मंडळी,
मला मराठीतील काही शब्दांच्या अचूक उच्चारांबद्दल तुमच्याकडून माहिती हवी आहे. माझा एक मित्र एका एकांकिकेच्या तालमींमध्ये गुंतला आहे. टिळक-आगरकरांच्या काळातील काही घटनांवर ही एकांकिका आधारली आहे. आजच्या काळात उच्चारांचे नियम (दुर्दैवाने) थोडे शिथिल झाले असले तरी या एकांकिकेचा काळ पाहता यातील उच्चार अचूक व प्रमाण असणे आवश्यक आहे. तर माझे प्रश्न असे ...
* आमचे, टिळकांचे, देशाभिमानाचे, कार्याचे या शब्दांतील 'चे'मधील 'च' या अक्षराचा उच्चार 'चंद्र'मधील 'च' प्रमाणे जड की 'झालाच'मधील 'च' प्रमाणे हलका करायचा? (माझ्या मते जड)
* द्यायचे, करायचे, पोहोचवायचे या शब्दांतील 'चे'मधील 'च' या अक्षराचा उच्चार 'चंद्र'मधील 'च' प्रमाणे जड की 'झालाच'मधील 'च' प्रमाणे हलका करायचा? (माझ्या मते जड)
* कुठचेही (उदाहरणार्थ, कुठचेही कार्य आम्हांस अशक्य नाही) या शब्दातील 'चे'मधील 'च' या अक्षराचा उच्चार 'चंद्र'मधील 'च' प्रमाणे जड की 'झालाच'मधील 'च' प्रमाणे हलका करायचा? (माझ्या मते जड)
* चाकू या शब्दातील 'चा'मधील 'च' या अक्षराचा उच्चार 'चंद्र'मधील 'च' प्रमाणे जड की 'झालाच'मधील 'च' प्रमाणे हलका करायचा? (माझ्या मते जड)
इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पूर्ण शिक्षण झाले असले तरीही मराठी वाचनाची आवड असल्यामुळे शब्दांच्या लिखित स्वरुपाबाबतीत तेवढा घोळ होत नाही, मात्र उच्चारांच्या बाबतीत क्वचित कधी होऊ शकतो म्हणून हा धागा. उत्तराची वाट पाहत आहे.
- दिपोटी
प्रतिक्रिया
15 Mar 2016 - 11:06 am | खेडूत
वरील सर्व चे. चा हलके उच्चारावेत.
काळानुसार शब्द, प्रत्यय बदललेत. उच्चार बदलल्याची उदाहरणे शोधावी लागतील.
15 Mar 2016 - 11:29 am | दिपोटी
खेडूत,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद! मात्र तुम्ही 'च'चा जो/जसा हलका उच्चार करण्यास सांगत आहात, तो मी वर दिलेल्या उदाहरणांसारखाच आहे का? थोडक्यात म्हणजे, वरील प्रश्न विचारलेल्या शब्दांतील 'चे' वा 'चा' मधील 'च' या अक्षराचा उच्चार 'चंद्र'मधील 'च' प्रमाणे जड की 'झालाच'मधील 'च' प्रमाणे हलका करायचा?
- दिपोटी
15 Mar 2016 - 12:23 pm | एस
'झालाच' मधला हलका 'च'.
15 Mar 2016 - 12:56 pm | मराठी कथालेखक
चाकूतला च तरी जडच असावा असे मला वाटते.
चाकूमध्ये च चा हलका उच्चार कधी ऐकल्याचे स्मरत नाही.
15 Mar 2016 - 2:58 pm | अभ्या..
नाही हो.
चाकू तला च मराठीत हलकाच. हिंदीत जड. चक्कू छुर्रिया तेज करालो वाला.
"चाकवाने काय माझी........" हा फेमस डॉयलॉग ऐकला नाही व्हय? ;)
15 Mar 2016 - 7:04 pm | मराठी कथालेखक
हा डायलॉग तर ऐकला नाहीये
पण चाकवाने मध्ये असू शकेल पण फक्त चाकू म्हणताना (उदा: 'जरा चाकू दे रे') हलका उच्चार ? मी तरी नाही ऐकला
15 Mar 2016 - 11:32 am | प्रदीप साळुंखे
शहरी लोक 'च' चे उच्चार हलके करतात,पण आम्ही बहुधा जास्तीकरून जड उच्चार करतो.
आता "उच्चार" मधील जो 'च' जो आहे तो जडच घ्यावा लागेल सर्वांना.
चंद्र = जड 'च'
चमचा = जड किंवा हलके,शहरी लोक हलके उच्चार करतात,पण आम्ही जड करतो
उदा - च्यमच्या
चाकू मधील च ही जडच उच्चारतो.
उदा - च्याकू
एक गंमत → द्यायचे,करायचे,पोहचवायचे मधील च चे उच्चार जड उच्चारावे.
आणि
द्यायचं,करायचं,पोहचवायचं मधील च हलके उच्चारावे.
15 Mar 2016 - 11:33 am | खेडूत
चंन्द्राप्रमाणे नाही.
चकलीप्रमाणे हलका.. :)
15 Mar 2016 - 6:47 pm | पैसा
शिवाय टिळक आगरकर काळानुसार अनुस्वाराचा हलका आघात हवा.
17 Mar 2016 - 8:50 am | राही
चकली हा उच्चार अनेक ठिकाणी च्यकली असा ऐकला आहे. त्याहूनही तो 'च्यकलें' असा नपुंसकलिंगी वापरला जातो. अनेक वचन चकलीं. मला वाटते तो चक्र वरून आला आहे याची खूण काही ठिकाणी अशी टिकून राहिली आहे. आता दृक्प्रसारमाध्यमांमुळे काही उच्चार सर्वत्र समान होत आहेत. याला अभिजनसंस्कृतिप्रसार म्हणजे प्रमाणीकरण म्हणावे की वैविध्य नष्ट होत असल्याने सपाटीकरण म्हणावे?
ज्यास्वंद आणि ज़ास्वंद असे दोन्ही उच्चार ऐकले आहेत. सामान्य संभाषणात उच्चारांतले असे स्थानिक बदल आपले मानून घ्यावेत असे वाटते. पण मंचसादरीकरण तेही पीरिअड असेल तर काटेकोर राहायला हवे.
15 Mar 2016 - 3:16 pm | प्रसाद१९७१
सर्व हलके "च" उच्चार करतो मी तरी वरील उदाहरणांमधे
15 Mar 2016 - 7:36 pm | होबासराव
चंदु के चाचा ने चंदु के चाचि को चांदि के चमचे से चटनि चटायी.
सांगा कुठे जड 'च' येइल आणि कुठे हलका.
15 Mar 2016 - 7:40 pm | मराठी कथालेखक
हिंदीमध्ये सगळे जडच की हो.
17 Mar 2016 - 3:38 am | दिपोटी
सर्व प्रतिसादकर्त्यांचे मनापासून धन्यवाद!
- दिपोटी
17 Mar 2016 - 3:01 pm | बरखा
आमचे, टिळकांचे, देशाभिमानाचे, कार्याचे या शब्दांतील 'चे'मधील 'च' या अक्षराचा उच्चार 'चंद्र'मधील 'च' प्रमाणे जड की 'झालाच'मधील 'च' प्रमाणे हलका करायचा? (माझ्या मते हलका)
प्रश्न :- द्यायचे, करायचे, पोहोचवायचे या शब्दांतील 'चे'मधील 'च' या अक्षराचा उच्चार 'चंद्र'मधील 'च' प्रमाणे जड की 'झालाच'मधील 'च' प्रमाणे हलका करायचा?
उत्तरः- माझ्या मते एखादे वाक्य ठासुन अथवा ठाम पणे सांगायच असेल तर, उदाहर्णार्थ.... हे तुला करायचेच आहे, हे तिकडे पोह्चवायचेच आहे.. अशा ठिकाणी तो 'च' जड उच्चारला जाइल.
17 Mar 2016 - 5:36 pm | कानडाऊ योगेशु
असाच गोंधळ जाधव हा शब्द उच्चारताना होतो.
सर्वसाधारण मराठी माणुस जाधव मधल्या ज चा उच्चार जहाज (मराठी) मधल्या ज सारखा करतात पण सर्व हिंदी मालिकांमध्ये मात्र हा उच्चार हिंदी जहाज मधल्या ज सारखा करतात. सी.आय.डी मध्ये प्रद्युम्न ला "ये जाधव कुछ गडबड कर रहा है" असे दयाला सांगताना डमरु वाजवताना ऐकले होते. (हा तर मराठी माणुस. जाधव ला जाधव म्हणाला असता तर काय बिघडणार होते.)