श्रीगणेश लेखमाला - 'राजहंस' सांगतो... - मुलाखत : विशाखा पाटील

स्रुजा's picture
स्रुजा in लेखमाला
14 Sep 2016 - 7:54 am

.inwrap
{
background-color: #F7F0ED;
}
.inwrap
{
border: solid transparent;
border-width: 30px;
-moz-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
-webkit-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
-o-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
}

मुलाखतकार : स्रुजा

परिचय : विशाखा पाटील हे नाव तसं मिपाकरांना परिचयाचं. मिपावरील त्यांच्या लेखांतून व अनेक प्रतिसादांमधून त्यांची अभ्यासू मतं समोर येत असतात. अनेक गुणी लेखक मिपाला आपल्या लेखणीने समृद्ध करत असतात, त्यात विशाखाताईचा नंबर बराच वरचा लागतो. 'धागे अरब जगाचे' आणि 'कल्चर शॉक' या दोन्ही पुस्तकांमधून अरब देशांबद्दल तिने एक वेगळाच आणि संतुलित दृष्टिकोन आपल्यासमोर आणला. त्याबद्द्ल तिला मराठी ग्रंथोत्तेजक सभेने आणि साहित्य परिषदेने पुरस्कार देऊन नावाजलंदेखील. खास कौतुकाची बाब ही, की बहारिनमध्ये राहून, आपली प्राध्यापकाची नोकरी सांभाळून तिने हे सगळं केलं. हाच या वेळच्या लेखमालेचा फोकस आहे. आपल्या कामांच्या रगाड्यातून वेळ काढत आपल्यातल्या सुप्त गुणांना मूर्त स्वरूप देणार्‍या काही व्यक्तिमत्त्वांचा हा घेतलेला शोध! पोटापाण्यासाठीची नोकरी आणि लेखिका म्हणून आणि आता राजहंसची एक संपादक म्हणून तिचा समांतर प्रवास याची सांगड नक्कीच कुतूहलास्पद आहे. तो जाणून घेण्याचा हा प्रयत्न...

हाय विशाखाताई! तुझ्या गडबडीच्या शेड्यूलमधून आम्हाला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. तू भारतात असताना प्राध्यापक होतीस, मुलगा मोठा झाला होता; आयुष्याला एक स्थैर्य ज्या काळात येतं, तेव्हा तू सगळं सोडून / अप-रूट करून नव्याने घडी बसवायला तुझ्या कुटुंबासोबत बहारिनला गेलीस, नोकरी सुरू केलीस. इथे असलेल्या अनेक परदेशस्थित वाचकांना यात असणारे कष्ट आणि जुळवून घ्यायला लागणारा वेळ, अशी दोन्हींची कल्पना आहे. ते सांभाळता सांभाळता, लेखिका म्हणून तुझा हा प्रवास कसा सुरू झाला, याचं आम्हाला फार कुतूहल आहे:

खरं म्हणजे मी ठरवून लेखिका वगैरे झाले नाही. इंग्लिश विषयाचं अध्यापन भारतात तसं इथेही पुढे चालूच होतं. वाचनाची मात्र मनापासून आवड होतीच पहिल्यापासून. इंग्लिश साहित्याची विद्यार्थिनी असल्यामुळे इतिहास, राजकारण, जिथे जिथे साहित्याचा संबंध येतो, त्या सगळ्या विषयांचं वाचन होत राहिलं. इतिहास आणि राज्यशास्त्र हे माझ्या आवडीचे विषय होतेच. बहारिनच्या विद्यापीठात शिकवायला लागल्यानंतर इथल्या विद्यार्थ्यांकडून मला त्यांचं जग कळत गेलं. मीही आजूबाजूला उत्सुकतेने बघत होतेच. मग कळायला लागलं की इतकं वाचूनही आपल्याला या जगाबद्दल असलेली माहिती अगदीच वरवरची आणि जुजबी आहे. आपले बरेचसे गैरसमजही आहेत. शिवाय तरुणाईशी बोलताना तुम्हाला सध्याचं, वर्तमानातलं जग समजतं. त्यांच्या विचारांमधून या जगाची पुढची दिशा कळते. ते समजून घेता घेता मी केवळ उत्सुकतेपोटी या जगाशी संबंधित पुस्तकं वाचत होते. पण तरीसुद्धा लिहायला सुरुवात करेन असं काही डोक्यात नव्हतं. पण हळूहळू वाटायला लागलं की आपल्याला हे जे काही उमगलंय, ते आपल्यासाठी लिहायला लागू या. या विचाराने मी काही लिहून ठेवलं. दोनेक वर्षं ते लिखाण तसंच पडून होतं. कधीतरी एकदा सुटीत ते टाईप करून ठेवलं आणि मग मी लिहिलंय ते थोडं जज करावं, असा एक सहज विचार डोक्यात आला. प्रकाशन संस्थांचा काही अनुभव तेव्हा नव्हताच. राजहंसचा ईमेल आयडी नेटवर मिळाला आणि मी ते लिखाण त्या ईमेलवर पाठवलं. दुसर्‍याच दिवशी मला त्यांचं उत्तर आलं. राजहंसच्या दिलीप माजगावकर सरांनी आणि आनंद हर्डीकर सरांनी लिखाण आवडल्याचं ईमेलद्वारे कळवलं. पुढची दिशाही दाखवली. तो क्षण माझ्यासाठी नंतर मिळालेल्या पुरस्कारांपेक्षाही मोठा होता. याआधी अॅकॅडमिक पुस्तकावर काम करण्याचा अनुभव होता, मात्र हे जॉनर पूर्णच वेगळं होतं. त्यावर जाणकाराकडून मान्यता मिळाली होती. त्यानंतर मात्र कामात शिस्त आली. विचारपूर्वक वाचन केलं जाऊ लागलं. पण अशी ती सुरुवात तशी सहजगत्या झाली.

प्रश्न : सर्वसाधारणपणे असं बघण्यात आलं आहे की इंग्लिश साहित्य किंवा ढोबळमानाने फर्स्ट वर्ल्ड मीडिया म्हण किंवा साहित्यकृती म्हण, या त्यांच्या एका चश्म्यातून इतर जगाकडे बघतात. अगदी बॉलीवूड सिनेमांचे रिव्ह्यूज वाचतानादेखील तो दृष्टिकोन बघून मजा वाटते. स्टिरिओटाईप्स तर सगळ्याच संस्कृती / समाजांबाबत आहेत. तुझं पुस्तक वाचताना मात्र एक संतुलित दृष्टिकोन, बॅलन्स्ड अॅप्रोच सतत जाणवत राहतो. विशाखाताई, तू इंग्लिश साहित्याचा उल्लेख केलास, म्हणून असं विचारावंसं वाटतं की तो प्रभाव दूर सारून तू तुझ्या लेखनात इतकं संतुलन कसं साधलंस?

माझ्या वडिलांकडून मी हे संतुलन उचललं असं म्हणावं लागेल. लहानपणापासून त्यांच्या मित्र-नातेवाइकांबरोबरच्या विविध विषयांवरच्या चर्चा ऐकत मी मोठी झाले. ते नेहमी साकल्याने दोन्ही बाजूंचा विचार करायचे. त्यामुळे चश्मा लावून लिहायचं, की आधी हे जग जाणून घ्यायचं आणि मग मत बनवायचं, या गोष्टीचं भान माझ्या मनात सतत होतं. राजहंसच्या संपादकांनी दिशा दाखवली. डॉ. सदानंद बोरसे यांनी काही सूचना केल्या. आणि तसं बघ, आपल्या सर्वांवर लहानपणापासून अनेकांचा प्रभाव पडत असतोच. मी अगदी छोट्या - पाचोर्‍यासारख्या गावातून आले होते. नंतर जळगावला पुढचं शिक्षण झालं. पुढे अलिबागला कॉलेजला नोकरी केली. माझे शिक्षक, प्राध्यापक, सहकारी, आणि आता प्रकाशक-संपादक यांचा प्रभाव आहेच. माझे वडील आता नसले, तरी तटस्थ आणि संतुलित लेखनाच्या बाबतीत मला त्यांचा प्रभाव जास्त वाटतो. माझ्या सुदैवाने मला सुरुवातीलाच माजगावकर सरांसारखे संतुलित नजरेने बघणारे प्रकाशक लाभले.

प्रश्न : तू प्राध्यापक असल्याने विद्यार्थ्यांशी, इतर लोकांशी तुझा सतत संपर्क असतो. त्यामुळे जनसंपर्क तुला नवीन नाही. पण तू जेव्हा हे पुस्तक लिहायला घेतलंस, तेव्हा काही खास जनसंपर्क वाढवावासा वाटला का?

नाही, खास वेगळा जनसंपर्क मी वाढवला नाही. पण माझ्या नोकरीनिमित्त झालेल्या जनसंपर्कातूनच मला हे अरब जग जास्त कळत गेलं, हेही तितकंच खरं. माझा अध्यापनाचा विषय इंग्लिश असल्याने असेल कदाचित, पण चर्चांचं माझ्या वर्गात वावडं नसतं. म्हणायला माझ्या पुस्तकाच्या विषयाशी असंबंधित असलेल्या चर्चांमधूनदेखील लक्कन एखादं असं मत, असं विधान समोर यायचं की मी विचारात पडायचे. आपल्या भोवताली चाललेल्या घडामोडींकडे बघण्याचा या मुलांचा एक दृष्टिकोन आहे, तो नक्कीच विचार करण्याजोगा असायचा. या निमित्ताने एक सांगावंसं वाटतं की तुम्हाला वर्तमान समजून घ्यायचा असेल, तर त्यांचा भूतकाळ समजावून घ्यावाच लागतो. बाहेरून एकसंध दिसणारं हे अरब जग खरोखरच तसं आहे का? त्यांच्या इतिहासात असं काय होऊन गेलंय ज्याचे पडसाद त्यांच्यावर, त्यांच्या विचारपद्धतीवर उमटत राहतात या अनुषंगाने मी शोध घेत राहिले .

प्रश्न : राजकारण हा विषय तसा फार संवेदनशील आहे. बघता बघता चर्चांचं वादात रूपांतर होऊ शकतं. शिवाय एक स्त्री म्हणून या विषयावर चर्चा करणं किंवा एकूणच या पुस्तकानिमित्त तू जो रिसर्च केला असशील, त्यात तुला काही चॅलेंजेस जाणवले का? खासकरून अरब जगात आहेस म्हणून हा प्रश्न विचारावासा वाटला.

माहिती काढून घेणं हे एक प्रकारचं चॅलेंज असतंच. मात्र एक सांगते की इथले विद्यार्थी अतिशय सहजपणाने आणि अदबीने मत मांडत असतात. थोडा रॅपो बनायला जो काही वेळ लागेल, तो सगळीकडेच लागतो. पण स्थिरस्थावर झाल्यावर तो वेळही कमी होत गेला. इथले लोक तसं बघायला गेलं तर मोकळंढाकळं बोलणारे आहेत. तरीही त्यांच्याशी बोलताना, माहिती काढतोय हा भाव संवादात येऊ न देणं हा मात्र कौशल्याचा भाग आहे. आणि तसंही या जगात कुणीही खुलेपणे राजकारणाची चर्चा करत नाही, पण ते कुठून ना कुठून आपल्यापर्यंत झिरपत असतंच. इथे बाकीच्या अरब देशांमधलेही लोक राहतात. त्यांचेही प्रश्न लक्षात येऊ लागले होते. एक साधं उदाहरण सांगते - अभ्यासात मागे पडणारा, पण मेहनत घेणारा एक इराकी विद्यार्थी एकदा म्हणाला, “काय करणार? मी शाळेत होतो तेव्हा सगळंच उद्ध्वस्त झालं. कुठली शाळा, अन कुठलं शिक्षण!” एका पिढीचं दु:ख, जळजळीत वास्तव या दोन वाक्यांतून पोहोचलं. एखादं असं विधान किंवा मत आपल्यासमोर येतं की आपण आपोआप त्यावर विचार करू लागतो. त्यासाठी उघड्या कानांनी ऐकणं मात्र गरजेचं असतं.

प्रश्न : साधारणपणे परदेशी जाणार्‍या भारतीयाला एक बरा-वाईट, छोटा-मोठा सांस्कृतिक धक्का बसतोच. अगदी टीव्ही-सिनेमांमधून कितीही परिचयाची संस्कृती असली, तरी हा धक्का बसायचा राहत नाही. मला वाटतं, तुझं दुसरं पुस्तक याच विषयावर आहे. अरब जग तसं अपरिचित आणि गैरसमजांचं, नकारात्मकतेकडे झुकणारं एक वलय त्यांच्या बाबतीत सतत पाहिलं गेलंय. तुझ्या पुस्तकाच्या आणि नोकरीच्या निमित्ताने तुला तर हे धक्के अधिक मोठ्या प्रमाणात जाणवले असतील ना?

हो. अधिकांश भारतीयांना बसणारे धक्के हे पाश्चिमात्य संस्कृतीच्या वेगळेपणामुळे आलेले असतात. पण मी पाहत होते ती पौर्वात्य संस्कृतीच आहे. आणि बहारिन हे तसं ओपन कल्चर असल्याने मला बसलेले धक्के हे गैरसमज दूर करणारेच होते. इथली मुलं बोलायला जास्त मोकळी आहेत. बहारिनचा प्रभाव म्हणावा, माझे काही विद्यार्थी इराक, जॉर्डन, सौदीचे पण आहेत पण तेदेखील तितक्याच अदबीने आणि आदराने पण मोकळेपणाने बोलतात. सुरुवातीला मला वाटलं होतं की कदाचित विद्यार्थी (मुलं) स्त्री शिक्षिका म्हणून अंतर ठेवून बोलतील. पण भाषेचा अडसर दूर करूनदेखील ती मुलं आपली मतं मांडण्यास, बोलण्यास उत्सुक होती. बाकी स्त्रिया घरात कोंडलेल्या असतात हा गैरसमज तर विमानातून उतरल्या उतरल्या दूर झाला. रात्रीच्या वेळीदेखील स्त्रिया गटागटाने कॅफेमध्ये, हॉटेलमध्ये बसलेल्या असतात. ‘कल्चर शॉक’ मालिकेची कल्पना जेव्हा माजगावकर सर आणि लेखिका वैशाली करमरकर यांनी सांगितली, तेव्हा मी या जगाकडे अधिक सजगपणे बघू लागले. भारतीय नजरेतून वेगवेगळ्या देशांकडे बघणं हाच या मालिकेचा यूएसपी आहे. आणि तशा पद्धतीने बघताना थोडे धक्केही लक्षात येऊ लागले. पण चांगलं-वाईट सगळीकडेच असतं. परदेशी राहताना आपल्याला सर्वांनाच ते जाणवतं. पण संवेदनशीलता ठेवणंही गरजेचं असतं.

प्रश्न : तू बहारिनला आलीस आणि तुझ्या लेखनाचा श्रीगणेशा झाला. तू आजूबाजूला बघत होतीस ते इतकं वेगळं आणि रंजक होतं की हे लिहून ठेवायला पाहिजे असं तुला प्रकर्षाने वाटलं आणि लेखिका म्हणून तुझा प्रवास सुरू झाला. यानंतर आणखी एखादा नवा देश अनुभवावा, तिथे जाऊन राहावं असं एक साहित्यिक म्हणून, एक लेखिका म्हणून तुला वाटतं का? तुझ्या साहित्यिक आकांक्षेला एखादी नवी संस्कृती खुणावत असेल ना?

(हसून) ते इतकं सोपं नाही ना! आवडेल मला, जरूर आवडेल. कारण एखाद्या ठिकाणी आठ दिवस फिरायला जाऊन तिथली संस्कृती नाहीच कळत. तिथे जाऊन काही काळ व्यतीत करावाच लागतो. इतर पाश्चात्त्य लेखक असं करतातच. खरं सांगायचं तर, अनेक विषय खुणावत राहतात, त्यावर चर्चा होत राहतात.. पण त्या विषयावर वाचन करुन, विचार करताना नवीन देण्याजोगं काही आहे का, यावर मी विचार करते. पण साहित्यिक आकांक्षा अशी काही मी ठेवली नाहीये. म्हणशील तर, स्वान्तसुखाय चालू आहे आजवरचा प्रवास.

प्रश्न : पण स्वान्तसुखाय जरी असला, तरी प्रत्येक क्षेत्राचा, कामाचा आपला असा एक परिपूर्णतेचा किंवा प्रमाण मानला जाणारा मापदंड असतो. मोदक करतानादेखील सुबक २१ कळ्या आल्या की गृहिणीला समाधान असतं, तसा परफेक्शनचा मापदंड तुझ्या बाबतीत काय आहे?

हां, परफेक्शनच्या बाबतीत मात्र मी आग्रही आहे. माझ्या पुस्तकांच्या बाबतीत दोन पैलू मला खासकरून महत्त्वाचे वाटतात. वाचक ईमेलने, पत्राद्वारे ते कळवतातही. एक आहे शैली, पण ती निसर्गदत्त असल्याने मी त्याचं काही श्रेय घेणार नाही. आणि दुसरी भूमिका. त्याबाबतीत मी थोडंफार श्रेय घेईन. त्यातही माझ्या वडिलांचा आणि माजगावकर सरांचा सिंहाचा वाटा आहे. पण पुस्तकाचा ढाचा ठरवताना असेल किंवा एखादा मुद्दा मांडताना असेल, स्वतःचं समाधान होईपर्यंत मी स्वसंपादन करत राहते. एखाद्या नवीन वाचकाला किंवा जाणकार वाचकाला किंवा मला स्वतःला ते वाचताना समाधान वाटेल असं लिहावं एवढीच माझी म्हणशील तर आकांक्षा आहे. तो तोल सांभाळण्याचा मी प्रयत्न करते. इंग्लिशमध्ये नॉन-फिक्शनही अभ्यासपूर्ण, पण सर्वसामान्य वाचकाला कळेल अशा रंजक, ललित शैलीत लिहिलं जातं, हे आता आपल्या लक्षात येतंच.

प्रश्न : तू वर्गावर जाताना संदर्भपुस्तकं, टीका-ग्रंथं पाहत असशील. मुद्दा मांडण्यासाठी टिपणं काढणं, अभ्यास करणं, आपला एक दृष्टिकोन मुलांपर्यंत पोहोचवणं हा तुझ्या व्यवसायाचा एक अविभाज्य भाग आहे. तुझ्यातल्या लेखकावर याचा किती प्रभाव होता? आणि लेखक आणि प्राध्यापक म्हणून तुझ्या व्यक्तिमत्त्वांमध्ये फरक किती होता?

बराच प्रभाव होता. अभ्यासाची, एखाद्या साहित्यकृतीची आजच्या संदर्भाशी सांगड घालण्याची सवय लेखक म्हणून कामाला आली. पण वर्गात असताना मला विद्यार्थ्यांचे भाव त्यांच्या चेहर्‍यावर वाचण्याची आणि त्याप्रमाणे एखादा मुद्दा कमी-जास्त विशद करण्याची सवय होती. पुस्तकाच्या बाबतीत मात्र वाचकाचा प्रतिसाद माझ्यापर्यंत पोहोचत नव्हता. निदान त्याक्षणी पोहोचत नव्हता. त्यामुळे माझे कुटुंबीय आणि प्रकाशक-संपादक यांच्यासमोर माझं लिखाण मांडून, ते पडताळून घेण्याची मला सवय लागली.

प्रश्न : वाचक म्हणून आपण काही गोष्टींशी, लेखकांशी, विचारांशी इतरांपेक्षा जास्त रिलेट करू शकतो आणि म्हणून त्या संदर्भात, त्या अनुषंगाने आपलं वाचनही वाढत राहतं. आपल्या विचारसरणीवर कळत-नकळत त्याचा प्रभाव पडायला लागतो. मात्र लेखक म्हणून भूमिका ठरवताना / मांडताना हा प्रभाव दूर करून लिहिणं हे आव्हानात्मक वाटलं का?

हो, निश्चितच. हे असं होऊ नये, आपला असा एक युनिक पर्स्पेक्टिव्ह असावा, यासाठी विस्तृत आणि सर्वांगाने वाचन करणं गरजेचं असतं. वाचन, मनन, चिंतन ही एक अखंड चालणारी मालिका असावी लागते. यातून आपली भूमिका ठरवणं हा एक आव्हानात्मक भाग निश्चित आहे. पण अशा वेळी माझा हक्काचा श्रोता म्हणजे माझा नवरा. बर्‍याच वेळा एखादा मुद्दा मांडताना तो वाचकांना विचारास प्रवृत्त करणारा असावा लागतो, त्या वेळी माझे विचार कुणाशीतरी बोलून दाखवण्याची मला गरज वाटते. (हसत) मूळची प्राध्यापक पडले ना! माझी आई आणि नवरा हे या बाबतीत सदैव मदतीला असतात. ते माझ्या क्षेत्रातले जाणकार नसल्याने सामान्य वाचकाचा फीडबॅक त्यांच्याकडून मिळतो. माझे एक एक ज्येष्ठ सहकारी प्रा. सुरेश घाटे आणि माजगावकर सर हे यातले तज्ज्ञ! त्यांचं मत मला आणखी एक वेगळा पैलू देतं.

प्रश्न : तू तज्ज्ञांच्या मताबद्दल बोललीस म्हणून विचारते - प्रकाशक/संपादक हे सातत्याने लेखकाच्या लेखनावर संस्कार करत असतात. तू स्वतःही एक संपादक आहेस. तर या भूमिकेतून तुला अलंकारिक शब्दसंपत्ती ही ओव्हर-रेटेड वाटते का? लेखनावर फीडबॅक देताना तुझ्या मते हा मुद्दा किती महत्त्वाचा असतो?

हो. विचार महत्त्वाचा. माझ्या लहानपणी शाळेत निबंध लिहिताना मोठे बोजड शब्द वापरणं ही एक आवश्यक संकल्पना होती. पण हळूहळू जसं आपण सुलभीकरणाकडे वळतोय, तसं ही गरज, ही संकल्पना कालबाह्य होत चाललीये. साहित्यातूनही ती तशी व्हावी असं वाटतं. विचार सहज मांडला जावा. शब्दांच्या खेळाचं अवडंबर नसावं. मिपावरही हाच सूर आपल्याला दिसतो आणि तो मला पटतो, आवडतो.

प्रश्न : संपादन करताना लेखकाने मांडलेला विचार, त्याची भूमिका तुझ्या भूमिकेच्या विरुद्ध किंवा वेगळी असेल, तर कुठे थांबायचं हे कसं ठरवतेस? लेखकाला फीडबॅक देताना त्याची न पटणारी मतं हा कितपत महत्त्वाचा मुद्दा असतो?

काही वेळेस होतं असं. त्या विषयाबाबत माझं आणि लेखकाचं मत वेगवेगळं असतं. असे मुद्दे आम्ही क्वेरीजच्या स्वरूपात लेखकापर्यंत पोहोचवतो आणि माझ्या अनुभवात लेखक अशा क्वेरीजना सकारात्मकरित्या स्वीकारतात. चर्चा करून ते सामन्वयाने सोडवलं जातं. कधी माझी भूमिका बदलते, कधी त्यांना पटतं. पण शेवटी ते लेखकाचं पुस्तक आहे. त्यामुळे त्याचं मत मांडलं जाणं महत्त्वाचं!

प्रश्न : नोकरी सोडून पूर्णवेळ लेखन-संपादन चालू करावं, असं कधी वाटतं का?

शिकवताना मला आनंद मिळतो. लेखन-संपादन हा तसाच खूप आनंददायी भाग आहे. पहाटे उठून लिहायला बसण्यापासून, आपलंच लेखन दहादा तपासत बसण्यापासून, सतत वाचन करण्यापासून ते संपादनाच्या निमिताने चार लेखकांशी होणार्‍या चर्चेपर्यंतची पूर्ण प्रोसेस मी मनापासून एन्जॉय करते. त्यामुळे मला दोन्ही हवंय :)

प्रश्न : हा शेवटचाच प्रश्न आहे. ब्लॉग्ज, संस्थळं अशा स्वरूपात जरी मराठीला वाचक भरपूर असला, तरी तो पूर्वीइतका नाही, हेही तितकंच खरं आहे. आजचा तरुण वर्ग वेळेअभावी ऑडिओ बुक्सना प्राधान्य देतो, कधी इंग्लिश माध्यमातून शिक्षण झाल्याने मराठी पुस्तकांचं इंग्लिश भाषांतर उपलब्ध असेल तर ते वाचतो. अशा वेळी लेखक म्हणून खंत जाणवते का?

माझ्या दृष्टीने ५० वाचतात की ५०० हा तसा गौण मुद्दा आहे. यावर माझ्या जवळचे लोक मला ‘तुला असं कसं वाटू शकतं?’ असाही वाद घालतात. पण मी खरंच त्यात पडत नाही. मला लेखनातला, काम करण्यातला आनंद जास्त महत्त्वाचा वाटतो. सहज म्हणून सांगते, एकदा माजगावकर सरांशी चर्चा चालू होती. ते सहजपणे बोलले असावे, पण मला ते भावलं. तेच इथे मला शेवटी सांगावसं वाटतं. ते म्हणाले, की "नुसतं व्यवसाय म्हणून नव्हे, तर एकूणच मराठी वाचनसंस्कृतीला पुढे नेणारी, दिशा देणारी विविध विषयांवरची पुस्तकं माझ्याकडून प्रकाशित होणं, हे मला कर्तव्य वाटतं." एका प्रकाशकाचा / संपादकाचा हा दृष्टिकोन मला खूप अंतर्मुख करणारा वाटला. हा प्रवाह पुढे नेण्यासाठी मला, तुला, मिपावर लिहिणार्‍यांना, ब्लॉगवर लिहिणार्‍यांनादेखील आपला खारीचा वाटा देता आला तरी पुष्कळ झालं. मात्र तू म्हणतेस तसं आता वाचकांच्या काय अपेक्षा आहेत, हे मिपाकरांकडून जाणून घ्यायला मला आवडेल. प्रतिसादात त्यांनी ते जरूर मांडावं.

स्रुजा : जरूर, या निमित्ताने मिपावर ती चर्चाही होईल. धन्यवाद, विशाखाताई!
विशाखाताईची ही दोन पुस्तकं :
 
a   a

प्रतिक्रिया

सस्नेह's picture

14 Sep 2016 - 9:09 am | सस्नेह

समर्पक आणि अचूक शब्दयोजनेमुळे मुलाखतीचे रंग विशेष भावले.

यशोधरा's picture

14 Sep 2016 - 9:17 am | यशोधरा

मुलाखत भावली.

स्रुजा न विशाखाताइ मुलाखत खुप आवड्ली :)

मुक्त विहारि's picture

14 Sep 2016 - 10:14 am | मुक्त विहारि

सुदैवाने, ही दोन्ही पुस्तके संग्रहात असल्याने, जास्तच आवडली.

भ ट क्या खे ड वा ला's picture

14 Sep 2016 - 10:21 am | भ ट क्या खे ड वा ला

मुलाखत वाचून आता पुस्तके वाचावीच लागणार.

मोदक's picture

14 Sep 2016 - 2:46 pm | मोदक

+११११

खेडूत's picture

14 Sep 2016 - 10:29 am | खेडूत

छान मुलाखत...!

वेळोवेळी इथेही विविध विषयांवर लिहीत जावे ही आग्रहाची विनंती.

पैसा's picture

14 Sep 2016 - 10:31 am | पैसा

सुरेख मुलाखत.

पुंबा's picture

14 Sep 2016 - 11:07 am | पुंबा

खुप सुंदर मुलाखत. दोन्ही पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली.

स्वाती दिनेश's picture

14 Sep 2016 - 11:15 am | स्वाती दिनेश

मुलाखत आवडली.
विशाखाला अजयाकडे भेटले होते त्या कट्ट्याची आठवण झाली, :)
स्वाती

चौकटराजा's picture

14 Sep 2016 - 11:35 am | चौकटराजा

मानवी समाजाचा एक दृष्टीकोन मला फारसा आवडत नाही तो असा की फक्त अति यशस्वी व प्रकाश झोतात आलेले हेच फक्त पथदर्शी असतात हे मानायचे. त्यांच्या मग आंब्यांचे लोणचे आवडते की लिम्बाचे अशा प्रकारचा जर्नालिझम करायचा. आताचा मुखतकर्तीने केलेला प्रकार हा सर्वस्वी भिन्न आहे कारण ज्यांची मुलाखत घेतली त्या रूढार्थाने सेलेब्रिटी नव्हेत. पण पथदर्शी नक्कीच आहेत हे मुलाखत कर्तीला जाणवले. खरे तर आपल्या सारख्या सामान्य लोकामधे अचाट क्रांतीकारी विचार करण्याची ताकद असते हे आपण व्यवहार कराची कल्पना आणणारे अनिल बोकिल यांच्या उदाहरणावरून समजू शकतो.माझा असा विचार आहे की संसदेला ग्राहक कायद्याखाली आणा. हा विचार सकृतदर्शनी मूर्खपणाचा वाटेल पण मजबूत पगार खाउन खासदार जे वर्तन संसदेत करतात त्याला चाप बसेल. पण..... पण माझी मुलाखत घेणार कोण..... ?

निओ's picture

16 Sep 2016 - 11:30 pm | निओ

+1

पद्मावति's picture

14 Sep 2016 - 1:20 pm | पद्मावति

सुंदर मुलाखत. आवडली.

प्रीत-मोहर's picture

14 Sep 2016 - 2:34 pm | प्रीत-मोहर

सुंदरच मुलाखत सृज आणि विशाखा ताई

टवाळ कार्टा's picture

14 Sep 2016 - 2:40 pm | टवाळ कार्टा

मस्तच

इशा१२३'s picture

14 Sep 2016 - 5:55 pm | इशा१२३

छानच झालीये मुलाखत.आवडली.

अभिजीत अवलिया's picture

14 Sep 2016 - 7:06 pm | अभिजीत अवलिया

!!! सुंदर मुलाखत !!!

रेवती's picture

14 Sep 2016 - 7:37 pm | रेवती

छान झालिये मुलाखत!
अभिनंन विशाखाताई.
धन्यवाद स्रुजा.

पिलीयन रायडर's picture

14 Sep 2016 - 7:50 pm | पिलीयन रायडर

विशाखा ताईचे लेखन नेहमीच आवडते. आज त्याच्यामागचे विचार, काम, प्रवास समजुन घेता आला. तिच्या सारख्या प्रतिभावान लेखिकेला माजगावकर सरांसारखे प्रकाशक मिळणे हे वाचकांचे भाग्य! तुझी अशीच उत्तमोत्तम पुस्तकं येवोत!

मुलाखतीचे प्रश्नसुद्धा फार अभ्यासपुर्ण आहेत. माझी मैत्रिण म्हणुन म्हणत नाही, पण खरंच स्रुजा टु द पॉईंट विचारते.

खटपट्या's picture

14 Sep 2016 - 7:51 pm | खटपट्या

छान मुलाखत. कल्चरल धागे पुस्तक वाचावे लागणार

प्रचेतस's picture

14 Sep 2016 - 8:27 pm | प्रचेतस

मुलाखत आवडली.

वाचकांच्या काही अपेक्षा मला पुढीलप्रमाणे वाटतात.

१. मराठी पुस्तकांच्या वाढत्या किमती.

इंग्रजी किंवा हिंदी भाषेतील पुस्तके अत्यंत कमी दरात उपलब्ध असतात तसे मराठी पुस्तकांबाबत होत नाही. मी सध्या बघतोय त्याप्रमाणे जवळपास दिड रुपयाला एक पान असा सध्याचा दर पडतो आहे. अर्थात आजही राजहंस, मौजेसारखी काही प्रकाशने पुस्तकांची निर्मितीमूल्ये उत्कृष्ट राखूनही रास्त भावात पुस्तके देत आहेत.
पुस्तकांचे दर कमी राखल्यास बुक पायरसीलाही काही अंशी रोखता येउ शकेल.

२. सेल्फ हेल्प पुस्तकांचे वाढते प्रमाण.

अशा प्रकारच्या पुस्तकांच्या वाढत्या प्रमाणामुळे (का प्रसारामुळे) साहित्याचा मूळ आत्मा असलेल्या कथा, कादंबऱ्या वेगाने मागे पडत चालल्या आहेत. गेल्या दोनेक दशकातले गाजलेले कादंबरीकार आठवा. अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच नावे सांगता येईल.
कदाचित वाचकांच्या आवडीही बदलल्या असल्याने नवे लेखक कथा कादंबरी लिहिण्यास धजावत नसावेत. महाबळेश्वर सैल, मुरलीधर खैरनार ह्यांसारखे नवे लेखक अनुक्रमे तांडव, शोध ह्या दमदार कादंबऱ्या घेऊन पुढे आलेत. दुर्दैवाने खैरनार ह्यांचे अकाली निधन झाले.
कादंबऱ्यांच्या बाबतीत मराठी माणूस अजूनही शिवाजी सावंत, विश्वास पाटील, रणजीत देसाई ह्यांत अडकून पडलेला आहे असे खेदाने म्हणावेसे वाटते.

३. अनुवादांची फ़्याक्टरी

अनुवादित साहित्याबद्दल वाचकांचे प्रेम वाढते आहे. फिक्शन- नॉन फिक्शन अशा दोन्ही प्रकारच्या साहित्याला लोकाश्रय मिळतो आहे. मात्र अनुवादांच्या वाढत्या मागणीने अनुवादांचा दर्जाही वेगाने घसरत आहे. हल्लीच मेहतांवर सुमार अनुवादामुळे एक पुस्तक मागे घ्यायची वेळ आली. त्यांच्या इतर तसेच अजूनही काही प्रकाशनांचा अनुवादाचा दर्जा तसा सुमारच आहे. येथे खरेतर साक्षेपी संपादकांचा हस्तक्षेप अनिवार्य असायला हवा.

हे सुचले तसे काही मुद्दे विस्कळीतपणे मांडलेत. पुढेही अजून काही सुचले तर येथे लिहीनच.

अभिजीत अवलिया's picture

14 Sep 2016 - 9:10 pm | अभिजीत अवलिया

सेल्फ हेल्प पुस्तकांचे वाढते प्रमाण.
--- सहमत. ह्या पुस्तकांनी खूप धुमाकूळ मांडला आहे.
मित्र कसे मिळवावे, प्रेम कसे करावे हे सांगणारी पुस्तके.
ह्या गोष्टी माणसाकडून सहजपणे झाल्या पाहिजेत. त्यासाठी पण पुस्तके वाचावी लागतात ह्याचे आश्चर्य वाटते. .

रुपी's picture

14 Sep 2016 - 11:37 pm | रुपी

अगदी, अगदी. ती पुस्तके डोक्यात जातात फार. एकच मुद्दा सांगायचा असतो, पण त्यावर एक पुस्तक लिहितात. "मेन आर फ्रॉम मार्स... " हे बर्‍याच वर्षांपूर्वी भेट मिळाले म्हणून वाचले, त्यानंतर अशी पुस्तके परत वाचली नाहीत.

पण मुलाखतीत आलाय तसा वेळेचा मुद्दा महत्त्वाचा आहे. आजकाल काही लोकांना कथा, कादंबर्‍या वाचणे म्हणजे वेळ वाया घालवणे वाटते. मुलांना कसे वाढवायचे, करीअर कसे पुढे न्यायचे, ऑफिसमधल्या राजकारणात कसे टिकून राहायचे अश्याच विषयांवर वाचायला आवडते काहींना.

बोका-ए-आझम's picture

14 Sep 2016 - 9:24 pm | बोका-ए-आझम

माझ्या मते -
१.मराठीमध्ये इ-बुक्सचा प्रसार होणं अत्यंत गरजेचे आहे. मुळात छापण्याच्या प्रक्रियेमुळे किंमती वाढतात. पण जर पुस्तकं इलेक्ट्रॉनिक स्वरूपात उपलब्ध झाली तर लोक सहजपणे विकत घेऊ शकतील. आता काही purists म्हणतील की आम्हाला छापील पुस्तकांचा आनंद इलेक्ट्रॉनिक पुस्तकात कसा मिळणार? अशा लोकांना एकच प्रश्न विचारावासा वाटतो - महत्वाचं काय आहे? Content की form? आंतरजालावर शिंपिणीचे घरटे वाचून लोक भारावले नाहीत का?
३. अनुवाद जोपर्यंत शब्दश: व्हावा हा आग्रह आहे तोपर्यंत काही खरं नाही. भावानुवादावर भर हवा, निदान कथात्मक (fictional) साहित्यासाठी. कथाबाह्य (non-fiction) मध्ये शब्दश: अनुवाद चालू शकेल एकवेळ.

प्रचेतस's picture

15 Sep 2016 - 7:15 am | प्रचेतस

बुकगंगाने काही प्रमाणात इ-बुक्स आणली आहेत पण ती त्यांच्या app शिवाय वाचता येत नाहीत. शिवाय ती मोबाईलवर वाचावी लागतात. त्या स्क्रीनमुळे डोळ्यांना त्रासच होतो. किंडलसारख्या इ-इंक रीडरवर अशी पुस्तके आली पाहिजेत. सध्या किंडल किंवा नूकवर पीडीएफ फॉर्मेटमधली मराठी पुस्तके वाचता येतात पण ती .mobi नसल्याने किंडलच्या सुविधांचा पुरेपूर वापर करता येत नाही.
शिवाय Content की form ह्यापैकी content जरी महत्वाचं असलं तरी आपण २५०/३०० पानी छापील पुस्तक एका बैठकीत वाचू शकतो मात्र तेच इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून वाचायचे ठरवल्यास शक्य होत नाही असा वैयक्तिक अनुभव आहे.

चौकटराजा's picture

15 Sep 2016 - 8:28 am | चौकटराजा

पुस्तकाच्या पानावरून रेडीएशन नसल्याने पुस्तक सलग तास दोन तास वाचले तरी डोळ्याला त्रास फारसा होत नाही. शिवाय पुस्तक मस्त लोळत पडून खारे शेंगदाणे चरत वाचता येते.

बोका-ए-आझम's picture

18 Sep 2016 - 12:06 pm | बोका-ए-आझम

पण त्यावर उपायही आहेच. पुस्तकं वाचूनही डोळे शिणतातच की. शिवाय आंतरजालावर वाचन करणाऱ्यांना इलेक्ट्रॉनिक साधनांची सवय असते. कधी थांबायचं हे कळलं म्हणजे झालं. माझा मुख्य मुद्दा हा पुस्तकांच्या निर्मितीखर्चाचा आहे, जो भरपूर असल्यामुळे किंमती जास्त आणि खप कमी हे दुष्टचक्र निर्माण झालेलं आहे. अजून एक फायदा म्हणजे लेखकांच्या राॅयल्टीचा. किती प्रती खपल्या हे प्रकाशक जे सांगेल त्यावर लेखकाला विश्वास ठेवायला लागतो. इ-बुक्समुळे नक्की किती डाऊनलोड्स झाले हे लेखकाला कळू शकतं आणि त्याला योग्य राॅयल्टी मिळू शकते.

पिशी अबोली's picture

24 Sep 2016 - 3:19 pm | पिशी अबोली

मी बुकगंगाकडे चौकशी केली होती तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आम्ही किंडल फॉर्मॅटमध्ये बनवून देऊ शकतो पुस्तकं. पण तशा मराठी पुस्तकांच्या किंमती कमी आहेत, त्यामुळे अशी बनवून घेण्याऐवजी हार्ड कॉपी घेणं परवडतं.

विशाखा पाटील's picture

15 Sep 2016 - 7:59 am | विशाखा पाटील

धन्यवाद!

लेखक ते वाचक या साखळीत येणारे घटक खूप कमावतायेत असं चित्र दिसत नाही. याचा संबंध खपाशी असावा. वस्तूचा खप वाढला की किमत कमी होते. पुस्तकांच्या बाबतीतला प्रश्न जरा गोंधळाचाच आहे. वाचक आपल्या आवडीनिवडीनुसार पुस्तक खरेदी करतात. त्यामुळे ग्राहक विभागलेला आहे. पुन्हा पुस्तक विकत घेऊन वाचणाऱ्यांची संख्या किती, हे मराठी पुस्तकांच्या किती आवृत्त्या निघतात यावरून आपल्या सहज लक्षात येतेच. बुक पायरसीचे म्हणाल तर ‘मन में है विश्वास’ या 225 रुपये किमतीच्या पुस्तकाचीही पायरसी होतेच. जे खपते त्याची पायरसी होते, मग त्याची किंमत अगदी १०० रुपये का असेना.

सेल्फ हेल्प पुस्तकांचा खप जोरदार होतो, त्यामुळे ते निघतात. अशी पुस्तके वाचून आपली परिस्थिती पालटेल, आपल्या व्यक्तिमत्त्वात फरक पडेल असा भाबडा आशावाद असतो बुवा! अशी पुस्तके इंग्रजीतही जोरदार चालतात. अनुवादाच्या फ्याकटरीतल्या दुय्यम दर्जाच्या प्रोडक्टचा खप कमी झाला की उत्पादकावर गुणवत्ता सुधारण्याचा दबाव येईल, अशी आशा करू या. :)

या सर्व घटकांबरोबर च माझ्या मते ऑडिओ बुक्स हा फार मोठा दुर्लक्षित घटक आहे. माझा वैयक्तिकरित्या निदान सव्वा तासाचा वेळ रोज ड्रायव्हिंग मध्ये जातो. मला वाचायला वेळ मिळत नाही पण ऑडिओ बुक्स मात्र त्या तासाभरात ऐकायला छान वाटतात. शिवाय ज्या मराठी मुलांचा ईंग्रजी माध्यमातील शिक्षणामुळे वाचनाचा प्रॉब्लेम होतो त्यांना ही ऑडिओ बुक्स ही देणगी ठरु शकते. मराठी मध्ये समृद्ध खजिना आहे, केवळ त्याचं माध्यम काळाशी सुसंगत नाही म्हणुन त्याचं मूल्य कमी होऊ नये असं कळकळीने वाटतं.

विशाखाताई संपादक झाल्या हा त्या पदाचा सन्मान आहे. पण त्या या व्यापात अडकल्यावर आम्हाला त्यांची नवीन पुस्तकं वाचायला मिळणार का?

इनिगोय's picture

14 Sep 2016 - 9:58 pm | इनिगोय

विशाखा पाटील यांचं लेखन अनाहितामध्ये आणि विशेषांकातही वाचलं आहे, सो त्यांच्या शैलीशी ओळख आहेच. रटाळ तसंच बोजड वाटू न देता पुस्तकपरिचयासारखा विषयही त्या सहजपणे हाताळतात हेही अनुभवलं आहे. त्यांच्या पुस्तकावरचा लेखही आजच वाचायला मिळाला, तेही लवकरच वाचलं जाणार हे नक्की.

स्रुजाचे नेमके प्रश्न आणि त्यांना सहज दिलेली उत्तरं यामुळे या लेखिकेला थोडं अधिक जाणून घेता आलं याचा आनंद वाटतो.

एक सुचवणी, लेखन आणि संपादन या एकाच मजकुराकडे पाहणा-या दोन भिन्न बाजू असल्याने हे ट्रान्झिशन कसं झालं, संपादक म्हणून काम करू लागल्यावर कोणते मुद्दे नव्याने, वेगळेपणाने जाणवले, हेही वाचायला आवडेल.

रुपी's picture

14 Sep 2016 - 11:31 pm | रुपी

छान मुलाखत. निवांत वेळ मिळेपर्यंत वाचायला सुरुवात केली नाही, कारण घाईघाईत वाचायची नव्हती.

स्रुजा, प्रश्नही खूप मुद्देसूद आणि व्यवस्थित विचारले आहेस. विशाखाताईंचे लेखन छानच असते, उत्तरे देतानाही अगदी साधेपणाने, तरीही मनापासून दिली आहेत.
पुस्तके मिळवून वाचण्याचा नक्कीच प्रयत्न करेन!

आदूबाळ's picture

15 Sep 2016 - 11:24 am | आदूबाळ

फार सुंदर मुलाखत आहे!

विशाखा पाटील's picture

17 Sep 2016 - 11:56 am | विशाखा पाटील

सर्वांचे आभार! या लेखमालेचा उपक्रम राबवणाऱ्या पैसा ताई, स्नेहांकिता, नूलकर काका आणि सासं मंडळाचे विशेष आभार! स्रुजाने नेमके प्रश्न विचारले. शिवाय मुलाखतीचे उत्तम संपादन केले. धन्यवाद स्रुजा!

सगळ्यांचे धन्यवाद. प्रश्नांचे कौतुक तुम्ही केलेत पण त्याचं ही श्रेय खरं तर विशाखा ताईलाच जातं. तिचा प्रवास खरोखर स्पृहणीय होता आणि मला तिच्याबद्दल समजल्यापासून कुतुहल होतंच. प्रश्न सुचण्यामागचं उत्तर तिच्या प्रवासात च आहे :) या मुलाखतीने मला ही २ गोष्टी शिकता आल्या. सुंदर झाली ही लेखमाला. हे सगळे लेख वाचून " याहुन करावे विशेष..." ची जाणीव होते, ते या लेखमालेचं निखळ यश म्हणावं लागेल.

पिशी अबोली's picture

24 Sep 2016 - 3:22 pm | पिशी अबोली

मुलाखत तर छानच. विशाखाताईंचं लेखन वाचणं, त्यांना प्रत्यक्ष भेटणं आणि त्यांची मतं मुलाखतीतून वाचणं हा सगळाच आनंदी प्रकार असतो.
आणि स्रुजाबाईंचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. ही बया काय काय म्हणून करत असते त्याचा अचंबा वाटतो नेहमी.

उल्का's picture

26 Sep 2016 - 3:06 pm | उल्का

मस्त मुलाखत!
सृजा आणि विशाखा दोघींना धन्यवाद!