सासवड तसं ऐतिहासिक गाव. इथे अनेक जुने पुराणे वाडे आहेत. पुरंदरेंची भली मोठी गढी आहे, सोपानकाकांची समाधी आहे, वीरगळ आहेत. गावच्या पाठीमागे भला मोठा पुरंदर त्याचा जोडीदार वज्रगडासह दिमाखात उभा आहे. ह्या सासवडाचा वारसा मात्र शिवकाळाच्याही आधी जातो तो थेट यादवकाळात. तत्पुर्वीचा त्याचा इतिहास मला ज्ञात नाही. खुद्द पुरंदर हा यादवकालीन किल्ला. गडावरील पुरंदरेश्वर आणि केदारेश्वर ही तत्कालीन मंदिरे त्याची अजूनही साक्ष देतात.
ह्याच सासवडात दोन यादवकालीन मंदिरे आहेत आणि पुरंदरच्या पायथ्याच्या पूर गावात एक. ही तिन्ही मंदिरे साधारण १३/१४ व्या शतकातली असावीत.
सासवडला कर्हेच्या काठावर सोपानकाकांचं समाधी मंदिर आहे आणि त्याच्याच पलीकडच्या बाजूला आहे ते संगमेश्वर मंदिर. पावसाळा सोडता कर्हा नदीला नगण्य पाणी असतं तेव्हा ती सहज ओलांडता येते मात्र पावसाळ्यात नदी अगदी फुफाटत वाहत असते तेव्हा संगमेश्वरला जायला थोड्या अंतरावरचा नदीपूल वापरावा लागतो.
संगमेश्वर मंदिर तसं उंचावर वसलेलं आहे. म्हणजे एक लहानसा कोट उभारुन त्यावर मंदिर बांधलेलं आहे. मंदिरात शिल्पं अजिबात नाहीत पण एकंदरीत मंदिराचं बांधकाम देखणं आहे. सभामंडप आणि गाभारा हे यादवकालीन शैलीत तर कळसाचा भाग हा नंतर पेशवेकालीन मराठा शैलीत बांधला गेला किंवा जीर्णोद्धारीत झाला. येथे नंदीमंडप नाही किंवा तो पूर्वीच भग्न झाला असावा. एक जुना भग्न नंदी मंदिराच्या आवारात दिसतोच. सभामंडपात पेशवेकाळात कधीतरी नव्या नंदीची स्थापना झालेली दिसते.
संगमेश्वर मंदिर
कर्हेच्या काठावरील संगमेश्वर
यादवकालीन सभामंडप
गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर डाव्या सोडेचा गणेश असलेली गणेशपट्टीका आहे.
मंदिराच्या बाह्य भिंतीवरील दगडी नक्षीकाम कमालीचं देखणं आहे. येथे असलेली शिल्पांची उणीव ही नक्षी भरुन काढते हे अगदी निश्चित,
मंदिराचे पेशवेकालीन कळस तर अतिशय सुंदर दिसतात. ह्याच कळसांवर विविध मूर्ती कोरलेल्या आहेत.
वटेश्वर मंदिर
यानंतर आमचा पडाव होता ते सासवडच्या वटेश्वर मंदिरात. ह्यालाच चांगावटेश्वर मंदिर असंही म्हणतात. हे तसं गावापासून थोडं दूर. सासवड पूर रस्त्यावर. गाव संपलं की साधारण दिडेक किमी अंतरावर. हे मंदिर पण कर्हेच्याच काठी, उंचावर. इथे नदीकाठी भरपूर झाडी आहेत आणि त्या झाडीत भरपूर मोर विहरताना दिसतात.
ह्या मंदिराचा बाह्यभाग हा संगमेश्वर मंदिरासारखाच. दगडी सभामंडपावर केलेलं कळसांचं विटांचं बांधकाम हे मराठा शैलीतलं. मात्र मंदिराच्या सभामंडपातल्या भिंतींवर विविध प्रकारची शिल्पं आहेत ते येथलं वैशिष्ट्य.
मंदिराचा दर्शनी भाग.
स्तंभांवरील शरभ
येथे एका स्तंभावंवर दोन ठिकाणी महिषासुरमर्दिनीची शिल्पे आहेत. हाती शस्त्र घेऊन दुर्गा महिषाचा संहार करतेय. वध होत असताना महिष आपले महिषरुप टाकून धडातून प्रकट होताना दिसतोय.
शरभ आणि अश्व
गजाबरोबर असलेलं हे शिल्प गेंड्याचं का रानडुकराचं हे मला नीटसं कळत नाहीये.
ताक घुसळणारी स्त्री
नर्तक
सुबक नक्षीकाम
शाखामृग
कुस्तीगीर आणि नर्तक
अजून काही शिल्पे
--
--
मंदिराच्या सभामंडपातील स्तंभांवरच उपरोक्त शिल्पे आहेत. सभामंडप आणि गर्भगृहाच्या मध्ये अंतराळ आहे.
मंदिराचा अंतर्भाग
अंतराळ व गाभारा
वर सांगितल्याप्रमाणेच मंदिराचा बाह्यभाग हा संगमेश्वरासारखाच आहे. पेशवेकालीन कळस मात्र हल्लीच सोनेरी रंगाने रंगवुन काढलेला आहे.
पेशवेकालीन कळस
मंदिराच्या बाह्यभिंती
मंदिरातून दिसत असलेले उडणारे मोर :)
चांगावटेश्वर मंदिर पाहून आम्ही निघालो ते पुरंदरच्या पायथ्याला असणार्या पूर गावात. ह्याच गावात आहे ते नारायणेश्वराचं सुरेख मंदिर.
पूरचा नारायणेश्वर
पूर गाव सासवडपासून तसं १०/१२ किमी अंतरावर. गावात जाताना पुरंदर किल्ला सतत नजरेसमोर राहात असून जवळजवळ येत असतो. ह्याच गावात आहे नारायणेश्वराचं सुंदर देऊळ.
माझ्या अंदाजाप्रमाणे संगमेश्वर आणि वटेश्वरापे़क्षाही हे अधिक प्राचीन आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावरील शैव द्वारपालांवरुन हा निष्कर्ष काढता येतो.
ह्याही मंदिराच्या बाह्यभिंतीवर तसेच सभामंडपातही शिल्पे नाहीत. जी काही मोजकी शिल्पे आहेत ती मंदिराच्या प्रवेशद्वारावरील द्वारपालांच्या रुपात आणि गाभार्याच्या द्वारपट्टीकेवरील भैरवांच्या रुपात आणि ह्याखेदीज नटराज शिवाचे एकमेव शिल्प येथे आहे.
मंदिराचं आवार विस्तृत आहे. आवारातच एका ठिकाणी चपेटदान मुद्रेतल्या वीर मारुतीची मूर्ती ठेविली आहे. हा मारुती शिवकालीन आहे.
वीर मारुती
नारायणेश्वर मंदिर
काही भग्न स्तंभ आणि द्वारचौकट
द्वारचौकटीवर दोन्ही बाजूसं शैव प्रतिहारी आहेत. कडेच्या बाजूस असणार्या मूर्तीच्या हातात लआंबटसर अशी पिशवी दिसते. ह्याचा अर्थ हे मंदिराच्या बांधकामासाठी धन आणत आहेत असा होतो.
नटराज शिव
द्वारचौकटीवरील नक्षीकाम
सभामंडप हा पुष्कळ स्तंभांवर तोललेला आहे मात्र ह्या स्तंभांवर शिल्पे नाहीत शिवाय नक्षीसुद्धा नाही.
गर्भगृहाच्या दोन्ही बाजूस असलेले भैरव द्वारपाल अतिशय देखणे आहेत. एकाच्या हाती त्रिशुळ आणि डमरु आहे तर दुसर्याच्या हाती डमरु आणि नाग आहे.
----
गाभार्याचं कमळाच्या आकृतीत कोरलेलं नक्षीदार छत
मंदिराच्या दगडी बाह्यभिंती अतिशय सुंदर दिसतात. भिंतीत काही ठिकाणी देवकोष्ठे केलेली दिसतात पण ह्यात आज मूर्ती नाहीत.
ह्याच मंदिराच्या समोर रस्त्याच्या पलीकडे शेतात काही सतीशिळा दुर्लक्षित अवस्थेत पडलेल्या आहेत. त्यातली एक सतीशिळा तर कमालीची देखणी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. ह्या सतीशिळेवर सतीचे चार हात कोरलेले आहेत. ह्याचा अर्थ चार वेगवेगळ्या वीरपत्नी येथे सती गेल्यात असा होतो. एकाच वीराच्या चार पत्नी सती जाणे हे संभवनीय नाही.
सतीच्या हातांखाली युद्ध करण्यार्या वीराचा प्रसंग कोरलेला आहे. व त्याचे खाली चार वीरपत्नी प्रार्थना करताना दाखवलेल्या आहेत. सर्वात खालच्या प्रसंगात चितेवर बसून सती जाणार्या स्त्रीचा प्रसंग कोरलेला आहे. व सर्वात वरच्या पट्टिकेवर ह्या स्त्रीया कैलासास जाऊन शिवलिंगाची आराधना करताना दाखवलेल्या आहेत.
ह्याच सतीशिळेच्या जोडीला वीरमारुतीची एक मूर्ती आहे.
ह्याच्या समोरच शेतात असलेली एक दुर्लक्षित सतीशिळा.
ही झाली सासवडच्या काही प्राचीन मंदिरांची थोडक्यात ओळख. अजूनही काही प्राचीन मंदिरे ह्या परिसरात असतील. थोडा शोध घेतला पाहिजे. पण सासवडच्या आसपासचा परिसर हा प्राचीन अवशेषांनी अगदी वेढलेला आहे. ह्याच्या आसपासच्या नाझरे, माळशिरस, नायगाव ह्या लहानशा गावांमध्ये असणारे कित्येक वीरगळ, सतीशिळा, काही मोडलेली मंदिरे, काही अजूनही शाबूत असणारी पण मूळचे सौंदर्य हरवलेली मंदिरे मी हिंडून पाहिली आहेत त्याबद्दल पुन्हा कधीतरी.
प्रतिक्रिया
5 Sep 2016 - 11:49 am | यशोधरा
सभामंडप, गणेश पट्टीका, नक्षीकाम ह्यांचे फोटो व इतरही फोटो आवडले.
छताला केलेले रंगकाम :(
माहितीपर वर्णन जरा अधिक विस्ताराने लिहिलेले चालले असते.
5 Sep 2016 - 12:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>>माहितीपर वर्णन जरा अधिक विस्ताराने लिहिलेले चालले असते.
सहमत. बाकी, छायाचित्र माहितीपूर्ण आहेत. धन्स.
-दिलीप बिरुटे
5 Sep 2016 - 11:51 am | बॅटमॅन
सासवडच्या देवळाच्या माहितीबद्दल आभार. इथे जायचा प्लॅन आहे पण मुहूर्त कै लागलेला नै अजून. जाईन तेव्हा हे नक्की लक्षात ठेवीन.
बाकी पूरच्या देवळाचा जो एंट्रन्स आहे त्या दरवाजातच आपल्या डाव्या बाजूला खांबाचा एक छोटासा शिलालेख न रंगवता आहे तस्सा ठेवलाय त्याचा फोटो दिला असता तर अजून बरे झाले असते. त्यात "चांगा वटेश्वर" असे यादवकालीन देवनागरी लिपीत लिहिलेले आहे. झालंच तर या मंदिराच्या मागील बाजूस जरा थोड्या अंतरावर एक बारवही आहे.
5 Sep 2016 - 11:57 am | प्रचेतस
अरे त्या लेखाचा फोटो नेमका गहाळ झाला. माझ्या आठवणीप्रमाणे हा लेख पूरला नसून वटेश्वराच्या भिंतीवर आहे.
बाकी पूर येथे सापडलेला रामदेवरायाच्या लेखाची शिळा फेमस आहे. ह्यात हेमाद्री आणि बोपदेव दंडनायकाचा उल्लेख आहे आणि त्यांना श्रीकरणाधिप केल्याचे म्हटले आहे. ही शिळा सध्या बहुधा मंडळात आहे.
5 Sep 2016 - 12:04 pm | बॅटमॅन
अच्छा, ओक्के. पण याही देवळाच्या एंट्रन्स वाला फटू पहा. मी म्हणतो तसेच आहे, एक छोटासा भाग बिनरंगाचा आहे. ते हेच मंदिर आहे यात डौट नै.
5 Sep 2016 - 12:11 pm | प्रचेतस
रैट्ट.
आता दिसतोय. पूर तसं जवळच. परत जाऊन पाहतो. :)
5 Sep 2016 - 11:52 am | मोक्षदा
एक प्रश्न शरभ म्हणजे काय
5 Sep 2016 - 11:59 am | प्रचेतस
शरभ म्हणजे सिंहासारखा काल्पनिक पशू.
हिरण्यकश्यपूच्या वधानंतर कोपलेल्या नरसिंहाला शंकराने शरभाचे रूप घेऊन (शरभाने सिंहाचा पराभव करुन) शांत केले अशी काहिशी दंतकथा शैवांमध्ये प्रचलित आहे.
5 Sep 2016 - 12:23 pm | शरभ
:)
- शरभ
5 Sep 2016 - 12:02 pm | पियुशा
मंदिराच्या बाह्य भिंतीवरील दगडी नक्षीकाम कमालीचं देखणं आहे
+ १०००००००००००००००० वेळा सहमत !!!
5 Sep 2016 - 12:10 pm | सुमीत भातखंडे
खूपच छान माहिती आणि फोटो.
5 Sep 2016 - 12:12 pm | अभ्या..
मस्त रे वल्ली.
ऑईलपेंट लावणार्याला फोडून काढले पाहिजे.
5 Sep 2016 - 12:14 pm | नाखु
आणि चित्रांंमुळे किमान काय पहायचे आणि नक्की कसे ते समजले.
जाता जाता सासवड ही जागा तुमच्या मित्रांची ऐतीहासीक ठिकाण आहे काय? अलिकडे वारंवार उल्लेख अस्तो म्हणून विचारले?
नेमस्त नाखु
5 Sep 2016 - 12:31 pm | अनुप ढेरे
संगमेश्वर आणि वटेश्वर मंदिर पाहिली होती. छानच आहेत. सोनेरी रंगाने शोभा गेली असं मत आहे.
5 Sep 2016 - 12:38 pm | पैसा
इतकी देखनी शिल्पे रंगवणार्याना हत्तीच्या पायी द्या! पण ही संरक्षित स्मारके नाहीत का?
5 Sep 2016 - 3:41 pm | प्रचेतस
ह्यातले कुठलेच मंदिर संरक्षित नाही. :(
5 Sep 2016 - 2:45 pm | पाटीलभाऊ
सुंदर फोटो आणि वर्णन.
मीसुद्धा बरीच मंदिरे पहिली आहेत..पण एवढे बारकाईने निरीक्षण नाही केला बुआ कधी..!
5 Sep 2016 - 2:47 pm | पद्मावति
सुरेख लेख.
5 Sep 2016 - 5:51 pm | अभिजीत अवलिया
काही काळ सासवड मध्ये राहिलेलो आहे. ही दोन्ही मंदिरे स्थापत्य कलेचा उत्तम नमुना आहेत. आता सुशोभीकरणाच्या नावाखाली रंग फासला जातोय म्हणजे काही खरे नाही.
5 Sep 2016 - 5:56 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर लेख आणि फोटो ! वल्ली म्हटल्यावर बोलनेकाईच नै :)
5 Sep 2016 - 6:29 pm | सतिश गावडे
तुमच्या लेखांना छान लिहीले आहेस असे म्हणणे म्हणजे सूर्याला तू छान प्रकाश देतो म्हणन्यासारखे आहे.
चांगा वटेश्वर म्हणजे ज्ञानदेवांना वाघावर बसून भेटायला येणारे चांगदेव का?
5 Sep 2016 - 7:44 pm | प्रचेतस
चांगदेव हे नाथपंथी होते हे आपणास ज्ञात आहेच.
तत्वसारात चांगदेव म्हणतात की
आता वटेश्वरप्रसादें | मी निर्गुणभक्ती अनुवादें |
तरिं आइकतु श्रोते विनोदें | चांगा म्हणे ||
...
कथिलें वटेश्वरप्रसादें | योगरहस्य हें |
वाइली वटेश्वरचरणयुगुळ | चांगा म्हणे ||
अर्थात वटेश्वर हे चांगदेवाचे गुरु अथवा शंकराचे नाव असावे. वटेश्वर कोण ते नक्की सांगता येत नाही.
हे मंदिर कदाचित चांगदेवाच्या शिष्यापैकी कोणीतरी बांधले असून त्यास आपल्या गुरुचे अर्थात चांगदेव वटेश्वर असे नाव दिलेले असावे. अर्थात हा केवळ तर्क आहे. तसे सिद्ध करणारा आधार मला माहीत नाही.
6 Sep 2016 - 10:27 am | रातराणी
लहान तोंडी मोठा घास, कोल्हापुरात स्टॅण्डला जायच्या रस्त्यावर एक छोटसं महादेवाच मंदीर आहे आणि मंदीराशेजारी वडाच झाड आहे त्यामुळे त्याला वटेश्वर महादेवाचे मंदीर म्हणतात. तसा काही संदर्भ इथेही असण्याची शक्यता असेल. लेख नेहमीप्रमाणेचं उत्तम!!
6 Sep 2016 - 11:11 am | प्रचेतस
हो.
वडाचं झाड सासवडच्या वटेश्वर मंदिरापाशी देखील आहे. त्याचा संबंधही असू शकतो.
पण चांगा हे नाव स्पेसिफिकली चांगदेव योग्याच्या संदर्भाने उच्चारले जाते. त्यामुळे वरील तर्क. शिवाय सासवड येथे चांगदेवाने मठ स्थापन केल्याचे उल्लेख आहेत. वर बॅटमॅन म्हणातो तसा पूरच्या नारायणेश्वराच्या देवळात तसा शिलालेखच आहे.
बाकी अधिक माहिती.
हरिश्चंद्रगडावरच्या शिलालेखांत
चक्रपाणि वटेस्वर नंदनु तस्य सुतु वीकटदेओ
आणि चांगा वटेस्वराचा
असे दोन उल्लेख आलेले आहेत
हे दोन चक्रपाणी वटेश्वर आणि चांगा वटेश्वर कुणी दोन व्यक्ती नसून एकच चांगदेव योगी आहेत. स्वतः ज्ञानेश्वरांनी चांगदेवपासष्टीत चांगदेवांना ह्या दोन्ही नावांनी संबोधिले आहे.
तया पुत्र तू वटेश्वराचा | रवा जैसा कापुराचा | चांगया मज तुज आपणयाचा | बोल एके ||
आणि
एवं ज्ञानदेव चक्रपाणि ऐसे | दोन्ही डोळस आरीसे | परस्पर पाहता कैसे | मुकले भेदा ||
5 Sep 2016 - 6:38 pm | संत घोडेकर
सुंदर फोटो आणि लेख.डाव्या सोंडेचा गणपती गणेशपट्टीकेवर सहसा आढळत नाही ना?
5 Sep 2016 - 8:08 pm | प्रचेतस
बरेचवेळा आढळतो. मी स्वत: चार पाच ठिकाणी द्वारपट्टीकेवर डाव्या सोंडेचा गणपती पाहिला आहे.
5 Sep 2016 - 8:31 pm | चित्रगुप्त
नेहमीप्रमाणे अत्यंत सुंदर फोऑटोंनी सजलेला महितीपूर्ण लेख.
या जुन्या वाड्यांचे आणि गढी वगैरेंचे फोटो डॉक्युमेन्टेशन करून ठेवणेही अगत्याचे आहे. मी सासवड बघितलेले नाही, परंतु आजकाल केंव्हा जुन्या वास्तु पाडून त्याजागी मॉल्स, दुकाने, गोडाऊन, पार्किंग वगैरे बनवले जाईल हे सांगता येत नाही. खुद्द दिल्लीत कॅनोट प्लेस जवळची एक प्राचीन संरक्षित इमारत रातोरात पाडली गेली, नंतर त्याजागी असेच काहीतरी शॉपिग काँप्लेक्स बनवले गेल्याचे मी बघितले आहे.
5 Sep 2016 - 9:59 pm | किसन शिंदे
लेख आवडला आणि त्यापेक्षाही फोटो जास्त आवडले. नारायणपूरच्या नारायणेश्वर मंदिरात आधी बर्याचदा गेलोय, पण एवढं लक्ष देवून कधीच पाह्यलं नव्हतं. पुढच्या वेळी जाताना लेख लक्षात ठेवून मंदिर बघेन.
आणखीही उत्तमोत्तम लेखांच्या प्रतिक्षेत..
5 Sep 2016 - 10:29 pm | अनिरुद्ध.वैद्य
तुम्ही इतकी छान माहिती देतात, अन त्यामुळे निदान अशी सुंदर मंदिरे आहेत, असे माहिती तरी होते.
एक पुस्तक लिहा देवा ह्या पुरातन वारस्यावर. अन शिल्पे कशी ओळखावी ह्यावरही :)
बाकी, तीनचारदा पुरंदरवर गेलो, पण ही मंदीरे बघीतली नाहि. आता ह्या मंदीरासाठी पुन्हा वारी.
अवांतर, पुरंदर किल्यावरील केदारेश्वर मंदिरात पुण्याच्या पुण्येश्वराच्या मुर्ती आहेत, असे कुठेशिक वाचले होते. ह्याबद्दल काही माहिती देऊ शकाल काय?
5 Sep 2016 - 10:45 pm | प्रचेतस
:)
केदारेश्वर मंदिरात मी तरी कुठल्याच मूर्ती पाहिल्या नाहीत, तिथे होत्या का नाही ह्याबद्दलही काही कल्पना नाही. पुण्येश्वर मंदिराचे काही अवशेष मात्र भारत इतिहास संशोधक मंडळात आहेत.ते बघता येतात.
6 Sep 2016 - 7:41 am | बॅटमॅन
केदारेश्वर मंदिरात मूर्ती नाहीत. परंतु मुसलमानी आक्रमणात केदारेश्वराचे लिंग पुरंदर किल्ल्यावर शिफ्ट केले गेले असे ऐकलेले आहे. डीटेल्स माहिती नाहीत.
6 Sep 2016 - 12:42 pm | अनिरुद्ध.वैद्य
मुर्ती चुकुन म्हण्टले. शिवलिंगच म्हणायचे होते.
5 Sep 2016 - 10:42 pm | अमितदादा
छान माहिती. लेखातून आपला व्यासंग दिसून येतो. काही गोष्टी डोक्यात जायला आपले जुने लेख वाचून काढायला हवेत.
5 Sep 2016 - 10:44 pm | कंजूस
भारी आहे.शाखामृग ?दोन माकडे/वानरे बसली आहेत ते?९७ ला गेलो होतो.नक्की कुठे जायचे ते सांगता आले नाही आणि स्वारगेटवरून सासवडला गल्यावर लोकांनी पूरच्या दत्तमंदिरात जाण्यासाठी टेंपोत बसवून दिले.त्याच्यामागचे देऊळ म्हणजेच चांगावटेश्वर असावे.तिकडे कोणी फिरकत नव्हते आणि दत्तमंदिर नावाच्या छपरातल्या छोट्या देवळात तुडुंब गर्दी होती. शंकराला कोणी वाली नाही हेच खरं.पुन्हा यस्टीने परत येण्याच्या घाईत उरकावे लागले भटकणे.
5 Sep 2016 - 10:55 pm | प्रचेतस
माकडांना शाखामृग ही संज्ञा आहे. फ़ांद्यांवर विहरतात म्हणून शाखामृग. रामायणात वानरांचे उल्लेख कित्येकदा शाखामृग म्हणूनच आलेत :)
पूरच्या दत्तमंदिरामागे असलेले देऊळ नारायणेश्वराचे. तिथे फारसे कुणी जात नाही. चांगा वटेश्वराचे देऊळ आहे ते सासवडजवळ.
केतकावळ्याचं बालाजी मंदिर, आणि हे दत्त मंदिर ह्यामुळे पूरला जाण्यास सासवडवरुन एसटी, जीप, रिक्षा ह्यांची विपुल सोय आहे.
5 Sep 2016 - 10:46 pm | कंजूस
लाइन ड्रॅाइंग रोडम्याप हवाच किमीसह.शिवाय कोणत्या बसेस जातात तेही हवे.
5 Sep 2016 - 10:50 pm | तुषार काळभोर
आहे.
सासवड पासून साधारण 3 किमी
तिथेही एक अशा शैलीतील शिव मंदिर आहे. संगमेश्वर/वटेश्वराइतकी कलाकुसर नाहीये. पण मंदिर नक्कीच जुने आहे.
6 Sep 2016 - 5:45 am | कंजूस
पुरंदरला जाण्यासाठी जवळचे ठिकाण ( स्वारगेटहून यस्टीने जाता येईल असे)कोणते?
6 Sep 2016 - 7:45 am | बॅटमॅन
सासवडच. तिथून पुरंदरापर्यंत वडाप आपलं ते हे शेअर रिक्षा वगैरे जातेत.
6 Sep 2016 - 7:51 am | अभिजीत अवलिया
सासवड ते भोर बस पण असते. तिने देखील जाऊ शकता. पण फार कमी असतील बस. वडाप बेस्ट.
6 Sep 2016 - 8:06 am | कैलासवासी सोन्याबापु
त्या सतीशिलांवर शेंदूर फासून केलेला वानरविचका पाहून अंगाचा तिळपापड झाला राव! असो!
"शरभ" ह्या संकल्पनेबद्दल काही सांगता येईल का वल्लीजी डिटेल?
6 Sep 2016 - 8:41 am | प्रचेतस
शरभ म्हणजे सिंहासारखा काल्पनिक पशू.
हिरण्यकश्यपूच्या वधानंतर कोपलेल्या नरसिंहाला शंकराने शरभाचे रूप घेऊन (शरभाने सिंहाचा पराभव करुन) शांत केले अशी काहिशी दंतकथा शैवांमध्ये प्रचलित आहे.
शरभ हे बहुत करुन किल्ले किंवा मंदिरांच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना आढळतात.
व्याल हा असाच एक प्राणी. व्यालाचे पुढचे दोन पाय मात्र उंचावलेले असतात.
6 Sep 2016 - 10:02 am | कैलासवासी सोन्याबापु
शरभ कसा असतो ते जरा डिटेल वर्णन करू शकाल का? माझ्या अर्धवट ऐकीव माहितीनुसार शरभ म्हणजे बकऱ्याची शिंगे सिंहाचे धड वगैरे असतो, शरभ अन ग्रीक पुराणातला कायमेरा ह्यात साम्यस्थळे असावीत बहुदा, फक्त हेलेनिस्टिक परंपरेत कायमेरा दुष्ट असतो अन शरभ दैवी अवतार
6 Sep 2016 - 10:24 am | प्रचेतस
शरभाचे मुख कधीच बकर्यासारखे नसते. तो सिंहच किंवा वाघासारखा.
बकर्याचे मुख आणि सिंहाचे शरीर असे देखील काही प्राणी आहेत त्यांना मेषव्याल असे म्हणतात. मेषव्याल हे खिद्रापूर आणि किकलीच्या मंदिरांत मी पाहिलेले आहेत. बकर्याचे मुख आणि मनुष्याचे शरीर असलेली मूर्ती दक्षाची म्हणून ओळखली जाते तर बकर्याचे मुख आणि एकच पाय असलेले एक शिवाचे एक रूप आहे त्याला अजएकपादशिव असे म्हणतात. पाटेश्वरला हा अजएकपादशिव मी पाहिलाय.
बाकी शरभांना काही वेळा पंख देखील असतात. शरभांचे मूळ दाक्षिणात्य आहे. बहुधा चालुक्यांकडून शरभ इकडे आले.

लोणी भापकरचा पंख असलेला शरभ
खिद्रापूर येथील शरभ
शेरी लिंब येथील १२ मोटेच्या विहिरीवरील शरभ

रायगडाच्या महादरवाजावरील शरभ प्रतिमा
6 Sep 2016 - 9:15 pm | शलभ
छान लेख..
व्यालाचे फोटो असतील तर डकवा..
6 Sep 2016 - 8:54 am | अजया
नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण लेख.सतीशिळेची माहिती,शाखामृग नव्यानेच कळले.तुमचे लेख वाचल्याने कुठेही वीरगळ, सतीशिळा दिसली की लक्ष जातेच!
6 Sep 2016 - 9:17 pm | शलभ
+१११११११११
आणि ती आधी कधी दिसलेलीच नसते..:)
6 Sep 2016 - 11:23 am | गणामास्तर
भारी फोटो.
मला सोडून गेल्यामुळे एवढीचं प्रतिक्रिया.
6 Sep 2016 - 12:39 pm | शान्तिप्रिय
मस्त फोटो.
वल्लीजी आपणाबरोबर एखाद्या वारसास्थळाला भेट देणे आवडेल.
पाहुया केव्हा जमते ते!
बाकी तुमचा हाहि प्रबंध उत्तम!
तहहयात डोक्ट्रेट आमच्या कडुन :)
मस्त!
7 Sep 2016 - 11:37 am | महासंग्राम
कचकून हनुमोदन वल्लींसोबत एक कट्टा पेंडिंग आहे. पुण्याच्याबाहेर जाऊदे गेलाबाजार पुण्यातलेच मंदिरे पाहत एक कट्टा करावा का ???
6 Sep 2016 - 1:15 pm | सस्नेह
प्र.के. अत्र्यांच्या आत्मचरित्रात सासवडचे वाचलेलं वर्णन आठवले. (कऱ्हेचे पाणी ).
शिल्पांची दुरवस्था पाहून वाईट वाटले..नेहमीच वाटते.
6 Sep 2016 - 2:21 pm | मुक्त विहारि
आता अंबरनाथला कधी येणार?
6 Sep 2016 - 5:39 pm | अत्रुप्त आत्मा
लेख छानच..
प. ..ण,
एकटाच कधी गेलेलास रे... दू दू आगोबा.
6 Sep 2016 - 6:05 pm | सूड
ती असल्या बटबटीत रंगात रंगवलेली देवळं कशीतरी दिसतात.
7 Sep 2016 - 10:45 am | अनिरुद्ध.वैद्य
दगडी मंदीरांवर निळा भगवा असेच रंग देतात. पुर्ण बट्याबोळ.
7 Sep 2016 - 3:55 pm | विशुमित
1) मुर्त्यांची तोंडात पेढा का बर कोंबत असतील लोक?
2) "चोरांपासून सावध राहा" चक्क खांबावर लिहलंय चोरांनी.
7 Sep 2016 - 3:55 pm | विशुमित
1) मुर्त्यांची तोंडात पेढा का बर कोंबत असतील लोक?
2) "चोरांपासून सावध राहा" चक्क खांबावर लिहलंय चोरांनी.
6 Sep 2016 - 6:42 pm | सुहास बांदल
खूप च सुंदर माहिती. पुढच्या भारत वारीत नक्की सासवड चा प्लॅन करणार.
6 Sep 2016 - 8:37 pm | नीलमोहर
अशा अभ्यासपूर्ण माहितीमुळे लोकांना मंदिरे वाचण्याची आवड आणि सवय लागेल,
7 Sep 2016 - 2:45 am | गामा पैलवान
प्रचेतस,
रंजक आणि रोचक माहितीबद्दल आभार! :-)
इथल्या शिल्पात आहे ते रानडुक्कर की गेंडा याचा निर्णय माझ्या मते गेंड्याकडे झुकतो. पायाच्या सांध्यांभोवती चरबीचे थर दिसतात. यावरून तो गेंडा असावा. शिंग भंगलेलं आहेसं वाटतं. तसेच त्यास रानडुकरासारखे सुळे नाहीत.
आजून एक गोष्ट सांगायची म्हणजे या एका शिल्पातल्या मल्लांनी शिरेटोप परिधान केला आहे. यावरून हे मल्लयुद्ध कमालीचं हिंसक असावंसं दिसतं. मात्र मल्लांच्या चेहऱ्यावरचे भाव तितके हिंसक वाटंत नाहीत.
आ.न.,
-गा.पै.
7 Sep 2016 - 10:10 am | अभ्या..
गेंडाच आहे तो पण चरबीचे थरापेक्षा ते पायाच्या स्नायूंचे अलंकरण आहे. वर अनेक शरभ आणि सिंहांना तसे आहे. गेंडा आहे हे ओळखायची खूण त्याची जिवणी. वराहाची जिवणी अशी दाखवली नसती. ती शंकूकार होते. ही दाखवलेली आडवी जिवणी वराहाचीच. शिंग बहुधा कुणा राजाच्या राज्याभिषेकला दान केले असावे गेंड्याने. ;)
8 Sep 2016 - 11:40 am | गामा पैलवान
अभ्या..,
ते अलंकारण असेल तर पाठीवरच्या झुलीसारखे अथवा गळ्यातल्या माळेसारखे दिसायला हवे. उलट ते पायातून उगम पावून अधांतरी लटकलेले वाटतेय. बहुधा चरबीच्या घड्या असाव्यात. अर्थात याबाबत चूभूदेघे.
आ.न.,
-गा.पै.
8 Sep 2016 - 11:56 am | अभ्या..
नाही पैलवान. अलंकरण म्हनजे अलंकार नाहीत. स्नायुचे आकार आणि कर्व्हज रिअॅलिस्टिक पध्दतीने न दाखवता अलंकारिक म्हणजे नक्षीदार कर्व्हजने दाखवायची पध्दत. वरच्या सिंहाच्या मांड्याचे, पोटाचे स्नायु आणि आकार बघा. मी काय म्हण्तोय ते लक्षात येईल. तसे दाखवलेय ते.
8 Sep 2016 - 12:02 pm | गामा पैलवान
अभ्या.., अलंकरणाचा हा अर्थ माहित नव्हता. धन्यवाद! :-)
आ.न.,
-गा.पै.
9 Sep 2016 - 4:29 pm | जिप्सी
सासवडची मंदिरे (पूर नाही) ही यादवकालीन हि मंदिरे असावीत असा का अंदाज आहे तुमचा ? म्हणजे कुठल्या घटकावरून तुम्हाला असं वाटलं ?
9 Sep 2016 - 4:38 pm | प्रचेतस
स्तंभांवरुन. वटेश्वर बहुधा अलीकडचं असावं कदाचि शिवकाळ किंवा नंतरही. मात्र संगमेश्वरचे स्तंभ, आणि तिथला फोडलेला नंदी हे यादवकालीन वाटतात.
9 Sep 2016 - 5:22 pm | बाळ सप्रे
अशा बांधकामावरचं शेवाळ घासून काढलं तरी पुरे आहे कशाला उगाच गावठी रंगरंगोटी करून वाट लावतात कोणजाणे.. तसंच सिमेंट थापणे, लोखंडी गज लावणे , लाईटसाठी लोंबत्या वायरी वगैरे डागडुजी करण्यापेक्षा पडके अवशेष जास्त चांगले दिसतील..
अशा वास्तूंच्या देखभालीसाठी तशी नजर असणारे आर्किटेक्ट / कारागीर हवेत..
9 Sep 2016 - 5:33 pm | जिप्सी
यादवकाळ म्हणताना आपण मधली ३-४ शे वर्षं बहुतेक सोडूनच देतो आणि एकदम शिवाजीपर्यंत येऊन पोचतो.भुमीज शैली जरी वापरलेली असली तरी ही यादवांची खास नाही.यादवकाळ संपून गेल्यावरही मधल्या काळात हि शैली काही काळ जिवंत होती आणि मंदिरे बांधली गेली याचा पुरावा म्हणून ही मंदिरे दाखवता येतील.सभामंडप आणि जंघा यांवर फारसे अलंकरण नाही.यादवकालीन मंदिरे आणि हि मंदिरे यांतला खूर व घट
यांतला फरक सुद्धा तुम्हाला जाणवेल.शिवाजीकालीन मंदिरात एकदम शैलीत बदल झालेला जाणवतो.भूमीजशैली परत एकदम उत्तर पेशवाई काळात अहिल्याबाई होळकर यांच्या मंदिरात परत दिसायला लागते.
9 Sep 2016 - 5:48 pm | प्रचेतस
ते बाकी खरं.
खरं तर ह्या मधल्या इस्लामिक अंमलात फारशी मंदिरे बांधली गेलीत नाहीत हे ही एक कारण असावे.
आता परत छायाचित्रे बारकाईने पाहिली असता फरक जाणवतोय.
मला वाटतं पाटेश्वर हे ही ह्या मधल्या काळात बांधल्या गेलेल्या मंदिरांचं उदाहरण.
9 Sep 2016 - 5:33 pm | जिप्सी
यादवकाळ म्हणताना आपण मधली ३-४ शे वर्षं बहुतेक सोडूनच देतो आणि एकदम शिवाजीपर्यंत येऊन पोचतो.भुमीज शैली जरी वापरलेली असली तरी ही यादवांची खास नाही.यादवकाळ संपून गेल्यावरही मधल्या काळात हि शैली काही काळ जिवंत होती आणि मंदिरे बांधली गेली याचा पुरावा म्हणून ही मंदिरे दाखवता येतील.सभामंडप आणि जंघा यांवर फारसे अलंकरण नाही.यादवकालीन मंदिरे आणि हि मंदिरे यांतला खूर व घट
यांतला फरक सुद्धा तुम्हाला जाणवेल.शिवाजीकालीन मंदिरात एकदम शैलीत बदल झालेला जाणवतो.भूमीजशैली परत एकदम उत्तर पेशवाई काळात अहिल्याबाई होळकर यांच्या मंदिरात परत दिसायला लागते.
12 Sep 2016 - 9:03 pm | काळुराम
धन्यवाद ... माझ्या गावाच्या बाबत लिहिल्या बद्दल. छान वाटलं. परत या. भेटूया मग.
30 Sep 2016 - 2:11 am | रुपी
मस्त!
पुढच्या वर्षीच्या श्रीगणेश लेखमालेत एक लेख नक्की येऊ द्या, ही मंदिरे पाहण्याची आणि समजून घेण्याची आवड कशी निर्माण झाली त्याबद्दल :)
30 Sep 2016 - 5:41 am | खटपट्या
नेहमीप्रमाणे लेख आणि माहीती