कडबोळी: दिवाळी स्पेशल

अनन्न्या's picture
अनन्न्या in पाककृती
27 Oct 2016 - 10:26 am

सर्व मिपाकरांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!!
पूर्वी अठराधान्यांची कडबोळी करत असत. अगदी अठरा नाही पण जी घरात उपलब्ध होती ती घेऊन केलेली खमंग कडबोळी!
साहित्यः
भाजणीसाठी: तांदूळ १ कि. ( मी गावठी वापरले), चणाडाळ अर्धा कि., उडीद पाव कि., एक वाटी पोहे, एक वाटी साबूदाणा, पाव वाटी तूरडाळ, पाव वाटी मसूरडाळ, पाव वाटी नाचणी, पाव वाटी मूग, पाव वाटी ज्वारी, अर्धी वाटी धने, पाव वाटी जीरे.
कडबोळ्यांसाठी: एक कि. भाजणी, पाऊण लि. पाणी, तेल १५०मिली, ओवा पाव वाटी, तिखट, मीठ, हळद, तेल तळणीसाठी.
कृती:
तांदूळ धुवावेत आणि सावलीत वाळवावेत. धुतलेले तांदूळ आणि बाकी सर्व साहित्य भाजून घ्यावे. खूप जास्त भाजू नये. उडीद भाजताना काळजी घ्यावी. भाजलेले सर्व साहित्य एकत्र करून बारीक दळून आणावे.
kadboli
कडबोळी करायला घेताना एक कि. भाजणी मोजून घ्यावी, पाऊण लि. पाणी गरम करावे. ओवा मिक्सरला जरा फिरवून घ्यावा. पिठात ओवा, तिखट चार चमचे, हळद एक चमचा, मीठ मिसळावे. तेल चांगले गरम करून पिठावर घालावे. गरम पाणी घालावे. सर्व मिश्रण नीट एकत्र करून झाकून ठेवावे. अर्ध्या तासाने भाजणी चांगली मळून घ्यावी. मी फूडप्रोसेसरला फिरवून घेते. तयार पिठाचा गोळा घेऊन ताटाच्या पाठच्या बाजूला लांब वळावे. मग चकलीसारखे गुंडाळावे.
kadboli
कढईत तेल चांगले तापवावे. तयार कडबोळी मध्यम गॅसवर छान कुरकुरीत तळावीत. लोण्याबरोबर फस्त करावीत. चकली तर वर्षभर असतेच. या दिवाळीला बघा कडबोळी करून!
kadboli
मी कडबोळ्याच्या भाजणीत अख्खे हरभरे घालत नाही. हरभरे वापरले तर कडबोळी खाल्ल्यावर जळजळ होते, हा माझा अनुभव पण तुम्ही वापरून पहायला हरकत नाही.

प्रतिक्रिया

लाडू's picture

27 Oct 2016 - 10:59 am | लाडू

तुम्हालाही दिवाळीच्या शुभेच्छा :)
कडबोळी मस्तच दिसतायत.

अत्रुप्त आत्मा's picture

27 Oct 2016 - 11:53 am | अत्रुप्त आत्मा

वाहव्वा! एक नंबर.

माझीही शॅम्पेन's picture

27 Oct 2016 - 11:54 am | माझीही शॅम्पेन

मस्त पा कृ धन्यवाद

हल्ली हा पदार्थ फाफार कमी झालाय अस वाटत

अनन्न्या's picture

27 Oct 2016 - 12:18 pm | अनन्न्या

पण कोकणात अजूनही कडबोळी केल्याशिवाय दिवाळी होत नाही.

स्वाती दिनेश's picture

27 Oct 2016 - 1:10 pm | स्वाती दिनेश

कडबोळी मस्त दिसत आहेत, पटकन एक घेऊन खावं अशी..
स्वाती

सुबोध खरे's picture

27 Oct 2016 - 1:12 pm | सुबोध खरे

. हरभरे वापरले तर कडबोळी खाल्ल्यावर जळजळ होते,
हायला
इथे न खाताच जळजळ होते आहे. हरभऱ्याचे काय घेऊन बसलात?

सस्नेह's picture

27 Oct 2016 - 2:46 pm | सस्नेह

हरभरे घाल अगर न घाल, बघूनच जळजळ होतेय..
मस्त फोटू !!

अजया's picture

27 Oct 2016 - 9:43 pm | अजया

सर्व सुगरणींना साष्टांग नमस्कार!

सुंदर!! थट्टेने चकली बिघडली की त्याची कडबोळी होतात असं म्हणतात. पण ही रेसिपी आणि कडबोळी बघून असं अजिबात बोलणार नाही कोणी.

खमंग दिसतायेत.

त्रिवेणी's picture

27 Oct 2016 - 3:22 pm | त्रिवेणी

किती एकसारखी वळली आहेस ग.

अनन्न्या's picture

27 Oct 2016 - 4:37 pm | अनन्न्या

आमच्याकडे प्रमाण खूप असते ना.
धन्यवाद सर्वांचे!

पिलीयन रायडर's picture

27 Oct 2016 - 6:54 pm | पिलीयन रायडर

अशी बरोब्बर एका सारखी दुसरी कडबोळी जमतेच कशी?? तळल्यात पण करेक्ट्ट एकाच रंगावर!!

मला माहिती नव्हतं की हा इतका भारी प्रकार आहे. लोक काही वाईट झालं की एखाद्या गोष्टीचं कडबोळं झालं असं का म्हणतात मग?

जे लोक्स कडबोळं झालं म्हणतात त्यांनी हरभरे घातलेली कडबोळी खाल्ली असावी, त्याने जळजळ होते असे ईशाचे म्हणणे आहे.

नूतन सावंत's picture

27 Oct 2016 - 6:59 pm | नूतन सावंत

सुरेख वळली न तळली सुद्धा आहेस,पटकन उचलून घ्यावीशी वाटताहेत.

मस्त दिसताहेत! खमंग प्रकार!

सही रे सई's picture

27 Oct 2016 - 7:26 pm | सही रे सई

अनन्या ताई मस्तच दिसतायत कडबोळी.. आणि भाजणी सकट कृती दिलीस ते फार बर झाल..

पियुशा's picture

27 Oct 2016 - 8:21 pm | पियुशा

सुगरण ताई :)

रेवती's picture

27 Oct 2016 - 9:11 pm | रेवती

अग ए! भेट एकदा...............कडबोळी घेऊन!
कडबोळीचा असा आकार पहिल्यांदाच पाहतिये.
आधी एकच वेढा व चिमटीत दाबणे असा पाहिला होता, खाल्ला होता, केला होता.

अनन्न्या's picture

27 Oct 2016 - 9:30 pm | अनन्न्या

आमच्याकडे कोकणात चकली नसेच कडबोळी करंजी आणि घरच्या भाताचे पोहे भेट दिले जायचे

उल्का's picture

27 Oct 2016 - 10:13 pm | उल्का

भाजणीचे माहित नव्हते. आम्ही फक्त तांदळाच्या पीठाची करतो.
सुंदर फोटो.

पोह्यांचा विषय निघालाच आहे तर मध्ये कोणीतरी दिवाळीत होणाते पोह्यांचे सतराशे साठ प्रकार असलेला धागा काढला होता. त्याची लिंक आहे का कोणाकडे?

मनीषा's picture

28 Oct 2016 - 7:38 am | मनीषा

कडबोळी छान दिसतायत.
शुभ दिपावली !

स्नेहल महेश's picture

28 Oct 2016 - 11:27 am | स्नेहल महेश

सुंदर फोटो.

औरंगजेब's picture

28 Oct 2016 - 1:45 pm | औरंगजेब

नका हो नका आधीच भूक लागल्ये त्यात असे चविष्ट पदार्थ