संगीताची आवड हा अतिशय वैयक्तिक विषय आहे. आपण कोणाला जबरदस्तीने एखादा गाणं आवडवू शकत नाही.
तसे लहानपणापासून माझ्या घरात शास्त्रीय संगीताची आवड सगळ्यांनाच होती, मी सोडून.!! (मला अजूनही ख्याल गायकी आवडत नाही, पण केवळ वाद्ये जशी सितार, तबला, बासरी वगैरे आवडतात ऐकायला.)
मला ताला सुराचे बर्यापैकी भान होते / आहे असे समजतो. नंतर अभियांत्रिकीला गेलो. तिथले वसतिगृह हा काय प्रकार असतो हे जाणकारांना सांगणे न लगे. नाना प्रकारची चित्र विचित्र मुले तिथे एकत्र राहत असतात. तिथे पहिल्यांदा माझ्या डोक्यात पाश्चात्य संगीताचा किडा घुसला. त्यातूनही ROCK n ROLL चा. Guns n Roses, Nirvana,Metallica, Ac/DC, U2, Bob Dylan, Beatles, Megadeath वगैरे लोक मला अचानक आपलेसे वाटू लागले. नंतर त्यातले बारकावे कळू लागल्यावर तर मी हिंदी, मराठी संगीत ऐकणार्या लोकांकडे क्षुद्र नजरेने बघू लागलो..!! (आता नाही बघत, तेव्हाची गोष्ट आहे ही).घरात मी अचानक विद्रोही चळवळीचा नेता असल्या सारखे वावरत होतो.. त्यांना कंठशोष करून समजावून सांगायचो कि Rock म्हणजे नुसती आदळ-आपट नाही, पण ऐकतय कोण.? पण नुकतेच एक पुस्तक वाचनात आले, न मला माउलीच्या भक्ताला ज्ञानेश्वरांनी स्वहस्ते लिहिलेली ज्ञानेश्वरी हातात आल्याचा भास झाला. !
पुस्तकाचे नाव आहे "लयपश्चिमा" आणि लेखक आहेत आशुतोष जावडेकर.
Western Music ची ओळख करून देताना त्यांनी अतिशय सहज सुंदर भाषा वापरून, आपण त्यात पुरते गुंगून राहील याची काळजी तर घेतलीच आहे, पण तसे करताना कुठेही असं वाटून नाही दिलं की आपण कुठल्यातरी वेगळ्या संस्कृती बद्दल वाचत आहोत. अतिशय आपलेपणाने त्यांनी पाश्चात्य संगीताच्या सर्व पैलूंविषयी उत्तम माहिती दिली आहे. ते स्वतः सुद्धा एक संगीतकार असल्याचा त्यांना निश्चित फायदा झाला आहे, कारण त्यांना संगीताच्या बारकाव्यांची पुरेपूर कल्पना आहे.
पुस्तकाची सुरुवातच Rock n Roll पासून होते. जे मला इतके दिवस कळलं होत, पण दुसर्यांना सांगता येत नव्हत ते त्यांनी अगदी आरामात समजावलं आहे. Rock संस्कृती कशी व का उदयाला आली, त्यातला वेगळेपणा, विद्रोही पणा असूनही ते समाजाला कसं आवश्यक आहे वगैरे माहिती अतिशय सूचक रित्या दिली आहे.
Rock नंतर Country music, Pop music पासून ते अगदी आत्ताच्या Hip Hop व Electronic Music पर्यंतचा प्रवास उलगडून दाखवला आहे. असे करताना त्या त्या क्षेत्रा मधील नामवंत कलाकारांची जुजबी ओळख देखील करून दिली आहे, जी अतिशय रोचक आहे. कारण कलाकार हे थोडे अत्रंगी असतात, न लहानपणी झालेल्या अन्यायाचा, वर्ण भेदाचा, अत्याचारांचा राग ते संगीता मार्फत कसा काढत असत हे वाचल कि आपल्याला कळत कि कलाकाराचे मन हे तहानलेले असले कि त्यातून एक सर्वोत्कुष्ट कला कशी बाहेर येते.
आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे, भारतातील Rock Bands ची सुद्धा ओळख त्यांनी करून दिली आहे, जी अगदीच जुजबी असली तरी महत्वाची आहे.
एकूण संगीत वेड्या लोकांसाठी हे पुस्तक म्हणजे एक खजिनाच आहे.
नक्की वाचा.
- लयपश्चिमा
- आशुतोष जावडेकर
- राजहंस प्रकाशन
- किंमत ३५० रुपये
प्रतिक्रिया
19 May 2016 - 10:32 pm | एस
शीर्षकापासूनच हे पुस्तक वाचकांची उत्सुकता जागृत करतेय असे दिसते.
उत्तम ओळख.
19 May 2016 - 11:11 pm | सस्नेह
वेगळा विषय आणि वेगळेच पुस्तक दिसते.
19 May 2016 - 11:44 pm | बोका-ए-आझम
तितकाच छान परिचय! पुस्तक वाचलंय. लेखकाने नुसती संगीताची नव्हे तर एका संपूर्ण अलग संस्कृतीची ओळख करुन दिलेली आहे. तुम्हीही छान लिहिलं आहे, पण अजून आलं असतं तर आवडलं असतं.
20 May 2016 - 7:13 pm | विशाखा पाटील
पुस्तक परिचय आवडला. या विषयावर लेखकाचे 'लोकसत्ता'च्या रविवार पुरवणीत लेख येत असत. परंतु हे पुस्तक फक्त त्या लेखांचे संकलन नाही. त्यात भर घालून लिहिलेलं हे उत्तम पुस्तक आहे. पाश्चात्य संगीताचा सामाजिक, सांस्कृतिक दृष्टीकोनातून केलेला विचार हा यातला महत्त्वाचा पैलू म्हणता येईल.