श्रीगणेश लेखमाला : लेख क्र. ९ : एका बापाचा जन्म

दशानन's picture
दशानन in लेखमाला
3 Sep 2017 - 10:02 am

लहान मुले आवडणे व आपले एक लहान मूल असणे यात जास्त फरक असेल असे मला तरी मागील वर्षापर्यँत वाटत नव्हते. पण मागील वर्षाच्या सुरुवातीलाच सौने शक्यता व्यक्त केली व पुढे काही दिवसांत खातरीलायक बातमी दिली की मी बाबा आणि ती आई होणार आहे. “अरे वा, छान छान” असे कौतुक इत्यादी करून मोकळा झालो, पण आतून हादरलो होतो... अनपेक्षित असे काहीतरी आयुष्यात घडत होते आणि पहिल्यांदा! आनंदी होतो का? हो निश्चित, खूप खूप. मनात खूप मोठे काहूर उठले होते, उत्सुकता होती, तसेच एक अनामिक भीतीदेखील. अशी बातमी मला काही वर्षांपूर्वीदेखील मिळाली होती, तो आनंद फक्त महिनाभर टिकला होता. मनात नको नको ते विचार येत-जात होते. नेमके अशा वेळी सर्व मित्रमंडळी दुरावलेली, दुखावलेली होती माझ्याकडून. माझ्या घरी तसेही थोड्या जुन्या विचारांची आई व आम्ही नवरा-बायको! सासर संवाद उत्तम आहे, पण स्थान, अंतर हा मोठा विषय होता. शेवटी आठवडाभर कसाबसा काढला व एके दिवशी मनात ठरवले - जे होईल, त्याला सामोरे जायचे, जमत नाही तर शिकायचे, पण सर्व आपणच बघायचे, जेवढे शक्य होईल तेवढे.. यानंतर प्रवास सुरू झाला... बाबा बनण्याचा.

सौ बोलता बोलता म्हणाली, “तुला काय वाटतं काय होईल? मुलगा की मुलगी?” एक क्षणही वाया न घालवता मी उत्तर दिले, "मुलगी आणि मी नाव शोधतोयदेखील." ती मुलाचे नाव शोधत राहिली व मी मुलीचे. पुढील दोन आठवड्यांत, ‘अजून’ भूतलावर न आलेल्या माझ्या अपत्याचे नाव ठरवले ‘ईवा’ आणि मला मुलगीच होईल यावर माझा ठाम विश्वास होता, म्हणून त्याच दिवशी त्या नावाचा आधार घेऊन दोन डोमेन बुक केली. बायकोला काहीच टेन्शन दिसत नव्हते. त्या येणाऱ्या बाळासह ती तिचे ‘अस्तित्व’ व्यवस्थित एन्जॉय करत होती, नेहमीप्रमाणे कामावर जात होती सकाळी ९ ते संध्याकाळी ७.३०! मी मात्र दिवसभर घरी. मला तसेही काही खास टेन्शन नव्हते व काळजीदेखील. गर्भवती ती होती, मी नाही ना! माझा उत्साह फक्त आणि फक्त ९ महिन्यांनंतर बाळ आल्यावर काय काय करायचे यातच गुंतला होता.. व घरात बाळाची दोन-तीन पोस्टर लावणे एवढाच.

चौथ्या महिन्याची सुरुवात. मंगळवार रात्री, अंदाजे एक वाजता... बाथरूममधून बायको आवाज देत आहे असा भास झाला. पण काही क्षणात जाणवले की ती खरेच आवाज देत आहे. धडपडत पळालो आणि बाथरूममध्ये पाहिले... आणि तेथेच थिजलो! बाथरूममध्ये भरपूर रक्त सांडले होते. बायको कण्हत होती. मी असा शून्यात गेलेला पाहून तिने परत जोरात आवाज दिला. मी तिला कसेबसे बाहेर घेऊन आलो बेडवर आणि एक न संपणारी रात्र सुरू झाली. ती रडत होती, नेमके काय झाले आहे हे माहीत नव्हते. एवढ्या रात्री ना डॉक्टर भेटणार, ना आपल्याकडे वाहन. मी रडण्याच्या पलीकडे गेलो, तिला धीर देत बसून राहिलो. सकाळ झाल्या झाल्या डॉक्टरकडे धाव घेतली. ते सात-आठ तास मी कधीच विसरू शकणार नाही. बायकोच्या टेस्ट झाल्या, सोनोग्राफी झाली व डॉक्टर मला म्हणाली, “८ दिवस फुल बेड रेस्ट आणि पूर्ण काळजी घ्या. नशीबवान आहात. गर्भ सुरक्षित आहे...!”

मी टाकलेला निःश्वास मलादेखील स्पष्ट ऐकू आला होता. मनाला खूप खूप समाधान लाभलेले होते. जे घडले होते, त्यातून एक धडा शिकलो होतो - आई होणे ही फक्त तिची जबाबदारी नाहीये, ती आई व्हावी हे पाहणे ही तिच्याएवढीच किंवा तिच्यापेक्षा जास्त माझीदेखील जबाबदारी आहे. घरात धूळ खात पडलेला संगणक सुरू केला व शोध चालू केला गुगलवर... आईची काय काळजी घ्यावी प्रत्येक दिवशी व प्रत्येक आठवड्यात, पुढील अनेक आठवड्यांसाठी जोपर्यंत बाळ सुखरूप बाहेर येत नाही तोपर्यंत. शेकडो वेबसाइट्स पालथ्या घातल्या, शेकडो ग्रूप्स, मिळेल तिकडून माहिती गोळा करत गेलो, एका जागी साठवत गेलो. बायकोची काळजी कशी घ्यावी, तिचे जेवण, खानपान, पाणी, मॉलिश, औषधे, सोनोग्राफी याचे एक टेबल तयार केले व घरात काम करायचे एक टेबल तयार केले. कामाची वाटणी करून घेतली दोघांनी व संध्याकाळच्या जेवणाची जबाबदारी माझ्या आईने घेतली.

माझ्याकडे मी मोठी कामे ठेवून घेतली होती – उदा., पिण्याचे पाणी खालून भरणे, कपडे धुणे, भांडी घासणे इत्यादी. हळूहळू यूट्यूब पाहून ज्यूस तयार करणे, हलकाफुलका नाश्ता व बायकोला आवश्यक ती सर्व जीवनसत्त्वे कशी मिळतील त्यानुसार रोजचे जेवण काय असावे याचे प्लानिंग सुरू केले. सुरुवातीला खूप अवघड गेले. आधीच ‘बायको काम करते व हा घरी बसून खातो’ इत्यादी गल्लीतील बायकांचे टोमणे कानावर येऊन गेले होते, पण आता टोमणे आणखीनच विखारी होत होते. भांडी घासतो, बायकोचे कपडे धुतो इत्यादी. पण सर्वाकडे दुर्लक्ष केले व बायकोने जमले तसा त्याचा समाचार घेतला. शेवटी आगरी आहे ना ती!

असेच एक दिवस रात्री जेवणानंतर आम्ही बोलत बसलो होतो, तेव्हा पहिल्यांदा बाळाने हालचाल केली व आईला बाळाचा धक्का जाणवला. थोडा कान लावल्यावर मलाही जाणवला. परत गुगलबाबाला शरण गेलो व कळले की दोन मोबाइल प्रणाली आहेत - एक बेबीबंप आणि किक काउंट! बेबीबंप तर अफलातून ऍप आहे. मला असा एक साथीदार मिळाला होता, जो जवळपास ९०% बरोबर अशी माझ्या बाळाच्या प्रगतीची माहिती देत होता. आज बाळ किती वजनाचे असेल, बाळाची उंची किती असेल, बाळाचे कोणकोणते अवयव पूर्ण निर्माण झाले आहेत किंवा होत आहेत अशा अनंत गोष्टी त्यातून मला समजत गेल्या. सातव्या महिन्यातील सोनोग्राफीनंतर बाळ व्यवस्थित व हेल्दी आहे हे समजले व त्याची आईदेखील.

यानंतर सुरू झाला शेवटचा टप्पा. सातव्या महिन्याच्या शेवटी बायको ऑफिसमधून सुट्टी घेऊन माहेरी निघून गेली व मी पूर्ण घरात एकटा. आम्ही दोघे फोनवर बोलून बोलणार किती? एक दिवस ती बोलता बोलता म्हणाली, "बाबा, बाळाची जबाबदारी तुलाच घ्यायची आहे, मी सकाळी ऑफिसला जाईन व रात्री परत येईन. बघ बाबा कसे करणार आहेस ते." गेल्या चार-पाच महिन्यांत हा विषयच माझ्या डोक्यात आला नव्हता.. बाळ माझ्याकडे राहणार आहे! परत गुगलबाबा व यूट्यूब यांच्या दारी पोहोचलो. जगात पहिल्यांदा डोळे उघडणाऱ्या त्या बालकाला / बाळाला काय हवे असते यापासून काय काय करावे व करू नये याची परत टेबल्स तयार केली. त्याचे कपडे, साबण, पावडर, औषधे, डोस... आणि शू-शी साफ करणे! अमर्याद उत्साहाने सर्व काही शिकत गेलो, अगदी एक एक गोष्टीबाबत.

डॉक्टरने सांगितलेला दिवस आला व गेलादेखील. बाळ काही आलेच नाही. जाम वैतागलो होतो. सारखे फोन किती करायचे? म्हणून सरळ उठून सासुरवाडी गाठली. डॉक्टर म्हणाले, “कधीकधी पुढे-मागे होते. काळजी नको, सर्व काही उत्तम आहे.” मी परत पुण्याला आलो. पुढे सहा दिवसांनी संध्याकाळी बाळाने नॉर्मल एंट्री केली या जगात! मला त्याच क्षणी फोन आला व बातमी मिळाली - मुलगी झाली आहे :) माझी आई म्हणाली, “लक्ष्मी आली घरी, पण तुझे गुण घेऊन.. जसा तू कधी येणार हे नक्की नसते, तसेच हिचेपण आहे. लोकांची बाळे वेळेआधी येतात, नाहीतर एक-दोन दिवस इकडेतिकडे... ही सहा दिवस लेट आहे...!” मी म्हणालो, “ही नाही, तिचे नाव ‘ईवा’ आहे.

पहिल्यांदा जेव्हा तिला हातात घेतले, तेव्हा वरील सर्व काही डोळ्यासमोरून झर्रकन गेले.. आता लिहितानादेखील जाणवते की यात खास असे काहीच नाही, सर्वसाधारणतः प्रत्येकाच्या आयुष्यात असे दिवस येतात-जातात, यात काय एवढे? थोडा फरक आहे तो एवढाच.. एक वर्तुळ पूर्ण झाले होते. मी माझ्या सासरच्यांकडून त्यांची मुलगी पळवून आणली होती, त्यांना ईवाच्या रूपाने परत त्यांची मुलगी मिळाली आहे व तीदेखील अगदी चिमुकली, गोंडस अशी.

घरी गणपती येतात आमच्या. गणराया आमचे दैवत आहे आईचे, माझे, बायकोचे. पोरीचा पहिलाच गणपती. तिलाही गणराया आवडलेला दिसतो आहे मला. ते कसे समजले, ते नाही शब्दात मांडता येणार, पण.. मला जाणवले आहे. गणपती बुद्धीची देवता... त्याने बुद्धी दिली व फक्त एक मुलगा, नवरा म्हणून असलेला मी.. उत्तम बाबा झालो आहे. दहा महिन्यांची आहे ईवा, ती मला स्पष्ट बा-बा म्हणते. ते शब्द कानावर पडले ना.. शांती, सुख की अन्य काही माहीत नाही... पण मन एकदम भरून येते.. आणि हो आणखी एक झाले आहे - आता माझे डोळे भरून येत नाहीत नुसते, वाहतात... जेव्हा तिला डोसचे इंजेक्शन दिले जाते आणि ती टाहो फोडते... शक्य असते तर.... जाऊ दे. आता मी बाबा आहे!

आजही बाळ दिवसातील जास्तीत जास्त वेळ माझ्याकडे असते. आंघोळ घालण्यापासून, शी-शू साफ करणे, दूध, तिचे अन्न देणे, तिला झोपवणे हे मी करतोच करतो... खूप वेगळा आनंद मिळतो यातून. शक्यतो.. माझा आणखी एक फायदा होतो आहे, तिची प्रत्येक नव्याने करत असलेली हालचाल मी स्वतः पाहिली व शक्य तेव्हा रेकॉर्डही केली. मग तिचे पहिल्यांदा पालथे होणे असो, रांगणे असो, उभे राहण्याचा प्रयत्न करणे असो किंवा तिने नव्याने शिकलेला प्रत्येक शब्द तिच्या तोंडून ऐकणे असो... बाबा असणे म्हणजे काय हे आज समजले आहे, उमजले आहे.. आणि सर्वात महत्त्वाचे यातील सुख म्हणजे काय हे उमजले आहे!

प्रतिक्रिया

Ranapratap's picture

3 Sep 2017 - 10:54 am | Ranapratap

उत्साही बाबाची कहाणी

प्रवास छान टिपला आहेस. आणखी मोठा लेख हवा होता.

१) एवढ्या रात्री ना डॉक्टर भेटणार, ना आपल्याकडे वाहन.

हे पुण्यात असताना.? ओला उबर पेटले होते का..? आणि मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पिटल्स तुझ्या घरापासून किती लांब आहेत..?

२) आधीच ‘बायको काम करते व हा घरी बसून खातो’ इत्यादी गल्लीतील बायकांचे टोमणे कानावर येऊन गेले होते,

दोन शब्द - फाट्यावर मारणे.

सस्नेह's picture

3 Sep 2017 - 6:53 pm | सस्नेह

प्रत्येक मुद्द्याला !
अभिनंदन ! तुमच्या बाळाची यशस्वी आई होऊन समस्त स्त्री जातीचा आईपणाचा मक्ता मोडलात म्हणून __/\__

नाही हो, आई ही आईच असते. बाबा कितीही गोड वाटला तरी!
पुढे काही लिहीत नाही, स्त्री समजून जाईल :)

त्यावेळी परिस्थतीच तशी होती रे..
:)

इथं पोस्ट करा दशानन, लैच भारी विडिओ होता तो अन खूप गोंडस बाळ आहे तुमचं. एकदा नक्की दृष्ट काढा पोरीची.

दशानन's picture

3 Sep 2017 - 8:45 pm | दशानन

नक्कीच!

बाजीप्रभू's picture

3 Sep 2017 - 12:17 pm | बाजीप्रभू

तुमचा बाबा होण्याचा गोड प्रवास वाचून स्वतःच्या आठवणी जाग्या झाल्या. वाचतांना कुठेतरी स्वतःला आरशात पाहतोय असं वाटलं. खूप छान लिहीलंयत. ‘ईवा’ च्या उज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.

दशानन's picture

3 Sep 2017 - 8:46 pm | दशानन

आभारी आहे बाजीप्रभु!

Nitin Palkar's picture

3 Sep 2017 - 12:33 pm | Nitin Palkar

तुम्हा दोघांच्याही स्थिन्त्यन्तराच खूप छान वर्णन केलंय.

स्वाती दिनेश's picture

3 Sep 2017 - 12:35 pm | स्वाती दिनेश

राज, तुझा बाबा होण्याचा प्रवास छान लिहिला आहेस.
इवाला अनेक शुभाशीर्वाद!
स्वाती

ईवा :P

इव्हा, इवा नाही काय :D

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Sep 2017 - 1:55 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर ! अनुभव आणि लेखनही !

या लेखमालेच्या विषयाच्या अ/योग्यतेसंबंधी बरेच संशय व्यक्त झाले होते. पण, त्यांत व्यक्त केलेल्या अपेक्षेपेक्षा खूप वेगळे, अनुभवसमृद्ध आणि रोचक अनुभवांचे लेख येत आहेत... आतापर्यंतच्या लेखांनी या लेखमालेचे यश अधोरेखीत केले आहे व पुढच्या लेखांनी ते वर्धिष्णू होत राहील असे वाटते आहे !

दशानन's picture

3 Sep 2017 - 11:15 pm | दशानन

धन्यवाद सर :)

पैसा's picture

3 Sep 2017 - 3:05 pm | पैसा

छान लिहिलंस राजे! तुझी राजकन्या फारच गोड आहे. सब्र का फल मीठा होता है म्हणतात ते खरंच. तिच्या जन्मापूर्वीची तुमची कठीण परीक्षा माहीत आहे त्यामुळे तू तिला जिवापाड सांभाळतो आहेस हे कळतंय.

नशीबवान आहेस की तुझी सहधर्मचारिणी सगळ्या प्रसंगात तुझ्यासोबत आहे. पुनर्जन्म असेलच तर गेल्या जन्मी अशी बायको मिळावी म्हणून तू नक्कीच मोठे पुण्यकर्म केले असणार.

पुनर्जन्म असेलच तर गेल्या जन्मी अशी बायको मिळावी म्हणून तू नक्कीच मोठे पुण्यकर्म केले असणार

अगदी अगदी :)

प्रीत-मोहर's picture

4 Sep 2017 - 10:35 am | प्रीत-मोहर

याच्याशी सहमतअगदी

बाळाचे आगमन झाले की आईबाप म्हणून फिरुनी नवा जन्मच होतो !
तुम्हाला अनेक शुभेच्छा आणि इवाला आशीर्वाद.

लेख खूप आवडला. सुरेख अनुभवकथन.

बाळाचे आगमन झाले की आईबाप म्हणून फिरुनी नवा जन्मच होतो !

खरंय अगदी.

लेख आवडला. बाबासुद्धा बाळाची अगदी आईसारखी उत्तम काळजी घेऊ शकतात हे सिद्ध केलेस म्हणून आनंद झाला. उगीच स्वयंपाक, बालसंगोपन वगैरे महिलांच्या माथी केवळ त्यांचे काम आहे म्हणून मारणे योग्य नव्हे अशी खात्री मिपावरच अनेक बाबांनी, (होऊ घातलेल्या, झालेल्या) नवर्‍यांनी दिली असल्याने छान वाटतेय.

एक व्हिडिओ लवकरच देतो आहे येथे, बघ व तूच सांग ;) संगोपन नीट करत आहे का नाही :D

पुतणीला भेटायला काय अजून मुहूर्त भेटत नाहीये मला.. पुण्याला आलो की येईन इतके नक्कीच..

तुझ्यासाठी घरदार खुलले आहे रे! बिनधास्त ये!
घर तुला माहिती आहेच :)

अतिशय सुरेख लिहिले आहे. आधी चर्चा झाल्याप्रमाणे पुढील लेख येऊद्यात लवकर आता! :-)

अप्रतिम! तुमच बाबापण ,तुमच्या पत्नीच working women असणं आणि तुमच house maker असणं तुम्ही ज्या अभिमानाने आणि मनातून पेलताय ते simply great!!

गवि's picture

4 Sep 2017 - 1:03 pm | गवि

राजे, ईवाबाळाला अनेक आशीर्वाद. तिला आयुष्यात उदंड यश, सुख, आनंद, आरोग्य मिळो अशा सदिच्छा कायम तिच्यासोबत.

आभारी आहे गवि व शुभेच्छासाठी धन्यवाद!

मस्त लिहीले आहे. आपणास अनेक शुभेच्छा...
रच्याकने माझ्याही मुलीचे नाव 'ईवा'च आहे. ३ वर्षाची झाली आहे सध्या!!

दशानन's picture

5 Sep 2017 - 7:36 pm | दशानन

अरे वाह :)
हे नाव सुंदर वाटतं मला नेहमीच. आणि आवडते आहे ते :)

arunjoshi123's picture

4 Sep 2017 - 5:05 pm | arunjoshi123

बधाई हो.

सविता००१'s picture

5 Sep 2017 - 12:21 pm | सविता००१

तुम्हा तिघांनाही मनापासून खूप खूप शुभेच्छा!

ज्योति अळवणी's picture

5 Sep 2017 - 2:03 pm | ज्योति अळवणी

खूपच शासन लिहिला आहात लेख. हे बाबा असणं इतक्या वेगळ्या पद्धतीने तुम्ही साजरं करता आहात वाचून खूप आवडलं.

ईवा ला खूप खूप पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा

मुलगीच हवी ही माझी इच्छा होती व आज मी मुलीचा बाप आहे :)
आता दोन महिन्यात तिचा वाढदिवस आहे, नक्कीच व्हिडीओ शेअर करेन.

कविता१९७८'s picture

5 Sep 2017 - 4:57 pm | कविता१९७८

सुंदर लेखन

सुरेख अनुभवकथन. ईवा ला अनेक शुभार्शिवाद.

असे तुमच्यासारखे प्रवाहाच्या विरुद्ध पोहणारे लोक जसे जसे वाढतील तसे बाकी लोकही त्याप्रमाणे विचार करू लागतील. खूप शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना.

प्रत्येक बापाने हा अनुभव घ्यावा ही प्रार्थना..
जेव्हा बाळ उभे राहण्याचा पहिला प्रयत्न करत असते ना तेव्हा ते धपकन पडते, कधी पुढे कधी मागे, पण जो पर्यंत बॅलन्स होत नाही तो पर्यंत प्रयत्न सुरूच असते त्याचे.. आजच माझं पोर अगदी ऐटीत पायऱ्या चढली.. सोबत मी होतोच.. पण दहा महिन्याची पोर जेव्हा सहा इंची जिन्यावर पाय टाकयला धडपडते हे पाहणे म्हणजे निसर्गाची एक मंत्रमुग्ध करणारी किमया पाहणे असते हे अनुभवातून सांगतो आहे :)

चिगो's picture

6 Sep 2017 - 5:06 pm | चिगो

अभिनंदन, दशाननराव.. पोरांची काळजी घेण्यातला, त्यांच्या शी/शु धुण्यातला, त्यांना भरवण्यातला आनंद जे लोक 'पुरुषत्वाच्या' अहंगंडात गमावतात, त्यांच्यासारखे मुर्ख तेच..

बाय द वे, 'ईवा' ह्या नावाचा अर्थ कळेल का? मी नावांच्या अर्थांबद्दल थोडा आग्रही, किंवा 'फिनीकी' आहे म्हणून विचारतोय. (ह्याचमुळे पोराचं नाव 'दुर्योधन' ठेवायचा विचार होता, जो घरच्यांनी हाणून पाडला.) आपल्याला आगावुपणा वाटला किंवा सांगायचं, नसेल तर असो..

ईवाचे मला माहिती असलेला संस्कृत अर्थ म्हणजे आदिमाया!
दुसरा अर्थ जगतजननी आणि तिसरा अर्थ अंकुर.

भ ट क्या खे ड वा ला's picture

6 Sep 2017 - 8:29 pm | भ ट क्या खे ड वा ला

असा बाबा लाभण हे इवा चे पूर्वपुण्य .
लेख खूप छान , थोडा विस्तृत चालला असता.

नाही हो, अश्या मुलीचा बाप होणे हे माझे पुण्यकर्म.
बाकी लेख अपडेट करायचा होता पण त्या पेक्षा पुढील भाग लिहितोय :)

बोका-ए-आझम's picture

7 Sep 2017 - 8:15 am | बोका-ए-आझम

अनुभव सुंदर मांडलेला आहे. पिता होणं हे भाग्य अाणि मुलीचा पिता होणं हे तर महाभाग्य! नशीबवान आहात एवढंच म्हणतो!

कुमार१'s picture

7 Sep 2017 - 11:50 am | कुमार१

सुरेख अनुभवकथन. आवडले.
अभिनंदन

उपेक्षित's picture

8 Sep 2017 - 1:29 pm | उपेक्षित

राजे सुंदर अनुभव

परवा २ तारखेला आम्हाला सुद्धा कन्यारत्न झाले त्यामुळे तुमच्या भावना समजू शकतो

संग्राम's picture

8 Sep 2017 - 1:45 pm | संग्राम

अरे वा !!! अभिनंदन @ उपेक्षित

उपेक्षित's picture

8 Sep 2017 - 6:13 pm | उपेक्षित

धन्स संग्राम

एस's picture

8 Sep 2017 - 8:43 pm | एस

वा! अभिनंदन!

दशानन's picture

8 Sep 2017 - 9:48 pm | दशानन

अरे वाह!!! अभिनंदन!!

पैसा's picture

8 Sep 2017 - 9:56 pm | पैसा

अभिनंदन!

उपेक्षित's picture

9 Sep 2017 - 12:31 pm | उपेक्षित

धन्यवाद मंडळी _/\_