आता कुठला गड करावा ह्यावर माझ आणि बायकोच खलबत चालू होत. बायकोने सहज विचारलं "माथेरान जवळच्या विकटगड करायचा का?" म्हटलं ठीक आहे बघूया झेपतो का, विकटगड करायचा म्हणून गुगल बाबाला म्हटलं जर माहिती द्या तर एक इमेज आली त्यात शिवशौर्य ट्रेकर्स १३ सप्टेंबर ला ह्या गडाच्या ट्रेकच आयोजन करताहेत असा कळाल. त्यांची डिटेल बघितली तर ते ट्रेन ने जाणार येणार होते, तो खर्च सहभागी होणार्या सभासदाने करायचा होता, दुपारचे जेवण आणायला सांगितले होते आणि सकाळी त्यांच्या कडून देण्यात येणाऱ्या चहा आणि नाश्त्याचा खर्च म्हणून १०० रुपये फक्त त्यांच्या कडे जमा करायचे होते.
म्हटलं खुपच कमी बजेट मध्ये होतोय हा ट्रेक, बायकोला विचारलं तर ती म्हणाली आतापर्यंत दोघेच फिरतोय बघुया ह्या ग्रुप बरोबर जाऊन. नवीन अनुभव. मग ह्या ग्रुपच्या ट्रेक लीडरचा फोन नंबर त्या इमेज मधेच होता त्यावर फोन करून डिटेल माहिती विचारली आणि आमच्या दोघांच नाव रजिस्टर केलं. विकटगड पेबचा किल्ला म्हणून देखील ओळखला जातो.
१२ सप्टेंबर ला शेवटची कर्जत लोकल पकडून नेरळ स्टेशन ला उतरलो, तिथे शिव शौर्य ट्रेकर्स चे सर्वजण भेटले. ट्रेक लीडर ने दुसर्या दिवसाचा प्लान सांगितला आणि झोपायला सांगितलं मग मिनी ट्रेन च्या प्लेटफोर्म वर पेपर पसरून झोपी गेलो.
सकाळी ५लाच विविध पक्षांच्या आवाजाने जाग आली, फ्रेश होवून रेडी होताच ट्रेक लीडर ने ट्रेक ला सुरुवात करायची घोषणा केली. मग एका टपरीवर चहा आणि स्यान्डवीच खाऊन ट्रेक ला सुरुवात केली.
ट्रेक च्या सुरुवातीला एका गावातून जाताना एक छान दृश्य दिसलं लगेच क्लिक केल.
वातावरण खूप छान होत, चालायला मजा येत होती. एका ठिकाणी शेताच्या बांधावरून चालताना एका मुलाचा पाय घसरला आणि तो चिखलात पडला लगेच ग्रुपच्या बाकी सदस्यांनी गणपती बाप्पाचा जयघोष केला. कोणी घसरून पडल की त्यांचा हाच जयघोष चालू होता आणि आता त्या जयघोषात आम्ही पण सहभागी झालो होतो.
ट्रेक लीडरने एका डोंगरावरच मंदिर दाखवलं आणि बोलला आपल्याला तिथे जायचं आहे. खाली जमिनीवरून त्या डोंगराच्या वर मुंगी एवढ ते मंदिर दिसत होत. मनात म्हटलं हा ट्रेक छान होणार आहे.
जस जस उंचावर जात होतो तस तसं वातावरण थंड आणि धुक्याचा पडदा दाट होत होता. बरेच चालून गेल्यावर, थकून दमल्यावर एका सपाट पठारावर सर्वजण बसले. तिथे ग्रुपच्या सर्व मेंबर शी ओळख परेड झाली. सर्वांनी स्वताबद्दल थोडक्यात माहिती सांगायची होती. अमित मेंगळे जो ह्या शिवशौर्य ट्रेकर्स संस्थेचा अध्यक्ष आहे, तो स्वतःच्या मुलीला पण घेऊन आला होता. तिचा हा २२ वा ट्रेक होता, विकटगड ला ती दुसर्यांदा आली होती आणि महत्वाच म्हणजे ही छोटी फक्त दुसरीत होती. अजून एक छोटा जो इयत्ता मोठा शिशु मध्ये होता.
थोड्या विश्रांतीने ताजेतवाने होऊन परत चालायला सुरुवात केली. ४ मुलांचा ग्रुप होता जो फक्त त्यांचे स्वतःचे "सेल्फी/ग्रूपी" म्हणता येतील असे प्रत्येक ठिकाणी जाऊन फोटो काढत होते. किमान दर पाच मिनिटाला एकतरी ग्रुप फोटो हवा या नियमाने ते फोटो काढत सुटले होते. बर त्यांनी इतर परिसराचे फोटो काढले म्हणावे तर ते पण नाही फक्त स्वतःचेच हे त्यांचे फोटो पाहिल्यावर कळाल. वाटल होत त्यांना सांगाव बाबांनो जरा या सुंदर जागेचा पण आस्वाद घ्या पण शब्द आपल्यापाशीच ठेवून चालत राहिलो.
एका ठिकाणी थोडा कठीण रॉक प्याच होता, कठीण या करता कारण वरती ओढताना दोन दगडात असलेली जागा खूप कमी होती जेणेकरून स्वताला वरती ओढायला खूप जोर लावावा लागत होता. ग्रुप मधले बारीक अंगकाठी असलेले लगेच वरती गेले आता अस्मादिकांचा ८९ किलोचा देह वरती कसा न्यावा या विचारात असताना ग्रुप मधला सौरभ धावून आला. म्हटलं याने हात देताना आपण वरती जाण्या ऐवजी हा खाली येउ नये. त्याने हात दिला, मग दगडाच्या खाचेत घट्ट पाय अडकवून जोर लावला आणि एकदाचा वरती गेलो. परत पदयात्रा चालू, जागोजागी अननसाची लावलेली झाडे दिसली.
प्रत्येकाचे ठिकठिकाणी थांबून वेगवेगळ्या पोज मध्ये फोटो सेशन चालू होते. मनात म्हटलं अरे अंगातून घामाच्या धारा वाहत असताना फोटो कसले काढताय. एका ठिकाणी पोहोचलो तर खालची पायवाटच सापडेना. समोर थोड्या अंतरावर भगवा झेंडा दिसत होता पण पायवाट काही सापडेना. आता म्हटलं ट्रेक लीडर साठी थांबाव तर तो मागच्या सदस्यांना रोप लावून रॉक प्याच मधून वर घेत होता. "अरे पुस्तक काय असच आणल आहेस का त्यात बघ ना" इति बायको. ट्रेक क्षितीज च्या गोवेकरांनी लिहिलेलं "नकाशातून दुर्गभ्रमंती" विकत घेतलं होत ते काढल आणि नकाशा पाहू लागलो तस रावणाला दहा डोकी यावी तशी माझ्या डोक्याला दहा डोकी चिकटली. "अरे हा काय झेंडा आणि खालून जातेय वाट, काय रे तू पण. इतका वेळ पुस्तक नाय काढता आल का?" असा माझा उद्धार करून परत चिकटलेली डोकी अलग झाली.
सापडलेल्या पायवाटेवरून गुहेपर्यंत पोहोचलो. आतमध्ये काही महाभागांनी आपली नाव लिहून ठेवली होती. माझ पुस्तक आणि मी एव्हाना प्रसिद्ध झालो होतो, जो तो पुस्तक घेऊन त्यात असणाऱ्या विविध गडांची माहिती आणि नकाशे बघू लागले. हे पुस्तक खूप छान प्रकारे गोवेकरांनी लिहिलेलं आहे. २५० गडांची संक्षिप्त माहिती, सारे गड किल्ले कितीतरी वेळा फिरून बनवलेले नकाशे, त्या गडावर असणार्या वास्तूंची यादी, प्रत्येक वास्तूसाठी विशिष्ट चिन्ह जेणेकरून ती वास्तू लगेच ओळखता यावी. या पुस्तकाची कुठल्या गडावर काय पाहावे कुठे पाहावे यासाठी खूप मदत झाली. मी केलेल्या प्रत्येक गडाच्या पुढे टिक मार्क करून ट्रेक केलेली तारीख लिहिलेली होती त्यावरून काहीजण प्रश्न विचारत होते.
पुढेच लोखंडी शिडी लागली. ती शिडी पाहूनच मनात धडकी भरली होती. सुधागड ची आठवण झाली.
विकटगडावरील शिडी
सुधागडावरील शिडी
आम्ही जाताना समाधी मंदिराच्या इथून न जाता एका शोर्टकटने डायरेक्ट दत्त पादूका असलेल्या मंदिरात पोहोचलो. हा ट्रेक चा शेवट असलेला गडाचा माथा.
ह्या गडाचा वापर सामान ठेवण्याकरता, धान्य साठवण्या करता करत अस ट्रेक लीडरने ओळख करून देताना सांगितलं होत. सकाळी ७ ला चालू झालेला ट्रेक १२ ला सर्वोच्च टोकावर येउन पोहोचला होता. पादुकांचे दर्शन घेऊन जेवायला बसलो. सर्वांचे डबे उघडले, काहींनी थेपले, काहींनी ब्रेड मस्का विथ सॉस आणल होत, आमच्या सोबत महाराष्ट्र पोलिस दलातले एक पोलिस होते त्यांनी तर १५/२० भाकर्या, कोलंबी, १२/१५ अंडी असा मेनू आणला होता. सर्व जेवणावर आडवा हात मारून सर्वजण मंदिराच्या बाहेर असलेल्या जागेवर आडवे झाले. वरून दिसणारे दृश्य अप्रतिम होते.
धुक्यामुळे बरेचसे फोटो गंडलेत.
हीच ती राज्ञी - अमित ची मुलगी २२ वा ट्रेक करणारी
आणि हा शार्दुल
थोड्या वेळाने आराम करून उतरायला सुरुवात केली. अमित ला सहज विचारलं वरती चढायला ५ तास आता उतरायला किती तर त्याने ५ मिनिट लागतील या आविर्भावात ४ तास सांगितलं. आता चालून चालून पाय दुखायला लागले होते तर ते दोघ छोटे मस्त खेळत मस्ती करत उतरत होते. त्या विकट गडावरून आता माथेरान च्या पठारावर जायचं होत. माथेरान ला जाणारी वाट खूप सुंदर दिसत होती.
समाधी मंदिराजवळील हनुमान रायाची मुर्ती
समाधी मंदिर
खाली उतरताना
जिथून आलो ते दत्त मंदिर
हसत मजा मस्ती करत एकदाचा ट्रेन च्या रुळाजवळ पोहोचलो. तिथून ५ मिनिटावर एका जागा होती जिथून कड्यावरच्या गणपतीच दर्शन होत होत. इतक्या जवळ येउन बाप्पाच दर्शन घेतलं नाही तर आपल्या सारखं कम नशीबवान आपणच म्हणून मग तो गणपती बघायला गेलो. एका दगडाला बाप्पाच रूप दिल होत, छान रंगवल होत. इतक्या उंचावर इतक रंगकाम करण किती कठीण असेल, बाप्पासोबत त्या कारागिरांना मनोमन हात जोडले.
मग त्या ट्रेन च्या रुळावरून चालू लागलो. चालतानाच थोडी फोटोग्राफी सुरु होती
मधेच एक धबधबा लागला मग काय मोबाईल, केमेरा आदी वस्तू ब्यागेत ठेवून त्यात मनसोक्त अंघोळ केली. सर्व शिणवटा कुठच्या कुठे पळून गेला.
बाहेर डांबरी सडकेला आल्यावर मग दोन ग्रुप पडले एक गाडी करून स्टेशन ला जाणारा आणि दुसरा चालत स्टेशनला जाणारा. एव्हाना सगळी ताकद संपली असल्याने आम्ही दुसर्या ग्रुप मध्ये गेलो, सर्वांचा निरोप घेतला आणि गाडीने स्टेशन ला आलो. माथेरान वरून स्टेशन ला यायला शेअर ट्याक्सी मिळतात, ७० रुपये प्रती मानसी. गाडीला गर्दी असेल म्हणून मग नेरळ वरून कर्जत ला रिटर्न जाऊन तिथून बसून आलो तर नेरळ स्टेशनला नेमक आमच्या डब्यात मागाहून येणारा पहिला ग्रुप चढला. तो ग्रुप पण थोड चालून दमल्यावर गाडीनेच आला होता. आता डब्यात चिवचिवाट चालू झाला. डब्यात ट्रेक बद्दलच्या गप्पा चालू झाल्या, त्यांचा पुढला ट्रेक हरिहर गड आणि कळसुबाई असणार आहे हे गप्पांमधून कळल मग काय तिथल्या तिथे पुढल्या ट्रेकच पण डन केल. घरी जाऊन गरम पाण्याने पाय शेकत ट्रेक च्या आठवणी काढत बायको सोबत गप्पा मारत बसलो.
आता पुढला ट्रेक : २३ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर, किल्ले हरिहर गड आणि कळसुबाई
थोडं अवांतर : "शिवशौर्य ट्रेक संस्था" जुलै महिन्यात पन्हाळा गड ते पावनखिंड ते विशालगड शिवाजी महाराजांची प्रतिकात्मक पालखी घेऊन जातात. ही त्यांची पूर्ण वाटचाल रात्रीच्या वेळेस असते, वीर बाजीप्रभू देशपांडे यांनी ज्या वाटेने ज्या दिवशी शिवाजी महाराजांची पालखी नेली होती त्याच वाटेने त्याच दिवशी शिवशौर्य वाले पालखी घेऊन जातात.
जगप्रवासी
प्रतिक्रिया
16 Oct 2015 - 3:15 pm | वेल्लाभट
शिवशौर्य परिचयाचे आहेत. अमित मेंगळे, शार्दुल खरपुडे दोघे खंदे शिलेदार आहेत शिवशौर्यचे. राज्ञी आमच्यासोबत राजगडला आली होती. गोड मुलगी आहे. हरिहरला जाल तेंव्हा अमितला जरूर नमस्कार सांगा माझा.
८ नोव्हेंबर ला किल्ले कुलाबा येथे दीपोत्सव आयोजित केला आहे शिवशौर्यने. अलिबागचा किल्ले कुलाबा. येथे मुक्काम असेल, दीपोत्सव असेल. इच्छुकांनी शिवशौर्यशी संपर्क साधा.
16 Oct 2015 - 12:05 pm | वेल्लाभट
विकटगड ट्रेक मस्तच झाला तुमचा. हवामान बेस्ट दिसतंय. फोटोही छान आलेत. वाह....
मिस्सिंग इट फॉर सम टाइम नाव.
16 Oct 2015 - 12:32 pm | बॅटमॅन
छान झालेला दिसतोय ट्रेक.
16 Oct 2015 - 12:40 pm | आनंदराव
छान
16 Oct 2015 - 1:25 pm | जगप्रवासी
वेल्लाभट साहेब नक्की सांगेन
16 Oct 2015 - 2:01 pm | जय२७८१
("शिवशौर्य ट्रेक संस्था" जुलै महिन्यात पन्हाळा गड ते पावनखिंड ते विशालगड शिवाजी महाराजांची प्रतिकात्मक पालखी घेऊन जातात. ही त्यांची पूर्ण वाटचाल रात्रीच्या वेळेस असते, वीर बाजीप्रभू देशपांडे यांनी ज्या वाटेने ज्या दिवशी शिवाजी महाराजांची पालखी नेली होती त्याच वाटेने त्याच दिवशी शिवशौर्य वाले पालखी घेऊन जातात.) ह्यांच्या सोबत जायला मला हि आवडेल.......
विकट गड हि छान...!
16 Oct 2015 - 3:10 pm | पद्मावति
मस्तं ट्रेक. वर्णन आणि फोटो खूप छान.
16 Oct 2015 - 3:10 pm | एस
मस्त भ्रमंती!
16 Oct 2015 - 4:15 pm | राजेंद्र मेहेंदळे
मस्त झालाय ट्रेक तुमचा...आम्ही नेरळहुन रात्री चालायला सुरुवात केली होती आणि मधेच वाट चुकलो होतो. मग जिथे होतो तिथेच थांबलो आणि ३-४ तासांनी सकाळ झाल्यावर पुढे गेलो. नंतर माथेरान ला जाउन टॅक्सीने नेरळला परतलो.
जाहीरात-पन्हाळगड-विशाळगड एक दिवसात करणारी अजुन एक संस्था जिच्याबरोबर मी २ वर्षे ट्रेक केला आहे. खाली लिंक देतोय.
http://www.misalpav.com/node/28324
16 Oct 2015 - 7:46 pm | सूड
मस्त !!
16 Oct 2015 - 7:55 pm | मुक्त विहारि
सुंदर वर्णन आणि मनोवेधक फोटो.....
16 Oct 2015 - 7:57 pm | पैसा
छान लिहिलंय आणि फोटोही आवडले.
17 Oct 2015 - 7:14 am | मांत्रिक
खूप झकास झालाय ट्रेक!
एकदा यायला आवडेल. पुन्हा जाणार असाल तर काही दिवस अगोदर व्यनी करुन कळवा.
17 Oct 2015 - 3:09 pm | बाबा योगिराज
कड्यावरच्या गणपती बाप्पाचा फ़ोटू भावला. सगळेच फ़ोटू मस्त आहेत.
लिहिलय सुद्धा छान.
पुढील प्रवसासाठी शुभेच्छा.
17 Oct 2015 - 5:25 pm | विवेकपटाईत
लेख आवडला.