"सूर निरागस हो..." शंकर महादेवन यांच्या प्रसन्न स्वराने कट्यार चित्रपटाची सुरुवात होते.. आणि पुढील ३ तास ही सुरेल कथा अक्षरशः गुंतवून ठेवते.
सुमारे पन्नास वर्षांपूर्वी पं. जीतेंद्र अभिषेकी, डॉ. वसंतराव देशपांडे, इत्यादी दिग्गजांनी अजरामर केलेल्या या कलाक्रुतीची मोहिनी आजही लोकांच्या मनावर कायम आहेच. सुबोध भावे सरख्या अत्यंत प्रतिभासंपन्न कलाकाराने, तितक्याच ताकदीच्या कलाकारांच्या साथीने, ही कथा चित्रपटरूपात आणून त्यांस अधिकच उंचावर नेऊन ठेवले आहे, असेच म्हणावे लागेल.
ब्रिटिशांच्या अमलाखालिल हिंदुस्थानातील विश्रामपूर हे सर्व कलागुणांचा योग्य मानमरातब व कदर करण्यासाठी नावाजलेले संस्थान. सुरांचे अनभिषिक्त सम्राट म्हणून ओळखले जाणारे,नम्र स्वभावाचे, मितभाषी पंडित भानुशंकर शास्त्री (शंकर महादेवन), हे तर संस्थानच्या, तिथल्या जनतेच्या गळ्यातले ताईतच. मिरजेतील एका कार्यक्रमाच्या दर्म्यान पंडितजींची भेट आफताब हुसेन, या मनस्वी गायकाशी होते. प्रथम भेटीतच खाँसाहेबांच्या गायनाचे चाहते झालेले पंडितजी, त्यांना विश्रामपुरास येण्याचे आमंत्रण देतात. बेताचीच आर्थिक परिस्थिती असलेले खाँसाहेब राजाश्रय मिळवण्याच्या आशेने विश्रामपुरास येतात खरे, पण राजदरबारातील एका मुकाबल्यात त्यांची गायकी पंडितजीपेक्षा काकणभर कमीच सिद्ध होते. राजगायकाचा किताब, राहण्यास प्रशस्त हवेली, व मानचिन्ह असलेली एक नक्षीदार कट्यार, असे भरघोस इनाम असलेली स्पर्धा हरल्याची खंत घेऊन खाँसाहेब परततात, पण या पराभवाची सल त्यांना स्वस्थ बसू देत नाही. काहीही करून आपल्या घराण्याच्या गायकीचे श्रेश्ठत्व सिद्ध करायचे, व राजगायकाची पदवी मिळवायचीच, या इरेला ते पेटतात. परंतू सलग १४ वर्षं कसोषीचे प्रयत्न करूनही, पंडितजींवर मात करण्यात मात्र त्याना यश काही मिळत नाही. आधिच पराभवाचे शल्य, त्यात बिकट आर्थिक परिस्थितीचे चटके, आणि सततच्या पराभवामुळे होणारी कुचेष्टा, यामुळे, त्यांच्यातिल जिंकण्याची ईर्षा, राक्षसी महत्वाकांक्षेचं रूप घेते, आणि शेवटी, पंडितजींवर कुरघोडी करण्यासाठी त्यांना एक अत्यंत हीन क्रुत्य करण्यास भाग पाडते.
गायनस्पर्धेत खाँसाहेब विजयी होतात, राजगायकाचा किताब व हवेली जिंकतात व विजयोन्मादात आकंठ बुडून जातात. पंडितजी मात्र पुरते खचून, विश्रामपूरातून नाहिसे होतात. १४ वर्षांनंतर मिळालेल्या मानसन्मान व ऐश्वर्यामुळे खाँसाहेबांचा अहंकार अधिकच वाढीस लागतो. अशातच आगमन होते सदाशिव (सुबोध भावे) या पंडितजींच्या शिष्याचे. आपल्या गुरुंवर झालेल्या अन्यायाची, त्यांच्या झालेल्या अवहेलनेची कथा ऐकून सदाशिव पेटून उठतो, व थेट खाँसाहेबांची हत्या करण्यासाठी हवेलीवर पोचतो. खाँसाहेबांची कन्या झरीना त्याला अडवते. "हाडामासाच्या माणसाची हत्या कोणीही करू शकतो. पंडितजींवरच्या अन्यायाचा सूड घ्यायचा असेल, तर खाँसाहेबांच्या अहंकाराचा नाश करून दाखव." हे त्याच्या मनावर बिंबवते. सूडाने पेटलेला सदाशिव, खाँसाहेबांच्या गायकीचे श्रेष्ठत्व मोडून काढून त्यांच्या अहंकाराला संपवण्याचा विडा उचलतो. आपल्या गुरुंवरच्या अन्यायाचा सदाशिवने घेतलेला प्रतिशोध, खाँसाहेबांचा चिरडलेला अहंकार .. याची कथा म्हणजे "कट्यार.."
पुरुषोत्तम दारव्हेकरांनी लिहिलेल्या नातकाची ही नितांतसुंदर कथा बहुतेकांना ठाउक आहेच. नव्हे, तिचे लाखो चाहते आहेतच. अशात, हे कथानक चित्रपट स्वरूपात आणणं हे एक मोठंच आव्हान असतं (आठवा.. दुनियादारी चित्रपटात मूळ कलाक्रुतीचा केलेला सत्यनाश. असो.).योग्य पटकथा लेखन या बाबतीत सर्वात महत्वाचं. अगदी "मेक ऑर ब्रेक" ठरवणारं. सुबोध भावे आणि टीमने यात चांगलीच बाजी मारलेली आहे. अतिशय ओघवत्या पटकथेमुळे, आणि तितक्याच उत्तम संवादलेखनामुळे, चित्रपट शेवटपर्यंत खिळवून ठेवण्यात १००% यशस्वी ठरतो.
कलाकारांची योग्य निवड, ही कट्यारची सर्वात उजवी बाजू. सचिन पिळगावकर, शंकर महादेवन, सुबोध भावेंपासून अमृता खानविलकर, मृण्मयी देशपांडे, साक्षी तन्वर पर्यंत सर्वच कलाकार आपापल्या भूमीकेत अगदी चपखल बसलेत.
सचिन पिळगावकरांना मिळालेली ही आजवरची सर्वोत्तम भूमीका असावी. सततच्या पराभवाने खचलेले, ईर्षेने, आसुयेने उद्विग्न, गर्वाने मग्रूर झालेले खाँसाहेब त्यांनी अविस्मरणीय केले आहेत. शंकर महादेवन यांचा पडद्यावरील वावर हा त्यांच्या गायनासारखाच, प्रसन्न, सुखावह. सदाशिवचे पडद्यावर आगमन जरी मध्यांतराच्या थोडेच आधी होत असले, तरी, सुबोध भावे पुरता भाव खाऊन जातो. इतक्या सहजतेने त्याने सदाशिव साकारला आहे, की अभिनय खरोखर खूपच सोप्पा असावा की काय असं क्षणभर वाटतं. बालगंधर्व, लोकमान्य, या पाठोपाठ सदाशिव तितक्याच ताकदीने उभा करणारा सुबोध, आजच्या घडीला मराठी सृष्टीतील सर्वोत्तम अभिनेता असावा यात शंकाच नाही.
मूळ नाटकाप्रमाणेच, संगीत हा या चित्रपटाचादेखील आत्मा आहे. पं अभिषेकी, व वसंतराव देशपांडेंच्या मूळ रचना शंकर महादेवन, राहुल देशपांडे, आणि महेश काळे इतके सुंदर गायले आहेत, की एखाद्या सुरेल मैफिलीत बसल्याचा कित्येकदा भास होतो, आणि तशीच दाद प्रेक्षकांतूनही येत राहते.
याचबरोबर, शंकर-एहसान-लॉय या त्रयीने रचलेली इतर गाणीही चित्रपतातील मूळ रचनांमध्ये कुठेही विसंगत अथवा अप्रस्तुत वाटत नाहीत इतकी समर्पक.
अभिनयाइतकीच दिग्दर्शनातही आपली या क्षेत्रावर मजबूत पकड आहे हे सुबोध भावेने पदार्पणातच दाखवून दिले आहे. ज्यांनी मूळ नाटक पाहिलेले नाही, किंवा जे संगीताचे दर्दी श्रोते नाहीत, अशांनाही कट्यार अतिशय मनोरंजक वाटेल हे निश्चित. मूळ नाटकाच्या, त्या संगीताच्या चाहत्यांसाठी तर ही एक मेजवानीच आहे.
अतिशय उच्च निर्मितीमूल्यं, व तंत्रज्ञानाच्या वापरामुळे, चित्रपटाची भव्यता रेखीवपणे साकारली गेली आहे. "झी"चे त्याबद्दल खरोखरच अभिनंदन. दिवाळीच्या मुहूर्तावर, खानमंडळींच्या भव्य बॉलिवुडपटांच्या गर्दीत मराठी निर्मात्यांनी आत्मविश्वासाने टाकलेलं हे धाडसी पाऊल चित्रपतगृहांमध्ये घट्ट रोवलेले राहील, व त्यास प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळेल, यात कोणताच संदेह नाही!
प्रतिक्रिया
14 Nov 2015 - 8:52 pm | चौकटराजा
सर्वानी कृपा करा नि कलाकार,पात्र व एक व्यक्ति म्हणून नट या तिन्ही ची सर मिसळ करून घोळ घालू नका मंड ळी ! नय्यर,रोशन व सी रामचंद्र तिघेही एकत्र बसून दारू ढोसत असत पण ते सोडून त्यांची निर्मिती ऐका आपल्या मृत्यू पश्चात ही ते नाव टिकवून आहेत.
14 Nov 2015 - 9:14 pm | मुक्त विहारि
.... पण ते सोडून त्यांची निर्मिती ऐका. आपल्या मृत्यू पश्चात ही ते नाव टिकवून आहेत."
असेल..असेही असेल....
आजकाल काही सांगता येत नाही....
कदाचित.....
काही गहनविचारी नाना, चिऊ-काऊच्या हितोपदेशातल्या गोष्टी, सांगता-सांगता हेवनवासी झाले असतील आणि त्यांची असंख्य पिलावळ, त्यांच्या मोठ्या गाढवकथांना किंवा अजब तर्कशास्त्राला, अद्याप प्रसवत असतीलही.
15 Nov 2015 - 6:34 am | मोगा
कित्तीदा सांगायचे हो तुम्हाला ?
15 Nov 2015 - 9:14 am | मुक्त विहारि
खालील वाक्य नीट मन लावून वाचा....
"काही गहनविचारी नाना, चिऊ-काऊच्या हितोपदेशातल्या गोष्टी, सांगता-सांगता हेवनवासी झाले असतील आणि त्यांची असंख्य पिलावळ, त्यांच्या मोठ्या गाढवकथांना किंवा अजब तर्कशास्त्राला, अद्याप प्रसवत असतीलही."
वरील वाक्य हे अतिशय साधे वाक्य आहे.
अर्थात तरी पण ते जर तुम्हाला लागले असेल तर, कठीण आहे......
14 Nov 2015 - 9:13 pm | त्रिवेणी
ओक्के बॉस.
15 Nov 2015 - 2:47 pm | आनन्दा
चित्रपट टीव्हीवर बघेन, पण सुरत पिया बिन गाणे नाही म्हणल्यावर माझा तरी इंटरेस्ट गेलेला आहे. बाकी शंकरमहादेवन यांचे घेई छंद छानच.
15 Nov 2015 - 3:12 pm | याॅर्कर
सुरत पिया कि गाणे पाहिजे होते,अजून मजा आली असती.
16 Nov 2015 - 11:42 am | सिरुसेरि
"सुरत पिया" हे गाणे नाही ? आणि "मुरलीधर शाम हे नंदलाला" , "दिन गेले भजनाविन सारे" , "लागी कलेजवा कटार" हि मुळ नाटकातील गाणी सुद्धा नाहित ? अरेरे .. ओह माय गॉड ..
16 Nov 2015 - 2:21 pm | वेल्लाभट
कुणी सांगितलं की ते गाणं नाहीये?
15 Nov 2015 - 2:58 pm | पद्मावति
खूप सुंदर परीक्षण. धन्यवाद.
मूळ नाटकाविषयी काही माहिती नव्हतं पण तुम्ही करून दिलेल्या इतक्या छान ओळखीमुळे हा चित्रपट नक्की बघणार.
15 Nov 2015 - 4:05 pm | त्रिवेणी
सुरत पिया बिन आहे की.
15 Nov 2015 - 4:11 pm | आनन्दा
दोन्ही आहेत का? की एकच? कारण ऑडिओमध्ये एक पण आलेले नाहिये.
15 Nov 2015 - 9:16 pm | पैसा
विकिवर महेश काळे आणि राहुल देशपांडे यांच्या आवाजात दाखवले आहे.
15 Nov 2015 - 4:08 pm | त्रिवेणी
आत्ताच बघितला पिक्चर.
आणि आवडला.
बाकी महागृन च्या कास्टिंग साठी १०० टक्के दिले.वेगळा अभिनय करावच् लागला नाही महगृणा.
15 Nov 2015 - 8:22 pm | sagarpdy
सिरुसेरि, यशोधरा, चौकटराजा यांच्याशी सहमत.
माझ्या मते सदाशिव मधील सूडबुद्धी आणि खाँसाहेबांचा अहंकार कथानकास सामान्य सूडकथानक बनवतात.
सदाशिव चा एखाद-दुसरा नम्र संवाद त्यास मूळ नाटकातील कलाप्रेमी सदाशिव बनवू शकलेले नाहीत. त्यामुळे चित्रपटाच्या अखेरचे निवेदन (विद्या / कलेला घराण्यात बंद करून ठेवू नये इ.) हुकाल्यासारखे वाटले. हेच निवेदन जेव्हा नाटका अखेरीस सांगितले गेले तेव्हा एकदम चपखल बसले होते.
त्याचबरोबर खाँसाहेब एकावेळी केवळ एका भावनेच्या आहारी गेलेले दिसतात - आधी सूड मग अहंकार. हे खाँसाहेब नाटकातील श्रीकृष्णाची मूर्ती हवेलीत ठेवून घेणाऱ्या उदात्त खाँसाहेबांपेक्षा फारच one dimentional झालेत. अर्थात मिळालेल्या भूमिकेचे सचिनने चीज केले आहे, अती-अभिनय जवळपास सर्वत्र टाळला आहे. पहिल्या जुगलबंदीच्या वेळी तर पंडितजींच्या गाण्यानंतर दरबारात पसरलेली शांतता आणि सचिनच्या चेहऱ्यावरील बदलत गेलेले भाव केवळ लाजवाब.
कथेच्या या दोन मुख्य पात्रांची उदात्तता अशा प्रकारे हरवलेली वाटली. अर्थात मध्यम बदलामुळे हे झाले असू शकते.
चित्रपटाच्या जमेच्या बाजू म्हणजे अतिशय सुंदर सेट्स, योग्य पात्रनिवड, आणि गाण्याची निवड व मांडणी. शंकर महादेवन चे विशेष कौतुक. अभिनयाचा पहिलाच प्रयत्न यशस्वी झाला असं म्हणायला हरकत नाही. मथुरेहून परत येताना नदीकीनारचा सीन उत्तम.
चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदर मला सर्वाधिक भीती वाटत होती ती म्हणजे महागुरूंचा अभिनय व नवीन गाणी (जी नाटकात नाहीत) यांची. परंतु दोन्ही खोट्या ठरल्या याचा मला आनंद आहे. नवीन गाणी अतिशय सुंदर प्रकारे कथानकात बसली आहेत. शिवमंदिरातील गाणे मला फ़ारच आवडले. कलाकारांचा प्रत्यक्ष गाण्याचा अभिनय काहीसा चुकल्यासारखा वाटतो एखाद दुसऱ्या ठिकाणी. पण तेवढे नक्कीच दुर्लक्षिता येऊ शकते.
एकूणच चित्रपट म्हणून फार सुंदर जमला आहे. प्रत्येकाने आवर्जून पाहावा असा आहे.
15 Nov 2015 - 9:03 pm | किसन शिंदे
Atishay Sundar ParikshaN! Varil sarv pratikriya vachun chitrapaT pahNyachi utsukta vaDhli aahe.
16 Nov 2015 - 2:22 pm | वेल्लाभट
महागुरूंशी वैयक्तिक वैर असल्यासारखं लोकांना बोलताना ऐकून हे पटतं की
कलाकाराचं पडद्यावरचं आणि वैयक्तिक आयुष्य वेगळं रहात नाही.
16 Nov 2015 - 4:04 pm | संदीप डांगे
जेव्हा कलाकार वैयक्तिक आयुष्य व पडद्यावरिल आयुष्य वेगळं ठेवत नाहीत तेव्हा हे होणारच. जेव्हा कलाकार आपले व्यक्तिगत आयुष्य माध्यमांमधून वेशीवर टांगणार तर लक्तरे तर फाडली जाणारच. मराठीतले कुणाही दिग्गज कलाकारांबद्दल असे वैयक्तिक वैर जनमानसात असल्याचे जाणवत नाही.