१. नानासाहेब पेशवे जेव्हा सदाशिव भाऊंच्या मदतीला निघाले (त्यांची मदत पोहोचली नाही हा भाग वेगळा) तेव्हा त्यांच्याकडे नक्की किती घोडदळ आणि पायदळ होते.
२. बाजारबुणगे म्हणजे नक्की कोण होते? आणि सोबत भली मोठी फौज असताना त्यांना नेण्याचं कारण काय?
३. दक्षिण दिशेकडून युद्ध लढत असून अब्दालीने त्याचा कुटुंब कबिला युद्ध सुरु झाल्यावर अफगाणिस्तानच्या वाटेला रवाना केला, मग मराठ्यानाही ते शक्य होतं, पण आपण बायका पोर आणि बाजारबुणगे सोबत घेऊन युद्ध लढलो याच कारण काय?
४. असं म्हणतात कि इब्राहीम खान गारदीला पुढे ठेऊन त्याच्या तोफा धडाडू दिल्या असत्या(सुरवातीला त्या पुढेच होत्या नंतर विचुरकर घोडदळ घेऊन पुढे आले आणि तोफांचा मारा बंद पडला) तरी आपण जिंकलो असतो हे खरं आहे का?
५. राघोबादादा जर या युद्ध मोहिमेवर निघाले असते तर निकाल वेगळा लागला असता का?
६. मराठयांच सैन्य(बाजारबुणगे स्त्रिया किती आणि फक्त सैन्य किती) आणि अफगाणांच सैन्य याचा नक्की आकडा किती होता.
पानिपत युद्धाबाबत माहिती हवी आहे.
गाभा:
प्रतिक्रिया
4 Apr 2016 - 8:33 pm | आदूबाळ
खालील दोन पुस्तकं वाचा:
..बाकी इतिहासतज्ज्ञ सांगतीलच!
4 Apr 2016 - 8:48 pm | lgodbole
मिसळीपाव व मायबोलीवर जुने अनेक धागे आहेत.
4 Apr 2016 - 10:29 pm | उगा काहितरीच
(यथाशक्ती उत्तरे देतोय . काही चुका असु शकतात . जाणकारांच्या प्रतिक्षेत... यानिमीत्ताने माझेही नॉलेज अपडेट होईल.)
नक्की माहीत नाही.
बाजारबुणगे म्हणजे थोडक्यात यात्रेकरू वगैरे. न लढणारे व्यक्ती . यात बायकापोरे,साधूबैरागी असे बरेच लोक होते. "गाड्याबरोबर नाळ्याची यात्रा" असे हे होते. त्याकाळी एकट्यादुकट्या यात्रेकरूंना चोराचिलटाचे भय असायचे म्हणून सैन्याच्या सोबत सुरक्षित राहून तिर्थयात्रा होईल या उद्देशाने आलेले लोक. यांना सोबत घेतले नव्हते हे लोक स्वतःच आले होते. (काशी करायला ! हा वाक्प्रचार यांच्यामुळेच रूढ झाला असेल का ?)
माझ्या मते ते जायला तयार नव्हते . किंवा त्यांच्यासाठी जाणं तितकसं सुरक्षित नसावं . शिवाय अब्दालीच्या तुलनेत संख्या खूपच जास्त होती.वर सर्वजण उपाशी , जखमी होते.
इतिहासात जर तर ला महत्त्व नसते, साहेब. तरी मला वाटते कदाचित जिंकलो असतो. (एक सुधारणा तोफाच्या ऐवजी बंदुका, सुतरनाळा हे शब्द घाला कारण विंचुरकरांच्या घोडदळामुळे गारद्यांच्या बंदुका बंद पडल्या होत्या .)
परत तेच उत्तर इतिहासात जर तर ला महत्त्व नसते. सदाशीवरावभाऊ काही कमी नव्हते राघोबादादाशी तुलना करायची तर.
नक्की आकडा माहित नाही. जाणकारांच्या प्रतिक्षेत.
5 Apr 2016 - 5:02 am | खटपट्या
बाजारबुगणे म्हणजे फक्त यात्रेकरु नव्हेत. लढणार्या सैन्याबरोबर बराच सपोर्टींग स्टाफ लगतो. उदा. हत्यारे बनवणारे, चपला/पायताण बनवणारे, प्राण्यांची काळजी घेणारे, जेवण बनवणारे, हमाल, तोफा/अन्य युद्धसामग्री वाहून नेणारे इत्यादी.
5 Apr 2016 - 8:17 am | उगा काहितरीच
हा ते पण आहेतच की. पण फक्त सपोर्टिंग स्टाफ का यात्रेकरू + सपोर्टिंग स्टाफ असं कनफ्युजन होतं.
5 Apr 2016 - 8:26 am | सुनील
बाकी तो मनोरंजन करणारा सपोर्टिंग स्टाफ लिहायचा राहिलाच की!
4 Apr 2016 - 10:53 pm | जव्हेरगंज
तुम्हाला हे प्रश्न पडले असतील तर तुम्हाला उत्तरे ही माहीत असणार असं वाटून गेलं ब्वॉ
5 Apr 2016 - 1:57 am | शिवोऽहम्
+१
मराठीत बख्खळ पुस्तकं आहेत या विषयावर वाचायला.
5 Apr 2016 - 2:03 am | तर्राट जोकर
:) जसे हे प्रश्नः आग्र्याचा ताजमहाल कुठे आहे? लोकरीचा स्वेटर कशापासून बनतो?
5 Apr 2016 - 5:09 am | नन्द्या
मी अनेक वर्षांपूर्वी एक(च) पुस्तक वाचले पानिपत या विषयावर. बहुधा श्री. विश्वास पाटील यांचे. यातले अधिकृत इतिहासाला धरून किती नि कादंबरी म्हणून मनोरंजक करण्यासाठी म्हणून किती हे माहित नाही. पण माझे प्रथम थोडेफार मनोरंजन झाले, शेवटी मात्र डोळ्यात पाणी आले, खिन्न, उदास वाटू लागले. त्यात लिहीले आहे -
१. पानिपत पूर्वी राघोबा अटकेपार जाऊन आले. तेंव्हा सदाशीवराव भाऊ पेढीवर बसून जमाखर्च पहात. त्यांनी तक्रार केली की राघोबांनी पुण्यातून पैसे घेऊन स्वारी केली पण परत येताना फारसे पैसे आणले नाहीत, त्यामुळे तिजोरीवर फार बोजा पडला. स्वारीवर जाताना पुण्याहून पैसे नेण्या ऐवजी वाटेतच रसद इ. साठी पैसे मिळवण्याची व्यवस्था करावी. हे ऐकून राघोबा भडकले नि म्हणाले असे असेल तर मी पुनः स्वारीवर जात नाही, भाऊंनी स्वतः जावे व पैसे वाटेतून मिळवून दा़खवावे. म्हणून भाउ निघाले.
२. नानांची पत्नि म्हणाली - अहो, भाऊंनी दिल्ली काबीज केली तर ते वेगळे राज्य करून स्वतः पेशवे होतील, त्यांच्यावर वचक म्हणून विश्वास रावाला पाठवावे. तो असताना भाउ वेगळे राज्य करणार नाहीत.
३. त्याकाळी मराठ्यांचे सामर्थ्य नि त्याचा दबदबा देशभरात एव्हढा होता, की मराठ्यांचा पराभव म्हणजे अशक्य समजले जाई, म्हणून बायका, त्यांचे आश्रित म्हणाले सैन्याच्या सोबतीने आपणहि हृषिकेष, हरिद्वारची यात्रा करावी, मग काय, बायका, लहान मुले, नोकर चाकर नि इतर अनेक ब्राह्मण सामील झाले. शिवाय पहिल्या बाजीरावांनी मस्तानी आणली तसे पुनः होऊ नये, म्हणून कुटूंबाने बरोबर जावे असा नियम करण्यात आला होता!
४. भाऊंचा बेत होता की मार्गशीर्षा पूर्वी दिल्लीला पोचावे, कारण नंतर त्या भागात जी थंडी होते, त्याची आपल्या सैन्याला सवय नाही. पण वाटेत कुठे नदी लागली की हे फुकटे ब्राह्मण ओरडा करीत की ही फर महत्वाची नदी आहे हिची पूजा करून सहस्रभोजन व ब्राह्मणांना दक्षिणा द्यावी, नाहीतर तुमचे वाट्टोळे होईल, मग बायकाहि घाबरून थांबा म्हणू लागल्या. भाऊ बिचारे! पहिले बाजीराव असते तर म्हणाले असते - माझे कुणि वाट्टोळे करणार नाही, मी मा़झ्या मते ठरवीन, कुठे व किती थांबायचे.
५. दोन महत्वाच्या मित्रांनी मदत केली नाही - एक मुसलमान राजा, ज्याने आजन्म मराठ्यांच्या बाजूने लढेन असे वचन पहिल्या बाजीरावास दिले होते. पण भाउ त्याला भेटण्यापूर्वीच नजीबखान रोहिला यांने त्या राजाला पटवले की तू मुसलमान आहेस, नि मुसलमानांची इज्जत खतरेमे! वास्तविक हा राजा शिया नि अब्दाली सुन्नी (किंवा उलटे) होते. त्याचे सैनिक अब्दालीच्या सैन्यात गेल्यावर त्यातल्या कित्येकांचा खून पडला.
दुसरे जाट - त्यांना होळकरांच्या गंगोबा तात्याने आश्वासन दिले, की दिल्ली जिंकल्यावर ती तुला मिळेल. यात त्या तात्याचे काही कारस्थान होते. भाऊंनी त्याला साफ नकार दिल्यावर तो रागावला व म्हणाला मी मदत करीन पण लढणार नाही.
६. अश्या रितीने सहस्रभोजान व दक्षिणा देऊन पैसे कमी झाल्यावर भाऊंनी नानांची मदत मागितली पण ती रसद मधल्या मधे अब्दालीने तोडली. मग बर्याह उशीरा दिल्लीला पोचल्यावर सैन्याची अत्यंत हलाखीची परिस्थिती झाली. मग खर्चासाठी म्हणून दिल्लीचे सोन्याचे तख्त फोडण्याची वेळ आली. म्हणजे खरे तर ही अभिमानाची गोष्ट नसून नामुष्की आहे.
७ अहमदाशहा अब्दालीचे भाग्य - त्याला नदीउतार व्हायला जमले, भाउ जाउ शकले नाहीत, पण तोपर्यंत सर्व सैन्याचे इतके हाल झाले होते (त्याचे हृदयद्रावक वर्णन आहे) की ते म्हणाले हे असे मरण्यापेक्षा लढून मरू! म्हणून हल्ला केला.
८, असे म्हणतात की इब्राहिम लोदीला चांगले यश मिळत असता त्याची स्तुति केल्याने मराठे चिडले नि म्हणाले आम्ही पण लढून दाखवतो!
पुढे काय झाले ते सर्व लोकांना माहित आहे. होळकरांनी पळ काढला असे काही म्हणतात, पण बायका मुलांना परत दिल्लीला जायला सोबत म्हणून भाऊंनेच त्यांना सांगितले होते.
९ नाना फडणवीस ९ वर्षांचे होते, त्यांचे कपडे, अंगावरील दागिने लुटल्या गेल्याने, लज्जारक्षणासाठी भरपूर राख अंगाला फासून, कसे बसे जीव वाचवून परत आले. नाना फडणवीस मुत्सद्दी, पण घाशीराम कोतवाल मधे त्यांची दुसरीच बाजू दाखवली आहे. त्या नाटकाच्या गोष्टीत भरपूर अतिशयोक्ति असावी असे वाटते.
5 Apr 2016 - 8:28 am | सुनील
आयला! डिपेंडन्ट विसाचा इतिहास असा आहे तर!!
5 Apr 2016 - 6:50 am | प्रचेतस
उत्तम माहिती मिळत आहे.
5 Apr 2016 - 12:58 pm | आदूबाळ
हो ना. पेशव्यांची पेढी, इब्राहिम लोदीचा कालप्रवास वगैरे बहुत मनोरंजक.
5 Apr 2016 - 2:23 pm | प्रचेतस
अगदी :)
5 Apr 2016 - 3:07 pm | तर्राट जोकर
क्खिक =))
5 Apr 2016 - 3:19 pm | अभ्या..
हीहीहीही, मला तर मस्त अॅक्रेलिकचा "बाजीराव बल्लाळराव अँड सन्स" चा बोर्ड डोळ्यासमोर आला.
5 Apr 2016 - 11:25 am | सतिश पाटील
पानिपत - ३ या युद्धाला (१४ जानेवारी, २०१२ रोजी) २५१ वर्ष पूर्ण झालीत.त्याबद्दल थोडेसे...
पानिपत
पानिपत भारताच्या हरियाणा राज्यातील एक शहर आहे.
हे शहर पानिपत जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे.दिल्लीपासून ९० कि.मी. वर असून राष्ट्रिय महामार्ग १ वर आहे. हे शहर भारतीय इतिहासाच्या दृष्टिने महत्वपुर्ण आहे. या शहरात तीन युद्धे लढली गेली ज्यामुळे भारतीय इतिहासाला वेगळे वळण लागले.
इतिहास
या शहराचे संदर्भ महाभारतात आढळतात. धृतराष्ट्राने कुरू साम्राज्याचे विभाजन केले व पांडवांना यमुनेच्या पश्चिमेकडील भाग वाटणी मध्ये दिला. पांडवांनी आपल्या हिंमतीवर पाच शहरांची निर्मीती केलि. त्यापैकि एक शहर होते पांडुप्रस्थ तेच आज पानिपत या नावाने ओळ्खले जाते.
इतिहासात पानिपतला रणभूमी संबोधले जाते. त्याला कारण आहे या शहराच्या आसपास झालेलि तीन युद्धे. या तिन्ही युद्धांमुळे भारतीय इतिहासाला वेगळे वळण मिळाले व असेही म्हणले जाते की हि युद्धे झाली नसती अथवा युद्धाचा निर्णय जर वेगळा असता तर आजचा भारत नक्कीच वेगळा दिसला असता.
पानिपतचे पहिले युद्ध १५२६ मध्ये दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोधी आणि बाबर मध्ये लढले गेले. बाबरच्या छोट्या परंतु शिस्तबद्ध सेना आणि तोफां यांच्या बळावर लोधीच्या एक लाखापेक्षा मोठ्या फौजेचा लीलया पराभव केला आणि भारतात मुघल सत्तेचा पाया घातला.
पानिपतचे दुसरे युद्ध १५५६ मध्ये हेमू आणि मुघलांच्यात लढले गेले. यावेळी पुन्हा मुघलांची सरशी झालि व भारतात मुघलांच्या वर्चस्वावर शिक्कामोर्तब झाले.
पानिपत चे तिसरे युद्ध बुधवार, जानेवारी १४ जानेवारी, इ.स. १७६१ रोजी मराठे सदशिवराव पेशवे "भाऊ" आणि अफगाण घुसखोरअहमद शहा अब्दाली यांच्यात झाले. या कालखंडात सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेपाचपर्यंतच्या एका दिवसाच्या अल्पावधीत असे भयंकर, घनघोर, जीवघेणे युद्ध घडल्याचे आणि त्यामध्ये दोन्ही बाजूंची दीड लाख माणसे आणि ऐंशी हजार जनावरे मेल्याचे दुसरे उदाहरण नाही. या युद्धात महाराष्ट्रातील प्रत्येक माजघरातल्या कुंकवाचा करंडा पानिपतावर लवंडला. या भीषण युद्धात मराठे पराभूत झाले, तसेच अब्दालीचीहि मोठी हानी झाली. या युद्धाबाबत अहमद अब्दालीनेच लिहून ठेवले आहे-"दक्षिण्यांनी (मराठ्यांनी) पानिपतावर मजबूत छावणी कायम केली होती. युद्धदिवशी त्यांनी अत्यंत निकराने आमच्या लष्करावर पुन्हा पुन्हा हल्ले चढविले. मराठ्यांचे हे असमान्य शौर्य पाहण्यासाठी त्यादिवशी आमचे रूस्तम आणि इस्किंदारसारखे (अफगाणांच्या महाकाव्यातील कृष्णार्जुन) वीर मौजूद असते, तर त्यांनी मराठ्यांचा महापराक्रम पाहून आश्चर्याने तोंडात बोटे घालुन चावली असती. मराठ्यांसारखी युद्धाची अशी लालसा, अशी खुमखुमी आणि इतके शौर्य इतरांकडून होणे वा दिसणे अशक्य". खणाणत्या, जिगरबाज मराठा तलवारींची त्याने एवढी दहशत खाल्ली होती की, विजयी होऊनसुद्धा पुन्हा हिंदुस्थानावर आक्रमण करायचे त्याला धाडस राहिले नाही. या युद्धामुळे मराठ्यांचे लश्करी वर्चस्व संपुष्टात आले. ज्याचा फायदा इंग्रजाना भारतात सत्ता फोफवण्यास झाला.
मराठा साम्राज्य. (Maratha Empire)
पानिपतची ३री लढाई
मराठे-दुराणी युद्ध यातील एक भाग
पानिपतचे युद्ध
दिनांक जानेवारी १४ १७६१
ठिकाण पानिपत, हरयाणा, भारत
परिणती दुराणींचा विजय परंतु प्रचंड नुकसान
युद्धमान पक्ष
मराठा साम्राज्य सेनापती
सदाशिवराव भाऊ
इब्राहिम खान गारदी
जनकोजी शिंदे
मल्हारराव होळकर
सरदार पुरंदरे
सरदार विंचुरकर
दुराणी साम्राज्य
सेनापती
अहमदशाह अब्दाली
नजीब उद दौला
मराठा सैन्यबळ
४०००० घोडदळ
२०० तोफा
१५००० पायदळ सैनिक
१५००० पिंडारी
२-३ लाख बुणगे (न लढणारे यात्रेकरू, स्त्रिया व मुले)
दुराणी सैन्यबळ
४२००० घोडदळ
१२०-१३० तोफा
३८००० पायदळ सैनिक
१०००० राखीव सैनिक
१०००० इतर
मराठा बळी आणि नुकसान
लढाऊ सैन्य:१५,०००-२०,०००. नागरिक= ३०,०००-३५,०००. एकूण :४५,००० ते ५५,०००.
दुराणी बळी आणि नुकसान
३५,००० ते ४०,०००
पानिपतची तिसरी लढाई जानेवारी १४ १७६१ रोजी भारतातील हरयाणा राज्यातील पानिपत नजीक झाली. याच गावानजीक पहिले दोन युद्धे झाली होती, ज्यात मोघलांची सरशी झाली होती व भारतात मुघल सत्तेचा पाया घातला गेला होता. तिसरी लढाई अफगाण सेनानी अहमदशाह अब्दाली आणि महाराष्ट्रातील पेशव्यांत झाली. अहमदशाह अब्दालीने पेशव्यांचा व पर्यायाने मराठी साम्राज्याचा मोठा पराभव केला. या पराभवानंतर मराठा साम्राज्याची एकसंधता नष्ट झाली. जरी महाराष्ट्रातील सत्ता पेशव्यांकडे राहिली असली तरी महाराष्ट्राबाहेरचे साम्राज्य अनेक सरदारांनी आपापल्यात वाटून घेतले.
पार्श्वभूमी
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याला खंबीर वारस मिळाला नाही त्यामुळे मराठ्यांनी उत्तर भारतात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यास सुरुवात केली होती. १७५० च्या दशकात मराठ्यांनी उत्तर भारतात बर्याच मोठ-मोठ्या मोहिमा काढल्या. पार पाकिस्तानातील अटकेपर्यंत आपले साम्राज्य प्रस्थापित केले व ७ ते ८ शतके राज्य करण्यार्या एकछत्री इस्लामी सत्तेला आव्हान दिले. थोरल्या बाजीरावाच्या कारकीर्दीपर्यंत उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले होते. परंतु भारताच्या सीमा ओलांडून मराठे येऊ लागल्याने भारता बाहेरील इस्लामी सत्तांना मराठ्यांना अंकुश घालणे गरजेचे वाटले. इ.स. १७५८ मध्ये मराठ्यांनी दिल्लीवर कब्जा मिळवला व मुघलांना नाममात्र राज्यकर्ते बनवले. याच वेळेस अब्दालीचा मुलगा तिमुर शाह दुराणीला हाकलून लावले. मुस्लिम धर्मगुरुंनी याला आपल्या धर्मावरचे मोठे संकट मानले व मराठ्यांना प्रत्युतर देण्यासाठी आघाडी उघडण्याचे आव्हान केले. अफगाण सेनानी अब्दालीने याला होकर दिला. त्याने १७५९ मध्ये बलुच, पश्तुन व अफगाणी लोकांची फौज उभारली व उत्तर भारतातील छोट्या छोट्या चौक्यांवर हल्ले करण्यास सुरुवात केली व मराठ्यांशी उघड उघड वैर पत्करले. या संघर्षामध्येच मराठ्यांचा मुख्य सेनापती दत्ताजी शिंदे याची नजीबने अत्यंत क्रूर हत्या केली. साहजिकच मराठ्यांना याचे उत्तर देणे गरजेचे होते तसेच अब्दालीला हुसकावणे गरजेचे होते. नाहीतर उत्तर भारतात काही दशकात मिळवलेले वर्चस्व गमावण्याची भीती होती. म्हणून मराठ्यांनी पण १ लाखाहून मोठी फौज उभारली व पानिपतकडे कूच केले.
युद्धाआधीच्या घडामोडी
भाउंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांची मोहिम चालू झाली. अनंत अडचणींना तोंड देत सेना उत्तरेत पोहोचली. वाटेत होळकर, शिंदे, गायकवाड, बुंदेले यांच्या तुकड्या येउन मिळाल्या सैन्याला बळकटी मिळाली. राजपुतांचे सूरजमल व भरतपूरचे जाट देखिल मिळाले. या एकत्रित सैन्याने दिल्लीवर हल्ला केला व काबीज केली. विश्वासरावला दिल्लीच्या गादीवर बसवायचा भाउंचा मनसुबा होता. भाउंनी रसदेअभावी दिल्लीलुटायचा आदेश दिला. परंतु शिखांनी व जाटांनी त्याला विरोध केला व ते युतीच्या बाहेर पडले. ही घटना युद्धात निर्णायक ठरली असे बर्याच इतिहासकारांचे मत आहे. अब्दाली व मराठ्याच्या यांमध्ये नियमितपणे चकमकी घडू लागल्या कर्नाल व कुंजपुरा येथे दोन्ही फौजा भिडल्या. कुंजपुराच्या चकमकीत मराठ्यांनी अब्दालीची संपूर्ण तुकडी कापून काढली व कित्येकांना बंदी बनवले. पाउस पडत असल्याने यमुना नदी पलीकडून अब्दालीला आपल्या सैन्याची काहीच मदत करता आली नाही. चिडून जाउन अब्दालीने आपल्या सैन्याला भर पुरात यमुना ओलांडायला सांगितले.अब्दालीने दक्षिणेकडे आपल्या फौजेची वाटचाल केली व बाघपत येथे यमुना ओलांडली. यमुना ओलांडल्याचे मराठ्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी पानिपत जवळ तळ टाकला व बचाव भक्कम करण्यावर जोर दिला. २६ ऑक्टोबर रोजी अब्दाली पानिपत व सोनपत मधील संबलका येथे पोहोचला. पुढे चालणार्या अब्दालीच्या आघाडीच्या सेनेची मराठ्याशी येथे जोरदार चकमक झाली व मराठे पूर्ण चाल करणार इतक्यात अब्दालीची कुमक पोहोचली व मराठ्यांचे जोरदार आक्रमणाचे मनसुबे थंडावले. दोन्ही बाजुनी मोठ्या प्रमाणावर सैन्य मारले गेले. मराठ्यांना व अब्दालीलाही या चकमकीमुळे मागे हटावे लागले व एकमेकांच्या सामर्थ्याचा अंदाज आला. युद्ध झालेच तर ते भीषणच होइल व प्रचंड जिवीतहानी होइल हे निश्चित झाले. अजून एका चकमकी मध्ये गोविंदपंत बुंदेलेंच्या सैन्य-तुकडीवर अब्दालीच्या सेनेने तुफानी हल्ला चढवला. ही तुकडी मुख्य सेनेसाठी रसद व घोडदळीची कुमक आणत होते. मराठ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले पण त्याही पेक्षा मोठे नुकसान म्हणजे, रसदेचा पुरवठा अब्दालीने पुर्णपणे तोडून टाकला. मराठ्यांची उपासमार होउ लागली.
पानिपतची कोंडी -
पुढील दोन महिने दोन्ही सेनांमध्ये सातत्याने चकमकी होत राहिल्या व एकमेकांवर कुरघोडी करणे चालू राहिले. मराठ्यांचा नजीबवर अब्दालीपेक्षा जास्त राग होता. एका चकमकीत नजीब मरता मरता वाचला. त्याचेही ३००० पेक्षा जास्ती सैन्य नुसत्या चकमकींमध्ये मारले गेले होते. अब्दालीला मराठ्याच्या सामर्थ्याचा अंदाज आलेलाच होता व युद्ध फायद्यात नाही हे लक्षात आले होते. मराठ्यांच्या गोटातही उपासमार व बुणग्यांच्या ताणामुळे भाऊही संधीचाच मार्ग शोधत होता. मराठे पानिपतच्या उत्तरेकडे होते व त्यांचा मार्ग दक्षिणेकडे होता. त्यांचे मित्र पक्ष, त्यांचे रसद पुरवठादार, सैन्य कुमक हे सर्व दिल्लीच्या दक्षिणेकडे होते. तर अब्दाली पानिपतच्या दक्षिणेकडे होता. अशीच एकदम विरुद्ध स्थिती अब्दालीचीही होती. मराठ्यानी व अब्दालीने एकमेकांचा रस्ता आडवला होता एकमेकांचे वैर्य लक्षात घेता युद्ध किंवा संधी असे दोनच विकल्प होते. अब्दाली ने संधी करायचा प्रयत्न केला परंतु नजीबने तो होउ दिला नाही, नजीबने इस्लामच्या नावावर युद्धाची शक्यता तेवत ठेवली. यामुळे मराठे अजून गोंधळात पडले. आज ना उद्या संधी होइल या आशेवर थांबले. दरम्यान धान्यसाठा संपत आलेला होता, यामुळे मराठ्यांना आजूबाजूच्या गावांमधून अन्न धान्य उचलण्याशिवाय पर्याय राहिला नाही. यामुळे स्थानिक नागरिकांचा मराठ्यांवरील रोष वाढला. याउलट अब्दालीला दक्षिणेकडील मित्र पक्षांकडून रसद पुरवठा होत राहिला. भाऊंनी सरते शेवटी कोंडी मोडून काढण्याचा निर्णय घेतला. पहिल्या प्रथम तोफांनी अफगाण्यांना भाजून काढायचे व नंतर घोडदळाने आक्रमण करायचे व कोंडी मोडून दिल्लीला पोहोचायचे जिथे रसद पुरवठा निश्चित होता, असे ठरले.
व्युहरचना -
मराठे रणांगणाच्या उत्तरेस स्थित होते तर अफगाणी दक्षिणेकडे. अब्दालीने आपले सैन्य तिरक्या रेषेत लावले होते तर मराठ्यांचे एकाच ओळित होते. मराठा सेनेच्या मध्यभागी भाऊ व विश्वासराव होते. डावीकडे इब्राहीमखान गारदीचे सैन्य तर उजवीकडे शिंदे व होळकरांचे सैन्य होते. मराठ्यांनी तोफखाना पुढे ठेवला. त्यांना संरक्षण करणारे भालदार व गारदी होते. तोफांच्या मागे अननुभवी तरूण सैनिक होते व जवळपास ३०,००० बुणग्यांनी लोकांनी स्वयंप्रेरणेने युद्धात भाग घेतला होता.
अफगाण्यांनी व्युहरचना यासारखीच केली होती. एका बाजूला नजीबचे रोहिले व दुसर्या बाजूला फारसी सैनिकांच्या तुकड्या होत्या. अब्दालीचे सेनापती शुजा उद दौला व शाह वली यांनी मधली कमान संभाळली.
युद्धाची सुरुवात -
मराठ्यांकडील अन्नाचा साठा संपल्याचे लक्षात आल्यावर युद्धाशिवाय पर्याय नव्हता व १४ जानेवारी १७६१ रोजी मराठे युद्धासाठी तयार झाले. पारंपारिक युद्ध पोषाक घालून चेहर्यांवर हळद , गुलाल फासून युद्धास तयार झाले. मराठे आपल्या खंदकातून बाहेर पडलेले पाहून अब्दालीने लगेचच व्युहरचना युद्धास तयार केली व तोफखान्याने मराठ्यांचे युद्धास स्वागत केले. अब्दालीच्या तोफा छोट्या अंतरावरच्या असल्याने युद्धाच्या सुरुवातीला काहीच फरक पाडू शकल्या नाहीत. मराठ्यांतर्फे पहिले आक्रमण इब्राहिम खान तर्फे झाले जो आपले सामर्थ्य दाखवण्यास आतूर झालेला होता. मराठ्यांच्या तोफांची ताकद जरा जास्तच होती. तोफेचे गोळे अफगाण सेनेच्या डोक्यावरून गेले व अब्दालीचे फारसे नुकसान झाले नाही पण इब्राहिम खानने आपल्या कमानी रोहिल्यांवर भिडवल्या. मराठे गारदी, तिरंदाज व भालदार यांनी अफगाण व रोहिल्यांना मोठ्या प्रमाणावर कापून काढले. रोहिले मागे हटले, लढाईची सुरुवात इब्राहिमखानने गाजवली.
दरम्यान भाऊंनी मध्यातून हल्लबोल केला व अफगाण्यांची कत्तल आरंभली अफगाण्यांच्या तकड्या पळ काढण्याच्या बेतापर्यंत भाऊने यश मिळवले शाह वली ने नवाब उद दौलाला मदत करण्यास बोलवले परंत नवाब आपल्या जागेवरुन हलला नाही. त्यामुळे काही काळ अफगाण्यांच्या गोटात गोंधळाचे वातावरण होते. अफगाणी कमानी पळ काढण्याच्या बेतात आहे हे पाहून मराठ्यांच्या घोडदळाला संयम आवरला नाही व आक्रमण केले परंतु उपाशी जनावरांनी ऍनयुद्धसमयी हाय खाल्ली, कित्येक घोडे रस्त्यातच कोसळले व घोडदळाच्या घावाचा दणका अफगाण सेनेला देता आला नाही.
अंतिम सत्र -
पानिपतची तिसरी लढाई १८ व्या शतकात फैजाबाद शैलीने काढलेले पानिपतच्या युद्धाचे वर्णन. यात दोन्ही सैन्याची व्यूहरचना दिसते आहे. तोफांचा धुरळा सर्वत्र उडलेला दिसतो. तपकीरी घोड्यावर अब्दाली आहे. खालच्या बाजूला नजीबची कमान दर्शावली आहे. मराठ्यांच्या गोटात जखमी भाऊला व विस्कळीत मराठ्यांची कमान दर्शावली आहे. व डाव्या बाजूच्या कोपर्यात बुणग्यांच्या शिबीरात घुसून महिलांवर अत्याचार करणारे अब्दालीचे सैनिक दाखवले आहेत.
शेवटच्या सत्रात शिंद्यानी नजीब विरुद्ध आक्रमण केले, दत्ताजीच्या वधामुळे शिंद्याचे व नजीबचे वैर टोकाला पोहोचले होते. परंतु नजीबने शिंद्याच्या फौजेला यश मिळू दिले नाही. परंतु मराठ्यांचे रणांगणावर वर्चस्व अजूनही होते अफगाणी सेना वाकली होती परंतु अजून मोडली नव्हती.उजवी बाजू इब्राहिमखानने जवळपास कापून काढलीच होती. मध्य भागी भाऊंचा ताबा होता व अब्दालीच्या सेनेला दोन भागात विभागले होते व फक्त डाव्या बाजूला नजीबचा प्रतिकार अजूनही शाबूत होता. मराठ्यांनी आपल्या सेनेची वाताहत केलेली पाहून अब्दालीने आपली राखीव सेनेचा पत्ता काढला. त्याने १५००० कसलेले योद्धे त्यांच्या मागे बंदूकधारी घोडदळ व उंटावर लादलेल्या छोट्या तोफा बाहेर काढले व चाल केली. या उंटावर लादलेल्या छोट्या तोफा पानिपतच्या युद्धात निर्णायक ठरल्या, या तोफा घोडदळाविरुद्ध अतिशय परिणामकारक ठरल्या तसेच मराठ्यांचे घोडदळ अफगाणी बंदुकधार्यांपुढे टिकाव धरू शकले नाहीत्. राखीव फौज परिणाम कारक होत आहे हे पाहून त्याने अजून राखीव फौज पाठवली. जखमी सैनिकांनापण त्याने लढायला सांगितले. उरली सुरली १०००० ची राखीव फौजही त्याने नजीबच्या मदतीस पाठवली. याच वेळेस दमलेल्या मराठे सैनिकांना ताज्या दमाच्या सैनिकांचा सामना करायला लागला व मराठे मागे हटू लागले. याच वेळेस मागून पण तोफांना आपल्या फौजांना संरक्षण देता आले नाही. समोरुन येणार्या उंटावरील तोफांसारखा मराठी तोफखाना लवचिक नव्हता व युद्धाचे पारडे फिरले.
अंतर्गत उठाव -
कुंजपुरामध्ये मराठ्यांनी काही अफगाण सैनिकांना बंदी बनवले होते व युद्धाच्या परमोच्च बिंदूवर त्यांनी अंतर्गत उठाव केला व मराठ्यांच्या कमानीतच युद्ध चालू झाले. यामुळे मराठ्यांच्या सेनेला वाटले की अफगाण्यानी पाठीमागूनही हल्ला चढवला आहे व मराठ्यांच्या गोटात गोंधळाचे वातावरण झाले. भाऊंना आपली कमान विस्कळीत झाल्याचे लक्षात आले व याच वेळेस ताज्या दमाचे राखीव सैनिक पुढे न आणण्यात भाऊंची चूक झाली व हत्तीवरुन उतरले व स्वता: पुढे राहून प्रेरीत करणार होते. परंतु मराठ्यांना भाऊ आपल्या हत्तीवर दिसले नाहीत व भाऊ पडले असे मरठयांना वाटले व संपूर्ण मराठे सैनिकांनी एकच हाय खाल्ली. विश्वासराव दरम्यान गोळी लागून ठार झाले होते व सर्वत्र गोंधळाचे वातवरण झाले आपला पराभव झाला असे समजून मराठ्यांनी पळ काढला. अब्दालीने रणभूमीवर ताबा मिळवला. मराठे युद्ध हरले. अब्दाली जिंकला.
कत्तल
मराठ्यांच्या मुख्य सेनेने जरी पळ काढायला सुरुवत केली तरी अनेक मराठ्यांच्या तुकड्यांनी अंधार पडेपर्यंत प्रतिकार करत आपल्या तुकड्या शाबूत ठेवल्या व अंधारामध्ये सावधपणे पलायन केले.
पळणार्या मराठी सेनेवर व बुणग्यांवरती अफगाणी भालदार व घोडदळ अक्षरशः तुटून पडले. जो सैनिक, जो नागरिक दिसेल त्याला गाठून ठार मारले गेले. सर्वाधिक हाल स्त्रियांचे झाले. अनेकांनी पानिपतच्या विहिरीत जीव देऊन मानाचा मार्ग पत्करला. ज्या स्त्रिया पकडल्या गेल्या त्यांचे अफगाणी सेनेने अत्यंतिक हाल केले. नोंदीप्रमाणे अनेकांना दासी म्हणून घेउन जाण्यात आले. भाऊंनी पार्वतीबाईंच्या रक्षकांना आदेश दिले होते की जर काही विपरीत घडले तर त्यांच्या पत्नीला म्रुत्यूदान देण्यात यावे, परंतु पार्वतीबाई आपल्या रक्षकांसोबत पुण्याला सुखरूप पोहोचल्या.
अफगाण्यांनी दुसर्या दिवशीपण (जानेवारी १५ला) कत्तल चालू ठेवली. सैनिकांची व नागरिकांची मुंडकी विजय महोत्सव म्हणून मिरवण्यात आली. अनेक मराठ्यांच्या तुकड्यांना युद्धबंदी बनवण्यात आले. ज्यांनी ज्यांनी प्रतिकार केला त्यांना अत्यंत हालहाल करून मारण्यात आले. इब्राहिमखान गारदीने प्रचंड प्रतिकार केला म्हणून त्याचे अतिशय खासप्रकारे हाल केले व क्रूरपणे मारण्यात आले. युद्धात मराठ्यांचे ३५००० जण मारले गेले होते. तर त्यानंतरच्या कत्तलीत साधारणपणे १०००० जण मारले गेले असण्याची शक्यता आहे.
युद्धाचे परिणाम
मराठ्यांची दुर्दशा -
पानिपतचे तिसरे युद्ध हे भारताच्या इतिहासात निर्णायक व दूरगामी परिणाम करणारे ठरले. इंग्रज इतिहासकार एल्फीस्टनच्या मते पानिपतमध्ये मराठ्यांचा जसा सर्वांगीण व पूर्ण पराभव झाला असा क्वचितच कोणाचा झाला असेल, त्यामुळे मराठ्यांवर दुःखाचा डोंगरच कोसळला. या पराभवाच्या धक्क्यातून पेशवा व त्याचे मराठा राज्य हे कधीच सावरले गेले नाही. १४ जानेवारी १७६१ हा दिवस मराठ्यांच्या दृष्टीने महाप्रलयच ठरला. दुसरे दिवशी अनुपगीर गोसावी व काशीराज यांनी रणक्षेत्राला भेट दिली. तेव्हा त्यांना प्रेतांचे ३२ ढीग दिसून आले. त्यात २८ हजार प्रेते होती, दूरपर्यंत प्रेतांचे खच पडले होते. या लढाईत ९० हजार स्त्रियांना व मुलांना गुलाम बनविण्यात आले. भाऊसाहेब, विश्वासराव, इब्राहीमखान, यशवंतराव पवार, तुकोजी शिंदे, जनकोजी शिंदे ही मातब्बर मंडळी मारली गेली. मराठ्यांची कर्ती पिढीच या लढाईत नष्ट झाली. पानिपतमधून वाचलेले मराठे १५ दिवसांनी ग्वाल्हेरला पोहोचले. सुरजमल जाटने २० हजार नग्न मराठ्यांना घोंगड्या व प्रत्येकी २ रूपये दिले. इतकी दुर्दशा मराठ्यांची झाली होती. पानिपतमधील पराभवामुळे उत्तरेत मराठ्यांच्या तलवारीचा धाकही नष्ट झाला.
अब्दालीचा शेवटचा विजय -
या लढाईत अब्दालीला मोठा विजय प्राप्त झाला असला तरी त्याला फार मोठा लाभ झाला असे म्हणता येणार नाही. उपासमारीने मरणार्या मराठ्यांच्या छावणीत द्रव्याची लुट कोठून मिळणार? दिल्लीतही संपत्ती आधीच लुटली गेल्यामुळे तेथे जाऊनही अब्दालीच्या हाती फारसे काही लागले नाही. उजाड झालेल्या व भयानक उदासीनता पसरलेल्या उत्तरेत अधिक काळ राहण्यास अब्दालीच्या सैन्याने नकार दिला. अब्दालीला मात्र सधन पंजाब कायमस्वरूपी आपल्या ताब्यात असावा असे वाटत होते. त्यामुळे मायदेशी जातांना तो पंजाबमध्ये गेला असता त्याला शीखांचा प्रचंड प्रतिकार सहन करावा लागला. शीखांनी अब्दालीशी १७६७ पर्यंत संघर्ष करून पंजाब मुक्त केला. अब्दालीचे सर्व परिश्रम वाया गेले. १४ एप्रिल १७७२ मध्ये त्याचा मृत्यु झाला.
नानासाहेबांचा मृत्यु -
पानिपतमध्ये भाऊ संकटात असल्याची खबर पेशव्यांना उशिरा समजली तरीही त्यांनी उत्तरेत जाण्याची तयारी केली. मार्गक्रमण करीत असता उत्तरेतील बातम्या येणेच बंद झाल्याने नानासाहेब चिंतातुर झाले. भेलसा येथे मुक्कामी असताना २४ जानेवारीस पानिपतच्या पराभवाची बातमी मिळाली. त्यांना मिळालेल्या सांकेतिक पत्रात दोन मोती गळाले, २७ मोहोरा गमावल्या, चांदी व तांब्याची नाणी किती गेली याची गणतीच नाही, असा निरोप होता. भाऊ, मुलगा व अनेक नातेवाईकांच्या मृत्युचा नानासाहेबांना मोठा धक्का बसला, त्यांची मनःशांती नष्ट झाली. दिल्लीत न जाता त्यांनी परत फिरण्याचा निर्णय घेतला. पानिपतवर कुचराई केल्याबद्दल पेशव्यांनी शिंदे, होळकर, पवार यांच्या महालांची जप्ती केली पण ती काही काळापुरतीच! दिवसेंदिवस नानासाहेब भ्रमिष्ठ होऊन तब्येत खालावत गेली. त्यातच २३ जून १७६१ रोजी त्यांचा मृत्यू झाला आणि मराठेशाहीला आणखी एक धक्का बसला.
मोगलांची दुर्दशा -
पानिपतच्या विजयानंतर अब्दालीने दिल्लीचा ताबा घेतला. मोगल बादशहा शहाआलम हा दिल्लीतून पळून गेला होता व त्याने अलाहाबादमध्ये आश्रय घेतला होता. रक्षणकर्त्या मराठ्यांचा नाश झाल्याने मोगल सत्तेला जबरदस्त धक्का बसला. अब्दाली मायदेशी निघून गेल्यानंतर दिल्लीची सत्ता नजीबखानाने मिळवली. मोगल साम्राज्य माधवरावाच्या काळात पुन्हा सत्तेवर आले असले तरी केवळ ते नाममात्रच होते.
इंग्रजांचा वाढता प्रभाव -
नानासाहेब पेशव्यांच्या कारकिर्दीत मराठे संपूर्ण हिंदूस्थानात अंमल बसवीत असतांना मोगल साम्राज्याती सधन अशा बंगाल सुभ्यात इंग्रज आपल्या बुद्धीने व हिंमतीने राज्यसाधना करीत होते. पानिपतच्या लढाईमुळे मोगली राज्यासाठी भांडणार्या मराठे व मुसलमान सत्ता दुर्बळ झाल्या व त्याचा फायदा नवी उदय पावणार्य इंग्रजी सत्तेला मिळाला. मराठ्यांच्या पराभवामुळे उत्तर हिंदूस्थानात मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली ती भरून काढण्याचे कार्य इंग्रजी सत्तेने केले.
शीखांची सत्ता स्थापना -
पानिपतच्या लढाईपूर्वी पंजाबमध्ये मोगल, मराठे, अब्दाली व शीख यांच्यात प्रखर सत्तास्पर्धा सुरू होती. पंजाबचे मूळ मालक शीख असूनही त्यांच्या मालकीचा पंजाभ होऊ शकत नव्हता. कधी मोगलांच्या, कधी अब्दालीच्या तर कधी मराठ्यांच्या ताब्यात जात होता. सरहद्दीवरील प्रदेश असल्यामुळे सतत परक्या आक्रमणाचा धोका असल्याने शीखांना त्यांच्या अत्याचारांना कायम तोंड द्यावे लागत होते. पानिपत युद्धामुळे ही परिस्थिती बदलली. मराठ्यांचा पराभव झाला व अब्दालीही अफगाणमध्ये निघून गेला त्यामुळे पंजाबमध्ये शीखांची सत्ता स्थापन होऊ शकली.
हैदरअलीचा उदय -
पानिपतच्या पराभवामूळे कर्नाटकातून मराठ्यांचा पाया उखडला गेला. मराठ्यांनी कर्नाटकचा प्रदेश पूर्णपणे जिंकला होता. पानिपतच्या पराभवामुळे पुढे काही काळ त्यांना कर्नाटककडे लक्ष देण्यास सवड मिळाली नाही. याचा फायदा घेऊन म्हैसुरच्या हिंदू राजाची सत्ता नष्ट करून महत्त्वाकांक्षी व धाडसी हैदरअलीने आपली सत्ता स्थापन केली. हैदरअलीच्या उदयामुळे मराठ्यांच्या शत्रूंमध्ये आणखी एका शत्रूची वाढ झाली कारण पुढील काळात हैदरअलीने हयातभर व त्याच्यानंतर त्याच्या मुलाने टिपू सुलतानने मराठ्यांना कायम त्रास दिला. पानिपतचे युद्ध झाले नसते किंवा या युद्धात मराठ्यांचा विजय झाला असता तर मराठ्यांनी हैदरला डोके वर काढून दिले नसते हे सुद्धा तितकेच खरे आहे.
माधवराव पेशव्यांचा उदय -
नानासाहेबांना विश्वासराव, माधवराव व नारायणराव ही तीन मुले होती. परंपरेनुसार नानासाहेबांनंतर पेशवेपदावर त्यांचा मोठा मुलगा विश्वासरावचा अधिकार होता. परंतु नियतीला ते मान्य नव्हते. पानिपतच्या संग्रामात लढता-लढता विश्वासराव ठार झाला व लवकरच नानासाहेबांचाही मृत्यु झाला. त्यामुळे दरबारात नानासाहेबांच्या दुसर्या मुलाला म्हणजे माधवरावला पेशवेपद देण्याचा निर्णय घेतला गेला आणि माधवरावाने आपल्या कर्तबगारीच्या जोरावर अत्यंत कमी काळात पानिपतच्या पराभवाचा कलंक पुसून टाकला.
उभयपक्षी चुका
मराठ्यांच्या चुका -
युद्धव्यवस्थापन -
अनेक इतिहासकारांनी केलेल्या अभ्यासानुसार मराठ्यांनी केलेली युद्धाची तयारी फारच तोकडी होती. बखरीतील वर्णनानुसार महाराष्ट्रातून ते उत्तर भारतात पोहचेपर्यंत अनंत अडचणींना तोंड देत सेना पोहोचली. पेशव्यांना सुरुवातीपासून रसदेचा तुटवडा जाणवत होता. रसद पुरवठ्याचे काहीच नियोजन नव्हते.
बांडगूळ बुणगे -
यातच पेशव्यांची धार्मिक वृती या युद्धात अतिमारक ठरली. पुण्यातील राजकारण्यांच्या दबावाला बळी पडून यात्रेकरूंना फौजेबरोबर मोहिमेत सामील करण्यात आले. एकास एक असे होत त्यांची संख्या लाखापेक्षाहीजास्त झाली. सैन्याच्या मोहिमेच्या संरक्षणात आपल्याला उत्तर भारतातील देवस्थाने (तीर्थस्थाने) पहायला मिळतील या भाबड्या कल्पनेमुळे सर्वजण आले होते. तसेच गेली ५० वर्षे मराठे जवळपास अपराजितच होते. पहिल्या मोहिमांमध्ये अनेकांनी विनासायास उत्तर भारत यात्रा पूर्ण केली होती व यावेळेस तसेच घडेल असे वाटले. कदाचित कुणालाच मोहिमेचे गांभीर्य कळाले नाही. या यात्रेकरूंमध्ये वृद्ध-बायका मुले यांचीच संख्या जास्त होती ज्यांचा प्रत्यक्ष युद्धाच्यावेळेस काहीच उपयोग झाला नाही. उलट दोन गोष्टी अत्यंत नुकसानकारक ठरल्या - पहिली म्हणजे मिळालेल्या रसदेमधील मोठा हिस्सा या बुणग्यांना जात होता, त्याचा अतिप्रचंड ताण सेनेवर पडला. युद्धाअगोदर काही आठवडे नोंदीनुसार माणसांना खायला नाही म्हणून घोडे हत्ती यांचा चारा बंद करण्यात आला त्याचा परिणाम प्रत्यक्ष युद्धाच्या वेळेस दिसला. दुसरी गोष्ट म्हणजे बुणग्यांच्या मोठ्या संख्येमुळे मराठ्यांच्या आक्रमणाच्या अनेक योजना कागदावरच राहिल्या. मराठ्यांना लढाईच्या वेळेस बुगण्यांच्या संरक्षणासाठी कित्येक सैनिकांच्या तुकड्या खर्ची पडल्या तसेच बुणग्यांना घेउन लढाईचा हा मार्ग शक्य नाही म्हणून अनेक उपायकारक आक्रमणाच्या योजना बारगळल्या. थोरल्या बाजीरावाच्या काळापासून मराठ्यांची सेना तुफानी वेगासाठी प्रसिद्ध होती तो वेग, चपळता व धडाडी कुठेच दिसली नाही.
राजकारण -
मराठ्यांचे पराभवाचे सर्वात महत्त्वाचे कारण खरेतर त्यांना इतर राज्यकर्त्यांकडून मदत मिळवण्यात आलेले अपयश हे होय. यात खरेतर त्याआगोदरचा ५० - ६० वर्षाचा इतिहास कारणीभूत होता. मराठ्यांनी भारतात सर्वत्र सद्दी चालवली होती. यामुळे सर्वत्र मराठ्यांबद्दल बरीचशी दहशत उत्तर भारतातील राजकर्त्यामध्ये होती. मराठ्यांनी मांडलिक राज्याकडून मोठ्या प्रमाणावर कर वसूल केल्यामुळे अनेक राज्यामध्ये नाराजी होती तसेच अनेकांना दुखावले होते. त्यामुळे ऐनवेळेस कोणीही त्यांच्या मदतीला आले नाही. परकीय सत्तेविरुद्ध पुन्हा एकदा एकत्र विरोध करण्याचे त्यांचे आवाहन वाया गेले. बहुतेकांच्या मते मराठ्यांनीच अब्दालीला चुचकारले आहे तेच त्याचे काय ते बघतील असा त्या वेळेसच्या राजकारण्यांचा सुर होता. याउलट अब्दालीने मराठ्यांना राजकारणातही मराठ्यांना कुठेही मदत मिळणार नाही याची पूर्णपणे काळजी घेतली. त्याने व त्याच्या मित्र पक्षांनी याबाबतीत मराठ्यांची पूर्णपणे नाकेबंदी केली होती. मराठ्यांना एकटेच लढावे लागले व त्याचा प्रचंड तोटा त्यांना झाला.
दुराण्यांच्या चुका
मराठ्यांप्रमाणे अब्दालीनेही अनेक चुका केल्या. अब्दालीचा मराठी सेनेच्या सामर्थ्याचा अंदाज चुकला होता. त्याचा तोफखाना मराठ्यांच्या तोफखान्यापुढे अगदीच कुचकामी ठरला. त्याची त्याला मोठी किंमत मोजावी लागली. त्याचीदेखील ३५-४० हजार इतकी सेना मारली गेली. युद्धानंतर अब्दालीकडे अजून प्रतिकार करू शकेल असे सैन्यच उरले नाही. म्हणूनच अब्दालीने मराठे अजून फौज एकत्र करून हल्ला करणार आहेत या बातमीवर आपला गाशा गुंडाळण्याचा निर्णय घेतला.
पानिपत मोहिमेचा खर्च ९०० कोटी रुपये.
(The decisive Maratha - Afghan war in 1761 at Panipat Total expenditure 900 Crore Rupees)
भारताच्या व मराठ्यांच्या इतिहासाच्या दृष्टीने निर्णायक ठरलेल्या पानिपतच्या लढाईचा एकूण खर्च किती आला असेल असे वाटते? आतापर्यंत, या लढाईत किती शूर वीर मराठ्यांनी गमावले याची माहिती आपण इतिहासात नेहमीच वाचतो. परंतु ही एवढी मोठी व दीर्घ काल चाललेली मोहिम करण्यासाठी पेशवे दरबारला एकूण किती खर्च आला याचा निश्चित आकडा कोणासच माहीत नव्हता.
अहमद शाह अबदाली दिल्लीवर चालून येत आहे हे समजताच मार्च १९ १७६० रोजी सदाशिव राव भाऊ यांना दारूगोळा, सैन्य व आवश्यक तेवढे धन देऊन नानासाहेब पेशवे यांनी दिल्लीचे संरक्षण करण्यासाठी पाठ्वले होते. १ ऑगस्ट १७६० ला मराठे दिल्लीला पोचले होते व दुसर्या दिवशी त्यांनी दिल्लीचा ताबा घेतला होता. 14 ऑगस्ट रोजी त्यांनी लाल किल्ला ताब्यात घेतला होता.
अहमद शाह अबदाली आणि मराठी फौज यांच्यातील युद्ध १४ जानेवारी १७६१ ला पानिपत येथे लढले गेले होते व या लढाईमध्ये मराठ्यांचा दारूण पराभव झाला होता. युद्धक्षेत्रावर मराठ्यांचा पराभव झाला असला तरी नंतरच्या काळात या मोहिमेवर पेशवे दरबारचा खर्च चालूच होता. पेशवे दरबारच्या हिशोबनीसांनी या युद्धावर झालेल्या खर्चाचा हिशोब अगदी बारीक तपशीलासह लिहून ठेवलेला आहे. या खर्चामध्ये कोणत्या प्रकारचा दारूगोळा मराठ्यांनी वापरला होता? ऊंट, हत्ती यावर किती खर्च झाला होता? याची नोंद आहे. मराठ्यांनी 18 कारखाने युद्धक्षेत्रात उभे केले होते. या कारखान्यात लोहार, सुतार, मिस्त्री आणि मजूर यांच्यावरचा खर्च, सैन्यासाठी गुप्त हेर, न्हावी,शिंपी आणि पहारेकरी यांच्यावरचा खर्च, या सर्व खर्चांची नोंद या हिशोबनीसांनी ठेवलेली आहे.
पेशवे दरबारने या युद्धावर एकूण ९२,२३,२४२ रुपये आणि ९ आणे (बाण्णव लाख तेवीस हजार दोनशे बेचाळीस रुपये व नऊ आणे) एवढा खर्च केला होता. या खर्चात २ ऑगस्टला दिली ताब्यात घेतल्यावर पुढचे साडेतीन महिने शिबंदीवरील खर्च, दिल्लीतील देवळे व मशिदी यांना दिलेल्या देणग्या, संत ,फकिर, मौलवी यांना दिलेली बिदागी यावरील खर्च निराळा दाखवलेला आहे. हा खर्च १४,७१,३२६ रुपये (चवदा लाख एकात्तर हजार तीनशे सव्वीस रुपये) एवढा झाला होता.
१७६१ ते २०११ या कालातील रुपयाच्या किंमतीतील फरक लक्षात घेतला तर आजच्या रुपयाच्या किंमतीनुसार मोहिमेचा एकूण खर्च ९०० कोटी रुपये व दिल्लीतील खर्च १५० कोटी रुपये येतो. पुण्यातील एक इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी नुकतेच काही नवीन मोडी कागदपत्रांचे वाचन केले असता ही माहिती उजेडात आली. हे पैसे मराठ्यांनी कसे उभे केले असतील याची कल्पना या कागदपत्रांवरून येते असे श्री. बलकवडे यांचे मत आहे.
श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या काळात मराठी सत्ता किती वैभवसंपन्न असली पाहिजे याची एक चुणूक या हिशोबामुळे उजेडात आली आहे.
5 Apr 2016 - 1:57 pm | उगा काहितरीच
धन्यवाद ... सविस्तर प्रतिसाद नंतर वाचतो.
5 Apr 2016 - 4:29 pm | भंकस बाबा
अतिशय सोप्या व् ओघवत्या भाषेत मांडले आहे तुम्ही! धन्यवाद.
फ़क्त एक ठिगळ लावू इच्छितो, पानीपत युद्धांनंतर मराठे तात्पुरते शक्तिहीन झाले असले तरी थोड्याच काळात त्यांनी गेलेले वैभव परत मिळवले . आपले दुर्दैव असे की माधवरावाची कारकीर्द अल्प ठरली व् रघुनाथरावाच्या सत्तालालसेमुळे मराठ्यांनी इंग्रजांना भारतात पाय भक्कम रोवायला मदत केली. हे माझे मत आहे, यावर प्रतिसाद अपेक्षित आहे. जरी विरोधी असला तरि, चर्चा करायला आवडेल.
5 Apr 2016 - 5:05 pm | सतिश पाटील
पण हितून पुढे माझ ज्ञान कमी आहे.
त्यामुळे आपला पास.
फकस्त चर्चा वाचायच्या.
5 Apr 2016 - 8:40 pm | संपत
खूप धन्यवाद. ह्या प्रतिक्रीयेखातर वाचन खुण साठवली आहे.
5 Apr 2016 - 11:42 pm | उगा काहितरीच
आत्ता वाचला पूर्ण प्रतिसाद . अगदी व्यवस्थित लिहीलं आहे. बरीच नवीन माहिती कळाली . खरंच मनापासून धन्यवाद . संदर्भ कोणते वापरलेत ?
6 Apr 2016 - 1:59 am | तर्राट जोकर
संदर्भः
१. http://nj9939.blogspot.in/2012/01/panipat.html
२. https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4...
३.http://hobbyhub.mogaraafulalaa.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%...
४. http://shivpratap96.weebly.com/2346236623442367234623402366-23302366-231...
५. http://www.yuvasahyadri.com/maharashtra-desha/literature/panipat-wat-iii
६. https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4...
थोडक्यात, माहिती उत्तम आहे, फक्त कॉपी-पेस्ट आहे.
प्रतिसाददात्याने पुढे चर्चा करण्यास असमर्थतता दाखवण्यामागे हेही एक कारण असू शकेल.
6 Apr 2016 - 12:03 am | डॉ सुहास म्हात्रे
अत्यंत सविस्तर व माहितीने भरलेला प्रतिसाद !
5 Apr 2016 - 2:21 pm | हेमंत लाटकर
मल्हारराव होळकरांनी हातात आलेल्या नजीब खानाला जीवदान न देता मारले असते तर पानिपत झाले नसते. पेशवे धोतरे बडवायला लावतील असा होळकरांचा विचार.
5 Apr 2016 - 3:00 pm | प्रसाद_१९८२
विचार केला होता, मल्हारराव होळकर व विंचुरकरांनी.
हाच विचार त्यांनी 'शिंदे ब्रदर्संना' ही पटवून द्यायचा प्रयत्न केला होता. पण बिच्चार्यांनी होळकरांचे ऐकले नाहि आणि हकनाक जिव गमावुन बसले दत्ताजी शिंदे बुराडी घाटावर.
5 Apr 2016 - 4:26 pm | बबन ताम्बे
छत्रपती शाहुंनंतर जे छत्रपती गादीवर आले त्यांची भूमिका भारताच्या राष्ट्रपतींसारखी होती का ? कारण पानीपत ते पेशवाई बुडेपर्यंत त्यांनी स्वतःचे राज्य (जे शिवाजी, संभाजी राजासारख्यांनी, येसूबाई, ताराबाई, संताजी, धनाजी वगैरे सारख्या वीर /वीरांगनांनी मोठया शर्थीने उभे केले, राखले होते) राखण्यासाठी काहीच केलेले दिसत नाही. माझ्या तरी वाचनात असे काही आलेले नाही. कुणी जाणकार यावर प्रकाश पाडेल काय ?
5 Apr 2016 - 5:40 pm | हेमंत लाटकर
पानिपत युद्धात अब्दालीचेही नुकसान झाले. त्यानंतर अब्दाली परत आला नाही.
5 Apr 2016 - 5:48 pm | चांदणे संदीप
याच्यापेक्षा मोठा फायदा तरी एखाद्याला कोणता असू शकतो?
पंजाबातल्या शिखांनी वारंवार केलेल्या उठावामुळे तो हैराण झाला व त्याच्या भारतस्वार्यांना खर्या अर्थाने खीळ बसली. शिवाय, पानिपताच्या तिसर्या लढाईला भारताच्या तसेच महाराष्ट्राच्या इतिहासात जे महत्वाचे स्थान आहे तेवढे महत्व अफगाणांनी अजूनही दिले नसल्याचे वाटते!
Sandy
5 Apr 2016 - 6:48 pm | lgodbole
पानिपतनंतर जे काही मिळाले ते घेउन अब्दाली मायभुमीत जाउन सुखात राहिला व आज तो अफगाणिस्तानचा राष्ट्रपिता म्हणुन ओळखला जातो.
अब्दालीने लिहिलेली कविता.. ( भाषांतर )
The most famous Pashto poem he wrote was Love of a Nation:
By blood, we are immersed in love of you.
The youth lose their heads for your sake.
I come to you and my heart finds rest.
Away from you, grief clings to my heart like a snake.
I forget the throne of Delhi
when I remember the mountain tops of my Afghan land.
If I must choose between the world and you,
I shall not hesitate to claim your barren deserts as my own.
5 Apr 2016 - 7:14 pm | lgodbole
पानिपतानंतर पेशवे व अब्दाली यानी एकमेकाना पत्रे व भेटवस्तु पाठवुन पानिपत हे दु:स्वप्न असल्याप्रमाणे विसरुनपरपरस्परनी आपापल्या प्रांतात सुखात रहावे असे सुचवले होते म्हणे.
असा एक सकाळमध्ये लेख आला होता.
तो लेख मिळाला नाही.
हा मिळाला.... खालच्या प्रतिक्रिया मस्त आहेत.
http://www.esakal.com/CricketCarnival/NewsDetails.aspx?NewsId=5337876034...
5 Apr 2016 - 7:25 pm | lgodbole
http://www.maayboli.com/node/32571
5 Apr 2016 - 8:53 pm | कल्पतरू
सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. लवकरच पानिपतवर जाणार आहे म्हणून माहिती साठवायचा आटापिटा करतोय. जमेल तेवढी माहिती गोळा करून १७६१ च्या पानिपतावर जाईन म्हणतोय, २०१६ च्या पानिपतावर जाण्यात काही मजा नाही.
5 Apr 2016 - 11:31 pm | गामा पैलवान
कल्पतरू,
राघोबादादांच्या सहभागाविषयी (लेखातला सहावा मुद्दा) थोडं शोधकाम केलं. त्यात ही माहिती सापडली : http://prabodhankar.org/node/245/page/0/40
हे कितपत खरं आहे माहीत नाही. मात्र लेखक प्रबोधनकार ठाकरे असल्याने लेखन विश्वासार्ह असावे. ते जर खरं असेल तर पानिपत मोहिमेस ऐन शनिवारवाड्यातून वा पुणे दरबारातूनच अपशकुन केले गेलेले असू शकतात. अधिक माहिती मिळवणं जरूरीचं आहे. पडद्याआडचं पानिपत शोधणं रंजक, रोचक आणि ज्ञानवर्धक ठरावं.
आ.न.,
-गा.पै.
6 Apr 2016 - 2:21 am | स्रुजा
कायस्थांची बाजू वरचढ दाखवण्याचा प्रयत्न वाटला. लेखामधला मुद्दा कालबाह्य वाटतोय आता.
6 Apr 2016 - 2:59 am | गामा पैलवान
स्रुजा,
कायस्थांची बाजू वरचढ दाखवणारं पुस्तक आहेच मुळी. जो काही मजकूर असेल, त्याचा उपयोग पानिपतासंबंधी अद्यापि अज्ञात असलेली माहिती उजेडात आणण्यासाठी करायचा आहे.
आ.न.,
-गा.पै.