नमस्कार,
मिसळपाव वरील लिखाणाचा पहिलाच प्रयत्न... तेव्हा शीर्षकापसुनच सुरुवात करावी असे वाटले..
मिसळपाव... आपले राज्यखाद्य..!!
मिसळपाव.. महाराष्ट्रात सर्वत्र मिळणारा पदार्थ.. मिळेल सगळीकडे..पण सर्वत्र त्याची विविध रूपे पहावयास मिळतात... फरक पडतो तो मुख्यतः ३ गोष्टीनी.. फरसाण , रस्सा आणि पाव...
ज्या मिस्सळ प्रसिद्ध आहेत.. त्यांच्या कडील फरसाण त्यांच्या मिसळी मधेच छान लागेल. एके ठिकाणच फरसाण आणि दुसरी कडचा रस्सा असा प्रयत्न केला तर भट्टी काहीतरी चुकल्या चुकल्या सारखी वाटेल, जरी दोन्ही ठिकाण मिसळी साठी प्रसिद्ध असतील तरीही...
रस्सा.. यातही विविध रूपे पाहायला मिळतात ती त्यामधील साहित्यांनी.. मटकी, मुग, वाटाणे, हि त्यामधील काही सर्वपरिचित रूपे.. याशिवाय हरबरे, मसूर, चवळी हे सुद्धा क्वचित पहावयास मिळतील...
पाव.. यामध्ये प्रकार नाही तर विविध आकार मिळतात.. आणि अगदी नकोसा वाटतो तो म्हणजे गोड पाव.. ज्याला थोडी गोड चव असते (कोल्हापूर बाजूला खावा लागतो ;) याने तिखट मिसळीची रंगत थोडी का होईना पण कमीच होते...
आता सर्वात मुख्य भाग राहिला तो म्हणजे तर्री...
तर्री... कट... सेम्पल... हि काही दर्दी लोकांनी दिलेली नावे..
मिस्सळ हा पदार्थ तिखटच खावा...आणि त्याला ती रंगत मिळवून देते तर्री...
बहुतांश मिसळी ची प्रसिद्ध ठिकाणे त्यांच्या तर्री मुळेच प्रसिद्ध आहेत यात शंका नाही...
हि झाली थोडक्यात ओळख... आता जरा मिस्सळ आणि आमचे नाते...
आम्ही मित्र चहा प्रमाणेच मिस्सळ ने सुद्धा बांधलो गेलो आहोत... शनिवार रविवार प्लान फिक्स ..
कॉलेज ला असता आठवड्यात तीनदा मिस्सळ खाणारे आम्ही खवय्ये...
आणि यासाठी कल्याण ला उत्तमोत्तम मिस्सळ ची ठिकाणे आहेत...त्यातली चार अत्यंत प्रसिद्ध..
एकाच शहरात असूनही चारही जणांचे रस्सा तर्री तर सोडाच फरसाण व शेव सुद्धा निरनिराळी...
एक गाडीवर मिस्सळ विकणारा ' हरी विठ्ठला पांडुरंगा ' तर दुसरा सर्वांचा लाडका 'जन्या'.... महाग असूनही लाईन मध्ये उभे करत मिस्सळ विकणारे जुने दिवाकारचे 'क्षुधा शांती'... तर दिवसभर कधीही जावे आणि मिस्सळ खावी असे 'लोकमान्य'...
सर्वात तिखट मिस्सळ हवीये? (चुना घालून केलीये का नाही असा विचार करणार नसाल तर...) 'हरी विठ्ठला पांडुरंगा' चे नाव घेत तेथे पाऊले वळवा... नवखे असाल तर एकदा खाताना आणि दुसर्यांदा रात्री ह्या तिखटाचा प्रत्यय नाही आला तरच नवल... त्याच साठी येथे बाजूलाच भारी ताक सुद्धा मिळते...
संध्याकाळी मिस्सळ खायचीये? पुणेरी मिस्सळ खायचीये?(पुणेरी म्हणून थोडा पोह्याचा चिवडा शिंपडलेली, पण पुणेरी मिसळी पेक्षा कैक पटीने चविष्ट)... तर बिनधोक पणे जन्या कडे जावे... याकडे मिळणारी आंबट गोड हिरवी चटणी हि मिसळीची उत्तम साथीदार..
आधी 'भटाची मिसळ' म्हणून ओळखले जाणारे दिवाकर चे 'क्षुधा शांती' त्यातल्या त्यात सर्वात महागडे पण उत्तम मिस्सळ देणारे हे ठिकाण.. याची इडली जास्त फ़ेमस.. पण मिस्सळ देण्याची पद्धत सुद्धा तितकीच निराळी आणि क्लास... एका स्टील च्या ट्रे मध्ये एका प्लेट मध्ये मिस्सळ... दुसऱ्या प्लेट मध्ये कांदा आणि पाव याचसोबत एका वाटीत रस्सा-तर्री तर दुसऱ्या वाटीत इडली सोबत मिळणारी नारळ-दाण्याचं कुट याची पातळ चटणी...हि चटणी मिसळी सोबत किंवा मिस्सळ वर घालून खायचा येथे प्रघात... आणि उलट म्हणजे.. 'इडली ठिपका मारून' म्हणजे इडली चटणी वर मिस्सळ च्या तर्री चा ठिपका...
वरील तीन ठिकाणे विशिष्ट वेळी मिस्सळ देतात... त्यांच्याकडे फिरून कंटाळा आला किंवा अगदी पारंपारिक मिस्सळ खायची इच्छा झाली तर 'लोकमान्य' दिवसभर आपल्या स्वागतासाठी तत्पर असतेच...इथे बसून गप्पा मारत वर्षानुवर्षे मिळणारी सेम मिस्सळ आणि वाटीत मिळणारा चहा...म्हणजे निवांत रविवार च्या सकाळ ची परफेक्ट सुरुवात...
यावरून आमची भाषा सुद्धा काही वेळा बदलते... 'उद्या विठ्ठला?'... 'इडली ठिपका मारून'... 'आई मी मिस्सळून येतो'....
अशी उत्तम मिस्सळ ची ठिकाणे लाभल्याने आम्ही मित्र स्वताला आणि कल्याणला नशीबवान समजतो... हल्ली अनेकदा ५० उत्तम मिसळ मिळण्याची ठिकाणे अशी एक यादी फिरते त्यात कल्याणला न दिलेले स्थान पाहून राग कमी पण हळहळ जास्त वाटते... कल्याणच्या बाहेरचे खरे खवय्ये नक्कीच याला मुकतील असे दुख होते...
बरेच मित्र विविध ठिकाणी गेले कि जेथे जातात तिथली मिस्सळ खाऊन येतात आणि कल्याणला परतल्यावर...'श्या नाही यार.. कल्याण सारखी मजा नाही कुठे' अश्याच निष्कर्षाला येतात...
महाराष्ट्रात वडापाव जेवढा प्रसिद्ध आहे तेवढीच अथवा त्याहून जरा जास्तच प्रसिद्ध आहे मिस्सळ... कारण वडापाव जसा मुंबईत बनतो तसा फार कमी ठिकाणी बनतो परंतु मिस्सळ चे तसे नाही... मिस्सळ च्या आपण विविध भागात विविध चवी अनुभवू शकतो आणि त्याची मजा निराळीच आहे... तेव्हा शेवटी पुन्हा आपल्या या राज्यखाद्याला प्रणाम...
भटकत राहा... मिस्सळत राहा..!!!
प्रतिक्रिया
11 Jun 2016 - 9:36 pm | जेपी
मी पयला...
बाकी मिसळ राज्य खाद्य नाही..
धन्यवाद.
11 Jun 2016 - 9:41 pm | हकु
इनिंग ची सुरुवात तर झकास केलीये.
विषयाची निवड आणि मांडणी अगदी उत्तम.
पु. ले. शु.
बादवे जन्याकडे जाऊन बरेच दिवस झाले रे. ;)
11 Jun 2016 - 10:04 pm | संदीप डांगे
मुंबई-पुणे-नाशिक म्हणजे महाराष्ट्र राज्य का? बरं बरं.
11 Jun 2016 - 10:20 pm | टवाळ कार्टा
खिक्क...वाटलेलेच असे कोणीतरी लिहिणार
11 Jun 2016 - 11:16 pm | संदीप डांगे
स्वतंत्र विदर्भ झाला तर आलुबोन्डा-रस्सा हेच आमचे राज्यखाद्य घोषित करावे अशी मी मागणी करतो या ठिक्काणी.
11 Jun 2016 - 11:40 pm | भक्त प्रल्हाद
पहिला शॉट मधे पुण्याशी आणि कोल्हापुरशी पंगा ...
ह्ये वागणं बरं न्हव !
12 Jun 2016 - 1:59 am | हकु
अगदी हेच सांगणार होतो.हा प्रकार इथे 'लई मोठ्ठं डेरिंग' या क्याटेगरीत मोडतो.
12 Jun 2016 - 3:58 am | कंजूस
जळगाव,औरंगाबाद,वर्धा ,नागपूर इकडचा रिपोर्ट काय?वडा उसळ?