श्रीगणेश लेखमाला - साद देती गिरिशिखरे...

भ ट क्या खे ड वा ला's picture
भ ट क्या खे ड वा ला in लेखमाला
9 Sep 2016 - 7:40 am

.inwrap
{
background-color: #F7F0ED;
}
.inwrap
{
border: solid transparent;
border-width: 30px;
-moz-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
-webkit-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
-o-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
}

माझा व्यवसाय याने पोट भरायचा उद्योग म्हणजे एक छोटीशी नोकरी. एका रासायनिक उद्योगात 'रासायनिक संयंत्र संवाहक' या पदावर मी १९८५च्या अखेरीस रुजू झालो. वयाची तिशी येईपर्यंत खरं तर माझा आजचा छंद मला गवसलाच नव्हता. आयुष्यात फार थोडा काळ शिक्षक व जास्त काळात मित्र म्हणून आलेल्या एका सद्गृहस्थामुळे वाचन या माझ्या छंदाला काही पैलू पडले. त्या वयात (९वी, १०वी) मी फक्त गुरुनाथ नाईक यांच्या रहस्यकथा वाचत असे. गोडबोले सरांनी सांगितलं, "अरे, सलग पुस्तक वाचू शकतोस हीच जमेची बाजू आहे. मी तुला काही पुस्तकं सुचवतो. ती वाचून पाहा." असं करता करता शिक्षणासाठी डोंबिवलीत आल्यावर त्या वेळच्या नगर वाचनालयाशी नाळ जुळली. मग खेडला गेल्यावर सरांकडून यादी आणायची आणि पुढील वेळी खेडला जाईपर्यंत ती पुस्तकं वाचून काढायची. खेडला गेल्यावर वाचलेल्या पुस्तकांविषयी सरांशी तासनतास चर्चा करायची, पुढील यादी घेऊनच सरांचं घर सोडायचं. नंतर तर डोंबिवलीतील नगर वाचनालयाचे एक कर्मचारी (बहुधा कुलकर्णी) मला वेगवेगळी पुस्तकं देऊ लागले.

असं करता करता एक दिवस गोनिदांचं 'दुर्गभ्रमणगाथा' हाती आलं. त्यात खेडजवळील चकदेव, पर्वत, नागेश्वर, रसाळगड, सुमार, महीपत गड या ठिकाणांच्या भटकंतीचे उल्लेख होते. तसंच माचीवरला बुधा, पवनाकाठचा धोंडी, त्या तिथे रुखातळी, कुणा एकाची भ्रमणगाथा इत्यादी पुस्तकांतून 'भटकंती' हे सूत्र सापडत गेलं.

तोपर्यंत नोकरीसाठी खेडला परतलो होतो. हाती बजाजची चेतकही आली होती, आणि गड-किल्ले साद घालू लागले होते. पण जोडीला खेडसारख्या गावात कोणी मिळत नव्हतं. एकेका मित्राला विनंती करून, तयार करून शेवटी एकदाचा पहिल्या ट्रेकचा बेत ठरला - 'चकदेव'. खेडच्या बाजारात या ठिकाणची काही मंडळी बाजारासाठी येतात, ही माहिती मिळाली. एक दिवस (पाल्या सोमवारी) मित्राच्या दुकानात ठिय्या मांडून बसलो. तेथे एक-दोन चकदेवकर बाजाराला येत असत. ('पाल्या' सोमवार म्हणजे साधारण आमावस्येच्या आसपास येणारा एक सोमवार, ज्या दिवशी शेतीची कामं न करता कोकणातील शेतकरी बाजारहाट वा इतर कामं करतात. पाल्या = पाळायचा असावे.) जणू चकदेवचा बुधाच भेटला असा आनंद झाला. गावकर्‍यांची भेट घेऊन मग एका शनिवारी चार गाड्या, आठ जण असे दुपारी आंबवली या गावी पोहोचलो. योगायोगाने आमच्या गावातील एक जण आंबवलीत आरोग्य सेवक म्हणून काम करत होता, त्याच्या खोलीसमोर गाड्या लावून त्याने दिलेला 'संतोष' नामक एक गाईड बरोबर घेऊन आम्ही चकदेवची वाट धरली. या पहिल्यावाहिल्या ट्रेकचे अनुभव हा एका वेगळ्या लेखाचा विषय होईल. असो, पण जो काय ट्रेक झाला, त्यानंतर आठातल्या दोघांनी परत या वाटेला (या छंदाच्या वाटेला) न जाण्याचा दृढ निर्धार केला व मी आणि उरलेल्यांनी ही वहिवाट करायची असं ठरवून खाली उतरलो.

असं करता करता खेड, चिपळूण, महाड, संगमेश्वर आदी परिसरातले सर्व किल्ले पाहून झाले. माझे खेडमधील सहकारी व्यवसायात असल्याने त्यांचा पाय सुटणं थोडं मुश्कील होऊ लागलं व 'पाहिलेलंच ठिकाण परत काय पाहायचं?' असाही प्रश्न त्यांना पडू लागला. मला मात्र वेगवेगळ्या ऋतूंत ते कसे दिसतील याचे वेध लागले होते. वाचनाची दिशाही बदलली... फक्त भटकंती, किल्ले या विषयावरचे लेख, पुस्तकं अधाशासारखी वाचू लागलो. या क्षेत्रात काम करणार्‍या संस्था, माणसं यांचा संपर्क व्हावा असं वाटू लागलं. मुंबईत गिरिमित्र संमेलन असा काहीसा प्रकार असतो ही एकदा माहिती मिळाली. मग एका 'गिरिमित्र'ला खेड ते मुंबई प्रवास करून हजेरी लावली. तेथे चक्रम हायकर्स मुलुंड, यूथ होस्टेल मुंबई, अंबरनाथ या संस्थांची माहिती मिळाली, माणसं भेटली आणि आपण फक्त वयाने वाढलो पण या क्षेत्रात बच्चे आहोत, याची जाणीव होऊ लागली. मग मुंबईकरांसाठी 'वन डे' असलेला ट्रेक माझ्यासाठी खेंडहून दोन-अडीच दिवसांचा होत असूनही जमेल तसे ट्रेक करू लागलो. ट्रेक करता करता ज्या गप्पा होत, त्यात हिमालयाची माहिती मिळत गेली. आता खेडला फोन आला होता. त्यामुळे ट्रेकची माहिती मिळणं थोडं सुलभ झालं होतं. काही काळाने इंटरनेटही आलं. मग तर माहितीचा प्रचंड ओघ सुरू झाला. वर्षातून एकदा ठरावीक मित्रांबरोबर सहकुटुंब एखादं राज्य, त्यातील प्रेक्षणीय स्थळं पाहायची आणि मग आपल्या आवडीची भटकंती करायची असा क्रम ठरून गेला. हे काही वर्षं नीट चाललं. आता मला हिमालय खुणावू लागला होता. मुलगीची दहावी झाल्यावर कुठेतरी जायचं असं ठरत होतं. मग मी, सौ., मुलगी, एका मित्राची मुलगी व भाची असे 'चंद्रखणी पास' हा हिमालयातील ट्रेक करायचं नक्की केलं. तो व्यवस्थित पार पडला आणि मी हिमालयाच्या प्रेमात पडलो. मग फुलांची दरी, अमरनाथ असे ट्रेक केले. सौ.ने पहिल्या हिमालय ट्रेकचा धसका घेऊन मला एकट्याला जायला पूर्ण मुभा दिली. मला ही पर्वणीच होती.

नशिबाने पोट भरायच्या उद्योगाने मला परत मुंबईत आणलं. पहिलं वर्ष मी एकटाच आलो. मग एक वीकेंड डोंगरात व एक खेडला, असा ट्रेकचा झपाटाच लावला. कधी 'चक्रम'बरोबर, तर कधी यूथ होस्टेल अंबरनाथबरोबर. पुढे सहकुटुंब मुंबईत आल्यावर यूथ होस्टेल अंबरनाथचा सक्रिय सभासद झालो. ह्या मित्रांनी मला खूप काही दिलं. मला एक-दोन ट्रेक्सनंतर त्यांनी कमिटीत सामावून घेतलं, या युनिटच्या हरेक उपक्रमात मीही सहभागी होऊ लागलो.

1
आता असं वाटू लागलं की आपल्याला हा छंद फार उशिरा गवसला, तरी आपलं जीवन याने समृद्ध केलं. जर किशोरवयात मुलाना हा छंद गवसला, तर त्यांना त्याचा कितीतरी फायदा होईल.

सुदैवाने अंबरनाथ युनिटमध्ये अशा स्वरूपाचे उपक्रम सुरू होतेच - उदा. मुलामुलींसाठी हिवाळी निसर्ग साहस शिबिर, मे महिन्यात दोभी येथील निसर्ग साहस शिबिर. या सर्व उपक्रमांत मी स्वयंसेवक म्हणून सहभागी होऊ लागलो.
मुलांच्या मुंबई-हिमालय-मुंबई या सर्व प्रवासाची जबाददारी सहकार्‍यांसमवेत पार पाडायची, आठ-दहा दिवस पूर्ण वेळ मुलांबरोबर व्यतीत करायचा; त्यांचे अनेक प्रश्न, त्यांची उत्तरं, त्यांचा उत्साह, त्याला शिस्तीची जोड हसतखेळत द्यायची, त्यांची दुखणी-खुपणी पाहायची, त्यांच्यासारखाच दमसास टिकवून रोज चालायचं आणि बर्फात गेल्यावर त्यांच्याइतकं लहान, निरागस होऊन निसर्गाचा सहवास अनुभवायचा, हा एक फार मोठा आनंदाचा ठेवा या छंदातून मिळत गेला. सर्वात जास्त आनंद केव्हा होतो, तर जेव्हा पालक सांगतात की "तुमच्या शिबिरात जाऊन आल्यापासून आमचा मुलगा/मुलगी बदलली." हे असं ऐकलं की आपण कुठेतरी योग्य जागी बीज पेरलंय याचं समाधान मिळतं.

आजकाल ट्रेकिंग या सर्वांगसुंदर छंदाला बदनाम करणार्‍या घटना घडताना ऐकल्या की काही वेळा खूप वाईट वाटतं. निसर्गाला समजून उमजून न घेता, निव्वळ घडीभर करमणूक करू इच्छिणारे नवशिके आणि त्यांची हौस, तोच आपला धंदा असं समजणारे आयोजक या छंदाला बदनाम करत आहेत.

पण त्याचबरोबर एखाद्या किल्ल्याच्या वाटेवर काही तरुण पण शिस्तबद्ध मंडळी भेटतात, तेव्हा आशाही वाटते की हे करतील काहीतरी नक्की. सुदैवाने असे अनेक तरुण गट आजही कार्यरत आहेत, ही मात्र जमेची बाजू आहे.

२

मला या छंदाने अनेक उत्तम माणसं भेटली, अनेक उच्चविद्याभूषित लोकांमध्ये, फारसं न शिकलेल्या माझ्यासारख्या माणसाची ऊठबस होऊ लागली. जगण्याकडे बघायचा एक आनंददायी दृष्टीकोन मिळत गेला. आरोग्याचं तर वरदानच लाभलं! सह्याद्रीच्या आणि हिमालयाच्या हवेने फुप्फुसं भरत राहिली अधूनमधून, की आजारपण, आळस आपल्या जवळपासही फिरकत नाहीत हा आत्मविश्वास मिळाला.

माझ्या संपर्कात येणार्‍या अनेकांना या छंदाची ओळख करून दिली. त्यात विविध वयोगटातली माणसं आहेत. कित्येक ज्येष्ठ नागरिकांचं एकटेपण या छंदातून दूर झालं. सोपे, सर्वांना करता येतील असे ट्रेक करण्याकडे आजकाल माझाही प्रयत्न असतो. गेली काही वर्षं पत्नीलाही या छंदाची लागण झाली आहे. मला शक्य नसेल तरी एखाद्या चांगल्या ग्रूपबरोबर माझ्याशिवाय ट्रेक करण्याचा आत्मविश्वास आलाय तिच्यात.

3
ट्रेकिंग या छंदाच्या जोडीने इतर अनेक छंद येतात, आकाशनिरीक्षण, पक्षी/प्राणिनिरीक्षण, वनस्पती, फुलं, वेली, झुडपं, कीटक, फूलपाखरं यांचं निरीक्षण व अभ्यास, छायाचित्रण असे अनेक जोडछंद ट्रेकरना असतात. ट्रेकिंग करताना भेटलेले अनेक सवंगडी यातील एक किंवा अनेक छंद जोपासणारे होते. मला लहानपणापासून झाडा-माडाची आवड होतीच. वनस्पतिशास्त्राचं औपचारिक शिक्षण झालं नाही, पण अनेक वृक्ष, वेली, झुडुपं ओळखता येतात. त्यांची शास्त्रीय नावं माहीत नसली, तरी त्यांची मराठीतील नावं व वैशिष्ट्यं माहीत होत गेली. मित्रांच्या साहाय्याने काही पक्षी, कीटक यांचंही ज्ञान मिळत गेलं. अनेक वृक्षांची वैशिष्ट्यं, त्यांचं पर्यावरणातील महत्त्व समजत गेलं. खेडमध्ये असताना दर वर्षी एक उपक्रम करत असे, तो असा - एखाद्या दुर्मीळ किंवा आपल्या परिसरात कमी होऊ लागलेल्या वृक्षाच्या बिया जमवायच्या, बहुधा ट्रेक करताना झाड पाहून ठेवायचं, त्या ठिकाणी पुन्हा जायचं जेव्हा बिया तयार होतात तेव्हा. त्या घरी आणून पिशव्यांमध्ये रुजवायच्या, पुढील पावसापर्यंत त्यांची देखभाल करायची आणि मग ज्याला हवं असेल त्याला मोफत रोप द्यायचं. बहावा, निव, सुरंगी, कडुनिंब, पळस, सीता अशोक अशा अनेक झाडांची अनेक रोपं करून ती वाटत आलो. या जोडछंदाने अनेक लोकांशी दृढ स्नेह झाला. अनेक वेळा एखादा फोन येतो आणि 'अमुक ठिकाणी एक झाड फुललं आहे नाव माहीत नाही, केव्हा जाता येईल तुला?' अशी विचारणा होते, मग वेळ काढून ते झाड पाहायचं... बहुधा परिचयाचं असतंच; नसलं तर फोटो काढून, पुस्तकं चाळून माहिती घ्यायची आणि शक्य असेल तर बिया मिळवून रोपं करायची.

सह्याद्रीत भटकताना अनेक अनुभव मिळाले. विशेषतः ग्रामीण जीवन जवळून अनुभवायला मिळालं आणि अनेक गावकर्‍यांशी परिचय होत गेला. माणुसकीचे अनेक पैलू दिसले. काहीही परिचय नसताना खेडुतांनी केलेलं आदरातिथ्य म्हणजे खास अनुभव आहेत. यातूनच मग कधी थोडं सामाजिक कामही झालं. चकदेवला अनेक वेळा वेगवेगळ्या ग्रूप्सबरोबर जात आलो, तेथील गावकर्‍यांशी स्नेह झाला. एकदा एका मित्राने सुचवलं की या लोकांना आपण घरघंटी देऊ या. तिथे वीज आहे, पण दळण दळून आणायचं, तर शिंदीत दोन तास जायला आणि दोन तास यायला लागतात. मग पाच-सहा जणांनी थोडे पैसे जमा केले, खेडमधील एका मित्राला चांगली घरघंटी खरेदी करायला सांगितली, गावकर्‍यांशी संपर्क साधून एक दिवस निश्चित केला. घरघंटी शिंदी गावापर्यंत गाडीने नेली. तिथून गावकर्‍यांनी कावडीसारखी उचलून शांताराम जंगम यांच्या घरात नेऊन ठेवली.

एखादा अपवाद वगळता सह्याद्रीत वाईट माणूस आढळला नाही. आपण शहरी लोक अनोळखी माणसाला घरात थारा देत नाही. पण या लोकांनी कधी पडवीत, कधी रिकाम्या गोठ्यात, कधी गावातल्या मंदिरात राहू दिलं. कधी शिधा असूनही आपल्याकडची भाकर खायचा आग्रह केला. कुमशेतला तर एक खास अनुभव आला. हरिश्चंद्र-कलाड-रतनगड असा ट्रेक होता. एक मुक्काम कुमशेत या गावात करायचं ठरलं होतं. गावात पोहोचेपर्यंत संध्याकाळ झाली. आमच्याकडे शिधा होता, पण आधी आसरा शोधू, मग चूल पेटवू असं ठरलं. ज्या घरात चौकशी केली, त्या घराचा मालक शहरात गेला होता. घरात मुलं व घरधनीण होती, आम्हाला पडवीत राहायला मिळेल असं मोठ्या मुलाने व आईने सांगितलं. आम्ही जेवण बनवण्याची तयारी करू लागलो, तोपर्यंत घरमालक आले. ते ऐकायला तयार होईनात. तुम्ही जेवण करू नका, आमच्याकडे जेवा; शेवटी आम्ही खिचडी करतो, ती आपण सर्वानी खाऊ व थोडी भाजी-भाकरी घेतो तुमच्याकडची अशी तडजोड झाली. त्या माउलीने आम्हा पाच जणांना एक चूल मोकळी करून दिली. त्यावर आम्ही खिचडी केली आणि त्या कुटुंबातील चार जण आणि आम्ही पाच असं एकत्र मस्त भोजन झालं.

एका आदिवासी पाड्यावरचा एक जण गडाची वाट दाखवायला आला. परतताना घरी घेऊन गेला. घरात दूध नव्हतं, पण कोरा चहा कसा द्यायचा, म्हणून हा निघाला शेजारून दूध आणायला. त्याला थांबवलं, "कुठे निघालात?" असं विचारलं, तर काही बोलेना. शेवटी बाजूला घेऊन गेलो, तेव्हा त्याने अडचण सांगितली. "अरे, आम्ही पितो कोरा चहा, तू कशाला लाजतोस एवढा?" असं सांगितल्यावर त्याला हायसं वाटलं.

लोणावळा ते भीमाशंकर ट्रेकला कुसूर पठारावर वाट चुकलो. शेवटी एक घर मिळालं. त्यात फक्त म्हातारबुवा, म्हातारी आणि बरीच लहान मुलं होती, त्यांनी पाणी दिलं. आम्ही मुलांना खाऊ दिला. आम्ही वाट चुकलो हे त्यांना सांगितलं. अंगात थोडा ताप होता म्हातारबुवांच्या. आम्ही खाणाखुणा विचारून घेतल्या व निघालो, तर म्हातारबुवा "वाघोबाच्या देवळापर्यंत येतोच" असं म्हणून घोंगडी खांद्यावर टाकून काठी घेऊन निघाले. नको नको म्हणालो, तरी आलेच वाट दाखवायला. असे कितीतरी अनुभव आले या भटकंतीत.

या छंदाचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेता आलं नाही, त्याचं कोणतंही प्रमाणपत्र आपल्याकडे नाही, याची खंत काही वेळा वाटते. पण एकंदर आनंदाच्या खात्यात जमाच जास्त आहे, याचं समाधान आहे.

4

५

6

प्रतिक्रिया

पैसा's picture

9 Sep 2016 - 9:56 am | पैसा

झपाटणारा छंद! लहान मुलामुलींसाठी ट्रेक आयोजित करून खूप महत्त्वाचे काम करत आहात. ते जास्त अवघडही आहे. ब्राव्हो!

अजया's picture

9 Sep 2016 - 9:56 am | अजया

लेख आवडला.

यशोधरा's picture

9 Sep 2016 - 9:58 am | यशोधरा

छान लेख.

बोका-ए-आझम's picture

9 Sep 2016 - 11:02 am | बोका-ए-आझम

आयडीमागची प्रेरणा उलगडणारा लेख आहे!

पी. के.'s picture

9 Sep 2016 - 11:46 am | पी. के.

मस्त लेख. आवडला

भटकीभिंगरी's picture

9 Sep 2016 - 1:46 pm | भटकीभिंगरी

खुप छान लेख.तुमच वनस्पती. फुले यान्चआन्णीन आणी निरिक्शण शक्ती छान आहे. असेच सुन्दर लेख यापुढे वाचायला मिळोत.

स्वाती दिनेश's picture

9 Sep 2016 - 3:39 pm | स्वाती दिनेश

लेख आवडला.
स्वाती

सस्नेह's picture

9 Sep 2016 - 3:42 pm | सस्नेह

भ्रमणगाथा आवडली...

खूप मस्त लिहिलय. हीच आवड असल्यामुळे खूप रिलेट झाला. चकदेव, सुमारगड पासून ते युथ हॉस्टेल अंबरनाथ पर्यंत सगळ ओळखीचं.
चकदेव ला आधी वर जायला वेलीची शिडी होती ते कुठेतरी पेपर मधे वाचून साधारण १० वर्षापूर्वी गेलेलो आम्ही. तेव्हा लोखंडी शिडी होती तिथे. तुम्हाला माहीत असेलच की कधी बदलली ते.

भ ट क्या खे ड वा ला's picture

9 Sep 2016 - 7:20 pm | भ ट क्या खे ड वा ला

नक्की कोणत्या साली बदललीय ते आठवत नाही. पण त्या शिडी ने गेलो आहे दोन वेळा.
गेली 10/12 वर्षे शिडीची वाट फार वापरात नाही, चकदेव ला राहणारे हि आता त्या वाटेला फिरकत नाहीत,फारसे. पूर्वी त्यांचे सर्व व्यवहार आंबवली या गावाशी असत , खेड ला जाण्यासाठी ही आंबवली खेड हि बस वापरत असत. आता रघुवीर घाट बारा महिने सुरु असतो ,त्यामुळे शिंदी या गावात उतरून तेथून बस पकडतात. आंबवली परिसरात राहणारे कुणी देवळात येणार असेल तर शिडी वापरतात, व ट्रेकर हि आंबवली मार्गे आले तर शिडी च्या वाटेने येतात , शिंदीतून चकदेव फारच सोपा आहे, मी ही कधी जातो तेव्हा शिंदी मार्गेच जातो, वर पोहोचल्यावर शिडी च्या टॉप ला जातो , तेथून सह्याद्री फार छान दिसतो.
मंदिर ते शिडी ह्या रस्त्यावर गव्यांनी (रानरेडे ) बरेच खड्डे केलेले दिसतात. माणसांचा वावर फारसा नसतोच,

आम्हीही शिंदीतून गेलेलो.
तुमची चकदेवची कथा येऊ द्या..

मुक्त विहारि's picture

9 Sep 2016 - 5:12 pm | मुक्त विहारि

आता भेटल्यावर परत एकदा बोलू (आपले गप्पा मारू) या...

वेल्लाभट's picture

9 Sep 2016 - 5:42 pm | वेल्लाभट

अफलातून!

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Sep 2016 - 9:52 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर लेख. छंदाबरोबर तुम्ही करत असलेला त्याचा सकारात्मक सामाजिक उपयोग खास आवडला !

सतिश गावडे's picture

9 Sep 2016 - 10:58 pm | सतिश गावडे

वाह... एका वेगळ्याच दुनियेत फिरवून आणलेत.

अभिजीत अवलिया's picture

10 Sep 2016 - 12:06 am | अभिजीत अवलिया

लेख आवडला.

पिलीयन रायडर's picture

10 Sep 2016 - 1:57 am | पिलीयन रायडर

लेख खुप आवडला. स्वतःच्या छंद जोपासत इतरांनाही त्यात जोडुन घेणे, विशेषकरुन तरुण मुलांना, ते फार कौतुकास्पद आहे!

छान लेख! जराही दर्पोक्ती न करता साधेपणा असल्यामुळे विशेष आवडला!

चाणक्य's picture

10 Sep 2016 - 4:41 am | चाणक्य

आवडला. ट्रेकिंग खरच भन्नाट प्रकार आहे.

प्रीत-मोहर's picture

10 Sep 2016 - 7:36 am | प्रीत-मोहर

असच सुरु राहुदेत तुमचे उपक्रम.

नाखु's picture

10 Sep 2016 - 10:37 am | नाखु

तुम्ही बाळक्डू देत असाल भटकंतीचे,(छायाचित्रातील मुले पाहून बरे वाटले)

मोबल्या-संगणकापासून लांब मुले खुल्या निसर्गातही आनंदी/उत्साही राहतात.

९परवानगी असेल तर या लेखाची स्थ्ळप्रत प्रिंट काढणार आहे.

मुक्त विहारि's picture

10 Sep 2016 - 12:13 pm | मुक्त विहारि

हो...ते देतात...

माझ्या धाकट्या मुलाला ट्रेकिंगसाठी त्यांनीच मार्गदर्शन केले आणि अद्यापही करतात.

भ ट क्या खे ड वा ला's picture

10 Sep 2016 - 9:38 pm | भ ट क्या खे ड वा ला

जरुर काढा .

भ ट क्या खे ड वा ला's picture

10 Sep 2016 - 9:38 pm | भ ट क्या खे ड वा ला

जरुर काढा .

भ ट क्या खे ड वा ला's picture

10 Sep 2016 - 9:38 pm | भ ट क्या खे ड वा ला

जरुर काढा .

भ ट क्या खे ड वा ला's picture

10 Sep 2016 - 9:38 pm | भ ट क्या खे ड वा ला

जरुर काढा .

प्रचेतस's picture

10 Sep 2016 - 10:53 am | प्रचेतस

लेखन आवडले.

अभ्या..'s picture

10 Sep 2016 - 12:28 pm | अभ्या..

एकदम खुश अशी बच्चे कंपनी दिसली. भारी वाटले.
मला फार आवडते हो असे चिल्लर पार्टीत दंगा करायला, च्यायला निदान ड्रॉईंग टिचर तरी व्हायला हवे होते.

स्रुजा's picture

10 Sep 2016 - 8:39 pm | स्रुजा

क्या बात है !! खुप साधा आणि मनाला भावणारा लेख. वाचुन खुप प्रसन्न वाटलं. बच्चा कंपनी तर एक नंबर !!

स्मिता_१३'s picture

20 Sep 2016 - 7:43 am | स्मिता_१३

भ्रमणगाथा आवडली.. प्रेरणादायी !!!

वाचायचा राहून गेलेला हा लेख! अतिशय आवडला! छान वाटलं वाचून :)