कढी आणि सार

पैसा's picture
पैसा in रूची विशेषांक
15 Oct 2015 - 5:40 pm

.

* छायाचित्र आंतरजालावरून साभार

आपल्याला जेव्हा पटकन होणारं आणि हलकं काहीतरी जेवणात हवं असतं तेव्हा "पटकन पिठलं भात किंवा कढी भात करूया" असं बहुतेकवेळा म्हटलं जातं. पिठल्याचे बरेच प्रकार असतात तसेच कढीचेही बरेच प्रकार आम्ही करतो. सार हा कढीचा सख्खा भाऊ म्हटलं तरी चालेल. कढीमधे उकळलेली आणि थंड कढी/सार असे दोन प्रकार असतात. उकळलेली कढी किंवा सार हे गरम भाताबरोबर घेतले जाते तर थंड कढी (तंबळी) सहसा जेवण संपवताना ताकासारखी प्यायली जाते किंवा उन्हाळ्यात थंड भाताबरोबर घेतली जाते. इथे मी साधारण तळकोकण, गोवा, कारवार भागात केल्या जाणार्‍या कढ्या आणि सारांच्या काही कृती देते. याशिवाय सिंधी कढी, गुजराती कढी वगैरे असंख्य प्रकार करता येतातच.

सुरुवातीला बघू कढीचे काही प्रकार

१) ताकाची कढी: आंबट ताकात आले, कढीलिंबाची पाने आणि हिरव्या मिरचीचे झेपतील तेवढे तुकडे घालणे. चवीप्रमाणे मीठ, किंचित साखर, हळद घालणे. थोडे ओले खोबरे आणि कोथिंबीर घालणे. वरून तुपात हिंग जिर्‍याची फोडणी करून घालणे आणि फुटणार नाही अशा बेताने उकळणे.

यात थोडा वेगळा प्रकार म्हणजे आल्याच्या तुकड्यांऐवजी आले लसणीची पेस्ट घालून कढी होते किंवा ताकात २ चमचे बेसन कालवून घालून वेगळ्या पद्धतीची कढी करता येते. बेसन घातल्यामुळे कढीला थोडा दाटपणा येतो. मात्र चव बदलते.

२) ताकतवः ताकात हिरवी मिरची तुकडे करून, कोथिंबीर चिरून घालणे, मीठ साखर घालणे आणि वरून तुपात जिरे मोहरी, हिंग आणि कढीलिंबाची पाने घालून फोडणी देणे. हे फार वेळ तापवायचे नाही.

३) सुंठीची कढी: सुंठ उगाळून किंवा सुंठीची पूड थोडी ताकात घालणे. त्यात हिंग, मीठ, सैंधव, पादेलोण घालणे. मंद विस्तवावर उकळणे. गरमागरम कढी अतिशय उत्तम पाचक समजली जाते. किंवा थंडीत अशीच सूपसारखी प्यायलाही छान लागते.

४) जिर्‍या-मिर्‍याची कढी: जिरे, मिरे, लसूण पाकळ्या (एक गड्डी) हिरव्या मिरच्या हे सर्व तुपात भाजून घेणे. त्यात एका नारळाच्या वाटीचे ओले खोबरे घालून वाटणे. त्यात ७/८ ओट सोले किंवा चिंच घालणे. मीठ व पुरेसे पाणी घालून उकळणे. वरून तुपात लसणीची फोडणी देणे.

५) लसणीची कढी: वर दिल्याप्रमाणेच. फक्त जिरे मिरे न घालता फक्त लसणीचे २ गड्डे आणि ३/४ सुक्या मिरच्या, चिंच, एका नारळाच्या वाटीच्या खोबर्‍यात वाटणे. मीठ घालणे. वरून तुपात मोहरी, हिंग, कढीलिंब पाने आणि लसणीची फोडणी देऊन उकळणे.

६) विड्याच्या पानांची कढी: ६ विड्याची पाने, जिरे, मिरे, हिरव्या मिरच्या, लसणीच्या ४ पाकळ्या तुपावर भाजून घेऊन चिंच व एका नारळाच्या वाटीच्या ओल्या खोबर्‍याबरोबर वाटणे. मीठ घालून उकळणे. तुपात हिंग, मोहरी, लसूण कढीलिंबाची पाने यांची फोडणी घालणे.

७) तिरफळांची कढी: ८/१० फिरवी तिरफळे तुपात भाजून घेणे. २/३ ओल्या मिरच्या, भाजलेली तिरफळे चिंच व एक नारळाच्या वाटीच्या ओल्या खोबर्‍याबरोबर वाटणे. मीठ घालून उकळणे. मोहरी, हिंग, कढीलिंब पाने तुपात घालून फोडणी देणे.

थंड कढी:

१) सोलकढी: ७/८ आमसुले थोडावेळ भिजत घालून ते पाणी किंवा २ चमचे आगळ मिसळलेले पाणी घेणे. (आगळ घातले तर चव थोडी वेगळी लागते. पण आमसुले भिजत ठेवायला वेळ नसेल तर इलाज नाही) त्यात एका नारळाच्या वाटीच्या ओल्या खोबर्‍याचे जाड व पातळ दूध घालणे. नारळाचे दूध काढताना ४ लसणीच्या पाकळ्या वाटून घालणे. मीठ घालून नीट ढवळणे. ही कढी थंडच प्यायची.

यात थोडाथोडा फरक करून म्हणजे २/३ मिरच्यांचे तुकडे घालून, हिंग घालून, जिरेपूड घालून, किंचित साखर घालून, कोथिंबीर घालून अशीही कढी करतात.

२) फुटी कढी: ७/८ आमसुले भिजवून ते पाणी किंवा २ चमचे आगळ घातलेले पाणी घेणे. त्यात थोडा कांदा बारीक चिरून, २/३ मिरच्या उभ्या चिरून, मीठ आणि चवीप्रमाणे साखर, हिंग, जिरेपूड घालून फुटी कढी तयार होते. याला गोव्यात तिवळ असेही म्हणतात. यात नारळाचे दूध नसल्याने ती 'फुटी' कढी. (गोव्यात बिनदुधाच्या चहालाही 'फुटी चा' म्हणतात.) ही फुटी कढी माशांच्या जेवणानंतर हवीच. अतिशय पाचक समजली जाते.

तंबळी (थंड कढी):

१) हिंगाची तंबळी: अर्धा लहान चमचा हिंग तुपात भाजून घेणे. एक नारळाच्या एका वाटीचे ओले खोबरे, ४/५ सुक्या मिरच्या, हिंग एकत्र वाटून त्यात चिंचेचे पाणी व मीठ घालून हवे तेवढे पातळ करून घेणे.

२) विड्याच्या पानाची तंबळी: विड्याची पाने व हिंग तुपावर गरम करून घेणे. वरीलप्रमाणे चिंच, मिरच्या, एका नारळाच्या वाटीच्या ओल्या खोबर्‍याबरोबर वाटून मीठ घालून हवे तेवढे पातळ करून घेणे.

३) ओल्या मिरच्यांची तंबळी: ५/६ ओल्या मिरच्या तुपावर भाजून घेणे. एका नारळाच्या वाटीचे ओले खोबरे, मिरच्या वाटून घेणे. त्यात हवे तसे ताक व मीठ घालून पातळ करून घेणे.

४) लसणीची तंबळी: लसणीचा गड्डा सोलून तुपात भाजून घेणे. त्यात नारळाच्या एका वाटीचे ओले खोबरे, ३/४ सुक्या मिरच्या घालून वाटणे. ताक व मीठ घालून पातळ करणे.

५) तिरफळांची तंबळी: ७/८ हिरवी तिरफळे तुपात भाजून घेणे. सुक्या मिरच्या, चिंच, हिंग व एका नारळाच्या वाटीच्या ओल्या खोबर्‍याबरोबर वाटणे. मीठ व पाणी घालून हवे तसे पातळ करून घेणे.

सार

१) टोमॅटोचे सारः ४ टोमॅटो शिजवून साले काढून टाकणे. गर कुस्करून घेणे. तुपाची फोडणी करून त्यात हिंग जिरे घालणे. त्यात आले लसूण मिरची कोथिंबीर, खोबरे वाटून घालणे. टोमॅटोचा गर घालून मीठ साखर घालणे. हवे तेवढे पाणी घालून उकळणे.

२) तूरडाळीचे सारः तूरडाळ चांगली शिजवून घोटणे. त्यात आल्याचे बारीक तुकडे करून व मीठ घालणे. पातेल्यात तेल तापवून त्यात सुक्या मिरच्या, मोहरी व कढीलिंबाची पाने घालून फोडणी करणे. त्यात शिजलेली डाळ व हवे तेवढे पाणी घालून पातळ करून चांगले उकळणे.

गोव्यात फोडणी न घालता केलेल्या अशा साराला दाळीतोय म्हणतात. तूरडाळ शिजवून घोटून घेणे. त्यात आल्याचे तुकडे, हिरव्या मिरच्या उभ्या चिरून, कढीलिंबाची पाने आणि चवीप्रमाणे मीठ आणि भरपूर पाणी घालून उकळणे. गरम भात व बटाट्याच्या वगैरे कापांबरोबर दाळीतोय हा अतिशय आवडता मेनु आहे.

३) आमसुलाचे सार: ४/६ आमसुले कोमट पाण्यात भिजवून किंवा २ चमचे तयार आगळ एक वाटी नारळाच्या ओल्या खोबर्‍याचे दूध काढून त्यात घालणे. मीठ घालणे. लसणीच्या ४ पाकळ्या व १/२ हिरव्या मिरच्या वाटून घालणे. वरून तुपात हिंग जिर्‍याची फोडणी करून पातळ करणे. गॅसवर ठेवून कोमट करणे. (उकळू नये.)

याचा दुसरा प्रकार म्हणजे थोडी साखर घालणे, आणि नारळाचे दूध व लसूण न घालता फोडणीत ३/४ सुक्या मिरच्या घालणे. हे सार उपासाला चालते.

४) कैरीचे सारः २ मोठ्या कैर्‍या उकडून गर काढून घेणे. एक वाटी नारळाच्या खोबर्‍याचे दूध काढणे. त्यात २ वाटलेल्या हिरव्या मिरच्या, मीठ, अर्धा चमचा मेथी दाणे, थोडा गूळ, एक छोटा चमचा बेसन घालून कालवणे. तुपात जिरे, हिंग, कढीलिंबाची पाने घालून फोडणी करणे. त्यात कैरीचा उकडलेला गर आणि नारळाच्या दुधाचे मिश्रण घालून हवे तितके पाणी घालून उकळणे. वरून थोडी कोथिंबीर घालणे.

अशाच प्रकाराने अननस तसेच अर्धवट पिकलेल्या आंब्याचेही सार करतात.

५) कळणः कोणतेही कडधान्य शिजवताना जरा जास्त पाण्यात शिजवणे. हे जास्तीचे पाणी काढून घेऊन त्यात मीठ, साखर व एक वाटी ताक घालणे. तेलात जिरे, मोहरी, हिंग, ओल्या मिरच्यांचे तुकडे आणि ४ लसूण पाकळ्या यांची फोडणी करून त्यात तयार केलेले कडधान्याचे पाणी व ताकाचे मिश्रण घालणे. कोथिंबीर घालून गरम करणे. हे कळण आजारी किंवा अशक्त माणसाला हमखास प्यायला देतात. शिजलेल्या कडधान्याची नेहमीप्रमाणे उसळ केली जाते.

६) चिंचेचे सारः एका लिंबाएवढ्या चिंचेचा कोळ काढून घेऊन त्यात हवे तेवढे पाणी घालणे. त्यात चवीप्रमाणे गूळ, मीठ, तिखट व जिरेपूड घालणे. मंद विस्तवावर उकळी काढणे. वरून तुपात जिरे, हिंग, कढीलिंबाची पाने २ सुक्या मिरच्यांची फोडणी घालणे.

७) कोथिंबिरीचे सार अर्धी जुडी निवडून धुतलेली कोथिंबीर, एका नारळाच्या वाटीचे खोबरे, ७/८ लसूण पाकळ्या, थोडे आले, २ हिरव्या मिरच्या हे सर्व वाटून घेणे. पातेल्यात तुपात हिंग जिर्‍याची फोडणी करून त्यावर वाटण घालणे. एक चमचा चिंचेचा कोळ, चवीपुरते मीठ, साखर घालणे आणि बेताची उकळी काढणे.

___________

कढीच्या जवळचे असे इतर प्रांतातील गट्ठे की कढी, रसम्, कटाची आमटी वगैरे कित्येक प्रकार आहेत. ते बदल म्हणून अधून मधून जरूर करावेत.

कढी आणि सार करण्यात फायदा म्हणजे ते पचायला हलके असतात. इतर स्वयंपाक करता करता एकीकडे पटकन करून होतात. आणि जेवणाची रुचि वाढवतात. नारळाचे दूध घातलेली किंवा ताक असलेली कढी उकळताना नेहमी मंद विस्तवावर उकळावी कारण लक्ष न दिल्यास ताक्/नारळाचे दूध फुटते आणि त्यातले पाणी वेगळे दिसायला लागते.

_/\_

प्रतिक्रिया

अमृत's picture

16 Oct 2015 - 12:05 pm | अमृत

यातील बर्‍याच कढ्या प्रथमच माहिती झाल्यात. जरूर करून पाहील.

तटी - वाखु साठवायची सोय का दिलेली नाही?

त्रिवेणी's picture

16 Oct 2015 - 2:28 pm | त्रिवेणी

तीवळ कांड्या कांद्या शिवाय सुद्धा करतात का

पैसा's picture

19 Oct 2015 - 10:10 pm | पैसा

आपल्या आवडीप्रमाणे. जिर्‍याची पूड आणि हिंग, मिरची कोथिंबीर घालूनही करतात.

प्रीत-मोहर's picture

16 Oct 2015 - 3:02 pm | प्रीत-मोहर

कढी शिवाय जेवण पुर्ण होत नाही. इतके बोलुन मी माझे दोन शब्द संपवते.
अवांतर: पैसाक्का मस्तच झालय कलेक्षन. सोलकढीच्या फोटोने जीव गेला माझा.
माझ्या साबा तंबळी चे अजुन बरेच करतात. त्यांना विचारुन इथेच टाकते रेशिप्या.

प्रचेतस's picture

16 Oct 2015 - 3:29 pm | प्रचेतस

हे सगळेच पदार्थ आवडीचे.

कढ्यांचं उत्तम कलेक्शन एकाच जागी मिळालं.वाचूनच तोंपासु!

अनन्न्या's picture

17 Oct 2015 - 11:12 am | अनन्न्या

मला बाबा लहानपणी कढीभट म्हणायचे, रोज कढी मागायचे मी आईकडे! तंबळीला मातीच्या खापरातली फोडणी असायची.

इशा१२३'s picture

17 Oct 2015 - 3:13 pm | इशा१२३

बापरे किती प्रकारच्या या कढ्या अन सार.यातल्या काहि प्रकार तर फक्त ऐकुनहि माहित नाहित.खजिनाच मिळाला.आता एकएक करून पहाते.

आरोही's picture

21 Oct 2015 - 9:22 pm | आरोही

अगदी असेच म्हणते !!बरेच प्रकार नव्यानेच कळले नक्की करून पाहण्यात येतील ...

पिशी अबोली's picture

17 Oct 2015 - 10:03 pm | पिशी अबोली

छानच संग्रह.
हल्लीच काकूच्या घरी बेलपाने व माक्याची पाने वापरून केलेली तंबळी प्याले. नाहीतर तो प्रकार माहीत नव्हता.

पैसा's picture

19 Oct 2015 - 10:12 pm | पैसा

मी अगदी थोडेच प्रकार दिलेत. माझी मंगलोरची मैत्रीण कसल्याही कोवळ्या अंकुरांची (पानांची) तंबळी होते असे म्हणते.

मधुरा देशपांडे's picture

18 Oct 2015 - 2:42 am | मधुरा देशपांडे

किती ते प्रकार. नवीन कळाले बरेचसे. यातले जे शक्य आहे इथे करणे, त्यातही खास करुन आता हिवाळ्यात ते नक्कीच करुन बघेन.

मांत्रिक's picture

18 Oct 2015 - 1:03 pm | मांत्रिक

अगदी झक्कास कढी संग्रह! मला स्वतःला गुजराती कढी खूप आवडते. कधी जमलं तर रेसिपी टाकेन. माझी सौ. खूप छान बनवते. काल मी स्वतः माझा लेख आठचा थाट तयार करण्यात गुंतलो होतो. त्यामुळे इकडे येता नाही आलं. पण आता संपूर्ण अंक वाचतोय.
एक महत्वाची सूचना. - हा संपूर्ण अंक पीडिएफ स्वरुपात उपलब्ध करुन द्यावा जेणेकरुन एक स्वतंत्र फाईल म्हणून सेव्ह करता येईल. अजून एक त्रासदायक अनुभव म्हणजे आजवर ज्या ज्या लेखांना बुकमार्क करायचा प्रयत्न केला ते लेख माझ्या खात्यावर कधीच सेव्ह होत नाहीत. असं का होतंय?

प्रीत-मोहर's picture

18 Oct 2015 - 1:56 pm | प्रीत-मोहर

सध्या वाचनखुणा चालत नाहीयेत मांत्रिकदादा

प्रीत-मोहर's picture

18 Oct 2015 - 2:09 pm | प्रीत-मोहर

सध्या वाचनखुणा चालत नाहीयेत मांत्रिकदादा

प्यारे१'s picture

18 Oct 2015 - 5:00 pm | प्यारे१

खासच!

सामान्य वाचक's picture

18 Oct 2015 - 10:52 pm | सामान्य वाचक

मग मणभर भात हापसला जातो

आता २-३ आठवड्यात जमेल तेवढे प्रकार करणार :) खूप मस्त मस्त प्रकार आहेत.

वाह..केवढे प्रकार कढीचे..बरेचसे माहितही नाहीत..आता सगले करून पाहीन..

सानिकास्वप्निल's picture

19 Oct 2015 - 8:37 pm | सानिकास्वप्निल

वाह !! लाजवाब!!
मला बेसन असलेली कढी अजिबात आवडत नाही पण सोलकढी, फुटी कढी आणि जिर्‍यामिर्‍याची कढी आवडते प्रकार.
तू तर किती विविध प्रकार दिले आहेस, मी तंबळी, ताकतव, विविध सार नक्की नक्की ट्राय अरणार.
धन्यवाद पैताई __/\__

केवढे हे प्रकार कढ्यांचे. एक एक नक्की करुन बघेन. हिवाळ्याच्या तोंडावर दिल्या आहेस नेमक्या.. माहिती पण नव्हते मला यातले बरेच प्रकार. केवढा मोठ्ठा खजिना आहे आपल्याकडे. मी सगळे लेख वाचुन हाच विचार करते आहे की बाहेर जे भारतीय कुझिन माहिती आहे ते खरं तर १ % पण नाही एकुण वैविध्यतेच्या आणि तरी तुफान लोकप्रिय आहे. आपण फार फार नशिबवान आहोत.

काल यातली फुटी कढी केली. दोघी मिळून पातेलंभर प्यायलो !!!!

मी या लेखाची वाटच बघत होते.

(कढीआमटीसारसांबाररस्समसूपप्रेमी) मितान

दिपाली पाटिल's picture

21 Oct 2015 - 1:23 am | दिपाली पाटिल

खुप छान माहीती, बर्‍याच कढ्या सारं अत्ता समजली. विड्याची कधी पारंपारिक पाकृ आहे कां?

विड्याच्या कढी मध्ये ताक वापरायचंय कां? ६ विड्याची पाने + जिरे + मिरे + हिरव्या मिरच्य + लसणीच्या ४ पाकळ्या तुपावर भाजून की फक्त लसूण तुपावर भाजायचाय?, एका नारळाची अख्खी वाटी कि अर्धी वाटी नारळाचा चव घ्यायचा?

आज-उद्या बनवून बघेन म्हणतेय.

पैसा's picture

22 Oct 2015 - 6:19 pm | पैसा

कारवार मंगलोरकडे विड्याच्या पानाच्या तशाच सगळ्याच कोवळ्या पानांच्या तंबळ्या करतात. हे वर दिलेले सगळे साहित्य तुपावर भाजून घ्यायचे आहे. नारळाच्या एका वाटीचा चव सगळा घ्यायचा. म्हणजे अर्धा नारळ.

पिलीयन रायडर's picture

21 Oct 2015 - 1:05 pm | पिलीयन रायडर

कढी करताच येत नाही ग मला... :(
पण कढी..सुप..सार.. फार फार आवडतात. आता तुझ्या लिश्टीतले करण्यासारखे प्रकार ट्राय करेन!

एवढ्या ऑप्शन्ससाठी धन्यु!

ताई अगं किती वेगवेगळे प्रकार दिलेस. मी तर कधीच ऐकले पण नव्हते. सुंठीची कढी, विड्याच्या पानांची कढी, तिरफळांची कढी, फुटी कढी हे सगळे मला नवीन आहेत.

के.पी.'s picture

21 Oct 2015 - 8:25 pm | के.पी.

कित्ती कित्ती ते प्रकार कढ्यांचे!!
तंबळी प्रकार पहिल्यांदाच ऐकतेय. विड्याच्या पानाची तंबळी फारच इंटरेस्टिंग आहे..तिला विड्याच्या पानांमुळे वेगळीच चव असणार एवढं नक्की.

पद्मावति's picture

21 Oct 2015 - 9:12 pm | पद्मावति

वॉव....मस्तं. कढी आणि सारांचे इतके प्रकार पहिल्यांदाच ऐकतेय. खूपच छान प्रकार आहेत. अतिशय उपयुक्त लेख.

बोका-ए-आझम's picture

23 Oct 2015 - 1:15 pm | बोका-ए-आझम

तर मी कढीच जेवतो. सोलकढी आणि आपली ताकाची कढी या तर all time favourites आहेत. विदर्भातली वडाभाताबरोबरची कढी तर खासच अाणि साऊथ इंडियन रेस्टॉरंटमध्ये मिळणाऱ्या कढीवड्याबरोबरची (कॅफे मद्रास, शारदा भुवन, रामाश्रय आणि तत्सम माटुंगा परिसरातल्या) कढी ही सुद्धा मस्त! लेखही तसाच मस्त!

नूतन सावंत's picture

24 Oct 2015 - 9:38 pm | नूतन सावंत

मस्त संकलन,पैताई.मलाही थंड गरम दोन्ही कढ्या आवडतात.विड्याच्या पानांची तंबळी पिऊन किती वर्षं झाली.आता घरात कोणी पान खाणारंनाही.आता विकत आणून करायला हवीच.

सॉलिड प्रकार दिले आहेत.. सगळे ट्राय करणार :) थैंक्यू पै ताई....

विशाखा राऊत's picture

25 Oct 2015 - 3:29 am | विशाखा राऊत

कढी कलेक्शन मस्तच. खुप वेगळे प्रकार कळले. मस्त मस्त लेख

विड्याच्या पानाची कढी! जबरा!

कढी हा प्रकार अखिल भारतीय आहे. गुजरात, राजस्थान, आसाम आणि हरियाणा पद्धतीने केलेल्या कढ्या मित्रमैत्रिणींच्यामुळे खाल्ल्या आहेत.

स्वाती दिनेश's picture

25 Oct 2015 - 11:17 pm | स्वाती दिनेश

मस्तच धागा.. एकेक नवे प्रकार करून पाहिन.
स्वाती

कढीचे इतके प्रकार असतात हे नव्याने समजले. ताकला बेसन लावणे, कधीबदल म्हणून काकडी चोचवून घालणे तर कधी गोळे घालून कढी करणे एवढेच माहित होते. जिर्‍या मिर्‍याची कढी, विड्याच्या पानांची कढी व तंबळीचे प्रकार म्हणजे मेजवानी असल्यासारखे वाटतेय. एकूणातच सगळ्या कृतींमध्ये ताक, हिंग, कोकम, विड्याचे पान, मिरे यांचा वापर आहे, जे पदार्थ पाचक म्हणून ओळखले जातात. फारच छान कृती आहेत.

पैसा's picture

28 Oct 2015 - 9:47 am | पैसा

सर्व वाचक प्रतिसादकांना मनापासून धन्यवाद!

कविता१९७८'s picture

29 Oct 2015 - 5:21 pm | कविता१९७८

बापरे इतक्या प्रकारच्या कढ्या असतात? , मला तर चिंचकढी(सार) , ताकाची कढी, कच्च्या कैरीची कढी आणि कोकमाची कढी(सार) व सोलकढी इतकेच माहीतीये.

मस्त माहीती आणि रेसिपीज पैसाताई

प्रीत-मोहर's picture

13 Dec 2016 - 12:09 pm | प्रीत-मोहर

माझी पणजी सासुच्या रेसिपीने वट्टेलांवाच्या पानांची तंबळी आणि चटणीवर्च दिवस काढला.

या धाग्याची आठवण झाली एका मैत्रिणीमुळे म्हणुन वर काढतेय

सस्नेह's picture

6 Mar 2017 - 11:47 am | सस्नेह

वाखू ठेवली आहे !