कृत्रिम पाउस
(१) पाउस का पडतो ?
सूर्याच्या उन्हाने पाण्याची वाफ होऊन ती आकाशात वर जाते. तेथे ती गार होते व वाफेचे रुपांतर परत पाण्यात होते व पाउस पडतो. ही माहिती शाळेत मिळालेली असते. यात थोडी भर घालावयास पाहिजे.
(२) वाफ गार झाली तरी पाण्यात रुपांतर होतांना न्युक्लिएशनची गरज असते. प्रथम वाफेच्या एका अतिशय छोट्या भागाचे पाण्याच्या एका फार छोट्या थेंबात रुपांतर होते. मग त्या भोवती इतर पाणी गोळा होते व तो थेंब मॊठा होतो. हा मोठा थेंब हवेहून जड झाला की तो खाली घसरू लागतो. असे अनेक मोठे थेंब खाली पडू लागले म्हणजे पाउस पडतो.
(३) म्हणजे दोन गोष्टींची गरज आहे. (१) न्युक्लिएशन व (२) थंड तापमान. आता या दोन्हींची माहिती घेवू.
(४) न्युक्लिएशन रसायनशास्त्रातील बर्याच ठिकाणी वापरली जाणारी गोष्ट आहे. उदा. मीठाच्या संपृक्त द्रवातून
मीठ मिळवावयाचे असेल त्यात थोडे मीठाचे बारीक कण टाकून ढवळले की काम झटकन होते. याला सीडिंग म्हणतात.
(५) भांड्यात पाणी घेवून ते गरम केले की प्रथम भांड्याच्या तळाशी लहान लहान बुडबुडे निर्माण होतात. जास्त उष्णता मिळाली की ते मोठे होतात व पाणी उकळू लागते. इथे वाफेमुळे बुडबुडे तयार झाले व वर येवू लागले. पावसाच्या बरोबर उलटी क्रीया. इथे भांड्याच्या आतील भागातील micro unevenness न्युक्लिएशनचे काम करतो.
(६) आता तापमानाकडे वळू. सगळी वाफ काही एकदम पार उंचावर जात नाही. काही इतकी वर गेलेली असते की तेथे पुरेसा गारवा असतो. पण काही इतक्या उंचीवर पोचली नसली की पाण्यात रुपांतर होण्याइतके कमी तापमान तीला मिळत नाही. अशा वाफेचा पाउस पडू शकत नाही.
(७) जर तुमच्या डोक्यावरून काळा ढग जात आहे पण पाउस तर पडत नाही असे असेल तर तेथे वरील दोन गोष्टींपैकी एकही नाही असे म्हणावयास हरकत नाही.
(८) कृत्रिम पाउस म्हणजे आपणच या गोष्टी तेथे पोचवून पाउस पडेल अशी तयारी ढगांना करून द्यावयाची. मोटारचे इंजीन सुरू होत नसेल तर धक्का मारून आपण गाडी चालू करतो ना, तसेच.
(९) प्रथम न्युक्लिएशन कडे पाहू. सिल्वर आयोडाईडचे बारीक स्फटिक प्रथम वापरण्यात आले. ढगात हे पसरविण्याकरिता विमानातून फवारणी करण्यात आली. प्रयोग यशस्वी झाले पण १०० टक्के नाहीत. मग जास्त संशोधन करून ढगांचे वर्गीकरण केले. काही ठराविक प्रकारचे ढग तुम्हाला उपयोगी पडतात.
(१०) चांदी फारच महाग. इतर स्वस्त पदार्थ, उदा. मीठ, वापरूनही पाउस मिळू शकेल. प्रयोग चालू आहेत.
(११) विमानाचा खर्चही कमी नाही. रॉकेटचा उपयोग खर्च कमी करण्याचा एक मार्ग. प्रयोग चालू आहेत.
(१२) आता तापमानाकडे वळू. कमी तापमान मिळवण्याचा एक मार्ग म्हणजे dry ice ( solid CO2, temp.-40 degree cel) वापरावयाचा. महाग आहे, पण फार नाही, परवडणारा पदार्थ. प्रयोग चालू आहेत. यशस्वी झाले की नाहीत, मला नक्की माहिती नाही.
(१३) आणखी एक शक्यता म्हणजे न्युक्लिएशन करिता इतर पदार्थ, उदा. अतिशय बारीक धातू कण वापरून पाहणे.
(१४) याचे प्र्योग जगभर चालू आहेत. चीनने ऑलिंपिक स्पर्धांच्या वेळी खेळ सुरू होण्याआधी कृत्रिम पाउस पाडून आकाश मोकळे केरून घेतले होते.
(१५) भारतात प्रयोग चालू आहेत. विमान व रॉकेट दोहोंचाही उपयोग केला गेला. निकाल निर्नायक नाहीत.
(१६) महाराष्ट्रातही विमानाचा उपयोग करून काही प्रयोग केले गेले. फारसा उपयोग झाला नाही. या विमानात बसून मंत्रिमहोदयांनी सफरही केली! (त्यामुळे तर पाउस पडला नाही ना ?)
(१७) महाराष्ट्रात डॉ. मराठे यानी "वरुण यंत्र " याचा शोध लावला. फार सोपे व जवळजवळ बिनखर्चाचे. एका शेगडीत कोळसे-लाकडे पेटवा. त्यात मीठ टाका. मीठ वर ढगात जाईल, पाउस पडेल. "सकाळ"ने बरेच प्रोत्साहन दिले होते. फालतूकपणा. लवकर गारठले.
श्री. शान्तिप्रिय याच्या शंकांचे समाधान झाले असावे. श्री, शान्तिप्रिय, निराळा धागा काढल्याबद्दल माफ करा. प्रतिसाद न देता वेगळा धागा काढावयाचे कारण
(१) या विषयावर तीन वर्षांपूर्वी "उपक्रम: वर चर्चा झाली होती. त्या वेळेपासून माझ्या मनात काही तरी करावे असे घोळत होते.
(२) कमी खर्चात काही प्रयोग करावे असे वाटत आहे. प्रयोग असे :
(३) न्युक्लिएशन करता मीठ व धातूची पावडर वापरणे.
(४) रॉकेट ऐवजी दिवाळीतले आतषबाजीचे बाण वापरावयाचे.
(५) यात अल्युमिअमची पावडर असते. ती उंच जावून सगळीकडे पसरते. पावडर न्युक्लिएशनचे काम करेल काय ?
(६) या पावडरवर मीठाचा पातळ थर देवून फरक पडतो का ते पहावयाचे.
(७) बाणावर ड्राय आइसची पुडी ठेवून त्याचा उपयोग होतो का ते पहावयाचे.
मित्र हो, वयोमानामुळे, दरिद्री माणसाच्या मनोरथांप्रमाणे हे मनातच विरून गेले. पण येथील तरुण, उत्साही सभासद काही मदत करू शकतील का ? आपण पावसाळ्यात दोंगरदर्यात सहली काढता. तिथे ही रॉकेट्स उडवून पहावयाची. बस. रॉकेट्सचा खर्च मी करावयास तयार आहे. धन्यवाद.
शरद .
प्रतिक्रिया
19 Jun 2016 - 8:16 pm | खेडूत
महत्वाचा विषय आहे. आजच पेपरात वाचले की चीन १९५८ पासून यशस्वीपणे हे करत आहे. त्यांच्या तज्ञांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मदत आणि प्रशिक्शण करायची तयारी दाखवली आहे.
आपन अजून जास्त सविस्तर लिहायला हवे होतेत असे वाटते.
रॉकेट म्हणजे नक्की काय?
ते कसे बनवावे?
त्याचा खर्च/ वजन किती?
उडवायला कसले बाण वापरता येतील? दिवाळीतले फटाके?
ढगांचे प्रकार कसे ओळखायचे?
त्यानुसार किती रॉकेट्स वापरून कोणत्या ढगातून किती पाऊस पडेल?
तरुणांनी मदत करायची म्हणजे नक्की काय? कोणत्या महिन्यात?
आपण पाडला की आपोआप पडला हे कसे ओळखता येईल?
सरकारी आणि खासगी विमाने हे करूओ शकतील का? जर शक्य असेल तर मग सरकार त्यातून का प्रयत्न करत नाही?
अजून खूप प्रश्न आहेत...