स्वातंत्र्यदिन

शैलेन्द्र's picture
शैलेन्द्र in काथ्याकूट
15 Aug 2016 - 11:13 am
गाभा: 

आजच्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी, खरंतर असे विचार करू नयेत, सगळा देश एका उत्साही समारंभात गुंतलेला असताना आपण उगाच प्रवाहाविरुद्ध एका जागी उभं राहणं तसही कठीण आहे.

भारत 15 ऑगस्ट 1947 या दिवशी स्वतंत्र झाला म्हणजे नक्की काय झालं? तो नक्की कोणत्या दिवशी पारतंत्र्यात गेला होता? जो भारत पारतंत्र्यात गेला होता तोच स्वतंत्र झाला की तो बदलला होता? 15 ऑगस्टला भारत स्वतंत्र झाला की एक नवीन देश तयार झाला?

मुळात देश म्हणजे काय?

माझ्या मते देव आणि धर्म यांच्यासारखीच देश हि मानवी समाजाला एकत्र आणण्यासाठी आणि सामाजिक व्यवहार सोयीस्कर करण्यासाठी राबवली गेलेली एक संकल्पना आहे, त्यामुळे आपला विश्वास या पलीकडे तिचे अस्तित्व नाही.

हो, भारत देशाचे अस्तित्व हे फक्त सगळ्या भारतीयांच्या त्यावर असलेल्या विश्वासावर अवलंबून आहे. देशाला भौगोलिक अस्तित्व नसते. या संकल्पनेवर विश्वास असलेल्या लोकांच्या ताब्यात जो भूभाग असतो त्याला आपण रूढार्थाने देश म्हणतो. आसेतु हिमाचल असलेला भारत हि खरंतर भारत या संकल्पनेवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्या मालकीची जमीन आहे, आणि म्हणूनच तिचे रक्षण करणे हे त्यांचे कर्तव्य आणि हक्कही आहे.

आणि इथूनच खरी गंमत सुरु होते, मुळात हि संकल्पना असल्याने, ती न मानणारे किंवा तिला ओलांडून पुढे जाणारे, त्याहून भव्य संकल्पनेवर विश्वास ठेवणारे किंवा जो समुदाय हि संकल्पना मानतो त्यावर विश्वास नसणारे लोकही या भूभागात राहत असतात. जसं देव/धर्म न मानणारे अनेक जण या समाजात आहेत तसेच देश हि संकल्पना तितक्या आत्मीयतेने न मानणारे किंवा फक्त व्यवहार म्हणून तिचे पालन करून तात्विक दृष्ट्या त्याबद्दल फारसे आग्रही नसलेले लोकही याच समाजात आहेत.

हल्ली त्यांना देशद्रोही म्हणायची फॅशन आहे.

या संकल्पनेवर सगळ्यांचा सारखाच विश्वास नसल्याने, माय गॉड इज होलियर दॅन युअरस, हा खेळ खेळायला बरीच जागा असते, तसंच जो समुदाय हि संकल्पना मानतो त्याच्या जीवावर सगळे फायदे उपटून पुन्हा त्याला प्रतिगामी ठरवायलाही बरीच जागा आहे.

खरंतर आजच्या जागतिक व्यवस्थेत राष्ट्रीयता हि न टाळता येणारी व्यवस्था झालीय, शेजारचा पाळतो म्हणून मलाही पाळावी लागणारी. मी माझं भारतीयत्व सोडलं म्हणून काही मी भारतीय कायद्यातून मुक्त होऊ शकत नाही. भारताने सैन्य काढून घेतले म्हणून चीन किंवा पाकिस्तान ह्या संकल्पना मानणारे लोकं आपापले सैन्य मागे घेणार नाहीत.

Absolute freedom cannot be enjoyed in this world until its anarchic or barbaric.

प्रतिक्रिया

विचारांना चालना देणारा लेख.
वसाहतवादाचा परिणाम म्हणून निर्माण झालेली राष्ट्रीयता - यावर कालच एका गटाशी चर्चा झाली.
समूह, संस्कृती अशा संकल्पनांच्या तुलनेत राष्ट्र ही संकल्पना नवी आहे. आणि बदलणा-या जागतिक संदर्भात देशभक्त-देशद्रोह या संकल्पनाही अधिक सखोलपणे वापरायला आपल्याला शिकावं लागेल.

शैलेन्द्र's picture

15 Aug 2016 - 2:52 pm | शैलेन्द्र

धन्यवाद

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Aug 2016 - 2:55 pm | डॉ सुहास म्हात्रे

.

आदर्शवाद :

लेखातला आदर्शवाद आवडला व तो खर्‍या जीवनात आस्तित्वात आला तर पृथ्वीचा स्वर्ग अथवा युटोपिया बनेल. पण, दुर्दैवाने...

हे जग आदर्शवादावर आधारून बनलेले नाही. प्राण्यांची मूलप्रवृत्ती अन्न, सुरक्षा आणि वंशविस्तार या मूळ गोष्टींवर (किंबहुना या तीन गोष्टींचा अभाव निर्माण होईल या भितीवर) आधारून बनलेली आहे. हे वाईट आहे असे नाही. कारण, असे नसते तर प्राणीजगत फार पूर्वी नष्ट झाले असते किंवा आज आहे तसे विस्तारीत तरी झाले नसते. गेल्या दोन लाख वर्षांच्या कालखंडात माणूस नावाचा प्राण्यामध्ये बदल होऊ लागले आणि या तीन मूळ गोष्टींत "अतीरेकी लोभ" आणि "अतीरेकी अहंवाद" या दोन गोष्टींची भर पडली आहे. हा फरक एक दुधारी शस्त्र ठरले आहे. या जगावर झालेल्या बर्‍याच दुष्परिणामांमागे मुख्यतः या दोन गोष्टी आहेत. पण, त्याचबरोबर हे पण निर्विवाद आहे की, माणसाचा आजवर झालेला भौतिक विकास होणे आणि माणूस पृथ्वीवरचा सर्वात प्रबळ प्राणी बनणे हे या दोन गोष्टींशिवाय होणे शक्य नव्हते... त्यांच्याविना माणूस आजही एक सर्वसामान्य प्राणीच राहिला असता.

मानव खूपदा आदर्शवादाची भलावण जरूर करतो. पण दुदैवाने, प्रत्यक्षात त्याबरहुकुम प्रामाणिक आचरण करणे त्याला अजून तरी जमलेले नाही... आणि मनुष्यस्वभाव पाहता ते बहुसंख्य मानवांना जमेल असेही दिसत नाही. असा आदर्शवाद बहुदा खालील गोष्टींसाठी उपयोगात आणला जातो...
(अ)आपला सामाजिक-राजकिय-आर्थिक-इ स्वार्थ लपविण्यासाठी एक आकर्षक भ्रामक पडदा निर्माण करण्यासाठी
किंवा
(आ) राष्ट्र व त्यावर अवलंबून असलेल्या कायदा व सुव्यवस्था या संकल्पनांमुळे मिळालेल्या स्थैर्य, शांती आणि सधनतेत बसून, भरल्या पोटावर हात फिरवत करण्याच्या तात्वीक-वैचारीक चर्चेसाठी.

मानवाची आदीम प्रवृत्ती व वाटचाल...
(अ) विस्तारवाद (दुसर्‍याची जमीन, संपत्ती, संस्कृती, इत्यादींवर आक्रमण करून त्यावर कब्जा करण्याची लालसा);
(आ) अहंवाद (केवळ मी/माझा धर्म, विचारसरणी (ideology), राज्यव्यवस्था, इत्यादी सर्वश्रेष्ठ आहे व ती इतरांवर लादणे हे माझे आद्य कर्तव्य आहे असा स्वकेंद्रित विचार);
यावर अबलंबून होती, आहे आणि मनुष्यस्वभावाची जडण-घडण पाहता भविष्यातही तशीच राहील. फार फार तर, स्थल-काल-व्यक्तीविशेषानुसार तिचे बाह्यस्वरूप बदलते राहीले आहे व बदलत राहील, इतकेच. हे सगळे आदीमाणूस लहान लहान टोळ्यांनी राहत होता तेव्हापासून ते मध्ययुग ते वसाहतवाद ते आजतागायत असेच चालू आहे.

"हे सर्व योग्य, तात्विक किंवा सात्विक आहे का ?" याचा हा उहापोह नाही... फक्त वस्तुस्थितीचे परखड विवरण आहे. आणि वस्तुस्थिती उघड्या डोळ्यांनी, प्रामाणिकपणे स्विकारून आपली रणनीति आखल्याशिवाय मानवाचे आस्तित्वातच धोक्यात येईल. जो मानवसमूह आस्तिवात राहणार नाही त्याच्या तत्वज्ञानाचे काय होईल हे ओळखणे फार कठीण नाही.

या जगात कोणत्याच गोष्टीचे स्थान पूर्णपणे चांगली अथवा पूर्णपणे वाईट असे दोनपैकी एका टोकावर नसते... प्रत्येक गोष्टीचे स्थान चांगल्या-वाईटाच्या वर्णपटावर कोठेतरी असते. त्याचबरोबर, चांगले आणि वाईट यांचे मानदंड स्थल-काल-व्यक्तीपरत्वे बदलत असतात. माणूस/मानवसमूह आणि त्याचे (भौतिक, राजकिय, सामाजिक, आर्थिक, इ) पर्यावरण यांच्यामध्ये सतत आणि अटळ, संवाद (interaction) आणि चढाओढ (competition) चालू असतात. त्यामधून, प्रचलित काळी असलेल्या परिस्थितीनुसार आपल्याला "परवडेल अशी शक्य तेवढी जास्त सुरक्षा आणि विस्तार देणारी तडजोडीची व्यवस्था (compromise)" माणूस व माणसांचे समूह (संस्था, देश, इ) स्विकारतात... किंबहुना, आस्तित्व टिकवायचे असल्यास त्यांना ती तडजोड स्विकारणे भाग पडते.

******

वास्तववादी राष्ट्रवाद :

वर वर्णन केलेली वस्तुस्थिती, मानवाचा ज्ञात पुर्वेतिहास, विशेषतः गेली दोन महायुद्धे, अनेक प्रयोगांतून वर आलेली लोकशाही व्यवस्था (जी निर्दोष/आदर्श व्यवस्था नाही तर उपलब्ध असलेल्या व्यवस्थांपैकी सर्वात जास्त स्विकार्ह पर्याय आहे) आणि जनसामान्यांतली मानवी हक्कांची वाढती जाण यांसंबंधिच्या अनुभवांवरून (किंबहुना त्यांच्या रेट्यामुळे) चालू परिस्थितीत "सार्वभौम देश" आणि "त्यांच्यात सौहार्द ठेवून प्रत्येकाचे सार्वभौमत्व राखण्यासाठी निर्माण केलेली देशांची संघटना (UN)" ही सद्य व्यवस्था निर्माण झाली आहे.

ही व्यवस्था सर्वोत्तम/निर्दोष नक्कीच नाही. पण...
(अ) कोणतेही जागतिक नियम-कायदे नसणारी "फ्री फॉर ऑल" किंवा "बळी तो कान पिळी" किंवा "अराजक" अशी वसाहतवादापर्यंत आस्तित्वात असलेली व्यवस्था
ते
(आ) केवळ मानवी चांगुलपणावर विसंबून असलेली आदर्शवादी व्यवस्था (जे मानवी स्वभाव पाहता केवळ स्वप्नरंजनच होऊ शकते),
...या संपूर्ण वर्णपटावर तिच्यापेक्षा जास्त चांगली दुसरी व्यवस्था सद्यपरिस्थितीत तरी नजरेसमोर नाही.

आसेतु हिमाचल असलेला भारत हि खरंतर भारत या संकल्पनेवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्या मालकीची जमीन आहे, आणि म्हणूनच तिचे रक्षण करणे हे त्यांचे कर्तव्य आणि हक्कही आहे.

वरचे विश्लेषण पाहता, भारताची ही संकल्पना सद्यस्थितीतली सर्वोत्तम तडजोड मानायला हरकत नसावी. त्याचबरोबर खाली काही तथ्ये जमेस धरली तर हा विचार अजून पका होण्यास मदत होईल असे वाटते...

भारत देश ही संकल्पना जगातल्या बहुतेक सर्व देशांना व संयुक्त राष्ट्र संघटनेला मान्य असूनही, पाकिस्तान व चीनने भारताचे काही भाग व्याप्त केलेले आहेत; त्यांनी अजून काही भारतिय भागांवर हक्क सांगीतले आहेत; आणि त्यांच्या त्यासंबंधात उघड-गुप्त आक्रमक कारवाया चालू आहेत. जर "भारत देश (देश, देशाचे सरकार, देशाचे सैन्य, इ)" व "संयुक्त राष्ट्रे" या संकल्पनाच आस्तित्वात नसत्या आणि त्यामुळे चीन व पाकिस्तानवर मनमानी उघड कारवाई करण्याविरुद्ध दबाव नसता, तर काय झाले असते याची कल्पना करणे फार कठीण नाही ! ही कल्पना करायला मध्यपूर्वेतला सिरिया, इराक, इसिस इत्यादींचा ताजा अनुभव उपयोगी पडावी... किंबहुना तिथल्या राष्ट्रहीन परिस्थितीचे चटके भोगणार्‍या लोकांना आपण आदर्शवादी तत्वज्ञान तेथे जावून सांगतो आहोत अशी कल्पना करून पहावी !

संदीप डांगे's picture

15 Aug 2016 - 3:13 pm | संदीप डांगे

सहमत,

मी स्वतः 'कंट्रीज विदाऊट बोर्डर्स' चा चाहता असलो तरी लेखात उल्लेखलेला आदर्शवाद पटत नाही,

शैलेन्द्र's picture

15 Aug 2016 - 9:39 pm | शैलेन्द्र

लेखात आदर्शवाद जरूर सांगितलाय पण मी कुठेही राष्ट्र या संकल्पनेत अर्थ नाही किंवा तो एक निव्वळ पोकळ अभिमान आहे असं म्हटलेलं नाही, आजच्या घडीला राष्ट्राचे अस्तित्व आणि त्याचे रक्षण/पोषण अपरिहार्य आहे.
मला सांगायचं ते इतकंच, कि इतर अनेक संकल्पनाप्रमाणे राष्ट्रवाद हि देखील एक संकल्पना आहे, आणि देश हि एक व्यवस्था आहे. त्यापेक्षा जास्त किंवा कमी काहीही नाही.

मदनबाण's picture

15 Aug 2016 - 4:43 pm | मदनबाण

जिसकी लाठी उसकी भैंस !
आदर्शवाद अवास्तव असु नये...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Maj Gen GD Bakshi's Address at Ideatum TLR Live, March 15, 2016

शैलेन्द्र's picture

15 Aug 2016 - 9:46 pm | शैलेन्द्र

संपूर्ण सहमत,

फक्त आपल्याकडे आहे ती भैस आहे, ऐरावत नाही याचं भान हवं.

मदनबाण's picture

15 Aug 2016 - 5:20 pm | मदनबाण

एक व्हिडियो देउन जातो...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Maj Gen GD Bakshi's Address at Ideatum TLR Live, March 15, 2016