.inwrap
{
background-color: #F7F0ED;
}
.inwrap
{
border: solid transparent;
border-width: 30px;
-moz-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
-webkit-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
-o-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
}
इतर कुठल्याही मराठी माणसाप्रमाणे मलाही इतिहासाची ओळख शिवाजी महाराजांपासूनच झाली. यत्ता चौथीसाठी महाराष्ट्र शासनातर्फे प्रकाशित केले गेलेले (आणि गेली पन्नास वर्षे सिलॅबस न बदलता जवळपास आहे तस्से राहिलेले) 'शिवछत्रपती' हे मी वाचलेले इतिहासाचे पहिले पुस्तक. त्याआधीही दिवाळीतले किल्ले, शिवजयंती, इ. माध्यमांतून ओळख होतच होती. प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत अनेक विषय शिकवले जातात, पण किमान महाराष्ट्रात तरी इतिहास हा एक विषय असा आहे की ज्याची किमान काही पैलूंपुरती तरी कायम ओळख होतच राहते. त्यामुळेच इतिहास हा बहुतेकांच्या आवडीचा विषय असावा असे वाटते - किमान माझ्या बाबतीत तरी ते खरे होते. घरी-दारी या विषयाची चर्चा कायम थोडीतरी होत असे (शिवाजी महाराज मिरजेला आले असताना त्यांचा तळ आमच्या घराच्या आवारात होता, असे तेव्हा बाबा मजेने सांगत.) शिवाय घरी यावरची अनेकविध पुस्तके असल्याने त्यांचे वाचन होतच असे. त्यातूनच उत्सुकता वाढत गेली, आणि इतिहासाचे बीज पेरले गेले. पुढे मग स्वातंत्र्यचळवळ, मध्ययुगीन व प्राचीन भारत, वैदिक संस्कृती, हडप्पा संस्कृती, युरोपातील रेनेसाँ, पहिले व दुसरे महायुद्ध, हिटलर, स्टॅलिन, नेपोलियन, इ.इ. विषयांवर जमेल तसे वाचन केले, कारण यात जितके वाचू तितके नवलच वाटत असे. कायम काहीतरी नवीन सापडत असल्यामुळे आणि नवीन सापडण्याकरिता विशेष मेहनतीची आवश्यकताही नसल्यामुळे आय वॉज हूक्ड. त्या भरातच घरी सापडतील ती पुस्तके वाचून काढली. राजा शिवछत्रपती-स्वामी-ययाती-पावनखिंड-पानिपत इ. नेहमीच्या कादंबर्यांसकट काही बखरी, शेजवलकरांसारख्या तज्ज्ञ इतिहासकारांचा समग्र लेखसंग्रह... असे एकुणात वाचन बरे चालले होते.
तोवर इंजीनिअरिंगकरिता आमची बदली झाली पुण्याला. मिरजवियोगाच्या दु:खातून लगेच बाहेर यायला मदत झाली ती अनेक मित्रांची आणि लायब्रर्यांची. फुटपाथवर पुस्तके धुंडाळण्याचा जो छंद तेव्हापासून लागला, तो अजूनही कायम आहे. त्यातच इंजीनिअरिंगच्या दुसर्या वर्षात असताना एका संध्याकाळी सदाशिव पेठेतल्या गल्लीबोळांमध्ये निरुद्देश भटकत असताना एका गल्लीत शिरताक्षणी एका जुनाट इमारतीने लक्ष वेधून घेतले. बाजूला भरत नाट्य मंदिर, समोर डेअरी आणि अपार्टमेंट अशा नॉर्मल परिसरात ही दुमजली इमारत अंमळ विजोडच दिसत होती. थांबून त्या इमारतीवरचा बोर्ड पाहिला - 'भारत इतिहास संशोधन मंडळ, पुणे' आणि लगेच ट्यूब पेटली. गोनीदांच्या दुर्गभ्रमणगाथेतला तो उल्लेख आठवला. (ते आणि बाबासाहेब दोघेही तरुण असताना तिथे येत, मोडी वाचताना 'ते समयीं बाजीरावसाहेबांसमवेत दोनशे लोक होते" ऐवजी "दोनशे केक होते' असे वाचून केकचा शोध भारतातच लागला, कारण युद्धातही स्वतः बाजीरावसाहेब दोनदोनशे केक जवळ बाळगीत, वगैरे दिव्य शोध लावीत.) आणि 'स्वप्नी जे देखिले रात्री | ते ते तैसेचि होतसे |' ही समर्थोक्ती जणू अनुभवल्याच्या आनंदातच त्या इमारतीत पहिले पाऊल ठेवले. त्यालाही आता जवळपास ९-१० वर्षे होत आली.
मंडळाचा (भारत इतिहास संशोधन मंडळाला सगळे चाहते 'मंडळ' असेच संबोधतात) शोध लागण्याअगोदर मिरजेतच उन्हाळी सुट्टीत श्री. मानसिंगराव कुमठेकर यांच्याकडून मोडीचे पहिले धडे गिरवले. मोडी शिकून प्रथमच अस्सल कागदपत्रे वाचताना जो आनंद झाला, तो शब्दांत सांगणे निव्वळ अशक्य आहे. घरी-दारी काही प्रसिद्ध पत्रे वाचून दाखवताना फार भारी वाटत असे. शिवाय अगोदर केवळ नाव ऐकलेली अनेक पुस्तके मंडळात प्रत्यक्ष पाहून हर्षवायू व्हायचाच बाकी होता. कवी भूषणापासून जदुनाथ सरकारांपर्यंत, होमरपासून हिटलरपर्यंत सर्व विषयांवरची पुस्तके मंडळात आहेत. हळूहळू त्यातली अनेक पुस्तके वाचून काढली. सोबतच अधूनमधून होणार्या व्याख्यानांनाही हजेरी लावणे सुरू केले. मंडळात काही लोक आपसात ऐतिहासिक चर्चा करतात, हेही तेव्हा पाहिलेले होते. जमेल तशी श्रवणभक्तीही करीत असे. पण त्यांपैकी कुणाशी ओळख नव्हती. पण त्याचीही चिंता एके दिवशी आपसूक मिटली. मंडळात एकदा काही लोक चर्चा करीत असताना मी तिथे एका गृहस्थांना विचारून फक्त ऐकत बसलो आणि मध्ये एक शंका तेवढी विचारली. दुसर्या एका गृहस्थांनी तिचे अगदी व्यवस्थित निरसन केले. ते दुसरे गृहस्थ खूप वेळेस मंडळात दिसत. त्यांना या अगोदरच्या भांडवलावर अधूनमधून काहीतरी विचारत असे, आणि ते अगदी तपशीलवार, न कंटाळता पूर्ण समाधान होईतोवर उत्तर देत. त्यांच्याबद्दलचा आदर हळूहळू वाढीस लागला, पण त्यांचे नाव काही माहीत नव्हते. एकदा मी सहज त्यांना नाव विचारल्यावर "मे-हें-द-ळे" असे नाव त्यांनी सांगितले. आमच्या एका मित्रवर्यांना हे सगळे सांगितल्यावर तो उडालाच. तोवर मला इतिहाससंशोधनात अलीकडे काय चाललेय याची वट्ट कल्पना नव्हती. बाबासाहेब पुरंदरे, वासुदेवशास्त्री खरे, इतिहासाचार्य राजवाडे, त्र्यं.शं. शेजवलकर, सेतुमाधवराव पगडी वगैरे संशोधकांची परंपरा नंतर जणू अस्तंगतच झाली अशा अतिशय मोठ्या गैरसमजुतीत मी वावरत होतो. मित्राने त्या भ्रमाचा फुगा लग्गेच फोडला आणि हे मेहेंदळे कोण आणि त्यांनी कुठले पुस्तक लिहिले इ. सांगितले. आता चकित होण्याची पाळी माझी होती. लगेच मंडळात गेलो आणि गजानन मेहेंदळे यांचे 'श्री राजा शिवछत्रपती' वाचायला सुरुवात केली.
बाबासाहेब पुरंदर्यांसोबत फोटो.
त्यानंतर मेहेंदळेंविषयीचा आदर झपाट्याने वृद्धिंगत होत गेला. त्यांचे पुस्तक म्हणजे माहितीचा अफाट खजिना आहे. निव्वळ माहितीच नव्हे, तर पानापानागणिक दिसणारी तर्कशुद्धता आणि चिकित्सक वृत्ती पाहून या माणसाने शिवचरित्राचा अभ्यास किती खोलवर केलाय हे सरळ दिसतच होते. इतके असूनही अन्य अज्ञ जनांसोबत वावरताना त्यांना कसलाही संकोच नाही. अगदी शांतचित्ताने सर्व प्रश्नांची उत्तरे देत (अजूनही देतात). त्यामुळे इतिहासातल्या अनेक गोष्टींचा नीरक्षीरविवेक कसा करावा, याचे थोडेतरी भान आले.
कॉलेजमध्ये असताना खर्या अर्थाने गेमचेंजर ठरलेली गोष्ट म्हणजे सीओईपी हिस्टरी क्लब. काही मित्रांसोबत क्लबची स्थापना केली. सुरुवातीला कॉलेजपातळीवरच विविध विषयांवर विद्यार्थीच लेक्चर देत असत - ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे. सुरुवात झाली ती ट्रोजन युद्धाने. पुढे चेंगीझ खान, सोन्याचा इतिहास, नाईट्स टेम्पलार, पानिपत, इ.इ. अनेक विषय अनेक मित्रांनी सादर केले. क्लबद्वारे ऑर्गनाईझ केलेला पहिला इव्हेंट म्हणजे क्रांतिकारकांच्या फोटोंचे प्रदर्शन. काही मित्रांच्या ओळखीने पेपरमध्येही त्याची बातमी दिली. त्यामुळे पुण्यातून बरेच लोक येऊन ते सर्व फोटो वगैरे पाहून गेले. परिणामी आउटरीच बर्यापैकी वाढला. त्यातच एका मित्रवर्यांनी 'हिस्टरी वीक' नामक भन्नाट आयडिया काढली - आठवडाभराची व्याख्यानमाला. प्रथम वर्षी विद्यार्थ्यांनीच लेक्चर्स दिली, आणि एक गेस्ट लेक्चर घेतले पुणे विद्यापीठातल्या प्रा.डॉ. राधिका शेषन यांचे टेक्स्टाइल हिस्टरीवर. प्रथम वर्षाची पुण्याई द्वितीय वर्षी (म्हणजे आमच्या इंजीनिअरिंग लास्ट वर्षी) खूप कामाला आली. तेव्हा सगळ्या क्लबकर्यांनी तुफान जोराने कामे केली. तेव्हाचा हिस्टरी वीक म्हणजे अजूनही आठवण आली तरी भारी वाटते. अगोदर बैठक होऊन निनाद बेडेकर, शशिकांत पित्रे, आनंद हर्डीकर, वि.ग. कानेटकर इ. दिग्गज वक्ते ठरवले, त्यांचे त्यांचे विषय नक्की करून त्यांच्याशी संपर्क साधला, त्यांचा होकार मिळवल्यावर आख्खे पुणे प्रचारार्थ पिंजून काढले. शाळा, कॉलेज, क्लास, लायब्ररी, होस्टेल्स... काही काही म्हणून शिल्लक ठेवले नाही. परिणामी ऑडिटोरियममध्ये तुफान गर्दी झाली. भाषणे तर हाउसफुल्ल झालीच, शिवाय बाहेर एक छोटेखानी पुस्तक प्रदर्शनही भरवले होते. तेव्हा आमच्या मित्रांच्या डोक्यात अशा काही भन्नाट आयडिया येत असत आणि ते ज्या पद्धतीने त्या राबवीत त्याला तोड नाही. म्यानेजमेंट-डिसलेक्सिक असलेला मी ते बह्वंशी अवाक होऊन पाहत असे.
p>
निनाद बेडेकरांसोबत सीओईपी हिस्टरी क्लब सदस्य.
२००९ सालचा हिस्टरी वीक तुफान जबरदस्त हिट झाला. त्याच वर्षी कॉलेजच्या इतिहासावरही थोडे संशोधन केले, केसरी पेपरच्या पुराभिलेखागारात चाफेकर बंधूंचे सहकारी महादेव रानडे यांच्याशी निगडित बातम्या हुडकल्या (ते सीओईपीचे विद्यार्थी होते). वर्ष आणि कॉलेज संपता संपताच निनाद बेडेकरांसोबत क्लबची दोनदिवसीय रायगड ट्रिपही केली. तेव्हा आम्हाला भूषणाचा किडा एकदम बिगटाईम चावला. येताजाता सगळे जण 'इंद्र जिमि जंभ पर', 'साजि चतुरंग भरि' वगैरे कवने गाऊन समोरच्याला एका श्लोकात गार करायचा प्रयत्न करीत असू. शब्दयोजना घिसीपिटी वाटेल, पण खर्या अर्थाने मंतरलेले दिवस होते ते. अजूनही त्या दिवसांची आठवण आली की स्फुरण चढते. सगळे एकाचढ एक नर्ड लोक्स आणि तितकेच उत्साही. कोणीच 'नॉर्मल' नाही. असा क्राउड आख्ख्या कॉलेजात तेव्हा दुसरा नसेल. माझ्या होस्टेल रूमवर कॉन्स्टंट अड्डा भरत असे. कोट्या, जोक्स, टवाळी यांना ऊत येणे ही नॉर्मल सिच्वेशन. फार फार फारच भारी दिवस. कधी जमल्यास सीओईपी हिस्टरी क्लबचा डीटेल इतिहास लिहावा म्हणतो. सुदैवाने त्याची बरीच साधनसामग्री उपलब्ध आहे.
हिस्टरी वीकमध्ये वि.ग. कानेटकरांसोबत क्लब सदस्य.
सीओईपीनंतर कोलकात्यात आगमन झाल्यावर हा इतिहासाचा किडा खूपच ष्ट्राँग होता. त्यातच ग्रीक भाषा शिकवणार्या एका क्लबबद्दल माहिती कळताक्षणी त्यांना जाऊन भेटलो आणि जोमाने ग्रीकाध्ययन सुरू झाले. कोलकात्यातल्या कॉलेजाची लायब्ररी अतिसुसज्ज असल्यामुळे तिथे इतिहासाचीही अनेक पुस्तके होती. त्यांचे वाचनही सुरूच होते. थोडक्यात, नव्या जोमाने गटणीकरण सुरू होते. त्या दोनेक वर्षांत खूप नवीन पुस्तके वाचली. ग्रीक क्लबमध्ये सुरुवातीला ग्रीक शिकलो खरे, पण काही महिन्यांनी ग्रीकऐवजी बंगाल-महाराष्ट्र सांस्कृतिक देवाणघेवाण यावरच भर आला. परिणामतः बंगालच्या इतिहासाची आणखी डीटेलमध्ये ओळख झाली.
त्यानंतर मग विशेष काही सांगण्यासारखे नाही. तीच ती जुनी रेकॉर्ड - अनेक पुस्तके वाचली. नेटचा पुरेपूर वापर/दुर्वापर झाला. अनेक संशोधकांशी विविध प्रकारे संपर्क साधला. एशियाटिक सोसायटी, नॅशनल लायब्ररी, इ. मोठ्या नामवंत संस्थांच्या पुराभिलेखागारात थोडा शिरकाव झाला, त्यांच्या लायब्रर्या बघितल्या. पण इतिहासात नक्की कशावर संशोधन करावे हे काही कळत नव्हते. असेच चाचपडण्यात आणखी तीन-चार वर्षे गेली आणि अखेरीस गेल्या दोनेक वर्षांत दिशा मिळाली....
त्यामुळे शिवाजीमहाराज मिरजेला आल्याचे मूळ डच पत्र शोधता आले. (ते अगोदर पब्लिश्ड होते, फक्त मूळ हस्तलिखिताचा फोटो काढला, इतकेच.) शिवाय आणखी काही अप्रकाशित डच साधनेही शोधता आली, त्यांचे विश्लेषणही करता आले.
हा झाला वाचक ते अमॅच्युअर संशोधक इथवर झालेला प्रवास. संशोधनही जसे जमेल तसे करतो, फुलटाईम युनिव्हर्सिटीवाल्यांच्या तोडीचे दर वेळेस होते असे आजिबात नाही. पण घाई कुणाला आहे?
या सगळ्याचा मला काय फायदा झाला? आर्थिकदृष्ट्या पाहता काहीच नाही. पण यानिमित्ताने जगभर इतक्या वेगवेगळ्या लोकांशी संपर्क आला, इतक्या लोकांच्या विचारपद्धतींशी परिचय झाला, त्याचे मोजमाप पैशात करणे निव्वळ अशक्य आहे. मग मेहेंदळे सरांशी शिवचरित्राबद्दलची चर्चा असो किंवा विजापूरकर श्री. अब्दुल अझीझ यांच्याशी टेम्पल आर्किटेक्चरबद्दलची चर्चा किंवा मिरजेबद्दल कुमठेकर यांच्याशी.... या आणि अशा अनेक लोकांनी इतिहासाचे आत्मभान जागृत केले, जाणिवांना व्यवस्थित पैलूही त्यांच्यामुळे पडले. त्यांचे ऋण कायमच राहील.
सरतेशेवटी 'इतिहाससंशोधनामागील प्रेरणा काय आहे?' असा प्रश्न कुणी विचारल्यास "जुनी रेकॉर्डे खोदत बसायला मजा येते" हेच उत्तर देईन. इतिहाससंशोधनातून समाजसुधारणा किंवा ओपीनियन फॉर्मेशन वगैरे बाकी सर्व गोष्टी सेकंडरी आहेत. या सर्व गोष्टींत - जुनी रेकॉर्डे खोदणे, त्यांच्या आधारे भूतकाळातील गोष्टी 'नक्की कशा घडल्या असतील?' याचे तर्कशुद्ध विश्लेषण करणे, इ.मध्ये एक स्वयंसिद्ध मजा आहे. त्यांचा काहीतरी कुठेतरी उपयोग होतो हे खरेच, आणि प्रत्येकाने 'कलेसाठी कला' छाप अॅटिट्यूडच दाखवावा असे आजिबात नाही. कुणाला निव्वळ उपयुक्ततावादी दृष्टिकोनातून इतिहास आवडेल, कुणाला आणखी कशामुळे, कुणाला कदाचित वट्ट आवडणारही नाही. पण माझ्यापुरते विचारल्यास मी तरी हेच उत्तर देईन!
बाबासाहेबांची सही व शुभेच्छा.
प्रतिक्रिया
15 Sep 2016 - 8:29 am | पैसा
योग्य त्या वेळी योग्य त्या जागी असणे हेही नशीबच! पुढील संशोधनासाठी भरपूर शुभेच्छा!
15 Sep 2016 - 8:43 am | A.N.Bapat
वा , झकास बॅटमॅन ...
15 Sep 2016 - 8:56 am | गणामास्तर
मनापासून उतरलेले एकदम प्रामाणिक लेखन ! एकदम झकास.
पुढील वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा !
15 Sep 2016 - 9:36 am | sagarpdy
+1
15 Sep 2016 - 10:22 am | मोदक
+1111
15 Sep 2016 - 9:01 am | यशोधरा
मस्त लिहिले आहे, आवडला लेख.
15 Sep 2016 - 9:05 am | अनुप ढेरे
झकास लिहिलय!
15 Sep 2016 - 9:29 am | टवाळ कार्टा
जबहरा.... गोथम सिटीत कधी प्रवेश झाला ब्याटूकसर
15 Sep 2016 - 9:34 am | प्रचेतस
तुझा हा प्रवास थोडाफार माहितच आहे.
लवकरच तुझे स्वतंत्र संशोधन प्रसिद्ध होईल ह्याची खात्री आहेच. पुढिल वाटचालीस शुभेच्छा.
15 Sep 2016 - 10:04 am | सतिश गावडे
आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा !!
15 Sep 2016 - 10:05 am | कैलासवासी सोन्याबापु
वंध्यामैथुन धाग्यांच्या भांगेत आज सकाळ सकाळ एक तुळस घावली!!. थँक्स फॉर द आर्टिकल बॅटू भावा. जियो!! भालो खूब भालो दादा!
15 Sep 2016 - 10:26 am | सुनील
अगदी हेच म्हणतो!
15 Sep 2016 - 10:16 am | सुबोध खरे
सुंदर
एक तरी "क्षेत्र" असे असावे आपल्या आवडीचे.
खरा आनंद मिळाला कि झाले.
मग तिथे पैसे मिळाले कि नाही याच्याशी काय घेणे देणे आहे?
शेवटी चार पैसे टाकून तुम्ही कॉफी/ दारू पिता कशासाठी? आनंदासाठीच.
मग झालं तर.
15 Sep 2016 - 10:48 am | A.N.Bapat
>>>एक तरी "क्षेत्र" असे असावे आपल्या आवडीचे.खरा आनंद मिळाला कि झाले.मग तिथे पैसे मिळाले कि नाही याच्याशी काय घेणे देणे आहे?<<<
अगदी हेच म्हणतो मी ....
15 Sep 2016 - 10:19 am | अजया
संशोधक कसा घडत गेला सांगणारा छान लेख.
15 Sep 2016 - 10:29 am | खालीमुंडी पाताळधुंडी
मस्तच!!!
15 Sep 2016 - 10:49 am | अभ्या..
हायला बॅट्या,
एकच लंबर. लै भारी वाटले वाचून. म्हणजे कसंय ना की तेवढ्या बाबतीत आपले जुळते पहिल्यापासून. एकदा माणूस आवडला की मग बाकी काय नाय.
ब्याटोबाची माझी ओळख मिपावरच झाली. मिरजेला वास्तव्य हा मुद्दा धरुन वाढलेली आमची मैत्री. ब्याट्याचे संस्कृतवरील प्रभुत्व, त्याची स्टॅटसवर असलेली कमांड आणि इतिहासावर असलेले निस्सिम प्रेम ह्या एका मेकॅनिकल इंजिनिअरला विजोड असणार्या गोश्टी नंतर कळत गेल्या. मला ह्या तिन्ही गोष्टीत गम्य नाही. अगदीच ढ. शिवाय णॉण इंजिनिअरिंग ब्याक्ग्राउंड पण बॅट्याशी सूत एकाच मुद्द्यावर जुळले. हा माणूस कमालीचा डाउन टू अर्थ आहे. प्रचंड प्रामाणिक आहे. त्वेषाने मुद्दे मांडेल, हिरीरीने न पटणार्या मुद्द्याचा प्रतिवाद करेल, एखादा मुद्दा कळला नाही तर विचारुन घेईल. अगदी निरागसपणे "च्यायला, असंय व्हय ते. म्हैतच नव्हते" म्हनून मोकळा होईल. मनात कधीच काही, कुणाबद्दलच, कसलाच पूर्वग्रह नसणारा एकमेव आयडी म्हणले तर मी बॅट्याचे नाव घेईन. इतका व्यासंग असून बिनधास्त कोट्या करणार, पीजे पण असे एंजॉय करणार की फर्स्ट टाइम ऐकतोय. हजरजबाबी असून दुसर्याच्या ह्या गुणाला तेवढीच दाद देणार. ती सुध्दा लगेच. हयगय नाही.
प्रचंड मेमरी, त्यात साठवलेला विविध प्रकारचा महाप्रचंड डेटा, अॅक्सेस करायचा अफाट स्पीड अन ते एक्झिक्युट करायची हातोटी हे दुसर्या कुणा मित्राकडे मी तरी पाहिले नाहे. त्याबाबतीत बॅट्या सुपर काय, अगदी रजनी आहे.
खाण्यावर निरतिशय प्रेम करणार. आधि चाखलेचि पाहिजे म्हनून जगभरातले सारे पदार्थ एकेकदा का होईना उदरस्थ करण्याची मनिषा बाळगणारा हा खवैय्या. तिथेही त्याचे मत अस्ते, पूर्वग्रह नाही. (दुर्दैवाने आम्ही भेटलो त्या प्रत्येक कट्ट्याला भुरटे पंजाबी मेनूच का नशीबाला येतात हा वेगळा प्रश्न. एकदा बॅट्यालाच कट्टा नियोजन दिले पैजे)
राहता राहले बाबासाहेब पुरंदरे अन शिवप्रेम. तो आमचा एकमेकाच्या मैत्रीतला फार मजबूत धागा आहे.
.
अजून आठवेल तसे लिहिणार. भरपूर लिहिणार.. कारण हा आमच्या बॅट्याचा धागा आहे.
15 Sep 2016 - 12:47 pm | A.N.Bapat
मायला , बॅटमॅन एवढे सगळे आहेत हे माहित नव्हतं.आता तर त्यांना भेटणे अनिवार्य दिसते ... बघू कधी वेळ काढतात ते ... काय बॅटमॅन काय म्हणता तुम्ही ?
15 Sep 2016 - 2:01 pm | अत्रुप्त आत्मा
@प्रचंड मेमरी, त्यात साठवलेला विविध प्रकारचा महाप्रचंड डेटा, अॅक्सेस करायचा अफाट स्पीड अन ते एक्झिक्युट करायची हातोटी हे दुसर्या कुणा मित्राकडे मी तरी पाहिले नाहे. त्याबाबतीत बॅट्या सुपर काय, अगदी रजनी आहे. ››› भरपूर मंजे अगदी कचकूण प्लस वण! +१
खाटुकम्यान झिंदाबाद.
खाटुकाच्या सुय्राला इतिहासाची झालर
खाटुकाच्या सुय्राला इतिहासाची झालर..
खाटुकाचा मित्र म्हणून ताठ माझी कॉलर! ;)
(अता खाटुक याचं संस्क्रुत पद्य पाडेल हं! =)). )
15 Sep 2016 - 4:28 pm | असंका
+१
अगदी खरंय...
15 Sep 2016 - 11:46 am | मारवा
बॅटोबा
दंडवत स्वीकारावा
आणि थोडं ते शिवाजी महाराजांच्या ओरीजनल चित्राविषयी ची त्यामागील ती स्टोरी सांगावी ही विनंती.
16 Sep 2016 - 3:52 am | चित्रगुप्त
कोणतं चित्र म्हणता ? इथे देता येइल का ते ?
15 Sep 2016 - 11:47 am | पगला गजोधर
अभिनंदन बॅटमॅन...
आपला परिचय फक्त मिपा व १-२ कट्टे याद्वारेच...
तरीही मी खात्रीने सांगू शकतो, तुमचे एकंदरीत लिखाण प्रतिक्रिया फार तोलाणे (निःपक्ष पणे), अभ्यासू असते.
सेन्स ऑफ ह्युमर ही सुरेख आहे. तुमच्या आवडीचा विषय इतिहासात तुम्हाला अनेक ग्रेट प्रोजेक्ट्स वर संधी मिळोत...
व्हाय सो सिरिअस (असे न म्हणता)
तुम्हाला शुभेच्छा
(पगला) जोकर हयी हयी हुं हुं
15 Sep 2016 - 12:16 pm | मारवा
मला वाटतं बॅटोबा उजवे किंवा उजवीकडे झुकलेले / कललेले किंवा उजव्यातली "उजळ" बाजु जपणारे दर्जेदार उजवे आहेत.
हल्ली दर्जेदार डावे दर्जेदार उजवे दर्जेदार समन्वयवाले दर्जेदार सर्वापलीकडले
सर्वचे दुर्मिळ झालेले आहेत.
त्यामुळे बाजु कुठली महत्वाची नाही इनफॅक्ट कधीच नव्हती बहुधा मात्र किमान दर्जा असणे अत्यावश्यक होते व सध्या जरा जास्तच आवश्यक झालेले आहे.
अशा काळात बॅटोबांचे असणे दिलासादायक आहे.
15 Sep 2016 - 11:59 am | पुंबा
अलीकडच्या काळातील सर्वाधीक आवडलेला धागा.. फारच प्रत्ययकारी लिहीलय..धन्यवाद.
15 Sep 2016 - 12:02 pm | वरुण मोहिते
अजून विस्तृत वाचायला आवडेल ..
15 Sep 2016 - 12:09 pm | स्वाती दिनेश
तुझ्या इतिहासाच्या छंदाविषयीचा लेख छानच लिहिला आहेस.
पण एक तक्रार आहे, फार कमी वेळा लिहितोस रे.. जरा फ्रिक्वेन्सी वाढव, :)
स्वाती
15 Sep 2016 - 12:11 pm | मृत्युन्जय
बॅट्या म्हणजे माहितीचा खजिना हे समीकरण ठरलेलेच आहे. एक नंबर झालाय तुझ्या छंदाचा प्रवास
15 Sep 2016 - 12:23 pm | स्वधर्म
अत्यंत डाउन टू अर्थ लेख! लवकरच अाणखी खोदकामांबद्दल लिहा. मिरजेला शिवाजी महाराज अाले होते हे वाचून एकदम अापल्या गावाबद्दल आभिमान वाटला. ते डच पत्रही येथे टाकता येईल का?
15 Sep 2016 - 12:36 pm | अंतरा आनंद
क्या बात है. मस्त. 'या माणसाला सगळंच कसं काय माहिती असतं?' असं नेहमी वाटतं, त्यामागची तुमची जिज्ञासा, जिद्द आणि मेहनत आज कळली. तुमच्या इतिहाससंशोधनामागील इतिहासप्रेमाचा इतिहास आवडला त्याच्या भविष्यासाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा.
15 Sep 2016 - 12:50 pm | बोका-ए-आझम
इंजिनियरिंग आणि इतिहास हे combination जबराट आहे. History Club बद्दल वाचून माझ्या college मध्ये काढलेल्या Economics Club ची आठवण झाली. आता इतिहाससंशोधनातल्या अनुभवांवर एक लेखमाला due आहे. ती इच्छा पूर्ण करावी ही नम्र विनंती!
15 Sep 2016 - 12:53 pm | माम्लेदारचा पन्खा
अशी इच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो !
15 Sep 2016 - 12:57 pm | आतिवास
ज्या व्यक्तीला कुतूहल वाटत असतं (कशाबद्दल ते महत्त्वाचं नाही) त्या व्यक्तीला जग वेगळं दिसतं - असं वाटलं तुमचा लेख वाचून.
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
15 Sep 2016 - 1:31 pm | सिरुसेरि
छान लेख . इतके दिवस मिरज मधले लग्नाचे हॉल , मिरज मार्केट , मिरज स्टॅन्ड अशा पाट्या लावलेल्या सिटि बसेस , जंक्शन , शिवाप्पा का बसप्पा हलवाई , मिशन हॉस्पिटल , मेडिकल कॉलेज , अमर खड्डा माहित होते . आज "बॅट्मॅन यांचे गाव" हि अधिक माहिती मिळाली .
15 Sep 2016 - 1:34 pm | खेडूत
झकास लेख. छंद असावा तर असा!
15 Sep 2016 - 1:46 pm | इशा१२३
छान लेख!छंदाच्या प्रवासाचा इतिहास आवडला.
15 Sep 2016 - 1:49 pm | अभ्या..
अभिनंदन,
ब्याट्याचा हा महिमा माहीतच नव्हता. चक्क इशा१२३ ची एकच कॉमेंट पडली.
15 Sep 2016 - 3:12 pm | इशा१२३
अजून आणु का प्रतिसाद?
शतक,द्विशतक करायची सुपारि घेतली आहे का तुम्ही?करुन टाकु.
15 Sep 2016 - 4:14 pm | अभ्या..
तुम्ही आहात व्हय त्या १००-२०० करुन देणार्या? बरं बरं.
असल्या हळदी कुंकू सुपारीची मला तर कधी गरज लागली नाही. विदाऊट कंपू जरा स्वतःचेच धागे बघा जमले तर.
15 Sep 2016 - 2:07 pm | पद्मावति
अप्रतिम!!!
15 Sep 2016 - 2:44 pm | इल्यूमिनाटस
म्याक्यानिकल विंजिनियर असल्यामुळे आदर दुणावला
15 Sep 2016 - 3:35 pm | जव्हेरगंज
भारी ओ !
15 Sep 2016 - 4:10 pm | इनिगोय
वरच्या प्रत्येक प्रतिसादाशी सहमत. सादर दंडवत तुला.
15 Sep 2016 - 4:11 pm | इनिगोय
वाखुसा कुठे गेलं!
15 Sep 2016 - 4:36 pm | अप्पा जोगळेकर
पहिल्या दिवसापासून या लेखाची वाट पाहात होतो. शेवटच्या दिवशी आला.
बाकी आम्ही पामर काय बोलणार असल्या व्यासंगाबद्दल. दंडवत घ्या.
15 Sep 2016 - 4:50 pm | अप्पा जोगळेकर
अं.त्यांचे होईलच. पण तुमचेही होईल असे वाटते.
15 Sep 2016 - 4:50 pm | अप्पा जोगळेकर
हा प्र्तिसाद प्रचेतस यांना आहे.
15 Sep 2016 - 5:18 pm | अप्पा जोगळेकर
बॅटमॅन यांचे नाव काय आहे हे कळेल काय ?
नाही म्हणजे वर्तमानपत्रात वगैरे एखादा लेख येईल वाचूनसुद्धा होईल पण कळणारच नाही बॅटमॅनचा आहे ते.
शिवाय, कोणाशी इतिहासाबद्दल बोलताना 'अमुक ढमुक रेफरन्स मी बॅटमॅनच्या लेखात वाचला' अस म्हटल की लोकं अंमळ अजब चेहरा करतात.
15 Sep 2016 - 5:34 pm | आदूबाळ
नाही. हे ब्रँडबिल्डिंग असंच होऊदेत. नाव आडनाव आलं की लोक लिंग, जात असल्या फालतू निकषांवर लेखन जोखतात.
15 Sep 2016 - 5:38 pm | अभ्या..
थोडे अवघड वाटते दादा,
आता बॅटमॅन ह्या नावाने लेख तो समजा पेपरात्/मोठ्या ठिकाणी पब्लिश करु शकणारे का?
माझेच घे. अभ्या नाव इतके कॉमन आहे की मी काही पेपरात्/साईटीवर्/अजुन कुठे काही माझ्या वरिजिनल नावाने केले तर इथे त्याचा किंवा वाइसवर्सा पत्ता लागणारे का?