माणसाचा अपघात होणे ही सर्वसाधारण घटना आहे. अपघात झाल्यानंतर मेडिकल ट्रिटमेंट त्वरीत घेणे ही मेडिकल सायन्सवर असलेली श्रध्दा आहे. पण एक शुल्लक जखम तीन महिने सततच्या बँडेज, अॅटीबायोटिक्स च्या गोळ्या आणि इंजेक्शने घेऊन बरी न होणे. सतत त्यात पु होणे. त्यामुळे जांघेत गाठ येणे आणि दररोजचे काम करणे अशक्य होणे याला डॉक्टरी कक्षेच्या बाहेर काहीतरी आहे असे मानणे यात कोणती अंधश्रध्दा आहे ?
हे सर्व मी वयाच्या २३ वर्षी भोगल आहे. माझी साडेसाती चालु होती. ५ मे १९८८ ला मित्राबरोबर सकाळी स्कुटरवर मागे बसुन जात असताना डेक्कन जिमखाना - पुणे येथे एका पी एम टी ने मला छोटासा धक्का दिला. डाव्या पायाचा घोटा हा मागच्या सिटवर बसल्यामुळे जास्त बाहेर आला होता इथेच एक जखम झाली. लगेचच समोरच्या प्रयाग हॉस्पीटल मधे त्यावर प्रथमोपचार झाले. टाके घातले गेले. जखम बांधली जाऊन मी घरी गेलो.
पुढे तीन महिने ही जखम भरुन आली नाही. तीन सर्जन बदलले. पाच अॅन्टीबायोटिक्स ची प्रिस्क्रीपशन्स झाली. एका सर्जन साहेबांच्या सांगण्यावरुन डायबेटिस आहे किंवा कसे हे ही तपासले. तेव्हा मी २३ वर्षांचा होतो आज मितीला मी ५२ वर्षांचा आहे आणि अद्याप मला डायबेटिस नाही.
तीन महिने मी फार चिंतेत होतो. मी ही सगळी ट्रीटमेंट सरकारी दवाखान्यात न करता खाजगी दवाखान्यात करत होतो. सदर डॉक्टर्स फारच अनुभवी आहेत याबाबत आजही मला शंका नाही. त्यांनी पराकाष्ठा केली, औषधे बदलली, बँडेजच्या पध्दती बदलुन खास बँडेज लावली. माझ्या दृष्टीने त्यांनी कुचराई केली नाही तरी अपघातातली साधारण १ इंच लांबीची थोडिशी खोल जखम तीन महिन्यात बरी होऊ नये यावर काय म्हणावे ?
बर जखम बरी होत नाही हे ठिक आहे पण त्यात वेदना, पु आणि जांघेला गाठ येऊन चालण्याला त्रास आणि इन्फेकशनमुळे ताप हे तीन महिने चालु होते. कसा तरी मी कंपनीत जात होतो.
एक दिवस माझा धीर सुटला आणि मी श्रीगजानन महाराज शेगाव यांची प्रार्थना केली. चक्क त्यांना नवस बोललो की महाराज या दुखण्यातुन सोडवा मी आपल्या दर्शनाला शेगावला येईन. कंपनीत मी कंपनीतल्या डॉक्टरसाहेबांकडे गेलो आणि त्यांना ही व्यथा सांगीतली.
या तीन महिन्यात मी २ वेळा बँडेज बदलण्यासाठी कंपनीच्या डिस्पेंन्सरीत गेलो होतो पण कधी डॉक्टरांना भेटावे अशी बुध्दी झाली नाही. हे डॉक्टर साहेब सिनीयर होतो. बी जे मेडीकलला ते शिकवायचे. त्यांनी मला पस कल्चर करण्याचा सल्ला देऊन काही जुजबी औषधे दिली. मला पस कल्चरचा रिपोर्ट मात्र आणुन दाखव मग औषधे बदलुन देईन असा सल्ला दिला. खर तर मी इतका त्रासलो होतो की या डॉक्टर साहेबांनी मला कोहळा टांगायला सांगीतला असता. उतारा टाकायला सांगीतला असता किंवा कोंबडा कापायला सांगीतला असता तरी मी तितक्याच श्रध्देने ते केले असते.
पस कल्चर चा रिपोर्ट मी त्यांना दाखविला. त्यांनी त्यातली मेख मला वाचुन दाखवली. ते म्हणाले या जखमेत जे जंतु आहेत ते फक्त दोनच अॅन्टीबायोटीक्स ला दाद देत आहेत. बाकीची सात प्रकारची अॅन्टॉबायोटीक्स इथे कुचकामी आहेत. मग त्यांनी त्या दोन पैकी एका अॅन्टीबायोटिक्सचा गोळ्यांचा तीन दिवसांचा कोर्स मला सांगीतला आणि जी जखम तीन महिने बरी झाली नाही ती तीन दिवसात बरी झाली.
याला काय म्हणावे ? श्री गजानन महाराजांच्या लीलेवर आधारीत श्री गजाननविजय ग्रंथात याचा उल्लेख आहे की व्याधी तीन प्रकारच्या असतात. आधीभौतीक ज्या औषधाने बर्या होतात. आधीदैवीक ज्या नवसाने बर्या होतात आणि आधीअध्यात्मिक ज्या कधीच बर्या न होता मृत्युला कारणीभुत होतात.
आज शास्त्र पुढे गेले आहे म्हणुन आपण औषध उपचार टाळत नाही. शरीर आणि मन याची रचना इतकी काँप्लेक्स आहे की डॉक्टर शेवटी मानवच आहेत. त्यावेळेला त्यांची एकाग्रता किती साथ देते यावर काही व्याधींवर अचुक आणि प्रयोग न करता औषधे लागु पडतात.
मी असे समजलो की मला त्या सिनीयर डॉक्टर साहेबांना भेटायची बुध्दी श्री गजानन महाराजांनी दिली. त्यांना सुध्दा पस कल्चर करावे हा सल्ला देण्याची बुध्दी महाराजांनी दिली असावी. अन्यथा अनेक वर्षे प्रॅक्टिस करणार्या नामांकित डॉक्टर्स ना हे का सुचु नये ?
मी त्या दिवसापासुन महाराजांचा भक्त झालो हे सांगणेच नको. माझ्यामते ते मला अडचणीतुन मार्ग दाखवतात ही माझी श्रध्दा आहे. याचा अर्थ मी साधा ताप आला म्हणजे औषध न घेता ग्रंथाचे पारायण करतो असे नाही. पण जेव्हा प्रचलीत शास्त्र हात टेकते अश्या अनेक वेळी ह्याचा अनुभव घेऊन माझी श्रध्दा दृढ झाली आहे.
शेंगाव संस्थान आज ५० पेक्षा जास्त सेवाकार्ये चालवत आहे ज्यात मोफत औषध उपचार, अन्नछत्र आणि आदीवासी लोकांना सहाय यासारखे उपक्रम चालवतात. इथे सेवा करण्याकरता संपुर्ण विदर्भातली तरुणाई वेटींग लिस्ट वर प्रतिक्षा करते. मी एकदा दर्शनाच्या रांगेत उभा असताना एका लहान मुलाला वांती झाली. समोर उभे असलेले सेवक काही क्षणात ती जागा कुणाच्याही सुपरव्हिजन शिवाय साफ करुन गेले. त्यानंतरच्या क्षणाला इथे असे काही झाले होते याचा मागमुस राहिला नाही. हे अनेक वर्षे असेच सुरु आहे. शेंगाव च्या संस्थानमधे पैश्याचा घोळ झाल्याचे ऐकीवात नाही.
बाजारात १२ रुपये बिसलरी च्या पाण्याचे मुल्य असताना शेंगाव संस्थानमध्ये पाणी ८ रुपये म्हणजे खरेदीच्या किंमतीत विकायचे हे तत्वज्ञान फक्त महाराजांच्या अतिव श्रध्देपोटीच येते.
अनेक मिपाकर असे असतील की त्यांना अश्या प्रसंगातुन जावे लागले नसेल किंवा परमेश्वर कृपेने जावे लागणार नाही. तुम्ही नास्तीक असाल तर माझ्या मते पुण्यवान आहात. पण अडचणीत एकदाही परमेश्वराची आठवण झाली नाही अश्यांनी परमेश्वरच नाही म्हणुन का आकांत करावा ? तुमच्या आकांत करण्याने श्रध्दा संपणार आहे की फुसक्या कायद्यांनी तुम्ही श्रध्दांना बांध घालु शकणार आहात ?
अनिस चे कार्य बुवाबाजीच्या विरोधात आहे ते नक्कीच चांगले आहे. पण उठ सुट तोंड सुख घेणे किती योग्य आहे याचा विचार त्यांचे आजी आणि माजी कार्यकर्ते घेतील असे वाटते. एक चांगली चळवळ श्रध्दा झोडपलीत तर नक्कीच संपुन जाईल. चळवळी लोकाश्रयाने चालतात.
कोर्टात उभे रहा तुम्हाला ईश्वरसाक्ष शपथ घ्यावी लागते. का बर ? सत्य शोधायला सरकार आहे ना ? ब्रेन मॅपींग सुध्दा आज कायद्याला पुरावा म्हणुन मान्य असताना ती साक्ष ब्रेन मॅपींग करुन खरी किंवा खोटी ठरवाना ? ईश्वराला कशाला मधे आणता ?
धर्म ही अफुची गोळी आहे असे म्हणताना मात्र कोर्टात ईश्वराला मधे घेता. हीच धर्मभावना ह्या कल्याणकारी राज्यात अन्नदान करुन अनेकांना अन्न देण्यास भाग पाडते. वास्तविक कल्याणकारी राज्यात ज्यांना संभाळायला कोणी नाही अश्या गरीब - पिडीतांना किमान अन्न द्यायला सरकारी अन्नछत्रे असायला हवीत. मोफत योग्य तो औषधौपचार मोफत हवा. अश्या वेळी योजना कागदावर रहातात आणि धर्मभावनेने प्रेरीत होऊन मग ते कोणत्याही धर्माचे असोत पिडीतांची सेवा करतात. सर्वशक्तीमान सरकार पेक्षा कायदा आणि त्यातील प्रोव्हीजन पेक्षा कोणीतरी मोठा किमान या देशात तर आहे ना ?
श्रध्दा हि शक्ती आहे जी सरकारच्या पुढे जाऊन काम करते. परमेश्वराला न मानणारे कार्यकर्ते सुध्दा पिडीताची सेवा व्हायला पाहिजे ही श्रध्दा ठेवतात म्हणुन जे काम कायद्याने होत नाही त्याही पेक्षा उत्तम श्रध्देने होते.
पटवुन घ्या असा आग्रह नाही. विचार करा अशी साद ही नाही. पण दुसर्याच्या धर्म भावनांना वा श्रध्देला हीन आणि पुरोगामी म्हणुन ठोकरण्या आधी फक्त क्षणभर विचार करा हे योग्य आहे का ?
प्रतिक्रिया
16 Nov 2015 - 11:58 am | गॅरी ट्रुमन
भलत्याच अपेक्षा बघा तुमच्या :)
काहीसे विस्कळीत
अंधश्रध्दा निर्मूलन म्हणजे नक्की कशाचे निर्मूलन याची व्याख्या पक्की होत नाही तोपर्यंत या अनिसवाल्या मंडळींना माझा तरी पाठिंबा अजिबात नाही. करणी, भानामती इत्यादी गोष्टींविरूध्द ही चळवळ असेल तर काहीच हरकत नाही पण अनेकदा "डोळस श्रध्दा असे काही नसतेच", "न बघितलेल्या किंवा सिध्द करत्या न येण्याजोग्या गोष्टीवरील विश्वास म्हणजे अंधश्रध्दा" असे काही म्हटले जाते तेव्हा यांना अंधश्रध्देची जी व्याख्या अभिप्रेत आहे तीच सर्वांना असावी असा काहीसा दुराग्रह वाटतो.
एडिसन हजारेक अयशस्वी प्रयत्नांनंतर लाईट बल्ब यशस्वीपणे बनवू शकला असे वाचले आहे.इतक्या वेळा त्याला अपयश येत असतानाही आपल्या मनातील अमूर्त कल्पनेला आपण मूर्त स्वरूप देऊ शकतो याच विश्वासाने (श्रध्दा) त्याला परतपरत प्रयत्न करायला प्रेरणा दिली असणार यात शंका नाही.लाईट बल्ब प्रत्यक्षात यायच्या आधी तो एक कल्पना होता.पण एडिसनने या "न बघितलेल्या" किंवा "सिध्द करता न येण्याजोग्या" कल्पनेवर विश्वास (श्रध्दा) ठेवला आणि म्हणूनच लाईट बल्ब प्रत्यक्षात आला.मग एडिसनही अंधश्रध्दाळू आणि विवेकहिन झाला का?
एडिसनने वीजेच्या दिव्याचा शोध लावला त्यावेळी वीजेच्या संदर्भातील शास्त्रीय तत्वांची बैठक तयार झाली होती की नाही याची कल्पना नाही.पण राईट बंधूंनी पहिले विमान उडविले १९०३ मध्ये आणि ज्याला एरोस्पेस इंजिनिअरींग म्हणतात त्याचे अगदी मूलभूत तत्व "बाऊंडरी लेअर" ची संकल्पना मांडली लुडविग प्रॅन्ड्टलने १९०४ मध्ये.तेव्हा राईट बंधूंनी विमानाचे उड्डाण केले तेव्हा विमानाच्या संदर्भातील शास्त्रीय तत्वांची बैठक तयार झाली नव्हती असे म्हणायला हरकत नसावी.मग आपल्या कल्पनेतील विमान आपण प्रत्यक्षात आणू शकतो या भावनेने राईट बंधूंना भारावले असेल तर ती त्यांची श्रध्दा की तत्कालीन शास्त्रीय तत्वांप्रमाणे अशक्य असलेल्या गोष्टीवरही विश्वास ठेवणारी अंधश्रध्दा?
मागे एकदा अशाच गोष्टीवर काही मित्रमंडळींमध्ये ई-मेलवर संवाद झाला. त्यावेळी अंधश्रध्दा म्हणजे नक्की काय हा प्रश्न विचारल्यावर "ज्या व्यक्तीने आणि संस्थेने एवढी वर्षे या क्षेत्रात काम केले आहे त्यांनी अंधश्रद्धा म्हणजे नक्की काय याची स्पष्ट व्याख्या केली नसेल असं गृहित धरणं माझ्या मते तरी योग्य नाही." अशा स्वरूपाचे विधान झाले होते. या विधानात दाभोळकरांविषयी एक प्रकारचा विश्वास ध्वनीत होतोच.असा विश्वास वाटण्यात काहीही गैर नाही. पण जर एखाद्याने "ज्या ABC बाबांच्या मठात हजारो-लाखो भक्तगण गेली ५० वर्षे येतात ते बाबा पाजी कसे असतील" असे म्हणत ABC बाबांविषयी याच धर्तीवर विश्वास व्यक्त केला तर त्यात त्याचे नक्की काय चुकले?
अनेकदा या अंधश्रध्दा निर्मूलनवाल्यांचा "आमचा तो शास्त्रीय दृष्टीकोन आणि इतरांची ती अंधश्रध्दा" हा होलिअर दॅन दाऊ असा दृष्टीकोन असतो तो मात्र भयंकर डोक्यात जातो.
16 Nov 2015 - 7:39 pm | गुलाम
श्रध्दा-अंधश्रध्दा या चर्चेत अशी विधाने नेहमीच ऐकायला मिळतात. आपण विश्वास आणि श्रध्दा हे समानार्थी शब्द असल्याप्रमाणे वापरले आहेत. वास्तविक त्यांच्यामधे एक महत्वाचा फरक आहे. विश्वासाला तर्काचे (रॅशनले) पाठबळ असते जेंव्हा की श्रध्दा ही अंध असते.
उदा १. माझा माझ्या आई-वडिलांवर विश्वास आहे. यामागचे रॅशनले आहे की मी त्यांना गेली अनेक वर्षे ओळखतो. ते माझं अहित कधीच चिंतणार नाहीत हे मला अनुभवावरुन माहित आहे. परंतु तरी सुध्दा त्यांचा सल्ला मी माझ्या बुद्धीवर तपासुन घेतो/घेऊ शकतो. उद्या त्यांनी मला लग्नात हुंडा घ्यायचा सल्ला दिला तर मी तो ऐकणार नाही/ ऐकू नये.
उदा २. मी जेंव्हा एखाद्या आजारासाठी डॉक्टरकडे जातो तेंव्हा त्यांचा सल्ला पुर्ण अंमलात आणतो. कारण मला त्यांच्या ज्ञानावर/पदवीवर विश्वास आहे. त्यामागे डॉक्टरांच्या औषधाने आजार बरा होतो हा अनुभव आहे. परंतु याचा अर्थ डॉक्टरने उद्या ताप बरा व्हाव म्हणून त्याला एक किलो लाडू भेट द्यायला सांगितले तर मी ते खचितच ऐकणार नाही. कारण माझा ताप आणि लाडू यात काही कार्यकारणभाव नाही हे मला माहिती आहे. म्हणूनच जर मनात शंका आली तर मी सेकंड ओपिनीयन घ्यायलाही कचरत नाही. म्हणजेच विश्वासाची चिकित्सा करायला मी तयार असतो.
उदा ३. मी जेंव्हा एखाद्या बुवा/महाराजांकडे जातो. तेंव्हा ती श्रध्दा असते. त्याच्या मागे कोणतेही रॅशनले नसते. माझ्या समस्येवर बुवा जेंव्हा एखादा सल्ला देतो तेंव्हा त्यामागे कोणताही कार्यकारणभाव नसतो. तरीही मी तो ऐकतो. तसेच त्या सल्ल्याची चिकित्सा करायची माझी तयारी नसते. कार्यकारणभाव, तर्क आणि चिकित्सेचा अभाव हे श्रध्देचे व्यवच्छेदक लक्षण मानता येईल.
उदा ४. माझ्यावरचे संकट दूर व्हावे म्हणून मी उपवासादि व्रत करण्याचे नवस बोलतो. ही पण श्रध्दा असते. कारण सर्वशक्तिमान, दयाघन असा देव माझे संकट दूर करण्यासाठी मी उपाशी बसण्याची किंवा मी कोणतेही आमीष दाखवण्याची का वाट बघेल, असे तार्किक प्रश्न मला पडत नाही. असे प्रश्न उपस्थित केलेलेही मला आवडत नाहीत. कारण श्रध्देची चिकित्सा होऊ शकत नाही.
आपण वरती एडिसनचे उदाहरण दिले आहे. बल्ब बनवण्याचे प्रयत्न हजार वेळा फसूनही तो प्रयत्न करत राहिला. कारण त्याला त्यामागचे भौतिकशास्त्र माहित होते. धातूमधून वीज खेळवल्यानंतर प्रकाश पडू शकतो हा कार्यकारणभाव होता. शिवाय हजार वेळा तो एकच गोष्ट ट्राय करत नाही बसला. दरवेळी त्याने त्यात बदल केले असतील, आपल्या चुकांमधून तो शिकला असेल. जर काहीही बदल न करता फक्त आपल्या कल्पनेवर विश्वास ठेवून तो प्रयत्न करत राहिला असता तर त्याला नक्कीच श्रध्दा म्हणलं असतं. आणि तो कधीच यशस्वीही झाला नसता.
अनिसचा दृष्टीकोन थोडा वेगळा आहे. ते श्रध्दा/विश्वास असा फरक न करता श्रध्दा/अंधश्रध्दा असा करतात. ज्या श्रध्देमुळे कुणाचेही शारिरीक, मानसिक, आर्थिक नुकसान होते/होऊ शकते त्याला अंधश्रध्दा म्हणता येईल आणि त्याला अनिस विरोध करते. निरुपद्रवी श्रध्दांना अनिस सहसा विरोध करत नाही. त्यामागे सामाजिक चळवळ चालविण्याची अपरिहार्यता आहे.
16 Nov 2015 - 12:16 pm | pacificready
सगळ्याच श्रद्धा सुरुवातीला अंधच असतात.
ज्या श्रद्धा मुळे कुणाचंही (प्राण्यांसकट सर्व जीव) शारीरिक, मानसिक, आर्थिक नुकसान होतं त्यांना 'विकृत श्रद्धा' मानावं.
16 Nov 2015 - 1:02 pm | DEADPOOL
द्विधा मनस्थितीत श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांची सीमारेषा पुसट होते.
16 Nov 2015 - 12:37 pm | बोका-ए-आझम
प्रयत्न करणं आणि यश मिळेल अशा विश्वासाने आपण काम करतो आहोत आणि दोन्हीमधला कार्यकारणभाव आपण समजून घेऊन काम करत आहोत - तोपर्यंत ती श्रद्धा आहे आणि असा कार्यकारणभाव नाकारला, उदाहरणार्थ आपलं काम झालं नाही तर आपले प्रयत्न कमी पडले असं म्हणण्यापेक्षा मांजर आडवी गेली म्हणून काम झालं नाही असं म्हणणं ही अंधश्रद्धा आहे - असं माझं मत आहे.
लेखात उपस्थित केलेले मुद्दे हे वैयक्तिक अनुभव असल्यामुळे त्याबद्दल चर्चा करण्यात काही अर्थ नाही. (याचा अर्थ अनुभवाची सत्यता नाकारतोय असं नाही.)
16 Nov 2015 - 12:41 pm | दिवाकर कुलकर्णी
तुमच्या वयाच्या हिशोबात कांहीं गफ़लत आहे. ती आपण तपासावी.
आपला अनुभव पटला. पण कार्यकारणभाव पटला नाही. आपल्याला कोणत्याहि इतर डॉक्टरांच्या
औषधाने गुण आला नाही,मग आपण कंपनीतील डॉक्टरांना दाखविले व त्याना दाखविण्याची बुद्धि आपल्याला महाराजानी दिली,
ही बुद्धि महाराजानी पुर्विच कांं दिली नाही,किंबहुना एक होउ घातलेला भक्त आहे त्याला अपघातापासूनच महाराजानी कां
वाचविले नाही. आपल्याला योग्य उपचार करावेत ही बुद्धि महाराजानी इतरडॉक्टराना कां पहिल्यांदाच कां दिली नाही?
हे प्रश्न मनात न येऊ दिल्यास आपली श्रध्दा उचित ठरते.
पण प्रत्यक्षात असंहि घडू शकत नां कि अखेरच्या डॉक्टरांच्याकडं आपण सुरवातीस गेला असतात तर इतर डॉक्टरांच्या
प्रमाणंच त्यांचेहि उपचार असते कांही कालानधीनतरच त्यानी कल्चर वगैरे केलं असतं,उलट सुरवातीला एकच चांगला डॉक्टर
आपण धरून राहीला असता तर त्यानीहि कल्चर वगैरे केलं असतंच.
आपल्या श्रध्देला हानी पोहचवावी असा माझा बिल्कुल हेतु नाही.
माझीहि अनेक श्रध्दा स्थानं आहेत. एक गमतीचा भाग सांगू ? मी अशाप्रसंगी होमियोपैथी उपचार घेतले असते.
शेगाव ला आमच्याकडूनहि महिन्यातून एकदा जाणारेहि अनेक लोक आहेत. महाराष्ट्र एक्सप्रेस थेट जाते ना.तुम्ही चांगली माहीति दिली आहे.
जाता जाता शेवटचं " कॉंटि. प्रकाशनाचं ---परमेश्वरावर मात---(किमत पूर्वी फक्त₹५/-)हे (पाने फक्त २५) उपलब्ध झाल्यास वाचावे.
16 Nov 2015 - 12:53 pm | आनन्दा
मुळात होमिओपॅथी हीच एक अंधश्रद्धा आहे असे वाटत नाही का?
16 Nov 2015 - 12:57 pm | मृत्युन्जय
नाही.
होमियोपॅथी अंधश्रद्धा आहे असे अजिबात वाटत नाही हे स्वानुभवावरुन सांगतो आहे.
16 Nov 2015 - 1:31 pm | आनन्दा
तुम्ही दोन्ही दगडांवर पाय ठेवत आहात..
एको पे रेहना.. या घोडा बोलना या चतुर बोलना.
17 Nov 2015 - 11:47 am | मृत्युन्जय
मला कळाले नाही. मी कुठल्याही प्रकारे संदिग्ध विधान केले आहे असे मला वाटत नाही. कृपया समजावुन सांगाल काय?
18 Nov 2015 - 12:31 pm | प्रसाद१९७१
जर तुम्हाला होमिओ पाथी अंधश्रद्धा वाटत नसेल तर गणपती दुध पितो असे वाटणे सुद्धा अंधश्रद्धा असू शकत नाही.
18 Nov 2015 - 12:45 pm | मृत्युन्जय
तरीसुद्धा नाही कळाले. तुम्हाला नीट कळाले नसेल तर सांगतो की मी स्वानुभावावर ते लिहिले आहे. "अनुभव" आणि "अंधश्रद्धा" या दोन शब्दांचे वेगळे वेगळे अर्थ आम्हाला शाळेत शिकवले होते. तुमच्या शाळेबद्दल माहिती नाही. आता या वयात शाळेत जाउन कितपत उपयोग होइल ते माहिती नाही पण बघा जमले तर. नाहितर चालु द्यात.
18 Nov 2015 - 3:05 pm | प्रसाद१९७१
घ्या घ्या, होमिओ पाथीचीच औषधे घ्या. मस्त अनुभव घेत रहा.
18 Nov 2015 - 3:19 pm | मृत्युन्जय
माझे कुठल्याही पॅथीशी वाकडे नाही. गरज पडल्यास योग्य त्या पॅथीची औषधे घेइनच.
मी प्रार्थना करतो की तुमची तब्येत ठणठणीत राहवी आणि तुम्हाला कधी औषधांची गरज भासु नये. औषधे घेत रहा असा सल्ला शक्यतो मी देत नाही.
धन्यवाद.
18 Nov 2015 - 3:26 pm | प्रसाद१९७१
म्हणुनच तुम्हाला मी होमिओ पाथी च्या साखरेच्या गोळ्या घ्यायला सांगितल्या, त्यानी काही उपाय नाही आणि अपाय पण नाही. मधुमेह नसेल तर रोज कीतीही घ्या, अजिबात अपाय नाही.
अमेरिकेत होमिओपाथी च्या गोळ्या ओव्हर द काउंटर विकायला परवानगी आहे ते ह्याच कारणा साठी. एफ्डीए ला शुगर कँडी आणि ह्या गोळ्यांमधे काही फरक दिसला नसेल.
18 Nov 2015 - 4:50 pm | मृत्युन्जय
तिकडे पण त्या "औषध" म्हणुनच विकल्या जातात ना?
बाकी होमियोपॅथी ने रोग बरे होतात हा स्वानुभव आहे हे तर आधीच सांगितले आहे. त्यामुळे परत परत तेच टंकायचा टंकाळा येतो आहे.
18 Nov 2015 - 4:55 pm | मांत्रिक
मृत्युंजय साहेब, वरती मी एक स्वानुभव दिलेला आहे. तो देखील वाचा. माझी सुद्धा या शास्त्रावर श्रद्धा आहे. मला अनुभव आल्याने मी तर १००% विश्वास ठेवतोच.
18 Nov 2015 - 6:36 pm | सुबोध खरे
श्रद्धा कि अंधश्रद्धा
यात मला पडलेला प्रश्न एक आहे कि बरेच पाश्चात्य होमियोपाथ( होमियोपथी च्या मूलतत्वात लसीकरण बसत नाही) लस टोचणे अनावश्यक आहे असे मानतात आणी तसा सल्ला हि देतात
(सुदैवाने भारतात असे लोक कमी आहेत). त्यांचा सल्ला घेऊन मुलाला लस न टोचणे हि श्रद्धा कि अंधश्रद्धा.
ज्यांना होमियोपाथीचा चांगला अनुभव आला आहे त्यांना मी हे विचारू इच्छितो
जालावर याबाबत भरपूर गरम गरम चर्चा उपलब्ध आहे म्हणून संदर्भ देत नाही.
18 Nov 2015 - 6:44 pm | मांत्रिक
लसीकरणास नकार देणं चुकीचच आहे. तो त्यांचा सांप्रदायिक एकांगीपणा झाला. पण अशी शास्त्रे आपल्या काही समस्या दूर करायला उपयोगी पडत असतील तर माझी तरी त्याला हरकत नाही. मी खाली माझा प्रत्यक्ष अनुभव दिलेलाच आहे. मी स्वतः हे घडताना अनुभवलंय म्हणून माझा या शास्त्रावर विश्वास आहे. बाकी अॅलोपॅथीला पर्याय असू शकत नाही हे मान्य आहे.
19 Nov 2015 - 11:21 am | मृत्युन्जय
त्यांचा सल्ला घेऊन मुलाला लस न टोचणे हि श्रद्धा कि अंधश्रद्धा.
मला विचाराल तर दोन्ही नाही. एक अॅलोपॅथी डॉक्टर म्हणुन तुमचे आयुर्वेद किंवा हॉमिओपॅथी याबद्दल काही मत / ग्रह असु शकतात. परंतु वैद्यकीय शिक्षण न घेतलेला एखादा सामान्य माणूस तसे करु शकत नाही. मी माझ्या अनुभवावरुनच बोलेन. माझा अनुभव असा आहे की तिन्ही शाखांची औषधे घेउन प्रसंगी गुण आला आहे. आजारातुन बरे करणार्या डॉक्टरांवर माणूस अर्थातच भरोस ठेवेल. मग तो कोणत्या पॅथीची प्रॅक्टिस करतो हे सामान्य माणसासाठी गौण आहे. एक डॉक्टर म्हणून मी तुमच्यावर विश्वास ठेवत असेन तर तो तुम्ही घेतलेल्या शिक्षणावरचा विश्वास आहे. यात श्रद्धा किंवा अंधश्रद्धा येतच नाही.
माझ्यापुरते विचाराल तर सरसकट सग्ळ्याच लशींचा काही उपयोग नसतो (काही लशींचा असतो. इतर लशी डॉक्टर उगाच गळ्यात मारतात) असे मला एका होमिऑपॅथी डॉक्टरने सांगितले. त्याचा सल्ला न मानता (मुलाबाबत रिस्क कोण घेणार? आणी कशाला?) मी अॅलॉपॅथी पॅड न सांगितलेल्या सगळ्या लशी वेळोवेळी देउन घेतल्या. यापुढेही देइन. पण लशी दिल्यामुळे मुलामध्ये अपंगत्व आले किंवा ऑटिझम ची लक्षणे दिसली असे सांगणारी लोकही आहेत ना? मग यात दोष कुणाचा?
मुलाला कफ झालेला असताना आयुर्वेदिक डॉक्टर म्हणतो केळे देउ नका. अॅलॉपॅथ म्हणतो केळेच द्या. काही होत नाही. मी अश्यावेळेस मुलाला केळे देणे टाळतो. अॅलोपॅथीक डॉक्टर मुद्दाम हिमालयाचे कुठलेही प्रॉडक्ट देणे टाळतो. गुटी नको. सुंठ नको. शेक शेगडी नको. टाळु भरायची नाही वगैरे वगैरे. आयुर्वेदिक डॉक्टर सांगतो हे सगळे करा. मग सामान्य माणूस पुर्वानुभवावर काही गोष्टी करतो काही टाळतो.
या सग्ळ्यामध्ये श्रद्धा किंवा अंधश्रद्धा हा विषय नसुन प्रश्न विश्वासाचा असतो. आणि हा शिक्षणावरच विश्वास असतो. त्यामुळे त्याला श्रद्धा किंवा अंधश्रद्धा म्हणणे चुकीचेच ठरेल.
19 Nov 2015 - 6:12 pm | सुबोध खरे
मला हेच म्हणायचे आहे कि एकाची श्रद्धा हि दुसर्याची अंधश्रद्धा असू शकते. हा शेवटी विश्वासाचा प्रश्न आहे. म्हणूनच मी सहसा कोणाच्या "श्रद्धे"वर टीका करीत नाही.
19 Nov 2015 - 6:15 pm | मृत्युन्जय
नाही. मी परत तेच म्हणतो. ही श्रद्धा देखील नाही. हा केवळ विश्वास आहे. तसेच म्हणायचे झाल्यास मी अॅलॉपॅथ डॉक्टर कडुन जर उपचार करुन घेत असेल तर ती सुद्धा अंधश्रद्धाच म्हटली पाहिजे.
18 Nov 2015 - 12:47 pm | मांत्रिक
मला स्वतःला एक वर्षापूर्वी अतिशय त्रासदायक अॅलर्जी सुरु झाली. नक्की कारण काय आहे ते कळत नव्हतं. ही अॅलर्जी केव्हांपण सुरु होत असे. सा-या अंगावर प्रचंड खाजवत असे. बाहेर त्वचेवर काहीच दिसत नसे. पण खाजवलेल्या ठिकाणी खारीच्या अंगावर धा-या असतात तसे त्वचा फुगली जाऊन धा-या उठत असत.
विशिष्ट अन्न खाल्यावरच येते असे नव्हते. अनेक डॉक्टरांच्याकडे दाखविले. वेगवेगळी अँटीबायोटीक, अगदी प्रभावी अँटीव्हायरल, अनेकोअनेक प्रकार झाले.
एका एम.डी. डॉक्टरांनी सुद्धा तपासल्यानंतर काही लक्षात येत नाही असे सांगितले व बरे वाटावे म्हणून Livocetrizine Montelucast ही गोळी चालू केली. ही गोळी अतिशय त्रासदायक होती. अॅलर्जी थांबत असे परंतु झोपाळलेपणा, सांधे खूप आखडून येणे, उत्साह न वाटणे, सतत थकवा, ग्लानि, तहान-तहान होणे यांचा त्रास सुरु झाला. जवळ जवळ ६ महिने हा त्रास भोगला. शेवटी एका परिचिताच्या सल्ल्यानुसार एका प्रसिद्ध होमिओपॅथिक क्लिनिक मध्ये उपचार सुरु केले. थोड्याच दिवसांत livocetrizine m गोळीवरील अवलंबन कमी झाले. गोळी घ्यावी लागण्याचे प्रमाण कमी झाले. ३ महिन्यांनी अॅलर्जी पूर्ण थांबली. त्यानंतर Livocetrizine Montelucast कधीच आजतागायत घ्यावी लागलेली नाही.
माझ्या मनात तरी या शास्त्राविषयी आदर आहे. हा माझा अनुभव माझ्यापुरता तरी सत्य. इतर कुणाला पटो न पटो.
18 Nov 2015 - 2:21 pm | आनन्दा
माफ करा. मला ते विधान दिवाकर कुलकर्णी यांनीच केले आहे असे वाटले. म्हणून त्यांच्या त्याच्या वरच्या विधानाचा संदर्भ घेऊन मी विचारले. मंत्रविज्ञान, अध्यात्म यांना अंधश्रद्धा म्हणणारे होमिओपॅथीवर कसा विश्वास ठेवतात असा प्रश्न मला पडला होता म्हणून.
19 Nov 2015 - 7:34 pm | अभिजित - १
मस्त पकडले .. पण साहेबाना काही माहितीच नाही ..
16 Nov 2015 - 12:57 pm | अमृत
गजानन महाराज मंदीराचा अनुभव खरच नेहमीच चांगला आलेला आहे.कुठेही बाजारीकरण झालेले नाही. मंदीरात सेवा देण्याची खूप इछा आहे पण अजून योग आला नाही. बाकी विदर्भातला असल्यामूळे महाराजांवर श्रध्हा आहेच.
||गण गण गणात बोते||
16 Nov 2015 - 1:45 pm | सुबोध खरे
कोर्टात उभे रहा तुम्हाला ईश्वरसाक्ष शपथ घ्यावी लागते. का बर ?
रच्याकने-- न्यायालयात आपण धर्म किंवा देव मानत नाही असे म्हणालात तर आपल्याला गीतेवर(कुराण/ बायबल) वर हात ठेवून शपथ घेणे आवश्यक नाही. मी माझ्या सद्सदविवेक्बुद्धिला स्मरून शपथ घेतो अशी शपथ घेता येते.
बाकी चालु द्या
18 Nov 2015 - 11:51 pm | भाऊंचे भाऊ
ओशोने रजनीशीजम नामक पुस्तकावर हात ठेउनच शपथ घेतली होती.. अन वरुन न्यायाधीशाला तुम्हाला जर या पुस्तकाच्या लेखकावर विश्वास नाही तर त्याच्या पुस्तकावर हात ठेउन मला शपथ कशी काय घ्यायला लावता असा प्रश्न विचारुन वैचारीक राडा केला होताच...
16 Nov 2015 - 2:40 pm | नितीनचंद्र
प्रश्न ईश्वरसाक्ष शपथ घेण्याची मुभा आहे याचा. हे जर धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे तर कोर्टात गीता आणि बायबल हा ऑपश्न कशासाठी ? कारण कायद्याला हे अपेक्षीत आहे की ईश्वराचे नाव घेतले की किमान बुध्दीप्रामाण्यवादी सोडले तर तमाम जनता खरे बोलण्याची शक्यता जास्त आहे.
18 Nov 2015 - 11:55 pm | भाऊंचे भाऊ
न्यायालयात शपथ घेणे हे एक महाथोतांड आहे असं वैयक्तीक मत आहे. जर (कसलीही) शपथ घेउन माणूस सत्य बोलतो हा समज आहे तर तो जे बोलतो त्याची सत्यता तपासायला उलटतपासणी का घेतली जाते ? तो परमेश्वरावर अविश्वास ठरत नाही काय ;)
20 Nov 2015 - 10:48 am | स्वप्नज
+१
16 Nov 2015 - 3:05 pm | बाजीगर
दिवाकर कुलकर्णी यांनी योग्यच म्हटले आहे,सहमत.
कंपनीतील डॉक्टरांना दाखविण्याची बुद्धि,महाराजांनी पुर्विच कांं दिली नाही??किंबहुना एक होऊ घातलेला भक्त आहे त्याला अपघातापासूनच महाराजानी कां वाचविले नाही. आपल्याला योग्य उपचार करावेत ही बुद्धि महाराजानी इतर डॉक्टराना कां पहिल्यांदाच कां दिली नाही?
याबद्दल विचार करा.
शेगाव च्या लोकांची सेवावृत्ती निर्विवाद चांगली आहे.
16 Nov 2015 - 3:08 pm | प्रकाश घाटपांडे
आपल्या तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट या न्यायाने माझी ती श्रद्धा इतरांची ती अंधश्रद्धा! माझी श्रद्धा ही समाजाला हानिकारक नाही म्हणून ती अंधश्रद्धा ठरत नाही. श्रद्धा ही आत्मिक बळ देते. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. या पद्धतीची मांडणीही समाजात होताना दिसते.
परंतु तसे पाहिले तर श्रद्धा ही मुळातच अंध असते. त्या मुळे अंधश्रद्धा म्हणजे पिवळा पितांबर म्हटल्या सारखे आहे. चिकित्सेशिवाय ठेवलेला विश्वास म्हणजे श्रद्धा. तसेच चिकित्सेशिवाय एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवण्याचे नाकारणे ही पण एक श्रद्धाच! विश्वास हा पुराव्यावर आधारलेला असतो. त्यामुळे त्याची चिकित्सा होउ शकते. श्रद्धेची चिकित्सा होत नाही.
मेंदुच्या मनात या पुस्तकात लेखक सुबोध जावडेकर म्हणतात," जगण्याच्या लढाईत अंधश्रद्धा आदिमानवाला उपयोगी पडल्या असणार. कठीण परिस्थितीत मनाला उभारी देण्याचे काम त्यांनी केल. कल्पना करा, लाखो करोडो वर्षांपुर्वी माणसाचा पूर्वज जंगलात एकटाच आहे. त्याच्या टोळीपासून त्याची ताटातूट झालीय.चहू दिशांना घनदाट काळोख. दुरुन वन्य प्राण्यांच्या डर्काळ्या कानावर येताहेत. आणि..... शेजारच्या झुडपातून कसली तरी खसखस ऐकू येते. या भीतीदायक परिस्थितीत कशाच्या आधारावर त्याने उभं राहावं? अशी एखादी गोष्ट ( लकी हाडूक? ) त्याच्यापाशी असेल आणी त्यामुळे आपण संकटातून तरुन जाउ अस त्याला वाटत असेल, तर त्याला बोल कसा लावणार? त्याच्या अंधविश्वासाच्या जोरावरच तो तगून राहिला आणि तो विश्वास नसणार्याने केवळ भीतीनंच 'राम' म्हटला. अशा अंधश्रद्ध आदिमानवाचे आपण वारस आहोत! अंधश्रद्धा समाजात का टिकून आहेत त्याच हे स्पष्टीकरण आहे, अंधश्रद्धेचे समर्थन नव्हे!"
दाभोलकरांनी जीवनाच्या खडबडीत रस्त्यावर अंधश्रद्धा शॉक अबसॉर्बर सारखे काम करतात असेच म्हटले आहे. आता काहींच्या दृष्टीने असलेल्या श्रद्धा या दुसर्याच्या दृष्टीने अंधश्रद्धा असतात हा भाग वेगळा.
18 Nov 2015 - 1:14 pm | प्रभाकर पेठकर
श्रद्धा - तर्कसंगत विचारांवर तपासून पाहता येते. प्रसंगी बदलते सुद्धा.
अंधश्रद्धा - तर्काला, सारासार विवेकाला थारा नसतो. बदल घडत नाहीत.
एखादा माणूस चुकीचा वागणार नाही, एखादा डॉक्टर आपल्याला चांगले औषधपाणी करून बरे करू शकतो ह्या श्रद्धा आहेत. पण जर तोच माणुस चुकीचा वागला किंवा डॉक्टरच्या ज्ञानावर शंका यावी असे वर्तन त्याच्याकडून घडले तर ही श्रद्धा बदलू शकते. आपण नवे वास्तव स्विकारू शकतो.
तर, त्या माणसाच्या चुकीच्या वागण्याचेही आपण समर्थन करीत बसतो, किंवा तो असे वागणारच नाही, तुम्हीच नीट औषध घेतले नसेल, पथ्य पाळली नसतील, त्या डॉक्टरच्या हातून रोगी बरा न होणे शक्यच नाही असा विचार ही अंधश्रद्धा आहे. इथे वास्तवाचा स्विकार नाकारला जातो.
श्रद्धेत लवचिकता असते आणि अंधश्रद्धा ही ताठर असते.
18 Nov 2015 - 4:26 pm | प्रसाद गोडबोले
घाटपांडे काका , पेठकरकाका ,
आपण जेष्ठ आहात , एकदा आपल्याशी सत्यनारायण श्रध्दा की अंधश्रध्दा ? ह्या विषयावर सविस्तर चर्चा करायची आहे मला :)
19 Nov 2015 - 3:17 pm | प्रभाकर पेठकर
व्यक्तिशः मी सत्यनारायणाची (किंवा कुठल्याच देवाची) पुजाअर्चा करीत नाही. कारण कर्मकांडावर माझा विश्वास नाही. त्या पेक्षा एखाद्या गरीबाच्या पोटी चार घास घालणे (तो अंगमेहनतीची कामे करायला सक्षम असूनही भिक मागायला सोकावलेला नाही हे पाहून) मी देवपुजा मानतो.
16 Nov 2015 - 3:41 pm | बोका-ए-आझम
इथे तुम्ही चिकित्सा करण्याची साधनं उपलब्ध आहेत हे गृहीत धरताय. जर ती साधनं उपलब्ध नसतील तर? उदाहरणार्थ वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या. इथे सामान्य माणसांकडे चिकित्सा
करण्याचा कुठलाही मार्ग नसतो. त्यामुळे पेपरात छापून आलंय ना? मग ते खोटं कसं असेल? असा विचार आपण करतो. आता याला विश्वास म्हणायचं की श्रद्धा?
अनुभवावरून बनवलेल्या मताला काय म्हणणार? लेखकाचं नाव पु.ल. देशपांडे असलं की लोक पुस्तक विकत घेणार ही प्रकाशकाची श्रद्धा का विश्वास? आणि डोळस का अंध?
दूर कशाला जायला पाहिजे? इथे मिपावर तुम्ही, रामदासकाका, इएकाका, भानस, मकीताई, गवि, मुवि अशा अनेक आयडींचं लिखाण लोक नाव पाहिलं की वाचतात कारण ते चांगलं असणार ही त्यांची श्रद्धा की त्यांचा विश्वास? आणि डोळस की अंध?
16 Nov 2015 - 8:32 pm | सुबोध खरे
अगदी अगदी
श्रद्धा आणि विश्वास यातील रेषा फार धुसर आहे.
माझ्या कोर्टातील लढाईच्या वेळेस पुण्यात मेस मध्ये जेवत असताना असताना मला एका कर्नल साहेबांनी विचारले कि डॉक्टर तू या लफड्यात का पडलास त्यापेक्षा संरक्षण मंत्रालयात कोणाला तरी पकड. टेबलाखालून तुझे काम होईल. त्यावर मी त्यांना म्हणालो कि माझी श्रद्धा आहे कि असनदशीर मार्ग मला लाभदायक होत नाहीत. पण सनदशीर मार्गाने माझे काम होईल असा विश्वास मला आहे. ते म्हणाले कि श्रद्धा हि अंध असते. यावर मी त्यांना म्हणालो सर तुम्ही आता सुखाने माझ्या बरोबर बसून जेवता आहात कारण तुमचा तुमच्या बायकोवर विश्वास आहे आणि ती तुमच्याशी एकनिष्ठ आहे अशी तुमची श्रद्धा आहे. पण जर तुम्हाला असे कळले कि तुमच्या बायकोचे कुणाबरोबर लफडे आहे तर आता जेवताय ते जेवण तुमच्या घशाखाली उतरणार नाही. ते एक मिनिट शांत झाले आणि म्हणाले सुबोध तू म्हणतोस ते बरोबर आहे.
16 Nov 2015 - 3:44 pm | उगा काहितरीच
शेगाव हे एक अतिशय सुंदर देवस्थान म्हणून उदयास येत आहे . येथील स्वच्छता , स्वयंसेवक , सुविधा खरंच वाखाणन्याजोग्या आहेत.
गजानन महाराजावर श्रद्धा असेल तर एक तीर्थक्षेत्र म्हणून जाऊ शकता . श्रद्धा नसेल तर फिरायला म्हणूनही जाऊ शकता. "आनंद सागर" हे उद्यान खरोखरच अतिशय सुंदर आहे.
अंधश्रद्धेबद्दल माझे मत असे आहे की जोपर्यंत कुणा दुसऱ्या व्यक्तीला दुखापत होत नाही तोपर्यंत ठीक आहे. पण कुणी जर नरबळी सारखा प्रकार श्रद्धेच्या नावाखाली करीत असेल तर मात्र त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे .
18 Nov 2015 - 11:48 pm | विलासराव
मी जरी भाविक नसलो तरी मी अनेकदा शेगावला जातो.
आनंसागरला भटकायचे, विवेकानंद ध्यानकेंद्रात ध्यान करायचे,त्यांच्या स्वस्त आणि मस्त नाष्टया-जेवणाचा समाचार घ्यायचा ,फॉउंटन शो पहायचा आणि ५० रूपयात डॉर्मिटरीमधे रहायचे असा माझा कार्यक्रम असतो.
जाताजाता: शेगाव देवस्थांनाचे अध्यक्ष श्री. श्रीकांतदादा हे विपश्यनेचे आचार्य आहेत.
18 Nov 2015 - 10:27 am | मांत्रिक
लेख आवडला.
तुम्ही साडेसातीचा उल्लेख केलात म्हणून सांगतो, श्री शनी हे दीर्घकाळ टिकणारे आजारपण, जखमा सडणे, दूषित होणे, अशा गोष्टींचे कारक ज्योतिषशास्त्रात मानले जातात. श्री शनी महाराजांचे कार्यच हे आहे की जीवाला यातना देऊन त्याला इतरांविषयी माणुसकीचा दृष्टी़कोन ठेवणे, गोरगरीब-गांजलेले यांची दु:खे समजून घेणे, त्यांना शक्य तितकी मदत करणे, इ. इ. आहे.
याबाबत अनेक आचरट उपाय ज्योतिषी सांगतात. ते आपण सर्वांनीच कुठे न कुठे तरी वाचले असतील. पण श्री शनी महाराज याने प्रसन्न होणारे नव्हेत. त्याऐवजी अनाथ, दीन दुबळे, रस्त्यावर तळमळत पडलेले आजारी लोक, वृद्धाश्रम अशा ठिकाणी आपआपल्या शक्तीनुसार आवर्जून मदत करावी. तेव्हांच त्यांचा खरा आशीर्वाद तुम्हाला मिळेल.
18 Nov 2015 - 11:32 am | कपिलमुनी
साडेसाती या विषयावर स्वतंत्र धागाच होईल !
18 Nov 2015 - 11:36 am | भाऊंचे भाऊ
मुळात श्रध्दा आणी अंधश्रध्दा असा फरक कोणतेही अध्यात्म करत नाही. विज्ञान तर अजिबात करत नाही मग तुम्ही आम्ही भेंडी कोण लागुन गेलो असा फरक करणारे ?
श्रध्दा आणी अंधश्रध्दा असा फरक फक्त अशी संस्था अथवा लोक करतात ज्यांना श्रध्देच्या नावाखाली होणारी फसवणूक/पिळवणूक/शोषण मान्य नसते. म्हणूनच त्यांनी आणलेला कायदा फार सुस्पश्ट आहे ढोबळमानाने बोलायचे तर अशी कोणतीही श्रध्दा ज्यातुन ती बाळगणार्याचे शारीरीक, मानसीक, आर्थीक, सामाजीक, शोषण/फसवणूक/नुकसान केले जाते ती अंधश्रध्दा होय.
म्हणजे मी जर मुलाला शुभंकरोती म्हण अथवा नमाज अदा कर असे म्हटले तर ती अजिबात अंधश्र्ध्दा ठरत नाही पण मी जर शुभंकरोती न म्हटल्याबदल चाबकाने फोडुन काढले, त्याचे आर्थीक, सामाजीक नुकसान केले, तर मात्र तो अंधश्रध्देचा गुन्हा ठरतो. तुम्ही कोणत्याही बाबा/बापुच्या नादी लागा नमस्कार करा, स्वेछ्चेने ब्राम्हण भोजन घाला तुम्हाला ती मोकळीक्/स्वातंत्र्य १००% आहेच. पण जर यामधुन तुमचे (शारीरीक, मानसीक, आर्थीक, सामाजीक,)शोषण केले जात असेल तरच तो गुन्हा. अथवा त्याची कृत्ये शोषणाच्या हेतुने असतील अन मग तुम्ही कीतीही सश्रध्द असलात तरी शोषण करणारा गुन्हेगारच.
कोणत्याही सश्रध्द अथवा विज्ञानवादी व्यक्तीने श्रध्दा आणी अंधश्रधा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत असे मानणॅ खचीतच गाढवपणाचे आहे. आणी लोकांच्या श्रध्दा बाळगण्याच्या मुलभुत अधिकाराला जराही धक्का न लावता त्याचा गैरफायदा घेणार्या गुन्हेगारांना अशा परिस्थीतीतही चाप लावण्यासाठी तितकाच समर्थ कायदा निर्माण करणार्या दाभोलकर सरांचे समस्त सश्रध्द वृत्तीच्या लोकांवर जे उपकार आहेत ते कधीही फिटणारे नाहीत. त्यातुन जे योग्य आहे तेच कस लागुन बाहेर येणार आहे.
श्रध्दा आणी अंधश्रध्दांबाबत यापलिकडे काही विचार मी करु शकेन असे मला वाटत नाही.
18 Nov 2015 - 2:27 pm | आनन्दा
बाकी सगळे जाऊ द्या. आधी मला या प्रश्नाचे उत्तर द्या.
जर मला एखाद्या ज्योतिषाने माझ्या चांगल्यासाठी सत्यनारायण घालायला सांगितला, आणि मी जर माझ्या घरी माझ्या भरभराटीसाठी सत्यनारायण घातला, त्यासाठी भटजी बोलावला, त्याला १००० दक्षिणा दिली. आता तुम्ही वर लिहिल्याप्रमाणे ही श्रद्धा की अंधश्रद्धा?
18 Nov 2015 - 2:51 pm | भाऊंचे भाऊ
जर मी आधीच श्रध्दा आणी अंधश्रध्दा असा फरक कोणतेही अध्यात्म करत नाही. विज्ञान तर अजिबात करत नाही असे स्पश्ट म्हटले आहे तर उगा प्रतिसाद न वाचल्याप्रमाणे कशाला प्रश्न करेला है ?
18 Nov 2015 - 12:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपला व्यक्तिगत अनुभव सांगून हा विषय संपला असता असे वाटले. आपण बरे झालात, आपला त्रास कमी झाला हे वाचून खुप चांगलं वाटलं. पण, पुढे श्रद्धा अंधश्रद्धा या विषयावर तुम्हाला चर्चा करायची आहे असे दिसते. माझं मत विचाराल तर 'या मुळे असं झालं आणि त्यामुळे तसं झालं हे मला पटलं नाही.
बाकी चालु द्या.
-दिलीप बिरुटे
18 Nov 2015 - 4:22 pm | प्रसाद गोडबोले
+१
उगाचच ओढुन ताणुन जोडलेली कॉजॅलिटी काही पटली नाही ! लोकं असं का करतात हेच कळत नाही त्या मुळे उगाच सारे खापर अध्यात्मावर जाऊन फुटते .
मी एका 'खर्या ' अध्यामिक प्रवचनाला बसलो होतो ( म्हणजे प्रवचन ऐकायला बसलो होतो , द्यायला नाही ;) ) तेव्हा एका बिचार्या माणसाला मुलबाळ होत नव्हते त्याने बुवांना विचारले मारुतीला नवस करु का तर बुवा फटकन म्हणाले "उगाचच कैचाकै बोलु नका,'नवसे कन्या - पुत्र होती। तरी का करणे लागे पती॥' असे तुकोबांन्नी स्पष्ट म्हणुन ठेवले आहे , आणी मारुतीला कशाला नवस , तो तर बिचारा बालब्रह्मचारी त्याला कशाला सतावता तुमच्या प्रापंचिक कुरबुरींनी ? सरळ जाऊन डॉक्टर ला भेटा आधी "
समर्थांनी ही "औषध न घे असोनि व्यथा | तो एक मुर्ख ||" असे स्पष्ट म्हणले आहे . जो काही गुण आला तो औषधामुळे ! त्यात अध्यात्माचे काही कर्तुत्व नाही . वेदना असतानाही शांतचित्ताने स्वतःचे काम करत रहायला जमणे हा अध्यात्माचा गुण आहे ही खरी गजानन महाराजांची कृपा :)
प्रापंचिक आधिभौतिक हितअहिताच्या गोष्टी अध्यात्माला कशाला चिकटवतात हे लोकं देव जाणे , हे असल्यांच्या मुळे समोसा हरी चटनी फेम निर्मलबाबांसारख्यांचे स्तोम वाढते अन मग त्याला प्रत्युत्तर देणार्या स्वमतांधं दांभिक चनावाल्यांचे स्तोम वाढते :-\
18 Nov 2015 - 4:33 pm | मांत्रिक
खासच प्रतिसाद!
20 Nov 2015 - 11:05 am | तुषार काळभोर
कॉजॅलिटी या शब्दावरून निओ अन् मेरोविन्जियनची भेट आठवली. काय एकेक डायलॅक हैत त्या पिच्चरमधी.
18 Nov 2015 - 3:42 pm | जातवेद
"जेनूवीन पावर वाले लोक कमी झाले आणि दूप्लिकेट चमत्कारी वाढले म्हणून हे वाद चालू झाले आहेत. आमच्यावेळी हे असं नव्हतं!", असं नुकतचं एका १२ व्या, १४व्या आणी १६व्या शतकातील सत्पुरूष एकदमच अंगात येण्णार्या महाराजांणकडूण ऐकण्यात आलय. आम्ही नेमक्या कोणत्या शतकात हे असं नव्हतं आणि हा प्रोब्लेम नेमका चालू कधी झाला हे विचारण्याच्या फंदात पडलो नाही, न जाणो १८व्या शतकात म्हणायचे आणि नविनच लफडं होउन बसायचं.
सगळं मट्रियल परत छापायला लागेल ना!
18 Nov 2015 - 4:37 pm | सत्य धर्म
देव आहे.........
18 Nov 2015 - 5:05 pm | टवाळ कार्टा
आहेच्च...पण माणसांत....मंदिर अथवा मूर्तींमध्ये नाही
18 Nov 2015 - 4:41 pm | याॅर्कर
___/\___
19 Nov 2015 - 7:25 pm | चौकटराजा
चिकित्सा श्रद्धा व अन्धश्रद्धा या विषयावर दुसर्याचे डोके खाणे हा माझा आवडता छंद आहे. मी मोकळा आहे. व्यनि करावा मग भेटायला यावे. मजा येईल. बाकी जे बदलू शकते ते अनुमान म्हणजे श्रद्धा हे पेटकर काकाण्चे म्हणणे पटले मण्डळी ! रस्त्यावर उतरवून टाकलेल्या लिम्बात ही सायट्रीक आसिड व क जीवनसत्व असते. हे अनुमान आहे. त्यात म जीवनसत्व ही असते असो कोणी सिद्ध केले तर हे वाक्य म सहही लिहिता येईल सबब लिम्बू सरबत करताना माणूस दरवेळी केमिक॑ल ल्याब गाठून घटकांचे प्रमाण मोजत बसणार नाही ही झाली श्रद्धा !
(असे उतवलेले लिबू धूवून मी त्याचे सरबत करून लहानपणी प्यालो व अजूनही भूत लागायचे बाकी आहे यात सारे आले ना ?) फिअर इज ओफन मदर ओफ फेथ !
19 Nov 2015 - 8:32 pm | संदीप डांगे
उतरवलेल्या लिंबूत भूत असते हे कुणी सांगितले आपल्याला? म्हणजे 'भूत नसते' हे तुम्ही सांगताय म्हणजे 'भूत असते' हे कुणीतरी तुम्हाला सांगितले आहे त्याच्या विरुद्धार्थी आपण मांडत आहात. आता 'भूत असते' हे ज्या कुणी सांगितले त्यालाही खरंच माहिती आहे का लिंबू उतरवण्याचे 'भूत असते' हेच खरे कारण आहे? कारण लिंबू उतरवणे हे भूत उतरवण्यासाठीच केले जाते असे काही नाही. शिवाय ते लिंबू ज्या कुणावरून उतरवले आहे त्याचे बरेवाईट त्या लिंबूत उतरते, मग ते लिंबू शिवणार्यास ते बाधते असेही काही नसते (नसावे). उतरून टाकलेल्या वस्तू कुणी वापरू नये म्हणून ह्या समजुती पसरवलेल्या असू शकतात. प्रत्येकदा कॉज-इफेक्ट असं इन्स्टंट दिसेलच असं नसतं. अमुक एक केल्यानेच अमुक एक झालं असा कार्यकारणभाव देता येत नाही.
बाकी उतरलेल्या लिंबूत भूत नसते हे पक्के खरे आहे. त्या बाबतीत अंनिस (नकळत) योग्यच मार्गदर्शन करत आहे. पण त्यामागचे तर्कशास्त्र गंडलेले आहे.
19 Nov 2015 - 8:41 pm | चौकटराजा
आपल्या युक्तिवादाबद्द्ल धन्यवाद ! चान आहे तो !
19 Nov 2015 - 8:51 pm | संदीप डांगे
एक शंका: ताप असलेल्या माणसाने पॅरासिटामॉल घेतली तर त्याचा ताप उतरेल, ज्याला ताप नाही त्याने घेतली तर काय होईल...?
19 Nov 2015 - 9:00 pm | चौकटराजा
खरे तर याचे उत्तर कुणीतरी डोक्टर देउन शकतील पण माझा एकदा फिजिशियन शी सम्वाद झाला होता त्याचे मते हेच औषध काहीसे फक्त तपमान कमी करंण्याचे काय करते. असे असेल तर अनावश्यक पणे च घेतल्यास शरीराचे तपमान कमी होत जाईल.
19 Nov 2015 - 9:07 pm | चौकटराजा
जालावर शोधले असता अनावश्यक पणे घेतलेले परासीटामोल लिव्हर चे नुकसान व विषार निर्माण करते असे दिसून आले आहे.
19 Nov 2015 - 9:51 pm | सुबोध खरे
शरीरात जंतू संसर्ग झाला कि शरीर त्याच्या विरुद्ध प्रतिहल्ला चढवते. या हल्ल्यात तुमच्या पांढर्या पेशी आणी जंतू दोन्ही मृत होतात. या मृत पेशीतील काही विशे आपल्या मेंदूच्या तळाशी असलेल्या केंद्रात रक्ताद्वारे जातात आणी तेथे सायक्लोऑक्सीजनेज नावाच्या विकराद्वारे रसायने तयार करतात. या रसायनांच्या प्रभावाने आपल्या मेंदूत असलेला थर्मोष्टाट बिघडतो आणी त्यामुळे आपल्याला ताप येतो. पैरासीटामोल या सायक्लोऑक्सीजनेज विकराला अटकाव करते त्यामुळे मेंदूत हि रसायने तयार होत नाहीत म्हणून आपला ताप उतरतो. पण पैरासीटामोल आपल्या ताप येण्याच्या मूळ प्रक्रियेत(उदा. जंतू संसर्ग) काहीच करत नाही. त्यामुळे शरीरातील हे औषध कमी झाले( साधारण ६-८ तास) कि ताप परत चढतो. म्हणजे ताप आला कि केवळ पैरासीटामोल घेणे हा कायम उपाय नाही तर त्याच्या मूळ रोगावरील इलाज हा उपाय आहे. परंतु डॉक्टरकडे जाईपर्यंत किंवा लहान मुलाला जोरात ताप आल्यास तात्पुरता उपाय म्हणून पैरासीटामोल नक्कीच घेता येईल. हे औषध गरोदर स्त्रियांना नवजात बालकांना किंवा मुलांना दुध पाजणार्या स्त्रियांना सुद्धा सुरक्षितपणे घेता येते. (लक्षात ठेवा-- अति सर्वत्र वर्जयेत)
हेच सायक्लोऑक्सीजनेज आपल्या वेदना जाणवण्याच्या केंद्रातही असते. तेथे पैरासीटामोलच्या प्रभावामुळे आपल्याला होणारया वेदनांपासून काही काळ आराम देऊ शकते. दिवसभर दगदग झाल्याने आपले डोके दुखू लागले कि आपण क्रोसिन ची एक गोळी घेतो त्याने डोके दुखणे थांबते. रात्रभराच्या झोपेने आपल्या शरीराला विश्रांती मिळाली की सकाळी आपण ताजे तवाने होतो.
आता आपल्याला ताप नसेल तर किंवा डोके दुखत नसेल तर आपल्या मेंदूत रसायने तयारच होणार नाहीत त्यामुळे आपल्या शरीराचे तापमान कमी होण्यची शक्यता नाही किंवा आपल्याला आनंदाने हुरळून जायला होणार नाही.
19 Nov 2015 - 9:53 pm | मांत्रिक
सुंदर माहिती. डाॅकसाहेब. हा कार्यकारणभाव माहीत नव्हता.
19 Nov 2015 - 10:26 pm | संदीप डांगे
अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण प्रतिसादासाठी अनेक धन्यवाद डॉक्टरसाहेब,
म्हणजे स्वस्थ व निरोगी माणसावर पॅरासिटामॉलच्या नॉर्मल डोज ने काहीही परिणाम (चांगला/वाईट) होत नाही. बरोबर ना?
22 Nov 2015 - 7:01 pm | अभिजीत अवलिया
महितीबद्दल धन्यवाद ...
19 Nov 2015 - 10:45 pm | अन्नू
सॉरी कोणाच्या श्रद्धेबद्दल मी काहीही बोलू इच्छित नाही, पण प्रत्येक गोष्टीच्या मागे विज्ञान असते असे माझे ठाम मत आहे. कोणतीही वस्तू जादूने घडत नाही आणि बिघडतही नाही. अंनिसवाल्यांची विचारसरणीसुद्धा यावरच आधारलेली आहे. फरक इतकाच कि ते फक्त अंधश्रद्धा कोणती हे दाखवून जनजागृती करतात तर मी मुळात श्रद्धेलाच मानत नाही. कारण अदृश्य गोष्टीवर असलेल्या श्रद्धाच अंधश्रद्धेला निर्माण करतात.
आता तुमच्या लेखात तुंम्ही स्वतःच उल्लेख केला आहे कि डॉक्टरांनी दिलेल्या (योग्य) मेडीसीनने तुमची तीन महीन्यांची जखम तीन दिवसात बरी झाली!
मग आता सांगा इथे महाराजांचा काय चमत्कार? महाराजांना नवस बोलणे आणि त्याच वेळेस डॉक्टरांनी तुंम्हाला मेडिसीन बदली करुन देणे या निव्वळ योगायोगामुळे तुंम्ही हे काम महाराजांनी केलं असं म्हणता?
नाही- तुमची मानसिकता समजू शकतो मी, कारण माझा एक मित्रही अशाच प्रसंगातून गेला होता, औषधे वगैरे करुन वैतागला होता. त्यावेळी त्याने चर्चला जायला सुरवात केली आणि त्याच वेळी त्याचा ब्लड कॅन्सर बरा झाला! ही गोष्ट वेगळी कि त्या दरम्यान त्याच्या औषधांचा कोर्सही पुर्ण झालेला होता!
तर- आता जे झालं ते फक्त येशूमुळेच झालं असं त्याचं ठाम मत झालं आणि तो येशूचा भक्त झाला! आजही तो येशूचा फोटो खिशात घेऊन फिरतो!
आता ही जर श्रद्धा असेल आणि खरंच येशूनं चमत्कार केला असेल तर त्याला डॉक्टरांकडे जाऊन विस हजार रुपये का घालवावे लागले? हे माहीती असूनही कि त्याची परिस्थिती खुपच हालाकीची आहे. येशूने त्याला मदत का केली नाही? का त्याने श्रद्धेच्या जोरावर किंवा त्या मित्राच्याच भाषेत सांगायचं तर- "चमत्काराने" त्याला बरं केलं?
असो- सांगायचं तात्पर्य काय- तर उत्तर आपल्या जवळच असतात फक्त न कळणार्या गोष्टी आपण एखाद्या अदृश्य शक्तींशी जोडतो आणि अंधश्रद्धेच्या भोवर्यात अडकत जातो.
कधी वेळ भेटला तर 'पिके' सिनेमा बघा, एलियन वगैरे काल्पनिक गोष्टी सोडल्या तर देव आणि धर्माच खरं वास्तव त्यात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे!
आणि हो- वर अंनिसचा काढलेला विषय बघून मला 'खुपते तिथे गुप्ते'च्या या एपिसोडची तिव्र्तेनं आठवण झाली.
20 Nov 2015 - 1:02 am | ट्रेड मार्क
त्या डॉक्टरचं नाव कृपया जाहीर करा. फक्त मिसळपाव वरच नाही तर शक्य असेल तिथे सगळीकडे. बऱ्याच रोग्यांना उपयोग होइल.
20 Nov 2015 - 3:21 am | अन्नू
ते अगदी बेसीक पातळीवर होतं, त्याचे रक्त अशुद्ध होऊन त्यात गाठी निर्माण होत होत्या. वेळीच उपचार न केल्याने त्याचे रुपांतर ब्लड कॅन्सरमध्येही होऊ शकते असे त्याच्या डॉक्टरने त्याला सांगितले होते. आणि त्या मित्राने त्याचीच धास्ती जास्त घेतली होती. त्याच्या मते त्याला ब्लड कॅन्सर झालेला होता, म्हणूनच तर तो मन शांतीसाठी चर्चमध्ये जायला लागला ना!
20 Nov 2015 - 3:25 am | संदीप डांगे
मला एक प्रश्न पडलाय बॉ...
देव बीव, जपजाप, मंत्रतंत्र न मानणारी लोकं संकटात असतांना काय करतात?
(मी तर सरळ विपश्यना करायला गेलो, बराच मानसिक फायदा झाला)
20 Nov 2015 - 5:53 am | चौकटराजा
संदीप शेठ याच प्रश्नाची वाट मी आतुरेतेने पहात होतो. "नास्तिकांचा देव" असा एक लेख बरेच दिवस मनात आहे तो आता लिहीन म्हणतो.मी स्वतः माझ्या आयुष्यात अनेक दु:खे पाहिली आहेत . खरे तर घटना ही घटना असते तिला आपली मानसिकता व बुद्धीचा आवाका मंगल वा अमंगळ असा अर्थ देत असतो. कितीही त्रयस्थ पणे आयुष्याकडे पहायचे ठरवले तरी स्वार्थ अहंकार व मायेचा बाजार आपल्याला तसे करू देत नाही. आपण एकटेच या जगात येतो एकटेच जातो फक्त काही नाती निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. सबब सुख दु: ख समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ इतके सोपे नाही.त्यासाठी सन्त कबीर यानी मानसिकता बदलण्याचे काही धडे दिले आहेत. पण ते बाजूला सारून फक्त रामनाम घ्या हा त्याचा आचरणात आणायला सोपा असा सल्ला मण्डळी स्वीकारतात .मानसिक बदल करताना अधिक जबाबदारी येते ती बहुताना नको असते. आध्यात्म ही आत्मसात करण्याची गोष्ट आहे त्याचा एक असा गुरू असूच शकत नाही. तरी अमुक महाराजांचा मी अनुग्रह घेतला आहे त्यानी अमुक जप दिला आहे. ई ई वरवरच्या गोष्ट्री भक्तगण स्वीकारीत " हेच अध्यात्म आहे असे ठासून सांगतात. बिच्चारे !
यासाठी आपल्यावर आलेले संकट आपल्यामुळे ( आध्यात्मिक) इतरामुळे ( अधिदैविक) वा निसर्गामुळे ( अधिभौतिक) आहे याचा प्रामाणिक॑ शोध घेणे व फक्त आध्यात्मिक फेक्टर जो आपल्या हातात आहे तो सुधारणे अशी योजना ही नास्तिक मंडळी करीत असतात . माझी स्वतःची तरी अशी पद्धत आहे.
20 Nov 2015 - 9:35 am | संदीप डांगे
आपले विचार तंतोतंत जुळतायत. :-)
20 Nov 2015 - 9:46 am | सुबोध खरे
चौ रा साहेब
बरीचशी नास्तिक माणसे जवळच्या माणसांचे दुःखाचे प्रसंग निभावून नेताना दिसतात, परंतु स्वतःच्या प्रकृतीबद्दल असाध्य आजार झाला कि भांबावून जाताना दिसतात. त्या वेळेस कोणतेही स्पष्टीकरण त्यांच्या मनाला उभारी देत नाही. दुर्धर आजाराचे उदाहरण म्हणजे एक कधीही सिगारेट न ओढणाऱ्या व्यक्तीला फुप्फुसाचा कर्करोग झाला तेंव्हा त्या माणसाची विचार शक्ती कुंठीत झालेली दिसली. त्यांनी मला परत परत विचारले कि डॉक्टर मी कधीही सिगारेट ओढली नाही. तुम्ही म्हणालात कि ९५ % कर्करोग सिगरेट ओढ्णार्याना होतो. मी त्यांना सांख्यिकी दिली कि उरलेले ५ % न ओढणारे असतात यावर त्यांचा प्रश्न पण मीच का? अर्थात यावर माझ्याकडेही उत्तर नव्हते. आस्तिक लोकांना मी देवाची इच्छा सांगू शकतो. मी या व्यक्तीला हे RANDOM BADLUCK (अनियमित दुर्दैव)एवढेच सांगितले. पण हे दुर्दैव माझ्याच वाट्याला का? आता याला काय उत्तर द्यावे?
त्यांच्या प्रश्नाला आणी त्यांच्या रोगाला माझ्याकडे उत्तरच नव्हते. दुसर्या माणसाचे मानसिक समाधान करणे हे जास्त सोपे असते परंतु स्वतःच्या मनाचे "खोटे समाधान" तुम्ही करू शकत नाही.
21 Nov 2015 - 9:54 am | प्रकाश घाटपांडे
सहमत आहेच.
श्रद्धाळू लोकांना प्राक्तन हे उत्तर दिले तर ते पटते. पण अश्रद्ध लोकांना अनियमित दुर्दैव हे उत्तर पटले तरी मानवत नाही.
अधिक माहिती सुबोध जावडेकरांच्या मेंदुच्या मनात पुस्तकातील अंधश्रद्धा आणि मेंदुविज्ञान या प्रकरणात आहे.
21 Nov 2015 - 12:19 pm | प्रकाश घाटपांडे
हे प्रकरण इथे वाचता येईल
https://drive.google.com/file/d/0B2X6bSru0D7IelpEbU5RcTRGQTA/view?usp=sh...
21 Nov 2015 - 5:05 pm | संपत
सहमत. मी माझ्या ओळखीच्या तीन तथाकथित नास्तिक व्यक्तींना संकट काळामुळे आस्तिक होताना पाहिले आहे.
21 Nov 2015 - 10:35 pm | चौकटराजा
संकटे येऊन सुद्धा मला नास्तिक ठेवल्याबद्दल मी ईश्वराचा आभारी आहे.
22 Nov 2015 - 3:26 am | ट्रेड मार्क
म्हणजे तुम्ही ईश्वर वगैरे संकल्पनांवर विश्वास ठेवता का?
22 Nov 2015 - 1:28 pm | चौकटराजा
जग परस्परावलम्बी घटकान्च्य्या क्रिया प्रतिक्रिया नी चालते आहे.त्याला कोणी नियंता नाही असे मानणारे त्याना आपण नास्तिक म्हणू या.साहजिकच "तो" प्रसन्न होण्याचा प्रश्नच नाही.पण असा माणूस तर्कावर चालताना उत्तर सापडे पर्यन्त debit चे corresponding credit नियति ,देव वा दैव याना देत असतोच.
20 Nov 2015 - 10:02 am | प्रभाकर पेठकर
देव बीव, जपजाप, मंत्रतंत्र न मानणारी लोकं संकटात असतांना काय करतात?
मी स्वतः नास्तिक आहे. पण अंशतः आस्तिकही आहे. (असे मला वाटते).
संकट म्हणजे काय? तर, अशी धोकादायक परिस्थिती ज्यावर आपले कांही नियंत्रण नाही, उपाय नाही अशी. हा प्रत्येकाचा वेगवेगळा आणि वैयक्तिक विचार असतो. कांही जणं संकट निवारण्याचे अजिबात प्रयत्न करणार नाहीत (लगेच देवाचा धावा वगैरे करतील) तर कांही जणं परिस्थितीशी चिवट झुंज देत हर प्रयत्न करतील. त्यांच्याजवळ दुर्दम्य आशावाद आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचे मानसिक बळ असते. ९० टक्के परिस्थितीत ते त्यांच्या प्रयत्नांनीच संकटावर मात करतात. पण अगदी १० टक्के परिस्थितीत त्यांना देवाकडे मदतीसाठी पाहावे लागते. पण अशा वेळीही त्यांचे स्वतःचे प्रयत्न चालूच असतात. 'असेल माझा हरी तर.....' अशी वृत्ती नसते. मला वाटते मी ह्या वर्गवारीत येतो. निसर्गाच्या तांडवात (पूर वगैरे) आपल्या वृद्ध आई-वडीलांचे प्राण वाचवायची आपल्यावर जबाबदारी असते आणि हाती कांही साधन नसताना आपण एखाद्या ठिकाणी अडकतो तेंव्हा देवाला साकडे घालणे हा अशा प्रयत्नातील एक मार्ग असतो.
20 Nov 2015 - 11:03 am | मांत्रिक
अगदी उत्तम प्रतिसाद पेठकर काका! अगदी मार्मिक!
20 Nov 2015 - 11:47 am | संदीप डांगे
सहमत आहे.
पण संकटाशी झुंजतांना आस्तिक-नास्तिक लोक दोघेही प्रयत्नांची पराकाष्ठा करतांना पाहिली आहेत. सरसकट देवावर सोडून देणारे फारच कमी असावेत. 'असेल माझा हरी तर देइल खाटल्यावरी' छाप असे फारसे कुणी आढळत नाहीत. अगदी अंगारे-धुपारे, बुवाबाजी करणारेही हाही 'प्रयत्न करून' पाहू म्हणून दैवी उपायाच्या नावाखाली नकळत प्रारब्धच (जे कधीच कोणी बदलू शकत नाही असे पुन्हा आस्तिकच मानतात) बदलण्याचा प्रयत्न करतात. माझ्या निरिक्षणानुसार बहुसंख्य लोक प्रयत्नवादीच असतात. पण मनासारखे झाले नाही तर देवाचा हवाला देतात. त्यांना कदाचित हार मान्य नसेल, किंवा देवाच्या नावाखाली आपल्या कमतरता झाकण्याचाही प्रयत्न असेल, किंवा खरंच जिथे प्रयत्न परिणाम देत नाहीत तिथे मग हात टेकतात. नास्तिकांचेही प्रयत्न परिणाम देत नसतीलच ना... तेव्हा नास्तिक काय म्हणून गप्प बसतात याचंही कुतूहल आहेच.
माझ्याबाबतीत, गोष्टी मनासारख्या झाल्या नाहित तर थोडी तणतण होते पण 'दैवी हस्तक्षेपामुळे आपल्यास यश येत नाही' हा विचार आजवर कधी मनाला शिवला नाही. काही संकटं तर स्वनिर्मित असतात, काही कर्मधर्मसंयोगाने (नशिबाने) येतात. आपल्या आपणच सर्व निस्तरायचे असते ही भावना असल्याने चमत्कार व दैवी मदतीची वाट बघणे हा प्रकार नाही.
पण काही चांगले, उत्तम घडले तर देवाचे आभार मानायला तोंडातून नकळत धन्यवाद निघतात. ह्यालाच विपश्यनेत 'मैत्री साधना' म्हणतात असे नंतर कळले.
20 Nov 2015 - 7:31 pm | मांत्रिक
पण संकटाशी झुंजतांना आस्तिक-नास्तिक लोक दोघेही प्रयत्नांची पराकाष्ठा करतांना पाहिली आहेत. सरसकट देवावर सोडून देणारे फारच कमी असावेत. 'असेल माझा हरी तर देइल खाटल्यावरी' छाप असे फारसे कुणी आढळत नाहीत.
यनावाला आणि मारवा यांना हीच गोष्ट तर समजत नाहीये. पुन्हा पुन्हा तेच तेच दळण चालू आहे. मारवासाहेब तर गिगाबायटी प्रतिसाद देत सुटलेत. वैताग आला आता याचा.
20 Nov 2015 - 7:58 pm | संदीप डांगे
देऊ देत हो मेगाबायटी प्रतिसाद, तेवढाच त्यांना विरंगुळा. आणि मलाही.
20 Nov 2015 - 11:33 am | राजेश कुलकर्णी
श्रद्धा व अंधश्रद्धा यात फरक नाहीच.
शरीरातील रेझिस्टंसमुळे व औषधातील बदलामुळे फरक पडला, तर त्याचे श्रेय कोणत्या तरी महाराजांना देणे हे योग्य नाही.
बाकी पाणी स्वस्तात मिळणे हा तर आपला हक्कच, ते काही कोठल्या मठाचे काम नाही. पण बाहेरची बजबजपुरी पाहिली की आपल्याला त्यांचे कार्य मोठे वाटते.
श्रद्धा व अंधश्रद्धा यात फरक नाहीच. एखाद्याच्या म्हणजे कुटुंबातील वडलांच्या किंवा आईच्या श्रद्धेमुळे मुलांनाही तसेच वळण लागते. संस्कारांच्या नावाखाली हे सारे चालते. उपासतापास, व्रते, परीक्षेआधी देवाला नवस वगैरे हे प्रकार तसे हार्मलेस वाटले तरी माणूस कळतनकळत या गोष्टींच्या आहारी जातो. त्यावरची उपाययोजनादेखील कुटुंबाच्या हिताचीच नसेल असे नाही.
शिवाय नसलेल्या देवावर श्रद्धा ठेवणे म्हणजे केवळ आपली बुद्धी गहाण ठेवण्यासारखेच असते. सुरूवातीला मनाला आधार म्हणून चांगला वाटणारा (शिवाय त्यातून वाईट तरी काही होणार नाही ना अशी धारणा असलेला) हा प्रकार आपल्या बुद्धीलाच केव्हा गुलाम बनवतो हेही कळत नाही.
अशा देवभोळ्यांच्याच भावनांचा आधार घेऊन अाज गुंडप्रव्ृत्तीच्या राजकारण्यांनी धर्म रस्त्यावर आणलेला आहे आणि आता आपल्यालाच त्याचा उपद्रव सुरू झालेला असूनही त्यावरचा काही उपाय दिसत नाही.
यामधून होणारे कौटुंबिक व सामाजिक पातळीवर होणारे दुष्परिणाम आपल्याला डोळे असूनही दिसत नाहीत, हे दुर्दैव.
20 Nov 2015 - 8:08 pm | दिवाकर कुलकर्णी
होमियोपैथी च्या बर्याच साधक बाधक चर्चा या आधीच्या प्रतिक्रिया तून झाल्या आहेत.
त्या बद्दलचे मी अनेक चिकित्सक पणानं घेतलेले अनुभव सांगू शकतो.
1)गैंगलीआॉन (अचूक उच्चार डॉक्टरनी पहावा) माझ्या ८ वर्षाच्या मुलाला मनगटावर बाहेरच्या बाजूस
१ से मी ची गाठ झाली होती, अनेक अैलो.डॉक्ट.नी छोटं ऑपरेशन सुचवलं होतं,होमियोपैथी नं ,लक्षात ठेवा
साबु.गोळ्यानं ते कायमचं बरं झालं
२)दुसर्या लहान मुलाला सतत डोळ्याखाली फोड उठायचे अैलो.डॉक्ट. ते फोडायचे, ते पुनः पुन
व्हायचे साबु.गोळ्यानं ते कायमचं बरं झालं
३)माझ्या स्वताच्या बाबतीत अनेक अनुभव आहेत,युरिन इन्फे जे अैलोपैथिने हायर अैंटीबायोटीक्सने बरे व्हायचे नांव
घेइना होमियोपैथी ने ४ दिवसात बरे झाले,इथं हे सांगण महत्वाचं आहे कि आमच्या होमियोपैथंनं पहिलं माझ्या अैलो गोळ्या
बंद केल्या
असे अनेक अनुभव मी सांगू शकतो
होमियोपैथी जे बाजारी करण झालेलं आहे त्याच्या विरोधातच आमचा होमियोपैथ असतो, खोटे दावे उदाहरणार्थ
मानेवरचं ९इंचाचं आवाळू घालवतो इत्यादि खोटं आहे तो म्हणतो, आणि अशा भंपक दाव्यामुळं होमियोपैथी
बदनाम झाली आहे असं तो मानतो
तान्हया बाळापासून ८० वर्षाच्या आजोबापर्यंत त्यांचे पेशंट असतात,आपला नंबर यायला कमीतकमी दोन तांस लागतात,
एव्हडी गर्दी असते,
ही अतिशयोक्ति नव्हे, (आय स्वेअर) कांहीं नामवंत अैलोपैथ त्यांच्या स्वताच्या ट्रीटमेंट साठी त्यांच्या कडं आलेलं
मी पाहिलेले आहेत,
एकाच प्रिमायसेस मध्ये आमच्या होमियोपैथचा व त्याच्या भावाचा एम बी बी एस दवाखाना होता (ते भाऊ आता हयात नाहीत)
भावांचा दवाखाना बिलकुल चालायचा नाही,
हे सगळं सविस्तर सांगण्यात माझा वैयक्तिक स्वार्थ कांही नाही कुठल्याचं पैथीतलं मला कांही च कळत नाही,
यात श्रध्दा अंध श्रध्देचा कांही भाग नाही , लहान कळत्या न कळत्या मुलाना जेव्हां इथं हमखास गुण येतो तेव्हां अंध श्रध्देचा
प्रश्न कुठे येतो इति लेखनसीमा
22 Nov 2015 - 1:42 pm | अर्जुन
क्रुपया वर उल्लेख केलेल्या होमीओपथी डॉक्टरचा पत्त्ता व फोन नं. मिळु शकेल का? अनेक गरजु माहीतीत आहेत.