या वेळच्या मिपा दिवाळी अंकात तीन मुलाखती आल्या त्या आधीही काही मुलाखती प्रसिद्ध झाल्याचे पाहिले. व्यक्तिशः या मुलाखती आवडल्याच त्या शिवाय मराठी संस्थळे आणि दिवाळी अंकांसाठी मुलाखत हा प्रकार जमेची बाजू होऊ शकेल असे वाटले. मराठी भाषेत व्यक्ती आणि प्रसंगांच्या व्यवस्थीत नोंदीं घेतल्या जाण्याचे प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळे विकिपीडियासारख्या ज्ञानकोशीय माध्यमात मूळ स्रोतातील माहितीची सातत्याने कमतरता जाणवत राहते. आडात नसेल तर पोहोर्यात कुठून येणार अशी गत असते. मुलाखती व्यक्ती चरीत्राची संपूर्ण जागा घेऊ शकत नसल्या तरी त्या व्यक्तीत्वाचा मागोवा घेण्याचे महत्वाचे साधन ठरतात त्या शिवाय व्यक्ती परिचयाचा संक्षीप्त का होईना परिचय देण्याची संधी उपलब्ध होते. म्हणून मराठी भाषीक साहित्याच्या दृष्टीने मराठी संस्थळांवरून मुलाखती प्रकाशीत करणे एक अत्यंत स्वागतार्ह बाब वाटते.
अशा मुलाखतींना प्रोत्साहन देणे हा ह्या धाग्याचा उद्देश आहे. मला स्वतःला मुलाखती घेण्याचा अनुभा नाही त्यामुळे ज्या मंडळींना मुलाखती घेण्याचा अनुभव आहे त्यांच्या कडून इतरांनाही मुलाखतीचे तंत्र आणि कला अवगत करण्याची संधी येथील जाणकारांकडून मिळावी म्हणून हा चर्चा धागा.
चर्चेस सुरवात करण्यासाठी काही प्रश्न विचारतो. इतर जिज्ञासू मंडळी आपापले प्रश्न विचारू शकतात.
१) मुलाखत घ्यावयाच्या व्यक्तीशी कशा पद्धतीने संपर्क करावा विशेषतः मुलाखतकार म्हणून अद्याप ओळख झालेली नसताना आणि ओळखीच्या पण विशेष परिचय नसलेल्या व्यक्तीकडे संपर्क कसा करावा (आणि नवागत मुलाखतकार म्हणून स्वतःची भीड कशी चेपून घ्यावी ? - नवीन लोकांशी संपर्क करताना मला स्वतःला भीड वाटत नाही पण मुलाखतीसाठी म्हणजे ? असे तरीही वाटते - हा प्रश्न गांभीर्याने विचारला आहे हे कृ लक्षात घ्यावे)
२) मुलाखत देणार्या व्यक्तीची माहिती कशी मिळवावी ? कोण-कोणत्या स्वरुपाची पुर्वतयारी करावी ? प्रश्न कसे बनवावेत ? कोणत्या गोष्टी विचाराव्यात कोणत्या गोष्टी विचारणे टाळावे
३) वेळ आणि ठिकाण कसे निवडावे ?
३) टेपरेकॉर्डर सारखी कोणकोणती साधने वापरता येऊ शकतात हल्ली मला वाटते मोबाईलवरही रेकॉर्डींग करता येते, रेकॉर्डींग करताना अथवा मोबाईल फोनवर रेकॉर्डींग करताना काय स्वरुपाच्या अडचणी येऊ शकतात ? तांत्रिक अडचणींचे निराकरण कसे करावे ?
४) मुलाखतीत मिळणारी माहिती हि विश्वासार्ह आहे हे कसे ठरवावे ? मुलाखतीत मिळणार्या माहितीच्या पडताळणीसाठी दुजोरा मिळवण्याचे काही मार्ग आहेत का ते कसे शोधावेत आणि वापरावेत ?
५) मुलाखत अपेक्षीत वळणाने गेली नाही काही अडचण आली तर मार्ग कसा काढावा ?
६) मुलाखत देणार्या व्यक्तीचा टेक्स्ट लिहून काढताना काय काळजी घ्यावी ? तो टेक्स्ट त्या व्यक्तीला दाखवणे आणि लेखी सही घेणे जरूरी असते का ?
७) मुलाखत देणार्या व्यक्तीस न आवडणारे अवघड प्रश्न कसे विचारावेत ?
८) मुलाखत देणारी व्यक्ती मुळ प्रश्नावरून भरकटत असेल अथवा प्रश्नाला बगल देत असेल तर गाडी पुन्हा रुळावर कशी आणावी ?
* उपरोक्त प्रश्न बरोबर आहेत का हे ही मला माहित नाही म्हणुन इतरांनी प्रश्न सुचवण्यात प्रश्नात बदल करण्यात मदत करावी.
मुलाखतकारांना धन्यवाद आणि शुभेच्छा.
प्रतिक्रिया
27 Nov 2015 - 3:12 pm | स्पा
अशी घ्यावी
27 Nov 2015 - 3:41 pm | माहितगार
:) कशी ?
27 Nov 2015 - 3:34 pm | कपिलमुनी
आणुबव येण्यासाठी मिपाकरांच्या मुलाखती घ्या
27 Nov 2015 - 3:42 pm | माहितगार
बरोबर या धागा लेखाचा एक उद्देश असाही आहे हे खरे. घरकी मुर्गी म्हणून उल्लेखनीय मिपाकरांकडे दुर्लक्ष करू नये असे वाटते.
27 Nov 2015 - 3:46 pm | आदूबाळ
बरोबर.
आमच्या सरांची मुलाखत घ्या. मस्त अणुबव मिळेल.
"मी, मिपा आणि मिपानंतर (काय?)" असं शीर्षक सुचवतो.
27 Nov 2015 - 3:59 pm | माहितगार
प्रा डॉं बद्दल म्हणताय ? आयडीया चांगली आहे !
27 Nov 2015 - 5:53 pm | आदूबाळ
प्रा डॉ नव्हे हो. (म्हणजे त्यांची घ्या मुलाखत, नाय असं नाय.)
मी म्हणत होतो ते हेवणवाशी गुर्जी.
27 Nov 2015 - 6:01 pm | माहितगार
ऑ sss !!
27 Nov 2015 - 6:31 pm | कंजूस
ज्या मंडळींना मुलाखती घेण्याचा अनुभव आहे त्यांच्या कडून इतरांनाही मुलाखतीचे तंत्र आणि कला अवगत करण्याची संधी येथील जाणकारांकडून मिळावी म्हणून हा चर्चा धागा.
ते इथले मुलाखतकार सांगतीलच परंतू "ज्ञानकोशीय माहिती स्रोत" या दृष्टीकोनातून हे विचारतो की काय अपेक्षित आहे?लेखी अथवा दृक् माध्यमात फरक असावा असे वाटते.टिव्ही न्यूज चानेलच्या मुलाखती या प्रासंगिक असतात.त्यातून संपूर्ण व्यक्तीमत्त्व पुढे न आणता काही विशेष घटनेमुळे आणि ती व्यक्ती त्या घटनेशी निगडीत वाटल्यामुळे त्या विषयी मते मुलाखतीतून जाणून घेतली जातात.
27 Nov 2015 - 6:49 pm | माहितगार
लेखी आणि दृक्-श्राव्य दोन्ही बद्दल वेगवेगळ्या टिप्स देण्यास हरकत नाही (दोन्हीही मिपाच्या माध्यमातून दाखवता येऊ शकतील पण युट्यूबसाठीच्या दृक्-श्राव्य मुलखाती (टिव्हीच्या तुलनेत) सहसा संक्षीप्त असतील तर त्या संक्षीप्त ठेवण्यासाठी काय केले पाहीजे किंवा त्यांचे एडींटींग करुन संक्षीप्त कसे कारावे आणि त्यातील अडचणी हे कदाचित मुख्य मुद्दे असतील).
मुलाखतींचे मुख्य प्रयोजन एखाद्या व्यक्तीचे माहित नसणारे पैलू आणि विचार माहित करून घेऊन वाचकांपर्यंत पोहोचवणे असावे. ज्ञानकोशीय संदर्भ म्हणून प्रयोजन आहेच पण मुलाखतकारासाठीही हे प्रयोजन दुय्य्म ठरेल तसेच ज्ञानकोशासाठी मुलाखती मुख्यत्वे दुजोरा मिळण्याचे साधन ठराव्यात, ज्ञानकोशासाठी अभ्यासकांनी लिहिलेली सा़क्षेपी व्यक्ती चरीत्रे हाच मुख्य स्रोत ठरावा. ज्ञानकोशांना जेव्हा व्यक्तिचरीत्रे उपलब्धच नसतात काहीच माहिती मिळत नाही तेव्हा उपलब्ध मुलाखती चे तौलनीक महत्व वाढते.
27 Nov 2015 - 6:52 pm | माहितगार
साधारणतः मुलाखतकाराने मुलाखतीतून येणार्या माहितीस स्वतंत्र दुजोरा घेऊन मुलाखतीतून मिळालेली माहिती विश्वासार्ह आहे आणि जमल्यास संक्षीप्त व्यक्ती चरीत्र (बायोडाटा) सोबत जोडल्यास ज्ञानकोशीय संपादकाचे काम बरेच हलके होऊ शकते.
27 Nov 2015 - 7:59 pm | कंजूस
"मुलाखतींचे मुख्य प्रयोजन एखाद्या व्यक्तीचे माहित नसणारे पैलू आणि विचार माहित करून घेऊन वाचकांपर्यंत पोहोचवणे असावे."
-थोडक्यात त्या व्यक्तीचे झटपट मौखिक आत्मचरित्र/कथन त्या्च्याच शब्दांत.
28 Nov 2015 - 9:46 am | विशाखा पाटील
मूळ धाग्यातल्या प्रश्नांविषयी थोडक्यात-
मुलाखत घ्यावयाच्या व्यक्तीशी प्रत्येकवेळी परिचय असतोच असे नाही. पण त्यांच्या कामाविषयी माहिती असते. आज संपर्क साधणे तेवढे अवघड राहिलेले नाही. मुलाखत देणारे आपला बायोडाटा कधी स्वतंत्रपणे देतात तर कधी मुलाखतीतून उलगडून दाखवतात. माहितीच्या संकलनासाठी मुलाखतीतून सांगितल्यासही तेवढे अवघड होत नसावे, असा माझा अंदाज.
प्रश्न कोणते विचारावे/टाळावे याला ठराविक उत्तर नाही. ते मुलाखतकाराचे कौशल्य आणि कोणत्या प्रश्नाला कसे उत्तर द्यायचे हे मुलाखत देणाऱ्याचे कौशल्य. माझा अनुभव- झी २४ तासवरच्या हार्ट टू हार्ट मधल्या मुलाखतीसाठी आधी एकही प्रश्न सांगण्यात आला नव्हता. मी फक्त एक विनंती केली होती, की वैयक्तिक माहिती एका प्रश्नात गुंडाळून लगेच मूळ विषयाकडे वळावे. मुलाखतीत एकदोन प्रश्न वेगळे वाटले, त्याला कसे तोंड द्यायचे हे लगेच सुचायला हवे. छापील आणि दृकश्राव्य मुलाखतीत हा मोठा फरक आहे.
सध्या एका मुलाखतींवर आधारित प्रोजेक्टवर काम करतेय. मुलाखतींचे रेकोर्डिंग आहे, त्याचे transcript तयार करणे हे मोठे आणि अवघड काम असते. बोलीभाषेचा वापर असल्यामुळे ते तसेच ठेवावे की त्याला प्रमाण भाषेत आणावे, असा सुरुवातीला संभ्रम होता. पण भाषिक अंगाने मुलाखतींचा अभ्यास व्हावा, यासाठी बोली भाषा ठेवण्याचे निश्चित केले गेले. (मूळ विषयाबरोबरच मुलाखतींमधली भाषा हा अभ्यासाचा विषय होऊ शकतो.) अशा मुलाखतींच्या विश्वासर्हतेचा मुद्दा असतोच. त्याविषयी नंतर लिहिते.