विज्ञानं अध्यात्म ?

मयुरMK's picture
मयुरMK in काथ्याकूट
24 Nov 2015 - 11:18 am
गाभा: 

२१ व्या शतकातील सामान्य विचारसरणी ही विज्ञानवादी आहे. मनाला पटले, बुद्धीला पटले तर ते योग्य आहे. विज्ञान, अध्यात्म वा देवधर्म ह्यांची तत्त्वे ही अध्यात्मिक ज्ञानाबद्दल, देवधर्माबद्दल साशंकता निर्माण करतात. माणसाला देवधर्म, अध्यात्म हे सोपस्कार करायचे नसतातच, असे नाही, परंतु ‘तो कां करायचा?’ हा चा मूळ प्रश्न असतो. अध्यात्म आणि आधुनिक विज्ञान ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अध्यात्म हे वैदिक विज्ञान आहे, तर विज्ञान हे आधुनिक अध्यात्म आहे, तरी सुद्धा या दोन्ही गोष्टींमध्ये एक सूक्ष्म फरक आहे अध्यात्म हे व्यक्तिगत आहे, तर विज्ञान हे सार्वजनिक आहे.

साधना, तप वगैरे करून, अध्यात्मात व्यक्तिगत विकास साधता येतो तर वैज्ञानिक शोध हे सार्वजनिक विकास साधू शकतात. विज्ञानाचा उपयोग करून सर्वसाधारण माणूसदेखील एक बटण दाबून प्रकाश निर्माण करू कतो, टीव्ही च्या सहाय्याने जगभरातील घडामोडींचा आढावा घेऊ शकतो, तर अध्यात्म हे व्यक्तिगत पातळीवर ह्या सर्व गोष्टींची अनुभूती निर्माण करू शकते.

पराकोटीची आध्यात्मिक उन्नती साधलेला एखादा योगी सत्पुरुष वरील सर्व गोष्टींची अनुभूती कोणतीही वैज्ञानिक उपकरणे न वापरता घेऊ शकते किंवा घेत असतो. हे खरे आहे की खोटे, हे सिद्ध करण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही. त्यावर एकच उपाय आहे – व्यक्तिगतरीत्या आपली आध्यात्मिक उन्नती साधा. त्या सात्त्विक आध्यात्मिक पातळीपर्यंत स्वत:चा विकास करा अन् मग पाहा हे सर्व अनुभव घेता येतात की नाही, हे खरे आहे की नाही ?

पुर्वीपासूनच अध्यात्म आणि विज्ञान यांची तुलना केली जाते. कोण श्रेष्ठ यावर वाद होतात. प्रत्येकाचे समर्थक आपापल्या भूमिकेवर ठाम असतात. पण, एक मूळ मुद्दा कुणी लक्षात घेत नाही की मुळातच ही तुलना करणेच चुक आहे. कसे? कारण तुलना करण्यासाठी आधी त्या दोन गोष्टींत एक मूळ साम्य सावे लागते. तुम्ही म्हणाल हे कसे?

एक उदाहरण देवून सांगतो : तुम्ही सचिन तेंडुलकर आणि सुनिता विलियम्स यांची कारकिर्दीची तुलना कराल का? नाही. कारण दोघांची कार्यक्षेत्रे वेगळी. पण सचिन आणि सुनील गावस्कर यांची तुलना करू शकता. कारण दोघांत एक मूळ साम्य आहे. त्यांची कार्यक्षेत्रे एकच आहेत. म्हणजे हेच ते तुलना करण्यासाठी लागणारे मूळ साम्य.

तसेच अध्यात्म आणि विज्ञान या मुळातच दोन वेगळ्या गोष्टी आहेत.त्यात आपण तुलना करूच शकत नाही. दोघांत कोण श्रेष्ठ हेही ठरवणे योग्य नाही. एकाचा निकष दुसऱ्याला लावून उपयोग नाही. विज्ञानाच्या नियमांचा निकष लावून अध्यात्म कसे तपासता येईल? आणि अध्यात्माच्या पातळीवर विज्ञान कसे खरे उतरेल? दोन्ही शक्य नाही. असे करूही नये.

पण असेच होते आहे. माणूस आयुष्यभर या दोघांत गल्लत करतो. एकाच्या मार्गावर गेले म्हणजे दुसरे सोडले पाहिजे असे त्याला वाटते. येथेच चुकते.

दोन्ही गोष्टी माणसाच्या आयुष्यात सारख्याच महत्त्वाच्या आहेत. दोन्ही गोष्टी माणसाच्याच विचारशक्तीतून निर्माण झाल्या आहेत. आज काँप्युटर युग असले म्हणून काय झाले? काँप्युटर शेवटी माणसानेच बनवले आहे. विचारशक्तीच्या आधारे.

हा विचार नेमका मनात कोठून येतो. हे कुणीच सांगू शकत नाही. वैद्यक शास्त्र सुद्धा नाही. विचार मेंदूतून येतो हे खरे असले तरी विशिष्ट वेळेसच विशिष्ट विचार का येतो? एखादी अशी शक्ती ( विज्ञानाच्या आकलनापलिकडे, विज्ञानाच्या कोणत्याच नियमात न बसणारी ) आहे जी आपल्या मनात विचार 'टाकते'... अशी शक्यता नाकारता येत नाही. मानव चंद्रावर जावून जरी पोहोचल असला तरी, ज्या उपकरणां आधारे तो चंद्रावर पोहोचला ती उपकरणे मानवानेच बनवली आहेत आणि ती ही विचारशक्तीच्या आधारे!

आता हेच पाहा ना, ज्योतिषशास्त्रात ग्रह व त्यांचे मानवी जीवनावर होणारे परिणाम यांचा अभ्यास केला जातो. आधुनिक खगोलशास्त्रातही ह्याचा अभ्यास केला जातो. दोन्ही पद्धतींत फरक आहे. परंतु अध्यात्माच्या ह्या विषयाची मूळ संकल्पना हीदेखील विज्ञानाच्या आधारे सिद्ध झाली आहे. समुद्राला येणारी भरती-ओहोटी ही चंद्राच्या गुरुत्त्वाकर्षणाशी संबंधित आहे. समुद्राचे पाणी आणि आपल्या शरीरातील रक्त ह्यांत खूपच साम्य आहे, हे मेडिकल सायन्सेसच्या आधारे सिद्ध झाले आहे. ब्लडप्रेशर असणार्‍या व्यक्तींना पौर्णिमेच्या दरम्यान अधिक त्रास होतो. म्हणजेच चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा मानवी शरीरावरही परिणाम होतोच. पागलखान्यात भरती केलेले वेडे, पौर्णिमेच्या दरम्यान विचित्र वागतात. मानवी मनावर, शरीरावर परिणाम करणारा चंद्र हा एकटाच आहे की इतरही ग्रह, तारे, नक्षत्र, सूर्य आदि सर्व खगोलीय वस्तुजात ह्या ब्रह्मांडातील सकल चराचर सृष्टी, आदी आपल्या शरीरातील कणाकणांवर परिणाम करीत असतात? ह्या सर्व परिणामांचे अति सूक्ष्म आणि अति सरळ पातळीवरचे गणित मांडणारे, अभ्यासणारे शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र. गल्लोगल्ली वा रस्त्यावर दुकान मांडून लोकांना फसविणार्‍या कुडमुड्या ज्योतिष्यांनी हे शास्त्र पूर्ण बदनाम करून टाकले आहे. जो येतो तो स्वत:ला एक निष्णात ज्योतिषी भासवितो. आपण अभ्यासिलेले उपाय ठासून सांगतात. मग हे उपाय केल्यावरही जर दोष गेले नसतील तर त्याचा हे विचारदेखील करीत नाहीत. स्वत:ची कोणतीच अनुभूती नसते, नशीब बदलविण्याचे त्यांचे सामर्थ्यही नसते. तरी ते इतरांच्या भविष्याशी सतत खेळत असतात. ज्योतिषशास्त्राचे सूक्ष्म आणि खरे गणित जाणून अचूक भविष्यवाणी करणारे प्रामाणिक अभ्यासक फारच थोडे आहेत, ते भेटणे हा खरा दैवयोगच आहे.

केवळ ज्योतिषशास्त्रच नव्हे तर अध्यात्माशी संबंधित सर्व शास्त्रे,वास्तुशास्त्र, स्थापत्य, नृत्य, संगीत, गायन, वादन, यज्ञशास्त्र, कर्मकांड ह्या सगळ्यांचे गहन विज्ञान आहे. आजच्या आधुनिक विज्ञानाची प्रगती ह्या प्राचीन विज्ञानापूढे अक्षरश: तोकडी आहे.

प्राचीन स्थापत्यशास्त्रांच्या आधारावर बनविलेल्या एखाद्या मंदिराचेच उदाहरण पाहा, अशा मंदिराच्या घुमटाचा आकार हा अति विशिष्ट ‘जॉमेट्रीतल्या पॅराबोलाच्या’ आकारासारखा असतो, अंतर्गोल आरशावर जर सूर्याची किरणे पडली तर ती परावर्तित होऊन आरशाच्या केंद्रस्थानी प्रखर उष्णता निर्माण करतात. ह्या केन्द्रस्थानी जर कापसाचा बोळा ठेवला तर तो क्षणार्धात जळू लागतो, मंदिराच्या घुमटाचाही असाच एक केद्रबिंदू असतो, तो बिंदू म्हणजे गाभार्‍यात बसलेल्या पूजार्‍यांचे स्थान. हे अति विशिष्ट आहे. त्या स्थानावर बसून म्हटलेल्या ॐ काराचा, मंत्रांचा, वैदिक मंत्रांचा ध्वनी घुमटाच्या आतील भागावरून परावर्तित होऊन अनेक पटींनी प्रभावी बनतो, मंदिरातील वातावरण भारून टाकतो आणि हे आपल्या रोमारोमाला जाणवते. किती परिणामकारक विज्ञान आहे हे !

सांगायचा उद्देश असा की विज्ञान आणि अध्यात्म यात तुलना न करता, त्या दोन्ही गोष्टींची आपल्याला गरज आहे. दोन्ही आपापल्या परिने श्रेष्ठ आहेत. विज्ञानयुग आहे म्हणून ज्योतिष, देव, अध्यात्म, भूत, अतिंद्रीय शक्ती नाहीतच असे म्हणता येणार नाही. विज्ञानाच्या नियमात बसवता आल्या नाहीत म्हणून त्या गोष्टी लगेच खोट्या ठरत नाहीत.

टिप -

एकमेकांच्या चुका काढन्यापेक्षा त्या चुकीचे निरसन कसे होइल हे पहावे.

स्त्रोत- आंतरजालावरुन साभार

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

24 Nov 2015 - 11:22 am | प्रचेतस

चोप्य पस्ते

चौकटराजा's picture

24 Nov 2015 - 2:40 pm | चौकटराजा

सर्व लेखात काही ठीक आहे बाकी .....

विश्वव्यापी's picture

30 Dec 2015 - 3:53 pm | विश्वव्यापी

लेख छान आहे .तुमचा दृष्टीकोन आवडला .
असेच लिहित जा ..

सतिश गावडे's picture

31 Dec 2015 - 12:11 am | सतिश गावडे

अतिशय सुंदर, विचार करायला लावणारा लेख.

पराकोटीची आध्यात्मिक उन्नती साधलेला एखादा योगी सत्पुरुष वरील सर्व गोष्टींची अनुभूती कोणतीही वैज्ञानिक उपकरणे न वापरता घेऊ शकते किंवा घेत असतो. हे खरे आहे की खोटे, हे सिद्ध करण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही. त्यावर एकच उपाय आहे – व्यक्तिगतरीत्या आपली आध्यात्मिक उन्नती साधा. त्या सात्त्विक आध्यात्मिक पातळीपर्यंत स्वत:चा विकास करा अन् मग पाहा हे सर्व अनुभव घेता येतात की नाही, हे खरे आहे की नाही ?

या परिच्छेदाने मनाचा ठाव घेतला.

स्त्रोत- आंतरजालावरुन साभार

आपला प्रांजळपणा आवडला. अशीच सुंदर विचारमौक्तिके आंतरजालावर आढळल्यास ईथे देत जा. आम्हालाही चार ज्ञानकण वेचता येतील.

मयुरMK's picture

31 Dec 2015 - 11:18 am | मयुरMK

धन्यवाद प्रतिसाद बद्दल..