इतर भाषांतील साहित्य वाचण्याची गोडी लागण्यासाठी काय करावे ?

धर्मराजमुटके's picture
धर्मराजमुटके in काथ्याकूट
14 Jan 2016 - 11:08 pm
गाभा: 

नमस्कार मंडळी,
मी मराठी साहित्याचे वाचन बरेच केले आहे. अजूनही करत आहे. अर्थात येथील वाचनसम्राटांच्या तुलनेत आम्ही मांडलिक राजेच म्हणा. सुरुवातीला घरापासून वाचनालय लांब असल्यामुळे आणि जास्तीत जास्त पैसे वसुल व्हावेत असा साधासरळ हिशेब असल्यामुळे मी जास्त पाने असलेले पुस्तकच घेत असे. यातुनच कादंबर्‍या वाचण्याची आवड वाढत गेली. कादंबर्‍या, कथा, संकीर्ण, प्रवासवर्णने, आत्मचरीत्र (चरीत्र नव्हे) अशा प्रकारच्या वाचनाची आवड जास्त प्रमाणात आहे.

कुठेतरी असेही वाचले की कादंबर्‍या वाचून मेंदू सुस्त होतो आणि छोट्या कथा वाचून विचारप्रवृत्त. कधी कधी याचा अनुभवही घेतला आहे.

वाचतांना बर्‍याचदा अनुवाद वाचण्यात येतात आणि मग कधीकधी मुळ लेखन वाचण्याची इच्छा होते पण ते तितक्यापुरतेच. तोंडी लावण्यापुरती हिंदी, इंग्रजी आणि गुजराती पुस्तके वाचली आहेत पण ती अगदी नगण्यच म्हणता येतील.

इथे विविध भाषांमधील साहित्य अभ्यासणारे विविध वाचक आहेत. तुम्हाला तुमच्या मुळ भाषेव्यतीरीक्त इतर भाषेतील वाचनाची आवड कशी निर्माण झाली याची माहिती मिळाल्यास मराठी व्यतीरिक्त इतर भाषांकडे वळता येईल का ? व कसे ? यासाठी मदत मिळेल असा विश्वास वाटतो.

धन्यवाद !

प्रतिक्रिया

मीही आठवी-नववीपर्यंत मराठीच वाचत असे. वडिलांना हे आवडत नसे. पण मी इंग्रजी पुस्तक हातात धरेचना. मग त्यांनी मी कोणती पुस्तकं वाचतो याचं निरीक्षण केलं. मला रहस्यकथा आवडतात हे लक्षात आल्यावर "पेरी मेसन" आणून दिलं. त्याकाळी एकएक पुस्तक मिळवण्यासाठी बरीच मनधरणी करावी लागत असे, आणि अचानक पाचसहा पेरी मेसनांचा अनपेक्षित लाभ झाल्यावर एकदमच खूश झालो.

तरी चालढकल होतीच. शेवटी त्यातल्यात्यात हॉट मुखपृष्ठ बघून एक उचललं. अर्धंमुर्धंच कळलं, पण त्यातलं रहस्य कळण्याइतपत इंग्रजी येत होतं.

मग पेरी मेसन संपल्यावर सिडने शेल्डन, लुडलम, आर्चर अशी प्रगती सुरू राहिली. त्यात अगाथा ख्रिस्तीवर जरा स्थिर झालो, पण रहस्यकथा, थ्रिलर्सपलिकडे प्रगती होईना.

माझ्या आजोबांनी त्यांच्या एका वकील मित्राकरवी फाऊंटनच्या फुटपाथवरून मिळतील तेवढी वुडहाऊसची पुस्तकं मागवली. त्यातलं सर्वात पातळ पुस्तक "द हेड ऑफ केज" उचललं. त्यात क्रिकेटचं वर्णन निघाल्यामुळे (आणि कथानायक माझ्याच वयाचा मुलगा असल्यामुळे) एकदम आवडलं. हळुहळू ती वुडहाऊसची पुस्तकंही संपली.

मग वाटलं, आपल्याला इंग्रजी वाचायला लावणार्‍या आपल्या वडिलांची आणि आजोबांची काय पसंद आहे ते बघू. पुस्तकांच्या कपाटातल्या त्या फळीवर मी कधी गेलो नव्हतो. त्यात पाहिलं तर "डिफेन्स अकौंट्स म्यानुअल", "प्रॅक्टिकल टेलिकम्युनिकेशन्स" वगैरे रोमहर्षक ठोकळ्यांच्या बाजूला डोरिस लेसिंग नावाच्या बाईंची बरीच पुस्तकं होती. आणखीही बरंच होतं. त्यात "हात लावाल तर तुकडा" स्थितीला पोचलेलं मनोहर माळगांवकर नावाच्या लेखकाचं "अ बेंड इन द गँजेस" नावाचं पुस्तक होतं. एकदोन पानांतच त्या पुस्तकाने घट्ट पकडून ठेवलं. हलक्या हाताने पानं उलटत ताठच्या ताठ बसून ते पुस्तक वाचलं. (अजूनही मूड लागला तर वाचतो. आता रोली बुक्सने नवी आवृत्तीपण काढली आहे, त्यामुळे लोळत वाचता येतं.) या पुस्तकाने "भारतीय इंग्रजी लेखन" हा एक नवाच कप्पा उघडून दिला. अरविंद अडिगा वगैरे रत्नं सोडली तर सहसा यात निराशा पदरी येत नाही.

इंग्रजीव्यतिरिक्त तिसरी भाषा येत नाही याचं कधीकधी वाईट वाटतं. बॅटमॅनसारख्या बहुभाषिकाला वाचनाचे किती पर्याय उपलब्ध आहेत याचा हेवा वाटतो.

तर धर्मराजभाऊ - तुम्हाला आवडेल तो प्रकार दुसर्‍या भाषेतून वाचा. म्हणजे भाषेचा अडसर असला तरी आवडीचा वाङ्मयप्रकार तुम्हाला पुस्तक खाली ठेवू देणार नाही. (डायरेक वॉर अँड पीस काढलं तर त्वरित झोप येईल.)

बोका-ए-आझम's picture

15 Jan 2016 - 5:33 pm | बोका-ए-आझम

थ्रिलर्सचं दालन एकदम समृद्ध आहे. विज्ञानकथा आणि थ्रिलर्स मूळ इंग्लिशमध्ये वाचायची मजा वेगळीच. डोस्टोव्हस्की आणि टाॅलस्टाॅय मूळ रशियनमध्ये अफाट आहेत असं एका रशियन शिकणाऱ्या मैत्रिणीकडून ऐकलं होतं. ते इंग्लिशमध्येही अफाट आहेत. बी आणि सी ग्रेडचे थ्रिलर्सही इंग्लिशमध्ये वाचायला मजा येते. हिंदीमध्ये रेल्वे स्टेशन्सच्या स्टाॅलवर मिळणारं वाङ्मय भारीच!प्रेमचंद, मंटो ते सुरेंद्र मोहन पाठक आणि राज काॅमिक्स का सुपरहीरो नागराज हे सगळे तिथे वाचले. शरदबाबूंच्या कादंबऱ्या बंगालीतून वाचायची इच्छा आहे.

इतर भाषेतील साहित्य वाचण्यासाठी, प्रथम तुम्हाला आवडणार्‍या साहित्याची निवड करावी लागेल. उदाहरणार्थ कथा,नाटके, कादंबरी,ललित लेख, वैचारिक लेख, काव्य, कविता, गझल्,विनोदी लेखन. चुटके / किस्से इत्यादी . त्यानंतर कुठली भाषा सहजपणे आत्मसात करता येईल हे ठरवावे लागेल.माझ्या अनुभवावरुन , जी भाषा आपल्याला चांगल्या प्रकारे लिहिता, वाचता, बोलता येते, तिच्या जवळपास जाणारी व आपल्या कानावर सतत येणारी असते, ती भाषा लवकर आत्मसात होते.
आता माझा अनुभव सांगतो. मराठी तर मुळची भाषा होतीच, पण हिंदी सिनेसंगीत ऐकुन ऐकुन , गझल व शेरोशायरी वाचण्यात आनंद वाटू लागला. त्यासाठी उर्दूभाषा यायला हवी असे मनोमन ठरविले. मराठी व हिंदी भाषेच्या जवळपास जाणारी उर्दू भाषा म्हणजे लिपी शिकणे आवश्यक वाटले. त्यासाठी " हिंदी उर्दू टीचर " हे अवघ्या अडीच रुपयांचे पुस्तक आणले.स्वयं-अध्ययन सुरु केले. त्यातुन सराव करता करता , आज उर्दू पेपर वा पुस्तक ९० % वाचु शकतो. काही काही फारसी शब्द वाचता येत नाही, मग त्यासाठी एखाद्या जाणकाराची मदत मिळुन जाते. हीच गोष्ट गुजराथी साहित्याबाबत. गुजराथी लिपी ही देवनागरी लिपीच्या बर्‍याच जवळची असल्याने ( जवळची याचा अर्थ बरचसे शब्द दोन्ही भाषेत सारखेच वा किंचित फरक असलेले असतात.) ती सुध्दा सहज वाचता येवू लागली. गुजरात समाचार, चित्रलेखा गुजराथी मासिक, समकालीन पेपर सहाय्यभूत ठरले.आता मोडी लिपी व पाली भाषेचा अभ्यास सुरु केला आहे.
इंग्रजी भाषेतील उत्तमोत्तम लेखकांच्या कादंबर्‍या फार पुर्वीपासुनच वाचत आलो आहे
.

आदूबाळ आणि जयन्त बा शिम्पि आवडलं.
गुजराथी वाचायला सहावीत शिकलो.खेळाच्या मैदानाजवळच्या गुजराथी वाचनालयात खूप पेपर्स मासिकं( तिथेच वाचनासाठी ) असायची.चांदोबा आणि चित्रलेखा ही दोन एकेक अक्षर ओळखून वाचायचो.चित्रलेखा त्यावेळेस फक्त गुजराथीतच असायचे.कॅालेजात गेल्यावर ब्रिटिश काँउन्सल लाइब्ररीची मेंबरशिप घेतली.त्यात मोठे घबाड सापडले.इंग्रजी बेस्टसेलर्स मात्र उशिरा वाचली.

आदूबाळ आणि जयन्त बा शिम्पि आवडलं.
गुजराथी वाचायला सहावीत शिकलो.खेळाच्या मैदानाजवळच्या गुजराथी वाचनालयात खूप पेपर्स मासिकं( तिथेच वाचनासाठी ) असायची.चांदोबा आणि चित्रलेखा ही दोन एकेक अक्षर ओळखून वाचायचो.चित्रलेखा त्यावेळेस फक्त गुजराथीतच असायचे.कॅालेजात गेल्यावर ब्रिटिश काँउन्सल लाइब्ररीची मेंबरशिप घेतली.त्यात मोठे घबाड सापडले.इंग्रजी बेस्टसेलर्स मात्र उशिरा वाचली.

मुक्त विहारि's picture

15 Jan 2016 - 7:36 pm | मुक्त विहारि

"हॅरी पॉटर आणि टॉम सॉयर" इतपतच सीमीत.

शिवाय आजकाल, बर्‍याच इंग्रजी कादंबर्‍या मराठीत पण प्रकाशित होत असल्याने, आमच्यासारख्या इंग्रजी न समजणार्‍या मराठी माणसांची बर्‍यापैकी सोय झाली आहे.

आपल्याला आवडणारा साहित्य प्रकार घेऊन त्यावर ज्या भाषेत आपल्याला वाचायची इच्छा आहे त्यातली साधी सरळ सोपी पुस्तकं घेऊन सुरुवात केल्यास हळूहळू भाषेची सवय होत जाते.
अनेक पुस्तकांनी भरलेल्या घरात इंग्रजी वाचायची सुरूवात जेम्स हॅडली चेसच्या कादंबऱ्यांनी झालेली!
हाॅस्टेलात एम अॅंड बीचा धुमाकूळ होता! दुय्यम दर्जाची ती पुस्तकं वाचत इंग्रजी वाचन कधी फक्त इंग्रजीच वाचते आहे हे कळले नाही.नंतर कोमा ,फायनल डायग्नाॅसिसने मेडिकल विषयक कादंबर्या वाचायचा चस्काच लागला.एक काळ तर सतत इंग्रजी वाचून विचारदेखील इंग्रजी यायचे डोक्यात.मग परत जाणीवपूर्वक मराठी वाचायला लागले!

छान धागा. प्रतिसाद वाचणार.

रुपी's picture

16 Jan 2016 - 1:33 am | रुपी

चांगला धागा आहे.

अगदी माझेच विचार कुणीतरी लिहिले आहेत असं वाटलं. ("कुठेतरी असेही वाचले की कादंबर्‍या वाचून मेंदू सुस्त होतो आणि छोट्या कथा वाचून विचारप्रवृत्त. कधी कधी याचा अनुभवही घेतला आहे." हे वाक्य सोडून.)

मी काही महिने टोरंटोमध्ये होते तेव्हा तिथल्या समृद्ध वाचनालयांमुळे बरेच इंग्रजी साहित्य उपलब्ध झाले, पण कोणती पुस्तके वाचावीत हे माहीत नव्हते, त्यामुळे म्हणावा तितका फायदा मी करुन घेतला नाही. सध्या वास्तव्य आहे तिथेही पुस्तके मिळू शकतात पण हाताशी वेळ नाही. म्हणजे अगदी पाच पाच मिनिटे वेळ मिळेल तेव्हा वाचू शकते, पण अशा गडबडीत उपलब्ध असेल तर मराठी वाचायलाच माझी पसंती असते. इंग्रजी येत असूनही त्या साहित्यात रमायला थोडी जास्त एकाग्रता असावी लागते, तेवढी मराठी वाचण्यासाठी नसली तरी मी त्याचा आनंद घेऊ शकते. त्यातल्या त्यात डॅन ब्राउनची पुस्तके वाचताना पुढे काय असेल याची सतत उत्सुकता असल्यामुळे जरा वेळ मिळाला की वाच, असं करुन वाचली, पण मग नंतर त्याची शैली तीचतीच वाटून कंटाळले.

आता थोडेफार मी इंग्रजी छोट्या कथा वगैरे ब्लॉगमधून वाचते, पण पुस्तके वाचण्यात अजून फारच मागे आहे.

वरच्या काही प्रतिसादांप्रमाणे गुजराती लिपी वाचायला खरंच सोपी आहे, पण मेहेंदी लावण्याच्या पुस्तकातली गुजरातीतली माहिती किंवा एखादी आरती यांच्या पलीकडे फार काही वाचले नाही.