http://www.loksatta.com/lekha-news/reason-and-effects-of-climate-change-...
आज, एका विचारवंताचे उन्मेखून व्यक्त झालेले मुक्तचिंतन वाचले. आहाहा, कं लिवलंय, कं लिवलंय! आम्हाला का बरं असं जमत नाही, या विचाराने अंमळ अस्वस्थ झालो. आम्ही तसे मुळांत स्वार्थीच! देशाविषयी, जगाविषयी आम्हाला कधी चिंतन करावेसे वाटत नाही. इतरांचे वाचले की निव्वळ स्वतःला केंद्रस्थानी धरुन्,आपल्याला असे का जमत नाही, या विचाराने जीव कासावीस होतो. आता हेच बघाना, आम्हाला कपाळ आहे, हातही आहेत, हंसण्यासाठी तोंडही आहे. पण कधी हे नाही सुचलं की एखादा विचार करताना कपाळावर हात मारुन हंसावे. ठीक आहे, आता कपाळाचा उपयोग सापडला आहे, आणि चिंता करायला देशापुढचे असंख्य प्रश्नही आहेत. चांगला टाईमपास सुचवलात हो म्हातारपणी. सुरवात करावीच आता.
गेली दोन वर्षे काय घुसमट होतीये हो आमची. आमचेच धर्मांध जातभाई सत्तेवर आल्यापासून डोक्याचा भुगा करताहेत अगदी. म्हणजे एखाद्या आततायी कृतीवर विचार करायला वेळच देत नाहीत ही मंडळी. इतक्या वेगाने कृत्या करायला लागलेत की दुसरा विषय डोक्यांत घेण्यासाठी, पहिल्याला कपाळावर हात मारुन बाजूला करावे लागताय! आणि तेही हंसतमुखाने. तोंड दाबून बुक्क्यांचा मार आहे अगदी.
बघा नं, ३७० म्हणजे काय, हे सामान्य जनतेला समजावून सांगण्याचा आत ह्यांनी गोहत्याबंदी वर गदारोळ उठवला. त्याचा विरोध करायच्या आत्, हे विद्यार्थ्यांच्या मागे लागले. सरळ्,सालस मुलं ती,अगदी नाकासमोर चालणारी. मग त्यांना व्यक्तिस्वातंत्र्य नको ? उगाचच देशद्रोहाचा शिक्का मारायचा? म्हणजे आम्ही इथे 'प्रेमाच्या गोष्टी' लिहून धर्मांमधल्या दर्या बुजवायचा प्रयत्न करायचा आणि इथे यांनी त्यांना देशातून हांकलायची भाषा करायची. वैज्ञानिकांसमोर पुराणातल्या बढाया मारुन जगभर हंसं करुन घ्यायचं? या असल्या राज्यकर्त्यांच्या मनातला अहंकार नाहीसा करावा याचा शोध आम्हाला अजून लावता आला नाही, उपयोग काय मग बुद्धिमान असण्याचा? उलट, या हुशारीमुळेच कपाळ बडवण्याची वेळ आली आहे. अल्झायमरची शक्यता, आमच्यासारख्यांना कितीतरी पट जास्त. उपाय काय? काही म्हणून काही विसरायचे नाही. सकाळपासून काय काय केले ते दहा वेळा आठवून पहायचे. बँकेत, पोस्टांत कोणीही दिसले तरी त्यांचे संभाषण ऐकायचे, ते घरी आल्यावर पुन्हा आठवायचे. ते आठवावे म्हणून त्यांतल्या एखाद्या व्यक्तिच्या प्रेमांत पडायचे.
आम्ही विचारवंत, म्हणजे देशांतल्या प्रत्येक समस्येचा विचार आमच्याशिवाय करणार कोण? साधा पंतप्रधानांचा मुद्दा घ्या. त्यावरही खोल विचार हवा. तो अहंकारी असून चालणार नाही, त्याच्यांत हुकुमशाहीच्या खुणाही दिसता कामा नयेत. त्याने महत्त्वाच्या विषयावर मौन धारण करुन, मनाच्या गोष्टींमधे मात्र वीट येईल इतके बोअर करणे बरे नव्हे. तर असा जर एखादा वागत असेल तर त्याला वठणीवर आणण्याचे काम आमचेच आहे.
देवाधर्माच्या नांवाने सध्या कशी मौज चालू आहे. देव मूर्त का अमूर्त, सगुण का निर्गुण हेही लोकांना ठरवता येत नाहीये. त्यांत आणखी भर घालून त्यापलिकडेही काही शक्यता आहे का, याचा विचार आणि चर्चा आम्हालाच सुरु केली पाहिजे.
सत्तेवर आल्यावर आम्ही हे प्रश्न सोडवू, ते प्रश्न सोडवू असे म्हणत सत्ताधारी जिंकून येतात. पण काही प्रश्न कधी सुटणारे असतात का ? गरिबी,पर्यावरण, काश्मीर, जातपात हे न संपणारेच प्रश्न आहेत आणि ते तसेच रहाण्यांत जसा राजकारण्यांचा फायदा आहे तसा विचारवंतांचा आहे, मिडियाचा आहे, तसे आणखी कितीतरी लाभार्थी आहेत. मग असे प्रश्न न सुटण्यांतच अनेकांचे भले आहे, हे उघड न सांगता, त्यावर निरथक चर्चेचे गुर्हाळ चालू ठेवणेच सर्वांच्या फायद्याचे आहे..
आपल्या अर्थव्यवस्थेच्च्या दोन्ही किडन्या आता खराब झालेल्या आहेत. त्यामुळे डायलिसिसवरच आपण जगतो आहोत. तर यांत दोष कोणाचा? वरकरणी तुम्ही म्हणाल, की हा आजवर सत्तेत असलेल्या अर्थतज्ञांचा आहे. पण तसे नाही बरं का ! हा दोष वैज्ञानिकांचा आहे. त्यांनी एवढ्या भौतिक सोयी निर्माण केल्या नसत्या, तर लोक आळशी झाले नसते, गरजा वाढल्याच नसत्या. बलुतेदारी चालूच राहिली असती. पर्यावरणही सुरक्षित राहिले असते.
आता, आमच्या सारख्यांनी एवढी मनोहारी,लोकशिक्षण देणारी नाटकं लिहिली. आमचा एक चाहतावर्ग निर्माण झाला. एकेका नाटकांत आम्ही अनेक प्रश्न हाताळले. आता, सर्वच जणांना ते कळले नाही तर आमचा काय दोष ? आमचे फक्त एकच मागणे आहे. कितीही भ्रष्टाचारी, निष्क्रिय राज्यकर्ते डोक्यावर बसले तरी चालतील, पण त्यांनी आम्हाला मुक्त श्वास घेऊ दिला पाहिजे. एखादे जुलमी, लोकांना काम करायला लावणारे सरकार आले तर देशाचे जे काय व्हायचे ते होईल, पण आमचा विचारवंतांचा मळा कायमचा कोमेजेल.
प्रतिक्रिया
22 May 2016 - 11:13 pm | पैसा
=)) आजच एक भारी विनोदी बातमी वाचली. राजदीप सरदेसाईला गोव्याचा मुख्यमंत्रे व्हायला आवडेल म्हणे. गोव्यातल्या लोकांना काय आवडेल ते विचार की मेल्या!