१.
आपण खाण्यासाठी शेंगदाणे, सुर्यफुल, सोयाबीनचे तेल वापरतो. मग खोबरेल तेल का वापरत नाही?
उपप्रश्न : डोक्याला लावायला खोबरेल तेलच का वापरतात? त्या Parachute च्या बाटलीवर Hair oil असा उल्लेख कोठेच नसतो.
२.
कच्चे पोहे कसे बनवतात?
शाबूदाणा, चुरमुरे वगैरे कसे बनवतात?
३.
जे लोक जन्मापासून आंधळे आहेत अशा लोकांचा जगाविषयी द्रष्टीकोन कसा असावा?
अशा लोकांना जेव्हा शस्त्रक्रियेनंतर द्रष्टी येते तेव्हा त्यांचा अनुभव काय असावा?
४.
संमोहन (hypnotism) विषयी आपले काय मत आहे. हे थोतांड की खरंच काही असतं?
संमोहीत व्यक्तीच्या पूर्वायुष्याची माहिती काढता येऊ शकते . यात कितपत तथ्य आहे.
संमोहनाविषयी काही रोचक किस्से आपल्याकडे आहेत काय?
५.
ख्रिश्चन, ज्यू आणि मुस्लिम यांच्यामध्ये नक्की काय कनेक्शन आहे?
उपप्रश्न : ज्यू विरोधाचे नक्की काय कारण आहे? सोप्या भाषेत कोणी सांगेल काय?
६.
पिरॅमिडस् कोणी आणि कसे बांधले?
क्रॉप सर्कल विषयी तुम्ही ऐकून आहात काय? असे अजून रंजक प्रकार तुम्हाला माहिती आहेत काय?
प्रतिक्रिया
15 Mar 2016 - 9:11 pm | श्रीरंग_जोशी
माझ्या माहितीप्रमाणे दक्षिण भारताच्या किनार्यांवरील भागांत जसे केरळ अन कर्नाटक खोबरेल तेलाचा वापर स्वैंपाकासाठी केला जातो.
15 Mar 2016 - 9:12 pm | गवि
वापरतात की खोबरेल खाण्यासाठी. पॅराशूट प्लेन हेयर ऑईल बाटलीवर लिहिलेलंही असतं की हे खाद्य तेल आहे.
दक्षिणेकडे भरपूर वापरतात. केरळी चिप्स वगैरे खोबरेलातच बनवतात.
16 Mar 2016 - 2:39 am | यशोधरा
कोकणातही वापरतात.
15 Mar 2016 - 9:16 pm | होबासराव
पण ते खोबरेल तेल आपण जे डोक्याला लावतो ते नसते तर शुद्ध खोबरेल तेल असत. फक्त खोबर्यापासुन बनवलेल.
15 Mar 2016 - 9:26 pm | गॅरी ट्रुमन
बाकीच्या प्रश्नांविषयी पास. तरीही--
याचे कारण बरेच पूर्वी घडलेल्या घटनांमध्ये आहे. ज्यू लोक ओल्ड टेस्टामेन्ट मानतात आणि ओल्ड टेस्टामेन्टमध्ये असा उल्लेख आहे की भविष्यात एक मसिहा येऊन जगाला देवाकडे कसे जायचे त्याचा मार्ग दाखवेल. ख्रिस्ती लोक मानतात की तो मसिहा म्हणजे येशू ख्रिस्तच तर ज्यू लोक त्या मसिहाची अजूनही वाट बघत आहेत.ख्रिस्ती लोक न्यू टेस्टामेन्ट मानतात. त्या न्यू टेस्टामेन्टमध्ये व्याजावर कर्जाऊ पैसे द्यायला बंदी आहे.आणि जर पैसे व्याजावर दिले नाहीत तर ते बिझनेस मॉडेल कधीच यशस्वी होऊ शकणार नाही.तेव्हा ख्रिस्ती लोकांना बॅंकिंगमध्ये यायला न्यू टेस्टामेन्टप्रमाणे बंदी होती. तशी बंदी ज्यूंनाही ओल्ड टेस्टामेन्टमध्ये होती.पण त्याला एक अपवाद होता.म्हणजे ज्यूंनी आपल्या भावांना (इतर ज्यूंना) पैसे व्याजावर द्यायचे नाहीत पण ज्यू सोडून इतरांना तसे पैसे व्याजावर द्यायला हरकत नव्हती.
म्हणजेच ज्यूंनी ख्रिस्ती लोकांना व्याजावर पैसे दिलेले चालू शकणार होते.त्यातूनच युरोपातील पहिल्या बॅंकेची व्हेनिसमध्ये स्थापना ७००-८०० वर्षांपूर्वी झाली. एक ज्यू मनुष्य (नाव विसरलो) व्हेनिसमधील कालव्याच्या काठावर टेबल टाकून पैसे उधार द्यायला बसत असे आणि ती बॅंकेची सुरवात होती.
एकतर ज्यूंना ते येशू ख्रिस्ताला मसीहा मानत नाहीत म्हणून त्यांच्याविरूध्द वातावरण होते. त्यातच त्यांनी सावकारी सुरू केली म्हणून त्यात भर पडली. सावकार या वर्गाविषयी मत कुठेच चांगले नसते. तेच युरोपातही झाले.
परंपरेतून ज्यू लोकांचे फायनान्समध्ये डोके चांगले चालते.जगातील जवळपास सर्व इन्व्हेस्टमेन्ट बॅंकांचे संस्थापक (गोल्डमन सॅक्स, मॉर्गन स्टॅन्ले इत्यादी) ज्यू होते. आजही या उद्योगात ज्यू लोकांची संख्या लक्षणीय आहे.
16 Mar 2016 - 6:24 pm | पक्षी
पण हिटलर च्या जू विरोधाचं कारण काय होत?
१. येशू ख्रिस्ताला मसीहा न माननं
२. सावकारी सुरू करणं
15 Mar 2016 - 9:32 pm | आदूबाळ
याचं उत्तर मोठं रंजक आहे.
खाद्यतेलांवर अबकारी कर (एक्साईज) नसतो. केसांना लावायचं तेल हे सौंदर्यप्रसाधनांच्या एक्साईज हेडिंगखाली येतं आणि त्यावर ८% अबकारी कर असतो.
मॅरिको (पॅराशूटचे उत्पादक), डाबर इ० आपल्या तेलांना खाद्यतेल मानून अबकारी कर लावत नव्हते. रंगाप्पांनी वर म्हटल्याप्रमाणे ते खरोखर खाण्यासाठी वापरलं जातं. पिव्वर प्याराशूटमध्ये तळलेले 'टॅपिओका'चे (ज्यापासून साबुदाणा बनवतात ते झाड) वेफर्स मीही खाल्ले आहेत. हेअर ऑईल असा उल्लेख केला तर ते सौंदर्यप्रसाधन ठरून ८% कर बसेल.
एक्साईज खात्याच्या लक्षात आलं की हे लोक शेंड्या लावत आहेत. म्हणून २००९ साली २०० मिलीच्या आतल्या तेलाच्या पॅकवर ८% कर लावावा असं एक सर्क्युलर काढलं. त्याविरोधात मॅरिको कोर्टात गेलं आहे. पुढे काय झालं काय माहीत.
16 Mar 2016 - 8:38 am | सुनील
प्रश्न अपुर्या माहितीवर आधारीत आहे. कोकण तसेच दक्षिण भारतात खोबरेल तेल खाण्यासाठी सर्रास वापरले जाते. आमच्या घरी पॅरॅशूट खोबरेल तेलाची बाटली फक्त खाण्यासाठीच वापरली जाते. विशेषतः डोश्यासोबत जी कोरडी चटणी (मुळगापुडी) घेतो तीत थोडे खोबरेल तेल टाकले की जो स्वाद येतो त्याला तोड नाही!
त्यावर हेअर ऑइल असा उल्लेख का नसतो याचेही उत्तर वर आदूबाळ यांनी दिले आहेच.
कच्चे म्हणजे नक्की काय ते समजले नाही. पण पोहे घरगुती पद्धतीने जनरली कसे बनवतात ते सांगतो.
भात (फोलपटासहित तांदूळ) साधारणता ३ दिवस पाण्यात भिजवायचा. पाणी दर दिवशी बदलायचे. नंतर तो भिजलेला भात उन्हात सुकवायचा. आणि मग उखळीत कांडायचा.
हल्ली पोह्याच्या गिरण्या असतात. त्यात पोहे कसे बनतात ते ठाऊक नाही.
याचे उत्तर गॅरी ट्रुमन यांनी दिले आहेच. त्यात थोडी भर (मुस्लिमांबाबत)
ज्यू, ख्रिस्ती आणि मुस्लिम या तिन्ही धर्मांची मूळ विचारधारा एकच. अब्राहमपासून बनलेले हे तिन्ही अब्राहमिक धर्म.
ज्याना मोझेसमध्ये आपला तारणहार दिसला, ते ज्यू.
ज्यांना मोझेस पूज्य आहे पण तारणहार मात्र येशू वाटतो, ते ख्रिस्ती.
ज्यांना मोझेस आणि येशू दोन्ही पूज्य आहेत पण तारणहार मात्र महंमद वाटतो, ते मुस्लिम.
16 Mar 2016 - 11:38 am | विजुभाऊ
पॅराशूट तेलात पूर्वी थोडेसे एरंडीचे तेल ( कॅस्टर ऑईल) मिसळलेले असायचे.
केरळमधील काहीनी ते खाद्या तेल म्हणून वापरले त्यामुळे लोकाना उलट्या जुलाब झाले. लोकाने त्याबद्दल ग्राहक न्यायालयात तक्रार केली.
त्या नंतर पॅराशूट तेलाच्या बाटलीवर तसा उल्लेख यायला लागला
16 Mar 2016 - 12:16 pm | यसवायजी
शाबूदाणा >>
याचे गुडघ्याइतक्या उंचीचे रोप असतात. साबुदाना कंद म्हणतात त्यांना. पेस्ट करून त्याचे गोळे करतात आणी सुकवतात.
रोप असे - link
ही link .
16 Mar 2016 - 2:35 pm | मन१
प्रश्न क्र ५ बद्दल थोडंफार ह्या मालिकेत सापडेल :-
इब्राहिमी धर्म -लोक कथा, घटना व श्रद्धा (मध्यपूर्व, ज्यू-क्श्रिश्चन- इस्लाम आणि जग )
http://www.misalpav.com/node/17293
http://www.misalpav.com/node/17324
http://www.misalpav.com/node/17365
http://www.misalpav.com/node/17500
16 Mar 2016 - 2:38 pm | मोदक
जे लोक जन्मापासून आंधळे आहेत अशा लोकांचा जगाविषयी द्रष्टीकोन कसा असावा?
अशा लोकांना जेव्हा शस्त्रक्रियेनंतर द्रष्टी येते तेव्हा त्यांचा अनुभव काय असावा?
या प्रश्नासोबत जन्मापासून दृष्टीहीन लोक स्वप्न कसे बघत असतील आणि ते कसे Visualize करत असतील असाही एक उपप्रश्न जोडून घ्यावा.
16 Mar 2016 - 2:46 pm | शि बि आय
संमोहन किंवा मानासोपाचाराविषयी मी ह्या माझ्या " http://www.misalpav.com/node/32031 " मागील धाग्यात विचारणा केली होती.
मानसोपचारतज्ञ संमोहनाद्वारे माणसाच्या मागील आयुष्यातील काही गोष्टी ठराविक उपचार पद्धतीचा अवलंब करून जाणून घेतात आणि त्यावर उपचार ही करतात.
माझ्या जवळील व्यक्ती जेव्हा अशा प्रकारचे उपचार घेणार आहे असे समजले आणि त्याबद्दल जाणून घेण्यासाठी मी काही साईट्स देखील पहिल्या परंतू त्या साईट्स वरील माहिती परिपूर्ण असूनही तशी समाधानकारक नाही वाटली म्हणून मग धाग्याचा प्रपंच करावा लागला. धाग्यावारही समाधानकारक माहिती न मिळल्यामुळे आम्ही मानसोपचारतज्ञांशी सविस्तर चर्चा करून त्या भितीसाठी उपचार पद्धतीचा अवलंब करायचा ठरवला. त्याचा परिणाम म्हणून कि काय त्या व्यक्तीला वाटणारी भीती ७०% प्रमाणात कमी झाली. तसेच ती व्यक्ती २ ते ३ वर्षाची असताना तिला ती भीती कोणी दाखवली आणि का ते देखील समजले. झोपेतून किंचाळत जागे होणे किंवा झोपेत रडणे असे प्रकार जवळ जवळ थांबले आहेत.
मला त्या थेरपीचे नाव आठवत नाही परंतू कार्यपद्धती ही मात्र नार्को टेस्ट सारखी असते ( तलवार ह्या चित्रपटामुळे ती कशी असते ते समजले) ह्या थेरपीमध्ये रुग्ण आणि त्याच्या घरच्यांची परवानगी लागतेच त्याचबरोबर रुग्णाचे खूप सहकार्य असावे लागते. साधारणत: ही थेरपी घेण्यासाठी रुग्णाच्या काही बेसिक तपासण्या केल्या जातात. त्याचे वय आणि वजनानुसार भूल दिली जाते. हि भूल संपूर्णपणे दिली जात नाही कारण भूल दिलेल्या अवस्थेत सुद्धा रुग्णाचा आणि त्याच्या सुप्त मनाचा संबध राहील हे ह्या थेरपीचे मुख्य उद्दिष्ट असते. भूल देण्यापूर्वी ४ ते ६ तास निर्जळी उपास ( भूल द्यायची असल्यामुळे खाणे - पिणे अजिबात चालत नाही) करावा लागतो. ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्याआधी रुग्णाचे बीपी, रक्तातील साखरेचे प्रमाण, नाडीचे ठोके तपासतात.
ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णाला सलाईन आणि ऑक्सिजन मास्क लावला जातो. मग भूलतज्ञ ठराविक प्रमाणात भूल देण्याचे औषध सलाईनद्वारे देतात. त्यानंतर ५ मिनिटातच रुग्ण पूर्ण जागा नाही किंवा पूर्ण झोपलेला देखील नाही अशा अवस्थेत पोचतो. त्याची ती अवस्था उपचारासाठी योग्य आहे असे वाटल्यावर मग मानसोपचारतज्ञ त्या घटनेशी संबधित प्रश्न विचारतात ज्या घटनेमुळे रुग्णाला त्रास होत असतो. अशा वेळी त्या रुग्णाचे सुप्त मन त्या काळात पोचलेले असते. त्याच्या जाणीव मनाचा किंवा मेंदूचा आणि त्याचा कोणत्याही भावनिक पातळीवर संबंध राहत नाही. सुप्त मनाच्या जाणीवेद्वारे सध्याचे शारीरिक आणि बौद्धिक वय विसरून रुग्ण त्या वयाचा होतो ज्या वयात त्याने तो त्रास भोगलेला असतो किंवा ती घटना घडलेली असते मग समोर दिसतील त्या सगळ्या घटना मगचा पुढचा विचार न करता रुग्ण सांगत असतो आणि मानसोपचारतज्ञ त्याची सुसंगती लावत त्या टिपून घेत असतात. कधी कधी एखादी भीती मनातून काढण्यासाठी आणि त्यात सुसंगती लावण्यासाठी त्या घटना वारंवार रुग्णाला विचाराव्या लागतात. ह्या परिस्थितीतसुद्धा रुग्ण रडतो किंवा ओरडतो, किंचाळतो अगदी पळण्यासाठी हात पाय पण झाडायचा प्रयत्न करतो पण औषधाच्या परिणामामुळे शारीरिक हालचाल विशेष करू शकत नाही . काही वेळा भीती एका गोष्टीची वाटत असते पण ती गोष्ट त्या वयात न समजल्यामुळे रुग्ण वेगळ्याच गोष्टीची भीती आपल्याला वाटत आहे असे मनात धरून वावरत असतो. ह्या थेरपीचे एक सेशन १५ ते २५ मिनिटांचे असते. औषधांचा परिणाम आणि रुग्णाचा प्रतिसाद ह्यावर सेशन किती वेळ चालते ते अवलंबून आहे. ह्या सेशनस मध्ये रुग्णाला नक्की कसली भीती वाटत आहे किंवा त्याला कसले दडपण आहे हे जाणून त्याच्या सुप्त मनाला काऊसिलिंग केले जाते. माणसाच्या बुद्धीला किंवा त्याह्या जाणीव मनाला केलेल्या काऊसिलिंग पेक्षा ह्या काऊसिलिंगचा परिणाम खूप लवकर आणि सकारात्मकपणे दिसून येतो. त्यानंतर मात्र रुग्णाला पूर्ण भूल दिली जाते आणि ३० ते ४५ मिनिटे शांत झोपवले जाते. जेव्हा पूर्ण भूल उतरते तेव्हा रुग्णाला त्या सेशन मध्ये काय झाले हे काहीही आठवत नसते.
जशी जशी सेशन होत जातात तसे तसे रुग्णाला स्वतः मधील बदल जाणवतो आणि ह्या बदलाची कबुली रुग्ण जागेपणी देतोच परंतू भूल दिलेल्या अवस्थेतही विचारल्यास देतो. त्या अवस्थेत रुग्णाचा आणि त्याचा जाणीव मनाचा आणि मेंदूचा संबध राहत नाही त्यामुळे त्या अवस्थेत कोणताही मनुष्य खोटे बोलत नाही.
जर समस्या खूपच गंभीर असेल तर माणूस कितीही वयाचा असला तरी ह्या थेरपीचा अवलंब त्याच्यावर करता येऊ शकतो परंतू ह्यासाठीचे सगळे अधिकार डॉक्टरांच्या हातात असतात जर त्यांना ह्या थेरपीची गरज वाटल्यास ह्या थेरपीचा अवलंब केला जातो.
ह्या थेरपीचे सेशन सुरु करायचे कि नाही ह्या विवंचनेत असताना मानसोपचारतज्ञानंनी ही वरील माहिती अतिशय विस्तृतपणे दिली त्यामुळे त्या थेरपीबद्दल आणि डॉक्टरांबद्दल विश्वास वाटला आणि केवळ त्यामुळेच ह्या थेरपीचा अवलंब केला.
16 Mar 2016 - 4:26 pm | नितीन पाठक
आमच्या घरी पॅरॅशूट खोबरेल तेलाची बाटली फक्त खाण्यासाठीच वापरली जाते. विशेषतः डोश्यासोबत जी कोरडी चटणी (मुळगापुडी) घेतो तीत थोडे खोबरेल तेल टाकले की जो स्वाद येतो त्याला तोड नाही!
@ श्री. सुनिल .......
दररोज पॅरॅशूट खोबरेल तेलाची बाटली फक्त खाण्यासाठीच वापरल्याने तुमच्या प्रकृति मध्ये काही फरक पड्ला का ?
असे केल्याने काही फायदा होतो का ?
मला असे समजले आहे की, खोबरेल तेल खाल्ल्याने गुडघे दुखी, सांधे दुखी कमी होते .......
खरे काय ?
दररोज खावे का ? कसे खावे ?
18 Mar 2016 - 9:25 am | सुनील
आमच्या दररोजच्या वापरात खोबरेल तेल नसते. वर म्हटल्याप्रमाणे, काही विशिष्ठ पदार्थात वरून कच्चे खोबरेल तेल (पॅरेशूट) वापरतो इतकच.
अर्थात, खोबरेल तेलाचा नेहेमीच्या जेवणात वापर करणारी कुटुंबे ठाउक आहेत. आणि त्यांच्या प्रकृती काही फार वेगळ्या (चांगल्या किंवा वाईट) अशा वाटल्या नाहीत! इतर चारचौघांप्रमाणेच वाटल्या.
त्यामुळे गुढघे वा सांधे दुखी कमी होते किंवा कसे याबाबत मी अधिकारवाणीने काहीही सांगू शकत नाही.
उकडलेल्या अळूवड्यादेखिल, वरून खोबरेल तेल घातल्यावर मस्त लागतात!!
18 Mar 2016 - 8:38 pm | मालविका
पोहे करण्यासाठी भात (वरच्या सालासह तांदूळ ) पाण्यात ७/८ भिजत टाकतात . मग उपसून रात्रभर वाळवतात . थोडेसे दमट असताना पोह्याच्या गिरणीवर आणतात . इथे भात वजन करून मग एका हॉपर मध्ये टाकतात . तिथून ते एका छोट्या भट्टीत जात . इथे सिमेंट मिक्सर सारख गोल भांड असत . या भट्टीत भात छानपैकी भाजल जात . तिथून ते एका चाळणीवर येत . कचरा बाजूला होऊन फक्त भाजलेलं भात सेपरेट होत. मग ते दुसर्या एका मशीन मध्ये टाकतात . त्यात भाताच वरच साल काढलं जात. तेव्हाच भात चेपल जात नि साल बाजूला पडून पोहा वेगळा होतो . मग एका सेपरेटरवर ते पोहे ओतले जातात . त्यातून पोहे आणि पोह्याचा बारीक चुरा वेगळा होऊन येतो . भट्टीत भाजलेल्या ताज्या पोह्यांचा वास आणि चव अप्रतिम लागते .
18 Mar 2016 - 11:21 pm | भंकस बाबा
पहिलया महायुद्धात हिटलर एक सामान्य सैनिक म्हणुन लढला होता. तेव्हा जर्मन सेनेला पुरवण्यात आलेली शस्त्र बहुतकरून ज्यू लोकांनी म्हणजे ज्यू मालक असलेल्या कंपन्यानि पुरवली होती. ही शस्त्रे व् दारूगोळा चांगल्या प्रतिचा नव्हता असा हिटलरचा समज होता. त्यामुळेच जर्मनी युद्ध हरले असा हिटलरला ठाम विश्वास होता. त्यामुळे त्याने ज्यूचि कत्तल केलि.
असे वाचले होते. खरे खोटे हिटलर जाणे.