श्रीगणेश लेखमाला - जीवन लेन्सच्या फोकसमधून..

अभिजीत अवलिया's picture
अभिजीत अवलिया in लेखमाला
11 Sep 2016 - 8:50 am

.inwrap
{
background-color: #F7F0ED;
}
.inwrap
{
border: solid transparent;
border-width: 30px;
-moz-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
-webkit-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
-o-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
}

माझा जन्म कराडचा. पण माझ्या जन्मानंतर आईवडील लगेच कोकणात कणकवली येथे स्थायिक झाले आणि त्यामुळे मी कोकणी माणूस बनलो. ऑगस्ट २००७मध्ये मी इंजीनियरिंग पूर्ण करून नंतरचे ५ महिने ज्या कॉलेजमध्ये शिक्षण घेतले तिथेच लेक्चरर म्हणून काम केले. त्यानंतर जानेवारी २००८पासून आजतागायत सॉफ्टवेअर इंजीनियर म्हणून काम करतोय. हा झाला व्यवसाय. माझा मुख्य छंद आहे फोटोग्राफी, ज्याचा माझ्या व्यावसायिक जीवनात उपयोग होण्याची सुतराम शक्यता नाही.

मी जवळपास साडेचार वर्षांपूर्वी कॅमेरा घेतला. आपण फोटोग्राफी थोडी तरी शिकावी असे कॅमेरा घेताना मुळीच वाटत नव्हते. आपल्याला जर कधी गरज पडली तर दर वेळी कुणाकडे मागणार? त्यापेक्षा स्वतः:चा असलेला बरा हे घेण्याचे मुख्य कारण. दुसरी गोष्ट म्हणजे हे डिजिटल युग आहे. ३२ का अशाच काहीतरी फोटोंचा रोल टाकून वर्षभर पुरवून पुरवून फोटो काढणे ही भानगड नाही. त्यामुळे एकदाच काय तो खर्च हादेखील विचार होता. पण नव्याचे नऊ दिवस झाल्यावर बिचारा जास्त करून बॅगेतच राहू लागला. अशातच साधारण दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु.ल. देशपांडे ह्यांचे खालील वक्तव्य वाचनात आले -
'आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजीविकेसाठी आवश्यक असणार्‍या विषयाचं शिक्षण जरूर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.'
पु.लं.च्या ह्या संदेशाने माझ्यात खरा बदल झाला असे मी म्हणेन. व्यावसायिक जीवनातल्या 'रॅट रेस'मध्ये विनाकारण धावत राहून आपण आयुष्यात ऑफिसशिवाय दुसरे काही असते, हेदेखील विसरून जात आहोत ह्याची प्रकर्षाने जाणीव झाली. आणि त्यानंतर गेली जवळपास दीड वर्षे मी फोटोग्राफीमध्ये बर्‍यापैकी लक्ष घालणे सुरू केले आणि सध्यातरी मला त्यातून खूप आनंद मिळतो.

फोटोग्राफी शिकणे म्हणजे केवळ कॅमेरा आणि महागड्या लेन्सेस घेतल्या आणि भारंभार फोटो काढत सुटले असे मुळीच नाही. कोणत्याही अन्य क्षेत्राप्रमाणे ह्यातदेखील प्रचंड अभ्यासाला आणि सरावाला दुसरा पर्याय नाही. त्यामुळे फोटोग्राफीची मासिके वाचणे सुरू असते. आणि इंटरनेट म्हणजे तर माहितीचा खजिनाच. त्यातून बर्‍याच लोकांचे काम समजते. केवळ प्रसिद्ध ठिकाणी जाऊन फोटो काढण्यापेक्षा रोजच्या जीवनात आपल्या आजूबाजूला घडणार्‍या घटनांचे चित्रण कसे करावे, त्याचे महत्त्व काय, साध्या साध्या वाटणार्‍या गोष्टींमधूनही किती उत्तम छायाचित्रे कशी निर्माण होतात हे समजू लागले. चांगला फोटोग्राफर व्हायचे असेल तर महागडा कॅमेरा, लेन्सेस यांच्यापेक्षा उत्तम दृष्टी आवश्यक असते हा या सर्वातून मला मिळालेला फार मोठा धडा.

खाली मी काढलेले माझे काही आवडते फोटो देत आहे

वारकरी
१

अर्णव
२

३

माझी आजी
४

शेतकरी
५

कोंडुरा बीच, सिंधुदुर्ग
६

एका हॉटेलचा दरवाजा
७

ट्विन सेल ब्रिज , इंग्लंड
८

डाउनटाउन पिट्सबर्ग
९

फोर्ट पिट ब्रिज पिट्सबर्ग
१०

एकांडे झाड
११

१२

माझे आवडते म्हणून मी जे फोटो इथे दिलेले आहेत, त्यातले बहुतेक मी घरात किंवा आजूबाजूला काढलेले आहेत. खास फोटो काढण्यासाठी म्हणून जी प्रसिद्ध ठिकाणे भारतात आहेत (उदा. वाराणसीचे घाट, पुष्करमेळा, कुंभमेळा, कोलकाता) अशा ठिकाणी जायची मला काहीच गरज वाटत नाही.

अजूनपर्यंत तरी फोटोग्राफी मधून ५ पैसेदेखील मिळवलेले नाहीत. काही दिवसांपूर्वी मी भटकंतीचे काही धागे मिपावर टाकले होते. ह्या धाग्यांमध्ये टाकलेल्या फोटोंचे बर्‍याच मिपाकरांनी कौतुक केले. हेच ह्या क्षेत्रातले आतापर्यंतचे बक्षीस. लोकांची दाद मिळणे खूप आवडते. शेवटी प्रत्येक कामातून आर्थिक कमाई झालीच पाहिजे असे नाही ना! काही गोष्टी निव्वळ मानसिक समाधानासाठी केलेल्या चांगले असते. दुसरी गोष्ट म्हणजे अजून काही वर्षात तंत्रज्ञान इतके पुढे जाईल की फोटोग्राफी हा कुणाचा मुख्य व्यवसाय राहील का ह्याबद्दल शंका वाटते.

हा छंद जोपासताना मी एक गोष्ट कटाक्षाने पाळतो, ती म्हणजे ज्या गोष्टी आपल्या मनाला पटत नाहीत त्यांचे फोटो काढायला जायचे नाही. त्यामुळे फोटो काढणे हा छंदच राहील. जर तो माझा मुख्य व्यवसाय झाला, तर कदाचित मला माझ्या मनाला पटणार्‍या गोष्टींपेक्षा मला पैसा मिळवून देणार्‍या गोष्टींचे फोटो काढावे लागतील. आणि तसे होणे योग्य होणार नाही.

भविष्यात स्वतः:च्या फोटोग्राफीमध्ये सुधारणा करत राहावी आणी स्ट्रीट फोटोग्राफीमध्ये उत्तमोत्तम छायाचित्रे काढून त्यांचा एक अल्बम बनवावा, अशी इच्छा आहे.

शेवटी एकच सांगेन - ताजमहाल पाहायला गेल्यावर सगळेच त्याचा फोटो काढतात आणि तो कसाही काढला तरी सुंदरच येतो. त्यात विशेष काहीच नाही. पण आपण आपल्या रोजच्या जीवनातल्या आजूबाजूलाच घडणार्‍या घटनांचे, असणार्‍या माणसांचे, आपल्या कुटुंबाचे प्रत्येकाने चित्रण करावे. कारण त्यात काहीतरी नावीन्य असते आणि ते तुमच्या आयुष्यभराची आठवण असतात, ज्याची किंमत पैशात कधीच करता येणार नाही. आणि ह्यासाठी तुमच्या मोबाइलमधला कॅमेरादेखील पुरेसा आहे.

लेखाचा शेवट अशाच तीन कौटुंबिक फोटोंनी - तांत्रिकतेच्या दृष्टीने यांचे परीक्षण केल्यास यांना कदाचित शून्य मार्क मिळतील, पण जे माझ्यासाठी सुखद आठवणी आहेत.

१३

१४

१५

प्रतिक्रिया

पैसा's picture

11 Sep 2016 - 8:54 am | पैसा

सुंदर फोटो आणि त्यासोबतचे मनोगतही खूप आवडले. खूप समाधान देणारा छंद आहे. कारण जे क्षण पुन्हा येणार नसतात त्यांच्या आठवणी चित्रात गोठवून ठेवता येतात.

सुरेख फोटो आहेत! अजूनही फोटो बघायला आवडतील.
लेखही आवडला.

बोका-ए-आझम's picture

11 Sep 2016 - 10:12 am | बोका-ए-आझम

ताजमहाल पाहायला गेल्यावर सगळेच त्याचा फोटो काढतात आणि तो कसाही काढला तरी सुंदरच येतो. त्यात विशेष काहीच नाही. पण आपण आपल्या रोजच्या जीवनातल्या आजूबाजूलाच घडणार्‍या घटनांचे, असणार्‍या माणसांचे, आपल्या कुटुंबाचे प्रत्येकाने चित्रण करावे. कारण त्यात काहीतरी नावीन्य असते आणि ते तुमच्या आयुष्यभराची आठवण असतात, ज्याची किंमत पैशात कधीच करता येणार नाही. आणि ह्यासाठी तुमच्या मोबाइलमधला कॅमेरादेखील पुरेसा आहे.

अगदी खरं आहे. चांगला लेखक कधीच पेनवर अवलंबून नसतो. तुम्हाला b/w छायाचित्रे जास्त आवडतात असं दिसतंय. माझीही आवड तीच आहे. लेख आवडला. फोटोही छान.

+ 11111 b /w छायाचित्रांबद्दल
मधूबाला चे फोटो b /w च सुंदर वाटतात

शिव कन्या's picture

11 Sep 2016 - 10:33 pm | शिव कन्या

हेच म्हणायला आले होते.
बाकी वारकर्याचा फोटो आणि त्यावर घेतलेली मेहनत सुपर.

कंजूस's picture

11 Sep 2016 - 10:17 am | कंजूस

>>भविष्यात स्वतः:च्या फोटोग्राफीमध्ये सुधारणा करत राहावी आणी स्ट्रीट फोटोग्राफीमध्ये उत्तमोत्तम छायाचित्रे काढून त्यांचा एक अल्बम बनवावा, अशी इच्छा आहे.>>
व्वा!
फोटो आवडले.
हॅाटेलचा दरवाजा मजेदार.

हॅा

अरिंजय's picture

11 Sep 2016 - 10:40 am | अरिंजय

'वारकरी' आणि 'माझी आजी' हे दोन फोटो - जबरदस्त, फार सुंदर टिपलेत.

स्वाती दिनेश's picture

11 Sep 2016 - 12:24 pm | स्वाती दिनेश

फोटो तर सुरेख आहेतच, त्याबरोबरचे मनोगतही आवडले.
स्वाती

अनुप ढेरे's picture

11 Sep 2016 - 12:32 pm | अनुप ढेरे

वारकरी आणि हॉटेलचे दार हे फोटो विशेष आवडले. लिहिलं देखील छान आहे.

अमितदादा's picture

11 Sep 2016 - 12:35 pm | अमितदादा

सुरेख....पहिला फोटो आवडला.

इल्यूमिनाटस's picture

11 Sep 2016 - 12:49 pm | इल्यूमिनाटस

आवडलं

सस्नेह's picture

11 Sep 2016 - 12:54 pm | सस्नेह

मस्त फोटो !
छंद खूप जिवाभावानं जपलाय तुम्ही..

पद्मावति's picture

11 Sep 2016 - 3:08 pm | पद्मावति

अप्रतिम फोटो आणि मनोगतही खूप आवडलं.
असेच क्लिका, लिहा आणि आमच्याबरोबर शेअर करा.

छायाचित्रे आणि मनोगत आवडले.

पिलीयन रायडर's picture

11 Sep 2016 - 10:34 pm | पिलीयन रायडर

सगळेच फोटो आवडले! ह्या लेखमालेसाठी आवहनाचा धागा आल्यावर असं वाटलं की माझ्याकडे कोणताही छंद नाही.. पण आपल्याकडे वेळच नसतो असे कारण मी स्वतःला दिले. पण तुमचा लेख वाचुन वाटलं की खरंच लहानसा का होईना छंद हवाच.

तुम्ही जरुर तुमचा उत्तम अल्बम बनवाल! न्यु यॉर्क मध्ये स्ट्रिट फोटोग्राफीला खुपच वाव आहे तुम्हाला!

अभिजीत अवलिया's picture

11 Sep 2016 - 11:31 pm | अभिजीत अवलिया

संर्वांचे आभार आणी संपादक मंडळाने संधी दिल्याबद्दल धन्यवाद.
@बोकाशेठ,
ब्लॅक अँड व्हाईट हा माझा सगळ्यात आवडता प्रकार आहे. ह्याचे कारण म्हणजे फोटोत इतर रंग नसल्यास एक प्रकारे मुख्य विषयाकडे/फोटोतल्या भावनांकडे पूर्ण लक्ष जाते आणी इतर रंगांच्या उपस्थितीमुळे होणारे 'distraction' कमी होते असे मला वाटते. त्यामुळेच कुठलाही फोटो काढताना अगोदर माझ्या डोक्यात हा फोटो ब्लॅक अँड व्हाईट मध्ये कसा दिसेल हेच येते.

संदीप डांगे's picture

12 Sep 2016 - 9:30 am | संदीप डांगे

सुंदर! सर्वच फोटो मस्त आहेत!

मित्रहो's picture

12 Sep 2016 - 10:13 am | मित्रहो

सर्वच फोटो छान आहेत, वारकरी सुंदर, एका हॉटेलचा दरवाजा पण मस्त. माझ्या मुलाचे नाव पण अर्णव असल्याने ते फोटो विशेष आवडले.

मुक्त विहारि's picture

12 Sep 2016 - 2:15 pm | मुक्त विहारि

आमची फोटोग्राफी म्हणजे...हॅ हॅ हॅ....

"ट्विन सेल ब्रिज , इंग्लंड" या छायाचित्रामध्ये पोलरायझर किंवा HDR चा वापर केला आहे का ?

अभिजीत अवलिया's picture

12 Sep 2016 - 8:54 pm | अभिजीत अवलिया

नाही. अजून पर्यंत असले काही वापरलेले नाही.फक्त एक 18-135 mm लेन्स आहे आणी ती धुळीपासून किंवा ओरखडे पडण्यापासून सुरक्षित राहावी ह्यासाठी साधा UV फिल्टर लावलेला आहे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

12 Sep 2016 - 7:47 pm | कैलासवासी सोन्याबापु

अभिजित शेठ, आम्ही तुमचे ५च्या वेगाने गरगर फिरणारा पंखा झालो आहोत, तीन फोटो तुफान आवडले

१. अर्थातच वारकरी
२. पिल्लूला घास भरवती आई
३. एकांडे झाड

बाकी ,


शेवटी एकच सांगेन - ताजमहाल पाहायला गेल्यावर सगळेच त्याचा फोटो काढतात आणि तो कसाही काढला तरी सुंदरच येतो. त्यात विशेष काहीच नाही. पण आपण आपल्या रोजच्या जीवनातल्या आजूबाजूलाच घडणार्‍या घटनांचे, असणार्‍या माणसांचे, आपल्या कुटुंबाचे प्रत्येकाने चित्रण करावे. कारण त्यात काहीतरी नावीन्य असते आणि ते तुमच्या आयुष्यभराची आठवण असतात, ज्याची किंमत पैशात कधीच करता येणार नाही. आणि ह्यासाठी तुमच्या मोबाइलमधला कॅमेरादेखील पुरेसा आहे.

ह्याच्यासाठी दंडवत घ्या आमचा साष्टांग !

मोदक's picture

12 Sep 2016 - 7:48 pm | मोदक

कडक्क..!!

सुबोध खरे's picture

12 Sep 2016 - 7:55 pm | सुबोध खरे

जर तो माझा मुख्य व्यवसाय झाला, तर कदाचित मला माझ्या मनाला पटणार्‍या गोष्टींपेक्षा मला पैसा मिळवून देणार्‍या गोष्टींचे फोटो काढावे लागतील. आणि तसे होणे योग्य होणार नाही.
एक वेगळा विचार-- जर आपला छंद हा आपला व्यवसाय बनवता आला तर आठ तास तुम्ही जे पाट्या टाकता आहात तो काळ सुद्धा तुम्हाला छंदाला देता येईल. मग त्यातील तास दोन तास जरी तुम्हाला नको असलेल्या गोष्टींचे फोटो काढायला लागले तरीही चालेल.
प्रेयसीची "बायको" बऱ्याच लोकांची होते
पण बायकोची "प्रेयसी" झाली तर आयुष्य जास्त सुंदर होते.
विचार करून पहा.
बाकी फोटो सुंदर आहेतच.

स्मिता_१३'s picture

20 Sep 2016 - 9:15 am | स्मिता_१३

सुंदर फोटो आणि मनोगत देखील

रातराणी's picture

20 Sep 2016 - 10:16 am | रातराणी

सुरेख! सर्वच फोटो अप्रतिम!