गाभा:
मराठी म्हणी खरोखरच अगदी थोड्या शब्दांमध्ये मोठा अर्थ सांगून जातात.. बऱ्याच म्हणी आजकाल वापरात नसल्याने ( किंवा इंग्रजीच्या फॅडमुळे वापरायची लाज वाटल्याने लोक त्या वापरायच्या टाळतात म्हणून...) काही वर्षात नामशेष होतील कि काय असे वाटते. आमच्या वेळेस ४ थी च्या स्कॉलरशिप परीक्षेच्या सिलॅबस ला म्हणी होत्या..त्यामुळे बऱ्याच म्हणी पाठ झाल्या व अजूनही त्यांचे अर्थ ही माहीत आहेत.
मी कुणाच्या भावना न दुखावता एक शंका विचारू इच्छितो की : "सोनार , शिंपी,कुलकर्णी अप्पा , यांची सांगत नको रे बाप्पा " या म्हणीचा नेमका अर्थ काय आहे? आणि ही म्हण कशी तयार झाली असावी? ह्याच जातींचा वापर का केला असावा? यातील अप्पा म्हणजे नेमके कोण? कृपया जातीवाचक चर्चा नको फक्त अर्थ माहित असल्यास सांगावा अथवा दुर्लक्ष करावे ही विनंती...उगाचच अनर्थ नकोय...
प्रतिक्रिया
9 Feb 2017 - 11:28 am | आनन्दा
वा वा. मस्त धागा.. पण केवळ एव्हढी एक म्हणच नव्हे, तर सगळ्या म्हणींचे माहेत असलेले अर्थ यावेत अशी अपेक्षा करतो.. तुम्ही पण तुम्हाला माहीत असलेले अर्थ सांगा.
9 Feb 2017 - 11:42 am | शरद
सोनार सोन्यात, शिंपी कापडात तर कुलकर्णी त्याच्याशी कराव्या लागणार्या प्रत्येक व्यवहारात तुम्हाला फसवणार हे त्रिकालाबाधित सत्य सगळे जाणत होते. म्हणून ते सावधगिरीचा सल्ला देत आहेत. भाऊ, दादा, आबा, अण्णा, आप्पा, ताई, माई, बाई, ही सर्वसामान्य नावे आहेत. ती कोणाही सामान्य व्यक्तीला उद्देशून वापरली जातात. इथे कुलकर्ण्याला आप्पा जोडले आहे; पुढे ते बापाशीही जुळते
तुम्हाला धागा फक्त या म्हणीपुरताच मर्यादित ठेवावयाचा आहे की सामान्य म्हणी-वाक्प्रचार यावर ओढावयाचा आहे. (हे थोडे माहितगार यांच्या क्षेत्रावर अतिक्रमण होईल म्हणा !) .
शरद
9 Feb 2017 - 12:25 pm | IT hamal
धन्यवाद...अर्थ सांगितल्या बद्दल... मला ह्याच म्हणीचा अर्थ जाणून घ्यायचा होता.. म्हणी व त्यांचे अर्थ असे अजून धागे असतील मिपावर तर त्यांच्या लिंका दिल्यास चांगलेच होईल !!!
9 Feb 2017 - 4:29 pm | फेदरवेट साहेब
आप्पा हा शब्द कुळकर्णी सोबत जोडलेला नसून स्वतंत्र आहे. आप्पा म्हणजे इथे लिंगायत जात अभिप्रेत असावी (लिंगायतांना आप्पा म्हणतात असे माहिती आहे मला) बाकी सगळे ठीक वाटले. अर्थात आप्पा लोकांपासून वाचून राहायला का सांगितलं आहे हे काही मला सांगता येणार नाही. तसेच, तुम्ही जे सोनार अन शिंपी बद्दल सांगितले आहेत ते रास्त आहे (म्हण तयार झाली त्या काळाला सुसंगत असावे) पण कुळकर्णी सोबत कुठलाही व्यवहार केल्यास धोका होतो असे म्हणीत अभिप्रेत नाहीये. कुळकर्णी हे ग्रामपातळीचे महसुल अधिकारी असत, जमिनीचे रुमाल, कागद, उतारे मेंटेन करणे त्यांचे काम असे, तेव्हा त्यांच्याशी मैत्री फायद्यात असू शके अन त्यांची दुश्मनी महाग पडू शके (कागद फिरवले म्हणजे!) म्हणूनच 'जमीन नीट ठेवायची असेल' तर कुलकरण्यापासून दूर राहा, असा अर्थ म्हणीतून अध्याहृत असावा.
9 Feb 2017 - 1:14 pm | बरखा
मला अजुनही जुन्या म्हणी पाठ आहेत. पण खरच आजकाल कोणी जास्त म्हणी वापरत नाही. तुमच्या या धाग्यामुळे मला मिपा स्पेशल म्हणी सुचल्या आहेत. बघा कशा वाटतात. ( म्हणी गंमत म्हणून सुचल्या आहेत. कुणालाही दुखवायची भावना नाही.)
१. मिळाले नेट की उघडले मिपा....
२. वाचक कमी अन प्रतिसाद फार !
३. मनात आले कि टाकले टंकून
४. लेखक वाचून धागा उघड
५. आला नविन की पाडला खाली
६. संपादक मंडळात तक्रारीच फार
७. काढली शंका की झालेच समाधान
८. असेल कट्टा तर जमतील मिपा
९. टाकला फोटो की दिसलाच नाही पाहीजे
१०. एक न धड बाराभर डू आय डी
११. डू आय डींचा सुळसुळाट फार
9 Feb 2017 - 3:02 pm | बबन ताम्बे
अजून ...
नेट थोडे जिलब्या फार
लेख नको पण जिलब्या आवर.
9 Feb 2017 - 2:17 pm | अनन्त्_यात्री
" पाचावर धारण बसणे " (= घाबरणे) या वाक्प्रचाराची व्युत्पत्ती मला अजून कुठेही मिळालेली नाही. कोणी व्युत्पन्न मिपाकर मदत करेल काय?
9 Feb 2017 - 4:01 pm | कंजूस
लाकुडतोडे लोक मोठा ओंडका उभा तोडताना ( पुर्वीची पद्धत)चीर पाडून त्यात पाचर/पाच ( छोटी खिट्टी ) मारत जातात. ती पार आवळून अडकून बसते. ओंडका फुटल्याशिवाय पाचरीची सुटका होत नाही.
= एखाद्या अडचणी पार अडकून बसणे.
9 Feb 2017 - 6:25 pm | राही
फार वर्षांपूर्वी नासिक येथले एक लेखक (माधव कानिटकर?) यांच्या आत्मचरित्रात वाचले होते. त्या पुस्तकात त्यांनी सुरुवातीला काही फार जुन्या आठवणी लिहिल्या होत्या. त्यातली एक अशी की पूर्वी कधीकाळी महागाई इतकी वाढली की एक रुपयात (किंवा काही ठराविक रकमेत) भरपूर मिळणारे धान्य पाचच्या मापावर येऊन बसले. इतक्या महागाईने लोकांची धाबी दणाणली. घाबरगुंडी उडाली. 'पाचावर धारण बसणे' चा अर्थ खूप घाबरणे असाच आहे. धारण म्हणजे धान्य भाव, बाजार भाव.
येत्या काही दिवसांत ग्रंथालयात जायला जमले तर नेमका संदर्भ आणि अर्थ सांगता येईल. पण शब्दकोशांतही हा अर्थ आहे.
9 Feb 2017 - 5:37 pm | विहंग
नाकाने कांदे सोलणे चा अर्थ काय आहे?
9 Feb 2017 - 10:13 pm | अनिवासि
नसता शुचिर्भुतपणा, पवित्रपणा दाखविणे,
नसता अभिमान दाखविणे., बढाया मारणे.
ख्
9 Feb 2017 - 10:13 pm | अनिवासि
नसता शुचिर्भुतपणा, पवित्रपणा दाखविणे,
नसता अभिमान दाखविणे., बढाया मारणे.
ख्
9 Feb 2017 - 9:06 pm | अॅस्ट्रोनाट विनय
काही कमी प्रचलित म्हण:
अडली गाय फटके खाय – अडचणीत सापडलेल्या माणसाला अपमानास्पद शब्द ऐकून घ्यावे लागतात.
उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक – एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्यासाठी काही काळ वाट पहावी लागते.
कसायाला / खाटकाला गाय धार्जिणी – खापट माणसापुढे गरीब माणसे नमतात.
काप गेले पण भोके राहिली – अधिकार व संपत्ती जाते पण त्यापेक्ष्या अंगी बाणलेल पोकळ अभिमान मात्र कायम असतो.
काकडीची चोरी फाशीची शिक्षा – लहानशा अपराधासाठी फार मोठी शिक्षा होणे.
जी खोड बाळा ती जन्म काळा – जन्मजात अंगी अरलेले गुण अगर दुर्गुण जन्मभर जात नाहीत.
ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी – एकाच गावातील लोक एकमेकांना चांगले ओळखतात.
9 Feb 2017 - 9:15 pm | सूड
काप हा कानात घालायचा दागिना होता पूर्वी, काही कारणाने काप विकले तरी ते घालायला टोचलेले कान तसेच राहीले.
मला समजलेला ह्या म्हणीचा अर्थ असा की एखादी गोष्ट गेली, त्याबद्दलच्या आठवणी तेवढ्या राहिल्या.
10 Feb 2017 - 2:50 am | गामा पैलवान
बळी तो कान पिळी = जिसकी लाठी उसकी भैस
stich in time saves nine = आळशाला दुप्पट काम
turn a blind eye = काणाडोळा करणे (शब्दश:)
निंदक नियरे रखियो = निंदकाचे घर असावे शेजारी
biting more than you can chew = लहान तोंडी मोठा घास
pot calling the kettle black = हमाममें सब नंगे
-गा.पै.
13 Feb 2017 - 6:40 pm | अरुण मनोहर
ही मी तयार केलेली म्हणा आहे.
उगम व अर्थ कोणी सांगू शकेल काय?
"रेनकोट चढवून इज्जत उतरविणे"
21 Feb 2017 - 7:40 pm | जयन्त बा शिम्पि
माझे मूळ गाव ' धुळे ' आहे. आमच्या पुर्वीच्या , पूर्व खान्देशात ( आताच्या धुळे जिल्ह्यात) अहिराणी भाषा बोलली जाते.अहिराणी भाषेत धुळे शब्दाचा उच्चार ' धुये ' असा होतो. त्यावरून ' कये ना वये , चालना धुये ' अशी म्हण प्रचलीत झाली होती. अर्थः- कळत नाही, वळत नाही , आणि चालला धुळ्याला '