लाहौल आणि स्पिती - एक अविस्मरणीय अनुभव (भाग २)

पाटीलभाऊ's picture
पाटीलभाऊ in भटकंती
7 Sep 2016 - 1:03 pm

लाहौल आणि स्पिती - एक अविस्मरणीय अनुभव (भाग १)

आज चौथा दिवस.


सकाळी सकाळी हॉटेलवरून निघतानाच सुंदर दृश्य नजरेस पडले.

आज आम्ही कीलॉंग वरून काझा ला जाणार होतो. छतरु, बातल पार करून कुंझुम पास जवळ पोहोचलो. कुंझुम पास हा १५०६० फूट उंचीवर आहे. तो पार करून रस्त्यातच कुंझुम देवीचं मंदिर आहे, तिथे नमस्कार करून देवीचं दर्शन घेतलं आणि थोड्या वेळ निवांत पडून राहिलो.


कुंझुम देवीचं मंदिर

आमच्यातल्या ३-४ जणांना आता 'हाय अल्टीट्युड सिकनेस' चा थोडा त्रास जाणवू लागला होता. माझी परिस्तिथी मात्र आधीपेक्षा जरा बरी होती. सर्दी कमी झाली होती…पण खोकला मात्र जैसे थे. कुंझुम पास वरून चंद्रताल तलावासाठी ९ किमी. चा ट्रेक आहे. आमच्यातल्या काही जणांची फार इच्छा होती कि तो ट्रेक करावा...पण आमची अवस्था बघून आशु भाई बोलला 'ऐसी हालत में ट्रेक मत करो'...मग काय आमचा हिरमोड झाला. पण त्याने अजून १ पर्याय सांगितला कि चंद्रताल तलावापर्यंत जरी नाही जमणार तरी आपण समोरच्या डोंगरावर ट्रेक करू शकतो जिथून चंद्रताल तलाव दिसू शकेल. मग काय सगळे खुश. निघता निघता भाऊंनी अजून एक कानमंत्र दिला 'साहब इस इलाके में घुमने के लिये आपको फिज़िकली से ज्यादा मेंटली फिट होना जरूरी है'. ते ऐकून जरा हायसे वाटले कारण मी थोडा आजारी जरी असलो तरी मानसिकदृष्ट्या फिट होतो. एक गोष्ट मात्र खरं, अनोळखी प्रदेशात खास करून हिमालयासारख्या ठिकाणी गाईड सांगेल ते ऐकावे कारण अशा ठिकाणी कधी गरज लागली तर मदत मिळण्याची शक्यता फार कमी. असो, तर आम्ही आमचा मिनी ट्रेक करण्यास सुरुवात केली. एवढ्या उंचीवरती, त्यात चढ चढताना श्वास घेण्यास फार त्रास जाणवत होता, दम लागत होता...मग काय १५-२० पावलं चालले कि बसा…असा क्रम सुरु होता. आणि खरंच तेव्हा आशूभाईच म्हणणं पटलं. मनातल्या मनात त्याचे आभार मानून पुढे चढणे सुरु ठेवले. शेवटी तासाभरानंतर कसे का होईना आम्ही सगळे वरती पोहोचलो. आणि तिथे पोहोचताच सगळे जण आडवे...एकेकाचे चेहरे बघण्यासारखे झाले होते (माझासुद्धा). १० मिनिट जरा निवांत पडून राहिलो आणि मग फोटो काढले. दूरवर चंद्रताल तलाव दिसत होता. म्हटलं एवढ्या दूर वर ट्रेक करायचा विचार होता तर आपला…आणि मनात भितीचा गोळा आला.


चंद्रताल तलाव

तिथेच अजून २ विदेशी पर्यटक आले होते. त्यांच्याशी बोलता बोलता कळलं कि जो तरुण होता तो अमेरिकेतून आला होता आणि तरुणी ऑस्ट्रेलियातून. तो ऑनलाईन पोकर खेळात असे तर ती डॉक्टर होती. दोन्ही ३-४ महिन्यांच्या भटकंती साठी आले होते. म्हणजे येताना एकत्र नव्हते...लेह-लडाख ला फिरताना दोघांची ओळख झाली आणि तिथून त्यांनी एकत्र फिरायचं ठरवलं. यामाहा ची बाईक घेऊन मस्त फिरत होते. भारतानंतर अफगाणिस्तान, नेपाळ, भूतान, म्यानमार वगैरे फिरायचा त्यांचा विचार होता. त्यांना शुभेच्छा देऊन आम्ही खाली उतरण्यास सुरुवात केली.


अँड्रयू आणि टेरेन

उतरताना मजा येत होती...मुख्य म्हणजे चढताना होणारा त्रास आता जाणवत नव्हता. अर्ध्या तासात खाली पोहोचलो पण. ५-१० मिनिट आराम केला आणि काझा कडे आमचा प्रवास सुरु केला. पुढे लोसर ला थांबलो...थोडे फोटो काढले आणि निघालो.


तेथील एक स्मारक..

रस्त्यात स्पिती नदी कधी डावीकडून तर कधी उजवीकडून साथ देत होती. एका बाजूला उंच डोंगर, तर दुसऱ्या बाजूला खोल दरी, खाली वाहणारी स्पिती नदी आणि नागमोडी रस्ते. काझा ला पोहोचेपर्यंत पूर्ण रस्त्यात हेच दृश्य आलटून पालटून नजरेस पडत होते.


वरती जाणारा रस्ता...


एका पाणी वाहत असलेल्या खडकाळ रस्त्यावरून(???) वाट काढताना बुलेटस्वार..

४-५ वाजेच्या आत काझा ला पोहोचणे भाग होते नाहीतर शिखरांवरील बर्फ वितळून ओढ्याना पूर येऊन रस्ते बंद पडण्याची शक्यता असते. जसजसं काझा जवळ आलं आजुबाजूला छोटी-छोटी शेतं दिसू लागली.


स्पिती गाव


आमच्या हॉटेलच्या बाहेर..

५ वाजता काझा ला आमच्या हॉटेल वर पोचलो. दमलेले असल्यामुळे हॉटेलवर पोहोचताच सगळेजण लगेच झोपले ते उठले डायरेक्ट रात्री ८ वाजता हॉटेल कर्मचाऱ्याने जेवणासाठी बोलावलं तेव्हाच. थोडी झोप काढल्यामुळे आता बरं वाटत होतं. पण एक मित्र मात्र तापाने फणफणला होता. जेवण केले आणि रात्री थोड्यावेळ बाहेर फेरफटका मारायला गेलो. सगळीकडे गर्द काळोख, निरभ्र आकाश, लुकलुकणारे तारे आणि ती नीरव शांतता...सगळंच कसं सुंदर वाटत होतं. मग आम्ही, हॉटेलमधला एक माणूस आणि आशूभाई मस्त गप्पा मारत बसलो. आपल्याकडचं शहरातलं जीवनमान, आणि इथल्या प्रदेशातील जीवनमान यांची तुलना करता, अनुभव सांगताना कधी २ तास निघून गेले…कळलंच नाही. मग मात्र निमूटपणे झोपायला गेलो.

क्रमशः

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Sep 2016 - 1:11 pm | डॉ सुहास म्हात्रे

भन्नाट निसर्ग, अप्रतिम फोटो ! मस्त चालली आहे भटकंती !

स्वर्ग, स्वर्ग ज्याला म्हणतात तो हाच असावा बहुतेक. सुंदर लेख.

सामान्य वाचक's picture

8 Sep 2016 - 10:19 am | सामान्य वाचक

माझी फार इच्छा आहे, लडाख ला निवृत्त जीवन जगायची
म्हणजे वानप्रस्थाश्रम

एस's picture

7 Sep 2016 - 1:44 pm | एस

क्या बात!

इशा१२३'s picture

7 Sep 2016 - 2:02 pm | इशा१२३

अहाहा सुंदर फोटो!अप्रतिम निसर्ग!

इशा१२३'s picture

7 Sep 2016 - 2:02 pm | इशा१२३

अहाहा सुंदर फोटो!अप्रतिम निसर्ग!

मोबायल्यावरुन फोटो पाहिले, अतिशय सुरेख फोटो! खूप आवडले!
स्पितीला जाताना आपला सल्ला घेणेत येइल नक्कीच.

पाटीलभाऊ's picture

7 Sep 2016 - 5:50 pm | पाटीलभाऊ

नक्की...काही माहिती हवी असल्यास व्य.नि. करा...!

वेल्लाभट's picture

7 Sep 2016 - 2:23 pm | वेल्लाभट

केवळ वेड लावणारे फोटो आणि वर्णन!!!!
श्या!

लईच भारी. चालू द्या. खूप फोटो आणि सविस्तर वर्णन येत राहूद्या.

मोदक's picture

7 Sep 2016 - 3:45 pm | मोदक

झक्कास फोटो...

रखरखीत निसर्गात एकदम काझाची हिरवीगार शेती बघून खूप छान वाटलं.

पाटीलभाऊ's picture

7 Sep 2016 - 7:59 pm | पाटीलभाऊ

धन्यवाद !

Nitin Palkar's picture

7 Sep 2016 - 8:51 pm | Nitin Palkar

सुंदर लेखन!पुढील भागाची वाट बघतो.

टवाळ कार्टा's picture

8 Sep 2016 - 9:59 am | टवाळ कार्टा

किती जळवतात

पैसा's picture

8 Sep 2016 - 5:49 pm | पैसा

कहर सुंदर आहे हे!

सुबोध खरे's picture

8 Sep 2016 - 6:37 pm | सुबोध खरे

सुंदर लेखन! आणी फोटो

अशोक पतिल's picture

9 Sep 2016 - 11:43 pm | अशोक पतिल

अप्रतिम फोटो ! मी २००६-०७ ला शिमला, मनाली टुर वर गेलो असताना अशीच द्रुष्ये असलेली पेटींगज एका रशीयन कलाकाराने रगंवलेली बघितले होते. हि पेटिंग्ज देविका राणी ह्या अभिनेत्री च्या बगंल्यावर होती . सेम हुबेहुब तसेच हे फोटो आहेत .

फोटू व वर्णन ग्रेट झालेय.
चंद्रताल तलावाचा फोटू मस्त आलाय.