श्रीगणेश लेखमाला - माझा मोडीचा प्रवास

kasturekaustubhs's picture
kasturekaustubhs in लेखमाला
6 Sep 2016 - 7:35 am

.inwrap
{
background-color: #F7F0ED;
}
.inwrap
{
border: solid transparent;
border-width: 30px;
-moz-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
-webkit-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
-o-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
}

1

मी तसा पेशाने इतिहासाशी संबंधित नाही. एका MBAचं इतिहासाशी काय घेणं देणं म्हणा... पण स्केचिंग, ट्रेकिंग, वाचन वगैरे माझ्या अनेक छंदांव्यतिरिक्त एक म्हणजे इतिहास! आणि इतिहासाचा, अन्‌ जिथे मराठी इतिहासाचा ‘अभ्यास’ करण्याची वेळ येते, तेव्हा ‘मोडी लिपी’शिवाय गत्यंतर नसतं. पण माझ्याकरता मोडी म्हणजे नाइलाजाने शिकण्याची गोष्ट बनून न राहता मनातून आवड निर्माण झालेला तो एक छंदच म्हणायला हरकत नाही.

मोडीचा आणि माझा प्रथम संबंध केव्हा आला? मला अगदी स्पष्ट आठवतंय.. माझ्या बाबांना ट्रेकिंगची आणि पर्यायाने इतिहासाची प्रचंड आवड. याच आवडीतून त्यांनी ‘श्रीमान योगी’, ‘छावा’, ‘स्वामी’, ‘राऊ’ यासारख्या ऐतिहासिक कादंबर्‍या आणून ठेवल्या होत्या. मी लहानपणी दिवाळीत किल्ले करण्याच्या निमित्ताने त्यात काही सापडतंय का बघण्यासाठी एके दिवशी त्यातली 'श्रीमान योगी’ घेतली, आणि पुढच्या तीन महिन्यांत ती वाचून काढली अन्‌ मग दिवसेंदिवस 'शिवाजी' या तीन अक्षरांनी त्या बालवयात मला अक्षरशः झपाटून टाकलं.

अशातच, १९९९च्या मे महिन्यात इयत्ता चौथीमध्ये प्रवेश घेतल्यावर हाती आलं ते मराठ्यांच्या इतिहासाचं पुस्तक, पण त्याहून जास्त मोठा प्रश्न उभा राहिला तो पुस्तकाचं मलपृष्ठ पाहून! काहीतरी अगम्य चित्राकृतींमध्ये एका वळकटीच्या कागदावर लिहिलेलं ते कसलंसं पत्र होतं. बालमनाने थोडा शोध घेतल्यावर कळलं की ते शिवाजी महाराजांचं पत्र आहे!! झालं.. आणखी शंका!! श्रीमान योगीत तर शिवाजी मराठी आहे, मग ही कोणती भाषा? म्हणजे शिवाजी महाराज 'आपले' नाहीत? ते कोणत्या न समजणार्‍या भाषेत बोलायचे? अखेरीस हे प्रश्न झेपेनासे झाले आणि तो विषय तिथेच संपला.
यानंतर साधारण सहा वर्षं उलटली, आणि आमच्या शाळेत ‘शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे’ यांची तीन दिवसांची शिवचरित्र व्याख्यानमाला झाली. आता हळूहळू समजायलाही लागलं होतं. ऋषीसारख्या दिसणार्‍या या आजोबांनी शाळेतल्या मुलांना सहज समजेल असं शिवचरित्र आणि त्याचा पाया सांगितला. हे सांगतानाच मध्येच कुठेतरी महाराजांच्या पत्रांचा वगैरे उल्लेख आला, अन्‌ त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे ‘शिवाजी महाराज मराठीच होते’ हे समजलं!! झालं.. मग ते मराठी होते तर मराठी पत्र चौथीच्या इतिहासात असं कसं छापलं? पुन्हा विचारांचं काहूर माजलं. शेवटी घरी आल्यावर न राहवून बाबासाहेबांचं 'राजा शिवछत्रपती' विकत आणलं. आणि आत पाहतो तो काय? चौथीच्या इतिहासात असलेलं ते पत्र जसंच्या तसं बाबासाहेबांच्या पुस्तकातसुद्धा!

आता काही स्वस्थ बसवेना. तेव्हा आजच्यासारखं घरी इंटरनेट नव्हतं. सायबर कॅफेत जाऊन नेट वापरायला मिळे. माझे तासन्‌तास कॅफेत जाऊ लागले. मोडी लिपीविषयी एकेक माहिती गोळा करण्याच्या नादात तहान-भूकसुद्धा विसरलो होतो. नेटवर काही जुजबी माहिती मिळाली. मोडी तज्ज्ञ राजेश खिलारींचा एक ब्लॉग होता मोडीवर, तो उपयोगी पडला आणि मोडीची बाराखडी मिळाली. मग काय.. पुन्हा बालवाडीत असल्यासारखं मोडी अक्षरं तक्त्यावरून वहीवर लिहायची आणि घोटून घोटून पाठ करायची, हा एकच उद्योग. तरीही काही समाधान होईना. बाबासाहेबांच्या वा चौथीच्या इतिहासातील ते पत्र अजून काही स्पष्ट वाचता येत नव्हतं. एके दिवशी चक्क भिंग घेतलं आणि छापलेल्या पत्रातले बारकावे बघितले, अन्‌ ताळमेळ साधत पत्रं वाचलं. अर्थात, त्या वेळी ते पत्र नुसतंच वाचलं होतं, निम्म्याहून जास्त शब्दांचा अर्थ समजला नव्हता.

2

मग हळूहळू सुरुवात झाली ती सवयीप्रमाणे वहीवर मोडीत लिहायची. मला आठवतंय, माझ्या दहावीच्या प्रत्येक वहीवर चुकीच्या का होईना, पण माझं नाव मोडीत लिहिलं होतं मी. पण इतकंच करायचं? आपण आपलं शिकतोय, पण चुका सांगणारा सापडत नाही, तोवर आपलं आपल्याला सगळंच बरोबर वाटतं. आणि याच जरा अधिक आत्मविश्वासात मी पत्र लिहिलं..
पत्र लिहिलं होतं थेट शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना! पुढच्या साधारण सहा महिन्यांत बाबासाहेबांना आणखी दोन पत्र पाठवली. वयोमानानुसार प्रत्यक्ष बाबासाहेबांचं उत्तर येणं अपेक्षित नव्ह्तंच. अखेर एके दिवशी पुरंदरेवाड्यावर गेलो असता आश्चर्याचा धक्काच बसला. बाबासाहेब म्हणाले, “मी तुम्ही लिहीलेली तिन्ही पत्रं वाचली.” पण याहून मोठा धक्का म्हणजे, बाबासाहेब त्यांच्या खास शैलीत मिश्कीलपणे म्हणाले, “पत्र सुरेख आहेत, पण जर्राSS लहानशा चुका आहेत काही.” बापरे! म्हणजे, एवढ्या आभाळाएवढ्या मोठ्या माणसाला आपण पत्र पाठवलं आणि ती चुका सापडतील इतक्या नीट त्यांनी वाचलीसुद्धा! नुकतंच पोहोचलेलं पत्र बाबासाहेबांनी हातात घेऊन त्यातले बारकावे सांगितले आणि त्या क्षणी मी त्या पत्रात किती ठिकाणी वेडेपणा केला होता हे मला जाणवलं. 'ली' लिहिताना 'ल' काढून नेहमीसारखी शिरोरेघेवरून वेलांटी दिली होती... 'कु', 'खु'साठी वेगळ्या आकृती असतात, हे काही माहीत नव्हतं, त्यांना सरळसोट उकार दिले होते. पण बाबासाहेबांनी मात्र चुका सांगताना त्या दुरुस्त कशा होतील हेसुद्धा समजावलं आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे आत्मविश्वास दिला. आणि म्हणूनच अभिमानाने सांगावंसं वाटतं की अप्रत्यक्षरित्या मोडीतले बारकावे शिकवणारे गुरू लाभले तेच खुद्द शिवशाहीर!

यानंतर मग मोडीचा जो सराव सुरू झाला तो काही आजतागायत सुटलेला नाही. मोडी म्हणजे कायम अमुक एकाच शैलीत असेल असं अजिबात नाही, हे नव्याने समजलं. मग निरनिराळी पत्रं वाचून, तत्पूर्वी शिवकालीन भाषेचा अभ्यास करून मोडी पत्रं वाचायला लागलो. काही पुस्तकांमधून छापलेली मोडी पत्रं हाताशी येत गेली आणि मग त्यांचं लिप्यंतर करण्याचा छंदच जडला.
दरम्यान मुंबईतले मोडी तज्ज्ञ श्री. राजेश खिलारी यांच्याशी ओळख झाली. त्यांच्याकडून काही आणखी कागद वगैरे मिळत गेले, काही गोष्टी नव्याने समजल्या. या मधल्या काळात मी सहज माझ्या हाताशी लागलेली काही आधीच प्रकाशित असलेली मोडी पत्रं लिप्यंतरासह फेसबुकवर पोस्ट करत गेलो आणि लोकांचाही मोडीच्या प्रती असलेला संभ्रम समजत गेला. अनेकांचे तर ती पत्रे पाहून मेसेज येत की “तुम्ही ज्या भाषेत फेसबुकवर काहीतरी टाकलंय तसंच आमच्याकडेही आहे, आम्हाला अर्थ सांगाल का?” मग अशातून घरबसल्या आणखी कागद वाढत गेले, वेगवेगळ्या वळणाची मोडी नजरेत येऊ लागली आणि वाचनसराव पक्का होत गेला.

आज या वळणावर उभं राहून पाहत असता हा प्रवास कधीकधी माझा मलाच समजत नाही. मी घरच्या घरीच मोडी कशी शिकलो? पण या प्रश्नाचं उत्तर वरचा सगळा प्रवास पाहिल्यावर मिळतं. आज शिवपूर्वकालीन, शिवकालीन, पेशवेकालीन आणि अगदी आंग्लकालीनसुद्धा मोडी वाचायला फारसा विचार करावा लागत नाही. मोडीने मला एक वेगळी ओळख दिली हे नक्की. आजवर अनेकदा वेगवेगळ्या खाजगी संस्थांमध्ये आणि कोल्हापूर विद्यापीठात मोडी लिपीवर प्रेझेंटेशन्सवजा व्याख्याने देण्याचा योग आला, त्यानिमित्त मला उमजलेले मोडीतील बारकावे लोकांपुढे मांडता आले. खरं तर मी कोणी मोठा तज्ज्ञ नाही, किंबहुना माझ्याहून शेकाडोपट पुढे असलेले मोडी तज्ज्ञ आज आहेत. पण सोशल मीडियावर लोकांशी असलेला संपर्क असेल कदाचित, या लिपीने मला ‘मोडी तज्ज्ञ’ अशीच ओळख मिळवून दिली. दि. १७ आणि १८ जुलै २०१६ रोजी आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर युवावाणी अंतर्गत माझी मोडी लिपीवर आधारित मुलाखतही प्रसारित झाली.
'आपणांसी जे ठावे। ते इतरांसी सांगावे; या उक्तीनुसार मोडीचा प्रसार करण्याच्या हेतूने काही लेख लिहिले, मोडी शिकण्यासाठी डिजिटाईज्ड पुस्तके हवी त्यांना दिली. आयटी हे माझं शिक्षण आणि करिअर असल्याने त्या शिक्षणाचा याकरिता काय उपयोग होऊ शकेल हासुद्धा विचार सुरू होताच. म्हणूनच संगणकावर मोडी लिहिता येण्यासाठी श्री. खिलारी यांच्या आकर्षक फॉन्ट्ससोबतच अस्सल पेशवेकालीन रूपडं ल्यालेला मोडी फॉन्ट 'मोडीकस्तुरे' बनवला. यापुढेही अनेक गोष्टी मनात आहेत. 'इतिहासमित्र' या माझ्या अ‍ॅँड्रॉईड अ‍ॅपमध्ये 'मोडी'साठी स्वतंत्र विभाग पुढच्या काही महिन्यांत देण्याचा प्रयत्न सुरू आहे. www.kaustubhkasture.in या ब्लॉगवरसुद्धा काही माहिती दिली आहे. महाराष्ट्रेतिहासाच्या दृष्टीने उपयुक्त अशी मोडी कागदपत्रे लिप्यंतराचे काम सुरू आहे. अजूनही जे जे नवे सापडेल ते करण्यासाठी मी हर प्रकारे प्रयत्नशील आहे. बहुत काय लिहिणे ?

3

- © कौस्तुभ कस्तुरे | www.kaustubhkasture.in

प्रतिक्रिया

पैसा's picture

6 Sep 2016 - 7:40 am | पैसा

जबरदस्त आहे! एखाद्या गोष्टीचा ध्यास माणासाकडून असे खूप काही करवून घेतो. तुमच्याकडून बर्‍याच लोकांना अशी प्रेरण मिळो आणि अनेक दप्तरांमधे धूळ खात पडलेल्या जास्तीत जास्त मराठी इतिहासाचे वाचन संशोधन होवो ही विघ्नहर्त्याकडे प्रार्थना!

लोनली प्लॅनेट's picture

7 Sep 2016 - 12:05 pm | लोनली प्लॅनेट

तुमच्या ध्यासाला सलाम

बोका-ए-आझम's picture

6 Sep 2016 - 7:44 am | बोका-ए-आझम

ध्यास हा शब्द फार स्वैरपणे वापरला जातो पण त्याचा खरा अर्थ फार क्वचित पाहायला मिळतो. मस्तच!

नाखु's picture

6 Sep 2016 - 8:59 am | नाखु

आपला व्यासंग ओळखून त्याचा कष्टाने,जिद्दीने पाठपुरावा करणे अगदी विरळा अस्ते आणि तेही चाकोरीबाहेरच्या विषयावर.

पुढील उपक्रमांसाठी आणि प्रकल्पांसाठी शुभेच्छा!! (अगदी प्राथमिक तोंडओळख माहीतीची लेखमाला लिहावी मिपावर)

गणपती बापा मोरया ! मोडी लिपी समजूया !!

जबरदस्त. फेसबुकवर वाचले होतेच, इथेही वाचून आनंद झाला. मस्त!

कैलासवासी सोन्याबापु's picture

6 Sep 2016 - 7:59 am | कैलासवासी सोन्याबापु

छान आहे लेख, तुम्ही खाल्लेल्या खस्ता जाणवल्या. शुभेच्छा

_/\_

अभिजीत अवलिया's picture

6 Sep 2016 - 8:00 am | अभिजीत अवलिया

तुमच्या छंदातून तुम्ही इतरांना पण ज्ञान देण्याचा प्रयत्न करत आहेत आणी मोडी भाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न करत आहात हे आवडले. पुढील उपक्रमास शुभेच्छा.

वा! असा ध्यास विरळाच.

आदूबाळ's picture

6 Sep 2016 - 8:16 am | आदूबाळ

एक नंबर लेख!

अभ्या..'s picture

6 Sep 2016 - 8:25 am | अभ्या..

जब्बरदस्त व्यासंग.

मोदक's picture

6 Sep 2016 - 8:36 am | मोदक

__/\__

दंडवत घ्या राजे

सुबोध खरे's picture

6 Sep 2016 - 9:00 am | सुबोध खरे

असेच म्हणतो --/\--

पिलीयन रायडर's picture

6 Sep 2016 - 7:31 pm | पिलीयन रायडर

अगदी अगदी!!!

प्रचेतस's picture

6 Sep 2016 - 8:49 am | प्रचेतस

अशी माणसं असली की अनाकलनीय असलेला इतिहास बोलका होणारच.
सुरेख लेख.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Sep 2016 - 1:01 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१००

सद्या वापरात नसलेल्या लिप्यांमध्ये लिहिलेला असल्याने खूपसा भारतिय इतिहास दप्तरबंद राहिला आहे. नवीन लिपी आणि/किंवा भाषा शिकायला लागेल असे समजल्यावर इतिहासाबद्दल कुतुहल असलेल्या बहुतेकांचा उत्साह संपून जातो. मग साहेब वाक्य प्रमाण होते यात आश्चर्य ते काय ?! :(

कस्तुरे साहेबांसारखा व्यासंग असलेली माणसेच खरा इतिहास आणि इतिहासासंबंधीचे प्रचलित समज यांच्यातील दरी खात्रीलायकरित्या भरून काढू शकतील. त्यांचे परिश्रम आणि योगदान स्तुत्य आहेत !

विशाखा पाटील's picture

6 Sep 2016 - 8:56 am | विशाखा पाटील

वा! मोडी शिकण्यासाठीची धडपड, आयटीचा उपयोग मोडीच्या जतनासाठी करण्याचा ध्यास हे भावलं.

अनुप ढेरे's picture

6 Sep 2016 - 10:16 am | अनुप ढेरे

मस्तं!

पैसा's picture

6 Sep 2016 - 10:22 am | पैसा

इतिहासमित्र हे तुमचे अ‍ॅप आहे का! मी डाऊनलोड केले होते. खूप छान आहे.

रातराणी's picture

6 Sep 2016 - 10:41 am | रातराणी

जबरदस्त!!! _/\_

वेल्लाभट's picture

6 Sep 2016 - 10:49 am | वेल्लाभट

कौस्तुभ तुझ्याबद्दल मला प्रचंड अभिमान वाटतो. पेशवाई, इतिहासाच्या पाउलखुणा यांच्या प्रकाशनाला येणं झालं नाही परंतु पुस्तकं प्री-ऑर्डर केल्यावरही मी (इतिहासात रस असलेल्या) प्रत्येकाला सांगत होतो, एक असा मुलगा आहे त्याने पेशवाईवर पुस्तक लिहिलंय.

ध्यास अनेकांना असतात, पण त्यांचा श्वासाशी संगम प्रत्येकात होत नाही. तुझ्यात तो झाला, आणि त्यामुळेच इतिहास, मोडी, शिवराय, पेशवे सगळ्यांना तू इतकं जवळून ओळखू शकलास. असंच जबर काम तू करत राहशील यात शंका नाही. खलास! प्रशंसा करावी तितकी कमीच आहे. मनापासून शुभेच्छा!

अप्पा जोगळेकर's picture

6 Sep 2016 - 11:08 am | अप्पा जोगळेकर

साष्टांग नमस्कार करतो साहेब. चिकाटी जबरदस्त आहे. या लेखमालेच्या निमित्ताने अनेक अनसंग हिरो समोर येतील असे वाटते.

सलाम तुमच्या ध्यासाला आणि चिकाटीला ! या आणि अशा गुणांमुळेच इतिहास जिवंत होतात...

वरुण मोहिते's picture

6 Sep 2016 - 11:49 am | वरुण मोहिते

तुमच्या पुढील वाटचालीकरता शुभेच्छा !!

मृत्युन्जय's picture

6 Sep 2016 - 12:20 pm | मृत्युन्जय

जबराट एकदम. शौक बडी चीज है :). तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

मुक्त विहारि's picture

6 Sep 2016 - 12:21 pm | मुक्त विहारि

व्यनि करत आहे...

खेडूत's picture

6 Sep 2016 - 12:39 pm | खेडूत

सुरेख लेख. हे वाचून आणखी नव्या मंडळींना मोडी शिकायला प्रोत्साहन मिळेल.
तुम्हाला खूप शुभेच्छा !!

स्वीट टॉकर's picture

6 Sep 2016 - 12:46 pm | स्वीट टॉकर

इतकी हटके आवड! ती नेटानी जोपासायची, त्याला आय टी च्या ज्ञानाची जोड द्यायची! वाह! क्या बात है! तुमचा अभिमान वाटतो आम्हा मिपाकरांना!

यशोधरा's picture

6 Sep 2016 - 1:05 pm | यशोधरा

जबराट!

माम्लेदारचा पन्खा's picture

6 Sep 2016 - 1:13 pm | माम्लेदारचा पन्खा

आमचा दंडवत स्वीकारा _/\_ !

नंदन's picture

6 Sep 2016 - 1:15 pm | नंदन

जबरदस्त!

मंजूताई's picture

6 Sep 2016 - 1:36 pm | मंजूताई

तुमच्या व्यासंगाला व जिद्दीला सलाम! माझे आजोबांशी मोडीतच पत्र लिहायचे त्यामुळे वाचता येते... लिहून कधी पाहीले नाही ... शुभेच्छा!

सुचिकांत's picture

6 Sep 2016 - 1:48 pm | सुचिकांत

कौस्तुभ तुमचा नेहमीच अभिमान वाटतो आम्हाला! पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.

ब़जरबट्टू's picture

6 Sep 2016 - 1:51 pm | ब़जरबट्टू

तुमच्या चिकाटीला सलाम..

अनन्न्या's picture

6 Sep 2016 - 4:49 pm | अनन्न्या

माझ्या बाबाना मोडी लिपी येत होती. अनेक लोक पूर्वीचे जमीनीचे कागद आणत असत. पण त्यांनी ह्या ज्ञानाचा उपयोग गावातील लोकांपुरताच मर्यादित ठेवला. आज तुमच्या या लेखामुळे बाबांची आठवण झाली.

स्वाती दिनेश's picture

6 Sep 2016 - 5:24 pm | स्वाती दिनेश

लेख आवडला.
आजीकडून मोडी मुळाक्षरे व बाराखडी शिकले होते त्याची आठवण झाली. माझे दोन्ही आजोबा (आई व वडिलांचे वडिल) एकमेकांना मोडीत पत्र लिहित असत त्याचीही आठवण झाली. आता अनेक वर्षात मोडीशी संबंध नाही. अर्थात तुमच्या छंदाचे ध्यासात रुपांतर होऊन त्याचा पाठपुरावा तुम्ही उत्तमरीतीने करत आहात.
स्वाती

माझ्या आजोबांनाही मोडी लिपी यायची. ते आम्हांला वरचेवर पत्रे लिहायचे - लिहायचे देवनागरीतूनच, पण त्यावर मोडीचा खूप प्रभाव होता.

नीलमोहर's picture

6 Sep 2016 - 8:29 pm | नीलमोहर

प्रभावी आणि प्रेरणादायी,

रुपी's picture

7 Sep 2016 - 1:05 am | रुपी

जबरदस्त!
विशेष म्हणजे शाळकरी वयात इतक्या चिकाटीने शिकत राहिलात आणि ती आवड पुढे नेऊन त्यात आणखी नवीन नवीन प्रयोग करत आहात!

लोथार मथायस's picture

7 Sep 2016 - 4:37 am | लोथार मथायस

राजे दंडवत स्वीकारा. जबरदस्त

खटपट्या's picture

7 Sep 2016 - 5:01 am | खटपट्या

जबरद्स्त सर.

जॅक डनियल्स's picture

7 Sep 2016 - 6:08 am | जॅक डनियल्स

फारच सुंदर कला आहे. गुगल नसताना आपण घेतलेला कलेचा ध्यास तर असामान्य आहे.
ब्लॉग पण खूप मस्त आहे.

आतिवास's picture

7 Sep 2016 - 8:16 am | आतिवास

प्रेरणादायी आहे तुमचा प्रवास.
खूप कौतुक वाटलं तुमचं.

मोडी शिकायची इच्छा असेल तर इथून सुरुवात करू शकता.
https://youtu.be/JYhMyUNqsFQ

कौस्तुभ, तुम्ही मिपावर मोडी शिकवायचा धागा काढा की. आम्ही शिकू.

हेमन्त वाघे's picture

7 Sep 2016 - 11:01 am | हेमन्त वाघे

जबरदस्त ! तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !!!

टिके's picture

7 Sep 2016 - 12:38 pm | टिके

अत्यंत कौतुकास्पद कार्य आहे आपले !! आपल्याला सलाम !!

स्मिता_१३'s picture

7 Sep 2016 - 4:19 pm | स्मिता_१३

एक नंबर लेख ! जबरदस्त ध्यास !!

सूड's picture

7 Sep 2016 - 8:17 pm | सूड

दंडवत!!

अमितदादा's picture

7 Sep 2016 - 11:46 pm | अमितदादा

छान काम करताय..करत राहा. आवडला लेख

पर्ण's picture

8 Sep 2016 - 2:45 pm | पर्ण

खूप छान!!!