पिझ्झाची गोष्ट

अजया's picture
अजया in रूची विशेषांक
15 Oct 2015 - 5:56 pm

मला आणि माझ्या लेकाला नॅशनल जिओग्राफिकवरचे फूड हिस्टरीवरचे कार्यक्रम बघायला खूप आवडतात. मध्ये एक कार्यक्रम बघताना रोचक शोध लागला की पिझ्झा हा जगात सर्वाधिक खाल्ले जाणार्‍या पदार्थांमध्ये मोडतो! अमेरिकेत तर म्हणे दर तिसरा मनुष्य पिझ्झा खात असतो. मुळातला इटालियन पदार्थ अमेरिकेत जाऊन कसा बरं एवढा प्रसिद्ध झाला याचे कुतूहल वाटून पिझ्झा काय "चीज" आहे बघुया तरी. म्हणून पिझ्झाचा इतिहास शोधायला घेतला आणि साकार झाली ही पिझ्झाची गोष्ट.

तसा पिझ्झाच्या चपट्या ब्रेडचा प्रकार फार जुना. अगदी सात हजार वर्षांपूर्वी देखील भाजलेले ब्रेड संशोधकांना मिळालेले आहेत. इटलीतल्या पोंम्पे शहरात तर दोन हजार वर्ष जुन्या लाकडाच्या भट्ट्या अजूनही दिसतात. प्राचीन ग्रीक लोक प्लाकोउस नावाचा ब्रेड, त्यावर कांदा, लसूण आणि हर्ब़्ज घालून खात असत. हा ब्रेड पिझ्झाचा जनक मानला जातो! तरी पिझ्झाला खरी ओळख मिळाली ती इटलीतल्या नेपल्समध्ये!

इसपूर्व ६००च्या आसपास नेपल्स हे समुद्र किनार्‍यावरचे एक भरभराटीला आलेले संस्थानच होते. इथे बंदर असल्याने काहीतरी काम मिळेल या आशेने अनेक गरीब लोक नेपल्सला येऊन रहात. नेपल्स अशा गरीब, बेघर लोकांचे गाव म्हणूनच प्रसिद्ध होते. या लोकांना पटपट खाणे संपवून कामावर जाता येईल अशा स्वस्त आणि मस्त अन्नाची गरज असे. गरज ही शोधाची जननी या न्यायाने तिथे अनेक फेरीवाले, छोटे हॉटेलवाले चपट्या ब्रेडवर निरनिराळे पदार्थ घालून त्याला चविष्ट बनवून विकत असत. या कळकट हाटीलात खाल्ल्या जाणार्‍या गरीबांच्या या पदार्थाची त्या काळात कुचेष्टाच होत असे.

कालांतराने कोलंबसाच्या अमेरीकावारीमुळे इटलीत टोमॅटो खर्‍या अर्थाने प्रवेशला. उच्चभ्रू लोकांनी त्याला विषारी फळ म्हणून नाकारले तरी गरीबांना मात्र ते फार आवडले. त्यामुळे पिझ्झा ब्रेडवर टोमॅटोचा सढळ हस्ते वापर होऊ लागला. एव्हाना टोमॅटो, चीज, ऑलिव्ह ऑइल आणि अ‍ॅन्चोवीज यांची पखरण असणारा पिझ्झा नेपल्समधला प्रसिद्ध खाद्य पदार्थ झाला होता. त्यात १८६१मध्ये इटलीचे एकत्रीकरण झाले. नेपल्स आता इटली देशाचा एक भाग झाले. १८८९ मध्ये त्यावेळचा इटलीचा राजा उम्बर्टो आणि राणी मार्गारिटा, इटली भ्रमण करता करता नेपल्सला आले. आत्तापर्यंतच्या प्रवासात त्यावेळची डेलिकसी असणारे फ्रेंच खाद्यपदार्थ खाऊन कंटाळलेल्या राणीने पिझ्झा खाऊन बघायचे ठरवले. आले राणीच्या मना तेथे कोणाचे चालेना! मग त्यावेळचा प्रसिद्ध पिझ्झानिर्माता एस्पोसितोला राणीसाठी पिझ्झाचे निरनिराळे प्रकार बनवायची ऑर्डर दिली गेली. त्या सर्वातला राणीला भावला तो इटलीच्या राष्ट्रध्वजाचे रंग असणारा पिझ्झा. यात लाल टोमॅटो, पांढरे चीज आणि बेसिलची पानं वापरली होती. राणीला आवडलेला पिझ्झा म्हणून या पिझ्झाला पिझ्झा मार्गारिटा हेच नाव पडले!

.

अशा रीतीने राणीचा आशिर्वाद मिळाल्याने पिझ्झा की तो चल पडी! इटलीच्या निरनिराळ्या भागात तिथल्या वैशिष्ट्यानुसार पिझ्झा बनायला लागले.अजूनही तिथल्या स्थानिक वैशिष्ट्यासह बनतात. पिझ्झा मरिनारा हा एक लोकप्रिय पिझ्झाचा प्रकार. हाही नेपल्सचाच एक पारंपारिक पिझ्झा. याचे नाव मरिनारा पडायचे पण एक कारण आहे. हा पिझ्झा खलाशांच्या बायका, त्यांचे नवरे मासेमारी करून दमून घरी आले की त्यांच्यासाठी बनवायच्या! यात ओरिगॅनो, अ‍ॅन्चोवीज आणि लसूण वापरलेला असतो.

.

कॅप्रीच्या पिझ्झामध्ये मश्रुम, ऑलीव्ह्ज, उकडलेले अंडे वापरले जाते.

.

तर सिसिलीच्या पिझ्झामध्ये हिरवे ऑलिव्ह्ज, सी-फूड, वाटाणे, अंडी वापरली जातात.
.

अश्या या बहूढंगी पदार्थाची ख्याती महायुद्धापर्यंत तरी इटलीपुरतीच मर्यादित होती. मात्र महायुद्धाच्या आसपास आणि नंतर इटालियन लोक मोठ्या प्रमाणात अमेरीकेत स्थलांतरित होऊ लागले. गरीब नेपल्सवासियांना अमेरीकेतल्या कारखान्यांमध्ये नोकर्‍या मिळू लागल्या. स्थिरस्थावर झाल्यावर त्यांना आपल्या लाडक्या खमंग पिझ्झाची आठ्वण येऊ लागली. मग हळूहळू तिथेच बिनापरवाना पिझ्झेरिया सुरू होउ लागले! मॅनहॅटनमध्ये १९०५साली लोम्बार्डीजचा पहिला अधिकृत पिझ्झेरिया सुरू झाला. मात्र अमेरिकन लोक पिझ्झाला फास्ट फूड म्हणूनच बघायला लागले आणि पिझ्झा मध्ये खास अमेरीकन बदल होऊ लागले. फक्त ऑलिव्ह, चीज, टोमॅटो असणार्‍या पिझ्झावर चिकन, अंडी, सलामी ते स्मोक्ड सामन अशी टॉपिन्ग्ज येऊ लागली. पिझ्झाने अमेरीकेला वेड लावले. इतके की पिझ्झा हा इटलीतला पदार्थ हे विसरून अमेरिकनच झाला!

.

.

.

इटलीत मात्र आता पारंपारिक पिझ्झाच्या बनवण्याच्या पद्धतीचे युरो सर्टिफिकेशन झाले आहे. २०१० पासून नेपल्सच्या पिझ्झाला STG हे युरोपियन युनियनकडून मानांकन मिळालंय. STG चा अर्थ पारंपारिक पद्धतीची गॅरेंटी असणारा पिझ्झा. या प्रकाराने पिझ्झा बनवण्याचे साहित्य, कृती हे सर्व आता कायद्याने नियंत्रित झाले आहे. त्याच प्रमाणे आता या पिझ्झासाठी ठराविक कणीक वापरली जाते, मळली जाते. त्याचा आकारही ठराविक असतो. हा पिझ्झा लाकडाच्या भट्टीतच भाजला जातो. अशा प्रकारे नियंत्रण आणून जुनी चव जपण्याचा प्रयत्न होतोय. नेपल्समध्ये STG नामांकन असलेल्या पिझ्झेरियात पिझ्झाचा स्वाद जरूर घ्यावा.

.

एकीकडे असे नियंत्रित पिझ्झे बनत आहेत तर दुसरीकडे पिझ्झा हट, डॉमिनोज, पापा जोन्स सारख्या पिझ्झा दुकानांच्या साखळ्या जगभरात पसरत आहेत, जे अर्ध्या तासात पिझ्झा हातात आणून द्यायला लागले आहेत. पिझ्झाला खरेखूरे वर्ल्डफूड बनवण्यात या साखळ्यांचा मोठ्ठा वाटा आहे.

.

तर अशी ही गरीबाचे अन्न म्हणून खाल्ले जाऊ लागलेल्या ते आताचे महागडे अन्न बनलेल्या पिझ्झाची शुक्रवारची कहाणी! सुफळ संपूर्ण!

( या लेखातील सर्व प्रचि आंतरजालावरून साभार )

प्रतिक्रिया

कविता१९७८'s picture

16 Oct 2015 - 11:52 am | कविता१९७८

वाह मस्त माहीती, पिझ्झा आवडतो पण खुप कमी खाते , भरपुर चीज असत ना

मीता's picture

16 Oct 2015 - 11:57 am | मीता

मस्त माहिती ताई.

जिन्गल बेल's picture

16 Oct 2015 - 1:20 pm | जिन्गल बेल

धन्यवाद...रुचकर पिझ्झाची अतिरुचाकार माहिती आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्धल!!! :)
संपूर्ण अंकासाठी खूप आभार अजयाताइ...:)

प्रीत-मोहर's picture

16 Oct 2015 - 3:59 pm | प्रीत-मोहर

पिझ्झ्याच्या माहितीसाठी धन्स बरका अजायातै

इशा१२३'s picture

16 Oct 2015 - 10:33 pm | इशा१२३

पिझ्झा फारसा आवडत नाहि.पण इतिहास मात्र रोचक आहे.
धन्यवाद अजया रंजकतेने लिहिले आहेस.

प्रचेतस's picture

17 Oct 2015 - 9:10 am | प्रचेतस

आता आज पिझ्झा खाणे आले.

वा! पिझ्झा खरेतर टॉपिंग विरहीत असतो ना? टॉपिंग ही अमेरिकन पद्धत आहे असे मिपावरच कुठेतरी वाचले होते.

मधुरा देशपांडे's picture

18 Oct 2015 - 4:14 am | मधुरा देशपांडे

पिझ्झागोष्ट आवडली.

पैसा's picture

18 Oct 2015 - 10:03 pm | पैसा

मस्त कहाणी!

सामान्य वाचक's picture

18 Oct 2015 - 10:29 pm | सामान्य वाचक

पण इतिहास इंटेरेस्टिंग

आपली मिसळ कधी मिसळ महाराणी होईल

अहाहा … थिन क्रस्ट वूड फायर बेक्ड … आज खायलाच पाहिजे आता !

मांत्रिक's picture

19 Oct 2015 - 12:37 pm | मांत्रिक

अगदी रोचक इतिहास मोजक्या शब्दांत मांडलाय. फोटोज देखील छान आहेत.

मस्त रोचक माहिती..आता पिझ्झा खाणे आले..

वेल्लाभट's picture

19 Oct 2015 - 6:01 pm | वेल्लाभट

उत्तम माहिती ! ! !
असंच काहीसं भारतात पावभाजीचं झालं. कामगारांचं खाणं, आज काय पॉप्लर झालंय... मुंबईची ओळख झालंय.

सानिकास्वप्निल's picture

19 Oct 2015 - 8:40 pm | सानिकास्वप्निल

माहितीपूर्ण गोष्ट सांगितलीयेस पिझ्झाची. पिझ्झा खूप आवडतो पण त्या मागचा इतिहास, माहिती या लेखामुळे समजली.
लेख आवडला, फोटो ही मस्तं.

ताई पिझ्झाची गोष्ट आवडली. तशी आधी ऐकली होती, पण परत तुझ्या स्टाईल मधे वाचायला आवडली. मला स्वतःला अमेरिकन जाड्या बेसवाला पिझ्झा अजिबात आवडत नाही. नुसता ब्रेड खातोय असे वाटते. हा ओरिजिनल इटालीयन थीन क्रस्ट पिझ्झाच आवडतो.

आतापर्यंत पिझ्झा खाण्याचं माहीत होतं पण त्या पिझ्झ्यामागील इतिहास मात्र आज तुझ्यामुळे कळला.
धँस अजयाताई!

बोका-ए-आझम's picture

22 Oct 2015 - 9:02 pm | बोका-ए-आझम

आता नुसता लोकप्रिय नाही तर जीवनशैली बनायला लागला आहे. त्याचा इतिहास माहित नव्हता.तो पिझ्झ्यासारख्याच खुसखुशीत शैलीत सांगितल्याबद्दल धन्यवाद!

अनन्न्या's picture

23 Oct 2015 - 6:38 pm | अनन्न्या

थोड्याच दिवसांपूर्वी रत्नागिरीत डॉमिनोज चालू झालेय. पिझ्झा खूप आवडतो, पण घरीच केला जातो.

स्वाती दिनेश's picture

23 Oct 2015 - 9:05 pm | स्वाती दिनेश

'कहाणी पिझ्झाची' आवडली..
मला स्वतःला इटालीमधले रोम आणि फ्लेरेन्सचे पिझ्झा आवडतात. आमच्या फ्राफुतही इटालियन फॅमिलींनी चालवलेले पिझ्झेरिया आहेत त्यातील काही आवडती आणि नेहमीची ठिकाणे झाली आहेत. आपल्याकडे कसं मद्रासी सांबार वेगळं, हैदराबादचं वेगळं तर कर्नाटकातलं अजून वेगळ्या चवीचं तसंच काहीसं पिझ्झाचंही आहे. वेगवेगळ्या प्रांतातला पिझ्झा वेगवेगळ्या पध्दतींनी केला जातो. अमेरिकन वे ऑफ पिझा आणखीनच वेगळा तर भारतातला पिझ्झा आपले मसाले लेवून येतो.
स्वाती

पद्मावति's picture

24 Oct 2015 - 8:46 pm | पद्मावति

रुचकर लेख. पिझा मार्गरीटाची कहाणी मस्तं आहे. पिझाचा इतका इतिहास माहीत नव्हता. खूप छान लेख. आवडला.

नूतन सावंत's picture

24 Oct 2015 - 10:18 pm | नूतन सावंत

अजया,अंकाच्या जबाबदारीतून वेळ काढून लिहिलेली पित्झाची कथा सुरेखच आहे.

अगदी !! मस्त झालीये पिझ्झा ची कहाणी ...

पिझ्झा मार्गारिटा नावामागची कहाणी आवडली. एस टी जी मानांकन असल्याचे आधी नवल वाटले पण चवीची जपणुक करण्याचा उद्देश आवडला. याआधी फक्त स्थळे, कागदपत्रे, वस्तू यांच्या जपणुकीच्याच कथा ऐकल्या होत्या.

विशाखा पाटील's picture

28 Oct 2015 - 11:43 am | विशाखा पाटील

आवडत्या पिझ्झाची कथा आवडली...

उमा @ मिपा's picture

30 Oct 2015 - 11:31 am | उमा @ मिपा

मस्तच गोष्ट! तशी ही माहिती थोडीफार ठाऊक होती पण तुझी गोष्ट सांगण्याची, लिहिण्याची पद्धत खासच असल्याने वाचताना मज्जा आली.
पिझ्झा मला विशेष आवडत नाही पण मुलांना खूप आवडतो त्यामुळे दीपकभाऊंच्या रेसिपिनुसार छोटे ब्रेड पिझ्झा आवर्जून बनवते. आता ही गोष्ट स्वरूपातली माहिती पण मुलांना नक्की सांगणार.