आज आरश्यात बघितले तेव्हा एक अनोळखा तीळ दिसला, मन खूप अस्वस्थ झाले ...
असे तीळ नव्याने उगवतात का ? कि जन्मापासून असतात ? हजार प्रश्न डोक्यात घर करू लागले.
मी आरसाही बदलून बघितला ... आता हे सगळे बायकोच्या तीक्ष्ण (मला काक म्हणायचे होते ... पण धमक नाही ...) नजरेतून सुटले नाही
"आज काय विशेष ? स्वताचे इतके निरीक्षण ? चला नाहीतर माझी बस चुकेल ... पुरे झाले आता",
बायकोचे उत्तराची अपेक्षा नसलेले प्रश्न आणि प्रतिक्रिया कानाजवळून गेल्या ...
मला मात्र स्वताचाच आवाज ऐकू येत होता ...
"आईला हा तीळ आला कुठून ? आधी होता का ? आज नेट वर शोधले पाहिजे ... असे कसे झाले यार ..."
नेहमीप्रमाणे गाडी काढली आणि नजर सारखी गाडीतील मागे बघण्याच्या आरश्यात जात होती,
मन म्हणत होते 'वळव तो आरसा ... बघ लेका तीळ आहे का अजून ...' पण शेजारी बायको बसली होती ...
मग मी एक शक्कल केली (जो नंतर खरतर मूर्खपणा ठरला),
बायको कशी नेहमी कोड्यात घालणारा प्रश्न विचारते ..."ओळख बर .. आज काय वेगळे आहे ?" तसाच मी तिला विचारला ...
"बायको ... सांग बर आज काय नवीन दिसते आहे ?" असे म्हणून तीळ दिसेल असा चेहरा तिच्याकडे वळवला ...
"बघ बघ ... ओळख ओळख ..." .... "बघ बघ ... ओळख ओळख ..."
तिने तिरुपतीला बालाजी आपल्याला जितके सेकंद दिसतो (तासान तास रांगेत उभा राहूनही)
त्याहि पेक्षा कमी वेळ (म्हणजे ०.३४ सेकन्दन्पेक्षा कमी वेळ ) माझ्या कडे बघितले आणि
"न्हाव्याने मिशी अन-इव्हन कापली आहे ... " असे म्हणून मोकळी झाली ...
पुढे तिला सोडेपर्यंत मी मुग गिळून गप्प बसलो.
बायको गाडीतून उतरली आणि मी लगेच आरसा वळवला ... तीळ अजून तसाच ...
थोडा हात ओला करून पुन्हा पुसून पहिला ... 'श्या ... काय पीडा आहे हि नवीनच ...' स्व-उवाच
ऑफिस मध्ये आलो आज का कुणास ठाऊक पण अगदी पार्किंग मधल्या वॉचमन पासून ते रिसेप्शनदादांपर्यंत सगळेच माझ्याकडे पाहून हसले ...
(हो मी अश्याच दुर्दैवी लोकांपैकी एक आहे, ज्यांच्या रेसेप्शन वर दादा बसतात ... )
आता हे नेहमीचे ओळखीच हसणे होते कि ... काही वेगळे .... फार त्रास होत होता ...
बर मनोज कुमार सारखे हात तोंडावर ठेऊन चालायचा प्रयत्न केला पण दोन वेळा आपटलो ..
त्या दिवशी तब्येतीचे कारण सांगून ऑफिस मधून लवकर पळ काढला ...
उगाच सारखे वाटत होते कि फिक्कट झाला आहे खरं तर तीळ पण ... पुन्हा वाटायचे नाही ...
आज पूर्ण दिवस ५०% लक्ष तिळाकडे होते अन ... ५०% (बर मान्य करतो ... ते हि तिळाकडेच होते !) उगाच तो लक्ष्याचा कुठलासा पडीक सिनेमा होता ना ज्यात तो तीळ वाली बाई शोधत असतो तसे काहीसे झाले आहे ...
बघू आता रात्री तरी शांत झोप लागते का !
ह्या बद्दल कोणाला काही माहिती असल्यास सांगू नका ... अजून कनफ्युजन !
- विश्वेश
प्रतिक्रिया
17 Oct 2016 - 12:30 am | पद्मावति
छान लिहिलंय.
पण ऑन अ सीरीयस नोट, त्वचेवर काही बदल झाला असल्यास किंवा नवीन तीळ आल्यास डॉक्टरांना कन्सल्ट करा प्लीज़.