मिरची लागवड

Primary tabs

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in कृषी
12 May 2017 - 1:05 pm

आपल्याकडे एक म्हण आहे,"मीठ-मिरचीला महाग नाही" किंवा "माझी मीठ-मिरची मी कशीही कमवीन."

मीठा नंतर आपल्या घरात "मिरची"ला स्थान आहे, हे त्रिकालाबाधित सत्य.

परंतू, मी जेंव्हा शेती हाच व्यवसाय म्हणून स्वीकाराचे ठरवले त्यावेळी "मिरची" डोळ्यासमोर न्हवती.

जालावर जास्त आत-बट्ट्याची न ठरणारी पिके कोणती? ह्याचा अंदाज घेत असतांना "मिरची" ह्या पिकाविषयी माहिती मिळाली.

जमीन : मिरचीला कुठलीही जमीन चालते.दगड आणि वीट, सोडून मिरची कुठेही येते.

पाणी : मिरचीला सुरुवातीला, म्हणजे रोपे तयार करतांना रोज संध्याकाळी पाणी द्यावे लागते. रोपे लागवडी नंतर रोज संध्याकाळी पाणी द्यावे लागते.

मिरचीला फुले आल्या नंतर पाण्याचे प्रमाण मुद्दाम कमी केले. सुरुवातीला २ दिवसा आड, मग ३ दिवसा आड. असे करता करता, ७ दिवसा आड एकदा पाणी देण्याचा प्रयोग केला. सर्वात शेवटी २१ दिवसांनी पाणी दिले. तोपर्यंत मिरचीचे रोप तग धरून होते.

खते आणि किटकनाशके : मिरचीलाच कशाला पण कुठल्याही पिकाला "खतांची किंवा किटकनाशकाची" आवश्यकता नाही, असे वाचनात आले होते. त्यामुळे मी पण "नैसर्गिक रित्या मिरची लागवड" हेच धोरण ठेवले होते. जीवामृत आधारीत मिरची लागवड केल्याने खतांचा आणि किटकनाशकांचा खर्च वाचला.

तोडणी : मी आणि माझ्या बायकोने मिळून तोडणी केली. अजिबात कठीण काम नाही.

बाजार : मिरची ३-४ प्रकारे विकता येते. हिरवी मिरची, सुकी मिरची, तिखट करून आणि लोणचे करून.

मिरची अजिबात नाशवंत नाही. बाजारभाव पडले तरी, एक वर्षभर घरात ठेवता येते.(अपवाद, हिरवी मिरची)

घरी रोपे तयार कराची पद्धत :

तुम्हाला जमेल तसे वाफे मेच्या अखेर पर्यंत करून घ्या. त्यात "जीवामृत" किंवा "अमृत-पाणी" टाका.

(जीवामृत आणि अमृतपाणी कसे तयार करावे? ह्या विषयी पण एक धागा तयार होवू शकतो. किंबहूना तो पण धागा आज टाकीन.कारण, "घरात बनू शकणारी, नैसर्गिक खते आणि किटकनाशके", हा खरोखरच एका धाग्याचा विषय आहे.)

पहिला पाऊस पडे पर्यंत त्या वाफ्यात फक्त "जीवामृताची" फवारणी करा.

पहिला पाऊस पडून गेला, की काही दिवस उघडीप मिळते.ती मिळाली की, त्याच संध्याकाळी त्यात मिरचीच्या बिया पेरा. नुसत्या टाकल्यात तरी चालेल आणि त्यावर थोडी माती टाका.साधारण पणे ३ बाय ३ फुटाच्या एका वाफ्यात ३०० बिया रुजतात किंवा ३०० रोपे तयार होवू शकतात.

दुसरा पाऊस सुरु होई पर्यंत, जेमतेम जमील भिजेल इतपत रोज संध्याकाळी पाणी द्या. आठवड्यातून एकदा जीवामृत द्या.

साधारण पणे १५ दिवसात बिया रुजतात.

बिया रुजायला सुरुवात झाली की, आठवड्यातून एकदा अमृत-पाणी द्या.

जून-जुलै-ऑगस्ट पर्यंत रोपे तयार होतात.

सप्टेंबर पासून रोपांची लागवड सुरु करायला हरकत नाही.

रोपे लागवड पद्धत :

एका खणतीने, २ फुटांवर खड्डे खणा. मी दिवसाला १०० असे खड्डे सहज खणू शकतो. हे काम साधारण पण जुलैच्या पहिल्या तारखेपासून पासून सुरु करावे. ऑगस्ट अखेर पर्यंत तुम्ही निदान ५,००० खड्डे खणू शकता.मी जर करू शकतो, तर तुम्ही पण नक्कीच करू शकता.

सप्टेंबर पासून रोपांच्या लागवडीला सुरुवात करा.शक्यतो मोठी रोपे निवडा.सुरुवातीला १००-२००च रोपे घ्या. ती रुजली की मग इतर रोपे लागवडीला घ्या.

शक्यतो दुपारी ३-४ वाजता रोपे लावायला घ्या. ५ वाजे पर्यंत जितकी रोपे लावू शकाल तितकीच लावा आणि ५ ते ६ वाजेपर्यंत रोपांना जीवामृताची फवारणी करा, अर्थात झारीने. एका तासात १०० रोपांना आरामात पाणी देवून होते. मी २ तासात ३०० रोपांना पाणी देत होतो आणि ते पण झारीने. (मला जर जमू शकते तर तुम्हाला पण नक्कीच जमेल....)

दुसर्‍या दिवशी पण असेच करा. ७-८ दिवसात रोपे रुजतात.

ती रुजली की आता आपल्या वाफ्यातील रोपे लागवडीला घ्या.झेपेल इतकेच काम केलेत तरी, १०-१५ दिवसात ५००० रोपे नक्कीच लावू शकाल.

एका गुंठ्यात साधारण पणे ४०० ते ४५० रोपे सहज लावता येतात आणि तुम्ही ही लागवड एका दिवसात सहज करू शकता, सकाळी २०० आणि दुपारी २०० रोपे आरामात लावू शकता.

रोपे जगवता-जगवता लागवड करणे अगदी उत्तम.नाहीतर सगळाच सावळा गोंधळ.कष्टात आणि वेळेत कमी पडत असाल तर. जितके जमत असेल तितकेच काम करा."शरीरं आद्यं."

जीवामृताच्या बरोबर अधून-मधून अमृतपाण्याची फवारणी करा.

डिसेंबर-जानेवारी पासून फुले येतात आणि फेब्रुवारी पासून मिरच्या येतात.

मी, रोपे विकत आणून "मिरची" लागवडीचा यशस्वी प्रयोग पण केला. (किती किलो मिरची मिळाली? ही मोजमापाची पट्टी न ठेवता, पहिलाच प्रयोग आहे, एक मिरची जरी मिळाली तरी पण प्रयोग यशस्वी झाला, हेच धोरण होते. २ किलो मिरची मिळाली.)

ह्या वर्षा पासून घरी रोपे तयार करून शेतात रुजवणार.

डिस्क्लेमर : लेख फार घाईत लिहिला असल्याने, काही माहिती देणे राहून गेले असणार. त्यामुळे प्रतिसादात ती चूक दुरुस्त करण्यात येईल.

प्रतिक्रिया

मोदक's picture

12 May 2017 - 1:10 pm | मोदक

अभिनंदन हो मुवि..

ह्या वर्षा पासून घरी रोपे तयार करून शेतात रुजवणार.

या संदर्भात धागा नक्की टाका आणि आवश्यक वाटतील तसे फोटो काढून ठेवा.

मुक्त विहारि's picture

12 May 2017 - 1:20 pm | मुक्त विहारि

आमची फोटोग्राफी फार दिव्य आहे.त्यामुळे मी स्वतः कधीच फोटो काढत नाही.मला फोटोग्राफी शिकवायला येणारा शिक्षक अजून जन्माला तरी यायचाय किंवा मला तरी भेटायचाय.असो, माझे फोटोग्राफीचे ज्ञान फारच प्रगाढ असल्याने, इथेच थांबतो.

पण....

माझ्या शेताचे फोटो आणि रोपांचे फोटो "अभिजित अवलिया"ने काढले आहेत.

खेडूत's picture

12 May 2017 - 1:18 pm | खेडूत

शेतीचा प्रयोग आवडला.
खड्डे किती बाय किती इंचाचे अन किती खोल? आणि अमृत् पाणी वगैरे काय ते सांगावे.
एकदोन फोटु असतील तर सुरेख पाकृ प्रमाणे एक शेतीकृती होईल!
पुढील वर्षासाठी भरपूर शुभेच्छा!

खड्डे साधारण पणे ६-७ इंच खोल खणले तरी चालतात.

दीड-दोन इंच व्यास असलेली खणती असली तरी चालते.

मिरचीच्या रोपंची मुळे नंतर स्वतःच जमीन भुसभुशीत करतात.

ह्या वर्षी शेतात चर खणून पाणी दिले, त्यामुळे पाण्याच्या अपव्यय खूप झाला आणि श्रम पण भरपूर लागले.आमच्या एका मैत्रिणीने मात्र चर न खणता, खणतीने रोपांची लागवड केली.

रोपे लावल्यानंतर रोपांच्या मुळाशी थोडी माती टाकल्यास फार उत्तम. (जसे आंब्याच्या झाडाला पार असतो, तसे करून)

एस's picture

12 May 2017 - 1:21 pm | एस

वा! Facta non verba ऊर्फ क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे हे दाखवून देत आहात. खूप खूप शुभेच्छा. जमल्यास एक चक्कर नक्कीच टाकेन कोकणात आलो तर.

वेलकम.

तुम्ही आलात तर फारच उत्तम.

शेतीचे सगळे फोटोसेशन तुम्हीच करा. फी म्हणून जेवण-खाण आणि रहाणे आमच्याकडे.

मार्कस ऑरेलियस's picture

12 May 2017 - 1:34 pm | मार्कस ऑरेलियस

भारीच हो मुवी !

तुम्ही खरेच एक साधा चमेरा ट्रायपॉड ला लाऊन ह्या प्रोसेस चे व्हिडीओ काडत रहा. एकदम प्रिमिटीव्ह टेक्नोलोजी प्रमाणे तुमचाही चॅनेल हिट होइल !!

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 May 2017 - 1:46 pm | डॉ सुहास म्हात्रे

बर्‍याच दिवसांनी नवशेतकरी मुविंचे आगमन झाले ! मिरची प्रयोग भारी झाला !! कसेही काढलेले फोटो टाकाहो तुम्ही. जरा जास्त मजा येईल तुमचे अनुभव वाचायला.

पुढच्या अनुभवांच्या प्रतिक्षेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 May 2017 - 1:55 pm | डॉ सुहास म्हात्रे

या आमच्या किचन गार्डनमधील पॉटमध्ये वाढवलेल्या झाडाला लागलेल्या मिरच्या...

अनुप ढेरे's picture

12 May 2017 - 1:47 pm | अनुप ढेरे

हेच जर नेहेमिची खतं घालुन केलं असतं तर किती मिरची मिळाली असती?

मुक्त विहारि's picture

12 May 2017 - 3:07 pm | मुक्त विहारि

.....खतं घालुन केलं असतं तर किती मिरची मिळाली असती?

तितकीच पण जास्त नाही.

माझ्या बाजूच्याच शेतकर्‍याने आणि मी एकत्रच रोपे आणली.

पण त्याच्या आणि माझ्या रोपांची वाढ जवळ-पास सारखीच होती आणि उत्पन्न पण सारखेच होते.

तो रोज पाणी घालत होता तर मी पुढे-पुढे आठवड्यातून एकदा.

माझी जमीन वर्षानुवर्षे खते आणि कीटकनाशके खात असल्याने ह्या वर्षी तरी फार काही फरक पडला नाही.

नैसर्गिक शेतीचे परीणाम दिसायला कमाल ५ वर्षे लागतात.

फलदायक शेती नक्की कोणती? नैसर्गिक की रासायनिक हा पण एक धाग्याचा विषय होवू शकतो.

जमल्यास पुढे मागे ह्या ज्वलंत विषयावर पण स्वानुभवावर एखादा धागा काढीन.

निमिष ध.'s picture

12 May 2017 - 7:02 pm | निमिष ध.

अतिशय उल्लेखनिय प्रयोग आहे मुवि. जरा सविस्तर लेख लिहा आता. बाकी काय लावले आहे ते पण लिहा.

Ranapratap's picture

12 May 2017 - 7:30 pm | Ranapratap

मु वि तुमचे शेतीतील प्रयोग हे वृत्त पात्रातून, शेती विषयक मासिकातून प्रसिद्ध व्हायला हवेत. नवीन शेतकरी तसेच तरुण याना मोठे मार्गदर्शन होईल. आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे.

पिलीयन रायडर's picture

12 May 2017 - 8:10 pm | पिलीयन रायडर

हे फार भारी काम करताय मुवि! तुमच्या लेखांना "शेती" असा टॅग देता येईल का? नवीन विभाग होईल न होईल, टॅगचा फायदा होऊ शकेल.

बादवे, मिरचीला कोंबडखत चांगले मानवते असा अनुभव आहे.

Sonu Sabnis's picture

13 May 2017 - 10:47 am | Sonu Sabnis

Chan lekh. Please Photos post kara

Sonu Sabnis's picture

13 May 2017 - 10:47 am | Sonu Sabnis

Chan lekh. Please Photos post kara

इरसाल कार्टं's picture

13 May 2017 - 11:00 am | इरसाल कार्टं

माझ्या मनात काही प्रश आहेत...
१) तुम्ही कुठे राहता? म्हणजे शेती कोणत्या प्रदेशात करता?(यावरून मला हवामान आणि पावसाचा अंदाज येईल)
२) तुम्ही मिरची कोणत्या प्रकारच्या जमिनीत लावलीत? शेतात कि माळावर?
३) जर तुम्ही (माझ्याप्रमाणेच)कोकणात राहत असाल तर हवामान सारखेच आहे म्हणायला हरकत नाही.

माम्लेदारचा पन्खा's picture

13 May 2017 - 5:33 pm | माम्लेदारचा पन्खा

अभिनंदन मुवि . . . . अखेर अमिताभच्या पंक्तीत जाऊन बसलात तुम्ही !

पैसा's picture

14 May 2017 - 9:17 am | पैसा

आधी केले, मग सांगितले. तुम्हाला या प्रयोगात आनंद मिळतोय हे महत्त्वाचे.

केडी's picture

15 May 2017 - 10:37 am | केडी

माझा सारख्या बालकोनीत प्रयोग करणारयांसाठी तर हि माहिती फारच उपयोगी आहे... त्या अमृत पाण्या विषयी नक्की लिहा....आजच सकाळी मेथी पेरून आलोय, बाकी लिंबू आताच लावलाय आणि एका कुंडीत मिरचीचे झाड आहे, त्याला बर्यापॆकी मिरच्या येतात, आणि यंदा भरपूर रोपे आलेली आहेत, ती आता नवीन कुंडीत लावेन...

तुम्ही खरंच असे लिहीत राहून मार्गदर्शन करत राहा...एक विनंती! _/\_