आडवाटेवरची भटकंती : करमाळा आणि किल्ले परांडा

उल्लु's picture
उल्लु in भटकंती
23 Nov 2015 - 4:48 pm

बरेच दिवस जायचं जायचं म्हणत ह्या महिन्यात अंबेजोगाईला जायचा योग आला. पुणे अंबेजोगाई प्रवासात नेहमीची वाट सोडून आडवाटेवरच ठिकाण म्हणून करमाळा बघायच ठरवल. पुण्याहून सोलापूर हायवेवर साधारण १०० किलोमीटर गेल्यावर भिगवणला फाटा लागतो तिथून ६० किलोमीटर वर करमाळा आहे. सोलापूर जिल्हातील एक तालुक्याचं ठिकाण असलेल करमाळा एक छोटस गाव आहे. सुरवातीच्या काळात बहामनी साम्राज्याचा भाग असलेले करमाळा नंतर नगरची निजामशाहिच्या अमलाखाली होते. निजामशाही सरदार रावरंभा निंबाळकरांची जहागीर असलेले करमाळा प्रसिद्ध आहे ते इथल्या कमला भवानी किंवा कमळजाइ मंदिरासाठी.
Pune Karmala Mp

कमला भवानीच मंदिर गावाच्या बाहेरील ओसाड अश्या माळावर आहे. मंदिरच वैशिष्ट्य म्हणजे इथे चक्क दाक्षिणात्य शैलीशी मिळतीजुळती गोपुरे आपले मंदिर प्रांगणात स्वागत करतात. महाराष्ट्रातील खूप कमी मंदिरात अशी गोपुरे बघायला मिळतात. शैलीतील हा बदल खरतर पिढीतील बदलामुळे झालाय. मुख्य मंदिर बांधल (कदाचित जीर्णोद्धार केला) सरदार राजे रावरंभा ह्यांनी तर बाजूची तटबंदी आणि हि गोपुरे बांधली त्याच्या मुलानी म्हणजे राजे जनकोजीनि. जनकोजी दक्षिणेच्या स्वारीवर असताना तिकडची मंदिरे आणि भव्य गोपुरे पाहून प्रभावित झाला आणि त्यांनी तिकडचे कारागीर करमाळ्यात आणून सुंदर गोपूर बांधून घेतली.
Gopur1

gopur 2
मूळ मंदिर चारही बाजूनी भक्कम दगडी तटबंदीनी वेढलेले आहे. तटबंदीच्या आतील बाजूस सुंदर दगडी ओवऱ्या आहेत आणि पूर्ण अंगणाला दगडी फरसबंदी केली आहे. मंदिरा समोर होमकुंड आणि तीन गगनचुंबी दीपमाळा आहेत. मंदिराची शैली हेमाडपंथी आहे असा उल्लेख सगळीकडे असला तरी त्या शैलीची वैशिष्ट्ये ठळकपणे इथे पाहायला मिळत नाहीत जसे उंच जोते, मंदिराचा बाह्य आकार आणि त्यावरील नक्षीकाम इत्यादी ह्या मंदिरावर दिसत नाहीत. कदाचित हेमाडपंथी आणि इस्लामिक शैलीची सरमिसळ झाली असावी असे वाटते. दिपामालांचा प्रकार हि पारंपारिक मराठी नसून बराचसा इस्लामिक प्रभाव असलेला वाटतो. एक शक्यता अशी वाटते कि मुळ मंदिर हेमाडपंथी शैलीतील असावे आणि जीर्णोद्धार निजामशाही काळात झाला असल्याने हि शैलीतील सरमिसळ झाली असावी. अलीकडच्या काळातच सुंदर अशा दगडी मंदिराला ऑइल पेंट फासून त्याच्या सुंदरतेला दृष्ट लागणार नाही ह्याची काळजी देवस्थान trust नि घेतलेली दिसतीय.

Darvaja

Deepmal 1

Deepmal 2

मंदिराबद्दल आख्यायिका अशी सांगतात कि सरदार रावरंभा हा तुळजापूरच्या भवानी मातेचा निस्सीम भक्त होता वृद्धापकाळात त्याला तुळजापूरला दर्शनाला जाणे शक्य होईना म्हणून भवानीने त्याला दृष्टांत दिला कि मी तुझ्या मागे तुळजापुराहून करमाळ्याला येईन पण तू मागे वळून बघायचे नाही. रावरंभा गावाबाहेरील माळापर्यंत आला आणि त्याच्या मनात शंका आली. देवी खरच मागे येत आहे कि नाही हे पाहण्यासाठी त्याने मागे वळून पाहिले आणि देवी अंतर्धान पावली. त्याचठिकाणी हे मंदिर बांधले आहे. आता अशीच कथा मी मिरजेच्या अंबाबाई बद्दलहि ऐकली आहे, खरे खोटे ती भवानीच जाणे. कमला भवानी मातेची मूर्ती मात्र अतिसुंदर आहे.. काळ्याशार पाषाणातील हातात त्रिशूल आणि तलवार धारण केलेली अष्टभुजा मूर्ती डोळ्याचे पारणे फेडते. देवीच्या उजव्या डाव्या बाजूस शंकर व गणपतीची छोटी मंदिरे आहेत. मंदिराच्या अगदी समोरच एक शंकराचे अगदी छोटेसे पण सुंदर दगडी घुमटी सारखे देऊळ आहे आणि त्याच्या शेजारी कुणाची तरी समाधी. समाधीचा वापर सध्या गावकरी पत्त्यांचा फड लावण्यासाठी करतात. मंदिर परिसराच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ९६ पायऱ्यांची विहीर.
mandir

Shankar

कातीव दगडात बांधलेल्या ह्या अष्टकोनी विहिरीत पाणी जवळपास ५० ते ६० फुट खोलवर असेल. पण पाण्यासाठी त्या खोलीपर्यंत बांधलेल्या एकसारख्या सुरेख ९६ पायऱ्या आहेत. पुरातन काळापासून पाणी पुरवठ्यासाठी बांधलेल्या अशा विहिरी (step wells) भारतभर पाहायला मिळतात. ह्या विहिरीचे वैशिष्ट्य म्हणजे हि अगदी दक्षिण उत्तर अक्ष ठेऊन बांधली आहे. उत्तरेकडून पायर्या आणि दक्षिणेला विहीर. ह्या अक्षाचा फायदा म्हणजे सुर्यभ्रमण पूर्वेकडून पश्चिमेकडे होत असल्यामुळे, पाणी आणि पायऱ्या दिवसभर जास्तीजास्त वेळ सावलीत राहतात फक्त भरदुपारी १२ वाजण्याच्या आसपास पाण्यावर सूर्यकिरण पोहोचतात. त्यामुळे बाष्पीभवन कमी प्रमाणात होते आणि सावलीतील पायऱ्या वापरणेही सोयीचे होऊन जाते. भारतभर जवळपास सगळ्याच अशा विहिरी (step Wells) ह्याच संकल्पनेवर बनलेल्या दिसतात हे विशेष. आपल्या पूर्वजांचे वातावरणाला अनुकूल करून घेणारे design बघून थक्क व्हायला होते. अर्थातच आपण जशी अनेक पुरातन पाणवठा ची जशी वाट लावली आहे तशीच ह्या विहारीची देखील लावली आहे. पाणी उपसा नसल्यामुळे आणि कचरा टाकल्यामुळे पाणी प्रदूषित झाले आहे. जवळपास सगळीकडे गवत पसरले आहे आणि ह्या ऐतिहासिक ठेव्याशेजारीच ग्रामपंचायतीने महिलांसाठी असलेले पण बंद असणारे स्वच्छतागृह बांधले आहे.

Step well 1

Stepwell 2

इतक्या सुंदर मंदिर आणि परिसरात फिरल्यानंतर आम्ही निघालो अंबेजोगाई च्या दिशेने. रस्त्यातच आम्हाला मिळाला आणखी एक ऐतिहासिक ठेवा ज्याची आम्ही कल्पनाही केली नव्हती. किल्ले परांडा...
पण तो आता पुढच्या भागात....

क्रमशः

प्रतिक्रिया

इस्लामिक शैलीचा प्रभाव स्पष्ट दिसतोय. हेमाडपंथी शैली मला दिसली नाही ह्या मंदिरात. ऑइलपेंट देऊन मंदिराची रया का घालवतात ते करणारेच जाणोत.

परांडा हा एक भव्य किल्ला आहे. पण तेथे छायाचित्रणास मनाई आहे.

पुभाप्र.

मंदिराचे स्तंभ मला यादवकालीन वाटतात. तशी ठेवण आहेच. स्तंभ वगळता इतर सर्वच भाग नंतरचा आहे.

मुख्य मंदिराच्या बांधकामाची शैली बरीचशी यादवकालीन / हेमाडपंथई असावी असा वाटते. वापरलेले स्तंभ आणि मुख्य म्हणजे structural system हि त्याप्रकाची म्हणजे खांब आणि तुळई ( trabeated system ) ह्यांचीच आहे. पण सगळीकडे मंदिर सरदार राव रंभा नि बांधले असाच उल्लेख आहे जो पटत नाही. म्हणूनच अस वाटत कि मूळ मंदिर यादवकालीन असावे आणि निजामशाही काळामध्ये त्याचा जीर्णोद्धार झाला असावा. नंतरच्या बांधकामावर जाणवण्या इतपत मुस्लीम स्थापत्य शैलीचा प्रभाव दिसतोय.

अमृत's picture

23 Nov 2015 - 4:58 pm | अमृत

व सोबतीला शब्दांकन. मंदिर परीसरातील स्वछता वाखाणण्याजोगी आहे. छायाचित्रांवरून विहीरीची भव्यता जाणवते. अजुन लिहा वाचायला आवडेल.

टीप - असा कसा आयडी घेतलात राव तुम्ही. उल्लूजी किंवा मस्त रे ऊल्लू असं कसं लिहायचं?? :-)

बाबा योगिराज's picture

23 Nov 2015 - 8:06 pm | बाबा योगिराज

अमृत जी सोबत सहमत..

मांत्रिक's picture

23 Nov 2015 - 5:02 pm | मांत्रिक

वा! लेख आवडला. फोटो पण झकासच!
आयडी नाव भारीच आहे अगदी!

हे अगदी कधी न ऐकलेले ठिकाण. एक नंबर!!!! काय मस्त विहीर आहे ती, वाह! ते गोपुरही छानच. असेच अन्य उदाहरण म्ह. तासगावच्या गणपतीचे. पटवर्धनांनीही खास कर्नाटकाहून कारागीर बोलवून गोपुर बांधवून घेतले.

प्रचेतस's picture

23 Nov 2015 - 5:30 pm | प्रचेतस

हेच म्हणतो.
लेख आवडला.

सौंदाळा's picture

23 Nov 2015 - 5:50 pm | सौंदाळा

न ऐकलेले ठिकाण.
सुंदर वर्णन आणि फोटो
प्रचेतसच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत

सौंदाळा's picture

23 Nov 2015 - 5:50 pm | सौंदाळा

न ऐकलेले ठिकाण.
सुंदर वर्णन आणि फोटो
प्रचेतसच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत

वेल्लाभट's picture

23 Nov 2015 - 5:57 pm | वेल्लाभट

यकदम सही... किल्ला येऊदे लवकर

चांदणे संदीप's picture

23 Nov 2015 - 6:16 pm | चांदणे संदीप

इ हमरा गांव बा!
(जहा हम कबहु नाही गये! :( )

Sandy

बाबा योगिराज's picture

23 Nov 2015 - 8:08 pm | बाबा योगिराज

माझ्या साठी तरी ही जागा नविनच आहे. लेखन, वर्णन आवडले. फोटो सुध्दा आवडले.
पुढील भाग लवकर येऊ द्या.

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Nov 2015 - 8:13 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर लेख आणि फोटो. विहीर खास आवडली !

प्रीत-मोहर's picture

23 Nov 2015 - 8:18 pm | प्रीत-मोहर

वाचिंग

आणखी सांगायच राहिल म्हणजे त्या ३ दीपमाळामधील दोन माळात वरच्या मजल्यापर्यंत जिना आहे.. आम्ही गेलो त्यावेळी नवरात्र - जत्रा वगेरे संपल्या होत्या त्यामुळे आजीबात गर्दी नव्हती आणि मंदिरात त्यामानाने बरीच स्वच्छता होती...

छान लेख.नवेच ठिकाण समजले.

पैसा's picture

23 Nov 2015 - 10:12 pm | पैसा

सुंदर लेख आणि छायाचित्रे!!

बोका-ए-आझम's picture

23 Nov 2015 - 10:55 pm | बोका-ए-आझम

फोटो पण मस्त!

राही's picture

23 Nov 2015 - 11:02 pm | राही

गेल्याच आठवड्यात आम्ही लातूर-उस्मानाबादमध्ये होतो. परांडा अर्थात पाहिला. भव्य, भक्कम भुईकोट आहे. आपण अधिक लिहालच. पण दुर्गरचनेचा एक उत्तम नमुना आणि अजूनही बर्‍यापैकी सुस्थितीत.
दुसरे म्हणजे मराठवाड्यातल्या काही देवळांनजीक उत्तम स्थितीतल्या पुष्करण्या आहेत. त्यातल्या कोनाड्यात अजूनही मूर्ती आहेत. मराठवाडा, विशेषतः तेर-उस्मानाबाद-लातूर पट्टा जुन्या अवशेषांची खाण आहे.

राही's picture

23 Nov 2015 - 11:04 pm | राही

लेख आणि फोटो आवडले हे लिहायचे राहिले.

विशाल कुलकर्णी's picture

24 Nov 2015 - 8:49 am | विशाल कुलकर्णी

आमच्या गावाकडं जावून आलात तर पावनं? मस्तच झालाय लेख.. आवडेश !

मालोजीराव's picture

24 Nov 2015 - 3:12 pm | मालोजीराव

बरेच जण या मंदिराला ९६ कुळी मंदिर म्हणूनही ओळखतात.
मुख्य मंदिर ९६ खांबांवर उभे आहे, शिखरावर अनेक शिल्प आहेत त्यांची संख्या हि ९६ च आहे. बाजूला ज्या ओवर्या आहेत त्यांची संख्याही ९६ आहे. इतकेच काय तर तिथल्या भव्य दीपमाळेतील पायऱ्यांची संख्या सुद्धा ९६ आहे.
९६ पायऱ्यांची विहीरही आहे ज्याचा उल्लेख लेखात आहेच.

शान्तिप्रिय's picture

24 Nov 2015 - 4:15 pm | शान्तिप्रिय

अप्रतिम माहिति आणी छायाचित्रे.

नाखु's picture

24 Nov 2015 - 5:06 pm | नाखु

भारी ठिकाण आहे..
वल्लींना घेऊन जाणे आले..

राघवेंद्र's picture

23 Apr 2016 - 1:40 am | राघवेंद्र

तुम्हाला माहित होते का इथे झिंगाटचे चित्रीकरण होणार होते. आज झिंगाटचा video बघुन धान्याची आठवण झाली. ह्या फोटोतल्या सगळ्या जागी चित्रीकरण झाले आहे.

अगदी हेच म्हणायला आले होते. आजच ते गाणं पाहिले व इकडे हा फोटू पाहून लगेच लक्षात आले.

डायरेक्टर नागराज मंजुळे मुळचा करमाळ्याचाच आहे. त्याने जुन्या आठवणीप्रमाणे सैराटचा खास पोस्टर शो पण करमाळ्यात आयोजित केलेला. अगदी हलगीच्या तालावर डान्स पण.

दुश्यन्त's picture

23 Apr 2016 - 11:13 pm | दुश्यन्त

मस्त आहे करमाळा. मी जावून आलोय. आता सैराट'मुळे हे ठिकाण, मंदिर आणि ९६ पायऱ्याची विहीर चर्चेत येणार .

अजय देशपांडे's picture

24 Apr 2016 - 9:06 am | अजय देशपांडे

मी पण जावून आलो आहे पुन्हा कधी तरी फोटो टाकीन इकदम छान ठिकाण कर्माला आणि परंडा किल्ला हि

अजय देशपांडे's picture

24 Apr 2016 - 9:11 am | अजय देशपांडे

karmala

नमकिन's picture

24 Apr 2016 - 11:10 pm | नमकिन

करमाळा - जामखेड-नगर-पुणे या मार्गे पण जाता येईल इथल्या मंडळींना.

सोलापुर ते अंबे जोगाई च्या आड मार्गावर यमाई/येडाई देवीचे मंदीर पाहण्या सारखे आहे.

राघवेंद्र's picture

25 Apr 2016 - 11:44 pm | राघवेंद्र

येडेश्वरी देवीचे हे मंदिर हे येरमाळा या गावी आहे. इथे बार्शी - अंबेजोगाई आणि औरंगाबाद - सोलापूर रस्ते CROSS होतात