राम-राम मंडळी, मिपावर जेव्हा एकापेक्षा एक सुंदर कविता, कधीतरी सुंदर लेख, कधीतरी सुंदर शब्दरचना आपण वाचतो तेव्हा, एखाद्याकडे अलौकिक प्रतिभा असते म्हणजे काय असते त्याचा साक्षात्कार होतो. कवीला एखादी कल्पना सुचते कशी ? याबाबत कायमच कुतूहल असते. दैनंदिन जीवनव्यवहारात तुम्ही आम्ही जे शब्द वापरतो तेच शब्द वापरुन एखाद्याला कवितेसाठी नेमके शब्द सुचतात. ती कविता एक वेगळा अनुभव आणि आनंद देते. त्यातल्या प्रतिभा शक्तीचे सतत आश्चर्य वाटत असते. म्हणून कवी जन्मावा लागतो असे म्हणावे का ! कवितेला कारण असलेली शक्ती प्रतिभाशक्ती दैवी असते का ! कवीजवळ असणारी निर्मितीची क्षमता सर्वसाधारण व्यक्तीकडे नसते हा अर्थ खरा आहे का ? मात्र त्या शक्तीला दैवी म्हणायला लोक तयार होणार नाहीत. पण विज्ञान आणि दैवाच्या सिमारेषेवर असल्यामुळे अशा अलौकिक स्पर्शांना दैवी म्हणायला आम्ही सर्वसाधारण माणसे कधी-कधी तयार होतो. सर्वच माणसे प्रतिभावंत नसतात, म्हणजेच त्यातले इतर सर्वसाधारण असतात. दररोज स्वयंपाक घरात वावरणा-या स्त्रीला वाफेमुळे भगूण्यावरचे (पातेलं ) झाकण खाली वर होते हे काय माहित नव्हते, पण ते वाफेच्या शक्तीमुळे होते हे सुचण्यासाठी जेम्स वॅट जन्माला यावा लागला. प्रत्येक फेकलेली वस्तू जमिनीवर पडते. पण गुरुत्वाकर्षण शक्ती समजण्यासाठी न्युटन जन्माला यावा लागला. यांना हे सर्व सुचले कसे. कोणत्या केमीकल लोच्यामुळे हे घडते. भाषिक कोट्या करणारे श्री.कृ. कोल्हटकर, रा.ग.गडकरी, अत्रे, यांना भाषिक कोट्या सुचतात कशा ? एखादा वक्ता खिळवून ठेवील अशी भाषा वापरतो. तेव्हा त्याच्याकडे कोणती अशी विलक्षण प्रतिभा असते. कलानिर्मितीच्या वेळी माणसाच्या विचारात कोणती अलौकिकता असावी लागते. जन्म, संस्कार, परिस्थिती, या गोष्टी माणसाच्या हातात नसतात. पण जे प्रतिभावंत असतात त्यांच्या संवेदनक्षमता सूक्ष्म, तीव्र स्वरुपाच्या असाव्यात. ते जे जे पाहतात त्याचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम होतो. त्याचबरोबर प्रतिभावंताची अनुभव घेण्याची प्रक्रिया कल्पना, विचार, भाव अशा व्यवहारातून सतत चालू असते.तेव्हाच अलौकिक कलाकृती जन्माला येते. त्यांच्या मनात सतत काहीतरी वाजत असते त्याचा आवाज फक्त निर्मात्यालाच येत असावा आणि तो अनुभव जेव्हा प्रकट होतो, तेव्हा तो कोणी अलौकिक प्रतिभावंत आहे याची आपणास जाणीव होते. इतरांच्या अनुभवांशी कल्पनाशक्तीच्या बळावर व तीव्र संवेदनामुळे तो त्याच्याशी एकरुप होतो. दुस-याच्या अंतरंगात प्रवेश करण्याचे सामर्थ्य त्याला प्राप्त होते. त्यामुळेच साहित्यव्यवहारातील विलक्षन अनुभव निर्माण होतात. 'नवनवोन्मेषालिनी प्रज्ञा' नित्यनुतन असे निर्माण करणारी प्रज्ञा म्हणजे प्रतिभा, हे प्रतिभेचे वैशिष्टे, समीक्षकाला, टीकाकाराला कलाकृतीतील दोष अथवा उणिवा दाखविता येतात. पण लेखन करता येणार नाही. एकंदर प्रतिभा ही दैवी शक्ती असते निसर्गत: उपजत असते या विचारापासून आम्हाल अजून दूर होता आलेले नाही. कवी जन्मावा लागतो, कलावंत जन्मावा लागतो, वक्ता जन्मावा लागतो अशा भुमिका घेतल्या की विलक्षण बुद्धीमत्ता असलेली दुर्मीळ माणसे म्हणजे दैवी चमत्कार म्हणन्याचा मोह होतो. मुळात माणसाजवळ असणारी बुद्धिमत्ता सरावाने विकसित होऊ शकते असेही वाटत असते. असा सराव करण्यासाठी अनुकूल वातावरण हवे असते. व्यक्तीच्या बालपणापासून असा सरावाबरोबर इच्छाशक्तीही असली पाहिजे. या सर्व बाबींचा एकत्रित परिणाम व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीवर होत असतो. म्हणून परिश्रमाने घडलेली माणसेही आपल्यासमोर वावरत असतात. जीवनशैलीचे 'प्रतिभा' एक वैशिष्टे असते. जीवनशैलीतून विकसित होणारी कल्पनाशक्ती हीच लेखनकृतीचे स्वरुप घडवते; या विचारातून प्रतिभाशक्ती दैवी असते हेही मानायला आम्ही तयार नसतो. दोस्त हो, वरील विचारासंबधी आमच्याच मनात प्रचंड गोंधळ आहे. तेव्हा या वादाचे करायचे काय ? यावर उत्तम मार्ग म्हणजे मिपा सदस्यमित्रांशी चर्चा करणे, त्यासाठीच हा काथ्याकुटाचा प्रपंच !!!
अवांतर : मद्याचे घोट, सिगारेटचे झुरके, आणि आणखी काय काय असेल अशा सेवनांमुळे मेंदूतील काही भाग उत्तेजीत होतो आणि अलौकिक कलानिर्मिती घडते का ? त्यावरही चर्चा होऊ दे !!!
प्रतिक्रिया
15 Oct 2008 - 3:58 am | टुकुल
>>>राम-राम मंडळी, मिपावर जेव्हा एकापेक्षा एक सुंदर कविता, कधीतरी सुंदर लेख, कधीतरी सुंदर शब्दरचना आपण वाचतो तेव्हा, एखाद्याकडे अलौकिक प्रतिभा असते म्हणजे काय असते त्याचा साक्षात्कार होतो. <<<
सहमत.. पण तुम्ही प्रतिसादांना विसरले भौ, एक एक लेखनाला असले जबरदस्त हाणलेले असते कि लेखनापेक्षा प्रतिसादच जास्त भाव खावुन जातात.
>> सर्वच माणसे प्रतिभावंत नसतात, म्हणजेच त्यातले इतर सर्वसाधारण असतात. <<
ह्म्म्म.. रामदासांच्या कविता वाचल्या कि हा विचार नेहमी डोक्यात येतो कि आपल डो़कं अस का नाही चालत. पण विचार करण्याचा मुद्दा आहे कि मि किती वेळा प्रयत्न केला आहे, माझा शब्दसंगर्ह किती, माझे आयुष्यातले अनुभव किती आणि सर्वात महत्वाचे माझ्या मनातली त्याबद्द्लची इछा. ज्यांना आपण प्रतिभावंत म्हणतो त्याच्या अंगात कुठ्ला तरी किडा असतो जो त्यांना शांत बसु देत नाही आणी मग ते त्या क्षेत्रात स्वताला झोकावुन देतात आणी स्वताला एका वेगळ्या पातळी ला नेतात, तो किडा म्हंजे प्रतिभा...
राजा रवी वर्माच्या पुस्तकात वाचलेले एक वाक्य पुसटस आठ्वत आहे
"प्रत्येक कलावंत हा स्वताशी थोडासा नाराजच असतो कारण त्याच्या कलाक्रुतीतल्या चुका इतरांना नाही दिसल्या तरी त्याला दिसत असतात आणी त्याचा प्रवास पुर्णतेकडे असतो". जिथे विचार आला कि ह्यापुढे अजुन काही सुंदर नाही तिथे तो कलावंत संपला आणी सर्वसाधारण झाला.
टुकुल.
15 Oct 2008 - 8:38 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एक एक लेखनाला असले जबरदस्त हाणलेले असते कि लेखनापेक्षा प्रतिसादच जास्त भाव खावुन जातात.
सहमत आहे. कधी-कधी लेखनापेक्षा प्रतिसादांनाच भरभरुन दाद द्यावीशी वाटते.
ज्यांना आपण प्रतिभावंत म्हणतो त्याच्या अंगात कुठ्ला तरी किडा असतो
कोणत्याही निर्मितीसाठी काहीच लोकांकडे प्रतिभा असते असे म्हटले तर तो दैवी स्पर्शच म्हणावा लागेल. पण मला वाटतं, प्रयत्न करणारे जेव्हा ओबड-धाबड लिहितात मात्र अशा लोकांकडे प्रतिभेचा अभाव आहे,असे म्हणतो. तेव्हा प्रयत्न करुनही त्यांनी भविष्यात कला निर्मितीचा प्रयत्न करु नये असे म्हणायचे का ?
बहीणाबाईंची गाणी जेव्हा आपण वाचतो तेव्हा अशिक्षीत स्त्री कितीतरी मोठा आशय आणि तत्वज्ञान सांगते. तेव्हा माझ्या कवितेची प्रेरणा ही माय सरस्वती माझ्या तोंडून बोलते त्यामुळेच असे लेखन घडते, असे त्या म्हणतात. म्हणून अशी माणसं जन्मालाच यावी लागतात असे म्हणावे लागेल.
-दिलीप बिरुटे
15 Oct 2008 - 7:46 am | अरुण मनोहर
प्राध्यापक बिरूटे ह्यांनी विचारांना चालना देणारा विषय चर्चेला घेतला आहे.
प्रथम त्यांची काही खूप भावलेली निरीक्षणे देतो.
>>>> कोणत्या केमीकल लोच्यामुळे हे घडते?
>>>> त्यांच्या संवेदनक्षमता सूक्ष्म, तीव्र स्वरुपाच्या असाव्यात. ते जे जे पाहतात त्याचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम होतो.
>>>> मनात सतत काहीतरी वाजत असते
जो पर्यंत विज्ञा्नाला मेंदूच्या कार्यप्रणालीचे पूर्ण आकलन होत नाही, तोपर्यंत प्रतिभेचे विज्ञा्न अनाकलनीयच रहाणार आहे. मात्र जेव्हा केव्हा मानव हे रह्स्य उलगडून काढेल, त्या दिवशी यंत्रमानव मानव बनण्याकडे मोठे पाऊल टाकेले असेल हे नक्की.
तोपर्यंत विज्ञा्न सोडून, प्रतिभेतील कलाच समजाऊन घेण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. लेखक किंवा कवी लीहीतो कसे ह्याचे उत्तर थोड्या फार फरकाने, एखादा चित्रकार अशाच प्रकारे रेषा का वळवतो किंवा रंगवतो, एखादा गायक वेगवेगळ्या हरकती कशा शोधून काढतो वगैरे कलांचा मागोवा घेतला तर मिळू शकेल. पण दुर्दैव्य असे की हे उत्तर मिळाले असे वाटते, पण ते शब्दात पकडता येत नाही.
माझी अशी धारणा आहे की जर एखाद्या विषयाबद्दल तुमच्या मनात काही जळत, खदखदत असेल तर त्या विषयी लीहीतांना प्रतिभेला बहर येतो.
दुसरे असे की, काहीही लीहायचे झाले तर एखादे बीज हवे. ते बीज कसे फुलवायचे हा थोडा प्रतीभेचा, थोडा सरावाचा, थोडा निरीक्षणाचा भाग असतो. गायक जरी गाणे शिकून व रियाज करून चांगले गाऊ शकतो, तरी मुळात गळ्यातील स्वरयंत्र जन्मजात गाण्याला योग्य नसेल, तर संगीतात फार पुढे जाउ शकत नाही. म्हणजे जन्मजात देणगी हवीच. पण ती पुढे जोपासून, संवेदनाशीलता संपादून आणि सतत लीहून (रीयाज) प्रतिभा फुलवली जाउ शकते.
लेखनाचे बीज सशक्त असेल तर त्यापासून येणारे फूलही सुंदर बनायला मोठी मदत होते. म्हणून कमजोर बीज फेकून देऊ नये. उत्तम मशागत करून तेही छान फुलू शकते. पण अर्थात, छान फुलवलेल्या सशक्त बीजापेक्षा कमी सुंदर फुले येतात. तेव्हा मला लेखन बीजाचे महत्व फार वाटते.
याबाबतीत मिपाने अनेक लेखकांच्या प्रतिभा फुलवण्याला योग्य व्यासपीठ उपलब्ध करून दिले, म्हणून पुन्हा एकदा तात्यांनी चालवलेल्या प्रकल्पाचे खूप खूप कौतुक करावेसे वाटते. आपल्याच लोकांचे आभार मानू नये म्हणतात म्हणून तो उल्लेख करत नाही.
15 Oct 2008 - 8:26 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जो पर्यंत विज्ञा्नाला मेंदूच्या कार्यप्रणालीचे पूर्ण आकलन होत नाही, तोपर्यंत प्रतिभेचे विज्ञा्न अनाकलनीयच रहाणार आहे. मात्र जेव्हा केव्हा मानव हे रह्स्य उलगडून काढेल.
मनोहर साहेब, आता नेमकेपणाने सांगता येणार नाही. पण मेंदुच्या कार्यप्रणालीत काही तरी लिहितांना, किंवा कोणत्याही कलाकृतिच्या निर्मितीच्या वेळेस काही बदल होतात म्हणे, आता त्याचे शास्त्रीय विष्लेशन मला सांगता येणार नाही. पण तसे ते जर नसेल तर प्रतिभा ही दैवी मानली पाहिजे, असे वाटते.
-दिलीप बिरुटे
15 Oct 2008 - 7:56 am | सहज
जन्म, संस्कार, परिस्थिती, या गोष्टी माणसाच्या हातात नसतात. पण जे प्रतिभावंत असतात त्यांच्या संवेदनक्षमता सूक्ष्म, तीव्र स्वरुपाच्या असाव्यात. ते जे जे पाहतात त्याचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम होतो. त्याचबरोबर प्रतिभावंताची अनुभव घेण्याची प्रक्रिया कल्पना, विचार, भाव अशा व्यवहारातून सतत चालू असते.तेव्हाच अलौकिक कलाकृती जन्माला येते. त्यांच्या मनात सतत काहीतरी वाजत असते त्याचा आवाज फक्त निर्मात्यालाच येत असावा आणि तो अनुभव जेव्हा प्रकट होतो, तेव्हा तो कोणी अलौकिक प्रतिभावंत आहे याची आपणास जाणीव होते. इतरांच्या अनुभवांशी कल्पनाशक्तीच्या बळावर व तीव्र संवेदनामुळे तो त्याच्याशी एकरुप होतो. दुस-याच्या अंतरंगात प्रवेश करण्याचे सामर्थ्य त्याला प्राप्त होते. त्यामुळेच साहित्यव्यवहारातील विलक्षन अनुभव निर्माण होतात.
सही..
खरे आहे ही प्रतिभा निखळ आनंद देणारे साहीत्य निर्माण करते.
प्रा. डॉ. चा हा लेख, रामदास, बेला यांच्या कविता. काल प्रतिभा सर्व शक्तीनिशी मिपावर अवतरली होती की. इंटरेस्टिंग पौर्णिमेच्या चंद्राचा हा परिणाम तर नसावा. :-)
अवांतर - टुकूल म्हणतात तसे जालावर धारेधार प्रतिसादातुन दिसणारी प्रतिभा म्हणायची का तिची सावत्र बहीण? :-)
15 Oct 2008 - 8:22 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रतिसादातुन दिसणारी प्रतिभा म्हणायची का तिची सावत्र बहीण?
सहजा, लेखन कोणतेही असू दे, लिहिण्यासाठी इतरांपेक्षा वेगळे सूचते त्या प्रतिभेला नमस्कारच केले पाहिजे. आता त्याला सावत्र बहीण म्हणायचे का ? मराठी साहित्यात साहित्याचे निर्मितीप्रक्रियेत प्रतिभेला वेडाची बहीण म्हणतात. म्हणजे काही तरी वेगळे सुचत असतांना वेडा माणूस ज्या अवस्थेत असतो, त्या अवस्थेतूनच असे वेगळे सुचते अशी कल्पना केली जाते. खरं खोटं मला काही नाही.
-दिलीप बिरुटे
15 Oct 2008 - 8:23 am | टुकुल
>>>>टुकूल म्हणतात तसे जालावर धारेधार प्रतिसादातुन दिसणारी प्रतिभा म्हणायची का तिची सावत्र बहीण
सहजराव, प्रतिभाच ति, बघा त्या पोष्ट मन ला (http://misalpav.com/node/397) कस हाणल आहे. प्रतिभेचा पाउस पडत आहे :-)
15 Oct 2008 - 8:10 am | श्रीकृष्ण सामंत
डॉ.दिलीप
अतिशय विचारोत्तेजक असा हा आपला लेख वाचून मला खूप आनंद झाला.आपल्या लेखातलं प्रत्येक विधान चर्चा करायला मला उद्दुक्त करतं.
बघूया कसं जमतंय ते.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
15 Oct 2008 - 11:24 am | श्रीकृष्ण सामंत
आपल्या विचारप्रवर्तक लेखावर माझी प्रतिक्रिया अशी.---
"सुंदर कविता, कधीतरी सुंदर लेख, कधीतरी सुंदर शब्दरचना कवीला एखादी कल्पना सुचते कशी ? "
हे सर्व मेंदुचे खेळ असावेत असं मला वाटतं.मग कुणी त्याला "अलौकिक प्रतिभा" म्हणो,कुणी "साक्षात्कार"म्हणो किंवा अन्य काही म्हणो.
बहिणाबाई,तुकाराम,सावता माळी,आणि असे अनेक मान्यवर,कुठल्याही युनिव्हरसीटीत जाऊन शिकले नाहित.आणि अन्य काही व्यक्ती शिकून मराठीत एम.ए.पिएचडी घेऊन सुद्धा तसं लेखन करतील असं ही नाही.
"म्हणून कवी जन्मावा लागतो असे म्हणावे का !"
मला वाटतं काही जन्मजात असतात,तर काही बनले जातात.
" प्रतिभाशक्ती दैवी असते का !"
कुणी त्याला दैवी म्हणेल तर कुणी नैसर्गीक म्हणेल.
आपण म्हणता तसं "हा सिमारेषेमुळे झालेला फरक असावा".ह्या आपल्या म्हणण्याशी मी सहमत आहे.
"वाफेच्या शक्तीमुळे होते हे सुचण्यासाठी जेम्स वॅट जन्माला यावा लागला.गुरुत्वाकर्षण शक्ती समजण्यासाठी न्युटन जन्माला यावा लागला"
त्या त्या विषयावर त्यांची विचाराची भरपूर चूरस डोक्यात झाली असावी.आपण म्हणता तसं,
"त्यांच्या मनात सतत काहीतरी वाजत असते" ह्याच्याशी मी सहमत आहे.
"समीक्षकाला, टीकाकाराला कलाकृतीतील दोष अथवा उणिवा दाखविता येतात. पण लेखन करता येणार नाही. "
मला वाटतं हे आपलं म्हणणं अगदी खरं आहे.वाचक होण्यासाठी लेखन करण्याची जरूरी नसते,परंतु,लेखन करायला वाचनाची अत्यंत जरूरी असते.मग ते वाचन पुस्तकातलं असो,किंवा सावत्या माळ्याच्या शेतातलं असो किंवा तुकारामाच्या भुसारी दुकानातलं असो किंवा बहिणाबाईंच्या रोजच्या व्यवहाराचं वाचन असो.
आणि शेवटी,
"जीवनशैलीचे 'प्रतिभा' एक वैशिष्टे असते."
हे जितकं खरं आहे तितकंच,
"नित्यनुतन असे निर्माण करणारी प्रज्ञा म्हणजे प्रतिभा"
हे ही खरं आहे,आणि
"म्हणून कवी जन्मावा लागतो असे म्हणावे का !"
ह्या ही आपल्या म्हणण्याशी मे सहमत आहे.
आणि त्याचं कारण असं की आता पर्यंत झालेल्या मान्यवर लेखनकरत्याचं "बॅकग्राऊंड" वरिल तिनही पैकी एकात किंवा वरिल तिन्हातही मिळून असलेलं दिसून येईल.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
15 Oct 2008 - 4:01 pm | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
आणखी काय काय ने मेंदू जोरात चालतो. वेगवेगळे क्रिप्टीक सुचतात.
छान लेख.
15 Oct 2008 - 4:18 pm | अवलिया
सर
चांगला लेख.
पण काय आहे की आम्ही काय लिहावे या विचारात पडलो आहोत.
सुचले काही तर जरुर लिहितोच पण तोपर्यत आमच्या भावना आपल्यापर्यत पोहोचाव्यात यासाठी हा प्रतिसाद.
अजुन लेख येवुद्यात. खुप अपेक्षा आहेत आपल्याकडुन.
नाना
15 Oct 2008 - 10:56 pm | पिवळा डांबिस
लेख सुंदर उतरला आहे, दिलीपराव!
अजून काय लिहायचे ते (प्रतिभा नसल्याने!!) सुचत नाहिये...
काही सुचलं तर जरूर कळवीन...
असंच लिखाण अजून येऊद्या....
15 Oct 2008 - 5:43 pm | लिखाळ
सर,
छान लेख आणि त्याला चांगले प्रतिसाद.
प्रतिभा काय आहे यावर माझे काही मत बनलेले नाही. त्यासाठी प्रतिभेची गरज आहे. पण प्रतिभेचा वेध घेण्यासाठी पूर्वसंचित, जीवाची अनुभव घेत घेत होत जाणारी उन्नती या कल्पना मान्य कराव्या लागतील असे वाटते. ते आज विज्ञानाला मान्य नाही आणि माझा आवाका नाही.
'केमिकल' लोच्या असे म्हणून मनोविश्वाच्या अनेक गूढ गोष्टींवर पडदा टाकता येतो असे वाटु लागले आहे.
--लिखाळ.
15 Oct 2008 - 5:54 pm | जैनाचं कार्ट (not verified)
आम्हाला तर लिहतं मिपावर च्या मित्रांनी केलं ! आमच्या चारओळी खरडलेल्या लेखाला देखील भरभरुन प्रतिसाद आले हीच काय आमची प्रतिभा !
तुम्हां मोठ्या माणसासारखं मी काय विद्वान नाही.. चार बुक शाळेत शिकलो व बाकी सगळं जिवनाच्या मैदानात .. जे अनुभवलं तेच शब्दांमध्ये व्यक्त केलं ...
अरुण मनोहर म्हणतात... लेखनाचे बीज सशक्त असेल तर त्यापासून येणारे फूलही सुंदर बनायला मोठी मदत होते. म्हणून कमजोर बीज फेकून देऊ नये. उत्तम मशागत करून तेही छान फुलू शकते. पण अर्थात, छान फुलवलेल्या सशक्त बीजापेक्षा कमी सुंदर फुले येतात. तेव्हा मला लेखन बीजाचे महत्व फार वाटते.
हेच काम मिपावर एकदम उत्तम पध्दतीने होतं.. जे चांगलं आहे त्याला देखील व जो नवखा आहे त्याला देखील भरभरुन प्रतिसाद भेटणारे हे एकमेव संकेतस्थळ असावे !
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग
15 Oct 2008 - 6:12 pm | प्रकाश घाटपांडे
बिरुटे सरांनी उत्तम विषय मांडला आहे. उत्तम प्रतिभा असलेल्या माणसाची माणुस म्हणुन असलेली प्रतिमा उत्तम असेलच असे नाही.
आन कधी कधी अवांतर म्हणजे विषयांतर नव्हे तो समांतर धागाच आहे.कधी कधी तोच मुख्य धागा होउन जातो.
ऋषिकेश सारखा मिसळलेला
प्रकाश घाटपांडे
15 Oct 2008 - 10:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
उत्तम प्रतिभा असलेल्या माणसाची माणुस म्हणुन असलेली प्रतिमा उत्तम असेलच असे नाही.
सहमत आहे.
15 Oct 2008 - 8:17 pm | संदीप चित्रे
जी नसली तर अडत नाही
जी असली तर 'अडत' नाही
15 Oct 2008 - 8:20 pm | स्वाती दिनेश
जेव्हा एकापेक्षा एक सुंदर कविता, कधीतरी सुंदर लेख, कधीतरी सुंदर शब्दरचना आपण वाचतो तेव्हा, एखाद्याकडे अलौकिक प्रतिभा असते म्हणजे काय असते त्याचा साक्षात्कार होतो.
अगदी..
लेख आवडला.
स्वाती
15 Oct 2008 - 8:44 pm | प्रमोद देव
प्रतिभा नाही असा कोणताच माणूस शोधून देखिल सापडणार नाही. ती उपजतच असते....दैवी वगैरे हे नुसते बोलण्यासाठी.
मात्र प्रतिभेचे रूप प्रत्येक माणसागणिक वेगळे असते. कुणाच्या प्रतिभेला अधिक वाव मिळतो,प्रसिद्धी मिळते इतकेच. म्हणजे इतर लोकांना प्रतिभा नसतेच असे नाही.
एकदा प्रसिद्धी मिळाली की मग अशा लोकांच्या प्रतिभेचे भरभरून कौतुक केले जाते आणि हळूहळू लोक त्यांच्या प्रतिभेला दैवी देणगी वगैरे म्हणायला लागतात. खरे तर हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच लोकांना अलौकीक की काय ते म्हणतात ना तशी प्रतिभा असते...म्हणजे इतरांच्यासारखीच त्यांच्यात प्रतिभा असते पण त्यांच्या सुदैवाने त्यांना अनुकुल वातावरण मिळते,योग्य वेळी मानसन्मान मिळत जातात आणि मग ह्या लोकांच्या प्रतिभेला लोक 'दैवी' देणं समजायला लागतात.
15 Oct 2008 - 9:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
'प्रतिभेचा लेख' नव्हे तर वरील विषयावर काथ्याकूटच करायचा होता. :)
प्रतिभा ही दैवी नसेल पण अशी असंख्य उदाहरणे आहेत की शिक्षण नसतांनाही ज्यांच्या प्रतिभेपुढे नतमस्तक होता येईल. अनुकूल वातावरण,सरावामुळे विकसीत झालेली प्रतिभा आणि उपजत प्रतिभा या दोन वेगवेगळ्या गोष्टी असाव्यात असे वाटते.
किंवा त्या तशा नसतीलही पण, काहीच लोकांच्या ठिकाणी ही प्रतिभा कशी विकसीत होते त्या बाबत काही शक्ती कार्यरत असतात असे म्हटल्या जाते. जसे स्फुर्ती ; स्फूर्तीशिवाय लिहिता येत नाही. एखाद्या दिवशी अनेक कविता लिहिणे होते, आणि महिनोनमहिने काहीच नाही. तेव्हा नुसते स्फूर्तीवर अवलंबून न राहता , त्याबरोबर अभ्यास असावा लागेल, मनात वेगवेगळ्या कल्पना नाचल्या पाहिजेत. प्रतिसृष्टी निर्माण करता आली पाहिजे, दिवास्वप्ने पाहता आली पाहिजे, म्हणजे आपल्या प्रतिभेला बहर येत असावा असे वाटते. पण मग हे सर्वांनाच का जमत नाही असा माझ्यापुढे प्रश्न होता ? अ सो.... :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
15 Oct 2008 - 11:01 pm | बेसनलाडू
प्रतिभा - म्हणजे टॅलेन्ट पर् से - प्रत्येकाकडे असतेच कमीअधिक प्रमाणात, आणि वेगवेगळ्या गोष्टींत. ती विकसित कशी करायची हे मात्र इतर बर्याच नियंत्रित-अनियंत्रित घटकांवर जसे आत्मविवेक/विचार, सराव, आजूबाजूचे वातावरण, प्रोत्साहन इ. अवलंबून असते.
(सामान्य)बेसनलाडू
15 Oct 2008 - 9:27 pm | घाटावरचे भट
जी माझ्याकडे नाही ती....
बिरुटेसर, उत्तम काथ्याकूट! अशाच विविधांगी चर्चांनी मिपा समृद्ध होईल यात तिळमात्रही शंका नाही (फक्त मला त्यात सहभागी होता येणार नाही, कारण चर्चा करण्यासाठी लागणारी प्रतिभा वर म्हटल्याप्रमाणे माझ्याकडे नाही.... :) )
--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
16 Oct 2008 - 9:46 am | विसोबा खेचर
प्रतिभा ही रक्ततातच असावी लागते. हे केवळ अन् केवळ दैवाचं देणं आहे!
एखादा प्रतिभावंत हा जर बहुशृत असेल तर त्याच्या प्रतिभेला चार चांद लागतात हे मान्य! परंतु बहुशृतता वेगळी अन् प्रतिभा वेगळी. बहुशृत होता येते, प्रतिभावंत होता येत नाही. प्रतिभा ही जन्मजातच असावी लागते. आडात असल्यशिवाय पोहर्यात येत नाही...
आपला,
(प्रतिभावान) तात्या.
16 Oct 2015 - 5:35 pm | गंगाधर मुटे
लेख आणि प्रतिसाद उदबोधक!
आणखी चर्चा व्हायला हवी.
16 Oct 2015 - 7:39 pm | चतुरंग
विषयावरचा लेख आवडला हो प्रा डॉ.
प्रतिभा किंवा टॅलेंट जन्मजात असते असा मोठा मतप्रवाह आढळतो. परंतु सगळ्या माणसांमध्ये उपजत भरपूर गुणवत्ता असतेच. त्या गुणवत्तेचे आपण काय करतो ते जास्त महत्त्वाचे ठरते. या विषयावरती लिहिलेले एक पुस्तक मध्यंतरी वाचनात आले
'टॅलेंट इज ओवररेटेड'.
लेखकाने त्याचा दृष्टिकोन व्यवस्थित उदाहरणे देऊन शात्रीय अंगाने माहिती विषद करीत मांडला आहे. किमान १०,००० तासांच्या विशिष्ठ सातत्यपूर्ण सरावाने तुम्हाला एखाद्या गोष्टीत जागतिक दर्जाचे यश मिळवता येते असे सर्वसाधारपणे दिसून येते. आपल्याला माहीत असलेली सचिन तेंडुलकर किंवा विशी आनंद किंवा रविशंकर वा भीमसेन अशी उदाहरणे बघितलीत तर हा मुद्दा पटतोच. अगदी लहानपणापासून जवळपास एककल्लीपणाने एकाच गोष्टीचा ध्यास घेऊन तुम्ही काम करत राहिलात तर उच्चतम यश मिळते.
याखेरीज माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसासाठीही गोष्टी निराशाजनक अजिबात नाहीत. आपले नित्याचे काम सांभाळून एखाद्या आवडीचा/छंदाचा केलेला सातत्यपूर्ण सराव आपल्याला वैयक्तिक आनंद, समाधान आणि ताणरहित आयुष्य देऊ शकतो हे निश्चित. यातला सातत्यपूर्ण हा शब्द मात्र लाख मोलाचा! :)
यातली सगळ्यात मोठी गोची अशी असते की आपण लहानांना सांगतो "ते अभ्यासाचे आधी बघा, मग मोठं झाल्यावर इतर छंद वगैरे जोपासता येतात!" परंतु खरी गोष्ट तशी नसते. लहानपणापासून जितक्या गोष्टी मुलांना करता येतील तेवढ्या करु द्याव्यात. मेंदूच्या विविध क्षमता जोखणे, जोपासणे, वाढवणे चक्क तसे तसे बदल मेंदूत होत जाणे हे सगळे वाढीच्या वयात भयंकर वेगाने घडत असते. मेंदूत तशी कनेक्षन्स होत असतात. पुढे काही कारणाने आवडी थोड्या मागे पडल्या तरी आपण ते विसरलेले नसतो. जेंव्हा कधी संधी मिळेल तेव्हा त्या आवडी उसळी मारुन वरती येतात आणि त्यावेळी मात्र आपण त्याला वारा घालून त्या फुलवत ठेवायला हव्यात. आयुष्य रसपूर्ण करण्यात या गोष्टींचा फार मोठा वाटा असतो. तेव्हा मुलांना वेगवेगळ्या गोष्टी करुन पाहूद्यात, थोडी रिस्क घेऊद्यात, आपणही ते करुयात आणि जगण्यात किती छान फरक पडतो ते अनुभवूयात! :)
(सुप्त प्रतिभावंत ;)) चतुरंग
16 Oct 2015 - 8:14 pm | विवेकपटाईत
मला वाटते, ज्या मनुष्याच्या मनात विचार तरंग उठतात, तो लिहू शकतो, बोलू शकतो. अंतर्जालावर तर मुक्या लोकांना हि वाचा फुटली.
16 Oct 2015 - 8:16 pm | प्यारे१
http://misalpav.com/node/26187
साधारण असाच काहीसा प्रश्न आम्हासही पडला होता. (जाहिरात)
16 Oct 2015 - 8:45 pm | वेल्लाभट
प्रतिभा ही एखाद्या अनामिक शक्तीसारखी आहे. पण उपासना केली म्हणून प्रसन्न होणा-यांपैकी नाही.
प्रतिभेचा संबंध केवळ कलेशी जोडता येत नाही. ती आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीत लागते.
प्रत्येक गोष्ट ही एक कला आहे. आणि जिथे कला आहे तिथे प्रतिभा असलीच पाहिजे. ती नसेल तर मग अर्थ नाही.
तुम्हाला कुठली कला अवगत असेल, आणि त्याला प्रतिभेची जोड कशी आणि किती मिळेल हे प्रत्येक व्यक्तीनुसार बदलणारं समीकरण आहे.
प्रतिभेचे स्त्रोत अगणित आहेत. मनापासून ते नभापर्यंत, संगीतापासून ते खेळापर्यंत. कुणाला कशातून काय सुचेल, कशाची प्रेरणा मिळेल, याचा नेम नाही. प्रतिभा प्रेमासारखी आहे, पण कुणा दोघांची सेम नाही.
प्रतिभा वाहत्या पाण्यासारखी आहे. पण तिला बांध घातला, की ती एकतर वाहून जाते, किंवा वाहवत नेते.
प्रतिभा अंधारातल्या सावलीसारखी आहे. ती तुम्हालाही दिसत नाही, पण संधीची तिरीप आला की ती तुमच्या बाजूला हजर असते.
पैशाने न खरेदी करता येणारी, सरावाने विकसित न होणारी, अनेकदा असूनही दुर्लक्षित राहणारी, समजावता न येणारी, कुठल्याही व्याख्येत न बसणारी प्रतिभा ही एक अनन्यसाधारण गोष्ट आहे.
ती आहे, तोवर आहे. ती नाही; म्हणजे नाही.
16 Oct 2015 - 8:52 pm | द-बाहुबली
प्रतिभा हा अॅटीट्युड असला तरी ति फुलायला पत्रिकेतला पावरफुल बुध हमखास मदत करतो.
16 Oct 2015 - 10:20 pm | चतुरंग
आजच ईसकाळ मध्ये आलेला हा लेख वाचला. प्रतिभा म्हणजे लहानपणापासून सातत्याने केलेल्या प्रयत्नांना आलेले यश असे पुन्हा एकदा सिद्ध झाले. केरळमधल्या एका मूकबधिर माणसाने, साजी थॉमस यांनी स्वतः दोन लोक बसू शकतील असे विमान बनवून उडवूनही दाखवले! ही पहा बातमी -
http://online4.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5042775605088082039&Se...!
16 Oct 2015 - 10:45 pm | अंतरा आनंद
प्रतिभा ही प्रयत्नसाध्य आहे आणि प्रतिभा हे देवाघरचे देणे आहे या दोन्ही गोष्टी अर्धसत्य आहेत असं मला वाटतं. एखादा चांगलं लिहू शकतो, गाउ शकतो, चित्र काढू शकतो. पण देवदत्त प्रतिभेला घासून पुसून लक्ख करत रहाणं हे त्या - त्या माणसावरच अवलंबून असतं. त्यासाठी आजूबाजूची प्रतिकूल वा अनुकूल परिस्थिती काहीशी सहाय्यभूत होते. अर्थात ती अनुकूलच असावी का प्रतिकूलच असावी याचेही काही नियम नाहीत.
मालिनी राजूरकराची एक मुलाखत फार वर्षांमागे वाचली होती त्यात त्यांनी आपल्याला गाणं चालू ठेवण्यासाठी पतीने प्रोत्साहन दिल्याचं म्हटलं होतं. पण हे प्रोत्साहन पंतोजींच्या वळणाचं होतं. पण त्यामुळे त्यांचं गाणं फुलतच गेलं. कधी कधी अश्या दडपणामुळे प्रतिभा कोमेजते असं म्हणतात. या निसर्गदत्त प्रतिभेचा मनापासून्चा आणि कोणालाही न जुमानणारा अभिमान असला तरच प्रतिभेला पैलू पडणं शक्य होत असेल. अर्थात हा पैलूदार हीरा जगाला दिसेलच असं नाही कारण ते परत त्या त्या कलाकाराच्या स्वभावावर अवलंबून आहे.
बाकी प्रयत्नांती प्रतिभा ही इल्युजन आहे. कारण फक्त चिकाटीने अवगत होणारी कला ही कला नाही तर कलाकारी असते. आताच्या बर्याचश्या कलाकारांत ही अशी कला दिसून येते. चि त्र्यं सारख्ं खानावळीत बसून, किंवा बहीणाबाईंसारखं कष्ट करत कला जोपासणं या कलाकारांमध्ये नाही दिसत. त्यामुळे "मला पहा, फुलं वहा" ह्याच प्रकारातली ती कला असते आणि अश्या कलाकाराच्या कलेला त्याला अपेक्षित असलेला प्रतिसाद नाही मिळाला तर ती आहे त्याच रुपात कायम रहाते. प्रतिसाद मिळाला, तर लोकानुनयाच्या चक्रात फिरत रहाते.
अर्थात, ही वरची दोन उदाहरणं घेतली म्हणजे कला कष्ट करतच जोपासली जाते असं नाही तर सर्व अनुकूल असतानाही कलावंताला स्वतःच्या कलेच्या उंचीचे योग्य भान आणि परिपूर्णतेची आच कलावंताला असेल तर त्याचा निव्वंळ भारवाहू कलाकार होत नाही. उदा. बालगंधर्वांच्या गाण्याच्या साच्यातून वहावा होत असताना ही स्वतःला बाहेर काढणारे कुमारजी.
तात्पर्यः आपल्याला परस्पर विरोधी अनेक उदाहरण देता येतील म्हणजेच चर्चाविषय मस्त आहे मुख्य म्हणजे जगाच्या अंतापर्यंत न संपणारा आहे.
16 Oct 2015 - 10:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
इ.स. १८५७ मधे काय लिहिलं तो धागा वर कसं काय आला :)
-दिलीप बिरुटे
17 Oct 2015 - 7:38 am | सुधीर कांदळकर
विविध क्षेत्रातील बंधूंच्या कामगिरीतील तफावतीवरून हे दिसून येते.
जिद्द आणि जास्त सराव असूनही स्टीव्ह वॉ ला मार्क वॉ ची फलंदाजीतली उंची गाठता आली नाही.
वसंत शिरवाडकरांना कुसुमाग्रजांची उंची गाठता आली नाही.
ट्रेव्हर चॅपेलला त्याच्या दोन्ही बंधूंची खेळातली उंची गाठता आली नाही कारण मेहनतीत नव्हे तर प्रतिभेत ट्रेव्हर कमी पडला. राहुल आणि अशोक मांकडबद्दलही तसेच म्हणता येईल.
सुधीर मोघेंची प्रतिभा श्रीकांतजवळ नाही असे श्रीकांत मोघे यांनी हल्लीच बंधूंच्या मृत्यूनंतर मुलाखतीत सांगितले होते.
कवीवर्य बा भ बोरकरांना कवींचे कवी म्हणतात ते त्यांच्या असामान्य प्रतिभेची उंची पाहूनच.
प्रतिभावंतांच्या कलेचा आस्वाद घ्यायला देखील प्रतिभवंतांच्या कुबड्या माझ्यासारख्या सर्वसामान्यांना घ्याव्या लागतात. स्थापत्यातील सौंदर्याचा आस्वाद काय आहे हे आचवलांचे किमया वाचल्यावरच कळते. बोरकरांच्या कवितेतली औंदर्यस्थळे जाणकारांनी दाखवल्यावरच कळतात. शास्त्रीय संगीतातली ध्वनिमुद्रित मैफिल पुन्हा पुन्हा ऐकतांना दर वेळी सौंदर्यस्थळांचे नवे पैलू दिसतात.
लढा द्यायचे सर्व मार्ग खुंटल्यानंतर गांधींनी सत्याग्रह हा नवा मार्ग शोधून काढला. तो बरोबर की चूक हा प्रश्न वेगळा. पण हा मार्ग नवनूतन आणि अस्सल - नॉव्हेल अँड ओरिजिनल होता आणि इतर कोणालाही सुचला नाही हे मान्य करावेच लागते.
प्रतिभेचे शास्त्रीय मापन करण्याचे देखील प्रयत्न झालेले आहेत. निव्वळ कल्पनांची संख्या हा एकच मापदंड त्यासाठी मानला गेला नाही. नॉव्हेल अँड ओरिजिनल असणे हाही मापदड ठेवला गेला. तरी प्रतिभा म्हणजे या सर्व मापदंडापलीकडे काहीतरी आहे असेच अनेक प्रयोगकर्त्यांचे मत पडले.
एक अशास्त्रज्ञ बहुधा रॉबर्ट स्पेरी मेंदूवर प्रयोग करतांना हस्तस्पर्शातून संस्र्ग होऊन कुरू होऊन ख्रिस्तवासी झाला.
या संदर्भांतली माझ्याकडची कात्रणे स्कॅन करून ठेवण्याआधीच घरे बदलतांना (म्हणजे घरातले सामान दुसर्या घरात हलवतांना) कुठेतरी गहाळ झाली. पण गूगलवर किंवा गूगल स्कॉलरवर काहीतरी सापडेल.
कार्बुझिए, व्हिन्सी, व्हॅन गॉ, बोरकर यांची बरोबरी करणारे अद्याप निर्माण झाले नाहीत. शिस्तीत होणारे पारंपारिक शिक्षण प्रतिभावंतांच्या निर्मितीप्रक्रियेला बाधा आणते असा देखील एक मतप्रवाह आहे. शिक्षण अर्ध्यावर सोडलेल्या अनेक शास्त्रज्ञांची उदाहरणे त्यासाठी दिली जातात. पठडीतल्या अभ्यासक्रमातली गृहीते, गृहीतके ग्रह, आकस इ. त्यासाठी कारणीभूत असावेत. विश्व हे पृथ्वीकेंद्री आहे हा ग्रह बाजूला ठेवल्यावरच विश्वाच्या रचनेच्या संकल्पनेच्या अद्यापही न उकललेल्या गूढाच्या थोडेफार जवळपास जाता आले.
17 Oct 2015 - 5:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वेळ मीळाला की काथयाकुट पुढे चर्चेला नेतो.
प्रा.डॉ.
(परिक्षेच्या कामात व्यस्त)
17 Oct 2015 - 8:00 am | dadadarekar
https://m.youtube.com/watch?v=JkcpLl0sz7Y
कला व विद्या
17 Oct 2015 - 10:54 pm | बाजीगर
प्रतिभा = जर्म (कल्पनेचे बीज) x चिकाटीने फुलवणे x त्या संकल्पनेभर अपार कष्ट (त्या कलेत महारथ) x त्या संकल्पनेची अग्नीपरीक्षा पास झाल्यावर दृढविश्वास (सर्व जग विरोधी झालंतरी (उदा.कोपर्नीकस))
यातील एक जरी शून्य झालं तर कींमत शून्य !
18 Oct 2015 - 6:51 am | dadadarekar
.
18 Oct 2015 - 8:17 pm | बिहाग
याचा बरोबर उलटे मत सुनिता देशपांडे यांनी आहे मनोहर तरी मध्ये व्यक्त केले आहे. त्यांचा मताप्रमाणे माणूस प्रतिभा घेऊन येतो आणि तो ती नैसर्गिकपणे आणी सहजपणे व्यक्त करत असतो. पण त्याच वेळेला समोरच्या माणसांना असे वाटते कि हे काहीतरी असामान्यपणे करत आहेत.
18 Oct 2015 - 9:30 pm | चित्रगुप्त
'चित्रानुभूतीत जगण्याची धुंदी' या माझ्या लेखात मी एक अनुभव मांडला होता, तो या धाग्याच्या विषयाशी संबंधित असल्याने पुन्हा उधृत करतोयः
"... काही दिवसांपूर्वी आगगाडीच्या प्रवासात सकाळी खिडकीशी येऊन बसलो आणि आळसवटलेल्या नजरेनं बाहेर बघू लागलो, आणि काय आश्चर्य, खिडकीबाहेरच्या झरझर बदलत जाणाऱ्या प्रत्येक दृष्य-चौकटीतून मला संपूर्ण रंगवलेलं एक एक चित्र दिसू लागलं. अगदी एक एक ब्रशस्ट्रोक, चित्र-घटकांची रचना, ब्रशच्या फटकाऱ्यांतली लयबद्धता … अगदी सगळं सगळं समोर साकार होत होतं …. मी चक्रावलोच, आपल्याला आज हे असं काय होतंय, हेच कळेना, ही अनुभूती इतकी अस्सल आणि उत्कट होती, की अंगावर रोमांच आणि डोळ्यात अश्रू येत होते… गंमत म्हणजे ही ‘चित्रानुभूती‘ चांगली दोन-तीन तास टिकून राहिली आणि मग मात्र नेहमीच्या व्यावहारिक, नीरस विश्वात माझी ‘घरवापसी’ झाली.
... मग मला आठवलं, अरे, चाळीस - पंचेचाळीस वर्षांपूर्वी तर आपण अहोरात्र अश्याच चित्रानुभूतीत जगत होतो … पहाटे पहाटे रंगसाहित्य घेऊन सायकल पिटाळत शहराबाहेर पडायचो, आणि जिथे जिथे ही ‘चित्रानुभूती’ जास्त प्रकर्षानं जाणवेल, तिथे तिथे थांबून चित्र रंगवायचो. स्केचबुक तर सततच जवळ असायचं, आणि दिवसभरात कितीतरी चित्रं त्यात रेखाटत असायचो.
पुढे इंदूर सोडून दिल्लीला आल्यावर सुद्धा सुरुवातीची काही वर्षं हे चित्रानुभूतीत जगणं चालू राहिलं. मग मात्र हळुहळू नोकरी- लग्न- कुटुंबकबिला वगैरे भानगडीत गुंतल्यावर ही चित्रानुभूतीत जगण्याची धुंदी केंव्हा आणि कशी ओसरत गेली, हे कळलंही नाही... "
----------------------------------------------------------------------
मला स्वतःला लेखन आणि चित्रे काढताना एक धुन असते, तोपर्यंत झरझर सुचत जाते, आणि ती धुन ओसरली, की अजिबात काही करता येत नाही, एवढेच नव्हे तर नुक्तेच सुचलेले जर लिहून ठेवलेले नसले, तर पुन्हा ते आठवत सुद्धा नाही. याच कारणाने मिपासाठी अर्धवट लिहून ठेवलेले बरेच लेख माझ्याकडे साठून आहेत, पण ते 'ठरवून' पूर्ण करणे मला जमत नाही.
मी संग्रहालयातील थोर चित्रकारांची चित्रे बघतो, तेंव्हा मला स्वानुभवातून कळते की कोणकोणती चित्रे (कधीकधी चित्रातील काही भाग) मेहनतीने, कमावलेल्या कसबाने रंगवली आहेत, आणि कोणती सहज सुचून गेलेली, त्या धुन मधे रंगवलेली-रेखाटलेली आहेत.
--------------------------------------------------
कदाचित प्रतिभा म्हणजे काय, हेही कधितरी सुचेल आणि काहीतरी लिहीता येईल. तोपर्यंत नेति नेति.
18 Oct 2015 - 10:14 pm | चित्रगुप्त
मेहनतीने रंगवलेले चित्रः (चित्रकारः फ्रेडरिक चर्च)
प्रतिभेच्या झटक्यात रंगवलेले चित्रः (चित्रकारः क्लोद मोने)
अर्थात वरील दोन्ही चित्रकार प्रतिभा संपन्न आणि मेहनतीने, दीर्घ प्रयत्नाने कसब कमावलेले होतेच.
चित्रकलेचे शिक्षण न घेता अगदी वृद्धपणी चित्रे काढू लागलेल्या 'ग्रँड मा मोझेस'या अमेरिकन शेतकरी स्त्रीने रंगवलेले चित्रः
19 Oct 2015 - 2:17 pm | बॅटमॅन
अरे वा!! मोनेगुर्जी तर वॉकिंग टॉकिंग ग्रेटच, पण मोझेस आज्जींचे चित्रही मस्तच आहे!
18 Oct 2015 - 10:43 pm | दत्ता जोशी
सुंदर लेखन आणि विचार प्रक्रियेला उद्युक्त करणारा विषय.
19 Oct 2015 - 3:29 am | तर्राट जोकर
छान धागा... व प्रतिसाद. चित्रगुप्त यांचे विश्लेषण आवडले.
माझे दोन पैसे.
प्रतिभा आटत नाही. हरवते. वर म्हटल्याप्रमाणे इतर भावना वरचढ होतात तेव्हा प्रतिभा हरवते. परफॉर्मन्सचं प्रेशर, डेडलाइनचं प्रेशर, लोकांच्या अपेक्षांचे प्रेशर. वैयक्तिक राग-लोभ-अहंकाराचं प्रेशर अशी अनेक कारणं वरचढ झाली की प्रतिभेला जे पाण्यासारखं पारदर्शक मन लागतं ते मिळत नाही. कलाकृती एक काम होतं, कामात मजा येत नाही. जे कलासाधनेत पूर्ण रममाण होतात, ध्यानस्थ होतात, तयांची प्रतिभा आटत नाही, हरवत नाही.
काही लोक सतत उच्च दर्जा कायम राखतात. त्यांनी एक्स्पोजर लिमिटेड ठेवलेलं असतं. जे अतिशय चांगलं झालंय तेच पुढे मांडलं. जगात कोणीही सदासर्वदा चांगलंच काम करू शकत नाही. खरा कलाकार सतत नाविण्याच्या ध्यासाने पिसाटलेला असतो. झालेली कलाकृती चांगली की वाईट हे रसिकांच्या मान्यतेवर ठरते. कलाकाराच्या मान्यतेवर नाही. असंख्य कलाकृतींतून काही चांगल्या लक्षात राहतात. त्या चांगल्यांच्या अस्तित्वात येण्यासाठी त्या असंख्य वाईट कलाकृतीही मदत करत असतात. केवळ उत्त्मच काम करेन असे म्हणून कोणी कलाकार आयुष्यात काहीच साध्य करू शकणार नाही.
19 Oct 2015 - 3:35 am | तर्राट जोकर
हा प्रतिसाद चूकून इथे पडला. प्यारेंच्या धाग्यावर जायचा होता.
इथे फक्त वरची एक ओळ ठेवावी अशी संपादकांस विनंती. व हा विनंती-प्रतिसाद उडवावा.
(आज आम्ही शुद्धीत आहोत म्हणुन ही चूक झाली, एक डाव मापी करा संपादकमायबाप, पुन्यांदा त्रास नै देनार..)
19 Oct 2015 - 2:46 pm | पथिक
छान लिहिलेय!
22 Oct 2015 - 3:22 pm | माजगावकर
छान लेख आणि तसेच काही उद्बोधक प्रतिसाद!