एप्रिलअखेरचे दिवस. उन अगदी रणरणतंय. अशाच एका पेटत्या दुपारी मी पेडगावला पोहोचतोय. छत्रपती शिवाजी महाराजांनी औंरगजेबाचा सेनापती बहादूरखानाला हूल देऊन वेड्यात काढल्यापासून पेडगाव जास्तच प्रसिद्धीला आलंय. ह्या पेडगावनं थोरल्या महाराजांच्या मृत्युनंतर केवळ नऊ वर्षातच एक दुर्दैवी घटना पाहिलीय. ह्याच बहाद्रूरखानाच्या किल्ल्यात, बहादूरगडात संभाजी महाराजांना विदूषकासारखी टोपी घालून तसेच त्यांचे दोन्ही हात लाकडी फळ्यांना बांधून त्यांची धिंड काढण्यात आली. त्यानंतर येथेच तापती सळई खुपसून डोळे काढण्यात आले तसेच तरवारीने जीभ छाटण्यात आली. काहीच दिवसांनी तुळापूर येथे त्यांची क्रूर हत्त्या करण्यात आली. हा बहादूरगड महाराष्ट्रातील सर्वात दुर्दैवी घटनांचा साक्षीदार आहे.
अर्थात पेडगावचा इतिहास काही बहादूरखानापासून सुरु होत नाही. त्याने येथे मजबूत कोट बांधला हे खरे पण त्यापूर्वीही येथे एखादा किल्ला अस्तित्वात असावा असे मला वाटते. तसे काही अवशेष येथे मिळत नाहीत हेही खरे पण प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेली पाच देखणी मंदिरे येथे आहेत. ह्या मंदिरांमुळेच पेडगावचा इतिहास शिवकाळाच्याही आधी सुमारे चारशे ते पाचशे वर्षे मागे जातो ते थेट यादवकाळात. ह्या जवळपास आठशे ते नऊशे वर्षे जुन्या असलेल्या ह्या मंदिरांना भेट देण्यासाठीच भर उन्हात मी येथे दाखल झालोय
पेडगावला येणे तसं जिकिरीचं काम. स्वतःच वाहन असल्याशिवाय येथे येण्यास पर्याय नाही. पुणे- हडपसर -पाटस - दौंड आणि ह्यापुढे अजणूज मार्गाने पेडगाव गाठता येतं. दौंड अजणूज मार्ग बराच खराब आहे. नगरवरुनही येथे श्रीगोंदे - पेडगाव ह्या मर्गाने येता येतं.
बहादूरगड तसा विस्तीर्ण पसरलेला भुईकोट. अगदी दूरवरुनही गडाच्या भक्कम भिंती दिसत राहतात. गडाचं मुख्य प्रवेशद्वार अगदी पेडगाव संपता संपता आहे. द्वाराच्या शेजारीच हनुमानाची दिड पुरुष उंच देखणी मूर्ती आहे.
कोटाच्या वेशीतनं आत आल्याआल्याच सर्वात पहिलं लागतं ते ग्रामदैवत भैरवनाथाचं मंदिर. हे ही मंदिर तसं बरंच जुनं. साधारण ८०० वर्षांपूर्वीचं. मंदिराला आज आधुनिक साज चढवला आहे पण त्याचं मूळपण लपत नाही. मंदिराच्या आवारात असंख्य स्तंभ, मूर्ती, मुखवटे, सतीशिळा विखुरलेल्या आहेत.
---
---
भैरवनाथ मंदिर हे मूळचे शैव मंदिर असावे असे तिथल्या द्वारशाखांवरील शैव प्रतिहारींमुळे सहजी लक्षात येते. अर्थात आजही ते शैव मंदिरच आहे. पण मंदिरात आज जी भैरवनाथाची मूर्ती आहे ती मूळची विष्णू मूर्ती आहे. मूर्तीभंजकांनी मूळचे शिवलिंग उद्ध्व्स्त केले असावे आणि नंतर स्थानिकांनी येथीलच एका अप्रतिम विष्णूमंदिरातील मूर्ती येथे भैरव म्हणून स्थापित केली असावी. शेंदराच्या जाड थराआड मूर्तीचे बाह्यरूप पूर्णतः लपून गेले आहेत. तरीही तिच्या हातातली शंख, चक्र, गदा, पद्म ही विष्णूमूर्ती लक्षणं लपत नाहीत.
---
भैरवनाथाचा सभामंडप वैशिष्ट्यपूर्ण आहे. इथल्या स्तंभांवर भातवाहक यक्ष आहेत तर स्तंभाच्या मध्यचौकडीतही भयानक चेहर्याचे यक्ष आहेत. इथली यक्षांची चेहरेपट्टी पाहून मला हे शिल्पकाम तसं नंतरचं वाटतं. हे मंदिर यादवकालीन आहेच ह्यात काहीच शंका नाही पण तरीही इथे नंतरच्या काळात काही संस्करणे झाली असावीत असं मला वाटतं. कदाचित स्तंभमध्यांवर ही शिल्पे नंतरच्या काळात कोरली गेली असावीत. एकूणातच मूळच्या शिल्पांवर झालेले रंगकाम, त्यांचे चितारलेले डोळे ह्यांमुळे ही यक्षशिल्पे जास्तच विकृत आणि बटबटीत दिसतात.
---
---
---
सभामंडपाच्या छतावर कमळाची अप्रतिम नक्षी आहे. जवळपास सर्वच मध्ययुगीन मंदिराच्या छतांवर असे कोरीव काम नेहमीच दिसते. ह्या कमळाच्या सर्व बाजूने शिल्पपट आहेत ह्यात विविध वादक, गंधर्व आदींच्या मूर्ती साकारल्या आहेत.
---
संभामंडपातच एका स्तंभाच्या मध्यावर लज्जागौरीचं शिल्प कोरलेलं आहे. लज्जागौरी म्हणजे मातृदेवता. स्त्रीच्या प्रजनन शक्तीचे प्रतिक. लज्जागौरी शिरोविहिन म्हणजे शिराच्या जागी कमळाची आकृती आणि शिरासहही आढळते. शिरोविहिन मूर्ती खाली दक्षिणेत आहेत. मी अद्याप तशी एकही मूर्ती प्रत्यक्ष पाहिली नाही. ह्या मूती असभ्य समजून त्या भग्न केल्या गेलेल्या असाव्यात कदाचित ह्याचमुळे ह्या मूर्ती बघायला मिळणे हे खूप दुर्लभ आहे. मी पाहिलेल्या दोन्ही मूर्ती शिरसह आहेत. वेरुळच्या क्र. २१ च्या रामेश्वर लेण्यात लज्जागौरीची एक अप्रतिम मूर्ती आहे. तशाच प्रकारची पण थोडीशी वेगळी मूर्ती पेडगावच्या ह्या मंदिरातील स्तंभावर आहे. ह्या नग्न मूर्तीच्या दोन्ही हातात सर्प असून ते तिच्या योनीतून निघालेले आहेत. सर्प हे पुरुष इद्रियाचे प्रतिक मानले जाते.
मंदिराच्या आजूबाजूला झाडोर्यांत पूर्वीच्या देखण्या मंदिराचे कित्येक अवशेष आढळतात. आज ते पूर्णपणे अनास्थेच्या गर्तेत आहेत. कधी ब्राह्मणी दिसते तर कधी गजांतलक्ष्मी,
---
पेडगावच्या बहादूरगडाचा हा संपूर्ण परिसरच आज ओसाड आहे. वेड्या बाभळीचं गच्च रान माजलंय इथं. प्रत्येक पाऊल अगदी संभाळून टाकावं लागतं. विशेषतः भर उन्हाळ्यात जसा आज मी येथे आहे हा परिसर पूर्णपणे उजाड, वैराण होतो. जागोजागी खुरटी काटेरी झुडपी आहेत. चालण्यात जरा दुर्लक्ष झालं तर इथल्या टोकदार काट्यांनी तुम्हाला ओरबाडलंच असं समजा. तरीही ह्या काट्याकुट्यांनी भरलेल्या वाटेतच अजून दोन लहानशी पण अप्रतिम मंदिरे येथे आहेत. ती म्हणाजे रामेश्वर आणि मल्लिकार्जुन. अर्थात नावात काय आहे, पण गावकरी ह्यां मंदिरांना ह्याच नावाने ओळखतात. ही दोन्ही मंदिरे आज पूर्ण भग्नावस्थेत आहेत तरीही त्यांचे देखणेपण आजही लपत नाही.
रामेश्वर मंदिर म्हणजे मुखमंडपातील चार स्तंभ आणि छतावर केवळ दगडांचा डिगारा ह्याच अवस्थेत दिसते. मंदिराची मूळची शैली कुठली काहीही अदमास घेता येत नाही.
पेडगावच्या आख्ख्या कोटात मला केवळ एकच वीरगळ दिसला तो ह्या रामेश्वर मंदिराच्या पुढ्यात. कदाचित पुष्कळ वीरगळ येथे असावेत पण बहादूरखानाच्या कारकिर्दित हे सर्व नष्ट झाले असावे.
ह्याच्यानंतर काट्याकुट्यातूनच चालत गेल्यास अजून एक मंदिर लागते ते म्हणजे मल्लिकार्जुनाचे. ह्या मंदिराचा विस्तार मोठा आहे रामेश्चरासारखेच हे भग्न मंदिर. येथेही छतावर मोठमोठे दगड रचलेले आहेत. ह्या मंदिराला त्रिदल गाभारा असावा असे ह्याच्या बाह्य रचनेवरुन वाटते.
आता मल्लिकार्जुन म्हणजे पार्वती आणि शिव. ह्या मंदिरात शिवलिंगही आहे. मात्र मूळ मंदिर हे शिवपार्वतीचे नाही. हे मंदिर आहे विष्णूचे. आता हे ओळखायचे कसे? तर ते तसं सोपं आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस शिरोभागी विदारण नरसिंहाच्या मूर्ती आहेत. विदारण नरसिंह म्हणजे आपल्या मांडीवर हिरण्यकश्यपूला आडवा पाडून त्याचे पोट फाडणारा नरसिंह. नृशिंह मूर्तींचे विविध प्रकार आहेत. स्थौण नृसिंह जो स्तंभातून प्रकट होऊन उभ्यानेच हिरण्यकश्यपूशी लढत असतो, ल़क्ष्मी नृसिंह जो लक्ष्मीसहित असतो, योगनरसिंह जो योगमुद्रेत असतो, केवल नरसिंह जो नुसताच बैठ्या अवस्थेत असतो. ह्यापैकी सर्वात प्रसिद्ध म्हणजे विदारण नृसिंह.
द्वारानजीक महावीर आणि गणेशमूर्ती ठेवलेल्या आहेत. राष्ट्रकूट, चालुक्य, शिलाहार, यादव ह्या सर्वच राजवटींचा जैन धर्माला देखील राजाश्रय होता. ह्या राजवटींनी कित्येक जैन मंदिरे देखील बांधलेली आहेत. तसेच ह्यांच्या हिंदू मंदिरांत देखील कित्येकदा महावीर, गोमटेश्चर, बाहुबली, पार्श्वनाथ अशा जैन मूर्ती कोरलेल्या दिसतात.
ह्या मंदिरात पाकोळ्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर आहे. जरा गाभार्यात पाऊल टाकावं तर पाकोळ्या फडफडत उडून जातात. इकडे कुणीच येत नसल्याने हे त्या पक्षांचं आश्रयस्थान बनल्यास त्यात नवल नाही.
ह्या मंदिराच्या पुढेच मुघलकाळातील एक मोट बांधून काढलेली दिसते. आज ही सुद्धा भग्नावस्थेत आहेत. विटांचं उंच बांधकाम, त्याच्या पुढ्यात मोटेचं काम आणि खाली हौद अशी त्याची रचना.
ही तीन मंदिरं पाहून आणि ह्या मोटेच्या पुढून सरळ चालत गेल्यावर इथलं सर्वात मोठं आश्रय लागतं. एक नव्हे दोन अशी अत्यंत देखणी मंदिरे. त्यातलं सर्वात प्रसिद्ध आहे ते इथलं लक्ष्मीनारायणाचं मंदिर. अतिशय सालंकृत. कोरीवकामानं गच्च भरलेलं. निर्विवादपणे सुंदर असं.
त्याविषयी पुढील भागात.
क्रमशः
प्रतिक्रिया
12 Jun 2016 - 9:34 pm | राजकुमार१२३४५६
नेहमी सारखाच अभ्यास पूर्ण लेख.
फोटो पण छान
12 Jun 2016 - 9:43 pm | उल्का
सर्व फोटो सुंदर आले आहेत.
पुढील भाग वाचण्यास उत्सुक.
13 Jun 2016 - 2:03 pm | पद्मावति
सुंदर! पु.भा.प्र आहे.
13 Jun 2016 - 2:32 pm | संजय पाटिल
अतीशय माहितीपुर्ण लेख.
लक्ष्मीनारायण मंदिराच्या प्रतिक्षेत ...
13 Jun 2016 - 2:45 pm | प्रसाद गोडबोले
प्रिय मित्र वल्ली सर
स.न.वि.वि.
अत्यंत माहीतीपुर्ण आणि अभुआसु वृत्तीने लिहिलेला लेख आवडला. आपण महाराष्ट्राचा कानाकोपर्यात जाऊन ह्या ऐतिहासिक वारशाची माहीती जमवत आहात आणि नुसते इतकेच नव्हे तर त्याचे असे डीजीटलायझेशन करत आहात हे अत्यंत कौतुकास्पद आहे , तसेच मुर्ती पाहुन , तिच्या वैषिष्ठ्यांवरुन मुर्ती ओळखण्याचे आपले अध्ययन आणि कौशल्य वाखाणण्या जोगे आहे .:)
बाकी इतरांनी सुचवल्या प्रमाणे पुस्तक लिहिण्याचे अन पी एच डी साठी प्रबंध लिहिण्याचे मनावर घ्यावे ही णम्र बिनंती .
पुढील कार्यासाठी शुभेच्छा !
कळावे , लोभ असावा.
आपला विनम्र
मार्कस ऑरेलियस
Vi veri universum vivus vici
13 Jun 2016 - 4:30 pm | सूड
गिर्जाकाकूसने आयडी बदलला?
13 Jun 2016 - 3:14 pm | मार्गी
अतिशय जोरदार लेख आणि पोटो! खूप खूप धन्यवाद!
13 Jun 2016 - 3:45 pm | जगप्रवासी
कुठे कुठे फिरता आणि आम्हाला देखील सफर करवून आणता. तुमच्यामुळे आता प्रत्येक दगडी कोरीवकाम निरखून पाहायची आणि समजून घ्यायची सवय लागली आहे. साष्टांग दंडवत स्वीकारा आणि हो पुस्तकाच खरच घ्या मनावर आपल्या मिपावरच सहज खप होईल.
13 Jun 2016 - 4:06 pm | अत्रुप्त आत्मा
ल्लूल्लूल्लू !
दोन वर्षानी लिवला ल्येख.!
13 Jun 2016 - 6:43 pm | प्रचेतस
३ वर्षांनी. २७ एप्रिल २०१३. अर्थात ती पहिली भेट. त्यानंतरही ३ वेळा परत जाणं झालं :)
13 Jun 2016 - 6:36 pm | चांदणे संदीप
सिद्धूला मोड आला : "भई, तेरा कमाल तू जाने, मुझे तो सब कमाल लगता है! ब्रूह्हा!" सिद्धूचा मोड गेला!
अवांतर: मला तर पेडगाव फक्त वेड घेऊन जाण्यासाठीच असते असे वाटत होते!
Sandy
13 Jun 2016 - 6:53 pm | चौकटराजा
झाडोर्यात पडलेले अवशेष पाहून मन विषण्ण झाले. हाच जर भारत देश नसता तर या मंदिरांचे पुनर्वसन ( रेस्टोरेशन) नक्की झाले असते. असो . लेख चांगलाच आहे. चित्रेही मस्त . पहिले व शेवटचे चित्र जास्त मस्त.
13 Jun 2016 - 6:55 pm | अभिनव
छान लेख.
13 Jun 2016 - 7:18 pm | स्पा
मस्तच
13 Jun 2016 - 8:10 pm | रमेश आठवले
-औंरगजेबाचा सेनापती बहादूरखानाला हूल देऊन वेड्यात काढल्यापासून पेडगाव जास्तच प्रसिद्धीला आलंय.-
वेड घेऊन पेडगावला जाणे या म्हणीचा उगम कसा झाला हे येथे समजले. त्याची सविस्तर कथा कोणी उलगडून सांगितली तर बरे होईल .
13 Jun 2016 - 9:57 pm | अभिनव
+१
13 Jun 2016 - 11:14 pm | प्रचेतस
राज्याभिषेकानंतर महाराजांनी पेडगावची लूट केली.
हंबीररावांनी आपल्या सैन्याचे दोन भाग केले. सैन्याचा अल्पसा भाग आधी पेडगावच्या कोटावर चालून आला. हे पाहून बहादूरखानाने कोटातले सगळे सैन्य मराठ्यांच्या मागे लावले. मराठ्यांच्या ह्या तुकडीने पळ काढल्याचे दाखवत बहादुरखानाच्या सैन्याला पेडगावपासून दूर नेले, हीच संधी साधून दुसऱ्या तुकडीने पेडगाववर हल्ला करून जवळपास १ कोटीचा खजिना आणि कित्येक अरबी घोडे लुटले.
अजून एक घटना म्हणजे (मला हे नेमकं कधी घडलं ते आठवत नाही - बहुधा आग्र्याहून सुटकेनंतर) महाराजांनी बहादूरखानाशी तह केला व काही किल्ले द्यायचे वचन देऊन औरंगजेबाच्या मान्यतेच्या फर्मानाची मागणी केली. यथावकाश ७/८ महिन्यांनी औरंगजेबाचे फर्मान बहादूरखानाकडे आले तेव्हा किल्ले घेण्यासाठी महाराजांकडे वकील पाठवला. तेव्हा महाराजांनी कोण तुम्ही, तुमचा पराक्रम काय असे म्हणून वेड्यात काढले. ह्या दरम्यानच्या काळाचा उपयोग त्यांनी राज्य स्थिरस्थावर करण्यासाठी केला.
13 Jun 2016 - 8:10 pm | दुर्गविहारी
नेहमीप्रमाणेच अतिशय उत्क्रुष्ठ लेख. पेडगावचा किल्ला पाहीला होता, पण मन्दिराविषयी फार माहिती नव्हती. खरे तर याच धाग्याची प्रिन्ट आउट काढून माहितीपत्रक म्हणून किल्ल्यात उपलब्ध करायला हवी. पु. भा. प्र.
13 Jun 2016 - 9:54 pm | मुक्त विहारि
पुभाप्र.
स्वगत : ह्या वल्ली बरोबर भारतभ्रमणच करावे लागणार.अर्थात सुरुवात आणि शेवट मात्र वेरूलळाच.
13 Jun 2016 - 10:23 pm | डॉ सुहास म्हात्रे
नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण आणि उत्तम प्रकाशचित्रांमुले अजूनच देखणा असलेला लेख.
पुभाप्र.
13 Jun 2016 - 11:20 pm | रातराणी
छान लेख. रखरखीत उन्हातले भग्न मंदीरांचे फोटो पाहून कसंसच झालं.
14 Jun 2016 - 12:04 am | एस
उत्तम लेख. वरील रामेश्वरच्या मंदिराच्या गाभार्यात आम्हांला कुत्र्याचा कित्येक दिवसांपासून सडत पडलेला मृतदेह आढळला होता. यावरूनच हे स्थान किती दुर्लक्षित आहे हे लक्षात येते. भैरव मंदिराला अजूनच रंगरंगोटी चढलेली दिसतेय.
पुढील भागातील लक्ष्मीनारायणाच्या अत्यंत देखण्या अशा मंदिराच्या माहितीच्या प्रतीक्षेत.
बादवे, बहादूरगड हे नाव तिथल्या लोकांना अपमानास्पद वाटतं. ते त्या किल्ल्याला पेडगावचा किल्ला असे म्हणतात. बहादूरखानाने पळून जाण्याआधी काय पराक्रम गाजवला असेल तर पेडगावच्या किल्ल्याला स्वतःचे नाव दिले. :-)
14 Jun 2016 - 7:01 am | दीपा माने
नेहेमीप्रमाणेच माहीतीपुर्ण आणि अभ्यासपुर्वक लिखाण असल्याने वाचुन लेख साठविला आहे. आपल्या हातून सतत असे लिखाण होत रहो अशी ईच्छा करते.
अनेक शुभेच्छा!
14 Jun 2016 - 8:46 am | कंजूस
अप्रतिम.
14 Jun 2016 - 12:00 pm | हकु
नेहमीप्रमाणेच सुंदर आणि उपयुक्त माहिती.
तुमच्या लिखाणामुळे इतिहासाकडे बघण्याचे निरनिराळे दृष्टीकोन सापडत जातात.
धन्यवाद!
14 Jun 2016 - 5:10 pm | नीलमोहर
पेडगावची कहाणी माहिती नव्हती, बहादूरगडाचा इतिहास वाचून अंगावर काटा आला. एकूणच या ठिकाणाहून येणार्या नकारात्मक लहरी, इथली अनावस्था, ते नंतर केलेले बटबटीत रंगकाम इ.मुळे इथे जाण्याची इच्छा होईलसे वाटत नाही.
14 Jun 2016 - 11:52 pm | यशोधरा
माहितीपूर्ण लेखाबद्दल आभार. दुसरा भाग लवकरात लवकर लिहावा.
रंगकाम भयानक वाटते आहे आणि स्थानही दुर्लक्षित दिसते आहे! :(
15 Jun 2016 - 1:00 am | खटपट्या
नेहमीप्रमाणे माहीतीपुर्ण लेख. शेवटचे चित्र पाहून पुढच्या लेखाची वाट पहातोय. मी वल्ली यांचे सर्व लेख प्रींटआउट काढून ठेवत आहे.
15 Jun 2016 - 2:31 am | निशाचर
शेवटचा फोटो तर खासच. लक्ष्मीनारायण मंदिराबद्दल वाचायची उत्सुकता आहे.
16 Jun 2016 - 12:30 am | रुपी
अरे वा! छान माहिती.
तुमचे मंदिरांविषयीचे सर्वच लेखन अतिशय माहितीपूर्ण असते. कधी वेळ मिळाल्यास, तुम्हाला ही आवड आणि एवढी माहिती कशी मिळाली त्याबद्दलही लिहाल का?