गर्‍यांच्या पिठाची आंबीलः खास उपासासाठी!

अनन्न्या's picture
अनन्न्या in पाककृती
19 Oct 2016 - 12:10 pm

मे महिन्यात जेव्हा खूप फणस तयार होतात तेव्हा कच्च्या फणसाचे गरे सोलून बारीक चौकोनी फोडी करून वाळवले जातात. अगदी चांगले वाळले ही डब्यात भरून ठेवतात. या गर्‍यांचे पीठ केले जाते. हे पीठ चार पाच महिने चांगले टिकते. पावसातल्या उपासाला उपयोगी येते. अर्थात गर्‍यांचा थोडा वास कळतो. या पिठाची थालिपीठे, आंबील असे प्रकार होतात.
साहित्यः
एक वाटी ताक, एक वाटी पाणी, मीठ, दोन चमचे गर्‍यांचे पीठ, पाव चमचा जीरे, एक चमचा तूप, एक ओली मिरची, चिमुटभर साखर.
फोटो आंतरजालावरून साभार.
gare
कृती:
एका भांड्यात ताक, पाणी, मीठ एकत्र करा. हवी असल्यास साखर घाला. आता यात दोन चमचे गय्राचे पीठ नीट मिसळून घ्या. गोळी राहता कामा नये. या मिश्रणाला तूपाची जिरे आणि मिरचीची खमंग फोडणी द्या. मंद गॅसवर उकळायला
ठेवा. ढवळत रहा. दाटपणा आला की गॅस बंद करा. गरमागरम प्या. नाचणीच्या आंबिली सारखीच लागते. कोथिंबीर वापरत असाल उपासाला तर वरून घाला.
gare

प्रतिक्रिया

विजय पिंपळापुरे's picture

19 Oct 2016 - 6:14 pm | विजय पिंपळापुरे

ह्याच प्रकारे ज्वारीची आणि बाजरीची आंबील करता येते

नूतन सावंत's picture

19 Oct 2016 - 6:43 pm | नूतन सावंत

नवा पदार्थ आहे माझ्यासाठी.

अनन्न्या's picture

19 Oct 2016 - 6:45 pm | अनन्न्या

आपल्या कोकणातला आणि पारंपारीक आहे. माझी आजी असे पीठ करून ठेवायची.

विशाखा राऊत's picture

20 Oct 2016 - 1:56 am | विशाखा राऊत

मस्त.. तुझ्याकडे खजिना आहे नवीन आणि मस्त रेसेपींचा :)

प्रभाकर पेठकर's picture

20 Oct 2016 - 2:15 am | प्रभाकर पेठकर

गर्‍यांचे तयार पिठ मिळते का बाजारात? करून पाहिली पाहिजे. उपासाची म्हणजे उच्च उष्मांक असणार.

अनन्न्या's picture

20 Oct 2016 - 5:30 pm | अनन्न्या

योजक वाले, देसाई बंधु, बेहेरे बंधु या मंडळींकडे असण्याची शक्यता. याची भाकरी पण करते माझी आई! थालिपीठ पण छान होते.

गर्‍यांचा फार उग्रस वास येत नाही ना पीठाला?

अनन्न्या's picture

20 Oct 2016 - 5:40 pm | अनन्न्या

कदाचित लहानपणापासून खात असल्याने जाणवत नसेल, पण थालिपीठ, आंबील यात काहीच कळत नाही. भाकरी मात्र कळते.

ओक्के, मिळालं कुठे तर बघतो. त्या वासापायी मी वाळवलेले गरे खाणं बंद केलं. म्हणून एकदा विचारावं म्हटलं.

अगदी वेगळा पदार्थ आहे. छान दिसतोय.

पिलीयन रायडर's picture

20 Oct 2016 - 5:51 am | पिलीयन रायडर

काय काय वेगळंच असतं बाबा हिच्या पोतडीत नेहमी!!!

कोकणक्विन अनन्न्याची नवी झकास रेसिपी.
पुस्तकाची तयारी कर बयो.वेगळ्या रेसिपी असतात तुझ्या खास कोकणी.

अनन्न्या's picture

20 Oct 2016 - 5:32 pm | अनन्न्या

कोकणात पूर्वापार केले जाणारे पण आता लोप पावणारे प्रकार एकत्र करायचा प्रयत्न आहे.

केडी's picture

20 Oct 2016 - 12:59 pm | केडी

कोकणात जाणे झाले कि हे पीठ घेऊन यायला पाहिजे. ह्याच पिठाचे उपासाचे थालीपीठ वैगेरे पण छान लागेल बहुदा.

पैसा's picture

20 Oct 2016 - 6:08 pm | पैसा

फणसाचे गरे, आठळ्या सगळेच मस्त प्रकार!