दुर्गा झाली गौरी!

विकास's picture
विकास in जनातलं, मनातलं
15 Sep 2008 - 7:04 pm

बॉस्टनच्या न्यू इंग्लंड मराठी मंडळाने या वर्षी गणेशोत्सवानिमित्ताने एक स्वतःसाठी आव्हान निर्माण केले होते. त्या आव्हानाचे नाव होते, सुमारे ७० हौशी कलाकारांनी भरलेली संगितीका - "दुर्गा झाली गौरी". ही बालसंगितीका माधव साखळदांडे यांनी लिहीलेली आहे आणि मूळ संकल्पना/निर्मिती ही "अविष्कार" नाट्यसंस्था आणि त्यातही अरविंद आणि सुलभा देशपांडे यांची आहे. नृत्यसंकल्पना ही पार्वतीकुमार यांची आहे.

भारतात चारशेहून अधिक प्रयोग झालेले हे नाटक बॉस्टनमधे यंदा गणेशोत्सवासाठी करायचे असे एप्रिलमधे मंडळाने जाहीर केले होते. बघता बघता हौशी बाल-प्रौढ कलाकार या नाटकासाठी तयार झाले आणि प्रत्येक विकेन्ड आणि अनेकांना कामाच्या दिवशी संध्याकाळी पण तालीमींसाठी जावे लागले. हे नाटक प्रायोगीक असल्याने त्याची डीव्हीडी वगैरे मिळणे शक्य नव्हते पण अविष्कारने मदत केली, जुने ध्वनीमुद्रण मिळाले आणि ते चांगले करत करत एक वर्षाच्या खालील मुलीपासून ते प्रौढांपर्यंत सहभाग असलेले हे नाटक बसवण्यात आले. बॉस्टन मध्ये ह्या नाटकाचे दिग्दर्शन अदीती टेलरने केले. अदीतीने स्वतः मुंबईत असताना या नाटकात अगदी लहानपणापासून काम केले असल्याने त्या भावनीक गुंतवणूकीचा फायदा दिग्दर्शन करताना झाला.

ह्या बालनाट्याची मूळ कथा थोडक्यात अशी:


दुर्गा ही नावाप्रमाणे तापट असलेली राजकन्या वाटेल ते हट्ट करायची. फुलांनी केलेल्या बिछाना पण टोचतो म्हणून माळ्याला फाशी द्या म्हणे पर्यंत तीची मजल जाते आणि राजाच्या सहनशीलतेचा अंत होतो. ती घर सोडते म्हणते आणि राजा थांबवत नाही... मग ती वादळात अडकते आणि कोळ्यांबरोबर होडीतून जात असताना नाव फुटून एका किनार्‍यावर पडते. तिथे असलेल्या वयोवृद्ध आजीआजोबांना ही स्वतःस विसरलेली गौरी म्हणजे वादळातून सापडलेली आपली गौरी ही नात वाटते. वादळात सापडून आणि घरापासून, ऐश्चर्यापासून लांब जाऊनही पिळ तसाच असल्याने, ही गौरी अर्थात दुर्गा सार्‍या गावाला आज्ञा सोडल्याच्या थाटात सांगते की ही नदी जर नेहमी पूर आणते तर तीला आधी बांध घाला आणि आवरा. तेंव्हा गावकर्‍यांच्या लक्षात येते की आपण काय करायला हवे ते.

इतके जरी असले तरी "गौरीस" झोप येत नसते. तेंव्हा गावतल्या दोन बायका कुत्सितपणे म्हणतात की काम केले तर झोप येते, नुसते बसून झोप कशी येणार! दुर्गा ते ऐकते आणि म्हणते की काम करून पाहूया. मग ती गावकर्‍यांना म्हणते की तुम्ही लहानमुलांना कामावर घेऊन जात त्या ऐवजी माझ्याकडे सोडा मी त्यांना शिकवेन. हे चालू असताना ती कधी उडणारे पक्षी, कधी मधमाश्या, कधी मुंग्या असे बघत जाते आणि कामाचे महत्व तीला त्यांच्याकडून समजत जाते. बघता बघता गौरीमुळे गावावरील दरवर्षीचे पुरामुळे येणारे संकट टळते आणि मुलेपण शिकायला लागतात. परीणामी या लाडक्या आणि नावाप्रमाणे शांत/प्रेमळ असलेल्या गौरीचे कौतूक राजा-राणी कडून ते करायचे ठरवतात. त्या कौतूक समारंभात राजा तीला विचारतो की तुझे नाव गौरी कसे काय? तुझे नाव दुर्गा ना? सर्व गावकरी म्हणतात की हे शक्यच नाही कारण ही तर फार प्रेमळ आहे... अर्थात दुर्गा आणि गौरी ह्या दोघी एकच आहेत आणि तापट "दुर्गा" आता "गौरी" सारखी शांत/प्रेमळ झाली आहे हे सर्वांना समजते...

"दुर्गा झाली गौरी" च्या तालीमी ह्या केवळ तालीमी न रहाता उन्हाळ्याच्या सुट्टीतले एकमेकांना भेटण्यासाठीचे आणि नवीन ओळखी करण्याचे एक निमित्त होऊन गेले. मुलांना अथवा स्वतःच्या तालिमींना केवळ आई-वडील अथवा स्वतः न जाता सर्वजण अगदी उन्हाळ्यात आलेल्या आजी-आजोबांना पण घेऊन येयचे. अंगत-पंगत (पॉटलक) म्हणजे "अक्षयपात्र"च होते! रात्री अकरापर्यंत चाललेल्या या तालीमींमधे सर्वजण मनापासून आनंद उपभोगत होते.

कार्यक्रमाच्या दिवशी, म्हणजे गेल्या शनीवारी, १३ सप्टेंबरला, ६०० च्या वर माणसे आली. गणपतीची पूजा आणि आरती-प्रसाद झाल्यावर कार्यक्रमास सुरवात झाली. त्यात अनेकजण अमराठी आणि अभारतीय वंशाचे - गोरे अमेरीकन्सपण होते. कुणाच्या ऑफिसातील तर आमच्यासारख्यांच्या बाबतीत आमच्या मुलीचे काम आहे म्हणून तीची मैत्रीण आणि तिचे आई-वडील. जरा शंका आली की अडीच तास ह्या कार्यक्रमास भाषा न समजता कसे थांबणार. पण इंग्रजीत "स्टोरीलाईन" दिलेली असल्याने नुसते बसलेच नाहीत तर मनापासून नाटक आवडल्याची त्यावेळेस आणि नंतर पोचपावती दिली. इतके दिवस सातत्याने केलेल्या तालिमींचा फायदा सर्वांना समजला.

१२ सप्टेंबरची स्टेजवरील तालीम आणि नंतरचा कार्यक्रम झाल्यावर अचानक आता सर्व कलाकार-संबंधीतांना पोकळी जाणवू लागली, की आता हे संपले? पण आता न्यूयॉर्कच्या मराठी मंडळाने दुर्गेला पाचारण केले आहे आणि दिवाळीच्या कार्यक्रमा निमित्त १६ नोव्हेंबरला आता न्यूयॉर्क मध्ये दुर्गेची गौरी होणार आहे!

कलासंगीतनाट्यप्रतिक्रियासमीक्षा

प्रतिक्रिया

मनस्वी's picture

15 Sep 2008 - 8:07 pm | मनस्वी

सर्वांचे अभिनंदन!

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

धनंजय's picture

15 Sep 2008 - 8:26 pm | धनंजय

न्यूयॉर्कमध्येही विजयी व्हावे!

प्रकाश घाटपांडे's picture

15 Sep 2008 - 9:12 pm | प्रकाश घाटपांडे

वाचुन छान वाटले. न्युयार्कला हा प्रयोग यशस्वी होवो. मराठी माणसांना जोडणारा दुवा होवो.
प्रकाश घाटपांडे

विसोबा खेचर's picture

15 Sep 2008 - 10:46 pm | विसोबा खेचर

मनपासून अभिनंदन... :)

मी हे नाटक खूप वर्षांपूर्वी पाहिलं होतं तेव्हा दुर्गेचं काम निशिगंधा वाडने केलं होतं...

तात्या.

प्राजु's picture

16 Sep 2008 - 12:51 am | प्राजु

शूटींग केले असल्यास यूट्यूब वर चढवून दुवा द्यावा ..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

ऋषिकेश's picture

15 Sep 2008 - 10:58 pm | ऋषिकेश

अरे वा! तुमचे, मुलीचे आणि मंडळाचे अभिनंदन!

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

स्वाती दिनेश's picture

15 Sep 2008 - 10:59 pm | स्वाती दिनेश

छानच.. अभिनंदन आणि शुभेच्छा..
गडकरीला ह्या नृत्यनाटिकेचा प्रयोग फार वर्षांपूर्वी पाहिलेला आठवतो आहे.
स्वाती

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Sep 2008 - 7:27 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अभिनंदन! मी पण गडकरीला माझ्या बालपणी (१५० वर्षांपूर्वी) हे नाटक पाहिल्याचं अंधुकसं आठवतंय!

प्रभाकर पेठकर's picture

15 Sep 2008 - 11:34 pm | प्रभाकर पेठकर

दुर्गा झाली गौरीची व्हिडीओ कॅसेट फार वर्षांपूर्वी पाहिली होती. हे नाटक मस्कतमध्ये बसविण्याची माझी इच्छा होती पण दुर्दैवाने 'मुहुर्त' मिळाला नाही. असो.
पण नाटक फार दमदार आहे. राजा, प्रधान, विदुषक मुख्य पात्र आहेत. गौरी बद्दल काय बोलायचे. सर्व नाटक तिच्या भोवतीच फिरते. तिला अभिनयाला, नृत्याला भयंकर वाव आहे. सर्वांनी आपापल्या भूमिका १०० टक्के वठविण्याचा प्रयत्न केला तर नाटक सर्वांनाच (कलाकार आणि प्रेक्षक) परमोच्च आनंद देणारे आहे.

दिग्दर्शिकेचे आणि सर्व कलाकारांचे हार्दीक अभिनंदन.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Sep 2008 - 11:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्व सहभागी आणि पडद्यामागील कलाकारांचे हार्दीक अभिनंदन, तसेच
न्यूयॉर्कच्या दौर्‍यासाठी शुभेच्छा !!!

mina's picture

16 Sep 2008 - 7:13 pm | mina

प्रथम सर्व कलाकारांचे हार्दीक अभिनंदन करते.. मराठी माणसाची ही झेप खरोख्रर कौतुकास्पद आहे. न्युयार्कला हा प्रयोग नक्कीच रसिका॑ना आवडेल्. आणि तिथेही हा प्रयोग यशस्वी होवो. मराठी माणसांना जोडणारा दुवा होवो.खुप आन॑द झाला नाटकाचे कौतुक वाचुन.. व्वा..छानच..............!

दिग्दर्शिकेचे आणि सर्व कलाकारांचे हार्दीक अभिनंदन.

मुक्तसुनीत's picture

16 Sep 2008 - 7:35 pm | मुक्तसुनीत

विकासराव आणि संबंधितांचे मनःपूर्वक अभिनंदन .
विकास राव , डीसीला कराल का हा कार्यक्रम ? मी इथल्या लोकांना विचारतो.

चतुरंग's picture

16 Sep 2008 - 9:13 pm | चतुरंग

पडद्यामागचे आणि पुढचे अशा सर्व कलाकारांचे, त्यांच्या पालकांचे, उपस्थित रसिकांचे, शांत बसलेल्या बालकांचे आणि ही महत्वाची बातमी आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल विकासरावांचे अभिनंदन!
(विकास, काही चित्रे काढली असतील तर चढवा ना.)

चतुरंग

विकास's picture

16 Sep 2008 - 11:36 pm | विकास

सर्व प्रतिसादांना धन्यवाद!

विकास, काही चित्रे काढली असतील तर चढवा ना!
भरपूर आहेत फक्त मी कुठे कशी प्रसिद्ध करायची या संदर्भात एकत्रित निर्णय होण्याची वाट पहात आहे. या शनीवारी श्रमपरीहारापर्यंत ती गोष्ट नक्की होऊन जाईल...

भडकमकर मास्तर's picture

17 Sep 2008 - 1:09 am | भडकमकर मास्तर

छान नाटक छान बसत जाते तो अनुभव घेणे खूप छान असते, भरपूर शिकवणारे असते....
सर्व कलाकारांचे अभिनंदन....आता न्यूयॊर्कमध्येही मस्त होऊन जाउद्यात प्रयोग..माझ्या शुभेच्छा...
फोटो पहायचे आहेत...लवकर येउद्यात....

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/