<strong>(रेस-पार्ट-टू)</strong>
‘तिकिट...’
‘दादा जवळ मागच्या डब्यांत आहे...’
‘फर्स्टक्लास चं आहे कां...?’
‘सॉरी, मी मध्यप्रदेशातून आलोय, मला माहीत नव्हतं की लोकल मधे देखील फर्स्टक्लास असतो...’
‘पकडलं गेल्यावर लोक असंच काहीतरी सांगतात...’
-------------
वराती सोबत पुण्याहून परतलो...त्या लग्नाची पार्टी रात्री साडे बारा ला संपली. घरी येऊन झोपलो तर दीड वाजला होता. सकाळी नवरया मुलाच्या मोठ्या भावाने मला उठवलं, म्हणाला-‘चल, राम काकांना स्टेशनपर्यंत सोडून येऊं. तू साइकिलीवर त्यांची सूटकेस ठेवून घे.’
मी तसाच पैंट-शर्ट घालून निघालो. पर्स बैग मधेच राहून गेली (त्यांत रेलवेचा फ्री पास होता). साइकिल घेऊन मी स्टेशनावर पोचलो, तर दादा आणि काका आधीच उभे होते. मला बघतांच दादा म्हणाला-‘हे घे पैसे, साइकिल स्टैंडला ठेवून तीन तिकिटं घेऊन ये. त्यांत दोन रिटर्न तिकिटे आणशील, आपण काकांना कल्याण पर्यंत सोडून येऊ.’
मी पहिल्यांदाच मुंबईला गेलो होतो. तीन दिवसांपूर्वी रात्री याच काकांसोबत अंबरनाथला उतरलो होतो. महानगरी एक्सप्रेसनी रात्री साडे सात वाजता कल्याणला पोचलो. महानगरीच्या प्लेटफार्महून लोकलच्या प्लेटफार्म वर आलो. गर्दीसोबत लोकलमधे कधी शिरलो मला कळलंच नाही. दहा मिनिटांत अंबरनाथ, तिथून घरी. दुसरया दिवशी दुपारी दोन वाजता बसनी वराती सोबत पुणे.
-------------
म्हणूनच अाज दादा म्हणाला की तिकिट घेऊन ये, तर कां कुणास ठावुक मला थोडी भीती वाटली. पहिल्यांदाच लोकल मधे दिवसा चढायला मिळणार होतं. मी तिकिट घेतलं, परतलो आणि दादा ला दिलं. आम्ही प्लेटफार्मवर आलो. सहा वीसच्या लोकल ची एनाउंसमेंट झाली. दादा-काका थोडेसे मागे उभे होते. लोकल येताच मी दादा ला इशारा केला की समोर आलेल्या डब्यांत चढतोय. त्याने ओके म्हटलं. मी चढलो आणि लोकल सुटली. काकांची सूटकेस माझ्याच हातात होती. ती मी वाकून खाली ठेवली, उभा राहिलो आणि मागून आवाज आला-तिकिट. मी चमकून बघितलं, तो टीटी होता.
मी त्याला सांगितलं-‘दादा मागच्या डब्यांत आहे, तिकिट त्याच्या जवळ आहे.’
तो म्हणाला-‘फर्स्ट क्लासचं आहे कां?’
मी नर्व्हस झालो-‘तिकिट तर आर्डनरी आहे.’
‘मग...हा फर्स्ट क्लास आहे.’
मी म्हटलं-‘हे बघा, मी मध्यप्रदेशातून आलोय, पहिल्यांदाच लोकल मधे चढलोय, मला माहीत नव्हतं की लोकल मधे देखील फर्स्ट क्लास असतो.’
तो म्हणाला-‘पकड़े जाने के बाद हर आदमी ऐसा ही कहता है.’
मी म्हटलं-‘मैं ऐसा क्यों करुंगा? मैं बता तो रहा हूं कि मध्यप्रदेश का रहने वाला हूं और पहली बार ही लोकल में चढ़ा हूं। मुझे नहीं मालूम कि लोकल में भी फर्स्टकलास होता है। हां..., रोज आने-जाने वाले ऐसा कर सकते हैं...’
झालं...शेजारी उभे असलेले यात्री मला म्हणाले-
‘म्हणजे आम्ही सगळे काय खोटं बोलतो की काय...!’
टीटी म्हणाला-‘तिकिट असेल तर 28 रुपए, नसेल तर तीस रुपए फाइन द्यावा लागेल.’
मी काही म्हणणार इतक्यांत गाडी थांबली-कल्याण.
(अरे म्हणजे भुर्दंड ही भरायचाय आणि एन्जॉय पण करतां आलं नाही...)
तो माझ्या सोबतच उतरला. दादाने माझ्या सोबत त्याला बघतांच खिशांतून पर्स काढली आणि मुकाट्याने फाइनचे पैसे दिले. काकांना सोडून आम्हीं परतलो. तो स्कूटरनी व मी साइकिली ने गेलो.
प्रसिद्धी माणसाच्या अाधी पोचते, याचा प्रत्यय त्या दिवशी पहिल्यांदा आला. मी घरी पोचलो, तर सगळ्यांच्या चेहरयावर निराळेच भाव होते. दुपारी आम्ही काही मंडळी नवा जोडप्यासोबत टिटवाळ्याच्या गणपतीला गेलो.
प्लेटफॉर्म वर लोकलची वाट बघत असतांना आमच्या पैकी एक बोलला-
‘त्याच्यासाठी फर्स्ट क्लास चं तिकिट काढा बरं का...?’
पुढच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता मी घरून निघालो. मला डोंबिवलीला राहणारया माझ्या काकांकडे जायचं होतं.
अंबरनाथमधील आर्डिनेंस फैक्टरीच्या कॉलोनीतलं काकांचं लगीनघर ऐसपैस होतं. बाहेर येऊन मी रस्त्यावर पोचतांच बस दिसली. हात देऊन थांबवली. चढलो, कल्याणचं तिकिट घेतलं. कंडक्टरलाच विचारलं की मला डोंबिवलीला जायचंय. तो म्हणाला कल्याण हून लगेच बस मिळेल की. बस मिळाली देखील. डोंबिवली वाल्या कंडक्टरला म्हटलं-‘मला दत्तानगर ला जायचंय..’
तर ताे म्हणाला-‘बाजारात उतरुन जा, तिथून जवळ पडेल.’
मी म्हटलं-‘सांगशील.’ तो हो म्हणाला. अर्ध्या तासानंतर त्याने सांगितलं-पुढच्या स्टाॅप वर उतरुन जा. तसा मी उतरलो. इथून कुठे. समोर एक आजीबाई भाजी घेऊन बसल्या होत्या. तिला विचारलं-दत्ता नगर कुठे आहे. तिने बोट दाखवलं म्हणाली पुढे जाऊन विचारुन घेशील. तसा मी पुढे गेलो. एका दुकानदाराला विचारलं-‘...कुठे राहतांत...’
‘माहीत नाही, काय पत्ता सांगितलाय...अच्छा, वो नेवी में थे क्या...!’
मी म्हटलं-‘हो...’
‘अरे यार..., वो सामने वाली बिल्डिंग में तो रहते हैं, दूसरे माले पर.’
मी पार सुखावलो. त्या घरी पोचलो, बेल वाजवली.
दार किलकिलं करुन कुणीतरी विचारलं-‘कोण पाहिजे?’
मी म्हटलं-‘...काका आहेत कां...?’
‘नाहीये, तुम्हीं कोण...’
अजून दार उघडलेलं नव्हतं.
‘मी बिलासपुरहून आलोय, त्यांचा भाचा...’
आता दार उघडलं आणि काकू समोर आल्या.
म्हणाल्या-‘ते येतच असतील, सहा वाजून पांच मिनिटांपर्यंत येतात.’
नकळत माझी नजर समोर घड्याळा कडे गेली. सहा वाजून दोन मिनिटे झालेली होती. इतक्यांत लहान मुलगा धावत आला-‘बाबा आले...’
काकू म्हणाल्या-‘ते आले...’
काकांनी मला लगेच ओळखलं-‘अरे, तू केव्हां आला? सामान वगैरे कुठे? आधी सांगायचं नाही कां...?’
मी सांगितलं अंबरनाथ ला उतरलोय. मग काकांनी माझी ओळख करुन दिली. काकू, दोघं भाऊ. दोघांशी गट्टी जमली. मग काकांनी मला डोंबिवली फिरवून आणलं. त्यांच्या दोघी बहिणी तिथेच होत्या. दोघींची भेट झाली. परतलो, काकांनी थालीपीट केलं. म्हणाले आता इथेच थांबून जा. मी म्हणालो नाही. काकूला सांगितलंय की परत येतोय. बरं म्हणत ते मला खाली सोडायला आले. ऑटो करुन दिला.
त्याला म्हणाले-‘मेरा भतीजा है, इसको स्टेशन पर टिकट काउंटर पे छोडना.’
त्याने मला फक्त सोडलंच नाही तर तिकिट घेतल्यानंतर लोकल कुठल्या प्लेटफार्म वरुन मिळेल हे देखील सांगितलं. अंबरनाथ साठी लोकल दहा मिनिटांनी होती. मी घरी पाेचलो तर साडे अकरा वाजले होते. मी दार वाजवलं.
काकूनी दार उघडलं, म्हणाली-‘मला वाटलं तू ... कडेच राहणार...’
आज मला परतीच्या प्रवासावर निघायचं होतं म्हणून सकाळी मी पहिल्या लोकल नी निघालो. दादाने मला स्टेशनावर सोडलं. विचारलं देखील की चलूं का कल्याण पर्यंत. मी त्याला नाही म्हटलं.
आज मी लोकलमधे मुद्दाम फर्स्टक्लासचा डबा शोधून चढलो. कारण मजजवळ रेलवेचा फ्री पास होता. तर आज कुणीच तिकिट विचारलं नाही. कल्याण ला उतरलो, बैग खाली ठेवण्या करितां वाकलो अन आवाज आला-‘तिकीट...’
मी म्हटलं-‘पास आहे...’
‘दाखवा...?’ वाकून पास काढता-काढता मी त्याला विचारलं गीतांजली कुठे येईल? माहीत नाही. पास बघून तो निघून गेला. गीतांजली आली तर मी पुन्हां हैराण झालो. इंजिन पासून गार्डच्या डब्यापर्यंत चक्कर मारली. फर्स्टक्लासचा डबाच नव्हतां. शेवटी टीटी ला विचारलं-रेलवेचा पास आहे, नागपूर ला जायचंय, कुठे बसूं. त्याने मला बघितलं-म्हणाला एस-7 मधे जाऊन बैस. (त्यानेच सांगितलं-गीतांजली ला फर्स्टक्लास नसतो)
त्याप्रमाणे एस-7 मधील एका बर्थवर जाउन बसलो. गाडी सुटल्यानंतर बसलेल्या माणसाने विचारपूस केली. मी सांगितलं नागपूरला जायचंय. तो म्हणाला मला कोलकाता पर्यंत जायचंय. तू दूसरी जागा बघून घे. मी जागा बदलली. नाशिक पर्यंत जिथे बसलो होताे त्याने मनमाड़च्या जवळपास मला विचारलं रिजर्व डब्यांत तूू कसा काय बसला आहेस. मी सांगितलं वडील रेलवेत आहेत, माझ्याजवळ पास आहे. अच्छा...मग त्याची भाषा, व्यवहार, माझ्या कडे बघण्याचा दृष्टिकोण बदलला. मग त्याने माझ्याशी गप्पा मारल्या. तो इंजीनियर होता आणि पहिल्यांदा गीतांजलि ने कोलकात्याला जात होता. मी त्याला त्याच्या प्रवासाची कल्पना दिली. नागपूरचं विमानतळ दाखवलं...आणि संध्याकाळी नागपूरला उतरलो...तिथे एक दिवस राहून बिलासपूरला परतलो...
आता लोकलमधील प्रवासाची माझी भीति संपली होती...पण त्यासाठी 28 रुपए भुर्दंड भरावा लागला होता...
स्वस्तात सुटलो...नाही कां...
-----------------
प्रतिक्रिया
8 Nov 2016 - 8:04 pm | राघवेंद्र
मस्तच, रेल्वे च्या गोष्टी वाचायला आवडतात.