गवळीच्या चरणी कलात्मकता

डॅडीभाई's picture
डॅडीभाई in जनातलं, मनातलं
19 Sep 2017 - 10:33 am

बेरोजगार असताना फुकटचा पैसा मिळविण्याची चटक लागली की पावलं गुन्हेगारीकडे वळू लागतात. अरुण गवळी त्याला अपवाद नाहीच. ज्या काळात मुंबई हाजी मस्तान आणि करीम लाला या तस्करांच्या नावाने ओळखली जायची, त्या दशकात म्हणजेच सत्तर आणि ऐंशीच्या दशकात मुंबईत एक वेगळं गुन्हेगारी विश्व उभं राहात होतं. त्याला हळूहळू रक्ताची चटक लागत होती. स्मगलिंग पुरतं मर्यादित हे गुन्हेगारी विश्व विस्तारु लागलं आणि वर्चस्वासाठी लढाया सुरु झाल्या. त्या लढायांचं नाव होतं गँगवॉर. करीम लाला आणि हाजी मस्ताननंतर मुंबईचा डॉन कोण, तर दाऊद अशी स्थिती होती. या जगतावर त्याची पकड बसू लागली होती. रमा नाईक, बाबू रेशीम, गुरु साटम यांच्या टोळ्या दाऊदच्या इशार्यावर नाचत होत्या. तेव्हा रमाच्या टोळीत एक बंडखोर बीज रुजलं होतं. त्याचं नाव अरुण गुलाब गवळी. गिरणी कामगार म्हणून तो काम करीत होता. गिरणी संस्कृतीची दुर्दशा झाल्यावर गवळी रमाच्या बरोबरीनं गुन्हे करु लागला. भायखळा, चिंचपोकळी भागात त्यांची दहशत निर्माण झाली. पण दाऊदचे इशारे त्यांना शिरसावंद्य होते. हे गवळीला खटकत होतं. यामुळं व्हायचं ते झालंच. वर्चस्ववादाचा भडका उडाला. रमा नाईक पोलिसांच्या एन्काऊंटरमध्ये मारला गेला आणि त्याच्या टोळीचा सूत्रधार बनला अरुण गवळी. पुढे गवळी आणि दाऊद यांच्यातलं गँगवॉर बराच काळ सुरु राहिलं. बाबू रेशीम, अशोक जोशी आणि अनेक गुंड यात मारले गेले. नंतर दाऊदनं मुंबई सोडली. पण गवळी या मायानगरीत पाय रोवून उभा राहिला....
'डॅडी' या सिनेमाने त्या काळ्या पर्वाला पुन्हा उजाळा दिलाय. अशिम अहलुवालिया या फारशा प्रसिद्ध नसलेल्या दिग्दर्शकाची ही कलाकृतीे. याला कलाकृती का म्हणायचं, तर तो सिनेमा आहे म्हणून. पण हा चित्रपट म्हंजे अरुण गवळीचं उदात्तीकरणच आहे. अर्थात तळी. हे सिनेमा पाहताना प्रसंगागणिक जाणवंत राहतं. विजयकर या पोलिस अधिकार्याचं पात्र त्यावेळच्या सरकारी व्यवस्थेचं रुपक आहे. यातून गवळीवर नेहमीच कसा अन्याय झालाय, हे दाखवलं जातं. ते पचनी पडत नाही. कलावंतांनी त्यांची कलात्मकता एखाद्या गुंडाच्या चरणी अर्पण करावी, ही कलेशी प्रतारणा झाली. या शिवाय खटणार्या आणखी काही बाबी आहेत. इतर पात्रांची खरी नावं कायम ठेवलीत. दाऊदचं नाव मात्र मकसूद ठेवलंय. त्यामागे निर्मात्याला वाटणारी भीती हे कारण असावे. दुसरं म्हणजे गवळी हा शिवसेनेचा नेता कमलाकर जामसंडेकर याच्या हत्या प्रकरणातील आरोपी आहे. हे प्रकरण न्यायालयात असल्याने त्या पात्राचे नाव बदललेले असावे.
चित्रपटाच्या मांडणीबद्दल बोलायचे, तर कथेत गवळीच्या जीवनातील अनेक प्रसंग आहेत. ते पडद्यावर आणण्याचा पुरेपूर प्रयत्न केलाय. सिनेमाचा वेगही भरपूर आहे. गुन्हेगारी विश्वातल्या कुरघोड्या, त्यांच्यातले मानवी-अमानवी व्यवहार, माणसांच्या प्रवृत्तीचे बदलते रंग, शत्रूला टपकवण्यासाठी वापरली जाणारी माणसं-बाया, हे सारं 'डॅडी' दाखवतो. तरीही अपेक्षित समाधान हा सिनेमा देत नाही. गुंडाचा आमदार कसा झाला, कोणते राजकीय पक्ष त्याच्या मदतीला धावले, त्यांच्यातले व्यवहार कसे झाले? बाळासाहेब ठाकरे त्यावेळी 'तुमचा दाऊद तर आमचा गवळी' असं म्हटले होते. नंतर शिवसेना आणि गवळी यांच्यात कोणत्या कारणावरुन वितुष्ट आले की तो बनाव होता. शिवसेना नेत्यांचे त्यावेळी झालेले खून हे कुणाच्या सांगण्यावरुन झाले, याची उकल होत नाही, हेच तर सिनेमाचं अपयश आहे. 'डॅडी' हा गवळीचा जीवनपट असेल, तर त्याच्याशी जोडलेल्या दंतकथांविषयीचं सत्य त्यात दिसायला हवं होतं. ते पाहायला मिळत नाही... पार्श्वसंगीताचा वापर करुन अनेक प्रसंग 'डार्क' केले आहेत, त्याची गरज नव्हती. सिनेमाचा संथ वेग जेवढा मारक, तेवढा अती वेगही. गवळीच्या जीवनातले खूप प्रसंग दाखवायचे आहेत आणि लांबी देखील मर्यादित ठेवायची, या नादात पटकथेची भट्टी बिघडून गेलीय. अंडरवर्ल्डमधील शह-काटशह, सुपार्यांचे नियोजन आदी व्यवहार खरंच एवढ्या वेगात चालत असतील का, असा मोठा प्रश्न सिनेमा उभा करतो.
आता राहतो प्रश्न अभिनयाचा. इथे तीनच पात्रांवर लिहिता येईल. कारण तेच सिनेमाचे नायक आणि खलनायक आहेत. एक गवळी, दुसरा दाऊद आणि तिसरा गवळीचा कर्दनकाळ असलेला पोलिस अधिकारी विजयकर म्हणजेच विजय साळसकर. बाकीच्यांवर लिहिण्यासारखं विशेष काही नाही. अरुण गवळी उभा करताना अर्जुन रामपालनं कमाल केलीय. गवळीच्या सवयी, लकब, बोलण्याचा लहेजा. सगळं मस्त. यासाठी घेतलेले कष्ट जाणवतात. दुसरा दाऊद. फरहान अख्तर याने त्याच्या आधीच्या चित्रपटांमध्ये कितीही चांगली कामे केलेली असली, तरी दाऊद साकारताना तो सपशेल फसला आहे. दाऊदची ऐट, थंड डोक्याचा क्रूरकर्मा दाखवताना फरहानने एवढा मेथॉडिकल अभिनय केलाय की एखाद्या नवथर कलाकाराने केलेले पहिले नाटक असावे, एवढा तो अभिनय कच्चा वाटतो. त्याचा पातळ आवाजही त्या पात्राची शान घालवून टाकतो. फरहानने केलेली आतापर्यंतची सर्वांत वाईट भूमिका. तिसरा पोलिस अधिकारी. निशिकांत कामतला आपण गुणी दिग्दर्शक म्हणून ओळखतो. पण त्याने अभियन कमाल केलाय. सिनेमा पाहायचाच असेल, तर अर्जुन आणि निशिकांतसाठी पाहा. ज्यांना 'बोल्ड' चित्रपट आवडत नाहीत, त्यांनी या सिनेमाच्या वाटेला जाऊ नये. गेलाच तर, लहान मुले बरोबर नसतील याची काळजी घ्या.
बाकी... जय शंभो नारायण!

- डॅडीभाई

कलासमीक्षा

प्रतिक्रिया

शलभ's picture

19 Sep 2017 - 11:55 am | शलभ

छान परीक्षण..

पैसा's picture

19 Sep 2017 - 12:15 pm | पैसा

गुंडगिरी आणि गुंडाचे उदात्तीकरण केलेला सिनेमा बघायचा प्रश्नच येत नाही.

आनंदयात्री's picture

19 Sep 2017 - 8:05 pm | आनंदयात्री

सहमत आहे.

प्रसाद_१९८२'s picture

19 Sep 2017 - 1:29 pm | प्रसाद_१९८२

परिक्षण आवडले.

पगला गजोधर's picture

19 Sep 2017 - 1:44 pm | पगला गजोधर

कलावंतांनी त्यांची कलात्मकता एखाद्या गुंडाच्या चरणी अर्पण करावी, ही कलेशी प्रतारणा झाली.

चुकिला माफी नाही .......

दया ढकलुन समुद्रात अश्या कलाकृतिला

डॅडीभाई's picture

19 Sep 2017 - 2:00 pm | डॅडीभाई

प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद

कलावंतांनी त्यांची कलात्मकता एखाद्या गुंडाच्या चरणी अर्पण करावी, ही कलेशी प्रतारणा झाली.

बळंच काहीतरी चमकदार लिहायचं म्हणून केलेलं स्टेटमेंट.
गुन्हेगाराचं उदात्तीकरण वेगळं आणि कला त्यांच्याचरणी अर्पण करणं वेगळं.

अभिदेश's picture

19 Sep 2017 - 8:14 pm | अभिदेश

तुम्ही अरुण भाऊंचे भाऊ का ? नाही नाव तसं घेतलंय म्हणून विचारलं ... ह. घ्या.

पगला गजोधर's picture

19 Sep 2017 - 9:02 pm | पगला गजोधर

"डॅडीभाई "
हे नाव बघून, माझ्याही डोळ्यासमोर, एका प्रसिद्ध टी व्ही मालिकेतील इन्सेस्ट या प्रकारातून निर्माण झालेल्या, नात्यांच्या नावासारखे वाटले.

बंदा, जो तुम्हारा डॅडी भी हय, और भाई भी हय.…... वो हय डॅडीभाई ...

आवर्जून पाहण्यासारखे काही आहे असं दिसतं नाही

परिक्षणातील निरिक्षक पांढरपेशा नाखु बिनसुपारीवाला

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

20 Sep 2017 - 10:13 am | माईसाहेब कुरसूंदीकर

चित्रपट पहायला हवा. ह्या टोळ्यांचे उदात्तीकरण करण्यामागे राजकीय पक्ष व तत्कालीन मराठी माणसेही जबाबदार होती असे ह्यांचे मत."ते एकमेकांना मारतात पण निरपराध माणसाला हातही लावत नाहीत, गरीबांना मदत करतात' वगैरे. मुंबई पोलिस मधील अनेक
अधिकारी दाउद वा गवळी टोळीच्या पे-रोल होते ही वस्तुस्थिती होती. ८०च्या दशकात सुरुवातीला भायखळा,परळ येथे पोलिस अधिकारी म्हणून जायचे असेल तर २ ते २.५ लाख रुपये मंत्रालयापर्यंत व पोलिस मुख्यालपर्यंत पोचवावे लागायचे असे एका माजी अधिकार्याने मुलाखतीत सांगितले होते. चित्रपट गुन्हेगारी व संबंधित सरकारी संस्थांमधील नात्यांना स्पर्श करतो का? ते पहावे लागेल.