कविता म्हणजे रे काय?........ भाऊ

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in काथ्याकूट
2 Oct 2008 - 10:54 pm
गाभा: 

कविता म्हणजे काय? असा प्रश्न खूप लोक विचारतात.माझा विचार मी थोडक्यात देतो.कवितेला प्रतिक्रिया देणं ही एक चांगली गोष्ट आहे."मला ही कविता आवडली किंवा मला आवडली नाही" अशी प्रतिक्रिया समजण्यासारखी आहे. कधी कधी काही वाचक कविता लिहायलाच सुचवतात किंवा एखादी कविता वाचून झाल्यावर उपदेश पण करतात. पण जो कविता लिहीतो त्याला ते ऐकून खूप मजा वाटत असते कारण "असाच"विषय घेऊन तूं कविता लिही असं कोणी सांगितल्यास किंवा "असं तू लिहायला हवं होतं "असं कोणी सांगितल्यास ते कसं शक्य होईल?.आणि जे तसे लिहू शकतात त्यांचं खरोखरच कौतुक केलं पाहिजे.कारण कविता कुणाला विचारून लिहिली जात नाही.तिची निर्मिती होते.ती जन्माला येते.कुणाला आवडो न आवडो त्याच्या मनात घोळत असलेले शब्द जेव्हा तो कागदावर लिहून काढतो ती त्याची कविता होते.

प्रसिद्ध कवयीत्री बहिणाबाई तर लिहू वाचू शकत नव्हत्या असं म्हणतात. तरी पण त्या कविता बोलून दाखवायच्या आणि कविता निर्माण व्हायची. त्यांच्या कविता अजूनही लोकांना आवडतात.

कविता करणं आणि "सुग्रास"जेवण करणं ह्या दोन गोष्टीची मी सांगड घातली तर अतिशयोक्ती होणार नाही.जेवणा साठी सामुग्री लागते.सामुग्री सर्वांकडे असू शकते पण म्हणून "गाजराचा हलवा"कर म्हणून कोणी सांगितल्यास सुग्रास चटकदार हलवा करायचा झाल्यास प्रथम तो करणार्‍याला त्याची -करण्याची- आवड पाहिजे नसल्यास तो त्याचा "घोळ"करून ठेवील.

तसंच शब्दांची सामुग्री-भांडार- असली म्हणून कुठचेही शब्द वापरून कविता लिहीता येणार नाही असं मला वाटतं. लिहिणार्‍याला त्यावेळी आवड निर्माण झाली पाहिजे. खाण्याची डिश पुस्तक वाचून करता येते,पण उत्तम डिश बनवावयाची झाल्यास करणार्‍याला त्यामधे स्वतःची "क्रियेटिविटी" दाखवावी लागते.त्याशिवाय ती डिश सुग्रास होणार नाही.कवितेचा विषय घेऊन सुधा "क्रियेटिविटी"नसेल तर कविता पण तितकी आवडली जाणार नाही.

थोडक्यांत आपल्या जवळ असलेल्या शब्दभांडारातून योग्य ते शब्द घेऊन विषयाला धरून त्यांची नीट जुळणी करता आली तर सुंदर कविता लिहीता येऊ शकेल.ह्या कलाकृतीत थोडा निसर्गाचा हात असावा असं पण मला वाटतं.कारण माझ्या अनुभवातून मी सांगेन की कधी कधी डोक्यात विषय आला की शब्द आपोआप जुळून येतात आणि त्या दोन ओळी कागदावर लिहील्या शिवाय चैन पडत नाही.कधी कधी ती शब्दाची जुळणी डोकयात कायम बसते आणि कागदावर लिहून काढता येते.

कुणाला आनंद देणारी कविता आवडते तर कुणाला निसर्गावरच लिहीलेली कविता आवडते आणि कुणाला दुसर्‍या काही विषयावर कविता आवडते.पण खरं सागायचं झाल्यास मला वाटतं दुःखी मनातून कवितेची निर्मीती जास्त होते त्यामुळे हृदयाला हलवणार्‍या कविता वाचणारे जास्त लोक असतात असं मला वाटतं.तसंच विनोदी कविता लिहीणारे कवी पण असातात पण बरेच वेळा तुम्ही पहाल की त्या कविता वाचेपर्यंतच आवडतात नंतर विसरून जायला होतं. त्या उलट एखादी मनाला चटका देणारी कविता वाचल्या नंतर त्या कवितेचे शब्द आपल्या मनात घोळत असतात.जशी एखादी चटकदार डिश खाल्यावर त्याची चव जिभेवर टिकून रहाते तशीच काही.
आता यावर कुणीतरी नक्कीच विनोद करील की "शेफ" कवी होतील आणि कवी "शेफ " होतील.पण विनोदाचा भाग निराळा.

सर्व आनंद देणार्‍या गोष्टी यातनेतून निर्माण होतात उदाहरणार्थ बाळाचा "जन्म"बाळाची निर्मीती होत असताना आईला किती यातना होत असतात पण एकदा बाळ जन्माला आलं की मग तिला किती आनंद होतो.घनदाट काळोखा नंतर प्रकाशाची थोडीशी पण तिरीप किती सुखदायक वाटते.आगितून पोळून काढलेलं सोनं किती चमकदार आणि पिवळं- धमक दिसतं.यातना नंतरच्या आनंदाची अशी किती तरी उदाहरणं देता येतील.

डोक्यात,निर्मीती होत असताना जशी होते तशी होवूं द्यावी. निर्मीती हा निसर्गाचा नियम आहे.त्याला कोणी काय ही करू शकणार नाही.
म्हणून म्हणतो मनातल्या भावना प्रदर्शीत करायल कविते सारखं दुसरं प्रभावी माध्यम नाही.कविता ह्रुदयातल्या कळा प्रदर्शीत करते.मग त्या आनंदाच्या असो दुःखाच्या असो वा विनोदाच्या असो.त्या तशाच येणार.त्यावर कुणाचा कंट्रोल नाही.
कविता एक दोन वेळा नीट वाचली की त्यामधला मतितार्थ कळतो.

श्रीकृष्ण सामंत

प्रतिक्रिया

संदीप चित्रे's picture

2 Oct 2008 - 11:20 pm | संदीप चित्रे

>> कविता कुणाला विचारून लिहिली जात नाही.तिची निर्मिती होते.ती जन्माला येते.कुणाला आवडो न आवडो त्याच्या मनात घोळत असलेले शब्द जेव्हा तो कागदावर लिहून काढतो ती त्याची कविता होते.

>> कारण माझ्या अनुभवातून मी सांगेन की कधी कधी डोक्यात विषय आला की शब्द आपोआप जुळून येतात आणि त्या दोन ओळी कागदावर लिहील्या शिवाय चैन पडत नाही.

ही वाक्यं तर विशेष महत्वाची आहेत.
ती एक सुरसुरी असते आणि कुठलीही ओळ / कुठल्याही ओळी सुचल्यावर कुठे तरी तात्पुरती लिहून ठेवणं फारच आवश्यक असतं... भले मग तो कागदाचा चिटोरा, बसचे तिकीट, रेस्टॉरंटच्या बिलाचा पाठकोरा भाग इ. काहीही असो. बरं, ही कवितापण अशी लहरी असते की एकदा सुचलेल्या ओळी, लिहून ठेवल्या नाही तर, काही वेळाने तश्शाच परत आठवतीलच ह्याची खात्री नसते !

कधी असंही होतं की दोन -तीन ओळी सुचतात पण पुढे त्यांचं काहीच होत नाही .. ती कविता आपल्याकडून होणारी नसतेच बहुतेक.

आवडत्या विषयावर लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद सामंतकाका :)

श्रीकृष्ण सामंत's picture

3 Oct 2008 - 12:09 am | श्रीकृष्ण सामंत

चित्रेजी,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
आपल्या पण कविता मी वाचल्या आहेत.छान लिहिता.
पाडगांवकर म्हणतात,
"जेव्हां आपले मन जुळते
तेव्हा आपल्याला गाणे कळते"
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

संदीप चित्रे's picture

3 Oct 2008 - 2:59 am | संदीप चित्रे

चित्रेजी वगैरे म्हणू नका हो काका. एकेरीच संबोधा. अजून सगळे केस पांढरे व्हायचे आहेत :)

श्रीकृष्ण सामंत's picture

5 Oct 2008 - 7:51 am | श्रीकृष्ण सामंत

संदीप,
तुला जसं आवडेल तसंच मी म्हणेन.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

प्राजु's picture

2 Oct 2008 - 11:42 pm | प्राजु

कविता कधीही सुचते. आणि कधि तर, लिहायला म्हणून बसलं तरी नाहि सुचत.
कविता सुचण्याला वेळ, काळ आणि स्थळाचं बंधन नाही हेच खरं.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

श्रीकृष्ण सामंत's picture

3 Oct 2008 - 12:12 am | श्रीकृष्ण सामंत

प्राजु,
प्रतिक्रिये बद्दल आभार.
तू पण छान कविता लिहितेस.मला वाचायला आवडतात.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

वैशाली हसमनीस's picture

3 Oct 2008 - 11:29 am | वैशाली हसमनीस

''वाक्यं रसात्मकं काव्यम्'' अशी काव्याची व्याख्या केली गेली आहे.

श्रीकृष्ण सामंत's picture

5 Oct 2008 - 7:54 am | श्रीकृष्ण सामंत

वैशाली ,

मला ही व्याख्या आवडली.प्रतिक्रिये बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

धनंजय's picture

6 Oct 2008 - 7:41 am | धनंजय

स्फूर्ती येईल तसे लिहिले, तर मनाला भिडते.

पद्मश्री चित्रे's picture

6 Oct 2008 - 9:24 am | पद्मश्री चित्रे

>>कविता ह्रुदयातल्या कळा प्रदर्शीत करते.मग त्या आनंदाच्या असो दुःखाच्या
खरच.
खुप आवडला हा लेख. पटला ..
मनात विचार येवुन लिहिता न येण्यात किती वेदना असतात ते अनुभवून कळते..

श्रीकृष्ण सामंत's picture

6 Oct 2008 - 10:35 am | श्रीकृष्ण सामंत

धनंजय,फुलवा,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com