू मध्ये गेलो तर तिथे न्युज बाईट घेण्याचा कार्यक्रम चालू होता. एका माणसाला रिपोर्टर्सनी गराडा घातला होता. मग ती मजा बघत बसलो. ह्या प्राण्यांचे पण फोटो घेतले!
म्हैसुरचा झू अत्यंत प्रशस्त आहे. अनेक विभाग आहेत. झू मध्ये अनेक प्राण्यांना पिंजरे नाहीत, नॅचरल हॅबिटॅट सारखं ठेवलेलं आहे. नीट स्वच्छता राखलेली आहे. बाराच्या सुमारास झू मधून बाहेर पडलो. जेवायला सिद्धार्थ हे व्हेज नाही तर ज्वेल रॉक हे नॉन व्हेज हॉटेल असे पर्याय होते. ज्वेल रॉकला गेलो तर ते बार सारखं वाटलं म्हणून सिद्धार्थला गेलो. साऊथ इंडियन खाल्लं. आणि मग बाहेर येऊन २.५ स्कूपचं मोठं ड्रायफृट्स वगैरे घातलेलं मस्त आईसक्रिम घेतलं. पोट एकदम फुल्ल!
पॅलेसकडे आलो. तिकीट काढुन प्रचंड गर्दीत पॅलेस पाहिला. तो पाहून होईस्तोवर ४ वाजले होते. तिथून जवळच गांधी सर्कल आहे. तिथे तांब्याच्या वस्तुचे एक दुकान पल्लवीने सांगितलं होतं. तिथून एका प्रकारचे ग्लास मला आवडले ते घेतले. आणि परत लाइंटिंग बघायला पॅलेसला आलो. हळू हळू गर्दी जमत होती. लाईटींग सुरु झालं. फोटोत जे एक कळसासारखं दिसतंय ते पॅलेसमधलं मंदिर आहे.
इथून आम्ही आणि पल्लवी चामुंडा हिलला गेलो. म्हैसुरजवळ एक टेकडी आहे, तिथे एक मोठ्ठं मंदिर आहे. ओळख असल्याने आम्ही गाड्या सरळ आत नेऊ शकलो. पल्लवीची ओळख असल्याने गाभार्यात पुजा चालू होती तिथे गेलो. त्यांनी आम्हाला बाईकवरून चाललोय म्हणून तिथले दोन हार दिले बाईकला घालायला! आणि पुजा साहित्यही दिलं. ते आता आम्ही उद्या आम्ही बाईकला घालु. टेकडीवर वेगवेगळे व्ह्यु पॉईंट्स आहेत. तिथून संपुर्ण शहर दिसतं. ते पाहिलं.
आता रात्री जेवायला ज्वेल रॉकला आलो! रात्रीचे बारा वाजलेत, जस्ट रूमवर आलोय. उद्या मदुराईला जाऊ. रस्ता चांगला असावा अशी अपेक्षा. बघू काय काय होतंय.
***************************************************************************************
२ ऑक्टोबर २०१७
२ ऑक्टोबर २०१७
आज सकाळी बाहेर पडलो. म्हैसुर ते मदुराई ह्याचे तीन रूट्स आहेत. प्रत्येक जण वेगवेगळी माहिती सांगत होता. शेवटी गुगल ने सुचवलेला जो सर्वात लवकर पोहचवेल तो मार्ग घेतला. जाताना रुचीसागर नावाच्या हॉटेलमध्ये नाश्त्याला थांबलो. हॉटेल मालक पण असला भारी की मी जाताना एक टिश्यु पेपर घेतला तर त्याने थांबा म्हणून १०० चा एक पॅक आणून दिला. असू दे म्हणे तुमच्या प्रवासासाठी!
आमच्या गाड्या आणि कपडे वगैरे पाहून तिथे आलेल्या काकांनी आम्हाला नेहमीप्रमाणे प्रश्न विचारायला सुरूवात केली! कुठून आलो.. कुठे चाललो. सगळं ऐकून घेतल्यावर म्हणाले "घरचे कसे काय जाऊ देतात? आम्ही इथे कुठे १० मिनिटावर गेलो तर १० फोन येतात." गाडी चालवून अंग दुखुन येत नाही का हे ही त्यांनी आवर्जुन विचारलं. आता सवय झाली म्हणालो. मग त्या काकांनी आम्हाला मदुराईपर्यंतचा मॅप अगदी गावांच्या नावासहित काढून दिला.
तिथुन पूढे आम्ही दोन तीन फॉरेस्ट क्रॉस केले. फुनाजनुर ह्या फॉरेस्ट मधून गेल्यावर आम्ही "सत्यमंगलम टायगर रिझर्व्ह" मध्ये प्रवेश केला. नाव "टायगर रिझर्व्ह" वगैरे असलं तरी दोन तीन जंगलं पार करुन आम्हाला पहायला काय मिळालं तर... गायी, म्हशी, माकडं आणि... एक घोडं! सत्यमंगलम उतरताना "हेयरपिन बेन्ड २७ बाय २७" अस बोर्ड दिसला. आधी अर्थ कळला नाही. मग एक लगेच पुढचा बोर्ड दिसला "२६ बाय २७". मग लक्षात आलं की असे २७ बेन्ड उतरायचे आहेत. इथे गाडी चालवणं अगदी धमाल प्रकार असतो. कारण तुम्हाला पूर्ण यु टर्न घ्यावा लागतो. कॉर्नरवर ट्रॅफिक असलं की ते एक नीट बघावं लागतं. तिथे थांबून फोटो काढायला काही जमलं नाही. इथून पुढे आम्ही तामिळनाडूच्या खेड्या खेड्यांमधून प्रवास करत निघालो. रस्त्याबद्दल सतत वेगवेगळी माहिती मिळत होती. आम्ही दोघांनी विचारलं तर दोघांना वेगवेगळी माहिती मिळायची. एकाच गावात एकाच ठिकाणी विचारलं तरी! इथून पुढे आम्ही "गोबी" नावाच्या गावात थांबून जेवलो. कॉफी घेतली.
इथून पुढे दोन तीन ठिकाणी विचारल्यावर सगळ्यांनी चक्क एकच पत्ता सांगितला! त्या पत्त्यानुसार ३५-४० किमी नंतर मदुराई - सालेम हायवे ला टच झालो. २ लेन असलेला मोठा हायवे आहे. तिथे ३० किमी प्रवास केल्यावर तुफान पाऊस आला. मग एका पेट्रोलपंपावर थांबलो. रेनकोट, बॅगेचं कव्हर वगैरे काढून पावसाला तोंड द्यायला सज्ज झालो. पाऊस कमी झाल्यावर बाहेर पडलो. मदुराई ७०-८० किमी लांब होतं. पावसामुळे स्पिड कमी झाला आणि रात्रही झाली. रात्री ९.३० च्या सुमारास मदुराईला पोहचलो. देवळाजवळच चांगली रुम मिळाली. जेवायला बाहेर पडलो तर १०:३० झाल्याने सगळं बंद झालं होतं. मग एका ठिकाणी डोसा मिळाला. तो खाऊन मंदिरात चक्कर मारून आलो. एक ज्युसचे दुकान चालु होते तिथे जाऊन कोडाईकनाल फ्रुट नावाचा एक मिल्कशेक घेतला. अशा प्रकारे आजचा दिवस संपला. आता उद्या मंदिरात जाऊन येऊ आणि बहुदा उद्याच कन्याकुमारी गाठू.
***************************************************************************************
३ ऑक्टोबर २०१७
३ ऑक्टोबर २०१७
आज सकाळी साधारणपणे ६:३०- ७ ला उठून मंदिरात गेलो. अजिबात गर्दी नव्हती. स्पेशल तिकिट घेऊन ५ व्या मिनिटात गाभार्यात गेलो. तिथे आरती आणि नैवेद्य चालु होता. अर्ध्या तासाने तिथे देवीची दिव्यांमध्ये उजळलेली मूर्ती पहायला मिळाली. मंदिर फारच छान आहे. तिथली शिल्पं आणि खांब फार कलात्मक आणि आखीव रेखीव आहेत. त्याचे फोटो घेतले. गाभार्यातलाही एक फोटो घेता आला. मंदिराच्या आजुबाजुला हॉल्सचे फोटो काढले. मंदिराच्या परिसरात फिरुन तिथले हॉल वगैरे पाहिले. त्याच परिसरात मंदिर प्रशासनाचा नाश्ताचा स्टॉल होता. तिथे पोंगल आणि लाडू खाल्ले. पोंगल म्हणजे केळीच्या पानात गुंडाळलेली गरम गरम तुपात केलेली गव्हाची खीर होती. तिथला लाडू म्हणजे तिरुपतीच्या लाडवात अजून भरपूर तूप ओतायचं! छानच चव होती.
मग बाहेर येऊन एक म्युझियम पाहीलं. मला मुर्तिंमधलं काही कळत नाही फारसं पण नटराजाची मुर्ती सुंदर होती. सगळीकडेच खांब फार सुंदर होते. बाहेर येऊन किरकोळ शॉपिंग केलं. पुर्षांसाठी काही मिळत नाही. हां.. एके ठिकाणी अगदी बोटाएवढ्या बारक्या बारक्या काकड्या मिळाल्या. त्या खाऊन रूमवर आलो. तिथे थोडावेळ विश्रांती घेऊन कन्याकुमारीसाठी निघालो. मदुराई ते कन्याकुमारी हायवे आहे. वाटेत एका ठिकाणी जेवायला थांबलो. नंतर आरामात थांबत थांबत ७.१५ पर्यंत कन्याकुमारीला पोहचलो. कन्याकुमारीच्या वेशीवरच विवेकानंद केंद्र आहे. तिथे बुकिंग करुन रुम घेतल्या.
आल्या आल्या पहिल्यांसा मराठी पुस्तकं घेतली. इथे मराठीतली पुण्याला केंद्रात किंवा रामकृष्ण मिशनमध्येही मिळत नसलेली पुस्तकं बघायला मिळाली. ती लगेच विकत घेतली. आता उद्या सकाळी ६ ला सुर्योदय बघायला बीचवर जायचे आहे.
मीनाक्षी मंदिराचे गोपुर (गुगल वरून साभार)
हे ही तिथे होते
फोटो काढतोय म्हणल्यावर गडबडीने शर्ट काढला!
हे काका निवांत पेटी ओढत बसले होते
वेफर्स आणि शेंगदाण्याची भजी
दहीवडा!
व्हेज मील
२९००० किमी पूर्ण झाले!
ब्रेक तो बनता है!
पोहचलो!
लायटिंग केलेला "हॉर्न ओके प्लिझ" मोदक!
***************************************************************************************
४ ऑक्टोबर २०१७
४ ऑक्टोबर २०१७
आज सकाळी लवलर उठुन सूर्योदय बघायचा होता. अलार्म लावून ५ ला उठलो. आवरून तयार होऊन ५:३० ला सनराईज पॉईंट आहे विवेकानंद केंद्रात, तिथे गेलो. तोवर फटफटलं होतं. दगडातली एक जागा बघून कॅमेरा सेट केला आणि सूर्योदयाची वाट पहात बसलो. समुद्रात होणार सूर्योदय बघण्याची पहिलीच वेळ होती म्हणून छान वाटत होतं. थोड्यावेळानी सूर्य वर आला, त्याचे फोटो काढून ७ ला निघालो.
सूर्योदय बघायला जाताना मेमोरीयलचे पहिले दर्शन
सकाळी अशा फुलांचा सडा पडला होता
७:३० ला विवेकानंद रॉक मेमोरियलला जाणारी बस पकडायची होती. त्यामुळे परत जाऊन कॅन्टीनला नाश्ता करून निघालो. बसने तिकिट केंद्राला गेलो. तिथे भली मोठी लाईन होती. पण १०-१५ मिनिटातच आम्ही बोटीत बसलोही होतो. बोटीने रॉक मेमोरीयलला पोहचलो. बोटीचं एका बाजुने तिकिट ३४/- आणि मेमोरीयलसाठी २०/- आहे. तिथे गेल्यावर तिथली कलाकुसर आणि बांधकाम हे पहायचं होतं. श्रीपाद दर्शन वगैरे घेऊन जिथे विवेकानंदांचा पुतळा आहे तिथे मुख्य मंडपात जाऊन बराच वेळ बसलो. थोडे डागडुजीचे काम चालु आहे त्यामूळे लाकडाचे सपोर्ट वगैरे लावलेले होते. आत फोटो घेण्याला मनाई आहे. लोकांनी चोरून फोटो काढले तर तिथला सिक्युरिटी गार्ड व्यवस्थित मोबाईल चेक करून फोटो डिलीट करायला लावत होता. त्यामुळे आम्ही त्या भानगडीत पडलो नाही. मुख्य पुतळा हा जे जे स्कूलच्या सोनवडेकर नावाच्या सरांनी केला आहे तो पहायचा होता. त्याबद्दल बरंच वाचलं होतं. त्याच्या आजुबाजुला अप्रतिम कलाकुसर केलेली आहे. पूर्ण बांधकाम ग्रॅनाईटचं आहे. त्याला वेगवेगळे आकार दिले आहेत, डिझाईन्स केले आहेत. गोल - दंडगोल वगैरे आकारांचा वापर केलाय. ते बघण्यात बराच वेळ गेला. खाली ध्यानमंडप आहे. तिथे अत्यंत शांतता असते. लहान मुलांना सोडत नाहीत. आत "ओम" चे चित्र लावलेय. तिथून सुंदर व्ह्यू दिसतो. ते बघत बराच वेळ बसलो. बराच वर्षांपासून इथे यायचं होतं. त्यामुळे इथे बसून छान वाटलं.
ह्यांनी पण दर्शन दिलं. सकाळी अलार्म सोबत मोराच्या केकांनी जाग आली - एकदम भारी वाटले
हत्तीच्या पाठीवरील झूल दगडाची आहे आणि त्याला कापडाप्रमाणे फोल्ड केला आहे
मंदिरात विकायला असणारे दिवे
संपूर्ण मेमोरियल मध्ये एक विशिष्ट रंग वापरून पांढरा पट्टा काढलेला आहे. ज्यावरून चाललं की बाकीचा खडक जरी तापला तरी तिथे गार रहात होतं. त्यामुळे चालताना त्रास होत नाही. सगळं बघून १०:३० च्या सुमारास कन्याकुमारीला परत आलो. जिथे फेरी सोडते तिथेच बाजुला कन्याकुमारी देवीचे मंदिर आहे. ते बघून ११ च्या बसने विवेकानंद केंद्रात परत आलो. केंद्रातही अनेक बघण्यासारख्या गोष्टी आहेत. रामायण दर्शन अतुशय सुंदर होतं. रामाच्या जन्माची कथा ते संपूर्ण रामायण अप्रतिम पेंटिग्स मध्ये साकारलेली आहे. (बहुदा) मल्याळम, इंग्रजी आणि हिंदी ह्या तीन भाषांमध्ये माहिती दिलेली आहे. पेंटिग्सचे डिटेलिंग अत्यंत सुंदर आहे. त्यावरच भारतमाता सदन आहे. त्यात भारतमातेचा २० फुटी ब्रॉन्झचा पुतळा आहे. आणि भारतात ज्या महत्वाच्या गोष्टी घडल्या त्याची चित्रे आहेत. त्यात शिवाजी महाराज आणि जिजाऊ ह्यांचेही चित्र आहे. गंगोत्री म्हणून एकनाथजींच्या वापरातल्या वस्तू, चित्रे, आणि हस्ताक्षरातली पत्रं उपलब्ध आहेत. हे सगळं बघून येऊस्तोवर प्रदर्शनाची वेळ संपत आली होती. ह्या सगळ्या चित्रांचे एक छान पुस्तकही मिळते. ते घेऊन जेवायला गेलो.
संध्याकाळसाठी एक लोकल टूर बुक केली होती. ती ३ ला चालू होणार होती म्हणून २ ला येऊन एक छोटी झोप काढली. ३ ला टूर चालू झाली. आजुबाजूची सुचिद्रम मंदिर, राम मंदिर, साईबाबांचे मंदिर वगैरे दाखवले. मुख्य आकर्षण सुचिंद्रम मंदिर आणि तिथले म्युझिकल पिलरच होतं. ते पिलर्स दगडी असून वाजतात. त्यातून वेगवेगळे आवाज येतात, जसं की ड्रमचा आवाज, ग्लासचा आवाज. पण ते फार काही भारी वाटलं नाही. दगड लंबगोलाकार कोरल्याने तो वाजतो असं लक्षात आलं. तिथून एका राम मंदिरात गेलो. तिथे रामापेक्षा हनुमानाची जास्त मोठी मुर्ती होती. ती पाहून बाहेर आलो तर एका ठिकाणी एकाने रॉयल एन्फिल्ड घेतलेली होती, आणि पुजारी त्याच्या चारी बाजुला कापुर लावून पुजा करत होते. गाडीच्या चाकाखाली लिंबं ठेवून मोठमोठया आवाजात मंत्र म्हणून हे चालू होतं. नंतर अगदी भक्तिभावाने प्रसाद दिल्यासारखं त्या गाडीची किल्ली त्याच्या मालकालाच दिली!
हाल्फ डे टूर दरम्यान... vattai kottai किल्ल्यावर
सूचिन्द्रम मंदिर
हाल्फ डे टूर - दत्ताचे मंदिर
सनसेट पॉईंटजवळ टाईमपास
"रॉयल" पूजा!
सूर्यास्त
केंद्रातील रामायण दर्शन इमारत
केंद्रातील गणपती मंदिर
तिथून आम्ही सनसेट पॉईंटलाही गेलो. एकाच दिवसात सूर्योदय आणि सूर्यास्त बघण्याची माझी पहिलीच वेळ होती. सूर्यास्त कोवालम बीचला होता. तो पाहून परत केंद्रात आलो. तिथे काही एक दोन पॉईंट्स ठरवलेले पहायचे होते. एक म्हणजे एकनाथजी रानडेंची समाधी आणि दुसरं म्हणजे विवेकानंदांचा जो पुतळा स्मारकावर बसवला नाही तो इथे ठेवला आहे. तो पुतळा बघितला. परत येईस्तोवर ९ वाजले होते. येताना एक आजोबा भेटले. आम्हाला बघून सहजच बोलायला सुरूवात केली. कुठुन आला वगैरे चौकशी केली. ८० + तरी सहज असतील. ते अहमदाबादचे होते. ते १९७२ साली केंद्रात आले. ४५ वर्षात त्यांनी इथे वेगवेगळी कामे केली आहेत. एकनाथजींसोबत त्यांनी काम केले आहे. त्यांनी आजोबांची मुलाखतही घेतली होती. अशा बर्याच वेळ गप्पा झाल्या. नंतर जेवून कन्याकुमारीमध्ये एक फेरफटका मारून आलो. आता उद्या सकाळी परत सनराईज बघून त्रिवेंद्रमसाठी निघू.
***************************************************************************************
५ ऑक्टोबर २०१७
५ ऑक्टोबर २०१७
आज सकाळी उठून बाहेर पडलो, उठायला उशीर झाल्याने सनराईजचा प्लॅन कॅन्सल केला आणि सरळ गाड्यांना बॅगा बांधायला सुरुवात केली. मी बॅग बांधून केंद्राच्या रिसेप्शनला पोहोचलो तर तेथे पंढरपूर / माळशिरस भागातले चारपाच शेतकरी आजोबा भेटले. त्यांच्याशी गप्पा मारताना बघून मुंबईचे आणखी चार जण गप्पा मारायला आले. कुठले? काय? कुठे प्रवास वगैरे बोलणे झाले. मी 2018 च्या मार्च / एप्रिल मध्ये जो प्रवास ठरवला आहे तो प्रवास ते आज सुरू करणार होते फक्त नेमक्या उलट्या दिशेने... मग त्यांचा नंबर घेतला आणि नंतर एकमेकांना फोन करायचे ठरले.
कन्याकुमारीतून बाहेर पडलो, केरळच्या छोट्या रस्त्यावरून गाडी चालवायला मजा येत होती. लहान रस्ते, बाजूने वाहणारे कॅनाल आणि मस्त हिरवाई.. पण हे दृष्य बदलेल असे वाटत होते ते बदलले नाहीच. हिरवाई चालेल पण लहान रस्ते आणि त्यावर पसरलेल्या लोकांचे काय? लहान रस्ते कुठे तरी मोठे होतील, गाव संपलं की ट्रॅफिक कमी होईल असा विचार करत गाडी चालवत होतो. ३० किमी नंतर लक्षात आलं की केरळातली गावं एकाला एक जोडून आहेत. एक गाव संपून दुसरं कधी सुरू झालं ते कळत नाही. बँकावरच्या पाट्या बदलल्या की गाव बदललं हे कळायचं! त्यामुळे आमचा स्पीड ड्रास्टिकली कमी झाला. कन्याकुमारीपासून 250 किमी आलो आहे पण वाटेत एकही किमान 5 किमीचा पॅच नव्हता जेथे गांव / घरे नव्हती.
असा अखंड ट्रॅफिकचा रस्ता होता
कसे बसे त्रिवेंद्रमला पोहचलो. तिरुअनंतपुरम राजधानीचं शहर असलं तरी आत्ता तरी ते आम्हाला छोटेखानी शहर वाटलं. शहरात पोहचल्या पोहचल्या मंदिर लगेच सापडलं आणि बाहेर पडलो की लगेच हायवे लागला म्हणून कदाचित तसं वाटत असेल. मंदिरात प्रचंड सिक्युरिटी होती. माहिती विचारायला पोलीसाकडे गेलो तरी तो आधी गाडी मागे घ्या म्हणत होता. आणि बहुतेक त्याचा काही तरी गैरसमज झाला. तो सारखा आम्हाला येऊन येऊन "रायफल कुठंय? पिस्तुल कुठंय?" असं विचारत होता!! शेवटी मी वैतागुन त्याला विचारलं की मी बाबा रे मी का बंदुका घेऊन फिरेन?? मग शंतनुच म्हणाला की अरे तुझे बूट बघ, आपला अवतार बघ. त्याची बॅग केमोफ्लॅश रंगाची आहे. आमचे कपडेही असे. त्याने बहुदा पोलीसांना आम्ही आर्मीचे वाटलो! त्यामुळे आम्ही काही प्रश्न विचारला की तो आधी रायफल कुठंय म्हणायचा!
पद्मनाभ मंदिर
मंदिरात एक चांगलं केलंय, तिथे माहिती देणारा माणूस हिंदीत माहिती देतो. त्याने मंदिरात काय चालेल आणि काय नाही हे व्यवस्थित सांगितलं. हातातले स्मार्टवॉचही चालणार नाही म्हणाला. कोणतेही इलेक्ट्रॉनिक आयटम्स चालत नाहीत. अगदी कारची रिमोट की असेल तर ती सुद्धा चालत नाही. आम्ही स्पेशल दर्शन तिकिट काढून आत गेलो, तरी अर्धा तास वेटींग होतं.
त्यानंतर दर्शन झालं. पुरुषांना शर्ट वगैरे काही चालत नाही, नुसत्या लुंगीवर दर्शन घ्यायचं. बायकांनी सुद्धा पंजाबी ड्रेस घालता असेल तर त्यावरुन साडी सारखं नेसून जायचं असा इथे नियम आहे. मंदिर सुंदर आहे. लाकडी बांधकाम आहे. मदुराई सारखेच खांब आहेत पुष्कळ. ह्या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथला प्रसाद "टीन पॅक्ड" होता. म्हणून मग आम्ही घरी न्यायला २-३ पॅक्स घेतले. कारण ते एक महिना टिकतात.
इथून बाहेर पडलो आणि आज जितकं शक्य आहे तितकं पुढे जायचं असं ठरवलं होतं. पण तरी दुपारी २ ते संध्याकाळी ७ ह्या वेळेत फक्त १५० किमी झाले. टारगेट तर कोचीन होतं, पण मग शेवटी अॅलप्पीला मुक्काम केला. आता जस्ट बाहेर जाऊन भरपुर कांदा आणि मसाला घतलेला पण गोड चवीची माशाची "फिश मोईली" ही आवडती डिश खाल्ली.
असे ताजे मासे पुण्यात (घरपोच) मिळायला हवेत!
स्ट्रॉबेरी सोडा, हा चेन्नईचा एक वेगळाच ब्रॅण्ड आहे
***************************************************************************************
६ ऑक्टोबर २०१७
६ ऑक्टोबर २०१७
आज सकाळी अॅलप्पीहून निघायची तयारी करत होतो. तेव्हा खालचं रेस्टॉरंट सुरु झालं होतं. त्याला विचारलं काय तयार आहे तर म्हणाला इडीअप्पम तयार आहे. म्हणून इडीअप्पम आणि कॉफी मागवली. त्याने इडीअप्पम सोबत अत्यंत स्वादिष्ट कुर्मा दिला होता. एकदम मजा आली!
इडीअप्पम
बाहेर पडलो. रस्त्यांवर जोरजोरात "सारे जहांसे अच्छा" गाणं लाऊडस्पीकरवर लावलं होतं. अर्धा किमीपर्यंत दर एक १०० - २०० मीटर वर स्पीकर्स लावले होते. कोचीन कडून निघालो तेव्हा बाहेर पडतानाच बारिकसा पाऊस होताच. त्यामुळे आम्ही रेनकोट्स आणि बॅग कव्हर घातले होते. थोड्या वेळानी मात्र मुसळधार पाऊस सुरु झाला. व्हिसीबिलिटी एकदम कमी झाली. काही दिसेना म्हणून हळूहळू पिढे जात राहिलो पण मग थांबलो. कोचीन शहरात पोहचेस्तोवर पाऊस चालू होताच.
कोचीदरम्यान मुसळधार पाऊस
प्रचंड रहदारीत आम्ही शहर क्रॉस केलं. बाहेर पडल्यावर जरा ट्रॅफिक कमी झालं. केरळ मध्ये असंच आहे सगळीकडे. सगळी लोकसंख्या रस्त्यावर पसरलेली, गावाला जोडून गावं. नंतर त्यानंतर पेट्रोल पंप बघून गाडी बाजुला घेतली आणि रेनकोट्स, गार्ड्स वगैरे अक्षरश: धोबीघाट केल्यासारखं वाळत घातलं. तिथे नायट्रोजन होता म्हणून मग ते ही रिफील करुन घेतलं. तिथे अजून एक प्रकार लक्षात आला म्हणजे बॅगेचं जे कव्हर होतं ते सायलेन्सरला चिटकत होतं. बुलेटच्या गरम सायलेन्सरला कव्हर चिकटून ते जळणार हे नक्की. थोडं चाचपल्यावर लक्षात आलं की ते जळून त्यात पाणी गेलंय आणि रेनकव्हरच्या आत पाणी जाऊन जाऊन पिशवीसारखं बनून त्यातच पाणी जमा झालं होतं. मग ते काढून वाळवलं.
उजव्या बाजुला बॅग खाली आलेली दिसतेय ते पाणी साचलंय
केरळमध्ये अत्यंत बेदरकार ट्रॅफिक.. रेकलेस.. कोणीही कुठेही कसंही चालवतंय.. मला वाटलं होतं सगळ्यात बेकार ट्रॅफिक म्हणजे काश्मीरचं, श्रीनगर मध्ये आतापर्यंत सगळ्यात वाईट ट्रॅफिक पाहिलं होतं. हे केरळ त्याच्या वर नंबर आहे. समोरचा माणूस लाईट देतो, हॉर्न मारतो असं काही तरी बेसिक सुद्धा इथे कुणी पाळत नाही. कुणीही कुठेही घुसतोय. आणि हे सगळं भयंकर स्पीड मध्ये. मग थोड्यावेळानी आम्ही सुद्धा सगळे नियम गुंडाळून ठेवले आणि आमची गाडी पुढे काढायला सुरुवात केली. बस आणि ट्रक अंगावर येत होते आणि अगदी जवळून जात होते. आम्ही गाड्यांना मागे बॅगा लावल्याने गाडीची रूंदी बर्यापैकी वाढली होती. त्यामुळे ते सांभाळत गाडी चालवायची होती. पण आम्हालाही पुण्याच्या होमग्राऊंडवर प्रॅक्टीस असल्याने आम्हीसुद्धा त्यांच्यासारखीच गाडी चालवायला सुरुवात केली. डावीकडून ओव्हरटेक, शहर असो वा गाव, स्पीड कमी न करता आहे त्या स्पीड मध्ये गाडी चालवणे वगैरे प्रकार जे आपण एरवी कधीही करणार नाही ते सगळे प्रकार केले! यथावकाश आम्ही कोचीन क्रॉस करुन पुढच्या गावाला आलो. आज आम्ही कोझीकोडे किंवा कन्नुर ठरवलं होतं. गुगल बाबाच्या कृपेने जो रस्ता सर्वात आधी पोहचवत होता त्या रस्त्याने कोझीकडे निघालो. वाटेत कॉफी नाही तर शहाळ्यांसाठी ब्रेक घेत होतो. दुपारी एकाठिकाणी थांबून डोसा आणि व्हेज बिर्याणी खाल्ली. इथल्या बिर्याणीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात बर्याचे प्रकारचे ड्रायफ्रुट्स घातलेले असतात. त्यातही एक प्रकारचे मोठा बेदाणे. आपले चार बेदाणे एकत्र केले तर ह्यांचा एक बेदाणा होता. आज कन्नूरच्या २० किमी आधी थेल्चरी (की अशाच काहीतरी!) गावात थांबलो. रुम घेतली. आजही इथे फीश मोईली खाल्लं. काल पेक्षा जरा वेगळा होता. ग्रेव्ही जास्त होती. कोकोनट बेस्ड ग्रेव्ही होती. गोड होती. त्यात कांदा, ढब्बू मिरची वगैरे असूनही. ही पुण्यातही अजून मिळत नाही. इकडेच मिळते ही डीश.
ब्रिज
आज आम्ही ३५० किमी गाडी चालवली. ज्या प्रकारचा रस्ता होता ते पहाता ही एक अॅचिव्हमेंटच आहे. कारण "आयल ऑफ एन्टीटी" मध्ये रेस मध्ये जशा गाड्या चालवतात तशी गाडी इथे लोक चालवतात! वाटेत आम्ही एका ठिकाणी थांबलो होतो तर तिथले एक लोकल काकांनी आमच्याशी गप्पा मारल्या. त्यांनी खाणाखुणांच्या सहाय्याने आणि मोडक्या तोडक्या हिंदी - इंग्रजी मध्ये आवर्जुन उल्लेख केला की केरळमध्ये ट्रॅफिक फारच वाईट आहे तरी गाडी कशी चालवत आहात? काकांची मजा म्हणजे त्यांना विचारायचं होतं की "पावसाचा त्रास होत नाही का?". त्यासाठी ते २-३ मिनिटं (तब्बल २४० सेकंद तरी झाले असतील!) खाणाखुणा करून आम्हाला "पावसाचं" वर्णन करुन सांगायचा प्रयत्न करत होते. आम्हाला आपलं धबधबा वगैरे काहीही वाटत होतं. शेवटी आम्हाला कळलं की ते पावसाबद्दल विचारत आहेत. मग त्यांना गार्ड्स वगैरे दाखवले.
आणखीन एक मजा झाली. अंधारात चुकामुक होऊ नये म्हणून मी आणि शंतनू पुढे मागे चालवतो गाडी चालवतो. एकदा मला शंतनू दिसेना. मला वाटलं २-३ गाड्यांमागे असेल म्हणून मी मागच्या अॅक्टिव्हावाल्याला पुढे जायचा सिग्नल दिला आणि गाडी जरा बाजुला घेतली. त्या माणसाला इतकं सौजन्य अनपेक्षित असावं. त्यानी मला ओव्हरटेक केलं, हात दाखवला आणि हसून थॅन्क्यु म्हणला! आणि हे सगळं हायवे वर!
असेच आम्ही पुढे मागे जात होतो तर एक जण आम्हाला ओव्हरटेक करून पुढे गेला. समोरून एक गाडी येत होती आणि हा मनुष्य त्याला हेड ऑन गेला होता. मग त्याने रस्ता ओलांडायला एक जण थांबला होता, त्याच्या मागून स्पीडमध्ये वेडीवेकडी गाडी घालून रस्त्याच्या दुसर्या बाजुला घातली आणि परत इकडच्या बाजुला आला. मी आपला आता तो उडवल्या जाईल ह्या हिशोबाने गाडी हळूहळू चालवत होतो. पण काही नाही. लोकांना त्याची सवय होती. तो आरामात उजव्या बाजुला जाऊन समोर येणारी गाडी क्रॉस करून परत आला! खतरनाक!
आता उद्या गोकर्ण गाठायला पाहिजे. आणि मग पुणे.. बघू आता कसं जमतंय!
***************************************************************************************
७ ऑक्टोबर २०१७
७ ऑक्टोबर २०१७
आपण लहानपणी चित्र काढताना जसं काढायचो.. डोंगर आहे..त्याला हिरव्यागार झाडांनी लपेटलेलं आहे.. मग एखादं छोटसं घर आहे.. बाजुने एक नदी वहात आहे.. आणि ह्या सगळ्यातून एक रस्ता जातोय.. तो गुळगुळीत रस्ता म्हणजे आजचा रस्ता! नितांत सुंदर असा रस्ता होता. आम्ही सकाळी बाहेर पडलो. हायवे लगतच राहिलो त्यामुळे कन्नुर वगैरे गावं लगेच क्रॉस केलं. गेले दोन दिवस रस्त्यावर सतत गर्दी होती, तसं आज काहीही नव्हत. अगदी मोकळे चाकळे रस्ते. छान मेन्टेन केलेले. बाजुने मस्त नारळाची झाडं आणि बॅकवॉटर. आम्ही किनारपट्टीच्या बाजुने प्रवास करत असल्याने सतत कोणता न कोणता ब्रिज लागत होता. त्याच्या बाजुचा नजारा अप्रतिम! फक्त ब्रिज अत्यंत अरुंद असल्याने थांबून फोटो काढायला जमलं नाही. पण अगदी खरोखर बघण्यासरखा नजारा!
केरळातील सुंदर रस्ते
नारळपाणी ब्रेक
केरळात खुले आम गवेराचे होर्डीग्स लावले होते... (बादवे.. बसचे रंग बघा..)
तिथून आम्ही मंगलोरच्या दिशेने आलो. मंगलोरच्या १२-१५ किमी आधी फोर लेन हायवे चालू झाला. मग तिथे थांबून आम्ही जरा फोटो काढले. मंगलोर शहर बायपास करुन आम्ही उडपीच्या दिशेने निघालो. वाटेत एका ठिकाणी मिनी करी नावाचं हॉटेल होत. तिथे आम्ही फिश मील आणि व्हेज मील घेतलं. मस्त मसाला फ्राय मासा होता.
मंगलोरकडे जाताना
फीश मील
फोर लेन हायवे
उडपी क्रॉस करताना शंतनूची गाडी अचानक बंद पडली. पुर्वी असं दोन वेळा झालं होतं. मग टाकीचं झाकण उघडून एअर काढली की गाडी सुरू होते. मग तिथून पुढे आम्ही पुढे मागेच थांबलो. थोड्या वेळाने जेवणामुळे चांगलीच झोप यायला लागली. म्हणून मग आम्ही एका पेट्रोल पंपावर थांबून टाईमपास करत बसलो. तिथे मग मी हायवे मोकळा आहे हे बघून हायवेवर फोटोग्राफीचे प्रयोग केले. आणि मग तिकडून निघालो.
फोटोग्राफीचे प्रयोग
३०,००० किमी पुर्ण झाले
फोर लोन हायवे बराच वेळ असेल असं वाटलं होतं. पण तो लवकरच संपला आणि मग प्रशस्त पण सिंगल लेन हायवे सुरू झाला. आमच स्पीडही मग जरा कमी झाला. म्हणून मग आम्ही मुरुडेश्वर इथे मुक्काम करायचं ठरवलं. लॉज मध्ये सामान टाकून मंदिरात गेलो. पण मंदिर बंद झालं होतं. उद्या सकाळी आता लवकर निघून पुणे गाठायचा प्लान आहे. नाहीच जमलं तर कुठे तरी मुक्काम करून सोमवारी सकाळी लवकर पुणे!
अजून एक व्ह्यू
मुरुडेश्वरला रात्री फोटॉग्राफी केली. इथे शंकराची भव्य मुर्ती आहे. नंदी सुद्धा प्रचंड मोठा आहे. गोपुराचा फोटो काढायला सकाळी जाऊन. इथे भूकैलास केव्हच म्युझियम आहे, तिथले पुतळे फारच सुंदर होते. ते बघून आता आम्ही रूमवर आलोय. उद्या गोपुरावर जाऊन दर्शन घेऊन आणि ७ -७:३० ला बाहेर पडू.
मुरुडेश्वर
मुरुडेश्वर
मुरुडेश्वर
शंकराची भव्य मूर्ती
भूकैलास केव्ह्ज
***************************************************************************************
८ ऑक्टोबर २०१७
८ ऑक्टोबर २०१७
काल थिल्चरी बाहेर पडल्या पडल्या एक टोल नाका लागला होता. तिथे आम्हाला एक ट्रक दिसला होता एम.एच ११ पासिंगचा. त्या मामांना ट्रक बाजुला घ्यायला लावला. आम्हाला पुढचा रस्ता नक्की कळत नव्हता. येल्लापुरहुन जावं की गोव्याहून वरती यावं हे क्लिअर होत नव्हतं. ते त्या मामांना विचारलं. त्यांनीही सगळी चौकशी केली. त्या मामांनी सांगितलेल्या रस्त्याने यायचं ठरवलं.
आज मुरुडेश्वरला शंकराची मोठी मुर्ती आणि गोपुर बघण्याचा प्लान होता. त्यामुळे पहाटेच उठलो आणि ५:३० ला मंदिरात गेलो. मंदिर ६ ला उघडणार होतं. मी पहिलाच! त्यामुळे मागून आलेल्या लोकांना मी लाईनमध्ये उभं रहायला लावलं! मंदिर उघडल्यावर पहिला असल्यामुळे लाईन वगैरे काही भानगड नव्हतीच. दर्शन घेतलं. फोटो घेतले. गोपुरापाशी ६:३० लाच पोहचलो. ते मात्र ७:३० ला उघडणार होतं. त्यामुळे तिथेही मी पहिलाच! ७ च्या सुमारास तिथला माणूस आला. त्याने लगेच सगळं सुरु केलं. १८ व्या मजल्यावर जाता येतं. चारी बाजुंचा व्ह्यु बघता येतो. तिथे फोटो काढले आणि रुमवर आलो.
मुरुडेश्वर
गोपुराच्या १८ व्या मजल्यावरुन दिसणारा नजारा
मुरुडेश्वर मंदिर
रात्री १२:३० ला लॉजवर जोरजोरात भांडणं झाली होती. मला आधीच त्या लॉज बद्दल शंका होती. गाड्या सेफ आहेत ना हे मी तीन तीनदा विचारुन ठेवलं होतं. ही भांडणं झाल्याने अजूनच टेन्शन. त्यात ते टुरिस्ट लोकं भांडणं करुन रात्रीच निघुन गेले. मग सकाळी मी परत येऊन त्या मालकाला पिडत बसलो की काय झालं वगैरे! तोवर शंतनूचंही आवरून झालं. मग तिथून निघालो. आजचा रस्ताही सिंगल लेनच होता, पण चांगला होता. एका ठिकाणी थांबून नाश्ता केला. पुढे २-३ रोड येल्लापुरच्या जंगलात जाणारे रोड होते. त्यात आम्हाला अंकोल्याच्या जवळून जाणारा रस्ता घ्यायचा होता. ह्या गडबडीत शंतनू बहुदा एखाद्या ट्रकच्या बाजुने माझ्या पुढे गेला असेल, मी त्याची वाट बघत थांबलो. तोवर तो ३० किमी पुढे जाऊन त्या जंक्शनला थांबलाही होता. त्यात अर्धा तास गेला.
येल्लापुरचे जंगल एकदम घनदाट आहे. जंगलातला गुळगुळीत रोड. विशेष म्हणजे तिथे पेट्रोल पंपही आहेत. तिथे निवांत फोटोग्राफी करत करत एका गावात एक ब्रेक घेतला. इथुन पुढे एन.एच ४ ला लागय्चं होतं. आमच्याकडचे चिवडे वगैरे काढले. त्या होटेलमध्ये भेळेचा सेटप दिसला म्हणून त्याला एक भेळ दे म्हणलं. भेळ म्हणजे चुरमुर्यात सांबार टाकून त्याला फुटाण्याचं पीठ लावलेलं. सुसला (सुशीला?) च्या जवळपास जाणारा पदार्थ.
भन्नाट भेळ
तिथून बेळगाव ७५ किमी राहिलं होतं. धारवाड स्किप करुन हा रोड होता. ३-४ किमी गेल्यावर त्या रस्त्याची लक्षणं काही ठिक दिसेनात. तरी तसंच पुढे जाऊयात म्हणालो तर सतत स्पीड ब्रेकर्स. असं ७०-८० किमी जाणं शक्यच नव्हतं. मग तिथे थांबुन एकाला विचारलं की हायवेला कसं लागायचं तर त्याने आम्हाला कित्तुरला पाठवलं. तर तो रस्ता मात्र चांगला निघाला. थोडं पुढे जाऊन बघितलं तर रस्त्यात एक झाड आडवं पडलं होतं. ते बघून आम्ही चक्रावलो. पण काही नाही, लोक ते झाड तोडत होते. त्यामुळे लगेच तिथून निघता आलं.
रस्त्यात पडलेले झाड
लगेच १०-१५ किमी वर हायवे लागला. लगेच आम्ही स्पीडही पकडला. बेळगाव क्रॉस केलं. निपाणीच्या जवळ मला धुक्यासारखं काही तरी दिसू लागलं. असं वाटलं की मुसळधार पाऊस चालु आहे की काय. पण नंतर कळालं की साखर कारखान्याचा धुर सगळ्या गावात पसरला आहे.
शंतनूला कोल्हापुरात काम होतं आणि मला पुण्याला पोहचणं आवश्यक होतं. त्यामुळे तो कोल्हापुरलाच थांबणार आणि मी एकटाच पुढे जाणार असं ठरलं. मी मग कोल्हापुर क्रॉस करुन पुढे निघालो. वाठारच्या जवळ जबरदस्त पाऊस लागला. मग मी पुण्याचा प्लान कॅन्सल करुन परत इस्लामपुरला आलो. आणि मित्राकडे मुक्काम केला.
आक्खा मसूर
***************************************************************************************
९ ऑक्टोबर २०१७
९ ऑक्टोबर २०१७
आजच्या प्रवासाला ७:३० ला सुरुवात केली. अगदी ओळखीचा रस्ता. खंडाळ्याजवळ वडा खाल्ला. ११ ला घरी पोहचलो. खूप छान ट्रिप झाली. बरोब्बर ३५०० किमी प्रवास आणि १२ दिवस! ह्या दरम्यान वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळाल्या. जसं की केरळ मध्ये आपण कुठेही पाणी मागितलं की गरम उकळत्या पाण्याचा जगच समोर ठेवतात! मग प्लेन वॉटर मागितलं की रुम टेम्परेचरचं पाणी देतात. केरळमध्ये हायवेला लागून जी हॉटेल असतात, त्याच्या बाहेर एक माणूस हॉटेलच्या नावाची पाटी घेऊन दिवसभर बाहेर उभा रहातो! तसं उभं रहाण्याचं कारण काही कळलं नाही, पण तशी पद्धत आहे खरी!
भरपूर इडली वडे, इडीअप्पम खाल्ले, फिश मोईली २-३ दा खायला मिळाली. तरी २-३ गोष्टी ह्या ट्रिपमध्ये जमल्या नाहीत. त्यासाठी एक वेगळी ट्रिप इकडे प्लान करावी लागेल. कर्नाटक किनारपट्टीला किल्ले आहेत बरेचसे. मुंबई ते कोचीन हा एक अत्यंत सुंदर रस्ता आहे. त्यावर स्पेशल राईड करायचा एक प्लान करायचा आहे. तर मग भेटत राहूच अशाच राईड्सवर! धन्यवाद!
प्रतिक्रिया
9 Oct 2017 - 2:44 pm | मोहन
मोदकरावांच्या जबरदस्त सवारीचे वर्णन. आता अखेरच्या ट्प्प्या वर सवारी पोहोचली असल्याने जरा हुरहुर वाटते आहे. सवारी आमच्या पर्यंत आणल्या बद्द्ल्ल पिराताई चे अनेकानेक धन्यवाद!
9 Oct 2017 - 3:18 pm | इरसाल
परतीची कहाणी जरा पटापट आवरताय अस नाय वाटत ????????????
10 Oct 2017 - 4:35 am | पिलीयन रायडर
तर मंडळी, शेवटच्या दोन दिवसांचे अपडेट्स टाकले आहेत!
धन्यवाद!
10 Oct 2017 - 7:15 am | अभिजीत अवलिया
मस्त झालीय भटकंंती.
10 Oct 2017 - 12:27 pm | डॉ सुहास म्हात्रे
भन्न्नाट सफर ! लाईव्ह अपडेट टाकल्याने अजूनच जास्त मजा आली !
या प्रयोगासाठी मोदक आणि पिरा यांचे अभिनंदन आणि आभार !
10 Oct 2017 - 1:13 pm | जव्हेरगंज
व्व्व्व्वाह्ह्ह्ह!!!
10 Oct 2017 - 2:15 pm | पाटीलभाऊ
मस्त भटकंती...!
10 Oct 2017 - 3:29 pm | सिरुसेरि
जबरदस्त सफर आणी फोटो
10 Oct 2017 - 7:29 pm | बाबा योगिराज
एकदम भारी सफर मोदकराव. मुद्दामून तुमचा धागा बघत नव्हतो. आज हिम्मत करून धागा बघितला नुसती जळजळ. एकसे एक खाद्य पदार्थ काय, बुलेट पळवायला भारी से भारी रस्ते काय, निवडलेला रूट अन जागा पण एकदम भारी.
वाह खतरनाक.
शेवटी हा धागा रोज अपडेट केल्याबद्दल पीरा तै चे विशेष धन्यवाद.
बाबा योगीराज
10 Oct 2017 - 10:13 pm | मिहिर
सुंदर सफर व वर्णन. रोज उत्सुकतेने वाचत होतो. धन्यवाद मोदक आणि पिलीयन रायडर.
10 Oct 2017 - 11:08 pm | एस
जोरदार टाळ्या मोदकराव आणि पिराताई यांच्यासाठी!
10 Oct 2017 - 11:57 pm | राघवेंद्र
मोदक राव मस्त ट्रिप. खूप धन्यवाद पिरा रोजच्या रोज धागा अद्ययावत केल्या बद्दल.
11 Oct 2017 - 4:12 am | निशाचर
प्रवासात सहभागी करून घेतल्याबद्दल मोदक आणि पिरा यांचे आभार! एकामागोमाग एक लाइव्ह भटकंतीचे धागे वाचून भटकायचे वेध लागलेत.
12 Oct 2017 - 6:15 pm | शलभ
भन्नाट भटकंती मोदकराव..धन्यवाद पिरा..
16 Oct 2017 - 12:01 am | चामुंडराय
व्वा, मोदकराव आणि शंतनुराव मस्त बुलेट सफर
आत्ताच वामनरावांच्या धाग्यावर बुलेट गीत चिकटवले.
बुलेट प्रेमी परंतु सीडी १०० वर समाधान मानणारा चामुंडराय....
या निमित्ताने तुमच्यासाठी देखील पेश आहे बुलेट गीत.
जीवनात ही गाडी अशीच राहू दे
तिच्यासवे हा प्रवास असाच चालू दे ॥धृ॥
बघतो मी नित्य रूप तिचे देखणे
आवडते वेडीला मजसवे पळणे
रस्त्यावरची ही साथ अशीच राहू दे ॥१॥
ढ्यँ ढ्यँ तुला ऐकण्याचा छंद आगळा
स्वार होऊनि दौडण्याचा आनंद वेगळा
वेगाने पळवून तुज मन धुंद होऊ दे ॥२॥
पाहू दे असेच तुला नित्य पळता
जाऊ दे रस्ता मागे वेगे धावता
तुज साथ जीवनगीत धन्य होऊ दे ॥३॥.
जीवनात ही बुलेट अशीच राहू दे
तिच्यासवे हा प्रवास असाच चालू दे ॥धृ॥
16 Oct 2017 - 12:01 am | चामुंडराय
व्वा, मोदकराव आणि शंतनुराव मस्त बुलेट सफर
आत्ताच वामनरावांच्या धाग्यावर बुलेट गीत चिकटवले.
बुलेट प्रेमी परंतु सीडी १०० वर समाधान मानणारा चामुंडराय....
या निमित्ताने तुमच्यासाठी देखील पेश आहे बुलेट गीत.
जीवनात ही गाडी अशीच राहू दे
तिच्यासवे हा प्रवास असाच चालू दे ॥धृ॥
बघतो मी नित्य रूप तिचे देखणे
आवडते वेडीला मजसवे पळणे
रस्त्यावरची ही साथ अशीच राहू दे ॥१॥
ढ्यँ ढ्यँ तुला ऐकण्याचा छंद आगळा
स्वार होऊनि दौडण्याचा आनंद वेगळा
वेगाने पळवून तुज मन धुंद होऊ दे ॥२॥
पाहू दे असेच तुला नित्य पळता
जाऊ दे रस्ता मागे वेगे धावता
तुज साथ जीवनगीत धन्य होऊ दे ॥३॥.
जीवनात ही बुलेट अशीच राहू दे
तिच्यासवे हा प्रवास असाच चालू दे ॥धृ॥
24 Oct 2017 - 4:37 pm | मोदक
प्रतिसादाबद्दल धन्यवाद मंडळी, प्रवास सुरू असताना तुम्हा सर्वांचे प्रतिसाद वाचायला जाम मजा येत होती. नवीन नवीन माहिती मिळत होती आणि विशेष म्हणजे लई भारी यांचा प्रतिसाद वाचूनच येल्लापूरचा मार्ग निवडला.
अर्थातच विशेष उल्लेख पिराचा.. रोज रात्री झोपताना पिराला रेकॉर्डिंगच्या फाईल्स पाठवायच्या, फोटो पाठवायचे.. आणि त्या रेकॉर्डिंगवर बरेचसे सोपस्कार करून पिरामॅडम रोजचे अपडेट इथे देत होत्या. आपण लिहिताना बर्याच गोष्टी एडिट करत असतो, लिखाण पुढे मागे होत असते, रेकॉर्डिंग करताना हा स्कोप नव्हताच. पण तिने सांभाळून घेतले आणि चिकाटीने फोटो व मजकूर येथे दिले. लिंकवरून त्या त्या दिवसाच्या अपडेटला जायची कल्पना तर निव्वळ भन्नाट..!!!!
दुसरे म्हणजे इरसाल बुवा.
आंम्ही निघाल्यावर दुसर्या दिवशी त्यांनी सहजच फोन केला होता. प्रवासाची माहिती कळताच त्यांनी रोजच्या रोज फोन करून रूटची, तेथील खादाडीच्या ठिकाणांची आणि कोणत्या ठिकाणी काय मिळेल याची नियमीतपणे माहिती दिली. :)
हा उपक्रम आवडल्याचे आवर्जून कळवल्याबद्दलही सर्वांचे आभार्स..!
तुम्ही फिरायला कधी बाहेर पडताय ..?
24 Oct 2017 - 6:32 pm | दिपस्वराज
मोदक शेट, हिप हिप हुर्रे .....! सालाबाद प्रमाणे तुमच्या भारतभ्रमणाच्या व्रताला जागून भटकंतीचा जो काही लाइव्ह अनुभव दिलात त्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन !!! तसेच तो लाइव्ह अनुभव आमच्यापर्यंत पोहचविण्यासाठी पिरा ताईंना सलाम .......