.inwrap
{
background-color: #F7F0ED;
}
.inwrap
{
border: solid transparent;
border-width: 30px;
-moz-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
-webkit-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
-o-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
}
भटकण्याचे वेड.........
माझ्या वयाच्या ३८व्या वर्षी लेक दहावीची परीक्षा पास झाली आणि मी ठरवले - आता आपण स्वत:साठी वेळ द्यायचा. आपल्याला आवडेल ते करायचे. यापैकी एक म्हणजे माझी भटकायची हौस. याच दरम्यान ठाणे यूथ होस्टेलशी संपर्क आला आणि त्यांच्यासोबत एक ट्रेक केला. तो मला इतका आवडला की त्यानंतर मी मागे वळून पाहिलेच नाही. गेली २३ वर्षे मी ट्रेक करत आहे.
या २३ वर्षांत मी सह्याद्रीतले ३००पेक्षा जास्त ट्रेक केलेत. यात १५० किल्ले केलेत. याशिवाय कळकराय सुळका आरोहण, भोसला अॅड्व्हेंचर कोर्स, राजगड प्रदक्षिणा, लोणावळा भीमाशंकर, ४ वेळा उल्हास व्हॅली, पन्हाळा-विशाळगड ५ साहियान्काने अशा विविध साहसी मोहिमा केल्या. तसेच रॅपलिंग, स्टमक रॅपलिंग, रिव्हर क्रॉसिंग, रॉक क्लाइंबिंग असे विविध उपक्रम केले.
हिमालयात २२-२४ ट्रेक केलेत. यात पिंढारी काफानी ग्लेशिअर, बागिनी ग्लेशिअर, रूपकुंड, एव्हरेस्ट बेस कँप, हर कि धून, गोमुख तपोवन यासारखे हाय altitude ट्रेकही समाविष्ट आहेत. यूथ होस्टेलबरोबर भारतभर राष्ट्रीय ट्रेक केलेत. दोन वेळा सायकल एक्स्पीडिशन्स केली. एकदा हिमालयीन ट्रेकदरम्यान छावणी नेता - कँप लीडर म्हणून काम केले. माझ्यासमवेत लेकीलाही या क्षेत्राची आवड निर्माण झाली. तिनेही बरेच उपक्रम केलेत.
हे सर्व करीत असताना निसर्गाशी नाते निर्माण झाले. निखळ आनंद मिळाला. अनेक झाडे, वनस्पती, फुले, फूलपाखरे, पक्षी यांची ओळख झाली. त्यांची नावे समजली. झाडावरची करवंदे, चिंचा, बोरे, पेरू, सीताफळे तोडून खाताना खूप मजा आली. गडावर चुलीवर केलेला बिनदुधाचा चहा, फोडणीशिवाय खिचडीही चविष्ट लागते, तर कधी भजीबिजीसुद्धा केल्ये हो.. रात्रीच्या गप्पा, गाण्यांच्या भेंड्या, त्याला थाळीवर दिलेली तबल्याची साथ.... सारेच भन्नाट. आत्मविश्वास वाढला, आरोग्य प्राप्त झाले. निसर्गाचे स्तिमित करणारे भव्य रूप पाहून आपण किती क्षुल्लक, क्षुद्र आहोत याची जाणीव झाली आणि आत्मपरीक्षणाची वृत्ती वाढली. ट्रेकदरम्यान गावोगावी जाणे होते. तिथली माणसे भेटतात. खूप आपुलकी असते त्यांना. खूप ओळखी होतात. नवीन ऋणानुबंध निर्माण होतात. आयुष्य समृद्ध, श्रीमंत होते.
इतक्या वर्षांच्या ट्रेकमध्ये कसोटी पाहणारे काही क्षणही होते. एकदा सह्याद्रीत मी रस्ता चुकले. बरोबरीचे साथीदार कुठेही दिसेनात. माझ्यासमोर एक मोठमोठ्ठ्या वेड्यावाकड्या ओबडधोबड दगडांचा उतार होता, जिथून उतरणे शक्य नव्हते. मी डावीकडे, उजवीकडे, मागे-पुढे फिरत राहिले. ट्रेकर देतात तशी "एssss ओsss" अशी हाक देत राहिले. पण काही उपयोग नाही. जवळ फारसे पाणी नव्हते. खायला नव्हते. थोड्या वेळाने संध्याकाळ झाली असती. घनदाट जंगल, काळोखी रात्र, साप, जनावरे अशी विविध संकटे भिववू लागली. खरोखर फार घाबरून गेले मी. मग ठरवले, जसे जमेल तसे खाली जात राहायचे. बसत, घसरत, लागो, खरचटो, पडो, काही होवो, पण येथे नाही थांबायचे. पण देवाला काळजी माझी... खाली काहीतरी हालचाल दिसली. मी ओरडले, तर एक गावकरी समोर आला. मला धीर आला. मी त्याला चुकल्याचे सांगितले. आणि कुठल्या गावात जायचे ते सांगितले. त्याने मला वाट दाखवीत नीट रस्त्याला आणून सोडले. अगदी देवमाणूस वाटला तो मला. मी मनोमन त्याला नमस्कार करून वेगाने निघाले. थोड्या वेळाने ग्रूपमधले एक-दोन जण दिसले. त्यांना थांबायला सांगितले. "कुठे मागे राहिलात?" त्यांच्यापैकी एक जण म्हणाला. त्यांना काहीच ठाऊक नव्हते तर... "काही नाही, जरा फोटो काढत होते." मी म्हणाले.
मी यूथ होस्टेलचा डलहौसी ट्रेक केला, त्याआधी महिनाभर खड्ड्यात अडकून पायाला मुका मार लागला. पाय सुजला. जरा चालले की पाय सुजायचा. डॉक्टरांनी जायला मनाई केली. पण मी जायचेच म्हटल्यावर गोळ्या देऊन परवानगी दिली. सुजलेल्या पायाने केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर मी डलहौसी ट्रेक पूर्ण केलाच, शिवाय धरमशालाला ट्रीयुंडचा सोलो ट्रेकही केला. ट्रीयुंडला वरती मी फक्त एकटीच महिला ट्रेकर होते. त्यामुळे तिथली एकमेव वॉशरूम केअर टेकरने मला वापरायला दिली. बरेचसे परदेशी ट्रेकर्सही होते. त्या सर्वांना माझे खूप कौतुक वाटले. मी सोबत गाईड नेला होता. दुसर्या दिवशी स्नोलाईनपर्यंत जाऊन तो ट्रेक यशस्वीपणे पार पाडला.
मी आणि वर्षा - माझी लेक - दोघींनी भोसला अॅडव्हेंचर कोर्स एकदमच केला. त्या वेळी रॅपलिंग करताना ओव्हरहंगवर उडी मारताना वर्षाला अपघात झाला. दोघा लीडरनी तिला तेथून खाली आणले. तिचा पाय खूप सुजला. तशी ती सहनशील आहे, पण पायाला हात लावू देईना. तिला उभेही राहता येत नव्हते. तिला उचलूनच एका प्रशिक्षकांनी खाली आणले. बेस छावणीवर आल्यावर सरांनी ‘चमक, लचक यावर उपचार करणार्या' एका गाववाल्याला आणले. ते म्हणाले, "मी जोरात झटका देऊन हिचे पाऊल फिरवतो. तिला खूप वेदना होतील, पण ती बरी होईल." मी या गोष्टीला स्पष्ट नकार दिला. आम्ही तिला घेऊन मग नाशिकला हॉस्पिटलमध्ये गेलो. डॉक्टरांनी क्ष किरण रिपोर्ट पाहून तिला फ्रॅक्चर झाल्याचे आणि ताबडतोब ऑपरेशन करावे लागेल असे सांगितले. मी त्यांना म्हटले, "मी ठाण्याला राहते. तिथे नेऊन उपचार केले तर चालेल का?" डॉक्टर "हो" म्हणाले. "पण मी हिचा पाय तात्पुरता सेट करून देईन. १५००/- रुपये खर्च येईल." ही गोष्ट आहे १९९४मध्ये झालेली. माझ्याकडे १५०० रुपयेसुद्धा नव्हते. मला संस्थेनेसुद्धा काही मदत केली नाही. याउलट सर्व सहभागी विद्यार्थी मदत करू इच्छित होते. पण त्या मुलांकडून मदत घेणे मला प्रशस्त वाटले नाही. शेवटी डॉक्टर म्हणाले, "पैसे नंतर द्या. देवमाणूस होता तो. अशी चांगली माणसेच वेळोवेळी भेटली.
त्यानंतर तिथे तात्पुरते उपचार करून तिला मुंबईत आणले. तिचे मोठे ऑपरेशन करावे लागले. तीन महिने प्लास्टर आणि तीन महिने कुबड्या, असे सहा महिने बरे व्हायला लागले. हा सर्व प्रसंग अतिशय कठीण, खूप परीक्षा बघणारा होता आम्हा दोघी मायालेकींसाठी. पण मोठ्या धीराने त्याला सामोरे जाण्याचे बळ कदाचित ट्रेक करून मिळवलेल्या आत्मविश्वासानेच दिले, असे म्हणावे लागेल. असे अनेक बरे-वाईट प्रसंग आले. हेच तर आयुष्य आहे. या सार्या अनुभवाने जीवन खूप समृद्ध बनवले.
ट्रेकिंगमध्ये सर्व सहभागी नेहमीच समजूतदार, सहकार्य करणारे, सुस्वभावी असेच भेटले. बहुधा तरुणांचा भरणा असतो. मुली कमीच असतात. मी सीनिअर आहे म्हणून माझी विचारपूस करतात. अनेक अवघड जागी चढायला आपणहोऊन मदत करतात. प्रोत्साहन देतात. अनेक वेळा "पाठपिशवी घेऊ का?" विचारतात. पण मी माझी पाठपिशवी नेहमीच स्वत: घेऊन जाते. मीदेखील इतर सहभागींसारखी एक सहभागी आहे, हे मी कधीही विसरत नाही. माझ्या या आवडीने मला अनेक मित्र-मैत्रिणी मिळाल्या.
प्रतिक्रिया
9 Sep 2016 - 9:59 am | पैसा
जबाबदार्या कमी झाल्यावर स्वतःसाठी जगण्याची उत्तम पद्धत! मलाही बाहेर पडायचे आहे. कधी जमते बघू! तुझ्याशी प्रत्यक्ष बोलल्यामुळे हा फक्त एक छंद आहे आणि तुझे बाकी छंद इतकेच आयुष्य समृद्ध करणारे आहेत याची कल्पना आहे! जियो!
20 Sep 2016 - 10:47 pm | इनिगोय
हे वाचायचं राहून गेलं असतं. अचाट आहे सगळं!
तुमच्या इतर छंदांबद्दलही तुमच्याकडून प्रत्यक्षच ऎकायला आवडेल.
9 Sep 2016 - 10:51 am | मोदक
सुंदर लेख. आणखी थोडे अनुभव लिहा.
9 Sep 2016 - 1:26 pm | भटकीभिंगरी
जरुर..
9 Sep 2016 - 1:27 pm | भटकीभिंगरी
जरुर..
9 Sep 2016 - 10:51 am | मोदक
सुंदर लेख. आणखी थोडे अनुभव लिहा.
9 Sep 2016 - 11:30 am | भ ट क्या खे ड वा ला
भटकि भिंगरी ,
तुमचा अनुभव खुपच दांडगा आहे अजुन येउ देत .
9 Sep 2016 - 11:32 am | वेल्लाभट
मागच्या ट्रेकला आमचा एक गडी 'किती रे झाले असतील आपले किल्ले...' असं अगदी हिशोब लागत नसल्यासारखं म्हणाला. तेंव्हा नंतर '१५ तरी असतील!' यावर एकमत होताना केवढा तो आनंद झाला होता आम्हाला.
तुमच्या लेखाचा पहिला परिच्छेद वाचूनच सुन्न झालो....
आयला मला एका आयुष्यात इतकं शक्य होणं कठीणच.
आता वरच्या आमच्या डॉयलॉगवर हसू येतंय.
असो, पण सलाम आहे तुम्हाला. तुमच्यासारख्या लोकांचा अभिमान वाटतो जाम. जेन्युइनली.
9 Sep 2016 - 11:36 am | बोका-ए-आझम
हे वाचल्यावर age is just a number हे किती खरं आहे ते जाणवतं.
9 Sep 2016 - 11:43 am | कंजूस
मजा आहे.
9 Sep 2016 - 12:06 pm | पी. के.
सलाम तुम्हाला.
पहिला आणि दुसरा परिच्छेद वाचून सुन्न झालो. तुम्हीतर भटकंतीवर पी एच डी केलाय. आणखी अनुभव ऐकायला आवडेल तुमच्याकडून.
9 Sep 2016 - 1:15 pm | डॉ सुहास म्हात्रे
+१००
अजून अनुभव वाचायला नक्की आवडतील.
9 Sep 2016 - 12:20 pm | माम्लेदारचा पन्खा
अनुभव मांडल्याबद्दल धन्यवाद !
9 Sep 2016 - 1:23 pm | सिरुसेरि
छान लेख
9 Sep 2016 - 1:36 pm | भटकीभिंगरी
तुमच्या प्रोत्चाहित करणार्या प्रतीक्रियान्बद्दल खुप खुप धन्यवाद मी या ग्रूपवर नविन आहे.मी सर्वतोपरी जास्तीत सहभाग देण्याचा प्रयत्न करेन. तुम्हा सर्वाना भेटुन आनन्द झाला.
9 Sep 2016 - 1:36 pm | भटकीभिंगरी
तुमच्या प्रोत्चाहित करणार्या प्रतीक्रियान्बद्दल खुप खुप धन्यवाद मी या ग्रूपवर नविन आहे.मी सर्वतोपरी जास्तीत सहभाग देण्याचा प्रयत्न करेन. तुम्हा सर्वाना भेटुन आनन्द झाला.
9 Sep 2016 - 2:30 pm | यशोधरा
खूपच भटकलाय की तुम्ही हिमालयात आणि सह्याद्रीमध्ये!
प्रत्येक ट्रेकवर लिहू शकाल. हर की दून ट्रेकबद्दल जरा विस्ताराने सांगाल का?
23 Sep 2016 - 1:54 pm | भटकीभिंगरी
हो सान्गेन ना....
23 Sep 2016 - 1:54 pm | भटकीभिंगरी
हो सान्गेन ना....
23 Sep 2016 - 1:54 pm | भटकीभिंगरी
हो सान्गेन ना....
9 Sep 2016 - 3:34 pm | स्वाती दिनेश
तुमची भटकंती आवडली. अजून वाचायला नक्की आवडेल.
स्वाती
9 Sep 2016 - 3:41 pm | सस्नेह
खरा स्वान्तसुखाय छंद !
9 Sep 2016 - 5:58 pm | मुक्त विहारि
अजून लिहा...
9 Sep 2016 - 6:24 pm | स्मिता चौगुले
खूप छान .. अजून वाचायला आवडेल
9 Sep 2016 - 6:31 pm | पिलीयन रायडर
भलताच इन्स्पायरिंग लेख!! तुमचे अनुभव वाचायला खुप आवडेल!!
9 Sep 2016 - 7:33 pm | शलभ
मस्त अनुभवकथन. अजून किस्से येऊ द्या.
9 Sep 2016 - 8:38 pm | इशा१२३
वा! मस्त भटकंती.अजून लिहा जरुर.
9 Sep 2016 - 8:38 pm | इशा१२३
वा! मस्त भटकंती.अजून लिहा जरुर.
9 Sep 2016 - 9:24 pm | झेन
खरोखर महान आहात. अहो तुम्ही फिरलेली ठिकाणं नुसती वाचून बधीर झालो, थोडावेळ आजुबाजूचं सगळं फिरायला लागलं. फक्त एकच विनंती आहे, टप्प्या टप्प्याने सविस्तर येऊदे. तुमचा अनुभव बघता लिहेण्यासारखे प्रचंड असणार.
9 Sep 2016 - 9:36 pm | अभिजीत अवलिया
आय.डी चे नाव अगदी सार्थ केलेत. :)
10 Sep 2016 - 8:28 pm | स्रुजा
___/\____
प्रेरणादायी हा शब्द कमी पडतोय ! ३८ व्या वर्षी सुरु करुन इतके वर्षं करत राहणे हे जबरदस्त प्रेरणादायी आहे. इथे अनुभव शेअर केल्याबद्दल खुप धन्यवाद. याच्या निम्मं जमलं तरी मी शाबासकी देईन स्वतःला.
10 Sep 2016 - 8:40 pm | जेपी
लेख आवडला..
19 Sep 2016 - 2:07 pm | भटकीभिंगरी
सर्वान्चे आभार ...
20 Sep 2016 - 6:57 am | स्मिता_१३
खरोखर प्रेरणादायी !!
20 Sep 2016 - 9:21 am | रातराणी
लेख आवडला!
21 Sep 2016 - 12:35 pm | मुक्त
और आंदो.
23 Sep 2016 - 12:44 am | पिशी अबोली
खूप प्रेरणादायी लेख आहे. तुमच्या अनुभवांबद्दल अजून नक्की लिहा..
23 Sep 2016 - 1:08 am | पद्मावति
सुरेख लेख!
23 Sep 2016 - 1:16 am | बॅटमॅन
अतिशय प्रेरणादायी लेख. आम्ही इथे गुळाच्या ढेपीला मुंगळा चिकटतो तसे चिकटून बसलेलो असतो बघावं तेव्हा. २०० किल्ले म्हणजे चेष्टा नव्हे. इथे १५ तरी किल्ले ट्रेकवले असतील याबद्दल डौट आहे. क्यारी ऑन & बेस्ट ऑफ लक!
23 Sep 2016 - 4:03 am | निनाद
काय झकास आहात हो तुम्ही!
योग्य निर्णय क्षमता...
पण लेख खुप म्हणजे खुपच छोटा झालाय. अजून वाचायला हवे होते असे वाटले...
यातले सगळे उल्लेख हे स्वतंत्र लेखांचे विषय आहेत. तेव्हा हा लेख अनुक्रमणिका आहे असे मानतो आणि पुढील लेखांची वाट पाहतो! :)
23 Sep 2016 - 1:57 pm | भटकीभिंगरी
हो ..नकी लिहिन...माझ्या माहितीचा कोणाला उपयोग झाला तर छानच ..
23 Sep 2016 - 6:57 pm | मी-सौरभ
तुमच्या मिपा वरील लेखनाचा श्रीगणेशा झाला आहे. आता जमेल तसे तुमच्या अनुभवांबद्दल आणि पुढील दौर्यांबद्दल पण लिहा.
कदाचित त्यामुळे तरी आमच्यासारखे मुंगळे आपली जागा सोडून जमेल तेव्हा जिन्याचा तरी वापर करतील. ;)
23 Sep 2016 - 7:02 pm | अनन्न्या
अजून अनुभव वाचायला आवडतील.