मिपा संपादकीय - मातृभाषेतून शिक्षणाची परवड!

संपादक's picture
संपादक in विशेष
6 Oct 2008 - 1:56 am
संपादकीय

मिपा व्यवस्थापन 'मिपा संपादकीय' हे सदर लोकमान्य टिळक यांच्या पवित्र स्मृतीस समर्पित करत आहे. यापूर्वीचे संपादकीय लेखन येथे वाचायला मिळेल! धन्यवाद...

मातृभाषेतून शिक्षणाची परवड!

मनुष्य हा अनुकरणशील प्राणी असल्यामुळे,लहान मूल त्याच्या सान्निध्यात असणार्‍या आईवडिल,आजी-आजोबा,प्रसंगी नोकरचाकर यांच्या ओठांच्या हालचालींवरुन, तसेच उच्चार करण्याचा प्रयत्न करीत असते.अधिक सरावाने ते त्याच्या अभिव्यक्तीचे साधन बनते,अर्थातच ती त्याची मातृभाषा ठरते.त्याच्या सर्वांत निकट व्यक्तीची ,बहुतांशी आईची भाषा ,ती त्याची भाषा म्हणजेच मातृभाषा!वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत त्याने त्या भाषेतील बोलण्याचे संपादनकौशल्य बर्‍यापैकी आत्मसात केलेले असते.त्यानंतर इतर अनेक कौशल्ये संपादन करण्यासाठी त्याला शाळेची वाट धरावी लागते.महाराष्ट्रात साधारणतः दोन ते तीन दशकांपूर्वी शाळेत प्रवेश घेतेवेळी,फारसा प्रश्न येत नसे.आईवडिलांचे बोट धरुन ते सांगतील त्या मराठी माध्यमाच्या शाळांत सर्वसामान्य मुले प्रवेश घेवून आपल्या शालेय जीवनाला प्रारंभ करीत असत.

आजच्या काळात शाळाप्रवेश व शिक्षणाचे माध्यम ही एक गहन सामाजिक समस्या होऊन बसली आहे.ह्या समस्येमागे पालकांची बदलती मानसिकता हेच मुख्य कारण असावे.जागतिकीकरणाच्या रेट्यात आपले मूल इंग्रजीशिवाय मागे पडेल की काय ह्या भीतीने धास्तावलेला पालकवर्ग स्वतःच संभ्रमित अवस्थेत आहे आणि म्हणूनच खिशाला परवडत नसतानाही महागडे शुल्क आणि भरमसाठ देणग्या देऊन तो आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश करवितो. ह्यामागे कित्येक वेळा विचार न करता एकापाठोपाठ एक विहीरीत उड्या मारणार्‍या बोकडांसारखीच त्याची गोंधळलेली मनोवृत्तीच दिसून येते.त्यानंतर आपल्या पाल्याच्या भविष्यात उद्भवणार्‍या समस्यांचा काही वेळा अज्ञानेने तर काही वेळा जाणूनबुजून पालकवर्ग विचार करीत नाही असे दिसून येते.

वास्तविक पाहता ,जगातील सर्व शिक्षणतज्ज्ञांच्या संशोधनांतीमते मूलाचे प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच होणे आवश्यक आहे कारण मातृभाषेतून विषयाच्या मूलसंकल्पना{Basic Concepts} जितक्या लवकर स्पष्ट होतात, जितक्या दृढपणे मुलाच्या मनावर ठसतात ,तितक्या त्या परभाषेतून कधीच होत नाहीत.असे सिद्ध झालेले असतानाही आपल्याकडे मात्र ह्याच्या उलटच चित्र आज दिसून येत आहे.प्राथमिक शिक्षणाची सुरुवातच जर इंग्रजीसारख्या परक्या भाषेतून झाली तर त्या मुलाच्या डोक्यात शिक्षणाचा गोंधळच माजतो कारण घरीदारी बोलली जाणारी एक भाषा आणि शाळेत बोलली जाणारी,शिक्षणाचे माध्यम असणारी दुसरी भाषा ह्या दोहोंचा मेळ योग्य रितीने घालणे त्याच्या छोट्याशा,निरागस मनाला फारच अवघड जाते.उदा.गणितातील २ ह्या अंकाची संकल्पना तो लगेच आत्मसात करेल पण two,to,too यातील फरक समजावून घेऊन त्यांचा योग्य वापर करणे त्याला फारच अवघड जाईल.त्यातून आपल्याकडील इंग्रजी माध्यमाच्या शाळांतील शिकविणारे शिक्षक हे बहुसंख्येने दाक्षिणात्य असल्यामुळे ते मराठी विद्यार्थ्यांशी फारसा संवाद साधू शकत नाहीत आणि साधलाच तर तो आपल्या राष्ट्रभाषेतून! म्हणजे मूलाच्या डोक्यावर आणखी एक भाषा शि़कण्याचे ओझे! त्या लहानग्या जीवाने ओझी वहायची तरी किती आणि कशासाठी? त्यातही दाक्षिणात्य शिक्षकांचे 'यल्','यम्'सारखे भयानक उच्चार त्याच्या कोवळ्या मनावर तसाच ठसा उमटवितात ते वेगेळेच.काही कॉन्व्हेंट स्कूल्स सोडली तर महाराष्ट्रात सर्वत्र हेच चित्र आहे.परिणामी त्या मुलाची ' एक ना धड भाराभर चिंध्या' अशी अवस्था होते.तो विद्यार्थी कोणत्याच भाषेत प्रावीण्य संपादन करु शकत नाही .वयाच्या दहा ते बाराव्या वर्षापासून त्याने परभाषा शिकणे योग्य कारण तोपर्यंत त्याचे मन स्वकोषातून बाहेर पडून चौकसपणे दुसरे नवीन काहीही शिकण्यास उत्सुक व तयार असते.

मराठी माध्यमात शिकलेले विद्यार्थी जेव्हा कॉलेजजीवनात प्रवेश करतात तेव्हा आपल्या पाल्याला ह्यापुढील शिक्षण इंग्रजीत असल्यामुळे झेपेल की नाही अशी पालकांच्या मनात धास्ती असते आणि अशा विद्यार्थ्यांच्या मनात न्यूनगंड निर्माण होण्याची शक्यता असते.परिणामी, तरुणवयात ते अनेक भाषांची सरमिसळ करुन बोलू लागतात.वास्तविक पाहता,ह्या समस्येला शि़क्षणमाध्यम हे कारण नसून सामाजिक परिस्थितीच कारणीभूत असते.कित्येकवेळा विद्यार्थ्यांच्या आसपास वावरणारी मंडळीदेखील हा न्यूनगंड वाढविण्यास मदत करतात.योग्य समुपदेशनाने ह्या समस्येचे सहज निराकरण होऊ शकते.

परदेशातील अनुभव लक्षात घेतले तर असे आढळते की चीन,जपान,जर्मनी इ. तांत्रिकप्रगत राष्ट्रातही मुले मातृभाषेतूनच शिकतात.त्यानंतर उच्च शिक्षणही घेतात.मातृभाषेतून शिक्षण घेऊनही ती जगात कोठेही मागे पडली आहेत असे दिसून येत नाही.याचाच दुसरा अर्थ असा की स्वातंत्र्य मिळून ६१वर्षें उलटून गेली तरी आपल्यावरची इंग्रजांची मानसिक गुलामगिरी अजून सुरुच आहे.महाराष्ट्र सरकारने सर्वांना प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मातृभाषेतून घेणे मोफत केले आहे परंतु सुशिक्षित व अशिक्षितही अशा जवळजवळ ७० टक्के लोकांनी त्याकडे पाठ फिरविली आहे.पाल्याकडून अवाजवी ,अवास्तव अपेक्षा आणि त्या पुर्‍या न झाल्यास येणारे मानसिक नैराश्य,येन केन प्रकारेण मुलाच्या उज्ज्वल यशप्राप्तीसाठी वाढलेले कोचिंग क्लासेसचे प्रस्थ हे सर्व दुष्टचक्र विद्यार्थी आणि पालकांच्या मागे लागते.त्यातून सुटण्यासाठी पालकांनी ह्या सर्वांचा विचार करणे अगत्याचे आहे.परदेशात वास्तव्य, प्रांतीय बदल्यांची नोकरी इ. कारणांमुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळांतून पाल्यांचे शिक्षण ही काही वेळा अपरिहार्यता ठरते हे खरे परंतु त्यांचे प्रमाण तुलनेने पाहता अत्यल्पच आहे.

वरील सर्व गोष्टींवर विद्यार्थीकेंद्रप्रमुख {student centred} मानणार्‍या शिक्षणतज्ज्ञांनी काही उपाय योजणे आवश्यक आहे.आपल्या सरकारने तर जाणूनबुजून ह्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे किंबहुना सर्वांगीण निकषांभावी सर्रास मान्यता दिल्यामुळे विनाअनुदानित इंग्रजी माध्यमांच्या शाळा दरवर्षी भूछत्रासारख्या उगवत आहेत.मराठी भाषेतून शिक्षण घेणे म्हणजे हल्ली कमीपणाचे मानल जात आहे.अशा विद्यार्थ्यांकडे काहीशा उपहासाने बघितले जाते,जसा काही तो दोषी आणि त्याचे पालकही दोषी!

परिणामी सर्व ओघ इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे वळल्यामुळे उत्तमोत्तम,नामवंत मराठी शाळांतील कित्येक वर्ग विद्यार्थ्यांभावी बंद पडले आहेत.जुन्या चांगल्या शाळा सरकारकडून वेतनेतर अनुदान वर्षानुवर्षे न मिळाल्याने कशाबशा तग धरुन आहेत.एकेकाळी नावाजलेल्या मराठी शाळा,विद्यार्थीगणसंख्या पुरेशी नसल्याने एकतर शेवटचे श्वास घेत आहेत किंवा बंद पडण्याच्या वाटेवर चाल करीत आहेत.त्याउलट अमराठी लोकांनी त्यांच्या मुलांसाठी काढलेल्या त्या त्या मातृभाषिक शाळा {गुजराथी,तामिळी,उर्दू इ.)जोरात चालू आहेत.आपल्याच महाराष्ट्रात,आपल्याच मराठी शाळांची अशी दुरवस्था कां ह्याचा साकल्याने विचार होणे आवश्यक आहे.

प्रत्येकाच्या मनात आपल्या प्रिय शाळेसाठी एखादा छोटा कोपरा असतोच.आपल्यापैकी बहुतेक जण मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलेले असतील तर त्यांना आपल्या मुलांना 'ही माझी शाळा' असे दिमाखाने दाखविण्याची कधी संधी आलीच तर तिथे ऐटीत उभे राहिलेले एखादे व्यापारीसंकुल दाखविण्याची पाळी येऊ शकते आणि तिथल्याच मॉलमधून मुलाला, त्याच्या नकळत डोळे पुसून ,कपडे वा खेळणी विकत घेऊन देण्याची वेळ येऊ शकते.
'सूज्ञांस अधिक सांगणे न लगे!'

पाहुण्या संपादिका : वैशाली हसमनीस.

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

6 Oct 2008 - 4:31 am | मदनबाण

सर्व ओघ इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे वळल्यामुळे उत्तमोत्तम,नामवंत मराठी शाळांतील कित्येक वर्ग विद्यार्थ्यांभावी बंद पडले आहेत.
हो..बरोबर आहे,मराठी शाळांचे अस्तित्व राहणार का? हा आता मोठा प्रश्न आहे.

त्याउलट अमराठी लोकांनी त्यांच्या मुलांसाठी काढलेल्या त्या त्या मातृभाषिक शाळा {गुजराथी,तामिळी,उर्दू इ.)जोरात चालू आहेत.
ठाण्यात अजुन देखिल गुजराती माधमातुन शिक्षण घेणारी मुले मोठ्या संख्येने आहेत..

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

वैशाली हसमनीस's picture

6 Oct 2008 - 9:42 am | वैशाली हसमनीस

आपण म्हणता ते अगदी बरोबर आहे.हीच आपली खंत असायला हवी नाही कां?

सर्वप्रथम मी वैशाली ताईंचे आभार मानतो की त्यांनी खर्‍या आणि ज्वलंत अश्या विषयाला हात घातला आहे.

अनेक प्रादेशिक भाषा कमी अधिक प्रमाणात याच टप्प्यावर पोहोचल्या आहे. आजच्या अनेक १०/१२ वर्षाच्या भारतीय इंग्रजी माध्यमातील मुलांना आपापल्या भाषेतील साधे फलक वाचता येत.

या सर्वांचे मुख्य कारण म्हणजे समाजाच्या मनातील न्युनगंडाची भावना आणि इंग्रजी माध्यमात शिकले तर नक्कीच रोजगाराच्या संध्या मिळणारच असा भ्रामक आशावाद .

२/४ वर्षांनी अश्या नैराश्यग्रस्त मुलांची पिढीच बाहेर येणार आहे यात शंका नाही.

आता राहिलेला भाग शासनाची निष्क्रियता. आजही अनेक चांगल्या अनुदानीत मराठी शाळेत मुलांच्या रांगा असतात पण शासनाच्या वर्गसंख्येच्या बंधनामुळे प्रवेश नसल्यामुळे अनेक लोक मग इतर सामान्य इंग्रजी शाळांचा मार्ग स्विकारतात.

अर्थात आहे ते तसेच राहणार आहे हे मी स्विकारत नाही आणि मान्य ही करत नाही. काही काळातच आम्ही परत आपल्या भाषेत शिकायला या असे प्रबोधनात्मक आंदोलन सुरु करण्याच्या विचारात आहोत.

आपल्यासारख्या लोकांची यात मदत लागणार आहे आणि याचा शुभारंभ या लेखाने झाला असे मी शुभसुचक समजतो.

ताईसारखे लोक जोपर्यंत महाराष्ट्रात आहे तो पर्यंत यातुन मार्गच निघेल याची मला खात्री आहे.

जय महाराष्ट्र.

वैशाली हसमनीस's picture

6 Oct 2008 - 9:54 am | वैशाली हसमनीस

आपण माझ्या विचारांशी सहमत आहात हे वाचून बरे वाटले. आपल्या अश्या आंदोलनास माझा सक्रिय पाठिंबा राहिलच !
माझा मराठीचा बोल कवतिके,परी अमृतातेही पैजा जिंके !

गणा मास्तर's picture

6 Oct 2008 - 7:37 am | गणा मास्तर

मातृभाषेतुन शिक्षण का घेतले पाहिजे?
->मुलभुत संकल्पनांचे आकलन आणि मातृभाषेचा अभिमान , जतन आणि संवर्धन यासाठी मातृभाषेतुन शिक्षण घेतले पाहिजे. इंग्रजी माध्यमातुन शिकताना विषयांचे आकलन न झाल्यामुळे बर्‍याच अडचणी येतात. मराठी माध्यमातून शिकले तर लहाणपणीपासुन सगळे विषय मातृभाषेत असल्याने समजत जातात. आणि विषय समजुन घ्यायची सवय लागते. पुढे माध्यम बदलले तरी ही सवय कायम रहाते.

लोक इंग्रजी माध्यमाकडे का वळतात?
१. एका ठराविक टप्यानंतर उच्चशिक्षण हे इंग्रजी माध्यमातुनच आहे. तर मग आत्तापासुन सराव का नको?
२. आंतरराष्ट्रीय व्यापार, संशोधन यासाठीची इंग्रजीची अपरिहार्यता
३. नोकरी चटकन मिळेल अशी समजुत
४. प्रतिष्ठेच्या भ्रामक कल्पना

आज मराठी माध्यमातुन शिकुन उत्तम इंग्रजी संवाद आणि संभाषण कौशल्य असणारे कित्येकजण आहेत. पण सर्वसाधारणपणे मराठी माध्यमातुन शिकलेल्या विद्यार्थ्यांना इंग्रजी बोलणे अवघड जाते. तांत्रिक इंग्रजी जमते पण बोलण्याच्या बाबतीत मनात एक प्रकारचा न्युनगंड निर्माण होतो. त्याची परिणिती ' आपण नाही तर आपली मुलं तरी' या न्यायाने मुलांना इंग्रजी शाळंमध्ये घालण्यात होतो.
खरेतर द्वैभाषिकत्व फारसे अवघड नाही. १० किंवा १२ नंतर शिक्षणाच्या माध्यमात मराठी चे इंग्रजी बनते. हा बदल कित्येकांच्या पचनी पडत नाही. शिक्षाणाचे माध्यम बदलताना होणारा त्रास कमी करता येण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. शालेय जीवनात मराठी माध्यमाच्या शाळांत उत्तम इंग्रजी श्रवण आणि संभाषण कौशल्य शिकवले पाहिजे. जेणेकरुन पाल्य (भावी पालकांच्या) मनात भाषिक न्युनगंड तयार होणार नाही. मुबंईला विलेपार्लेमध्ये नल परांजपे यांनी 'फंक्शनल इंग्लीश' या नावाने सहा वर्षाचा एक इंग्रजी श्रवण आणि संभाषण कौशल्य नावाच कार्यक्रम तयार केला आहे. तो शाळाशाळांमधुन राबवायला हवा.
इंग्रजीभाषिक कौशल्य आत्मसात करण्यासाठी उत्तम पुस्तके, सीडी असायला हवीत.

मातृभाषेतुन शि़क्षणाबाबतचा हा आफ्रिकी देशांचा एक अहवाल
लोकसत्तातील एक लेख
वरील लेख लिहिणार्‍या लोकसत्ताच्या सहसंपादीका शुभदा चौकर 'मित्र मराठी शाळांचे' या नावाची एक संघटना चालवतात. अशा सामाजिक संघटनांच्या माध्यमातुन भाषिक न्युनगंड, पालकांची उदासीनता दूर करता येइल.

- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

वैशाली हसमनीस's picture

6 Oct 2008 - 9:58 am | वैशाली हसमनीस

१००%सहमत

प्रकाश घाटपांडे's picture

6 Oct 2008 - 5:43 pm | प्रकाश घाटपांडे

गना मास्तर अगदी बरुबर बोल्ला राव. आता मातृभाषेत म्हन्ला तरी प्रमान भाषेवरुन भान्न व्हतातच.
प्रकाश घाटपांडे

वैशाली हसमनीस's picture

6 Oct 2008 - 6:09 pm | वैशाली हसमनीस

ओरीयंट लाँगमन्स कंपनीच्या कांही रेकॉर्डस् आहेत, इंग्रजी संभाषणासाठी.पुर्वी मी त्यांचा प्रयोग केलाहोता. त्या विद्यार्थ्यांना ऐकवायच्या,त्याबरोबर त्याची पुस्तके त्यांच्या हातात द्यावयाची. असे ३ वेळा केल्यावर ५०% यश सर्वसामान्य विद्यार्थी प्राप्त करतो असा माझा अनुभव आहे.आपण सी.डी.वर लिहीलेत म्हणून फक्त माझा एक अनुभव सांगितला एवढेच !बाकी आपले सर्व विचार पटले.

अभिजीत's picture

7 Oct 2008 - 7:04 am | अभिजीत

गणा मास्तर यांचे "लोक इंग्रजी माध्यमाकडे का वळतात?" याचे विश्लेषण पटले.

पण आता मराठीमधे शिक्षणाचा मुद्दा इतका हाताबाहेर जात आहे की केवळ मराठीप्रेम वगैरेने सुटेलसे वाटत नाही.

छोटुली's picture

6 Oct 2008 - 8:16 am | छोटुली

वैशाली काकू,
अशा गहन सामाजीक विशयाला हात घातल्याबद्द्ल तुमचे आभार.मला असे वाटते की तुमचा हा लेख शिक्शणतज्ञांसाठी एक eye opener आहे.
अमेरीकेत आमच्या मुलांना शाळेतील माध्यमाचा पर्यायच नाही.काही विशयातील Basic Concepts त्यांना इंग्रजीतून समजावणे मला अतिशय कठीण जाते.उदा.गनित.मी मराठी माध्यामातून शिकल्यामुळे असा प्रोबलेम येतो.
आपल्या मुलांना 'ही माझी शाळा' असे दिमाखाने दाखविण्याची कधी संधी आलीच तर तिथे ऐटीत उभे राहिलेले एखादे व्यापारीसंकुल दाखविण्याची पाळी येऊ शकते
ह्या वाक्याला माझी मराठी शाळा अपवाद ठरावी ही माझी इच्छा आहे.
खूपच छान आणि स्पष्ट विचार मांड्ल्याबद्द्ल पुन्हा एकदा तुमचे मनःपुर्वक अभिनंदन!!!
मराठी भाषेचा विजय असो!!

मराठी बाणा जोपासण्यास सर्व मि.पा मराठी प्रेमींना शुभेच्छा!!

वैशाली हसमनीस's picture

6 Oct 2008 - 10:07 am | वैशाली हसमनीस

तुमचीच काय कोणतीच मराठी शाळा बंद न पडो ! पण त्यासाठी आपण सर्वांनीच कृती करणे आवश्यक आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Oct 2008 - 8:30 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मायबोलीतून शिक्षण दिले पाहिजे, ती सर्वांची बोली झाली पाहिजे. असे आपण म्हणतो तेव्हा त्यात जरा भावनिक गुंता अधिक असतो. प्रत्येक मातृभाषेची कमी-अधिक प्रमाणात परवड होत आहेच. त्याला मायमराठी अपवाद नाही. आपापल्या भाषेतून जर जागतिकीकरणाच्या रेट्यात, पोटापाण्याच्या उद्योगात ती जर आपले व्यवहार पूर्ण करु शकत नसेल तर तसा हट्ट आपण सोडला पाहिजे असे वाटते. प्रांतीय भाषेच्या काही मर्यादा असतात त्यामुळे ती सार्वत्रिक आहे असे ग्रहित धरुन आपण जर वावरत असू तर ते धोकादायक असते. प्राथमिक शिक्षण हे त्या-त्या बोलीतून दिले पाहिजे म्हणजे शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढते. पण हे असे शिक्षण कोणत्या वर्गापर्यंत दिले पाहिजे. अगदी कला शाखेच्या किंवा पदव्युत्त्तर पदवी मिळेपर्यंत तसे शिक्षण दिले तर, त्यातही ही आता मराठी माध्यम घेणारे कला शाखेतील विद्यार्थी सोडले तर बाकीचे शिक्षण मात्र इंग्रजी माध्यमातून घेण्याकडे विद्यार्थ्यांचा ओढा दिसतो. याचाच अर्थ असा की, मायमराठीचे शिक्षण घेतांना बाहेरील जगात तिच्यासोबत वावरतांना भाषिक व्यवहाराला काही मर्यादा पडतात म्हणून तर मराठी माध्यमांच्या शाळेची अवस्था बिकट होत आहे. त्यामुळे सरकारचे धोरण जे आहे, ते ब-याचदा मला पटते. इंग्रजी शाळेत मराठी आवश्यक करावे आणि मराठी शाळेत मराठी आणि इंग्रजी चे शिक्षण वाढवले पाहिजे. स्पर्धेच्या काळात पाल्यांवर आपण मर्यादा पडलेल्या भाषेचा आग्रह धरत असू तर आपण अशा पाल्यांवर अन्याय करत आहोत असे वाटते.

उत्तम संपादकीय लेखनाबद्दल आपले अभिनंदन !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वैशाली हसमनीस's picture

6 Oct 2008 - 10:22 am | वैशाली हसमनीस

सर्,मला वाटते की प्राथमिक शिक्षण तरी मातृभाषेतूनच दिले गेले पाहिजे.त्यानंतर मुलाने परभाषा शिकण्यास सुरुवात करावी.पण ती द्वितीय भाषा म्हणून.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Oct 2008 - 2:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मला वाटते की प्राथमिक शिक्षण तरी मातृभाषेतूनच दिले गेले पाहिजे.
सहमत आहे, मी तर त्यापुढे म्हणतोच आहे की , त्या-त्या बोलीतून प्राथमिक शिक्षण दिले पाहिजे.

मुलाने परभाषा शिकण्यास सुरुवात करावी.पण ती द्वितीय भाषा म्हणून.

द्वितीय भाषा मराठी आणि आवश्यक भाषा इंग्रजी असा अभ्यासक्रम असल्यामुळे मुकी बिचारी 'मराठी' कोणीही हाका अशी परिस्थिती आहे. विषयांतर होईल पण सांगतो आमच्या विद्यापीठात प्रथम वर्ष वाणिज्य शाखेतून द्वितीय भाषा असलेली मराठीची हाकालपट्टी झाली. आणि आमचे दुर्दैव की बाकी अभ्यासक्रम मराठी माध्यमातून चालतो आहे. त्यामुळे सरकारचे मातृभाषेविषयी पक्के धोरण ठरल्याशिवाय, मायबोलीला गती येणार नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वैशाली हसमनीस's picture

6 Oct 2008 - 5:22 pm | वैशाली हसमनीस

आपल्याशी मी पूर्णपणे सहमत आहे.सरकारी धोरण निश्चित नाही म्हणून तर गोंधळ आहे.मराठी शाळांमध्ये वर्गात ५-१० विद्यार्थी कमी असतील तरी वर्ग बंद होऊ शकतो.म्हणजे तेवढे शिक्षक कमी,बाकी स्टाफ कमी अश्या दुष्टचक्रात सध्या मराठी शाळा आहेत्.पण शेवटी सरकार तरी आपलेच ना? आपण शिक्षकांनीच हात झटकले तर कसे होईल?

सहज's picture

6 Oct 2008 - 2:23 pm | सहज

बिरुटेसरांशी सहमत.

सध्याच्या काळात तरी इंग्रजीला झुकते माप देण्यावाचुन वेगळा पर्याय दिसत नाही आहे. आपल्या इंग्रजी भाषा येते म्हणुन गेल्या १० वर्षात प्रचंड संधी उपलब्ध झाल्या आहेत. शेवटी भाषा, शिक्षण हे सर्वप्रथम पोटापाण्यासाठीच आहे.

वैशाली हसमनीस's picture

6 Oct 2008 - 5:29 pm | वैशाली हसमनीस

आपण माझा लेख नीट वाचला नाही असे वाटते.प्राथमिक शिक्षण मातृभाषेत द्यावे,त्यानंतर परभाषा शिकावी असा माझा मुद्दा आहे.

कलंत्री's picture

6 Oct 2008 - 7:09 pm | कलंत्री

इंग्रजी भाषा येते म्हणून आपल्याला रोजगार मिळत आहे असे आपले मत असेल तर चुकीचे आहे. असे असते तर या देशातही बेरोजगारी नसायला हवी होती.

आपल्याला रोजगार जो मिळतो तो आपल्यातील क्षमता, बुद्धिमत्ता आणि काम करण्याची क्षमता म्हणून.

उद्या त्या त्या देशांना रोजगार कपात करावी लागली तर केवळ इंग्रजी येत आहे म्हणून आपले रोजगार टिकणार नाही.

आपली समस्या अथवा आपले वैशिष्ट्य म्हणजे आपली भाषा धोक्यात आहे हे आपण अगोदरच ओळखले आहे. इतर भाषा यांच्या ते ध्यानीमनीही नाही.

वैशाली हसमनीस's picture

7 Oct 2008 - 6:19 am | वैशाली हसमनीस

आपण मांडलेल्या विचारांशी १००% सहमत !

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

7 Oct 2008 - 9:58 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

इंग्रजी भाषा येते म्हणून आपल्याला रोजगार मिळत आहे असे आपले मत असेल तर चुकीचे आहे. असे असते तर या देशातही बेरोजगारी नसायला हवी होती. आपल्याला रोजगार जो मिळतो तो आपल्यातील क्षमता, बुद्धिमत्ता आणि काम करण्याची क्षमता म्हणून.

अर्थातच! पण इंग्लीश या एवढ्याच भांडवलावर बर्‍याचशा नोकर्‍या नाहीच मिळत. पण हातातोंडाशी आलेली नोकरी इंग्लीश येत नाही म्हणून जाऊ शकते. म्हणून इंग्लीश येणं महत्त्वाचं ठरु शकतं, ठरतं.

वैशाली हसमनीस's picture

8 Oct 2008 - 6:13 am | वैशाली हसमनीस

अदिती ,तुमचे विचार एकदम बरोबर. माझा इंग्लिश शिकण्याला विरोध नाहीच .ती यायला हवीच्.फक्त तो मातृभाषेला पर्याय नसावा एवढेच.

कलंत्री's picture

6 Oct 2008 - 9:00 am | कलंत्री

आजच लोकसत्ता मध्ये चौकर बाईंचा लेख आहे.

आपल्यासारख्या लोकांनी तो वाचलाच पाहिजे.

http://www.loksatta.com/daily/20081006/opead.htm विविध शिक्षण मंडळात संवादाचा पूल.

कृपया अश्या लेखाबद्दल आणि विषयाबद्दल आपापले अनुकूल अथवा प्रतिकुल मत त्यांनाही कळवावे.

आपले मत / प्रतिक्रिया त्यांना शक्तीवर्धक ठरत असते.

shubhada.chaukar@gmail.com

विनायक प्रभू's picture

6 Oct 2008 - 7:25 pm | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
रोज बघ्तो आहे मराठी शाळा उध्वस्त धर्मशाळे च्या मार्गाला लागलेल्या आहेत.

वैशाली हसमनीस's picture

7 Oct 2008 - 6:27 am | वैशाली हसमनीस

त्या उध्वस्त धर्मशाळा चांगल्या शाळा कशा होतील ह्यचा विचार होणे आवश्यक आहे.आपल्यासारख्या समुपदेशकाची त्यासाठी फार मदत होऊ शकते.

ऋषिकेश's picture

6 Oct 2008 - 7:30 pm | ऋषिकेश

अग्रलेख आवडला... मस्त मांडणी व विचारांशी प्रामाणिक अग्रलेख
मी सेमी इंग्रजी माध्यामात होतो आणि तेच मुलांसाठी पसंत करेनसे वाटते
-(सेमी इंग्रज) ऋषिकेश

स्वाती दिनेश's picture

6 Oct 2008 - 9:19 pm | स्वाती दिनेश

अग्रलेख आवडला... मस्त मांडणी व विचारांशी प्रामाणिक अग्रलेख
असेच म्हणते.
ऋषिकेशप्रमाणे मी ही सेमी इंग्रजी माध्यमात शिकल्याने मला तो पर्याय जास्त सयुक्तिक वाटतो.
स्वाती

वैशाली हसमनीस's picture

7 Oct 2008 - 6:34 am | वैशाली हसमनीस

आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. सेमी. इंग्रजी हा पर्याय बरा वाटतो,पण तोही माध्यमिक शिक्षणासाठी आणि बुध्दिमान मुलांसाठी.सर्वसामान्य कुवतीच्या मुलांसाठी नाही.

मी_ओंकार's picture

6 Oct 2008 - 9:09 pm | मी_ओंकार

वैशालीताई,
अतिशय चांगला अग्रलेख. शासनाने खरोखर योग्य ती पाऊले उचलून मराठी शाळांची होत चाललेली दुरावस्था थांबवली पाहिजे. मराठीतून शिक्षण घेताना त्याच्या जोडीला गणा मास्तर म्हणतात त्याप्रमाणे व्यवहारातील इंग्रजी संभाषण योग्य प्रकारे शिकवले तर न्यूनगंड येण्याचे कारण उरणार नाही.

चांगल्या संपादकीयाबद्दल आपले अभिनंदन!

- ओंकार.

वैशाली हसमनीस's picture

7 Oct 2008 - 6:37 am | वैशाली हसमनीस

आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद !

यशोधरा's picture

6 Oct 2008 - 10:52 pm | यशोधरा

अग्रलेख अतिशय आवडला.

वैशाली हसमनीस's picture

7 Oct 2008 - 6:45 am | वैशाली हसमनीस

प्रतिक्रियेबद्दल आभार !मी एका नावाजलेल्या मराठी शाळेत शिक्षक होते,त्यामुळे त्या शाळांची सुखदु:खे मला चांगलीच माहीत आहेत.

बेसनलाडू's picture

6 Oct 2008 - 11:28 pm | बेसनलाडू

अग्रलेख एकंदर आवडला. एका महत्त्वाच्या प्रश्नाला त्याद्वारे वाचा फोडल्याबद्दल संपादकांचे हार्दिक अभिनंदन. मुळात मूलभूत शालेय शिक्षण मातृभाषेतून न होता इंग्रजीतून होण्याची बरीच कारणे - जसे मुलांच्या मनात न्यूनगंड निर्माण व्हायची भीती, इंग्रजी माध्यमातून - विशेषतः कॉन्वेन्ट आणि इन्टरनॅशनल् स्कूल्स् मधून - घेतलेल्या शिक्षणास प्रतिष्ठाप्रतीक (स्टेटस् सिम्बल्) म्हणून आजकाल मिळणारी मान्यता - लेखातून समोर आलेलीच आहेत. आणि त्यामुळे आपली आर्थिक कुवत, पाल्याचा इंग्रजीतून अभ्यास घेण्याची तयारी इ. बाबत अनुकूलता नसतानाही पालक इंग्रजी शाळांतून आपल्या पाल्यास शिकवण्यासाठी धडपडत असतात, हे वास्तव आहे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मातृभाषेतून आणि तेही मोफत मिळण्याची सोय असताना त्याचा लाभ न घेणार्‍यांची लेखातील आकडेवारी निराशाजनकच म्हणावी लागेल. आणि अप्रत्यक्षपणे मातृभाषेतूनच शिक्षण घेण्याचा हिरिरीने पुरस्कार करणार्‍या या लेखात किंवा इतरत्रही वयाच्या दहाव्या-बाराव्या वर्षीपासून इतर भाषा शिकण्यासंबंधी जो पुरस्कार केला जातो, या विचारास जो पाठिंबा दिला जातो तो निश्चितच स्पृहणीय आहे. अमृता जोशी सारख्या मराठी मुली अशाच विचारांचे फलित मानता येतील.
शालेय शिक्षण कोणत्या माध्यमातून झाले हा मुद्दा जेव्हा विवाहजुळणीसमयीसुद्धा कळीचा ठरू लागतो, तेव्हा तर अग्रलेखातील समस्येकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज भासू लागते. आजकाल आंतरजालावरील म्याट्रिमॉनिअल्स् मधूनही जेव्हा उपवर मुलेमुली आपण कॉन्वेन्ट शिक्षित असल्याचे सांगतात, त्यावरूनच एकंदर समस्येच्या व्याप्तीची कलना यावी :)
तसेच मराठी माध्यमाच्या (किंवा जी मातृभाषा आहे त्या माध्यमाच्या) शाळेतून शिक्षण घेणे आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून - विशेषतः कॉन्वेट - शिक्षण घेणे यांमध्ये सांस्कृतिक शिक्षणाच्या दृष्टीने असलेला फरक अग्रलेखातून अधोरेखित व्हायला हवा होता, असे राहून राहून वाटले. मराठी माध्यमाच्या शाळांतून शिकल्याने मराठी संस्कृतीशी निर्माण होणारी जवळीक व या संस्कृतीविषयीचे शिक्षण खचितच साहजिक आहे. याचा अर्थ मराठी माध्यमाच्या शाळांतून शिकलेल्यांनाच मराठी संस्कृतीचे सखोल शिक्षण व तिच्याविषयी अगदी जिव्हाळा आहे आणि इंग्रजी माध्यमातून शिकलेल्यांना नाही असे नाही; पण शाळांमधून होणारे संस्कृतीशिक्षण हा मुद्दा आणि त्यातील शाळेचे स्थान या गोष्टी लक्षात घेतल्या, तर मराठी शाळांना नैसर्गिक फायदा मिळणे स्वाभाविक आहे.
दुसरे असे, की कोचिंग क्लासेसचा मुद्दा याच्याशी निगडीत आहे असे वाटत नाही. त्याचा संबंध शिक्षणाच्या बाजारीकरणाशी सर्वाधिक आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळा अस्तित्त्वातच नसत्या तरी गुणाधिष्ठित शिक्षणपद्धती आणि विद्यार्थ्यांमधील जीवघेणी स्पर्धा जोवर अस्तित्त्वात आहे, तोवर कोचिंग क्लासेस असतेच ना?
समस्येची एकंदर व्याप्ती पाहता समाजशास्त्रीय तसेच व्यक्तिगत मानसिकतेच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून अग्रलेखातील प्रत्येक मुद्दा स्वतंत्र लेखासाठी पात्र ठरू शकतो; मात्र एकंदर समस्येचा आढावा, मराठी व बिगरमराठी(इंग्रजी व इतर) शाळांमधून होणार्‍या शिक्षणामधला फरक इ. चा तौलनिक अभ्यास, मराठी शाळांची सध्याची दयनीय अवस्था आणि मातृभाषेतून शिक्षण घेतानाच इतर भाषांविषयी आवश्यक ती गोडी आणि मातृभाषेतर किमान दोन भाषांचा प्राथमिक अभ्यास याचा पुरस्कार इ. बाबी लक्षात घेता अग्रलेखातून मांदल्या गेलेल्या विचारांबद्दल संपादकांचे हार्दिक अभिनंदन.
(वाचक)बेसनलाडू

वैशाली हसमनीस's picture

7 Oct 2008 - 6:52 am | वैशाली हसमनीस

आपण लेखात उल्लेख केलेले कांही मुद्दे अग्रलेखात मांडले गेले नाहीत हे मान्य !पण लेख फारच मोठा व शेवटी कंटाळवाणा होईल की काय ह्या भीतीने आवरता घेतला.

प्राजु's picture

7 Oct 2008 - 2:40 am | प्राजु

अग्रलेख आवडला. संपादकांचे अभिनंदन!
खरंतर मातृभाषेतून शिक्षण या विषयावर बर्‍याचवेळेला चर्चा झाली आहे. तरीही आपला लेख वेगळा वाटला.
खास करून शेवटचा पॅरा..
प्रत्येकाच्या मनात आपल्या प्रिय शाळेसाठी एखादा छोटा कोपरा असतोच.आपल्यापैकी बहुतेक जण मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलेले असतील तर त्यांना आपल्या मुलांना 'ही माझी शाळा' असे दिमाखाने दाखविण्याची कधी संधी आलीच तर तिथे ऐटीत उभे राहिलेले एखादे व्यापारीसंकुल दाखविण्याची पाळी येऊ शकते आणि तिथल्याच मॉलमधून मुलाला, त्याच्या नकळत डोळे पुसून ,कपडे वा खेळणी विकत घेऊन देण्याची वेळ येऊ शकते.
'सूज्ञांस अधिक सांगणे न लगे!
'

मनांत घर करून गेला. अशी वेळ कोणावरही येऊ नये हीच देवाकडे आणि शिक्षण व्यवस्थेकडे प्रार्थना.

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

वैशाली हसमनीस's picture

7 Oct 2008 - 6:55 am | वैशाली हसमनीस

माझीही तीच प्रार्थना !

सुक्या's picture

7 Oct 2008 - 3:06 am | सुक्या

ह्या समस्येला शि़क्षणमाध्यम हे कारण नसून सामाजिक परिस्थितीच कारणीभूत असते.कित्येकवेळा विद्यार्थ्यांच्या आसपास वावरणारी मंडळीदेखील हा न्यूनगंड वाढविण्यास मदत करतात.

आपल्या या विचारांशी मी सहमत आहे. ह्या समस्येचे मुळ हे फक्त सामाजिक परिस्थिती आणी पालकांचा अट्टहास हाच आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळेतुन चांगले शिक्षण मिळते हा केला जाणारा प्रचार, शेजारचा बब्या / बबली इंग्रजी शाळेत जाते म्हनुन आपलाही बाब्या / बबली इंग्रजी शाळेतच गेली पाहीजे हा विचार किवा "मराठी शाळेत काही शिकवत नाही हो" असे म्हनत आपनच केलेली लाथाळी हेच या समस्येचे मुळ कारण आहे.

सरकार या बाबतीत काही करु शकते यावर माझा विश्वास नाही. फक्त कायदा करुन या वर काही सुधारना होनार नाही. शेवटी प्रत्येक पालकाने या विषयी विचार करायला हवा. इतर मातृभाषिक शाळा का चालतात आणी मराठी शळा का बंद होत आहेत याचे उत्तर त्या इतर लोकांचे त्यांच्या मातृभाषेवर असलेले प्रेम पाहीले की आपोआप कळते.

-- मराठी शाळेत शिकलेला.
सुक्या (बोंबील)

वैशाली हसमनीस's picture

7 Oct 2008 - 7:00 am | वैशाली हसमनीस

आपण माझ्याशी सहमत आहात ,बरे वाटले.
मराठी शाळेत शिकलेली आणि शिकवणारी,
वैशाली हसमनीस.

चित्रा's picture

7 Oct 2008 - 5:03 am | चित्रा

फक्त मुले लहानपणी अनेक भाषा शिकतात, त्यामुळे अशा लहान वयातच अनेक भाषा कसलाही भाषिक आडपडदा न ठेवता शिकवाव्या असे वाटू लागले आहे.
मातृभाषेचे संस्कार बोली भाषेत होणे महत्त्वाचे आहे, भाषेतून अनेक गोष्टी मुलांपर्यंत पोचतात. त्यामुळे मुलांना मराठी चांगले बोलता-वाचता -लिहीता यावे असे झाले तर फारच उत्तम.

पण एक नुसता विचार आला -मराठी माध्यमात घातले तर प्रमाणभाषेवरून भांडणे होताना पाहिली आहेत, आमच्या मुलांची भाषा बिघडते, इथपासून त्यांना मुद्दाम मार्क कमी दिले जातात इथपर्यंत भांडणे ऐकली आहेत. तसेच शाळांची रया गेली आहे हे एक दुसरे कारण हल्ली ऐकायला मिळते. ही सर्व आपापसातील भांडणे बंद झाली तर ना मराठी माध्यमाच्या शाळेत घालून फायदा? जोवर लोकांचा मराठी माध्यमाच्या शाळांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत नाही तोवर इंग्रजी माध्यमांच्या शाळांना पर्याय नाही असे वाटते, मन खट्टू होते. अनिल अवचटांसारखे लोक फार कमी. अधिकाधिक लोक हल्ली इंग्रजी माध्यमाकडे वळू लागले आहेत.

धनंजय's picture

7 Oct 2008 - 9:44 pm | धनंजय

माझे शिक्षण परप्रांतात झाले. घरच्या मराठीतही नाही, राज्याच्या कोकणीतही नाही, तर इंग्रजीत.
(यामुळे मला तोटा झाल्याचे जाणवत नाही. घरात मराठी नीट बोलले जायचे. चार बैलांना चारा चार = ४ बैलांना गवत खायला घाल, या ठिकाणी गोंधळ होत नसे. शाळेत इंग्रजी नीट बोलले जायचे. Give feed to this bull and two others too, याचाही गोंधळ होत नसे.)
काही तपशीलवार विचार पटले नाहीत तरी मराठी शाळांचा र्‍हास होऊ नये, हा अग्रलेखातला मुख्य विचार पटला.

वैशाली हसमनीस's picture

7 Oct 2008 - 6:42 pm | वैशाली हसमनीस

धनंजय,आपण आपला अनुभव सांगितलात. आपल्या मि.पा.च्या लेखनावरुन आपल्या बुध्दिमत्तेची खात्री पटते.आपण शाळेतही अत्यंत हुषार विद्यार्थी असणारच त्यामुळे आपल्याला बहुभाषिकत्वाचा प्रश्न जाणवला नाही.पण 'वक्ता दशसहस्त्रेषु'त्याप्रमाणेच बुध्दिमत्तेचे असते.शिक्षण हे सर्वसामान्य कुवतीच्या विद्यार्थीवर्गासाठी असायला पाहिजे.जसा परीक्षेचा पेपर हा सामान्य मुले डोळ्यासमोर ठेऊन काढला जातो,त्यातील१०% भाग फक्त अतिहुषार मुलांसाठी असतो.फक्त तेच तो सोडवू शकतात्.तसेच आपल्या बाबतीत घडले असावे.चु.भु.द्या.घ्या.

बिन्धास्त बबनी's picture

8 Oct 2008 - 7:28 am | बिन्धास्त बबनी

वैशाली ताई,
लेख अतिशय माहितीपूर्ण वाटला.एका महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नावर झोत टाकल्याबद्द्ल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन!!
आज परिस्थिती अशी आहे की अडाणी पालकदेखील आपल्या मुलाला इंग्रजी माध्यमात शिकण्यास भाग पाडत आहेत.माझ्या मते ह्याला आपली सामाजिक रचनाच जबाबदार आहे. इंग्रजीसारखी भाषा शिकण्याचे ओझे, घरातून त्याविषयीचे काडीचेही मार्गदर्शन नाही आणि "होमवर्क "करवून घेण्यासाठी लावल्या गेलेल्या ट्यूशन्स ....हया सगळ्यांचा त्या कोवळ्या मनावर काय परिणाम होतो हे सांगण्याची काही आवश्यकता नाही.लहानग्यांकडुन वाढलेल्या पालकांच्या अवास्तव अपेक्षा,कुवतीपेक्षा अधिक थोपलेले उपद्व्याप(उदा.क्रिकेटचा क्लास,त्यानंतर गाण्याचा वर्ग आणि ते संपल्यावर गृहपाठ) हे जरा जास्तच होत आहे असे नाही का पालकांना वाटत.
परिणामी मुलांमध्ये दुसर्‍यांविषयी मत्सर,सूडभावना,जीवघेणी स्पर्धा किंवा नैराश्य आणि न्यूनगंड नको त्या वयात निर्माण होतो. त्यामुळे मुलांमध्ये suicidal tendencies आणि depression /aggression च्या भावना वाढल्या आहेत असेच दिसून येते.समाजात antisocial elements फोफावू लागले आहेत.बालमनःशास्त्रतज्ज्ञांच्या मते पालकच मुलांचे मन ओळखू शकतात.फ्क्त गरज आहे ती आपल्या मुलाच्या मनात डोकावून बघण्याची आणि त्याला मानसिक बळ देण्याची.पालकांनाच धडे घ्यायची वेळ आली आहे असेच वाटू लागले आहे.

वैशाली हसमनीस's picture

8 Oct 2008 - 8:59 am | वैशाली हसमनीस

आपण सद्य परिस्थीतीचे योग्य वर्णन केले आहे.पालकांनाच समुपदेशनाची अधिक गरज आहे ह्या आपल्या मताशी मी सहमत आहेच.