नमस्कार मंडळी!! झाले का जेवण? टाकलीत का सुपारी तोंडात?
मस्त सणावाराचे दिवस आहेत. काही ना काही निमित्ताने रोज गोडधोड खाल्ले जातंय. मग ते पचायला सुगंधी चविष्ट पान वा सुपारी हवीच की!
सुरेख पदार्थांनी भरलेल ताट त्याचा आस्वाद घेत घेत केलेले तुडुंब जेवण त्यावर तोंडात टाकायला तांबूल किंवा छानशी सुपारी, सूखच!
असे कितीहि छान जेवणानंतर पोट भरले तरी आठवण येते ती मुखवासाची. मुखवास म्हणजे जेवणानंतर पचनासाठी खाल्ली जाणारी सुपारी, तांबूल. आपल्याकडे अनेकविध प्रकारचे तांबूल, सुपार्या, सुकामेवे खायची परंपरा फार जुनी. अगदी ऐतिहासिक, पौराणिक काळात याचे उल्लेख आढळतात. राजे, महाराजे, सरदार लोकांकडे पान सुपारीचा सुरेख सरंजाम असायचाच. सुंदर नक्षीदार पानाचे डबे, चुन्याच्या डब्या, अडकित्ते सोन्याचांदीचे नाजूक वेलबुट्टी असलेले. सहज म्हणून तोंडात टाकले जाणारे वेलदोडा, केशर. आव्हानाचे विडे, निरोपाचे विडे एक एक वर्णन एकुणच थाटमाट! आता गेला तो काळ पण आवड तर आहेच.
अर्थात आपल्यालाच काय देवालाही नैवेद्याच्या ताटाबरोबर तांबूल लागतो. छान भात, भा़ज्या, पोळी, गोडधोड असलेल्या ताटाबरोबर सुबक हिरवागार गोविंद विडा ठेवला की कसे परिपूर्ण वाटते ताट. माहुरच्या देवीला तर तांबूलाचा
नैवेद्य नित्याचाच.
रोज अगदी विडा नाहीतरी सुपारी, बडिशेप, लवंग, वेलदोडा काहीतरी तोंडात टाकायची सवय असतेच. लहानपणी तर या पानाचे भयंकर आकर्षण वाटायचे. मोठी मंडळी पान खाल्ले कि आपणही पान खाउन ओठ लाल लालचुटुक करून आरशात पहावेसे वाटायचे. मग आईच्या मागे लागुन एक तुकडा का होईना विड्याचा मिळवायचाच. मग ते लाल ओठ पुन्हा पुन्हा आरशात पहायचे अन एकमेकाना दाखवायचे. त्या नादात तो लाल मुखरस फ्रॉकवर पडला कि तोंडाबरोबर पाठही लाल व्हायची. तरी हौस कमी व्हायची नाहीच.
सुपारी वा तांबूल खरा खायचा तो पाचक म्हणुन. छान चावुन,चघळुन खाल्लेला मुखवास मुखात लाळ सुटून पचनाला मदत करतो शिवाय तोंडाला सुगंध येतो ते वेगळच. त्यात वापरलेल्या पदार्थांतील औषधी गुणामुळे पचनाला मदत होते. पानातहि किती विविध प्रकार. मघई, कलकत्ता, बनारसी अशी आपापली खासियत असणारी. सिनेमाच्या गाण्यातही लोकप्रिय झालेली.
यातील जुना प्रसिद्ध प्रकार म्हणजे त्रयोदशीगुणी विडा. तेरा विविध पदार्थांनी युक्त असा...
एला लवंग कर्पुर कस्तुरी केसरादिभि|
जाती फलदलै: पूगै: लागल्यूषणनागरै:|
चुर्णे खदिरसारैश्च युक्ता कर्पूरवीटिका||
अर्थात नागवेलीच्या उत्तम पानात सुपारी,पांढरा कात, लवंगा, जायफळ, केशर, खोबरे, कापूर, कंकोळ, जायपत्री, वेलदोडा, बदाम, कस्तुरी, चुना, असे तेरा पदार्थ वापरून हा विडा करतात.
पहा बरं किती औषधी, सुगंधी जिन्नस वापरून विडा केला जातो. असा विडा सुगंधी, चविष्ट असणारच. रोज काही असा साग्रसंगीत विडा शक्यच नाही. मग आपला साधं पान, चुना, कात, सुपारी, बडिशेप, लवंग, वेलदोडा वापरून केलेला विडाही छान लागतो. आता यातही गुलकंद घालुन कधी चॉकलेट सिरप मधे बुडवुन खाल्ले जाते. शेवटी आवड ज्याची त्याची.
आता असा विडा खूप माणसं जेवायला असली तर घरी एक एक करत बसणं वेळखाऊ. काही खास प्रसंगी, गोडधोड खाऊन झाले की माझी आजी छान कुटलेला तांबूल करायची. काही पुजेसाठी आणलेली जास्तीची पानं बहुदा उपयोगात आणली जायची.
तांबूल
साहित्यः
विड्याची पाने: १२
कुटलेली मसाला सुपारी: ५-६ चमचे
चुना
कात गोळ्या: बारीक गोळ्या प्रत्येक पानाला २
ओला नारळ खवलेला: १/२ वाटि
वेलदोडा: ६
लवंगा: ४
केशर : चिमुटभर
गुलकंद: १ मोठा चमचा
पान स्वछ धुवुन घेउन डेख काढुन टाकायची.प्रत्येक पानाला चुन्याचे बोट लावुन घ्यायचे म्हणजे अंदा़ज चुकत नाही.
आता ही पानं व वरील सर्व जिन्नस एकत्र करून मिक्सरवर वाटुन घ्यायचे. तांबूल तयार.
हा सुवासिक तांबूल फ्रिजमधे ४ दिवस छान टिकतो आणि चवीलाही छान लागतो.
आता रोज विडा,पान खाणे शक्य नसल्याने घरीच यातील काही पदार्थ वापरून कुटलेली मसाला सुपारी केलेली बरी.
मी करते ती सुपारी अशी.
मसाला सुपारी
साहित्यः
बडिशेप २०० ग्रॅम
धनाडाळ ५० ग्रॅम
ओवा: २ चमचे
लवंगः १०-१२
वेलदोडा: १०-१२
तीळः २ चमचे
जेष्ठमध पुडः ५० ग्रॅम
शेंदेलोणः १चमचा
पादेलोणः१ चमचा
सुके खोबरे:१/२ वाटि
यातील सगळे साहित्य (जेष्ठमध पावडर,शेंदेलोण,पादेलोण सोडुन)छान भाजुन घ्यावे.आता सगळे नीट एकत्र करून मिक्सरवर बारीक करून घ्यावे.
या सुपारीत वा मुखवासात सुपारी वापरलेली नाहिये, मात्र बाकीचे सगळे पदार्थ पाचक अन सुगंधी. सुपारी नसल्याने छोटी मुलंही खाऊ शकतात.
यातच खसखस व बाळंतशोपा घातला की बाळंतिणीला उपयुक्त सुपारी तयार. चवही छान लागते. रोजच्या जेवणानंतर लहानमोठ्याना चालणारी ही सुपारी.
पण उपासाच्या दिवशीचं काय? काय ते चार पदार्थ साबुदाण्याची खिचडी,भगर आमटी,रताळी खिस,बटाटाभाजी,कोशिंबीर,गोड चकत्या,खिर,पापड पापड्या एवढंसं जरी केलं(नाहीतर कशाला करायचा उपास)तरी ते पचायला पाचक हवेच ना! तर त्यासाठी आहे ना आवळा सुपारी अन जिरा गोळी.
आवळा सुपारी
छायाचित्र आंजावरुन साभार
साहित्यः
आवळे:पाव किलो
जिरेपूडः१ चमचा
मीठः चवीपुरते
लिंबाचा रसः२ चमचे
आले तुकडा:एक मोठा
प्रथम आवळे किसणीवर किसुन घ्यावेत.आले किसुन घ्यावे.नंतर त्यात मीठ,लिंबुरस जिरेपूड घालुन कालवावे व उन्हात वाळवावे.मुलंही आवडीने खातात.
आवळा अतिशय औषधी आणि गुणकारी, पचनास उपयुक्त आणि उपासाला चालणारा.
आमसुल-जिरा गोळी
साहित्यः
आमसुलः२०-२५
मीठ :चवीनुसार
जिरे:१ चमचा
साखर: १चमचा
आमसुलं किंचित पाण्यात भिजवुन घ्यावीत.मिक्सरमधे सर्व एकत्र वाटुन घ्यावे. थोडे चिकट झाल्यावर काढुन हातावर गोळ्या कराव्यात.एक दोन दिवस वाळवुन पिठीसाखरेत घोळवुन ठेवाव्यात.
ही जिरा गोळीही लहान मुलांमधे आवडीची.
याशिवाय ऑमेगा अॅसिड्स आणि फायबर असलेली जवसाची पाचक सुपारीही माझ्या आवडीची.
जवसाचे पाचक
साहित्यः
जवस :१ वाटी
बडिशेप :१ वाटी
तीळः १/४ वाटी
खसखस:१ चमचा
ओवा:१ चमचा
जेष्ठमध पूडः १चमचा
सैंधव :१/२ चमचा
आता हे जवस, बडिशेप खमंग भाजुन घ्यावी.खसखस,तीळ मंद आचेवर छान गुलाबी भाजावेत.ओवा भाजावा. सर्व साहित्य एकत्र करुन त्यात सैंधव व जेष्ठमध पूड मिसळावे आणि बरणीत भरावे.
ही सुपारी अशीच चावुन खायला चांगली. बारीक पूड करायची गरज नाही.
हे झाले काही सहज,सोपे घरी करता येणारे मुखवास.
बाहेर बाजारात आजकाल अनेक प्रकार मिळतात पण बहुतेक सगळे मसाला घातलेले,उग्र चवीचे अन प्रिझर्वेटिज घातलेले असा अनुभव.त्यापेक्षा घरी केलेले उत्तम.
वर दिलेले प्रकार औषधी, चविष्ट, पाचक. जेवणानंतर असे पाचक नक्कीच खावे अन तृप्तीचा ढेकर द्यावा.
प्रतिक्रिया
16 Oct 2015 - 10:36 am | अमृत
दरवर्षी अक्षय तृतीयेला तांबूल बनवायचो पात्रांसोबत ठेवायला. आमसूल जीरा गोळी बनवायचा विचार आहे. आमसूल म्हणजे कोकम काय? की सुकवलेला आंबा?
21 Oct 2015 - 10:21 pm | इशा१२३
आमसुल म्हणजे कोकम.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
16 Oct 2015 - 3:58 pm | प्रीत-मोहर
मस्त पाकृ. नक्की करेन ग
16 Oct 2015 - 10:04 pm | सानिकास्वप्निल
छान छान पाककृती आहेत मुखवासाच्या.
नक्की नक्की बनवणार मी.
फोटो देखणे आहेत इशा :)
17 Oct 2015 - 6:00 am | स्रुजा
विशेषणं संपली माझी !! किती सुरेख फोटो आहेत. आठवणींमध्ये गुंफलेला मुखवास फार आवडला. नक्की करुन बघेन , अगदी सोपं करुन सांगितलं आहेस.
17 Oct 2015 - 7:20 am | Maharani
आहा..वाचूनच चव आली तोंडाला.नक्की बनवून बघणार..
17 Oct 2015 - 6:44 pm | मधुरा देशपांडे
लेखातील पाकृ आणि फोटो, माहिती सगळेच छान. इथे मी ज्या अनेक गोष्टी मिस करते भारततल्या, त्यात विड्याचे पान, तांबुल हे यादीत फार वर आहेत. येताना @आईने बनवलेली सुपारीविना सुपारी आणते आणि ती पुरवुन पुरवुन खाते.
18 Oct 2015 - 12:12 am | पद्मावति
इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे मुखवास, सुपार्या बघून तोंडाला पाणी सुटलंय. खूप सुंदर लेख. उत्तम माहिती आणि पाककृती.
18 Oct 2015 - 5:05 pm | प्यारे१
+१११
हेच्च. असेच.
19 Oct 2015 - 10:01 am | गिरकी
या दसऱ्याला नक्की करणारच. मस्त दिसतोय हा मुखवास :)
19 Oct 2015 - 4:26 pm | वेल्लाभट
जब्बरदस्त !
20 Oct 2015 - 1:31 pm | एस
क्या बात है! अप्रतिम. सर्व मुखवास सोपे आहेत करायला.
20 Oct 2015 - 7:17 pm | मांत्रिक
जबरा आहेत मुखवास!!! खूप आभार वेगळा विषय हाताळल्याबद्दल!!!
21 Oct 2015 - 8:21 pm | Mrunalini
मस्त आहेत गं रेसिपी सगळ्या. ह्यातली मी मसला मुपारी केली आहे. आवळ्याची सुपारी नक्की करुन बघितली असती, पण ते हि इथे मिळत नाहित. :(
21 Oct 2015 - 8:44 pm | के.पी.
खुप छान माहिती आहे लेखामधे.
पाकृ-फोटोज दोन्ही छान.
21 Oct 2015 - 9:20 pm | आरोही
हात टेकले तुझ्यापुढे !! हे घरी बनवायचा मी स्वप्नातही विचार करू शकत नाही ...सहिच दिसतायेत सगळे मुखवास !!
23 Oct 2015 - 6:33 pm | अनन्न्या
भरपूर प्रकार दिलेस, आता एकेक करून पाहते.
25 Oct 2015 - 9:26 pm | त्रिवेणी
तांबूल करुन बघेन मी आता. मसाला सुपारी नाही आवडत मला.
आणि आवळा पण ठेवलाय यादीत.
26 Oct 2015 - 10:09 pm | रेवती
मिक्सरमधून तांबूल क्रश करण्याची आयडिया भारी आवडली. हे आधी सुचले नव्हते. माहेरी नेहमी सणवार, नवरात्रे, एकत्र जमून करायची असतात. (पंचवीसेक) विडे करायचे काम वडिलांकडे असल्याने एकेक विडा करण्यातला त्रास लक्षात आला नव्हता. आता त्यांना तांबूल कुटण्याची कल्पना सांगणार आहे. झटपट काम होईल.
बाकीच्या सुपार्या/मुखवासही आवडले.
27 Oct 2015 - 10:07 pm | अदि
सुंदर दिसतायत मुखवास!!
28 Oct 2015 - 3:57 pm | मीता
खुप छान माहिती आहे लेखामधे.मस्त पाकृ
29 Oct 2015 - 5:13 pm | कविता१९७८
छान माहीती, ठाण्यात चॅरीटी हॉल ला एक सीझलर्स चं छोटेसे हॉटेल आहे , व्हेज - नॉन व्हेज दोन्ही प्रकारचे सिझलर्स मिळतात. मिपाकर स्नेहश्री बरोबर गेले होते , शेवटी बिलाबरोबर बडीशेपचे सरबत दिले होते दुधात घालुन छोटुश्या ग्लासेस मधे, अप्रतिम चव होती. अजुन जीभेवर रेंगाळतीये.