बुद्धाची शिकवण आणि आपण,
"खून ऋजुरात" आमच्या कंपनीच्या थायलंड युनिटची स्टोर्स मॅनेजर. अतिशय बुद्धिमान, दर आठवड्यात होणाऱ्या प्रोजेक्ट स्टेटस मिटिंगमधे कंपनीच्या सीईओच्या प्रश्नांनी फाफलणारे एक आम्ही आणि एका दमात क्रिस्टल क्लीअर रिपोर्ट देणारी "खून ऋजुरात" दुसरीकडे. ३० जणांच्या स्टाफला आणि स्टोर्स डिपार्मेंटला लीलया हाताळते. ऑडिटर्सना आजतागायत स्टोर्स डिपार्टमेंटच्या चुका शोधता आल्या नाहीत. तिच्या कामाची पद्धत इतरांनाही शिकावी म्हणून तिला मागे आमच्या स्विझर्लंड युनिटच्या स्टोर्स डिपार्मेंटला ट्रेनिंग देण्यासाठी पाठवले होते.
"खून नुआन" परचेस डिपार्टमेंटमधील एक सर्व साधारण स्टाफ, कायम कामात गढून गेलेली पण उत्तम विनोदबुद्धी असलेली. कधी कॉफी मशीनपाशी भेटली तर आंनदाने मला कॉफी बनवून देणारी. अशीच अजून एक "खून वानविस्या" जॉईन झाल्यापासून सेफ्टी पॉलीसीमधे अमूलाग्र बदल घडवून आणणारी कंपनीची डॅशिंग सेफ्टी ऑफिसर.
आवांतर:- थाई भाषेत Mr., Mrs, Miss या सगळ्यांसाठी "खून" हा कॉमन शब्द वापरला जातो.
आता तुम्ही म्हणाल "धत तेरी" यात काय विशेष आहे? भारतात अशी उधाहरणे सतराशे सत्त्याण्णव, अगदी किलोच्या भावात सापडतील, पण मी जेव्हा सांगेन कि यातली पहिली "लेडी बॉय" आहे, दुसरी "टॉमबॉय" आहे आणि तिसरी "गे" आहे तेव्हा खात्रीने सांगतो, भारतातल्या उधाहरणासाठी तुम्हाला १०० ग्रॅमचं मापही जास्त होईल. माणूस म्हणून जगण्याचा अधिकारच नाही तर समान हक्कांच्या जोडीला आदरही देणाऱ्या थाई समाजाच्या वैशिष्ट्याला सलाम केल्याशिवाय तुम्ही रहाणार नाही.
आपण ज्याला किन्नर, तृतीयपंथी किंवा हिजडा संबोधतो तो समाज थायलंडमधे ठायी ठायी सापडतो. तो तुम्हाला भाजीवाला म्हणून दिसेल, मासे विकणारी कोळीण म्हणून दिसेल, ७/११ शॉपमधे अदबीने स्वागत करत काम करणारे दिसतील, तुमच्या गाडीत पेट्रोल भरतांना गन धरून असलेला दिसेल, बँकेत अधिकारी म्हणून दिसेल, टूर गाईड म्हणून दिसेल, ट्रक चालवणारे दिसतील, एअरपोर्टवर ग्राउंड स्टाफ म्हणून दिसतील इतकंच काय थाई राजाच्या ग्रँड पॅलेस मधे सिक्युरिटी गार्ड म्हणूनही दिसतील. आणि या सगळ्यांत न शिकलेले तुम्हाला पटाया बीचवर देह विक्रय करणारे म्हणूनही दिसतील.
काठोकाठ भरलेल्या दुधाच्या भांड्यात दूध उतू जाऊ न देता साखर जशी विरघळते तितक्या सहजतेने हि मंडळी थाई समाजात सामावली गेली आहेत. इथे कुणी स्वतःची "थर्ड जेंडर" हि आयडेंटी लपवतांना दिसत नाही. यातली टॉमबॉय असलेली "खून नुआन" आमच्या युनिअन लिडरची मुलगी आहे म्हणजे एका बापाला आपल्या मुलीचं स्टेटस समाजापासून लपवावंसं वाटत नाही हे विशेष.
हिच ऋजुरात, नुआन आणि वानविस्या भारतात जन्माला आल्या असत्या तर एखाद्या सिग्नलवर टाळ्या वाजवत भिक मागत असतांना दिसल्या असत्या. अश्याच कुठल्याश्या उकिरड्या वस्तीत, पत्र्याच्या घरात दिवस कंठत असत्या. "जगा आणि जगू द्या" हा महान संदेश देणाऱ्या बुद्धाचा जन्म भारतात व्हावा मात्र विचारांची फुलं थायलंडमधे पडावीत हा आपला कपाळ करंटेपणा म्हणायला हवा. ख्रिस्ती देशांत आजही पृथ्वी सपाट आहे असं मानणारे लोकं जसे सापडतात तसे "हिजडा" म्हणजे मागच्या जन्मीची पापं असं मानणारे बरेच भारतीय सापडतील (बरेच हा शब्द 'सगळेच'असा वाचलात तरी हरकत नाही)
आजकाल वाढत चाललेली नास्तिकांची संख्या पहाता असं म्हणतात कि विज्ञानात आपल्या अंधश्रद्धांचे जस जसे तर्क सापडत जाणार तस तसा देव अधिक दुर होत जाणार. पण त्याच विज्ञानाने कितीतरी आधी "किन्नर" म्हणजे फक्त हार्मोनल मिस मॅच आहे. यात त्या जिवाची काहीही चूक नाहीये हे सांगितले असतांना देखील "पूर्वजन्मीचे भोग" हे लेबल नास्तिक लोकही सहज लावतांना दिसतात. त्यांना जन्म देणाऱ्या आई-बाबांना समाजाची सहानुभूती मिळते, खुनी, चोर, रेपिस्ट उजळ माथ्याने समाजात वावरतात पण स्वतःची काही चूक नसलेल्या आणि कोणताही त्रास न देणाऱ्या हिजडा समाजाला तिरस्काराशिवाय आपण काहीही देत नाही.
अर्जुन देखील बृहन्नडा झाला होता, रामायणात देखील किन्नरांचा आदरार्थी उल्लेख आहे. मोगलांच्या भटारखान्यात किन्नरांचा मुक्त वावर होता. आपल्यावरचे हे सगळे संस्कार गेले कुठे? काही म्हणतात त्यांच्या बीभत्स हावभाव, भडक मेकअप तसेच त्यांच्या लोकांकडून पैसे काढण्याच्या पद्धती यामुळे असावा. पण त्यांच्यावर भीक मागण्याची परिस्थिती आणली कोणी? एखाद्याचा हात अपघातात तुटला किंवा पाय तुटला तर आपण त्याचा स्वीकार करतो. मात्र केवळ लिंग ठरवणारा अवयव बाद झाला तर त्याला अयोग्य समजतो. अजबच आहे सगळं.
खून ऋजुरात जेव्हा याबद्दल मला तुमच्या भारतात कसं असतं? असं विचारते तेव्हा खरंच मान शरमेने खाली जाते. तिला फक्त एव्हढच सांगतो कि तू नशिबवान आहेस भारतात जन्माला आली नाहीस. आम्ही खूपच मागासलेले आहोत. थाई समाजाने तुमच्या जगण्याचा अधिकार मान्य केला आहे पण भारतात अजूनही हि मंडळी. रेशनकार्ड, इलेक्शन कार्ड आणि मरणोत्तर विधीसाठी हक्काची स्मशानभूमी यासाठी कोर्टाच्या पायऱ्या झिजवताहेत.
१५ एप्रिल २०१४, सुप्रिम कोर्टाच्या ऐतिहासिक निर्णयात "थर्ड जेंडर" हि आयडेंटिटी हिजडा समाजाला मिळाली देखील पण आजही पाच लाख (Third gender census count २०१४) किन्नर, दुय्यम नागरिक म्हणूनच जगताहेत. कितीतरी ऋजुरात, कितीतरी नुआन आणि वानविस्या या पाच लाखांत घुसमटत असतील. काल्की सुब्रमण्यम, गौरी सावंत, लक्ष्मी नारायण त्रिपाठी, LGBTI ऍक्टिविस्ट बिंदूमाधव खैरे यांसारखे काही आशेचे किरण या समाजाला लाभलेत हि एक जमेची बाजू धरली पाहिजे.
बुद्धाची शिकवण आपल्या देशात वाया गेली असं तुम्हाला वाटतं का?
प्रतिक्रिया
23 Oct 2016 - 9:25 am | खटपट्या
जबरदस्त लेख बाजीप्रभू साहेब. आपण अशा लोकांना कशी वागणूक देतो हे आठवून शरमेने मान खाली गेली...
23 Oct 2016 - 9:38 am | एस
सहमत आहे. वरवर सहिष्णू भासणाऱ्या आपल्या संस्कृतीत अशी द्वेषाची मुळे घट्ट रोवून आहेत हे दुर्दैव!
23 Oct 2016 - 9:50 am | राही
मुंबई, महाराष्ट्र आणि आता देशभरात 'अनाम प्रेम' या नावाखाली एकत्र आलेल्या एका मोठ्या लोकसमूहाने या लोकांविषयीच्या प्रश्नांना नुसतीच वाचा फोडली नाही तर त्यांना आत्मसन्मानाने जगू देण्याच्या संधी निर्माण करण्यासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गेली कित्येक वर्षे कोणताही गाजावाजा न करता काम सुरू ठेवले आहे.
आपला लेख आवडला.
23 Oct 2016 - 10:34 am | पिलीयन रायडर
लेख फारच आवडला. खरंच भारतात परिस्थिती फार वाईट आहे. :(
23 Oct 2016 - 1:11 pm | ओम शतानन्द
विचार प्रवर्तक लेख
23 Oct 2016 - 2:18 pm | डॉ सुहास म्हात्रे
लेख आवडला.
एकीकडे युगप्रवर्तक विचार आमच्या ग्रंथांत ठासून भरलेले आहे असे म्हणणार्या आपल्या समाजात दुसरूकडे अश्या नकारात्मक ग्रह/समजूतीही ठासून भरलेल्या आहेत. :(
23 Oct 2016 - 2:38 pm | अनंत छंदी
लेखातील "त्याना" ही स्वत:ची ओळख हवी, आत्मसन्मान द्यायला हवा ही बाजू १००% पटली. त्यांना जगण्याची समान संधी मिळायलाच हवी. पण, त्याच बरोबर त्यांनीही नीट वागायला हवे हे देखील हवे. हे मत मी व्यक्त करताच माझ्यावर टिकेची झोड उठण्याची शक्यता आहे. पण मी पाहिलेली एक बाजू आपणासमोर मांडतो. पुणे ते लोणावळा या दरम्यान या लोकांची एक वसाहत आहे. त्यातील लोक पुणे लोणावळा लोकलमध्ये भीक (?) त्याला खरेतर खंडणी म्हणणे जास्त योग्य होईल. मागतात. ज्या पद्द्धतीने पैसे मागितले जातात व न दिल्यास अश्लील व अर्वाच्च्य शब्दात त्या माणसाची निरभर्त्सना केली जाते ते ते पाहता या लोकांची दया येणे तर दूर किळस वाटू लागते. यातील अनेकांची कमाई दिवसाला ५ ते ६ हजार रुपये इतकी असते. (माहिती खात्रीशीर आहे) त्यामुळे ते लोक अन्य काही करू पहात नाहीत.
24 Oct 2016 - 2:15 pm | अप्पा जोगळेकर
ज्या पद्द्धतीने पैसे मागितले जातात व न दिल्यास अश्लील व अर्वाच्च्य शब्दात त्या माणसाची निरभर्त्सना केली जाते ते ते पाहता या लोकांची दया येणे तर दूर किळस वाटू लागते.
हे जरा अतिच सेन्सेटिव्ह होतय नाही का ? याहून जास्त त्रास लोकलच्या गर्दीमुळे होतो. तो मुकाट झेलला जातो.
तृतीयपंथी इतके अॅग्रेसिव्ह वगैरे नसतात. थोडा-फार तमाशा करतात. ती किळस वगैरे तुमच्या मनात आहे.
यानिमित्ताने उगाचच '१०० रुपयांच्या बदल्यात १ किस' असे किन्नरांबरोबर डील करणारा मित्र आठवला.
24 Oct 2016 - 6:30 pm | सुबोध खरे
अप्पा साहेब
टोकाचे अनुभव बऱ्याच लोकांना आलेले आहेत म्हणून ते असे नमूद केले जातात. माझ्या भावाचे लग्न ठरलेले असताना तो आपल्या वाग्दत्त वधू बरोबर गिरगाव चौपाटीवर बसलेला असताना दोन तृतीय पंथी आले आणि १०० रुपयांची मागणी केली. (१९९० साली हि रक्कम मोठी होती) आणि हि रक्कम न दिल्यास आपले कपडे फेडू म्हणून धमकी दिली. माझा भाऊ निःसंग होता म्हणून त्याने एक पैसा हि देण्यास नकार दिला. एक तृतीय पंथीने आपली साडी वर केली. तरीही माझ्या भावाने एकही पैसा दिला नाही म्हणून ते नाद सोडून निघून गेले. परंतु आजू बाजूच्या जोडप्यानकडून मात्र ते असे जबरदस्तीने पैसे उकळताना दिसत होते.
पैसे मिळवण्यासाठी हे लोक "अंगचटीला" येतात हा मात्र सार्वत्रिक अनुभव आहे.आपल्या अंगाला हात लावलेला कोणत्या स्त्रीला आवडेल? दुसऱ्या कोणी भिकाऱ्याने आपले/ आपल्या बायकोचे गाल कुरवाळले तर आपण त्याच्या कानाखाली आवाज काढाल कि नाही?
तेंव्हा टाळी फक्त एकाच हाताने वाजत नाही हेही लक्षात ठेवा.
बाकी जनता त्यांच्याशी हिडीस फ़िडीस करून वागते यात संशय नाही. त्यांना पण माणसासारखे वागवणे आवश्यक आहे एवढेच नव्हे तर तो त्यांचा हक्क आहे.
24 Oct 2016 - 7:29 am | बाजीप्रभू
अनंत छंदी, तुम्हाला आलेला अनुभव इतर बऱ्याच जणांना आला असेल. मनुष्याला असलेल्या षडरिपुंची बाधा याला तेही अपवाद नाहीत. लोभ हा कुणाला चुकलेला नाही. समाजाने वाळीत टाकल्याचा क्रोध, त्यांना माहित असलेली त्यांच्याबद्दल समाजात असलेली एकप्रकारची भीती या सर्वांचा परिपाक तुम्हाला आलेल्या अनुभवात होतो. पण मुद्दा संधी देण्याचा आहे. संधी असूनही ते भिक मागण्याला प्रेफरन्स देत असतील तर तुमचा मुद्दा बरोबर आहे, पण मला वाटत नाही असं होईल.
थर्ड जेंडर ऍक्टिविस्ट "गौरी सावंत" हि खरंतर माझी सख्खी आतेबहीण आहे. तिच्या रेफरन्स नुसार आपण जे "छक्का" म्हणून हिणवतो ते बहुतांशी चांगल्या घरातून आलेली मुलं/मुली असतात. कुठेतरी १०/१२ व्यावर्षी हे सिम्टन्स दिसू लागतात. मग आई-वडिलांची मारझोड, शाळेतील टिंगल-टवाळीला कंटाळून शाळा सुटणे, प्रचंड घुसमट आणि सरतेशेवटी घर सोडून नाईलाजाने यावस्तीत आश्रयाला येणे.. हा कॉमन पॅटर्न या समाजात दिसतो.
सांगायचा मुद्दा असा कि, आईवडिलांचा खंबीर सपोर्ट असेल तर हि मंडळी इतर समाजाला नक्कीच तोंड देऊ शकतात. पण आई-वडीलच जिथे कच खातात तिथे यांचा नाईलाज होतो. आपल्याकडे मेंटली चॅलेंज, मंदबुद्धी मुलांचा आई-बाप सांभाळ करतांना दिसतात पण "किन्नर" म्हणून जन्माला आलेल्या मुलाला हाकलून देण्यात धन्यता मानतात हि भारतातील शोकांतिका आहे.
या लोकांमधे टॅलेंड आणि शारीरिक क्षमतेत कोणतीही कमी नसते. थायलंडसारख्या देशाने हे शक्य करून दाखवले आहे, आपणही नक्की करू शकतो.
24 Oct 2016 - 9:07 am | नाखु
तर आवडलाच पण हा प्रतिसादही तुमची विषयाबाबत असलेली आस्था आणि सखोल अभ्यास दाखविणारा आहे.
आप्ल्या बहिणीला कार्याबद्दल शुभेच्छा आणि एका वेगळ्या प्रबोधनपर लेखासाठी आपले अभिनंदन.
24 Oct 2016 - 9:02 am | आतिवास
एका वेगळ्या विषयावर चर्चा सुरू केल्याबद्दल आभारी आहे.
तुमचे अनुभव वाचायला आवडले. पण
१. शहरी-ग्रामीण हे विभाजन थाईलँडमध्ये टोकदार आहे. त्यामुळे तुम्हाला दिसलेले चित्र शहरी भागात प्रातिनिधिक असले तरी ग्रामीण भागात परिस्थिती वेगळी आहे.
२. बौद्ध धर्म - थाईलँडप्रमाणेच थेरवाद बौद्ध धर्म म्यानमार आणि श्रीलंकेतही आहे. तिथंही शहरांत एलजीबीटीना लोकांनी काही अंशी स्वीकारले आहे असं दिसतं - पण संपूर्ण देशाबाबत ते म्हणता येणाार नाही.
३. तुमच्या आधीच्या लेखात तुम्ही लिहिल्याप्रमाणे दुस-या महायुद्धाने थाईलँडमध्ये अनेक बदल झाले. हाही त्यातला एक बदल, पण तो बराच वरवरचा आहे. समाजाने व्यक्तींचे चाकोरीबाहेरचे (हा शब्द कदाचित अयोग्य आहे, स्टिरिओटिपिकल म्हणायचं आहे मला) लैंगिकत्व स्वीकारण्यासाठी थाईलँडला आपल्यासारखीच अजून बरीच वाटचाल करायची आहे.
अवांतर - ज्यांना या विषयात अधिक रस आहे त्यांनी हा अहवाल जरूर वाचावा.
25 Oct 2016 - 9:49 am | बाजीप्रभू
काल अहवाल वाचता होतो पण दुसऱ्या महत्वाच्या कामामुळे बाकी ठेवावा लागला. पुर्ण वाचून मगच प्रतिसाद लिहीन. बादवे लिंकबद्दल आभारी.
24 Oct 2016 - 12:21 pm | पूर्वाविवेक
खूप छान लेख. अतिशय संवेदनशील विषय तुम्ही चांगल्या पद्धतीने हाताळला आहे. भारतातही असेच बदल होणे अपेक्षित आहे.
24 Oct 2016 - 11:38 pm | रुपी
सहमत.
24 Oct 2016 - 2:07 pm | अप्पा जोगळेकर
लेख आवडला. ते लेडी बॉय, टॉम बॉय म्हणजे काय असत.
आणि किन्नर गे असतात म्हणजे काय कोणास ठाऊक.
बारीक केस कापणार्या मुलीला टॉमबॉय म्हणतात इतकच माहिती होतं.
अवांतर -
'घरात आलेल्या सुनेला उंबरठ्यावर फटकवायच' हे गेल्या आठवड्यात लिहिणारे तुम्हीच कसे याच खूप आश्चर्य वाटतय.
24 Oct 2016 - 3:17 pm | बाजीप्रभू
ढोबळ मानाने "लेडी बॉय" म्हणजे शरीर/भावना स्त्रीच्या मात्र जननेंद्रिय पुरुषाचं. आणि "टॉम बॉय" म्हणजे संपूर्ण शरीर स्त्रीचं मात्र भावना/रहायला मुलांसारखं आवडतं असे.
अवांतराबत खुलासा,
"घरात आलेल्या सुनेला उंबरठ्यावर... " हि गुजरातमधील प्रचलित म्हण आहे. तिचा शब्दशः अर्थ "रूढ़िवादी" वाटत असला तरी ती बऱ्याचदा रूपक म्हणून वापरली जाते. फॉर एक्साम्पल,
उदा-१. कामाच्या ठिकाणी बॉस जेव्हा पहिल्यावेळी जास्तीच्या कामासाठी थांबायला लावतो त्या पहिल्याच दिवशीच बॉसला सडेतोड उत्तर दिलं तर नंतर उगाचच थांबायची वेळ येत नाही.
उदा-२ मुलं पहिल्यांदा उलट उत्तर देतात तेव्हाच ठेवून दयायची असते म्हणजे परत अपमान होत नाही. इत्यादी.
मी गुजरातेत ६ वर्षे राहिलेलो असल्यामुळे तिथल्या काही म्हणी माहित झाल्यात. आपले "ते" गलितगात्र झालेले धागाकर्ते पाहून हि म्हण पोस्ट केली. बाकी मला सुदैवाने म्हणीप्रमाणे वागायची संधी अजूनतरी मिळालेली नाही.
24 Oct 2016 - 3:25 pm | अनुप ढेरे
माझ्या माहिती प्रमाणे हिजडा = युनक. ज्यांचे टेस्टिकल्स कापलेले आहेत ते. ट्रान्स लोकांनापण हिजडा म्हणतात का?
ट्राण्स लोकांना सरकारद्वारे रेकग्निशन मिळत आहे हळू हळू. ही एक आश्वासक बातमी वाचली होती काही दिवसांपूर्वी
http://www.thehindu.com/news/national/other-states/manobi-bandopadhyay-i...
24 Oct 2016 - 4:10 pm | बाजीप्रभू
फार अभ्यास नाहीये माझा, माहिती घेऊन सांगतो.
पण जुजबी माहिती नुसार,
तृतीयपंथी (3RD Gender) हि एकच कॅटेगरी वापरली जाते या समाजाची विभागणी करण्यासाठी. जे पूर्ण नर नाहीत किंवा पूर्ण मादी नाहीत असे,
बाकी "किन्नर", "हिजडा", "छक्का" व बोली भाषेतील "बापट" हे केवळ साऊथ एशियामधे वापरले जाणारे समानार्थी शब्द आहेत.
"ट्रान्स जेंडर" हा शब्द जनरली ज्यांनी आपल्या शरीरात शस्त्र क्रियेद्वारा बदल करून घेतला आहे अश्या लोकांसाठी वापरला जातो. असं असूनही शस्त्रक्रिये पूर्वी आणि नंतर "हिजडा" हे बिरुद पुसलं जात नाही हे विशेष.
बाकी दिलेली लिंक वाचून आनंद वाटला. फोटोत मागच्या लोकांचे भाव मात्र लपून राहात नाही.
25 Oct 2016 - 7:56 am | आतिवास
"ट्रान्स जेंडर" हा शब्द जनरली ज्यांनी आपल्या शरीरात शस्त्र क्रियेद्वारा बदल करून घेतला आहे अश्या लोकांसाठी वापरला जातो.
असं नाहीये हो.
इथं पाहा.
अवघड आहे.
25 Oct 2016 - 9:44 am | बाजीप्रभू
अतिवास, माहितीबद्दल धन्यवाद! स्वतःला करेक्ट केलेय तुमच्या माहितीनुसार.
खरंतर "थर्ड जेंडर" मंडळींच्या शरीर रचनेबद्दल मला फार कल्पना नाही. कर्णोपकर्णी जे ऐकून माहित आहे तेव्हढच. या धाग्याच्या निमित्ताने तीही माहिती जाणकारांकडून मिळतेय हे विशेष. मिपावरील डॉ. मंडळी यावर अधिकारवाणीने बोलू शकतील.
या लेखानिमित्त थायलंडमधील समाज किती प्रगल्भ आहे हे दाखवण्याचा प्रयत्न होता. प्रज्ञा, शील, करुणा व मैत्री या बुद्धाच्या शिकवणुकीचा मूळ गाभा या मंडळींनि किती आत्मसात केला आहे याच्या उधाहरणादाखल वरील पोस्ट लिहिली होती. अजून एक उधाहरण म्हणजे "रोड ऍक्सिडंट" होतो तेव्हा थाई मंडळी कशी वागतात याचं. याबद्दल मी एक सेपरेट पोस्ट लिहिणार आहे. त्यासाठी थोडं थांबावं लागेल.
25 Oct 2016 - 10:01 am | सुबोध खरे
ट्रान्सजेन्डर म्हणजे ज्यांचे मानसिक लिंग वेगळे असते. म्हणजेच पुरुषाच्या शरीरात लपलेले स्त्रीचे व्यक्तिमत्त्व किंवा उलट(स्त्रीच्या शरीरात लपलेले पुरुष व्यक्तिमत्त्व). यात त्या व्यक्तीला आपली ओळख पुरुष किंवा स्त्री किंवा यातील काहीच नाही अशी हवी असते पण बाह्य लिंगाचा संबंध नाही. या व्यक्ती बऱ्याच वेळेस संभोगासाठी/ शारीरिक जवळिकीसाठी उत्सुक नसतात पण व्यक्तिमत्त्वाची ओळख हवी असते
ट्रान्स सेक्सुअल म्हणजे ज्यांचे बाह्य लिंग वेगळे आहे आणि मेंदूला भिन्न लिंगी जाणीव असणे. अशा व्यक्ती आपली शल्यक्रिया करून घेण्यास तयार असतात आणि त्यांना शारीरिक जवळीक/ संबंध ठेवण्यात रस असतो.
ट्रान्सवेस्टाईट - या व्यक्ती शरीराने आणि मेंदूने एका लिंगच्या असतात परंतु भिन्न लिंगीय कपडे घातले कि त्यांना अतीव आनंद होतो.परंतु त्यांची शारीरिक जवळीक आणि संबंध हे मूळ लिंगाशी एकरूप असतात.
25 Oct 2016 - 11:32 am | बाजीप्रभू
सोनाराने कान टोचले हे बरं झालं. आम्ही आपले काहीहि अनुमान लावत होतो. आंतर जालावरची अश्या विषयावरची माहिती आमच्यासारख्या बॉयलर सुट वाल्यांना कमीच कळते.... नेमकी माहिती, वेळेवर दिल्याबद्दल डॉक्टरांचे आभार.
24 Oct 2016 - 4:47 pm | कैलासवासी सोन्याबापु
उत्तम विषय अन संवेदनशील मांडणी बाजीप्रभू साहेब, लेख आवडला हे वेगळे सांगणे नलगे, ह्या निमित्ताने एक अनुभव शेअर करावा वाटतोय,
२००३-०८ दरम्यान हिमाचलमध्ये खूप भटकत असे मी, त्याकरता मी नागपूर दिल्ली रेल्वेवे प्रवास करत असे. त्या प्रवासात भोपाळ नंतर खूप तृतीयपंथी लोक चढत असत (भोपाळ त्यांच्या मोठ्या वस्ती पैकी एक असून त्यांच्यातील शबनम मौसी ह्या भोपाळच्या मेयर होत्या असे ऐकिवात आहे) लोक ह्या लोकांना खूप हाडहूड करीत असत रेल्वेत, एकदा मी प्रवास करत असताना माझ्या पलीकडल्या कंपार्टमेंट मध्ये ह्यांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली तसे लोकांनी त्यांना हाकलून लावले, पुढे ती मंडळी आमच्या कंपार्टमेंट मध्ये आली तेव्हा त्यांच्यातील एकाने माझा गालगुच्चा घेऊन पैस्याची मागणी केली, तेव्हा मी त्याला/तिला हसून शांतपणे म्हणले "मौसी अभी तो मै भी बाप के पैसे पर ही पल राहा हूं, आज मत मांग, जिस दिन नौकरी लगी उस दिन इसी ट्रेन मे इसी बर्थ पर तू मु मांगी बक्षीस दूंगा" तसे तो/ती गोड़ हसला अन म्हणाला "हिजडे को भी इज्जत देता है रे तू तो, अच्छा है अच्छा बने रहना" अन डोक्यावर हात ठेऊन "तेरा जिंदगी मे बहुत भला होगा बच्चे" असा मनापासून आशीर्वाद देऊन गेला, तेव्हा एक पक्के कळले, ही मंडळी प्रेमाची भुकेली असतात त्यांना शांतपणे एक मानव म्हणून उत्तर दिल्यास ते आचकट वगैरे अजिबात बोलत नाहीत, माझ्यामते किमान समोरच्याला माणुसकी ने संबोधणे इतके तर आपण करूच शकतो, असे वाटते.
24 Oct 2016 - 5:01 pm | अप्पा जोगळेकर
नोकरी,शिक्षण वगैरे बाबतीत रिझर्वेशनची सर्वात जास्त गरज या समुदायाला आहे. पण त्यांचा निवडणूकीच्या दॄष्टीने फारसा उपयोग नसल्यामुळे राजकीय पक्षांनी सुद्धा या समुदायाला वळचणीला टाकून दिले आहे.
मुळात या समुदायाबाबत किळस करण्याजोगे काय आहे हे अजून कळले नाही.
याहून अधिक किळस तर लग्नाच्या जेवणात ताटात टाकून दिलेले अन्न पाहून येते.
पण ती माणसे तर उजळ माथ्याने वावरत असतात.
24 Oct 2016 - 5:04 pm | कैलासवासी सोन्याबापु
आप्पांना काचकून सहमती !
24 Oct 2016 - 11:11 pm | NiluMP
+ १. भारतात रिझर्वेशन फक्त या समुदायाला हवे.