ब्रेंडन मॅकलम् म्हणजे एक तुफानी फलंदाज. एक अत्यंत आक्रमक आणि सकारात्मक क्रिकेट खेळणारा हा न्यूझीलंडचा कर्णधार मागील आठवड्यात फक्त ३४ व्या वर्षी सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय सामन्यातून निवृत्त झाला. खरं तर ३४ हे काही निवृत्तीचं वय नाही. तो अजून ३-४ वर्षे सहज खेळू शकला असता. अगदी २०१९ ची विश्वचषक स्पर्धाही खेळू शकला असता. परंतु भरात असतानाचा त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला हे आपले दुर्दैव.
तो अत्यंत आक्रमक आणि अत्यंत सकारात्मक क्रिकेट खेळणारा खेळाडू होता. तो न्यूझीलंडचा यष्टीरक्षक देखील होता. मैदानावर तो उत्कृष्ट क्षेत्ररक्षक देखील होता. फारच क्वचित तो नांगर टाकून संथ खेळताना दिसला असेल. तितकाच तो आक्रमक कर्णधारही होता. त्याच्याच नेतृत्वाखाली न्यूझीलंडने प्रथमच २०१५ मध्ये विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्यापूर्वी तब्बल ६ वेळा न्यूझीलंडचा संघ विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचला होता, पण प्रत्येकवेळी उपांत्य फेरीतच त्यांचा पराभव व्हायचा. परंतु २०१५ मध्ये मात्र न्यूझीलंडने एका अत्यंत चुरशीने खेळल्या गेलेल्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून प्रथमच अंतिम फेरी गाठली. तो सामना पावसामुळे ४३ षटकांचा खेळला गेला. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना ४३ षटकात २८१ अशी जबरदस्त धावसंख्या रचली. सामना कमी षटकांचा झाल्याने डकवर्थ-लुईस नियमानुसार न्यूझीलंडला विजयासाठी प्रतिषटक ६.९३ धावा इतक्या गतीने ४३ षटकात २९८ धावा करण्याचे मोठे आव्हान समोर होते.
याच मैदानावर काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या २२२ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा पराभव झाला होता. याच मैदानावर काही आठवड्यांपूर्वी ऑस्ट्रेलियाला १५१ धावात गुंडाळल्यावर न्यूझीलंडची अवस्था ९ बाद १४५ इतकी वाईट झाली होती. त्याही सामन्यात मॅकलमने सलामीला येऊन केवळ २४ चेंडूत ५० धावा केल्या होत्या.
उपांत्य फेरीचा सामना घरच्या मैदानावर खेळला जात असल्याने प्रतिष्ठा पणाला लागली होती. समोर डेल स्टेन, मॉर्नी मॉर्केल, फिलँडर असे जबरदस्त वेगवान गोलंदाज होते. मॅकलम गप्टिलच्या साथीत सलामीला आला आणि पहिल्या षटकापासून एकदम चित्र बदलले. स्टेनच्या पहिल्याच षटकातील ४ थ्या चेंडूवर मॅकलमने जबरदस्त षटकार मारून आपला इरादा दाखवून दिला. फिलॅंडरने टाकलेल्या दुसर्या षटकात मॅकलमने पुन्हा एकदा १ षटकार व २ चौकार मारून जोरदार तडाखा दिला. तिसर्या षटकात स्टेनला अजून १ चौकार, ४ थ्या मॉर्नी मॉर्केलच्या षटकात ३ चौकार, स्टेनच्या ५ व्या षटकात २ षटकार व ३ चौकार मारून २५ धावा असा जबरदस्त तडाखा मॅकलमने आफ्रिकेच्या गोलंदाजांना देऊन न्यूझीलंडने पहिल्या ५ षटकात एकही गडी न गमावता तब्बल ७१ धावा केल्या होत्या. एका मोठ्या स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात पहिल्या ५ षटकात इतकी धुलाई आजवर कोणीही केली नव्हती. या ७१ मध्ये मॅकलमचा वाटा होता २५ चेंडूत ५९ धावा. हा सामना शेवटी न्यूझीलंडने शेवटच्या षटकात जिंकला आणि त्यात भक्कम पायाभरणी केली होती मॅकलमने.
२०१५ च्या विश्वचषक स्पर्धेत मॅकलम काही तुफानी डाव खेळला. श्रीलंकेविरूद्ध ४९ चेंडूत ६५, इंग्लंडच्या जेमतेम १२३ धावांचा पाठलाग करताना त्याने केवळ १८ चेंडूत अर्धशतक करताना जागतिक विक्रम केला. या सामन्यात त्याने केवळ २५ चेंडूत ७७ धावा केल्या. त्यात त्याने फिनला लागोपाठ ४ षटकार मारले होते. याच स्पर्धेत त्याने ऑसीजविरूद्ध केवळ २४ चेंडूत ५० धावा मारल्या होत्या.
आपल्या अंतिम कसोटीतही त्याने आसीजविरूद्ध केवळ ५४ धावात शतक झळकावून जागतिक विक्रम केला. त्या डावात त्याने केवळ ७९ चेंडूत १४५ धावा केल्या होत्या. कसोटीत सर्वाधिक १०७ षटकार मारण्याचा विक्रमही त्याच्याच नावावर आहे. कसोटीत ६४.६, एकदिवसीय सामन्यात ९६.३७ आणि ट-२० सामन्यातील १३६.२१ चा स्ट्राईक रेट त्याच्या तुफानी खेळाचे निदर्शक आहेत. न्यूझीलंडतर्फे त्रिशतक करणारा तो एकमेव खेळाडू आहे. २०१४ मध्ये भारताविरूद्ध त्याने ३०० चा टप्पा पार केला.
न्यूझीलंडचा संघ हा माझा आवडता संघ आहे. शिवीगाळ न करता सभ्य आणि आक्रमक क्रिकेट खेळणारे किवीज् माझे आवडते खेळाडू आहेत. त्यात मॅकलम् सर्वाधिक आवडता. तो जितका तुफानी फलंदाज होता तितकाच उत्कृष्ट यष्टीरक्षक व क्षेत्ररक्षकही होता.
त्याच्या काही महान इनिंग्ज
(१) शेवटचे कसोटी शतक - २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध केवल ७९ चेंडूत १४५ धावा करून सर्वात जलद शतकाचा जागतिक विक्रम (५४ चेंडूत १०० धावा)
https://www.youtube.com/watch?v=2boxcdjDnpE
(२) २०११ मध्ये एका ट-२० सामन्यात जवळपास २०० च्या स्ट्राईक रेटने ११६ धावा. या सामन्या त्याने दिलस्कूप फटक्याचा सढळ वापर केला.
https://www.youtube.com/watch?v=lbmoqXUAR8k
(३) २०१४ मध्ये श्रीलंकेविरूद्ध २३ षटकात १९८ धावा करायच्या असताना हेराथच्या शेवटच्या षटकातील शेवटच्या ४ चेंडूवर १७ धावा हव्या असताना मॅकलमने जोरदार फटके मारून तो सामना जिंकून दिला.
https://www.youtube.com/watch?v=6AYaCd7QH2k
(४) मॅकलमने स्लीपमध्ये घेतलेला एक जबरदस्त झेल
https://www.youtube.com/watch?v=-iBxQrbq8lU
(५) मॅकलमने आउटफिल्डवर घेतलेला थिसारा परेराचा एक जबरदस्त झेल
https://www.youtube.com/watch?v=IRRw1VAWtPI
प्रतिक्रिया
1 Mar 2016 - 3:41 pm | नाखु
पण न्युझीलंडमध्ये एकांडे शिलेदारांचाच जास्त भरणा होता.संघात एकाचवेळी एकमेकांना पूरक आणि एकजिनसी अत्युच्च संघभावना अभावानेच दिसली.
विशेष म्हणजे बरेच जण आयपील सर्कसीत चमकलेही.
1 Mar 2016 - 10:00 pm | श्रीगुरुजी
न्यूझीलंड संघामध्ये संघभावना नाही असे नाही. पण मला वाटतं की ते फक्त जिंकणे किंवा काहीही करून न हरणे यासाठी न खेळता खेळाचा आनंद घेण्यासाठी खेळतात. जिंकण्यासाठी ते जीवाचा आटापिटा करीत नाहीत किंवा ऑसीजसारखे ते शिवीगाळ करून प्रतिस्पर्ध्यांचे खच्चीकरण करून दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत नाहीत. तसेच टुकुटुकु खेळून सामना वाचविणे असेही ते करताना फारसे दिसत नाहीत. विजीगिषू वृत्तीचा काहिसा अभाव आढळतो. कदाचित अल्पसंतुष्ट असावेत. त्यामुळेच विश्वचषकात तब्बल ७ वेळा उपांत्य फेरीत गेल्यावर फक्त एकदा ते अंतिम फेरीत पोहोचले. त्यांच्या उलट ऑसीजही ७ वेळा उपांत्य फेरीत पोहोचले आणि सर्व ७ वेळा ते अंतिम फेरीत पोहोचले. त्यांचे बरेचसे खेळाडू संघातून काढून टाकायची वाट न बघता ८-१० वर्षे खेळून वयाच्या ३५-३६ पर्यंत निवृत्त होतात. त्यांचे बहुतेक चांगले खेळाडू (व्हिटोरी, स्टायरिस, मॅकलम्, शेन बाँड, फ्लेमिंग, मॅकमिलन इ.) भरात असतानाच व अजून २-३ वर्षे शिल्लक असतानाच बाहेर पडले आहेत.
2 Mar 2016 - 2:23 pm | नाखु
हाच शब्द शोधीत होतो विजीगिषू वृत्तीचा काहिसा अभाव .
अर्थात येन केन प्रकारे नामहरोम करण्याची त्यांची व्रूत्ती नाही हे ही खरे !!!
1 Mar 2016 - 3:45 pm | होबासराव
चला कोणितरी ह्याला माझ्यासारखेच संबोधते तर 'सर्कस'
आयपील, २०-२० सुरु झाल्यापासुन क्रिकेट पाहण्यापासुन निव्रुत्ति घेतलेला
होबासराव
1 Mar 2016 - 5:30 pm | मुक्त विहारि
म्हणजे क्रिकेटचा बट्ट्याबोळ.
1 Mar 2016 - 4:07 pm | उगा काहितरीच
सहमत ! बाकी लेख पण छान आहे.
1 Mar 2016 - 5:18 pm | तुषार काळभोर
पहिल्या आयपीएलच्या पहिल्या सामन्यात कोलकाताकडून दीडशे धावा चोपल्या होत्या त्याने!
1 Mar 2016 - 5:20 pm | सन्जय गन्धे
सुंदर लेख, मला सुद्धा हा संघ आवडतो!
3 नंबर ची लिंक नाथन मॅकलमची दिसते आहे, ब्रेंडनची नाहिये!
1 Mar 2016 - 9:51 pm | श्रीगुरुजी
अरे हो. चूक झालेली दिसतेय. लिंकच्या खाली ब्रेंडन मॅकलम् चे नाव आहे. प्रत्यक्षात नेथन मॅकलम् खेळताना दिसतोय.
1 Mar 2016 - 5:29 pm | मुक्त विहारि
"न्यूझीलंडचा संघ हा माझा आवडता संघ आहे. शिवीगाळ न करता सभ्य आणि आक्रमक क्रिकेट खेळणारे किवीज् माझे आवडते खेळाडू आहेत. त्यात मॅकलम् सर्वाधिक आवडता. तो जितका तुफानी फलंदाज होता तितकाच उत्कृष्ट यष्टीरक्षक व क्षेत्ररक्षकही होता."
+१