नमस्कार..._/\_
मिपावर लेख लिहिण्याचा हा पहिलाच प्रयत्न. तरी लेखात काही चूक/त्रुटी आढळल्यास क्षमा असावी. गेले कित्येक महिन्यांपासून हा लेख लिहिण्याचा प्रयत्न करीत होतो…1-2 वेळा सुरुवातदेखील केली होती...पण या ना त्या कारणाने राहून गेले...आता अखेर हा लेख पूर्ण केला :)
नोकरीला लागून तीनेक वर्ष झाली होती, आणि या मधल्या काळात छोटे-मोठे ट्रेक, कोकण आणि गोवा सोडून कोणतीही भटकंती झाली नव्हती. तेव्हा मित्र-मंडळीनी भटकंतीसाठी थोडे दूरचे आणि अलिप्त असे ठिकाण शोधण्यास सुरुवात केली. बरीच शोधाशोध केल्यानंतर शेवटी सर्वानुमते ठिकाण नक्की झालंच 'लाहौल आणि स्पिती'. आणि कधी तर ऑगस्ट महिन्याचा तिसरा आठवडा. आंतरजालावरून चौकशी करता-करता 'आशु' नामक व्यक्तिशी संपर्क झाला. त्यानेच आम्हाला सगळे नियोजन देखील करून पाठविले. चंडीगढला घ्यायला तो येणार होता. मुंबई ते चंडीगढ जायचं आणि यायचं विमानाची तिकीट पण आरक्षित झाली होती. निघण्याच्या 4-5 दिवस आधी तापाने फणफणलो आणि भरीसभर म्हणून सर्दी आणि खोकला होताच. आजारी आहेस तर नको जाऊस, तिथे खूप थंडी असेल...इति घरचे. पण काही झाले तरी जायचे होतेच कारण अशा ठिकाणी सारखे जाणे होत नसते. जायचा दिवस उजाडेपर्यंत 2-3 मेम्बर्स गळाले आणि आम्ही 9 जण निघालो.
आमच्या चमूतील काही जणांचा (माझाही) पहिलाच विमानप्रवास असल्याने आधीच उत्साहित होतो. प्रवास सुरु झाला आणि थोड्याच वेळात डोके दुखायला सुरुवात झाली...आधीच सर्दी-खोकला त्यात हे अजून...पाऊण तासात चंडीगढ ला पोचलो...विमानातून उतरल्यावर कुठे जरा बरे वाटले. ठरल्याप्रमाणे आशुभाई टेम्पो ट्रॅव्हलर सहित आम्हाला घ्यायला तिथे हजार होता. बरं वाटत नसल्याने मी मागच्या सीटवर जाऊन आडवा पडलो. आणि आम्ही मनाली कडे प्रस्थान केलं. प्रवासात मध्येच एका धाब्यावर गाडी थांबवली, तिथे मस्त पराठ्यांचा आस्वाद घेतला आणि प्रवास पुन्हा सुरु केला. जस-जस कुल्लू जवळ आलं वातावरण अधिक आल्हाददायक झालं. आजुबाजूला उंचच उंच देवदार वृक्ष आणि नागमोडी रस्ते. 6-7 तासांच्या प्रवासानंतर मनालीला पोहोचलो.
मनाली...आमच्या गेस्ट हाउसवरून दिसणारे सुंदर दृश्य
त्या रात्री मनालीला मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही कीलॉंगसाठी निघालो. कीलॉंग (Keylong) - आमचे पहिले डेस्टिनेशन. थोड्याच वेळात पहिला टप्पा गाठला…रोहतांग पास. रोहतांग पास म्हणजे कुल्लू खोरे आणि लाहौल-स्पिती खोरे यांना जोडणारी खिंड.
रोहतांग पास
रोहतांग पास पार करून वर पोहोचलो आणि अहाहा...काय सुंदर नजारा. तोच टिपण्यासाठी गाडीतून खाली उतरलो तर हि गारठून टाकणारी थंडी.
रोहतांग पासवरून दिसणारे विहंगम दृश्य
थोडा क्लिक-क्लिकाट करून रोहतांग पास वरून निघालो. रोहतांग पास नंतर निसर्गाचे दुसरे रूप दिसते...आधी आजूबाजूला सगळीकडे हिरवंगार दिसत होतं तर आता रुखरुखीत. हवेत प्राणवायूची कमतरता असल्याने येथे हिरवळ कमी असते. मनाली-लेह राष्ट्रीय महामार्ग क्र. 21 वर ठिकठिकाणी दरडी कोसळून वा ओढ्याना आलेल्या पुरामुळे वाहतूक बंद पडते, पण BRO चे कामगार मात्र दिवस-रात्र मेहनत करून रस्ते पुन्हा वाहतुकीस मोकळे करून देतात.
रस्त्याचे सुरु असलेले काम
मनाली-लेह रस्त्यावर इंडियन आर्मीचे निशाण
आम्ही कीलॉंगला पोहोचेपर्यंत रस्त्यात 4-5 ठिकाणी काम सुरूच होते. रस्त्यात जाताना एका बोगद्याचे बांधकाम चालू असलेले दिसले. त्याबाबत विचारले असता कळाले कि या बोगद्यामुळे मनाली ते लेह मधील अंतर जवळपास 60 किमी ने कमी होणार आहे. 8.8 किमी लांब असलेला हा बोगदा भारतातील सर्वात लांब बोगद्यांपैकी एक आहे.
रोहतांग बोगदा
बर्फवृष्टीमुळे रोहतांग पास वर्षातील केवळ 4-5 महिने सुरु असतो त्यामुळे बाकीच्या काळात लेह आणि आजूबाजूच्या प्रदेशातील संपर्क तुटतो. परंतु या बोगद्यामुळे हा रस्ता आता पूर्ण वर्षभर वाहतुकीस खुला असेल. कीलॉंगला पोहोचेपर्यंत संध्याकाळ झाली.
संध्याकाळी कीलॉंग मध्ये थोडा फेरफटका मारला. जवळपास 11000 फूट उंचीवर असल्याने रस्त्याचा थोडासा चढ देखील दमवत होता. कीलॉंग हे शहर लाहौल आणि स्पिती या जिल्ह्याचे कार्यालयीन मुख्यालय आहे. जेवण करून रात्री मस्त ताणून दिली. सकाळी लवकर उठून आजु-बाजूची काही ठिकाणांना भेट देण्याचा बेत होता. त्यात मुख्य म्हणजे चंद्र-भागा नद्यांचा संगम आणि कारदांग मठ (Monastary).
सकाळी उठण्यास थोडा उशीर झालाच...हे वेगळे सांगायला नकोच..पटापट आवरून पुढील सफरीसाठी सज्ज झालो. तंडी येथे चंद्रा आणि भागा या नद्यांचा संगम होतो. इथून पुढे हि नदी चंद्रभागा आणि त्यानंतर चिनाब म्हणून ओळखली जाते.
डावीकडून येणारी चंद्रा आणि उजवीकडून येणारी भागा नदी
तंडी येथील पेट्रोल पंपावरून पेट्रोल भरून घेतले. मनाली-लेह हायवेवरील हा शेवटचा पेट्रोल पंप आहे. यानंतर थेट 365 किमी वर पुढचा पेट्रोल पंप आहे...तो लेह मध्ये प्रवेश करताना...'कारू' येथे. चंद्र-भागा संगमानंतर आम्ही आमचा मोर्चा वळवला तो कारदांग मठाकडे. कीलॉंगपासून 8-10 किमी. वर असलेला हा मठ जवळपास 14-15000 फूट उंचीवर आहे. वरपर्यंत गाडी जाते पण आमच्या आशु भाईने गाडी थोडी खालीच थांबवली...आणि म्हणाला कि 'उपर तक चलके जाईये, मजा आयेगा'. आम्हाला ट्रेक ची सवय असल्याने वाटलं कि आरामात चढून जाऊ 10-15 मिनिटांत...पण तो थोडासा चढ चढताना पण आमची चांगलीच दमछाक झाली. विरळ हवेमुळे श्वास घेण्यास थोडा त्रास जाणवत होता. शेवटी 30-40 मिनिटांत वरती पोहोचलो. वरतून दूरवर डोंगराच्या कुशीत वसलेले सुंदर कीलॉंग शहर दिसत होते.
डोंगराच्या कुशीत वसलेले सुंदर कीलॉंग शहर
मठात जाण्याआधीच बाहेर बघितलं तर भारत गॅस ची गाडी आली होती. गाडीतल्या माणसांनी 2-3 सिलेंडर काढून ठेवले. आणि 2-3 बौद्ध स्त्रिया ते सिलेंडर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होत्या...आश्चर्य म्हणजे कोणी पुरुषहि नव्हता मदत करायला...गाडीवाले माणसं पण सिलेंडर देऊन तसेच निघून गेले होते...मग आम्ही मित्रांनी ते सिलेंडर त्यांच्या घरापर्यंत नेण्यास मदत केली. नंतर मठात गेलो…
कारदांग मठ
याला काय म्हणतात माहित नाही...पण इथल्या लोकांची अशी श्रद्धा आहे कि हे एकदा फिरवल्याने 1000 वेळा मंत्र म्हटल्याचे पुण्य लाभते
ध्यानस्थ बसलेला बुद्ध...
देव-देवतांची चित्रे आणि माहिती असलेल्या पताका...
कारदांग मठ हा 12 व्या शतकात बांधण्यात आला होता आणि 1912 मध्ये लामा नोरबू रिंपोचे यांनी त्याच नूतनीकरण केला (आंतरजालावरून साभार). आम्ही तिथून निघणार तेव्हढ्यात आम्ही आधी ज्या स्त्रियांना सिलेंडर नेण्यास मदत केली होती त्या आमच्या साठी सरबत घेऊन आल्या होत्या. मस्त सरबत पिऊन त्यांचे आभार मानले आणि तिथून निघालो.
संध्याकाळी कीलॉंगच्या बाजारपेठेत थोडा फेरफटका मारला...रात्री मस्त पोटभर जेऊन उद्या काय काय बघणार आहोत त्यावर चर्चा करत...मस्तपैकी पत्त्यांचा डाव मांडला.
क्रमशः
प्रतिक्रिया
1 Sep 2016 - 2:32 pm | शान्तिप्रिय
मस्त लेखन आणि फोटो पाटीलभाऊ.
पुभाप्र!
1 Sep 2016 - 2:34 pm | पद्मावति
खूप सुंदर वर्णन आणि फोटो.
पु.भा.प्र.
1 Sep 2016 - 2:40 pm | प्रभाकर पेठकर
एव्हढ्या उंचावर (१५००० फूट) सुद्धा वस्ती आहे. तिथले लोकं एव्हढ्या कमी प्राणवायूत कसे (आणि का?) राहतात? त्या हवेची/वातावरणाची सवय झाली म्हणावे तर त्यांना अशा विशिष्ट (प्राणवायूची कमी) परिस्थितीत विशिष्ट आरोग्य समस्या असतात का? तिथे वैद्यकिय सेवा त्वरीत मिळते का?
1 Sep 2016 - 2:53 pm | पाटीलभाऊ
हो तर...वस्ती आहेच. कसे राहतात म्हणाल तर सवय अजून काय. वर्षानुवर्षे तिथेच राहत असल्याने तेथील वातावरणाशी जुळवून घेतलेले असते. आणि 'का राहतात' हा तर ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण एक मात्र खरे शहरी सोयी-सुविधांपासून अलिप्त असले तरी इथले लोक सुखी आणि समाधानी असतात.
विशिष्ट आरोग्य समस्यांबद्दल माहित नाही..पण वैद्यकीय सेवा म्हणाव्या तेवढ्या प्रमाणात उपलब्ध नाहीत...!
1 Sep 2016 - 4:07 pm | डॉ सुहास म्हात्रे
तेथे राहणारे लोक तेथेच जन्माला आलेले व वाढलेले असतात. त्यामुळे त्यांना त्या हवामानाची आणि वातावरणाची सवय (अक्लायमेटायझेशन) असते. हिमालयीन शिखरे चढून जाणारे बेस व त्यापुढच्या कँपांत शरिराला हीच सवय (अक्लायमेटायझेशन) व्हावी म्हणून सराव करत ठराविक वेळ (प्रत्येकी १ ते ३ दिवस) व्यतीत करतात. काही शेरपा तर इतके तरबेज (अक्लायमेटाईझ्ड) असतात की ते ऊंच शिखरे प्राणवायूविनाही चढून जाऊ शकतात.
1 Sep 2016 - 2:59 pm | किल्लेदार
छान. हा भाग बघायचा राहूनच गेला. आता फोटोमध्ये बघतो.
1 Sep 2016 - 4:01 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर फोटो आणि वर्णन !
हिमालयाचा भाग हिरवाईने झाकलेला असो वा बर्फाने किंवा नुसता रखरखीत थंड वाळवंटाच्या रुपात असो... प्रत्येक भूभाग दर ऋतुत मोहक सौंदर्याने लपेटलेला असतो. एखादा भाग एखाद्या ऋतूत आकर्षक नसतो असे म्हणायला अजिबात जागा नाही !
: हिमालयाचे वेड असलेला वेडा.
1 Sep 2016 - 7:17 pm | पाटीलभाऊ
+११११
1 Sep 2016 - 6:02 pm | मुक्त विहारि
काही प्रश्र्न....
१. किती साली प्रवास केला?
२. एकूण किती खर्च आला?
1 Sep 2016 - 6:24 pm | पाटीलभाऊ
ऑगस्ट 2013
अंदाजे 22000 रु. (विमानप्रवासासहित)
1 Sep 2016 - 6:56 pm | एस
सुंदर वर्णन आणि फोटो.
1 Sep 2016 - 7:02 pm | रेवती
मस्त फोटू. वाचतिये.
1 Sep 2016 - 8:38 pm | सही रे सई
फोटो आणि वर्णन दोन्ही सुंदर.
कारदांग मठाचा फोटो त्याच्या रंगसंगतीमुळे विशेष आवडला.
मस्त लिहित आहात. आजून कुठे कुठे ट्रेकिंग ला गेला होतात त्याचीपण वर्णन फोटो येऊदेत.
काही फोटो दिसत नाही आहेत. ते का बरे?
2 Sep 2016 - 12:37 pm | पाटीलभाऊ
आता कुठे लिहायला सुरुवात केली आहे..लिहितो हळू-हळू...!
फोटो तर व्यवस्थित दिसत आहेत..!
1 Sep 2016 - 9:30 pm | यशोधरा
मस्त धागा! आवडला!
2 Sep 2016 - 12:35 pm | पाटीलभाऊ
धन्यवाद..!
2 Sep 2016 - 5:16 pm | मोदक
झक्कास धागा... भारी फोटो...
2 Sep 2016 - 5:37 pm | शरभ
काय अप्रतिम छायाचित्रे आहेत राव..
-शरभ
2 Sep 2016 - 11:13 pm | रातराणी
सुरेख फोटो !
3 Sep 2016 - 1:10 am | ट्रेड मार्क
मस्त प्रवासवर्णन. अश्या ठिकाणी जायला मिळणं म्हणजे भाग्यच.
बादवे: ते लाहौलविलाकुवत (म्हणजे नक्की काय?) आणि याचा काही संबंध नसावा अशी आशा करतो.
5 Sep 2016 - 1:09 am | पाटीलभाऊ
'लाहौलविलाकुवत' हे प्रथमच ऐकतोय !
5 Sep 2016 - 2:32 pm | आवडाबाई
लाहौलविलाकुवत ह्याचा मला माहित असलेला (आउट ऑफ क्युरिऑसिटी माहिती काढलेला) अर्थ
पूर्ण वाक्य = ला हौल वि ला कुव्वता इल्ला बि अल्लाह
ला = नाही
हौल = बदल
व = आणि (!!!)
ला = नाही
कुव्वत = शक्ती
इल्ला = शिवाय
बि = सोबत
अल्लाह = देव
देव सोबत असल्याशिवाय बदल किंवा शक्ति मिळत नाही.
"त्या"च्या मर्जीशिवाय झाडाचे पान देखिल हलत नाही ह्या टाईप चे वाक्य
3 Sep 2016 - 10:07 am | पैसा
अतिशय सुरेख!
5 Sep 2016 - 1:10 am | पाटीलभाऊ
धन्यवाद
5 Sep 2016 - 7:08 am | इल्यूमिनाटस
फोटू आणि वर्णन दोन्ही झ्याक