एक
"कैसा है?" मी मोठ्या उत्सुकतेने विचारलं.
मित्राच्या गोरटेल्या आसामी चेहर्यावर कसेनुसे भाव आले होते. त्याने मान डोलावली आणि ब्रेडचा तुकडा तोंडात कोंबून घटाघट पाणी प्यायलं.
अजून लैच मोठा टप्पा गाठायचाय याची जाणीव झाली.
---
दोन
सगळं स्थिरस्थावर असताना वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी परदेशात जाऊन उच्चशिक्षण घ्यावं अशी भलतीच कल्पना डोक्यात आली. घरच्यांना पटवणे, वेड्यावाकड्या वेळा असलेली नोकरी सांभाळून युनिव्हर्सिट्यांना अर्ज करणे, पैशाची चिंता वाहणे यात सहा महिने गेले. 'केल्याने होत आहे रे' या उक्तीचा प्रत्यय देणार्या काही अविश्वसनीय घटना घडत गेल्या, आणि माझ्या व्यावसायिक क्षेत्रातल्या अग्रगण्य विद्यापीठात वर्षभरासाठी मास्टर्स करण्यासाठी आवताण आलं. नोकरीचा नोटीस पिरियड, पीएफ सोडवून घेणे, शैक्षणिक कर्जाची व्यवस्था करणे, व्हिसा मिळवणे या गोष्टींमध्ये आणखी दोन महिने गेले आणि बघता बघता निघायची तारीख दोन दिवसांवर आली.
वर्षभर नेदरलँड्समध्ये राहून आलेला मामेबहिणीचा नवरा खास भेटायला आला. त्याने टिप्सचा खजिना उघडा केला. सिन्सियर विद्यार्थ्यासारख्या त्या सगळ्या टिप्स मी टिपून घेतल्या.
"सगळी ग्रोसरी तुला अल्बर्ट हाईनमध्ये मिळेल. पण लिडल आणि आल्डी जास्त स्वस्त असतं. पण आपल्या देसी ग्रोसरीसाठी देन हागमधल्या एका दुकानाचा पत्ता देतो..."
मी पुढचं काहीच ऐकून घेतलं नाही. ग्रोसरी. हा मुद्दाच माझ्या ध्यानात आला नव्हता! आजवर जेवण हे आई, बायको किंवा वेटर या अन्नदात्या त्रिमूर्तींपैकी कोणीतरी आपसूक पानात आणून वाढलं होतं. ते बनवायला लागतं, आणि ते चविष्ट असलं तरच घशाखाली उतरेल हे सत्य फाडदिशी कानाखाली वाजलं.
मामेबहिणीच्या नवर्याच्या सल्ल्याने त्याच संध्याकाळी राईस कुकर घेतला.
"नावावर जाऊ नकोस. यात पोळ्या सोडून सगळं होतं. चहासुद्धा." मा० ब०च्या न० ने धीर दिला. इथे च्यायला चहा सोडून शिजवायला मुळात येत काय होतं? पण उगाच दाजींसमोर इज्जत डौन नको व्हायला म्हणून मी पण आत्मविश्वास दाखवत मान डोलावली.
[अवांतरः हे दाजी फारच लोकोत्तर पुरुष आहेत. गावगन्ना एकटेच भटकत असतात पण सूद्द साकाहारी आहेत. नुकतेच ते कोरियाला गेले होते. तिथेही आपला शाकाहारी बाणा जपला असणार याची पूर्ण खात्री आहे.]
उरलेल्या दोन दिवसांत आईला मुगाच्या डाळीची खिचडी शिजवताना नीट पाहिलं. पण आणखी काही शिकायला वेळ नव्हता.
-----
तीन
एका सकाळी डोळे उघडावेत आणि आपण अगदी परक्या मुलखात एकटेच आहोत ही जाणीव होणं जबरदस्त प्रकार असतो. आधीच्या प्रवासांतही ती झाली होती, पण खांडव्याला किंवा राजनांदगावला डोळे उघडणं आणि अॅम्स्टरडॅमला डोळे उघडणं यात फरक आहे. अॅम्स्टरडॅम / लायडेनचं पहिलं दर्शन आणि पहिल्या आठवणी हा एका स्वतंत्र नॉस्टॅल्जियायुक्त लेखाचा विषय आहे. पण इथे इतकंच सांगतो - "इथेही आकाश निळंच आहे आणि टोमॅटो लालच आहेत!" असा वेडसर विचार मनात आल्याचं अगदी स्पष्ट आठवतं!
लायडेन सेंट्राल स्टेशनावर रूममेट घ्यायला आला होता. अर्थातच त्याला आधी भेटलो नव्हतो, दोनदा फोनवर बोलणं झालं होतं. त्यात तो आसामी (म्हणजे आसाम राज्यातला) आहे एवढं लक्षात आलं होतं. त्याने रूमवर नेऊन एक रस्साभाजी खाऊ घातली. फारसा विचार न करता मी झोपून गेलो तो थेट पंधरा तासांनी उठलो.
रूममेट मस्तच माणूस होता. आमची दोस्ती जमायला वेळ लागला नाही. (आता यापुढे त्याचा उल्लेख 'मित्र' असा करेन.) जवळपास माझ्याच वयाचा, पण जगातले अनेक देश एकटाच फिरून आला होता. मला आश्चर्यच वाटलं. त्याचं असं होतं, की त्याचे वडील एअर इंडियात पायलट होते (आहेत). त्यांना मिळणार्या फुकट तिकिटांवर हे बाबाजी जग फिरून आले होते. आपल्या तरूण मुलाला थोडे पैसे देऊन नवख्या देशांत एकट्यालाच सोडून देणार्या पालकांचं मला कौतुक वाटलं. त्याच्या पालकांच्या महानतेबद्दल पुढे येईलच.
आम्ही बसून एकत्र राहायचे 'ग्राऊंड रूल्स' बनवले. बाथरूमचा वापर, रूमची साफसफाई, इंटरनेटचे पैसे वगैरे.
"खाने का कैसे करना है?" मी अंतरीचा प्रश्न विचारला.
"थोडा घर पे पकाएंगे, थोडा बाहर खाएंगे." मित्रोबा चांगलेच निवांत दिसत होते. "जब घर पे करेंगे, एक जन पकाएगा दूसरा बर्तन मांजेगा..."
"तुम्हें पकाना आता है?"
"बिलकुल आता है! बचपन से. क्यों, तुम्हें नहीं आता?"
"..."
---
चार
पहिला आठवडा नाही म्हटलं तरी बरा गेला. घरून आणलेले म्यागी, हार्लेमरस्त्रात (लायडेनचा लक्ष्मी रोड) वर सापडलेलं एका आर्मेनियन गृहस्थाचं कबाब केंद्र आणि मित्रोबांचं आसामी पद्धतीचं भोजन यामध्ये बरं चालू होतं.
"तुम्हें इतना सबकुछ पकाना कैसे आता है?" इमाने इतबारे बर्तन मांझत मी एक दिवस त्याला विचारलं.
एअर इंडियापूर्वी याचे वडील भारतीय वायुदलात होते. वेगवेगळ्या तळांवर बदल्या होत असत. वडिलांची फार इच्छा की यानेही पायलट व्हावं. त्यासाठीच्या लाईफ स्किल्सचं ट्रेनिंग त्याला ते लहानपणापासून देत असत. त्यातलं एक लाईफ स्किल "स्वतःचं स्वत: शिजवून खाता आलं पाहिजे!" हे होतं. त्यासाठी त्यांनी एक अघोरी उपाय केला. "घरातलं मूल बारा वर्षांचं झालं की आठवड्यातला एक दिवस त्याने ब्रेकफास्ट रांधायचा. सगळ्यांसाठी."
पदार्थ कोणते करायचे याला काही बंधन नव्हतं. अगदी ऑम्लेटसुद्धा चालेल. फक्त ते सगळ्यांच्या पोटभरीचं झालं पाहिजे एवढीच अट होती.
"और नहीं किया तो क्या होगा?" मी माझ्या व्यवसायाला शोभेशी शंका काढली.
नाहीतर सगळ्यांना उपास. आता, त्या उपासाचा उपद्रव मुलांनाच सर्वात जास्त होणार आहे हे उघड होतं. वडील बेसवरच्या कँटीनमध्ये पाहिजे ते खाऊन पोट भरतील, आणि पोरं शाळेत कटली की आई जवळच्या कुठल्यातरी हॉटेलात जाऊन चरून येईल. पण पोटभरीचा ब्रेकफास्ट न शिजवणारं पोरगं मात्र लंचपर्यंत उपाशी बसेल.
वयाच्या बाराव्या वर्षी भुकेने काय अवस्था होत होती हे आठवल्यावर हा प्लॅन किती अभेद्य होता याची जाणीव मला झाली.
"तेरेवाला खिला कभी! मुझे तुम्हारे मराठी डिशेस भोत पसंद है. वो क्या होता है - पोहा. और उसल..."
माझ्या काळजात चर्र झालं. पण या इन्स्पायरिंग ष्टोरीमुळे इन्स्पायर न होतो तरच नवल. दुसरं म्हणजे नवेनवे अनुभव उरावर घ्यायचे ते दिवस होते. आकांक्षांपुढति जिथे गगन ठेंगणे असं वाटवणारे. उसल क्या चीज है...
"आज मैं खिलाता तेरेको. हमारा आलू का रस्साभाजी खिलाता. एकदम मराठी स्पेशल..." मी आश्वासन दिलं.
---
पाच
लहानपणी 'ज्वलज्जहाल मिसळ' फेम रामनाथ हॉटेलच्या पाठिमागे आम्ही रहात होतो. संध्याकाळी साडेआठच्या सुमारास रामनाथचा नाथ खन्ना नवी तर्री बनवायला घेत असे. त्याचा दरवळ आख्ख्या गल्लीत पसरे. वासावरूनच ती किती हेवी ड्युटी असू शकेल याचा अंदाज यायचा. ती तर्री प्रत्यक्ष खायचा धीर व्हायला अनेक वर्षं गेली.
नेमका तसाच वास माझ्या रस्साभाजीतून निघाल्यावर त्या बिचार्या अहोमियाच्या ताटात काय वाढून ठेवलं आहे याची कल्पना मला आली. नवख्यांना खन्ना नेहेमी बरोबर ताक घ्यायला लावतो. त्याची आठवण होऊन मी त्वरित ताक घुसळलं. कोणतं ज्ञान कुठे उपयोगी पडेल काही सांगता येत नाही.
मित्रोबा अगदीच झंटलमन असल्याने त्याने तो प्रकार खाल्ला. दोन ग्लास ताक प्यायल्याचं माझ्या नजरेतून सुटलं नाही. फोडणीतली मोहरी जळली होती. जेवढं लाल तिखट घातलं होतं त्याच्या एक तृतियांशच घालणं योग्य होतं. कांदा चिरण्यात सफाई येणं गरजेचं होतं.
"मैं सिखाता कल से.." एवढंच बोलून त्याने बर्तन मांझून टाकले.
---
सहा
- पाककृती ही स्टेप बाय स्टेप वाचून करायची निर्बुद्ध गोष्ट नव्हे. एखादा पदार्थ खाताना तुला त्यातलं काय आवडलं होतं ते आठव, आणि ते कसं आणता येईल याचा विचार कर. उलटीकडून विचार कर.
- एखादं साहित्य नसेल तर डगमगून जाऊ नकोस. पर्याय शोध.
- गॅस सुरू करायच्या आधी चिराचिरी पूर्ण झालेली असली पाहिजे.
- तेल धुरावल्यावरच त्यात मोहरी टाक. गारेगार तेलात मोहरी टाकून ती कधी तडतडेल याची वाट बघत बसू नकोस.
- गरम तेलात हळद घालशील तर ती जळेल आणि सगळी चव खराब होईल.
- लसूण घालताना उलथन्याच्या उलट्या बाजूने तो ठेच आणि मग घाल. त्याने त्यातला रस चट्कन बाहेर येतो.
- कुकर लावताना झाकण पाण्यात भिजवून मग लाव. म्हणजे रिंग बराच काळ टिकेल.
- दह्या-ताकाला जिर्याची फोडणी. बाकीला मोहरीची.
- फोडणीसाठी तेल तापवायचं तीव्र आचेवर, पदार्थ शिजवायचा मध्यम आचेवर आणि तळातळी करायची मंद आचेवर.
- पदार्थ तिखट झाला तर त्यात लिंबू पिळायचं.
- पदार्थ शिजताना वेळ मिळतो. त्यात पुढच्या पदार्थाची तयारी करायची. अगदीच काही नसेल तर ओटा पुसायचा, एखादं तरी भांडं घासून टाकायचं.
- ... वगैरे.
---
सात
श्रीगुरूसारखा असता पाठिराखा, इतरांचा लेखा कोण करी? तरबेज होऊ लागलो, आत्मविश्वास येऊ लागला. राईसकुकरमध्ये खरंच पोळ्या सोडून सगळं करता येतं याची प्रचिती आली. काही चुकलं तर गुरुदेव मागे उभे होतेच.
दसर्याला युनिमधल्या भारतीय मित्र-मैत्रिणींना बोलावून मटार उसळ खिलवली. सोबत शेवयांची खीर. मैत्रांचा आवाका अखिल भारतीय होता. 'गुलाल' सिनेमातून नुकताच बाहेर आला असावा असं वाटणारा एक राजस्थानी, एक पिव्वर व्हेज गुजराथी मुलगी, तितकीच पिव्वर नॉनव्हेज हरियाणवी मुलगी, पलिकडच्या खोलीत राहणारा केरळी कॅथलिक, मित्रोबा आसामी आणि मी मराठी. मंडळी तुडुंब जेवली.
बोलता बोलता कढीचा विषय निघाला. एकच पदार्थ, ढोबळमानाने एकच पद्धत, पण हर प्रांताची न्यारी कढी. पकोडे सोडलेली हरियाणवी कढी, जवळजवळ त्यासारखीच पण मोहरीच्या तेलात केलेली अहोमिया कढी, गुळमाट गुजराथी कढी आणि आपली मराठी कढी. मलाच मराठी कढीचे तीन प्रकार आठवत होते: लसूणमोहरीचं वाटण लावलेली पिवळी दक्षिण महाराष्ट्रीय कढी, कोणत्याशा सणाला करतात ती पडवळ घातलेली पांढरट कढी (भिकार लागते: जनहितार्थ जारी) आणि वेगळ्या कृतीची सोलकढी. मग पुढे महिनाभर आठवड्यातून एका दिवशी अखिल भारतीय कढी महोत्सव भरवण्यात आला.
ही टीम जमलीच. एकदा पन्नास माणसांचा स्वयंपाक करण्याचा घाटही घातला होता. युनितल्या आख्ख्या वर्गाला दिवाळी पार्टी दिली तेव्हा सगळ्यांनी मिळून पावभाजी केली होती. युरोपियन जिभांसाठी सपकवाली आणि अन्य जिभांसाठी मसालेदार. पण 'स्पायसी डिलिशियस इंडियन फूड'ची जाहिरात इतकी झाली होती की मसालेदार पावभाजीचा चट्टामट्टा झाला, आणि संयोजकांना सपक पावभाजीवर कांदालसूणमसाला घालून घ्यायला लागला!
वर्षाच्या अखेरपर्यंत आत्मविश्वास फसफसायला लागला होता. एका 'ब्रिंग युवर ओन फूड' बार्बेक्यू पार्टीसाठी 'चिकन दो पियाजा' वगैरे यशस्वीपणे करण्यापर्यंत मजल गेली. या प्रकारात कांद्याचा दोन प्रकारे वापर होतो हे आधी लक्षात आलं नव्हतं.
दहा महिन्यांनंतर घरी गेलो तेव्हा तमाम कुटुंबाला बसवून त्यांच्यासाठी बटाटेवडे तळले. पत्नी खूष झाली. आई कृतकृत्य.
"काय गं आई," मी विचारलं. "स्वयंपाकातला अर्धा स देखील येत नसताना तू मला दूरदेशी पाठवलंच कसं? काळजी नाही वाटली का की बुवा हा काय जेवेल?"
"तू उपाशी राहणार नाहीस याची खात्री होती..." माझ्या सुटत चाललेल्या पोटाकडे बघत आई थंडपणे म्हणाली.
Touché!
---
आठ
हे सगळं एकदा जॅक डनियल्सला सांगत होतो. त्याने त्याच्या एका मास्तरांची आठवण सांगितली. ते म्हणायचे की जर केमिस्ट्री शिकायची असेल तर स्वयंपाक शिका. खरं आहे एकदम.
गरज म्हणून सुरू केलेला स्वयंपाक 'दिवसांतलं एक वैतागवाणं काम' न राहता आनंददायक गोष्ट म्हणूनच समोर आली, हे श्रेय निस्संशय शिकवणार्याचंच. आता हौस म्हणून स्वयंपाक करतो. प्रयोग करतो. निम्म्यापेक्षा जास्त फसतात, पण आता किमान फोडण्या तरी जाळत नाही. स्वतःच्या पाककृती एका वहीत लिहून ठेवतो.
मिपावरच्या अन्नपूर्णा आणि बल्लव; विशेषतः पेठकरकाका हाटेलवाले, दीपक कुवेत पनीरवाले, केडीभाऊ एअरफ्रायरवाले यांच्याकडे बघून शिकतो आहे. आता पाकृचा शो दिसला तर चॅनेल बदलत नाही. घरात पाकृंच्या पुस्तकांची भर पडली आहे.
एकेकाळी चवीबाबत फार आग्रही होतो. एखादा पदार्थ पाहिजे त्या चवीचा झाला नसेल तर फाड्कन तसं बोलून दाखवायचो. (शिवाय तरूण था मय.) कित्येक माऊल्या या बळंचकर स्पष्टवक्तेपणामुळे दुखावल्या गेल्या असतील. पण आता समजतं की 'ती' चव बरोब्बर आणण्यासाठी पार्श्वभागाला किती मोड येतात ते. आता थोडं इकडेतिकडे झालं तर सोडून देतो.
एक अतिशय समाधानाची गोष्ट म्हणजे माझा मुलगा स्वयंपाकघरात लुडबुड करतो. हाताखालची कामं करतो. "अमुकमध्ये तमुक घातलं तर काय होईल?" वगैरे प्रश्न विचारतो. मला एक चांगला गुरू भेटला - प्रत्येकालाच भेटेल याची काय शाश्वती?
-- x --
प्रतिक्रिया
28 Aug 2017 - 10:32 am | मोदक
चविष्ट आणि खुसखुशीत लेख
चवदार कोट्यांची फोडणी भारी लागत आहे
28 Aug 2017 - 10:48 am | अनुप ढेरे
जबरदस्तं! लेख.
ही आणि इतर टिप्स वाचून हाफ ब्लड प्रिन्स आठवला. "डॅगरच्या अमुक भागाने ठेचा, तमुक वनस्पतीचा भरपूर ज्युस निघेल तो पोशनमध्ये घाला" वगैरे वगैरे !
28 Aug 2017 - 10:50 am | मिहिर
आदूबाळी शैलीतला भारी लेख.
28 Aug 2017 - 10:54 am | ज्योति अळवणी
आयुष्याला वेगळा अर्थ देणारा अनुभव मस्त
28 Aug 2017 - 10:57 am | अत्रे
+१ लेख
त्याने बर्तन मांझून टाकले.
टीव्ही च्या मराठी ऍड मध्ये चालूल जाईल असे वाक्य आहे.
30 Aug 2017 - 3:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बर्तन मांझने लैच आवडले.
-दिलीप बिरुटे
28 Aug 2017 - 11:11 am | केडी
अरे काय कमाल लिहिलंय, आणि खरंच मी स्वतः ह्याला खूपच रिलेट करू शकलो, भारतात असताना थोडं फार स्वैपाक घरात लुडबुड करायचो, पण असाच वयाच्या २६व्या वर्षी अमेरिकेत पोचलो, रूम मेट्स ना स्वैपाक येत नाही, आणि ३ महिने फ्रोझन पिझ्झा खाऊन कंटाळा आल्यावर शेवटी मीच घुसलो आणि स्वैपाक सुरु केला....[ह्यात अजून एक स्वार्थ होता, भांडी घासणे, आणि नंतरची साफ सफाई ते करायचे.. :-)]
मी पण अजून शिकतोच आहे, ह्या सगळ्या बल्लवाचार्यांच्या नावात स्वतःचं नाव वाचून आनंद जाहला...आभारी आहे! अशीच उतारोतर प्रगती होत राहो!
A recipe has no soul, you as the cook must bring soul to the recipe.”
– Thomas Keller
28 Aug 2017 - 11:20 am | पैसा
भारतीय कुटुंबात आणि गेल्या शतकात शिकण्याच्या वयात असल्यामुळे ही वेळ कधी आली नव्हती. कोणालाही स्वयंपाक असा वेगळा शिकावा लागतो याची आज पहिल्यांदाच जाणीव झाली. नशिबाने माझ्या पोराला येता जाता गरजेपुरते जेवण बनवायला शिकवले आहे त्यामुळे त्याच्यावर कधी इतकी श्रीगणेशा करायची वेळ येणार नाही! =))
28 Aug 2017 - 12:37 pm | तुषार काळभोर
स्वयंपाकातला अर्धा स् सुद्धा येत नसताना युरोपियन लोकांना पावभाजीची पार्टी देणे अन् 'आई' व 'बायको' यांना आपल्या चवीने कृतकृत्य करणे हे म्हणजे कीबोर्ड-माउस हाताळता न येणार्याने अझ्युरवर व्हर्च्युअल सर्वर प्रस्थापित करण्यासारखे आहे.
आणि त्याची 'व्हॅल्यू' माहिती असल्याने शिसान!
28 Aug 2017 - 11:40 am | खेडूत
:))
28 Aug 2017 - 11:55 am | माम्लेदारचा पन्खा
पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही हेच खरं . . . . माणसाला स्वतः शिजवून खाता येईल इतपत स्वयंपाक यायलाच हवा (म्हणजे बायकोही निर्धास्त असते !)
पार्टीला कधी बोलावताय . . वाट बघतो आहे !
28 Aug 2017 - 11:56 am | फ्रेनी
खुसखुशीत शैलीतील लेखन .
28 Aug 2017 - 12:11 pm | अजया
एकदम ब्येश्ट खुसखुशीत लेख :)
28 Aug 2017 - 12:11 pm | भित्रा ससा
स्वतः केलेला पदार्थ खाण्याची मजा काई औरच असते का नाई
28 Aug 2017 - 12:18 pm | जेम्स वांड
उत्तम लेख खूप आवडला, मी कसा कसा शिकत गेलो ते आठवलं, परदेशी नाही पण घर सोडले म्हणून सुरु केलं होतं स्वयंपाक शिकणे, आता 'कूकिंग' माझ्यासाठी स्ट्रेसबस्टर झालंय, जरा काही चिंता वाटली, काही व्यग्रता आली की सरळ मुद्पाकात घुसून काहीतरी सिद्ध करणे ह्याचा आनंद विरळ असतो.
30 Aug 2017 - 10:17 am | नूतन सावंत
कुकिंग हे स्ट्रेसबस्टरच असतं, कारण पदार्थ हव्या त्या शकलचा आणि हव्या त्या चवीचा बनणे एकाग्रतेशिवाय शक्य नसते हे एक आणि फोडणी ,मसाले यांच्या परिचित सुवासाने मेंदू शांत होतो.पदार्थ बनून पोटात गेला की स्ट्रेस संपलेलाच असतो.
1 Sep 2017 - 12:28 pm | जेम्स वांड
एखादी शॉर्ट ड्युरेशन डिश तयार करून गरमगरम खाल्लीतरी जाते. जास्त वेळ लागणाऱ्या निगुतीच्या रेसिपी करून लोकांना खायला घालायची मजाच मस्त असते.
28 Aug 2017 - 12:33 pm | नंदन
खास आबाशैलीतला लेख आवडला. योग्य वेळी, योग्य गुरु मिळणं भाग्याचंच. (आमच्या शेजारच्या घरी, डिशसोपमधे शिजलेले छोले आणि तेलाचं बोट लावून पापड मायक्रोवेव्हमध्ये ठेवल्याने लागलेली मिनी-आग इत्यादी किस्से आठवले :))
28 Aug 2017 - 12:44 pm | पुंबा
जबरदस्त आबा!! झकास लिहिलयंत..
28 Aug 2017 - 12:47 pm | यशोधरा
मस्त लेख. एकदम आवडला.
28 Aug 2017 - 12:48 pm | अभ्या..
अॅक्चुअल स्वयंपाक करणे इंटरेस्टींग काम आहे पण त्यापेक्षा त्याची पूर्वतयारी, नंतर रांधतानाच इतर कामे करण्याचा उरक आणि व्यवस्थितपणा हे अंगात बाणवायला विषेष प्रयत्न करावे लागतात. ते एक मस्त मॅनेजमेंट स्कील असते.
ह्या सर्व गोष्टीत प्राविण्य मिळवल्याबद्दल मिपाचे साटोपचंद्र ही पदवी आदूबाळाला देण्यात यावी असा मी ठराव मांडतो.
(बहुधा माझा शब्द अन त्याचा अर्थ बरोबर असावा असे वाटतेय, चुकीचा असल्यास नवीन पदवी हुडकू)
28 Aug 2017 - 1:00 pm | प्रीत-मोहर
__/\__
28 Aug 2017 - 1:44 pm | सिरुसेरि
मस्त लेख . या श्री गणेश लेखमालेतील सर्वच लेख आवडले . "success has no shortcut" , "practice make man perfect" याची जाणीव करुन देणारे लेख .
28 Aug 2017 - 1:48 pm | डॉ सुहास म्हात्रे
भारीच चटकदार आणि खुसखुशीत लेख !
28 Aug 2017 - 2:03 pm | संग्राम
अशीच अवस्था जेव्हा अस्मादिकांची अमेरिकेत झाली होती .... चहा, आणि भात सोडून काही येत नव्हते ...
त्यातल्या त्यात बरे की रुमी द. भारतीय होता ... मग काय भात आणि स्पेशल "ghungroo pickle" असे काही दिवस काढले .... मग घरी आईला फोन करुन
रेसिपी विचारुन बनवायला लागलो .... मग कधी डाळ जास्त नाही भिजवली, साबुदाणा खिचडी एवज साबुदाणा गोळा असे प्रयोग करुन बर्यापैकी स्वयंपाकी बनलो ...
28 Aug 2017 - 2:37 pm | जागु
वा छान लिहील आहे. खरच ही एक कला आहे. जेवढा सराव कराल तेवढी रंगत येते.
28 Aug 2017 - 3:50 pm | सविता००१
कसलं भारी लिहिलंय हो.. सुंदरच. अगदी खुसखुशीत.
28 Aug 2017 - 4:09 pm | प्रचेतस
हा माणूस इतकं कमी का लिहित असतो?
28 Aug 2017 - 4:10 pm | कंजूस
आवड हाच गुरु असतो.
लेखन नेहमीप्रमाणेच चुरचुरीत. व्यक्तिनिरीक्षण चटपटीतपणे येतं.
28 Aug 2017 - 4:13 pm | स्मिता श्रीपाद
मस्त लिहिलय...
पंचेस जबरीच....
28 Aug 2017 - 5:08 pm | रेवती
चवदार लेखन आवडलं.
अभ्यानं दिलेली पदवी बरोबर आहे. साटोपचंद्र.
28 Aug 2017 - 5:22 pm | मृत्युन्जय
काय खंग्री लिहलय राव.
या लेखमालेतले अजुनपर्यंतचे तिन्ही लेख झक्कास जमलेत एकदम.
28 Aug 2017 - 5:36 pm | नीलमोहर
लेखविषय भारी, लेखनशैली त्याहून भारी.
28 Aug 2017 - 5:57 pm | जेडी
मस्तच लेख, मजा आली वाचताना.
28 Aug 2017 - 6:08 pm | स्वाती दिनेश
खुसखुशीत लेख आवडला,
स्वाती
28 Aug 2017 - 6:29 pm | सूड
हे अगदी खरंय. पण वर्षानुवर्षे सैंपाक करुन हर वक्ताला एखाद्या माऊलीचं काय ना काय बिनसत असेल तर शब्द बोलले नाहीत तरी आमचे हावभाव नको इतकं बोलून जातात. त्यावर कंट्रोल आणणं चालू आहे.
28 Aug 2017 - 6:31 pm | सूड
बाकी लेख झकासच. सणवार सोडता अवसेपुनवेला पण लिहीत जा काहीतरी, त्यानिमित्ताने इथे वाचण्यालायक काहीतरी मिळेल.
28 Aug 2017 - 6:52 pm | पिलीयन रायडर
लेख नेहमीप्रमाणे आबास्टाईल! फार थोड्या काळात फार मोठी मजल मारलीत.
पण मला सिन्सिअरली आश्चर्य वाटतं जेव्हा माझ्याच पिढीच्या मुलांना अजिबात स्वयंपाक येत नाही. आम्हाला कुणी मुली म्हणुन "बाईच्या जातीला.." वगैरे कारणं देत स्वयंपाक शिकवला नाही. किंवा आठवड्यातून एकदा टाईप नियमही नव्हते. आम्ही सुद्धा इतर मुलांप्रमाणे अभ्यास आणि करिअर इ गोष्टींमध्ये बिझी. पण तरी स्वयंपाक येत होता बुवा. कसं काय ते ठाऊक नाही. हां अगदी पोळ्या वगैरे जमत नव्हत्या. लग्नानंतर तास तास लागायचा मला पोळ्या करायला. त्यापण गरम खाल्ल्या तरच बर्या लागायच्या. पण बाकी सगळं करायचं कसं असतं हे तरी ठाऊक होतंच. करताना आईला एखादा फोन करुन शंका दूर केल्या की मग तर पदार्थ खाणेबल तरी होणारच. आणि आई नोकरी करत असल्याने घरात एकंदरितच कामात मदत करायचोच. त्यामुळे ओटा धुणे, वस्तु नीट आवरुन ठेवणे वगैरेची सवय असल्याने स्वयंपाकातही राडा होत नाही.
एक जनरल प्रश्नः- टिपीकली मुलांना अशी कामं सांगत नाहीत का? कांदा चिरुन द्या, ओटा धुवा, ताटं वाढा, खरकटं काढा वगैरे. कारण ह्यामुळे की काय स्वयंपाक घरात वावर असायचा आणि स्वयंपाक कसा होतो हे बेसिक तरी आपोआपच शिकल्या जायचं.
28 Aug 2017 - 9:48 pm | स्मिता.
लेख मस्त खुसखुशीत आहे, वाचताना मजा आली.
पण त्याचवेळी माझ्याही मनात पिरा सारखेच विचार आले. बारावीपर्यंत घरी होते तेव्हा काही फारसे चूलीजवळ जावे लागले नाही. नंतर शिकायला आणि नोकरीला परगावी असल्याने घरी आल्यावर आईने कधी काही बनवू दिले नाही. तरी केवळ आईला स्वयंपाक करतांना नेहमी पाहीले असल्याने मला फार लवकर स्वयंपाक जमला.
मुलांचा पाय घरात नसतो आणि असला तरी एकतर त्यांना स्वयंपाकघरात यावसं वाटत नाही. अगदी यावसं वाटलं तरी आई/आजीच हुसकावून लावतात. कदाचित या कारणामुळे मुलांना स्वयंपाक करण्यात गती नसावी.
आता माझा चार वर्षांचा मुलगा रोज मला पोळ्या बनवतांना बघतो आणि शेवटी कणकेचा उर(व)लेला लहानसा गोळा लाटत बसतो. जसजसा मोठा होईल तसं त्याला झेपेल तेवढा स्वयंपाक शिकवण्याचा मानस आहे.
30 Aug 2017 - 2:18 pm | अप्पा जोगळेकर
टिपीकली मुलांना अशी कामं सांगत नाहीत का? कांदा चिरुन द्या, ओटा धुवा, ताटं वाढा, खरकटं काढा वगैरे. कारण ह्यामुळे की काय स्वयंपाक घरात वावर असायचा आणि स्वयंपाक कसा होतो हे बेसिक तरी आपोआपच शिकल्या जायचं.
असे काही नाही. हे उगाचच केलेले एक जनरलायझेशन आहे. पूर्वीच्या काळी बायका ४ दिवस सोवळ्यात असत त्यामुळे स्वयंपाक अजिबात न येणारे पुरुष जुन्या पिढीत फार विरळ असतील. अलीकडे म्हणजे गेल्या ५० वर्षांमधे १ किंवा २ च मुले असण्याचे प्रमाण वाढत गेल्याने आणि आर्थिक सुबत्ता आल्याने
लग्नाआधी स्वयंपाक न येणारी एक अक्खी पिढीच तयार झाली. यात स्त्री-पुरुष सगळेच आहेत.
30 Aug 2017 - 2:28 pm | सूड
आम्हाला स्वयंपाक येतो त्याच्या महत्त्वाच्या कारणांपैकी हे एक आहे. चार दिवस आई बाजूला बसायची. दुसर्या कोणी दिला करुन स्वयंपाक करुन तरी किती दिवस असं म्हणताना हळू हळू एकेक पदार्थ शिकवला. त्यामुळे आता अडत नाही.
30 Aug 2017 - 8:39 pm | पिलीयन रायडर
येस्स! आमचेही कारण हेच आहे. आमची आई (आजीच्या कॄपेने.. भलं होवो तिचं!!) बाजुला बसायची. त्यामुळे आम्हाला हाताशी तरी घ्यायचे. काकांकडेही तसेच झालेय आणि खुद्द आजी बाजुला बसत असल्याने आजोबांना सुद्धा अगदी नैवेद्याचा स्वयंपाक यायचा.
आमच्या आजोळी बाजुला बसणं नसतं. तरी मामेभावांना स्वयंपाक येतो. ह्याचं एक कारण असंही असू शकतं की एक तर आम्हा सर्व भावंडांच्या आया नोकरी करत होत्या. त्यामुळे वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस वगैरे दिवशी आम्ही हमखास गिफ्ट म्हणून "आज तू काही करु नकोस, आम्ही स्वयंपाक करणार" असं सांगायचो. त्यामुळे अगदी साग्रसंगीत नाही पण पुलाव/ रायतं/ मठ्ठा / भरीत असा काहीतरी छोटेखानी स्वयंपाक आमचा आम्ही केलाय. एकदा आम्हाला मोठ्या भावाच्या जीवावर सोडून (ज्याचे वय १९-२०) आई बाबा आणि मामा मामी कुठे तरी निघून गेले होते. २ दिवस त्याने आम्हाला जमेल ते बनवून खाऊ घातलं. माझे भाऊ आजही घरी जमले की एखादा दुसरा पदार्थ करतातच.
कुठे अडणार नाही इतपत यायला हवं हे घरच्यांनी आमच्याही नकळत आमच्या डोक्यात टाकलं होतं. सूड सारखा सुगरणपणा अंगात नाही किंवा स्वयंपाकाची आवड वगैरे आजही नाहीये. पण कधीही अडलं नाही.
28 Aug 2017 - 7:38 pm | सुबोध खरे
पडवळ घातलेली पांढरट कढी (भिकार लागते:
हे वाचून पोट धरून हसलो. बाकी लेख छान आहे आणि विचार करायला लावणारा आहे. मला स्वतःला स्वयंपाक येत नाही पण लष्करात २३ वर्षात अडलं नाही हीही वस्तुस्थिती. पण थोडं डोकं वापरलं आणि मूळ रसायन शास्त्र माहित असेल तर बऱ्याच गोष्टी उत्तम करता येतात.
एकदा वडिलांच्या मित्राला लिंबाच्या सालीपासून (लिंबं संपली होती आणि पिळलेली साल शिल्लक होती) सायट्रिक ऍसिड घालून उत्तम लिंबाचे सरबत करून दिले होते.
नौदलात अश्विनी रुग्णालयात आमच्या कुक ने रात्री १० वाजता एका अधिकाऱ्याच्या नखरेल बायकोला टोमॅटो सॉस आणि कॉर्न फ्लॉवर पासून उत्तम टोमॅटो सूप बनवून दिले होते.
30 Aug 2017 - 10:26 am | नूतन सावंत
अगदी खरंय,एकदा पाहुणे आले असता सोलकढी नारळाचे नाही तर साधे दूध घालून केली होती ते आठवलं,लगेच संपल्याने कुणाला काही समजले नाही.
30 Aug 2017 - 1:31 pm | मोदक
कोकणात गेल्यावर माझे एकवेळचे जेवण हे फक्त भात, सोलकढी आणि तळलेले मासे असे असते.
एका दिवशी चक्क ताकातली सोलकढी समोर आली. X-(
28 Aug 2017 - 9:14 pm | वरुण मोहिते
जेवण करायला मजा येते पण . शिकत शिकत . मलापण लहानपणा पासून हौस . आता बरेच काही बनवता येते . हळूहळू पाककृती पण माणूस गोष्ट वाचल्यासारखा आवडीने वाचू लागतो . घरी किंवा मित्रांमध्ये काही आपण बनवलेलं आवडलं कि आपल्याला जो आनंद होतो त्याची तोड नाही . असो आता भेटाल तेव्हा ते बटाटे वडे बनवून आणायला विसरू नका :))
28 Aug 2017 - 11:32 pm | दशानन
मी देखील कधी कधी स्वयंपाक करतो, पुरावा येथेच मिपावर आहे ;)
28 Aug 2017 - 11:57 pm | एस
फोडणी पहावी टाकून, अर्थात 'संगीत गोईंग डच'!!!
मिपाचे 'कोट्या'धीश, मानलं तुम्हांला. _/\_ आयुष्यात टीटीएमएम केल्याशिवाय जीवन गोड लागत नाही. काय? :-D
29 Aug 2017 - 2:29 am | निशाचर
आवडली ही खुसखुशीत डच ट्रीट!
29 Aug 2017 - 2:16 am | जुइ
खुसखुशीत शैलीतील हा लेख वाचून मजा वाटली ;-)