प्ले इट अगेन

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in दिवाळी अंक
18 Oct 2015 - 6:54 pm

.
.
.
.
.
Image
(चित्रः प्रतिमा खडके)

त्याच्यासाठी ते सगळंच नवीन होतं. ते लोक, ती जागा, तो माहोल आणि सगळंच. या नवीनतेची ओळख करून घ्यायला कुठपासून सुरुवात करू, या संभ्रमात तो तिथे बसला होता. संजय. कोकणातल्या एका छोट्याशा गावातला तो एक हुशार मुलगा होता. वडिलांची छोटीशी शेती, आईचं घरून चालणारं शिवणकाम, अंगणातल्या गोठ्यात असलेल्या दोन गायी आणि दोन बैल, आंबा-फणसाची झाडं, समुद्र हे सगळं विश्व सोडून तो या शहरात शिकण्यासाठी आला होता. वडिलांची इच्छा होती की संजयने चांगल्या कॉलेजात शिक्षण घ्यावं आणि त्यामुळे त्याला इथे धाडण्यात आलं होतं.

मुंबई. एक समुद्र सोडला, तर संजयच्या तोवरच्या आयुष्यातील कुठलीही गोष्ट इथे नव्हती. झाडांच्या जागी इमारती होत्या, गुरांच्या जागी गाड्या होत्या. शिक्षक, रूममेट्स हेच काय ते नित्याचा संपर्क येणारे. संजय मुंबईत एका भाड्याच्या जागेत तीन इतर मुलांबरोबर राहत होता. त्यापैकी अमित नावाचा एक मुलगा राजस्थानचा होता आणि जयपूरच्या श्रीमंत तरीही अतिशय जुनी विचारसरणी जपणार्‍या घरातून आलेला होता. मुंबईत पहिल्यांदाच आलेला असला, तरीही मुंबईशी जुनी ओळख असल्यागत तो इथे सरावलेला होता. देवेंद्र हा दिल्लीचा. दुसर्‍या मुंबईचाच म्हणायला हरकत नाही. लोकल ट्रेन आणि समुद्र या गोष्टी सोडल्यास त्याला मुंबईत काहीच नवीन नव्हतं. आणि तिसरा राजीव, जो मुंबईचाच होता पण तरीही मित्रांबरोबर वेगळा राहत होता. संजय आणि हे तिघे जण एकत्र एका घरात भाड्याने राहत असत. चौघे एकाच कॉलेजमध्ये असल्याने ओळख व्हायला वेळ गेला नाही. पण सगळे स्वभावाने फार वेगळे होते आणि इतर तिघे संजयपेक्षा तुलनेने जास्त पुढारलेले होते. त्यामुळे संजय गप्प गप्प असायचा, बुजलेला असायचा.

त्याला इथे येऊन सहा महिनेच होत होते. पण मुंबई अजून त्याला म्हणावी तितकी आपली वाटत नव्हती. कॉलेजमार्फतच त्याला या रूममेट्सबद्दल कळलं आणि तो यांच्यासोबत राहायला लागला. सकाळी उठल्यावर लवकर आवरणं, कॉलेजला जाणं, कॉलेज संपल्यावर लायब्ररीत जाऊन अभ्यास आणि रात्री मेसमध्ये जेवून घरी, असा संजयचा दिनक्रम होता. त्याचे इतर रूममेट्स कॉलेज जीवनात पुरेपूर मजा करत होते. संजयची मात्र काहीशी घुसमट होत होती. प्रत्येक गोष्टीत त्याला गावाची आठवण यायची. मुंबईच्या मुलामुलींचं वागणं-बोलणं, मजा मस्ती, इथला कलकलाट, इथली गर्दी, या सगळ्या चित्रात तो स्वतःला बघूच शकला नव्हता. आणि अशा गर्दीत मित्र म्हणावा, आपलं म्हणावं असं कुणीच दिसत नसल्याने तो आणखीनच खट्टू झाला होता. रूममेट्सनी मागवलेल्या पिझ्झात त्याने मंग्याने दिलेल्या उष्ट्या वड्याची चव शोधली.. मिळाली नाही. बिसलेरीत विहिरीच्या पाण्याची गोडी शोधली.. मिळाली नाही. अलार्मच्या आवाजात कोंबड्याचं आरवणं शोधलं.. मिळालं नाही. प्रोफेसरांच्या रूक्ष लेक्चरमध्ये मास्तरांचं रागावणं शोधलं.. मिळालं नाही. आणि अशाने मग त्याने अभ्यासात स्वतःला गुंतवून या तगमगीवर औषध शोधलं होतं.

त्या दिवशी कॉलेजला सुट्टी होती. दुसर्‍या दिवशी शनिवार, पुढे रविवार असल्याने मंडळ रंगलंय वीकेंडात असा प्रकार होता. काय करावं? यावर चर्चा सुरू होती. अमित म्हणाला, "चलो मूव्ही चलते है." "कोई अच्छी मूव्ही नही है यार," राजीव म्हणाला. देवेंद्रने सुचवलं, "तो फिर डिनर चलते है ना मस्त" "अरे बेस्ट आयडिया! डीवीडी लाते है, लॅपटॉप पे देखेंगे, साथ में पिझ्झा और दारू.." अमितने आणखी एक प्रस्ताव मांडला. संजयची अशी काहीच कल्पना नसल्याने तो गप्प राहिला. तरीही जरा संभ्रमातच होता. मग राजीवने एक फोन फिरवला, आणि एक प्लॅन ठरला. "पब मे जाते है. मेरा एक फ्रेंड है जो बँड्रा मे रहता है. उसके इधर एक सही पब है. मस्त नाचेंगे, पिएंगे फुल्ल ऑन! और अच्छी लडकिया शडकिया भी होंगी या....र" येस येस येस. चौथा येस नेहमीप्रमाणे गृहीत धरला गेला.

"मुझे थोडी पढाई करनी है. मैं नहीं आता हूं. तुम लोग जाओ." संजयने टाळायचा प्रयत्न सुरू केला. "अभी क्या पढना है? चल! कल पढ लेना पूरा दिन." अमितने आग्रहाने म्हटलं. "नही, रहने दो" संजय म्हणाला. "अरे क्या रहने दो? चल ना अब" उत्तर आलं. "पर उधर क्या करनेका?" संजयने घाबरत घाबरत विचारलं. "तू चल यार, तेरेको बहोत मजा आएगा. चल, चल" म्हणत राजीवने संजयच्या गळ्यात हात टाकत त्याला ओढलं. संजयचा नाइलाज झाला आणि चौकडी पबकडे निघाली.

त्याच्यासाठी ते सगळंच नवीन होतं. ते लोकं, ती जागा, तो माहोल आणि सगळंच. या नवीनतेची ओळख करून घ्यायला कुठपासून सुरुवात करू, या संभ्रमात तो तिथे बसला होता. बाकी तिघे जण त्या गर्दीत मिसळलेले होते. राजीव त्याच्या मित्राला भेटला आणि तो त्याच्याशी बोलत होता. बाकी दोघं जण कुठली दारू प्यावी हे ठरवत बार काउंटरवर उभे होते आणि संजय एका टेबलावर एकटाच जाऊन बसला होता.

"आता निघता तर येणार नाही इथून यांचं आटपेपर्यंत." संजय विचारात पडला होता. दणदणीत आवाजात गाणी वाजत होती. डिस्को लाईट्स चमकत होते. मुलंमुली बेभान होऊन डान्स फ्लोअरवर नाचत होते, ओरडत होते. संजय या सगळ्याचं निरीक्षण करत बसला होता. त्याला घराची आठवण येत होती. गावाची, शाळेची, त्या मुलामुलींना नाचताना बघून मित्रांची आणि मित्रामित्रात ठरलेल्या मैत्रिणींची आठवण येत होती. कोण कुणाला कुणावरून चिडवायचं, कोण खरंच कुणाला आवडायचं, कुणाचं कसं भांडण झालं, सगळं आठवत होतं. एकदा शाळेजवळच्या सार्वजनिक गणपतीत संजय, मंग्या, संतोष आणि शिर्के कसे नाचलेले आणि नाचताना शिर्केने स्मिताबरोबर कशी फुगडी घातलेली, मंग्याला जेव्हा एका मुलीने वही मागितलेली, तेव्हा मंग्याची कशी बोबडी वळलेली आणि नंतर पुढचे दोन आठवडे वडाखाली बसून त्याला किती छळलेलं, या सगळ्या गोष्टी आठवून संजयला मनातल्या मनात हलकंच हसायला येत होतं, आणि आठवण जास्तच तीव्र होत होती. आत्ताच्या आत्ता गावाला जावं आणि टेकडीवरच्या वडाखाली गप्पा कुटत बसावं, असं त्याला वाटत होतं. तिथल्या गर्दीत संजयला विलक्षण एकटेपणाची भावना खायला लागली.

इतक्यात चार ओले तुषार संजयच्या तोंडावर उडाले. खट्टकन ग्लास आपटत एक मुलगी संजयच्या समोर येऊन बसली होती. "यू नो... ही वॉज अ प्रिक. ही वॉज जस्ट... आय डोन्ट नो..." ती तंद्रीत बडबडत होती. "अच्छा हुआ, मुझे बहोत पहलेही समझ में आ गया. नही तो मुश्कील हो जाता उससे दूर जाना.." हातातल्या बिअरचा एक घोट घेत ती म्हणाली. पुढे पाच मिनिटं ती काय बोलत होती हे तिला तर कळत नव्हतंच, पण संजयलाही कळत नव्हतं. तरीही तो ऐकत होता. शाळेत मुलींच्या बाकाच्या बाजूच्या बाकावर बसलं तरी मुलं चिडवत असत. इथे मुंबईत मुलं-मुली असा काही फरकच दिसला नव्हता. आणि आता तर एक मुलगी चक्क संजयच्या समोर येऊन बसली होती, त्याच्याशी बोलत होती. संजय नजर चोरत होता, अस्वस्थ होत होता, आश्चर्यचकित होत होता. त्याला कुठेतरी आनंद होत होता. अशा विचित्र अवस्थेत संजयची ती पाच मिनिटं गेली.

थोड्या वेळाने बडबड थांबवत भानावर येत तिने विचारलं, "वैसे... तुम यहां क्यू बैठे हो? तुम्हारा भी ब्रेक अप हुआ क्या?" "नही नही... मै तो... ऐसेही." "अरे बोलो यार! छोड ही दिया है तो पूरी दुनिया को बताओ." असं पुन्हा काहीसं स्वतःशीच म्हणत पहिल्यांदा तिने संजयकडे बघितलं. संजय आणिकच अवघडून बसला. "वैसे तुम तो बहोत अच्छे, शरीफ, और... स्मार्ट भी हो. प्रॉब्लेम क्या हुआ?" "नही. ऐसे कुछ नही." "अरे या....र" असं म्हणत तिने उरलेला ग्लास रिकामा केला. 'अरे लाजतोस काय मुलीसारखा? नाव विचार तिचं!' असं संजयचं एक मन त्याला ओरडून सांगत होतं आणि 'गप बस हं! उगाच ओळख ना पाळख' असं दुसरं मन थांबवत होतं.

संजय विचार करत राहिला. एखाद मिनिट असं शांततेत गेलं आणि स्पीकरवर वाजणारं गाणं बदललं, तशी ती किंचाळतच उठली आणि "कित्तने दिन बाद ये गाना सुना है.. ओ माय गॉड.. कमॉन, लेट्स डान्स" म्हणून संजय काही म्हणायच्या आत तिने त्याला हाताला धरून ओढलं आणि डान्स फ्लोअरवर घेऊन गेली. भेदरल्यासारखा तो तिथे उभा होता. भीत भीत तरीही खोलवर आनंदित होत. ती त्याचा हात उंच करून गिरक्या घेत नाचायला लागली. तो पाय जेमतेम उचलत नाचल्यासारखं करत होता. 'गावाकडच्या मित्रांना हे सांगितलं तर चिडवून चिडवून जीव नकोसा करतील मला', त्याच्या मनात विचार चमकला. तिच्या नाचण्यातला थोडासा बेभानपणा उसना घेत संजयने तो विचार झटकून टाकला. हळूहळू त्याच्या बावरलेल्या चेहर्‍यावर स्मिताची लकेर उमटू लागली. त्याला छान वाटत होतं. बर्‍याच गोष्टी आठवत होत्या, सुचत होत्या, बर्‍याच गोष्टींचा विसर पडत होता. तो तिच्याकडे, तिच्या आपल्याच धुंदीत नाचण्याकडे बघत होता. तो हरवला होता, एका वास्तव स्वप्नात.

गाणं संपलं, तशी ती त्याच्या हाताला धरून त्याला ओढतच डीजेच्या टेबलजवळ धावत गेली आणि म्हणाली, "प्ले इट अगेन!" मागे वळून पुन्हा डान्स फ्लोअरकडे जायला लागली आणि तिच्या मागोमाग धावत वळताना आपसूक संजयही त्या डीजेला म्हणाला, "प्ले इट अगेन!"

प्रेरणा
https://www.youtube.com/watch?v=ALV-QtDFpSw
http://www.azlyrics.com/lyrics/lukebryan/playitagain.html

अपूर्व ओक
.

दिवाळी अंक २०१५

प्रतिक्रिया

विशाल कुलकर्णी's picture

10 Nov 2015 - 7:12 am | विशाल कुलकर्णी

सुरवंटाचे फुलपाखरात रूपांतर होण्याचा, आपला कोष झुगारुन जगाच्या अंगणात उतरण्याचा तो क्षण खुप महत्वाचा असतो. खुप छान टिपला आहेस भाऊ...

अमित खोजे's picture

10 Nov 2015 - 9:39 pm | अमित खोजे

कथा पण सुंदर अन तुमचा प्रतिसादही तेवढाच सुंदर.

एक एकटा एकटाच's picture

10 Nov 2015 - 8:04 am | एक एकटा एकटाच

मस्तच आहे.

कविता१९७८'s picture

10 Nov 2015 - 10:16 am | कविता१९७८

कथा आवडली

बहुगुणी's picture

10 Nov 2015 - 10:24 am | बहुगुणी

व्हिडिओ पाहिला, कल्पनाविस्तार आवडला. छान लिहिलंय.

अजया's picture

10 Nov 2015 - 11:12 am | अजया

छानच आहे कथा.

मधुरा देशपांडे's picture

10 Nov 2015 - 3:45 pm | मधुरा देशपांडे

कथा आवडली आणि त्याला साजेसं चित्रही.

बोका-ए-आझम's picture

10 Nov 2015 - 6:35 pm | बोका-ए-आझम

आणि चित्रही एकदम समर्पक!

एस's picture

10 Nov 2015 - 8:04 pm | एस

कथा खूप छान फुलवली आहे आणि नेमक्या अशा वळणावर आणून सोडली आहे की वाचक म्हणतील, 'प्ले इट अगेन...!'

पैसा's picture

10 Nov 2015 - 9:38 pm | पैसा

खूप छान! मोजक्या शब्दात मोठे बदल छान टिपलेत!

इडली डोसा's picture

10 Nov 2015 - 11:59 pm | इडली डोसा

भरभर पुढे सरकणारी आणि नेमका क्षण टिपणारी छान कथा.

प्रभाकर पेठकर's picture

11 Nov 2015 - 7:48 pm | प्रभाकर पेठकर

चांगली कथा आहे. मुंबईतच आयुष्य गेल्यामुळे कथा नायकाच्या भावनांशी समरस होऊ शकलो नाही. पण असे असूही शकते ह्यात शंका नाही.

मित्रहो's picture

12 Nov 2015 - 1:46 pm | मित्रहो

विडीयो बघितला, कथाविस्तार छान आहे.

टवाळ कार्टा's picture

12 Nov 2015 - 3:48 pm | टवाळ कार्टा

कथा ओळखीची वाट्ली...आम्चे एक मिपाकर मित्र असेच गावाहून मुंबैत आले....इथे येउन हिर्व्या नोटांच्या देशात गेले...पण सकाळी पाण्याऐवजी कागद मिळाला म्हणून खट्टू झाले =))

सानिकास्वप्निल's picture

12 Nov 2015 - 6:15 pm | सानिकास्वप्निल

छान आहे कथा, चित्रही समर्पक.

कैलासवासी सोन्याबापु's picture

12 Nov 2015 - 9:09 pm | कैलासवासी सोन्याबापु

स्वतः एक लहान गावातुन आल्यामुळे लगेच भिडली अन जाणवली भाऊ ही गोष्ट! अफाट लिहिली आहे तुम्ही

नाखु's picture

16 Nov 2015 - 11:52 am | नाखु

गांवकरी नाखुस

मुक्त विहारि's picture

13 Nov 2015 - 5:23 pm | मुक्त विहारि

आवडली...

बाबा योगिराज's picture

13 Nov 2015 - 11:40 pm | बाबा योगिराज

काय मस्त गान आहे. वाह.
भेष्ट कथा. सोबतिला भेष्ट गाण.

सस्नेह's picture

14 Nov 2015 - 8:37 pm | सस्नेह

कथा आणि चित्र दोन्ही छान. छोट्या घटनेतून मोठी गोष्ट व्यक्त करण्याची हातोटी आवडली.

वेल्लाभट's picture

16 Nov 2015 - 11:12 am | वेल्लाभट

सर्व वाचक व प्रतिसादकांचे मनापासून आभार
आणि संपादक व अंकाशी संबंधित सगळ्यांचेही. :)

सौन्दर्य's picture

27 Nov 2015 - 8:49 am | सौन्दर्य

आधी संजयची काही फरपट होते की काय असे वाटत होते पण बदलत्या आयुष्याशी त्याचे जुळवून घेणे आवडले.