स्लोवाकियामध्ये आल्यापासून इथली खाद्यसंस्कॄती, जेवणातील काही प्रमुख पदार्थ शिकायची खूप दिवसापासून इच्छा होती. ती आता पूर्ण होणार होती. फेसबुकवर Internations Bratislava ह्या नावाचा एक ग्रुप आहे. ह्या ग्रुपने २८ एप्रिलला, ब्रातिस्लावा मधे असलेल्या 'शेफ परेड" ह्या कुकिंग स्कूल मधे स्लोवाक कुकिंगचा प्रोग्रॅम आयोजित केला होता. मी ह्या ग्रुपची सदस्य असल्यामुळे मला त्याचे निमंत्रण आले होते. मी लगेचच पैसे भरुन माझी जागा निश्चित केली होती. आता मी २८ एप्रिलची वाट बघत होते.
शेफ परेड हे स्लोवाकिया मधील पहिले प्रसिद्ध कुकिंग स्कुल आहे. ह्याची सुरवात २०११ मधे झाली. इथे वेगवेगळे कार्यक्रम केले जातात. जसे नविन कुकिंग ट्रेन्डसवर व्याख्याने, वर्कशॉप्स, फिल्मिंग प्रोग्रॅम्स, कुकिंग फोटोग्राफी, टिम बिल्डींग. शेफ परेडमधे १० वेगवेगळ्या प्रांतातील व खाद्यसंस्कृतील शेफ्स तुम्हाला शिकवण्यासाठी तयार असतात. इथे तुम्ही फ्रेंच, इंडीयन, चायनीज, इटालियन, स्लोवाक पदार्थ शिकु शकता. मी खूप आतुर झाले होते उद्याच्या कार्यक्रमासाठी.
२८ एप्रिल उजाडला. क्लासची वेळ संध्याकाळी ७ ते ११ अशी होती. सकाळ पासूनच मला कार्यक्रमाचे वेध लागले होते. ऑफिस संपताच घरी जाऊन फ्रेश होऊन मी शेफ परेडच्या स्कूलमधे गेले. तिथे गेले तेव्हा बाहेरच Internations Bratislava बोर्डने स्वागत झाले.
हॉलमधे प्रवेश करताच समोर नजरेस पडतो तो मधोमध असलेला बार काऊंटर ;) Internations चा प्रमुख Diegoने वेलकम ड्रिंकने आमचे स्वागत केले. आजुबाजुला बरेच नविन चेहरे दिसत होते. मी लोकांशी बोलायला सुरवात केली. प्रत्येकजण वेगवेगळ्या देशाचे होते. कोणी रशिया, हंगेरी, ऑस्ट्रेलिया, जपान, जर्मनी, नेदरलँड्स सगळेच नविन. आम्ही एकत्र गप्पा मारत उभे होतो.
साधारण ७.१५ वाजता शेफ स्टेफन आणि शेफ माईकलने स्वतःची ओळख द्यायला सुरवात केली. स्टेफन हा मूळचा मेक्सिकोचा. २० वर्षांचा अनुभव असलेला स्टेफन, एशियन, थाई आणि मेकिस्कन कुकिंगमधे तज्ञ आहे. तर माईकल हा मुळचा स्लोव्हाकियाचाच. १० वर्षांपासुन हॉटेल ईंडस्ट्रीमधे असलेला माईकल मेडिटेरियन, फ्रेंच आणि स्लोवाक कु़किंगमधे तज्ञ आहे.
सगळ्यांची ओळख झाल्यावर स्टेफन आणि माईकलने आम्हाला समजावुन सांगायला सुरवात केली. त्यांचा हातात एक बाऊल होते आणि त्यात काही चिठ्ठ्या होत्या. प्रत्येकाला त्यातील १-१ चिठ्ठी उचलायची होती. सगळ्यांना चिठ्ठ्या मिळाल्यावर त्या उघडुन बघितल्या तर त्यावर काही अंक लिहिलेले होते. १-५ अंक होते. आम्हाला कळेना हे कसले नंबर आहेत. हॉलमधे ५ किचन काऊंटर होते. स्टेफनने सांगितले की प्रत्येक किचन काउंटरवर वेगवेगळी रेसिपी आहे. तुम्हाला जो अंक आला असेल त्या काऊंटरवर जा.
आम्ही सगळेच आपापल्या काउंटरवर गेलो. माझा नंबर होता २. आमच्या काउंटरवरची पाकृ होती - Traditional Slovak Strudel. मला ही पाकृ खुप दिवसापासुन करायची होती. आता एका प्रोफेशनल शेफच्या हाताखाली मला ती शिकायला मिळणार होती. आमच्या काउंटरवर आम्ही एकुण ५ मुली होतो. मी, केरी, लिन, मारिया आणि याना. केरी स्लोवाकियाची, लिन जपानची, मारिया रोमेनिया आणि याना युक्रेनची. आम्ही एकमेकांची ओळख करुन घेतली. टेबलवर पाकृचा कागद ठेवला होता. तो वाचायला सुरवात केली.
Strudel साठी लागणारे सगळे साहित्य आधीच टेबलवर ठेवले होते. तिथे आम्ही बघितले की रेडिमेड फ्रोझन पेस्ट्री शिट्स ठेवल्या होत्या. ते बघुन आम्ही स्टेफनला सांगितले, आम्हाला रेडिमेड शिट्स नको. आम्ही स्वतः पेस्ट्री डो बनवतो. ते ऐकुन तो पण खुश झाला. त्याने आम्हाला पँट्री मधुन मैदा आणि बटर आणायला सांगितले. एका पातेल्यात आम्ही तो मैदा आणि बटर एकत्र करायला सुरवात केली. तो निट मिक्स झाल्यावर थोडेसे दुध वापरुन पेस्ट्री डो बनवुन घेतला आणि फ्रिजमधे ठेवुन दिला.
आता आम्ही Strudel मधे भरण्यासाठी सारण बनवायला घेतले. Traditional Slovak Strudel हे काळी खसखस, मनुके, रेड चेरीज व मध वापरुन बनवले जाते. पाकृत दिल्याप्रमाणे आम्ही हे सारण बनवुन घेतले.
काळी खसखस ही पूर्व युरोपीयन लोकांच्या खाद्य पदार्थांमधे मोठ्या प्रमाणात वापरले जाते. जशी आपली पांढरी खसखस असते, तशीच थोडी अजुन बारीक आणि काळा रंग असलेली ही खसखस. हिचा सगळयात जास्त वापर गोड पदार्थांमधे केला जातो.
Strudel चे सारण बनवून झाले होते. आता आम्ही त्याचा रोल बनवण्यासाठी पेस्ट्री डोचे २ समान भाग केले आणि लाटायला सुरवात केली. मोठी पोळी लाटून झाल्यावर, त्याच्या एका बाजुला सारण पसरवले आणि त्याचा रोल केला. आता हा रोल आम्हाल बेकिंग ट्रे मधे ठेवायचा होता. स्टेफानच्या मदतीने ते कामही मार्गी लावले. Strudel ओव्हनमधे बेकिंगला ठेवून आम्ही आता फिरण्यासाठी मोकळे झालो होतो.
बाजुच्या टेबलवर बघितले तर त्यांचे Potatoes baked with rosemary तयार होते, तर Spicy beef with mushroom and cream ची तयारी चालू होती. Slovak bean soup with pasta, Plene pirohy आणि Bryndzove halusky असे वेगवेगळे पदार्थ प्रत्येक टेबलवर बनत होते.
Slovak bean soup with pasta - बीनचे सूप ज्यात smoked meat sausage, बटाटा, लसूण, गाजर, कांदा आणि तेजपत्ता ह्याचे फ्लेवर होते.
Plene pirohy म्हणजे उकडलेले मोदक. मैदा किंवा रवा व अंडे वापरुन कणिक मळली जाते. त्यात चीज किंवा जॅम भरुन उकळत्या पाण्यात टाकून पास्त्यासारखे शिजवून घेतात.
Bryndzove halusky (sheep cheese gnocchi) हा स्लोवाकियाचा सगळ्यात प्रसिद्ध पदार्थ. gnocchi बनवून ते ह्या शीप चीजच्या सॉस मधे घोळवले जातात आणि वरुन चवीसाठी smoked bacon वापरले जाते.
साधारण ३०-४० मिनिटांनी आमचे Strudel तयार झाले होते. तो पर्यंत सर्व टेबलवरचे पदार्थ सुद्धा तयार होते. सगळ्यांनाच आता खूप भुक लागली होती. स्वतःची डिश भरुन सगळेजण जेवायला बसले. गप्पांच्या नादात जेवण कधी संपले कळलेच नाही. आता सगळेजण dessert ची वाट बघत होते. आम्ही लगेच Strudel कापायला घेतले. Dessert खाउन सगळ्यांची मनं आणि पोट त्रुप्त झाले होते. :P
घड्याळ्यात बघितले तर १० वाजुन गेले होते. आता सर्वांना घरी जायचे वेध लागले होते. Diegoचा निरोप घ्यायला गेलो, तेव्हा त्याने सांगितले की २ महिन्यांनी मेक्सिकन कुकिंगचा क्लास असणारे. २ महिन्यांनी होणार्या मेक्सिकन कुकिंग क्लासचा विचार करतच आम्ही एकमेकांचे निरोप घेतले आणि घरी निघालो.
खूप छान अनुभव होता हा. ह्यातून मला काही नविन मैत्रिणीसुद्धा मिळाल्या. आता मी मेक्सिकन क्लासच्या तारखांची वाट बघतिये.
प्रतिक्रिया
16 Oct 2015 - 11:58 am | अजया
खरोखर हौशी कूक आहेस! मस्त लेख आणि फोटॊ.मजा आली वाचायला.
16 Oct 2015 - 4:50 pm | प्रीत-मोहर
+११
खूप मजा आली. तुझ्या डोळ्यानी ते सगळे पदार्थ मी ही बघितले. (केले नाही एक साधी गोष्ट जमुदे आधी मला मग केले तला क उच्चारेन!!)
16 Oct 2015 - 7:42 pm | सानिकास्वप्निल
मृ अप्रतिम अनुभव गं, लकी गर्ल !!
अशी शेफ परेड अटेंड करायला मी एका पायावर तयार आहे ;)
वाचताना मजा आली, फोटो पण काय देखणे, चविष्त टाईप्स आलेत :)
16 Oct 2015 - 9:12 pm | कविता१९७८
वाह मस्त कुकीन्ग
17 Oct 2015 - 1:21 am | स्रुजा
ही ऑसम कल्पना आहे. किती सही संधी मिळवलीस, या धर्तीवर इथे काही आहे का हे मी पण जरुर बघेन. तुझा पुर्ण लेख २ दा वाचुन काढला, मस्त च झालाय.
17 Oct 2015 - 11:20 am | अनन्न्या
वाचायला मजा आली खूप, खरच लकी आहेस तू आणि हौशी पण! मेक्सिकनची वाट पाहतोय गं.
18 Oct 2015 - 4:18 am | मधुरा देशपांडे
किती छान अनुभव. तुझ्या आवडत्या पाककलेला तर असे प्रोग्राम्स म्हणजे पर्वणीच.
इथे एकदा अशाच एका बेकिंग कोर्ससाठी मी आणि काही मैत्रिणिंनी नाव नोंदवले. चार दिवस आधी त्यांचा फोन आला की लोक नाहीयेत जास्त सो कॅन्सल करतोय. भयंकर चिडचिड झाली होती ते आठवले.
18 Oct 2015 - 8:35 pm | पैसा
खूप छान आयडिया आहेत! तुझ्यासारख्या सुगरणीला तर ही खूप छान संधी आहे!
18 Oct 2015 - 9:50 pm | एस
वा! तुमच्यासारख्या सिद्धहस्त सुगरणीला ही पर्वणीच वाटली असणार यात शंका नाही! मस्त लेख.
19 Oct 2015 - 9:54 am | गिरकी
मलापण बोलवा रे कुणीतरी शेफ परेडला …
19 Oct 2015 - 12:19 pm | मांत्रिक
मस्त लेख व अनुभव!
25 Oct 2015 - 11:18 pm | स्वाती दिनेश
शेफ परेड आवडली.
स्वाती
30 Oct 2015 - 11:40 am | उमा @ मिपा
यम्मी यम्मी यम्मी! डिशेसचे फोटो असले टेम्प्टिंग आहेत.
किती हौशी आहेस तू! ऑफिसमधून येऊन पुन्हा हे सगळं करायला जायचं. त्याबद्दल तुझं कौतुक.
लिहिलंय सुद्धा खूप छान.
3 Nov 2015 - 10:13 pm | Maharani
मस्त लेख.छान अनुभव..